तमिळनेट.कॉम: लोकप्रिय मानववंशशास्त्र, राष्ट्रवाद व आंतरजाल यांबाबत काही विचार

संकल्पना

तमिळनेट.कॉम: लोकप्रिय मानववंशशास्त्र, राष्ट्रवाद व आंतरजाल यांबाबत काही विचार

मूळ लेखक - मार्क विटेकर

भाषांतर - उज्ज्वला

गोशवारा :

जगभर विखुरलेल्या तमिळ भाषक तसेच इंग्रजी येणाऱ्या उच्चभ्रू लोकांवर प्रभाव टाकण्याच्या उद्देशानं काही श्रीलंकन तमिळ लोकांनी सुरू केलेल्या तमिळनेट.कॉम या आंतरजालीय वृत्तसंस्थेद्वारा औपरोधिक वृत्तांकन शैली आणि मानववंशशास्त्राची सोयीस्कर ढाल वापरून पद्धतशीरपणे श्रीलंकेतील नागरी युद्धाच्या आंतरराष्ट्रीय वृत्तांकनाला वेगळं वळण दिलं असा माझा दावा आहे. माझा असाही दावा आहे की याद्वारे स्ववंशकेंद्रित लोकप्रिय मानववंशशास्त्राची भलामण करून व्यावसायिक मानववंशशास्त्राला आव्हान दिलं आणि काही अंशी त्याची हकालपट्टी केली. या निबंधाच्या पहिल्या दोन भागांत लोकप्रिय म्हणजे काय, मानववंशशास्त्रज्ञ आणि सामाजिक सिद्धांत मांडणारे संशोधक मानववंशशास्त्र ही संज्ञा वापरताना दोन एकमेकांशी निगडित तरीही स्वतंत्र अशा लोकप्रियतेच्या प्रकारांबाबत कसं बोलतात हे सांगणार आहे – एक बॉड्रिलार्डप्रणित बाजारतंत्री लोकप्रियता आणि दुसरी हेबरमासप्रणित अस्मिता-रक्षक लोकप्रियता. त्यानंतर आंतरजाल तंत्राधिष्ठित असल्यानं त्याचं रूप बाजाराधिष्ठित लोकप्रियतेचं पण आशय अस्मिता-रक्षक लोकप्रियतेचा आहे हे दाखवून देईन. उरलेल्या चार भागांत श्रीलंकेच्या नागरी युद्ध काळात जगभर विखुरलेल्या तमिळ भाषकांना साद घालताना तमिळनेट.कॉमच्या कर्त्यांनी आंतरजालाचे हे स्वरूप ओळखून त्यांचे स्वतःचे नॅशनॅलिस्ट हितसंबंध मांडणारे संकेतस्थळ कसं सुरू केलं आणि त्याचे वांशिकदृष्ट्या कसे पडसाद उमटले ते मी विशद करेन.

प्रस्तावना

एका छोट्या श्रीलंकन तमिळ गटानं आंतरजालाचा वापर सर्व जगाशी बोलण्यासाठी केला त्याची ही गोष्ट. त्यांनी तमिळनेट.कॉम ही वृत्तसंस्था सुरू केली. त्याद्वारे त्यांनी आश्चर्यकारकरीत्या आंतरराष्ट्रीय वृत्तांकन पद्धतीचं वरवर अनुकरण करत, सूक्ष्मपणे खच्चीकरण केलं आणि हे करत असताना त्यांनी पद्धतशीरपणे आपलं जे वांशिक वर्णन केलं त्याला मी स्ववंशकेंद्रित वर्णन म्हणत आहे. मेरी लुइस प्राट यांनी हा शब्द ज्या अर्थानं वापरला तोच मला अभिप्रेत आहे. एखादा दुर्बल सामाजिक गट पद्धतशीरपणे स्वतःची ओळख दुसऱ्या श्रेष्ठ गटाला – इथे पाश्चिमात्य प्रसारमाध्यमं – पटेल, रुचेल अशा स्वरूपात देण्याचा प्रयत्न करतो. ज्याला आपण लोकानुवर्ती मानववंशशास्त्र म्हणतो हे त्याच्या एका प्रकाराचं धडधडीत उदाहरण आहे. राजकीय हेतूंनी प्रेरित लोकानुवर्ती मानवशास्त्राचे आडाखे मानववंशशास्त्र शाखेलाच वेगळं स्वरूप प्रदान करतात आणि त्यानं माझं स्वतःचं मानववंशशास्त्रीय विवेचन अनपेक्षित प्रकारे बदललं आहे. त्यामुळे हा निबंध बराचसा तमिळनेट.कॉम हे संस्थळ आणि त्याचे निर्माते यांबद्दलच आहे. श्रीलंकन तमिळींची स्वतंत्र राज्याची मागणी हा जरी या निबंधाचा मुख्य विषय असला तरी तो माझ्या गेल्या वीस वर्षांमधल्या संशोधनाचा एक भाग आहे. एखादी नॅशनॅलिस्ट मागणी कशी राष्टीय, आंतरराष्ट्रीय आणि कदाचित तमिळींचा अंतर्गत दबाव झुगारून तग धरून राहते, हा माझ्या परिशोधाचा धागा आहे. हे श्रीलंकन तमिळींचं उदाहरण उलगडण्यामागे आंतरजालामुळे वांशिक संस्थळ ही ओळख निर्माण करून बाह्य जगाशी संपर्क प्रस्थापित करत आपलं म्हणणं कस प्रभावीपणे आणि साळसूदपणे रेटणं शक्य होतं ते दाखवणं हा माझा उद्देश आहे. माझा मुद्दा असा की आंतरजाल विशिष्ट प्रकारचं लोकानुवर्ती मानववंशशास्त्र शक्य आणि कदाचित प्रबळ करतं.

काही प्राथमिक स्पष्टीकरणं

लोकानुवर्ती मानववंशशास्त्र या शब्दप्रयोगात मानववंशशास्त्राच्या संदर्भात 'लोकानुवर्ती' म्हणजे काय हे आधी ठरवलं पाहिजे. ते तितकं सोपं नाही. १९९९ साली बेर्डाल आणि फिलिप्स हे दोघं आपापल्या लेखांमध्ये त्याचा एकमेकांजवळ जाणारा तरीही वेगवेगळा अर्थ लावत होते.

एकीकडे जनसमूहानं विकत घ्यायची सांस्कृतिक उत्पादनं असा त्याचा अर्थ होतो. हे अर्थात पॉप संगीत, पॉप मिडिया - ज्याचा परिपाक विचारवंतांनी नाकं मुरडावीत अशा पॉप्युलरायझेशन नावाच्या सवंग लोकप्रियतेत होतो - अशा बाबतींत होतं. अशा प्रतिमा आणि आभास, अतिवास्तवता आणि अर्थाचं आरोपण या बाबींमुळे बॉड्रिलार्ड यांनीही १९९७च्या आपल्या एका लेखात याबाबत काळजी व्यक्त केली होती. तर दुसरीकडे लोकानुनयी सांस्कृतिक उत्पादनं – ग्राफिटी म्हणजे भिंतीवर लिहिलेला विद्रोही मजकूर, लोकाश्रयी (बाबा-बुवा यांचा 'धर्म' (सत्संग) इ.) – शैक्षणिकसह सर्व व्यवस्थाबाह्य पद्धतीनं सामान्यांच्या रोजच्या भाषेत आणि स्वरूपातील अभिव्यक्ती असा त्याचा अर्थ होतो. इथे लोकसंगीत, लोकनृत्य आणि तशाच स्थानिक पारंपरिक व्यवस्थेबाहेरच्या चळवळी हे सगळं काही येतं.

अर्थात, या दुसऱ्या प्रकारच्या लोकप्रिय गटात मोडणाऱ्या चळवळींचं स्वरूप कोणत्याही विचारप्रणालीचं असू शकतं. म्हणजे एकीकडे महात्मा गांधी, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग यांच्या लोकसहभागी चळवळींबद्दल आता, हे तीनही महापुरुष काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर किंवा सत्ताबाह्य झाल्यावर, पाश्चिमात्य जग आदरानं बोलू लागलं. अशा प्रकारचं, आणखी एक लोकांच्या पाठिंब्याचं, जरासं तऱ्हेवाईक उदाहरण १९९८मध्ये अमेरिकेत घडलं. जेसी वेंटुरा हा एकेकाळचा व्यावसायिक कुस्तीगीर मिनेसोटाचा राज्यपाल झाला. आणि पुढे अर्‌नॉल्ड श्वार्झनेगर. काही वेगळ्या प्रकारच्या लोकाश्रयी चळवळी आणि चेहरे नकारात्मक आणि दुर्दैवी होते – खुआन पेरॉन आणि त्याची पेरोनिस्टास, एडॉल्फ हिटलर आणि त्याचे नॅशनल सोशलिस्ट्स, किंवा अमेरिकेतलं वंशद्वेष्टं कू क्लुक्स क्लान. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर या प्रकारचा जनाधार तसा तटस्थ असतो आणि त्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण बसू शकतं. म्हणूनच वर उल्लेखलेल्या कोणत्याही चळवळी किंवा व्यक्तींपेक्षा राजकीयदृष्ट्या संदिग्ध अशा चळवळीचं उदाहरण आपल्यासाठी अधिक समर्पक ठरेल. ते आहे श्रीलंकेतलं सिंहली-बहुल आणि सिंहल-वंशाभिमानी भूमीत तशाच तमिळ वांशिक राष्ट्रवादाचा उदय आणि रक्तरंजित प्रवासाचं. तमिळ वंशवाद हा सिंहली वंशवादाला उत्तर म्हणून फोफावला आणि त्यातून पुढे दोन दशकं नागरी युद्ध चालू राहिलं. म्हणजे इथे आपल्याला अस्मिता आणि प्रतिकार या छापाची लोकमान्यता पाहायला मिळते. तिचं ध्येय होतं सार्वजनिक जीवनात आपलं अस्तित्व राखणं, नव्यानं शिरकाव करणं, त्यायोगे सार्वजनिक अवकाश बदलणं किंवा निर्माण करणं.

या दोन वेगळ्या प्रकारच्या लोकप्रियता किंवा जनाधार आहेत. बॉड्रिलार्ड यांच्या मते बाजारतंत्री लोकमान्यतेनं लोकप्रियतेचे बाकी सर्व प्रकार व भाषा गिळून टाकले आहेत. समाजाच्या माध्यमांवर होणाऱ्या आक्रमणामुळे जनसमूहांना गप्प बसण्याखेरीज काही करण्यासारखं उरलेलं नाही. हेबरमास यांच्या लेखी बाजारतंत्री लोकप्रियता हे केवळ संवादप्रक्रियेचं विस्थापित रूप असून त्यातली विसंगत विधानं कोणत्याही संवादी लोकशाहीमध्ये उघडी पडतील. या दोन्ही मतांमागची तात्त्विक बैठक भक्कम आहे, पण आपण त्याकडे वळणार नाही. आपण मानववंशशास्त्रदष्ट्या इतकंच म्हणू शकतो, की अनेक लोक आता या दोन्ही प्रकारच्या लोकप्रियता अस्तित्वात आहेत हे धरूनच संघर्ष करत राहतात. मात्र या दोन प्रकारांतला गोंधळ टाळणं महत्त्वाचं आहे; कारण बाजारतंत्री लोकप्रियतेची गल्लत अस्मिता-रक्षक लोकप्रियतेबरोबर व्हावी हे बाजारलक्ष्यी धोरणांना अनुकुल असतं. उदाहरणार्थ, अमेरिकेत टीव्हीवर दिसणारे, लोकांच्या मतांवर आधारित पुरस्कार सोहळे पाहा. त्यातल्या जाहिराती जणू उत्स्फूर्त प्रतिसादाचा परिपाक असल्याचं भासवलं जाते. (उदाहरणार्थ, पेप्सी जनरेशन, किंवा आमच्यासारख्या म्हाताऱ्यांना 'इटस् मॉर्निंग इन अमेरिका'.)

एका बाजूला अशा संदिग्धतेचा उपयोग वस्तूंची विक्री होण्यात होतो आणि आपण पुढे पाहूच की प्रतिकार झाकण्यासाठीही होतो. त्यातून स्पष्टता लयाला जाते. तेव्हा, अशा धूसरतेतून वाट काढण्याची क्षमता गमावू नये म्हणून – तमिळनेट.कॉमच्या बाबतीत त्याची आपल्याला फारच गरज असणार आहे – "बाजारतंत्री" आणि "अस्मिता- रक्षक" लोकप्रियता हे दोन भेद विसरून चालणार नाहीत. कोणत्याही प्रकारची ओळख अधोरेखित करणं – मग ते एखादी गुंडांची टोळी असो की एखादं लोकगीत किंवा एखादा पोशाख हे जेव्हा लोकांच्या डोळ्यात भरतं तेव्हा ती एक प्रकारे टिकण्याची धडपडच असते. स्टीफन फेल्ड यांनी आपल्या जागतिक संगीतावरच्या लेखात म्हटल्याप्रमाणे असं प्रकटन हेसुद्धा एक वस्तू बनतं आणि त्याला बाजारतंत्री अधिष्ठान प्राप्त होतं. पण अशा प्रकारचं व्यापारीकरण केवळ कार्यपद्धतीतील बदल अशा रूपात उरत नाही, तर विटगेनस्टाइनच्या शब्दांत सांगायचं तर तो जगण्याचा प्रकार होतो आणि त्याला वेगळे नियम लागू होतात. का? कारण बाजारतंत्री लोकप्रियता हे सामूहिक विधान करणं असतं आणि त्यात कोणत्याही विरुद्ध विधानाला स्थान नसतं. ब्रेकफास्ट सिरिअल हे उत्पादन म्हणून दुसरं काही नसतात किंवा त्यांच्या उपयुक्ततेबाबत वाद होऊ शकतो हेही मान्य करत नाहीत. याउलट "अस्मिता-रक्षक" लोकप्रियता प्रतिवादाची शक्यता गृहीत धरते. अगदी एखाद्या टोळीची निशाणी दुसऱ्या असल्या-नसल्या टोळीपेक्षा स्वतःला वेगळं दाखवण्याची धडपड असते. त्यामुळेच सर्वच सार्वजनिक संवाद बाजारतंत्री व हुकुमशाही गाजवणारा असतो असं बॉड्रिलार्ड म्हणतात; तर हेबरमास त्याला अस्मिता व प्रतिकार याचा उद्‌गार म्हणूनच पाहतात आणि नीट घडवलेला, धाकदपटशा नसलेला सार्वजनिक संवाद हा खऱ्या लोकशाहीचा एकमेव पाया आहे असं मानतात.

आता जरा "बाजारतंत्री" आणि "अस्मिता-रक्षक" लोकप्रियतांच्या संदर्भात आंतरजालाचा विचार करू. हॅकन, फिशर यांच्यासारख्या मानववंशशास्त्रज्ञांनी याबाबत काय म्हटले आहे ते पाहू. हॅकन यांच्या मते लोक आंतरजालाचा वापर कसा करतात याचं वांशिक आकलन करता येऊ शकेल. त्यांच्या आधी फिशर यांनी आंतरजालाचे मानववंशशास्त्रीय वर्णन करण्यासाठी त्याचे जागतिक पटलीकरण करायला पाहिजे असं जे म्हटलं होतं, त्याचा अर्थ निव्वळ आभासी वास्तव या पातळीवर आंतरजालाकडे न पाहता त्याचं वर्णन करताना सिद्धांत, स्थल-काल आणि भाषा यांचे संदर्भ लक्षात घ्यायला पाहिजेत असा असावा असं मला वाटतं.

मात्र एकंदरीत आंतरजालाबाबतच्या लिखाणाचा सूर नवसहस्त्रकवादी जास्त आणि मानववंशदृष्टीकोनातून कमी असा दिसतो. त्यात मग हॅरेसारखा लिंगभेदांपलीकडचे जालीय भविष्यकाळ रेखाटणारा, ते लॅशप्रणित नव्या जगाची तर्काधिष्ठित मूल्यप्रणाली, ते स्टेफिकना वाटणारं हे इतिहासाचं टोक, ते हेवूड यांचे आंतरजालाबाबत सश्रद्ध–अश्रद्धतेतील दोलायमान हेलकावे, ते शापिरो यांचं आंतरजालामुळे शक्य होऊ घातलेलं राजकीय वर्चस्वाच्या विकेंद्रीकरणाचं भाकित, ते व्हॅलोकिक यांना दिसणारे जुन्या आंतरजालपूर्व मिथकांच्या राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेणारे नवे सांस्कृतिक आयाम अशी विविधता दिसते. त्यांत थोडंफार तथ्यही आहे. मात्र आंतरजालाबाबतचे बहुतेक सर्व सिद्धांत आंतरजालाला "अस्मिता-रक्षक" लोकप्रियतेचा प्रांत मानून चालतात. हार्वे यांच्या लेखी आंतरजालाचा सर्वात रोचक व महत्त्वाचा पैलू म्हणजे तिथे आपली लिंगाधारित ओळख बदलताना, लपवताना, नव्यानं मांडताना ती एकाचवेळी सार्वजनिक आणि अनामिक असते. सामाजिक संवादाचं, त्याच्या चौकटीचं, व्यक्तीच्या अस्तित्वाचंच वेगळं रूप घडवण्याच्या शक्यता या तंत्रज्ञानामुळे निर्माण झाल्या असल्या तरी ते तंत्रज्ञान तटस्थ नाही.

आपल्याला आंतरजालाची आर्थिक बाजू विसरून चालणार नाही. या माध्यमामध्ये संस्थळांची भाषा, रचना, अभिव्यक्ती यांद्वारे – अगदी अर्थार्जन न करणारी संकेतस्थळंदेखील – वाचकवर्ग आकर्षित करण्यासाठी "विपणना"च्या भाषिक कसरती करतातच. सर्च इंजिनसारख्या आंतरजालावरील माहिती शोधणाऱ्या संगणकप्रणालींचा आधार घेऊनच बहुतेकजण जालीय विश्वात वावरतात त्यामुळे लोकप्रियतेला बाजारतंत्री अधिष्ठान प्राप्त होतंच. टिम बर्नर ली यांनी जेव्हा world wide webची निर्मिती universal resource locator file access code वापरून केली तेव्हाच, प्रथमपासूनच आंतरजाल हे एक "ठिकाण" असं मानून तिथे बाजारतंत्री अर्थव्यवस्था चालेल असं मानलं. ते मुळी "सायबरमार्ट" म्हणूनच रचलं होतं.

म्हणूनच, आंतरजाल हा बाजारतंत्री व अस्मिता-रक्षक या दोन लोकप्रियतांचा वांशिक आखाडा आहे. मात्र त्यातल्या शैलीवर ऐतिहासिक दृष्ट्या बाजारतंत्री लोकप्रियतेचा ठसा आहे. वृत्तपत्रं, रेडिओ, टीव्ही, किंवा सिनेमासारख्या बाकीच्या समूहमाध्यमांपेक्षा आंतरजाल वेगळं कशामुळे ठरतं? सर्वच तंत्राधिष्ठित समूहमाध्यमांत बाजारतंत्री लोकप्रियताच महत्त्वाची आहे. मात्र आंतरजाल हे एकच माध्यम स्वस्त आणि प्रवेशसुकर आहे. एक संगणक व मोडेम किंबहुना तेही नसले तरी एखाद्या सायबर कॅफेतूनही कोणालाही आपलं संस्थळ सुरू करता येतं. या स्वस्त, परवडण्याजोग्या समूहमाध्यमामुळे आंतरजाल हा अस्मिता-रक्षक आणि जवळजवळ कोणतीही चाळणी न लावता अभिव्यक्त होता येणारा अवकाश ठरतो. कारण आजवर तिथे बाजाराचं तत्त्व लागू करणारे कोणी संपादक, प्रोग्रॅम डिरेक्टर्स नाहीत. याउलट, सर्च इंजिनद्वारे जेव्हा तपशील शोधायचा असतो, तेव्हा बाजार-तत्त्वाचा प्रभाव जाणवतो. अशा चाळण्या लावण्याला तांत्रिक कारणांमुळे मर्यादा आहेत. त्यासाठी URL access code मध्ये बदल करावा लागेल, ते सोपं नाही. अर्थात वेगळ्या प्रकारचं अप्रत्यक्ष नियंत्रण काही प्रमाणात दिसून येतं. त्याचं कारण फोफावणारी पोर्नोग्राफी किंवा अलीकडे पाहायला मिळणारी पाश्चिमात्य जगाची - विशेषतः अमेरिकेतील सनातन्यांची - राजकीय बाबतींतील तीव्र संवेदनशीलता. त्यामुळे जे सुविधा उपलब्ध करून देतात त्यांचं नियंत्रण बघायला मिळतं. एलन यांच्या मते ९/११नंतर विरोधी मतं व मतांतरांचा आवाज दडपून टाकण्याचा दबाव सेवादात्यांवर वाढत गेला. आता अमेरिकेतली अनेक संकेतस्थळं तपशील बदलतात. पण अशा तऱ्हेचे तथ्यबदल किंवा दडपणी बाजारतंत्री नव्हे. मी तरी असंच म्हणेन कारण ९/११नंतर लगेच विचित्रसा अस्मिता-रक्षक प्रकारचा लोकप्रिय राष्ट्रवाद अमेरिकेत बळावला. एकंदर पाहता, आंतरजालीय शैलीचा भर बाजारतंत्री असला तरी बाजारतंत्री लोकप्रियतेचं कधीही तिथल्या शिरकावावर नियंत्रण नव्हतं आणि नसेल. आणि या दोन विरोधी गुणधर्मांचा मिलाफ – रूप बाजारतंत्री आणि शिरकाव अस्मिता-रक्षकी – तमिळनेट डॉट कॉमच्या निर्मात्यांनी हेरला आणि १९९६मध्ये त्यांच्या आंतरजालीय वृत्तसंस्थेच्या निर्मितीसाठी वापरला.

हे सर्व समजून घेण्यासाठी आधी तमिळनेट.कॉमचं काम आणि त्याच्या निर्मितीचा इतिहास समजून घेतला पाहिजे. श्रीलंकन तमिळांची राष्ट्रवादी चळवळ जवळजवळ वीस वर्षं चालली; त्यात साठ हजाराहून अधिक लोक मेले; सुमारे सात लाख तमिळ निर्वासित जगभर विखुरले आणि त्यातून तमिळनेट.कॉमची निर्मिती व विस्तार झाला. या कटू पार्श्वभूमीवर तमिळनेट.कॉमचं काम पाहिलं तर निदान त्यामागे आंतरजालाच्या आभासीपणाचा भाग आहे असं मानण्याचा मोह होणार नाही. तमिळनेट.कॉमचा इतिहास पाहिला तर त्याच्या निर्मात्यांनी बाजारतंत्री व म्हणून दडपशाही वृत्तीच्या प्रभावशाली समाजमाध्यमांना उत्तर म्हणून आपलं संकेतस्थळ कसं निर्माण केलं हे कळतं. हा इतिहास पाहण्याचं कारण त्यामुळे कोणत्याही वांशिक अभ्यासात त्यातल्या लोकांच्या सक्रियतेकडे दुर्लक्ष करण्याची या विषयाच्या अभ्यासकांची मानसिकता टाळण्याचं महत्त्व स्पष्ट होईल.

तमिळनेट डॉट कॉम :

सुरुवातीला एक तमिळनेट डॉट कॉमवरची बातमी पाहू. ती ८ जुलै २००१ रोजी १३:४८ GMT ला प्रसारित झाली.

JRC RECORDS BIZARRE TORTURE BY AMPARA POLICE

The investigation Officer of the Human Rights Commission, Mr. Dharmeratnam Sritharan, visited Boosa camp recently and recorded evidence from four persons who were detained and tortured by the Counter Subversive Unit of the Police in Amparai. He said the suspects bore clear marks of torture on their bodies.

The prisoners said that a constable with the Counter Subversive Unit of the Police in Ampara had allegedly subjected them to bizarre forms of torture; that he made them eat cow dung and the vomit of fellow prisoners; that he urinated into the mouth of a prisoner, that he smashed the fingers of another prisoner with the handle of a mammoty (a type of heavy hoe). The prisoners who were tortured at the Ampara CSU said that Policemen poured boiling water down their throat [sic] as a consequence of which one them [sic] is unable to speak.

या दोन परिच्छेदांनंतर मानवाधिकार आयोगाचा तपशिलवार अहवाल होता. त्यात कैद्यांनी सांगितलेल्या अधिकच बीभत्स छळाचं विवरण होतं. या लेखातल्या बऱ्याच गोष्टींचा आपण आढावा घेतला पाहिजे. सर्वप्रथम अर्थातच लेखातली भयानकता व त्यामागची स्फोटक राजकीय परिस्थिती. फेब्रुवारी २००२पासून जरी श्रीलंकेत कायमस्वरूपी शस्त्रबंदी जाहीर झालेली असली तरी हा लेख आला तेव्हा जुलै २००१मध्ये ते नागरी युद्धाचं अठरावं वर्ष सुरू होत होतं. श्रीलंकेत सरकार बहुसंख्य सिंहलीभाषक बौद्ध लोकांच्या बाजूनं तमिळ भाषक फुटीरतावादी लोकांवरुद्ध क्रूर व रक्तरंजित युद्ध करत होते. १९८०च्या मध्यापासून श्रीलंकन तमिळ लोक लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (LTTE - लिट्टे) या छुप्या व हिंसक सैन्याद्वारे श्रीलंकेच्या उत्तर व पूर्व भागांत तमिळ राज्य निर्मिती करून आपल्या राजकीय आकांक्षांची पूर्ती करू पाहत होते. २००१पर्यंत दोन्ही बाजूंनी होणारी क्रूर व अमानवी हिंसा टिपेला पोहोचलेली होती. त्यांच्या आक्रमकतेत निरपराध सामान्य लोकांवर हल्ले, छळ, अपहरण, बॉम्बहल्ले, लहान मुलांची सक्तीची सैन्यभरती, पत्रकारांच्या हत्या आणि नरसंहार अशा बाबी होत्या. या दुःखद पार्श्वभूमीवर वरती दिलेल्या परिच्छेदांतील मजकूर कितीही भयावह असला तरी त्यात आश्चर्य वाटण्याजोगं काही नव्हतं.

पण २००१च्या उन्हाळ्यापर्यंत परिस्थितीला एक नवं वळण लागलं होतं. राष्ट्राध्यक्ष कुमारतुंगा यांच्या युनायटेड फ्रंट या पक्षाच्या सरकारचं धोरण बदललं होतं. तसा तो पक्ष १९९५पासून सत्तेवर होता. त्यांची भूमिका शांतता व नागरी हक्काच्या बाजूनं होती. त्यांचे प्रयत्न अमेरिकेच्या क्लिंटन सरकारला खूष करून त्यांच्याकडून खर्चिक युद्धासाठी जागतिक अर्थव्यवस्थेची काही फळं आपल्या पदरात पाडून घेण्याचे होते. त्यामुळेच अलीकडे त्यांनी आपल्या जनसंपर्क धोरणात पोलिसी, मिलिटरी खाक्या पूर्णपणे बंद केल्याचं सांगायला सुरुवात केली होती. पण २००१मध्ये असा दावा कोणाला पटेल अशी परिस्थिती नव्हती. आदलं वर्षभर सरकारला पराभव पाहावे लागत होते आणि त्यामुळे त्यांच्या सिंहली पाठीराख्यांची चलबिचल होऊन राजकीय अस्थिरतेची शक्यता दिसू लागली होती. नागरी युद्ध जर अधिक तीव्र झालं तर पुढच्या होऊ घातलेल्या निवडणुकांत पक्षाचं संसदेतलं बहुमत संपुष्टात आलं असतं. त्यामुळे तेव्हा विशेषतः तमिळनेट.कॉम ज्याप्रकारच्या हिंसेची खबर देई त्याचं शक्य असेल तेव्हा खंडन करणं किंवा अशा बातम्यांचं दमन करणं सर्रास होई. श्रीलंकन वृत्तपत्रांना कायद्यानंच अशा बातम्या देण्यास प्रतिबंध होता. त्यामुळे कित्येकदा ते काळी शाई लावलेले रकाने प्रसिद्ध करत.

तमिळनेट.कॉम मात्र वेबसाइट असल्यानं आणि तिचे मालक देशाबाहेर असल्यानं अशा दडपशाहीतून वाचले. म्हणून त्यांच्या विरुद्ध अधिक क्रूर कारस्थानं झाली. त्यांच्या मैल्वगनम निमलराजन या बातमीदाराची त्याच्या घरात हातबॉम्ब टाकून हत्या करण्यात आली. आणि तमिळनेट.कॉमचे संपादक धर्मेरत्नम यांना जून २००१मध्ये सरकारी टेलीव्हिजनवर राष्ट्रद्रोही जाहीर केलं गेलं. पुढे शरद ऋतूत त्यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्नही झाला. ते कमी म्हणून की काय, एका सरकारी वृत्तपत्रानं "निरागसपणे" अशी अटकळ बांधली की कायद्याला न जुमानणारे सिंहली अतिरेकी राष्ट्रवादी धर्मेरत्नमवरील प्राणघातक हल्ल्याच्या आरोपामुळे बिथरून असं काही करूही शकतील. सरकार नियंत्रित अशा अतिरेक्यांना अभय असण्याच्या त्या काळात ही अप्रत्यक्ष धमकीच होती. म्हणून मग धर्मेरत्नम रोज रात्री वेगवेगळ्या घरी मुक्काम करत व दिवसा कोलंबोमध्ये फिरताना नेहमी वेगवेगळे रस्ते वापरत. जुलैच्या सुरुवातीला ते उत्तर अमेरिका व युरोपात तमिळनेट.कॉमच्या कामासंदर्भानं गेले ते ऑगस्टपर्टंत. तेव्हा ते तमिळनेट.कॉमच्या पाठीराख्यांना, भाषांतरकारांना आणि एका मानववंशशास्त्रज्ञाला – म्हणजे मला – भेटले.

एका गोष्टीची नोंद घेतली पाहिजे ती म्हणजे तमिळनेट.कॉमवर हल्ले, धमक्या हे चालू असले तरी त्यांच्या आरोपांचं खंडन करण्याचे विशेष प्रयत्न होत नव्हते. आणि याचं कारण दुसरी महत्त्वाची गोष्ट – उदाहरणार्थ वर उद्धृत केलेल्या लेखाची व्यावसायिकता आणि विक्रीयोग्यता. त्यात दुसऱ्या परिच्छेदातल्या दोन छपाईच्या चुका सोडल्या – त्यात थोडा माझा (मी सांगितलं throat अनेकवचनी पाहिजे. of शब्द सुटलाय हेही सांगितलं) आणि थोडा आठ दिवस प्रवास करून दमलेल्या, नात्यातल्या लहान मुलांच्या गलक्यानं शिणलेल्या अशा धर्मेरत्नम यांच्या कामात थोडी विश्रांती घेण्याच्या निर्णयाचा वाटा आहे – तर हा लेख उत्तम रिपोर्ताजचा नमुना आहे. इंग्रजी वाचकांसाठी थोडा सुरस व चमत्कारिक आणि अर्थात भयानक असा त्याचा विषय आहे. लेख कोण-काय-केव्हा-कोठे या पठडीतला, कोणतेही राजकीय भाष्य नसलेला, पोलीसी छळाचं कथित - allegedly - विचित्र प्रकार अवलंबले अशी आवश्यक तेथे संभाव्यता व्यक्त करणारी वाक्यरचना असलेला असा आहे. लेखाचा स्रोतही काळजीपूर्वक निवडलेला आहे. हे वृत्त कोणत्याही चांगल्या श्रीलंकन वर्तमानपत्रात येऊ शकलं असतं. शिवाय तो छोटा लेख या स्वरूपात मँचेस्टर गार्डियन किंवा यु. एस. ए. टुडे अशा दैनिकांतही तसाच्या तसा येऊ शकला असता. बळी पडलेले लोक अमेरिकी नसतील तर यु. एस. ए. टुडे ते छापणार नाहीत हे अलाहिदा. अशासारखी, पण किंचित वेगळी, वृत्तं ए. पी., रॉयटर्स, बीबीसी अशा वृत्तसंस्था देतच असतात. आणि हो, कधी कधी ती तमिळनेट.कॉमचाही हवाला देतात. याचं कारण तमिळनेट.कॉमचं लिखाण व्यावसायिक पाश्चिमात्य वृत्तपत्रांप्रमाणेच तटस्थ आणि अधिकारवाणीचं असतं; त्यांनी सांगितलेल्या घटना आणि आकडेवारी दोन स्रोतांकडून मागवलेली, काळजीपूर्वक तपासलेली आणि विश्वासार्ह असते; आणि त्यांचे लेख दुसरीकडे छापण्यासाठी ते कोणतंही मूल्य आकारत नाहीत; फक्त श्रेय द्यावं एवढीच अपेक्षा असते. 'द हिंदू'सारखं वृत्तपत्रदेखील तमिळनेट डॉट कॉमच्या बातम्या विश्वासार्ह असतात असं म्हणतं. कोलंबोतली सिंहलीप्रबळ वृत्तसंस्था त्याला लिट्टेचं मुखपत्र म्हणून हिणवत असली तरी (बहुतेक पाश्चिमात्य वृत्तसंस्था तमिळनेट.कॉमला प्रो-रिबेल म्हणतात) त्याची शैली व मांडणी इतकी वेगळी आहे – नेहमी सपाट व तटस्थ – आणि माझ्या माहितीत तरी तिच्या वृत्तांकनाच्या सत्यतेला कोणी क्वचितच आव्हान देऊ शकले आहेत. त्यामुळे असा आरोप निराधार आहे. तमिळनेट.कॉमचे लेख हे नेहमीच उत्तम वेष्टनात विक्रीसाठी तयार अशी उत्पादनं असतात, त्यांना कोणी ग्राहक मिळाला तर ते बाजारलक्ष्यी लोकप्रियतेच्या भाषेत पाश्चिमात्य पत्रकारितेच्या साच्यात चपखल बसतात. यामुळेच तमिळनेट.कॉमची व्यावसायिकता त्यांच्या मोठ्या, अ-तमिळ वाचकवर्गाला आपलंसं करते आणि निव्वळ बातमी नाकारणं कोणाला शक्य होत नाही. २००१च्या उन्हाळ्यामध्ये मी टोरांटो आणि लंडनमधल्या एकूण पंचवीस तमिळ प्रौढ व्यक्तींची भेट घेतली आणि त्या सर्वांनी ते तमिळनेट.कॉम आणि इतर काही संकेतस्तळं आठवड्यातून अनेकदा पाहतात असं सांगितलं. त्यांच्यातील बरेचजण १९८०च्या दशकातील पहिल्या निर्वासितांपैकी असल्याने तमिळनेट.कॉमपूर्वी त्यांना श्रीलंकेतील बातम्या उडतउडत, सांगोवांगी अशा कळत. या निर्वासितांच्या मुलांच्या बाबतीत हे अधिकच खरं होतं, कारण त्यांच्यासाठी आता इंग्रजी (किंवा फ्रेंच, जर्मन) ही भाषाच प्रमुख भाषा बनली होती. १९८०च्या दशकात तसंच १९९०च्या दशकाच्या पूर्वार्धात जगभर विखुरलेल्या तमिळ भाषकांना श्रीलंकेतल्या बातम्या कळण्यासाठी विश्वासार्ह स्रोत नव्हते. आणि पाश्चिमात्य वृत्तपत्रं एकतर कसलीच बातमी द्यायचे नाहीत, नाही तर काही तरी भरताड सांगायचे. बाजारतंत्री उद्योग असलेली पाश्चिमात्य वृत्तपत्रं एका अत्यंत छोट्या समूहाकडे आपले लक्ष वळवतील किंवा वळवलंच तरी त्यांच्या मालकवर्गाच्या हितसंबंधांविरुद्ध जाऊन किंवा बाजाराच्या ठोकताळ्यांविपरीत काही लिहितील ही शक्यता नव्हती. त्यामुळे अशा वाचकवर्गाला कॅनडा, इंग्लंड, फ्रान्स, अशा ठिकाणांहून तमिळमध्ये प्रसिद्ध होणारी गडद राजकीय रंगाची लिट्टेच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभावाखाली असलेली वृत्तपत्रं, रेडिओ केंद्रं व काही संकेतस्थळं यांचाच आधार होता. अशा माध्यमांमधल्या राष्ट्रवादी मांडणीला त्यांची सहानुभूती असली तरी त्यांच्याकडे माहितीचा विश्वासार्ह स्रोत म्हणून ते बघू शकत नव्हते. हे देखील समजण्यासारखं आहे कारण अस्मिता-रक्षक अशा माध्यमाचं मुख्य काम बातमी सांगणे हे नसून तमिळांच्या राष्ट्रवादाला प्रतिष्ठा प्राप्त करून देणं हे होतं. मी ज्यांच्याशी बोललो त्या सर्वांना याची जाणीव होती आणि त्यामुळेच ते ह्या स्रोतांचे वाचक राहिले तरी खऱ्या बातम्यांसाठी इतरत्र वळत. त्यांना आंतरजालपूर्व जमान्यात बातम्यांसाठी नातेवाईकांचे फोन, कौटुंबिक समारंभाचे व्हिडिओ मिळाल्यास, किंवा कोणा सुदैवी निर्वासिताला आपल्या देशात पुन्हा एकदा जाऊन यायला मिळालं तर त्याच्या तोंडून काही ऐकणं, थोडक्यात अफवांवर विसंबून राहावं लागे. श्रीलंकेत काय चाललं आहे याची दैनंदिन आणि अचूक बातमी – विशेषतः राजधानी कोलंबो वगळता देशाच्या अंतर्भागातल्या युद्धाच्या सावटातील बातमी – तमिळनेट.कॉम उदयास येईपर्यंत मिळत नव्हती. आता आपण या संकेतस्थळाच्या निर्मितीची अधिक माहिती घेऊ.

तमिळनेट डॉट कॉमची निर्मिती

मी धर्मेरत्नम यांना वीस-अधिक वर्षं ओळखतो. आमची पहिली भेट १९८१ साली झाली. मी माझ्या पीएच. डी.च्या अभ्यासानिमित्त श्रीलंकेतील मंडूर नावाच्या छोट्या हिंदू खेड्यात गेलो होतो. आम्ही दोघेही अगदी तरुण आणि (गेले ते दिवस) शिडशिडीत होतो. तो बट्टिकालोआ या जिल्ह्याच्या त्याच नावाच्या शहरात राहायचा आणि मी अधूनमधून माझी मोटरसायकल तीस किलोमीटर ताबडत नेऊन तिथल्या गुलाबी स्टक्को ग्रंथालय किंवा सरकारी कार्यालयं असलेल्या दगडी डच किल्ल्यात जायचो. आम्हाला दोघांना जोडणारा धागा म्हणजे तत्त्वज्ञान किंवा कशालाही तात्त्विकतेचा मुलामा देण्याची आवड. मी गेलो की आम्ही तासनतास त्याच्या कुटुंबाच्या फरशी उखडलेल्या व्हरांड्यात बसून बोलत असू. त्या व्हरांड्याचं लाल छप्पर १९७८च्या चक्रीवादळात बरेचसं उडून गेलं होतं. नाही तर मग त्याच्या वडिलांच्या अभ्यासिकेच्या भग्नावशेषांवर बसून सिगरेटी फुंकत, त्याच्या आईच्या हातचे चांगलेचुंगले पदार्थ खात वादविवाद करत असू. धर्मेरत्नम यांचं कुटुंब एकेकाळी जिल्ह्यातलं श्रीमंत व प्रभावशाली कुटुंब होतं. अगदी १९७०च्या सुरुवातीपर्यंत त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या नारळीच्या बागा आणि हजारो एकर भातजमीन होती. त्यांचे वडील केंब्रिजला शिकायला गेले होते आणि त्यांनी बर्ट्रांड रसेलची व्याख्यानं ऐकली होती. त्यांचे दोन्ही आजोबा, पणजोबा हे श्रीलंकेतले प्रमुख व्यापारी व जमीनदार होते आणि वडिलांचे वडील १९३०साली ब्रिटिश राजवटीत झालेल्या स्टेट काउन्सिलच्या निवडणुकीत निवडून आले होते. पण भू-संपादन-पुनर्वाटप कायदा, वडिलांचा मृत्यू, त्यांच्या घरातली भाऊबंदकी, आणि पुढे देशालाच लढाईकडे घेऊन जाणाऱ्या घटना यातून सर्व संपत्ती लयाला गेली आणि काही अपवाद वगळता कुटुंबातल्या बहुतेकांनी अगदी इंग्लंड, फिजी, ऑस्ट्रेलिया अशा देशांत स्थलांतर केलं. बाट्टिकालोआमध्ये केवळ धर्मेरत्नम, त्यांची बहीण, आता हयात नसलेली आई, तिच्या बहिणी आणि काही चुलतभावंडं, पुतणे आणि सावत्र भाऊ-बहिणी एवढेच लोक राहिले. धर्मेरत्नमचे भाऊ इंग्लंडला गेले.

मी धर्मेरत्नमना १९८१ साली पहिल्यांदा भेटलो तेव्हा ते श्रीलंकेतील नामांकित पेरादेनिया विद्यापीठात पदवीच्या पहिल्या वर्षाला होते. मग युद्धानं सगळंच बदलून गेलं. उत्कट तरीही तत्त्वज्ञानाच्या अंगानं विचार करणाऱ्या राष्ट्रवादी धर्मेरत्नम यांनी कित्येक तमिळ तरुणांप्रमाणेच शिक्षण सोडलं आणि People's Liberation Organization of Tamil Eelam (PLOTE) नावाच्या राष्ट्रवादी गटात ते सामील झाले. तो गटही सशस्त्र प्रतिकाराच्या बाजूचा होता. १९८३मधले तमिळ-विरोधी दंगे, त्यांतून घडलेलं नागरी युद्ध यात ते १९८७ साली भारत-श्रीलंका यांच्यात सैनिकी मदतीचा करार होईपर्यंत सक्रिय होते. PLOTE हा तोवर अधिकृत राजकीय पक्ष बनला होता. पण ८७ साली त्यांनी पक्ष सोडला. मलेरियाग्रस्त, कफल्लक अवस्थेत ते कोलंबोला गेले व तेथे पत्रकारिता करायला लागले. श्रीलंकेतील काही मोजक्या स्वतंत्र इंग्रजी वृत्तपत्रांपैकी एक अशा The Islandमध्ये त्यांचा "तारकी" हा स्तंभ प्रसिद्ध होऊ लागला. त्यांनी केलेले युद्धात गुंतलेल्या सर्वांच्या बाजूंच्या लष्करी युक्ती व रणनीतींवरील स्पष्ट, परखड तरी तटस्थ वृत्तांकन लवकरच लोकप्रिय झालं. ते युद्ध १९९०च्या सुरुवातीला हास्यास्पद तऱ्हेनं गुंतागुंतीचे झाले होते. त्यात भारतीय सैन्य लिट्टेविरुद्ध लढत होतं, श्रीलंकन सरकारचं सैन्य सिंहली अतिरेकी संघटना जनता विमुक्ती पेरामुना – जनस्वातंत्र्य संघटना – यांच्याविरुद्ध लढत होतं आणि १९९२नंतर श्रीलंकन सरकार पुन्हा लिट्टेविरुद्ध लढत होतं. तारकी धर्मेरत्नम हे देशाबाहेरील तमिळांमध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यांचे The Eluding Peace: An Insider's Political Analysis of the Ethnic Conflict in Sri Lanka, हे पुस्तक त्यांच्या लेखांचे संकलन करून त्यांच्या चाहत्यांनी पॅरीसमध्ये १९९१ साली प्रसिद्ध केलं.

त्यामुळेच १९९६मध्ये तमिळनेट.कॉमच्या प्रवर्तकांनी फारशा लोकप्रिय होऊ न शकलेल्या त्यांच्या संकेतस्थळाला कशा प्रकारे चालना देता येईल यावर सल्ला देण्यासाठी धर्मेरत्नम यांना उत्तर अमेरिकेत बोलावलं होते. त्यांची महत्त्वाकांक्षा आपलं संकेतस्थळ पाश्चिमात्य वृत्तपत्रांत येणाऱ्या श्रीलंकेसंबंधीच्या तोकड्या आणि प्रतिकूल बातम्यांना पर्यायी व समर्पक स्थान देणारा चांगला माहिती स्रोत व्हावा ही होती. आर्थिक पाठबळ, चांगली रचना हे त्या संकेतस्थळाकडे होते. पण तिकडे फार थोडे वाचक वळत. त्यासाठीच त्यांनी तारकी यांना बोलावून घेतले.

बातमी हे प्रतिबिंब

हे संकेतस्थळ न चालण्याचं कारण तारकी यांनी बरोबर ओळखलं होते. मला लिहिलेल्या एका मेलमध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केला होता : "त्यांच्या कामाला कसली दिशाच नव्हती कारण त्यांच्याकडे घडणाऱ्या घटनांची कोणतीही ठोस बातमी नसे आणि राष्ट्रवादी, त्यातही देशाबाहेर पडलेले अनामिक तमिळ राष्ट्रवादी तमिळनेटला व्यावसायिक व तटस्थ संकेतस्थळ म्हणून सादर करू शकत नव्हते. ते साचेबद्ध आणि म्हणून बंद पडायच्या मार्गावर होते." पहिला प्रश्न कसा सोडवायचा हे त्यांना कळले होते – ठोस बातमी. त्यांना माहिती होतं की श्रीलंकेच्या कानाकोपऱ्यापर्यंत अर्धवेळ तमिळ वार्ताहरांचे सैलसर जाळं होतं. ते सहसा शिक्षक नाही तर सरकारी नोकर असत. ते कोलंबोतल्या मोठ्या श्रीलंकन वृत्तपत्रांना आणि पाश्चिमात्य वृत्तसंस्थाना बातम्या किंवा प्राथमिक माहिती पुरवत असत. कधी फोटोही पाठवत. पण त्यांनी पत्रकारितेचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं. बेताचे पैसे, मग बेताचीच प्रेरणा आणि त्यांची कोणी फार दखलही घेत नसे. असं का? तर कोलंबोतील सरकार नियंत्रित सिंहली आणि इंग्रजी वृत्तसंस्थांना देशाच्या अंतर्भागातल्या, अधिकाधिक तुंबळ युद्ध होत असलेल्या ठिकाणांहून अचूक तपशीलाची बातमी नकोच होती. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थाही राजधानी कोलंबोवर आपले लक्ष केंद्रित करत होत्या. "उत्तर आणि पूर्वेकडील बॅकवॉटर्स विशेषतः पूर्व किनारपट्टी (धर्मेरत्नम याच भागातले) तसेच वन्नी हा उत्तरेकडील जंगलांचा कोरडा प्रदेश, (लिट्टे प्रबळ भाग) हे त्यांच्यासाठी टिंबक्टू इतकेच दूरस्थ होते." इति धर्मेरत्नम. तेथून येणाऱ्या बातम्या कोलंबोत स्वीकारत, पण तोंडदेखल्या. देशाच्या अंतर्भागात अगदी तमिळ वृत्तपत्रंही स्थानिक घटनांपेक्षा जाफनामध्ये काय घडत आहे याकडे लक्ष देत. अंतिम परिणाम – ज्यांचा आवाज कुठेच पोहोचत नव्हता ते तसेच दुर्लक्षित राहात होते. पण धर्मेरत्नम यांनी हेरलं की हे सर्व बदलता येईल. स्थानिक बातम्या देण्यासाठी बातमीदारांना थोडं प्रशिक्षण, बरा पगार आणि संगणक, मोडेम तसेच डिजिटल कॅमेरे यांसारखी उपकरणं उपलब्ध करून देण्याची आवश्यकता होती. म्हणजे मग तमिळनेट.कॉम ठोस व विश्वासार्ह बातम्या देणारं संकेतस्थळ बनेल; हे त्यांनी संस्थळाच्या प्रवर्तकांना पटवून दिलं. विशेषतः बाकी सर्वांनी दुर्लक्ष केलेल्या, जिथे प्रत्यक्ष युद्ध घडत होतं आणि माणसं हालअपेष्टांना सामोरी जात होती अशा श्रीलंकेतील खेडोपाड्यांच्या बातम्या देणं, हे तमिळनेट.कॉमनं करावं. स्थानिक बातमीदार बातमी तमिळमध्ये लिहितील, ती इंग्रजीही येणाऱ्या अमेरिका, युरोप, कोलंबो, ऑस्ट्रेलिया येथील तमिळभाषक लोकांना इमेलने पाठवतील आणि ते लोक बातमीचं भाषांतर करून संकेतस्थळावर टाकतील अशी व्यवस्था झाली. अशा तऱ्हेनं तमिळनेट.कॉम हे स्थानिक घडामोडींशी जुळलेलंही राही आणि अधिक महत्त्वाचं, श्रीलंकन सरकारच्या नियंत्रणाच्या कचाट्यातूनही सुटे. धर्मेरत्नम यांनी या प्रकल्पाचं धुरीणत्व स्वीकारले आणि सर्व कल्पना प्रत्यक्षात उतरवल्या.

उदाहरणार्थ, एक तमिळ बाई लंडनला राहते. ती तिच्या नोकिया 9000वरून संपादनाचं काम करे. ती समजा कॉव्हेन्ट गार्डनमध्ये संध्याकाळी सहा वाजता कॉफी पीत असेल आणि श्रीलंकेत, त्रिंकोमालीत स्थानिक वेळ दुपारी साडेबारा वाजता एक बॉम्बहल्ला झाला, काही सैनिक मारले गेले. त्रिंकोतील बातमीदार बातमीची खातरजमा करून, ती लिहून अर्ध्या तासात पाठवतो. इमेल सिस्टिमद्वारे ती सर्व संपादकांना मिळते. या तमिळ बाईला ती मिळते तेव्हा तिथे संध्याकाळचे सहा वाजलेले असतात. ती तिच्या नोकियावर संपादन करते आणि ती बातमी एका इंग्रजी न बोलणाऱ्या युरोपीय देशात संकेतस्थळावर चढवण्यासाठी पाठवते.

पण अशी यंत्रणा उभारणं हे तमिळनेट.कॉमसाठी सोपं होतं. मुख्य अवघड बाब वेगळीच होती. त्या संकेतस्थळाभोवती केवळ राष्ट्रवादी जाणिवांनी भारलेल्या भूतपूर्व श्रीलंकनांचीच गर्दी होती. त्यानं मोठाच पेचप्रसंग ओढवत होता. नंतर अनेक संभाषणांतून धर्मेरत्नम यांनी विशद केलेली समस्या खरं तर दोन प्रकारची होती : एकीकडे राष्ट्रवादी भाषा आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय, बाजारतंत्री पत्रकारिता व शिक्षणक्षेत्रांत तमिळांच्या आशाआकांक्षांना फारसं महत्त्व नसल्यानं तमिळांनी चालवलेले प्रयत्न मोठ्या अ-तमिळ वर्गापर्यत पोहोचवण्याची तसदी ते घेत नसत.

स्थलांतरांनी चालवलेल्या समाजमाध्यमांत अर्थातच राष्ट्रवादी सूरच ऐकू येई, आणि ते स्वाभाविकही होतं. मात्र कोणताही राष्ट्रवादी सूर मग जगभर विखुरलेल्या तमिळांच्या इतर अनेक तशाच सुरांपैकी एक होऊन जाई. तमिळ राज्यासाठी भावनोद्रेक, ढळणारा आणखी एक अश्रू हे तमिळनेट.कॉमच्या सुरुवातीच्या अपयशाचं कारण आणि भावी यशासाठी आव्हान होतं. मोठ्या राष्ट्रवादी गर्जनेचा तो केवळ प्रतिध्वनी होता. मात्र गर्जना न करता बोलता येतं हे त्यांच्यासाठी अकल्पनीय होतं. कारण ते सर्व राष्ट्रवादी होते. धर्मेरत्नम यांच्याप्रमाणेच त्यांनाही ऱाष्ट्रवादी संकेतस्थळ हवं होतं; मात्र असं संकेतस्थळ, जे अ-तमिळ, अ-राष्ट्रवादी, आणि ज्यांना श्रीलंकन तमिळांबाबत कसलंच ममत्व किंवा शत्रुत्व नव्हते अशांशीही संवाद साधू शकेल. पण कसं? धर्मेरत्नम यांच्या मते एकच उपाय होता – "स्थलांतरितांचा अपारदर्शी" राष्ट्रवाद पूर्णपणे सोडून द्यायचा आणि दुसऱ्या कोणत्या धोरणानं आपला हेतू साध्य होईल ते शोधायचं. आणि हे दुसरं धोरण म्हणजे "वस्तुनिष्ठ तटस्थते"चा "उपरोधी" अवलंब करायचा – ही भाषा आंतरराष्ट्रीय पत्रकारिता आणि पाश्चिमात्य शिक्षणक्षेत्रात प्रचलित आहे.

अशा प्रकारच्या उपरोधाबाबत मी आणि धर्मेरत्नम अनेकदा बोललो होतो. वीस वर्षांपूर्वी, त्यांच्या वडिलांच्या घरी आम्ही जेव्हा चर्चा करायचो तेव्हाही धर्मेरत्नम यांचा श्रीलंकनच नव्हे तर पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचाही अभ्यास चांगला होता. वडिलांनी मागवलेल्या शिकागो ग्रेट बुक्स संचातली सगळी पुस्तकं वाचून त्यांनी स्वतःला घडवलं होतं. तेव्हाही त्यांना पाश्चिमात्य मानववंशशास्त्रज्ञांच्या श्रीलंकेबाबतच्या लिखाणाबद्दल आक्षेप होता. त्यांचा मुद्दा असा होता की श्रीलंकेबाबत जरी कोणा श्रीलंकन विद्वानाने अभ्यासपूर्ण लिखाण केलं – माझ्यासारख्या पाश्चिमात्य, संशोधकीय पदवीसाठी आलेल्या उपऱ्यानं नव्हे – तरी, त्यांचे निष्कर्ष राजकीय व मानसिक केंद्र श्रीलंकन वा श्रीलंकन तमिळ यांच्या नैतिक क्षेत्राच्या बाहेर असणाऱ्या विद्वत-बाजारासाठीच बेतलेले असतात. हा विद्वतबाजार, धर्मेरत्नम यांच्या मते, श्रीलंकेच्या वास्तविक भीषण परिस्थितीवर काही इलाज सुचवण्यापेक्षा अद्वितीय सैद्धांतिक मांडणी करण्यास प्रोत्साहन देतो.

या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी धर्मेरत्नम यांनी ऐशीच्या दशकात गनिमी युद्धात भाग घेतला आणि नंतर पत्रकारिता केली. तरी, ते मला म्हणत की खऱ्या अर्थानं ते राष्ट्रवादीही नाहीत आणि पत्रकारही नाहीत. ते केवळ त्यांच्या धोरणांसाठी या दोन्ही बाबी वापरणारे "उपरोधक" आहेत. धर्मेरत्नम यांच्या लेखी "उपरोधक" असणं म्हणजे प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले पूर्वापार चालत आलेले भाषिक खेळ खेळण्याची गरज मान्य करणं. आणि अशा तटस्थ नटाच्या उलट उदाहरणार्थ शिक्षण क्षेत्रातील विचारवंत असतात, जे पठडीबद्ध मूर्खपणा करायला उद्युक्त होतात. ती अशी, की एक तर अशा भाषिक खेळांवर भाष्य करणं, किंवा त्यांचं दुसऱ्या अधिक सोयीस्कर रुपांत परिवर्तन करणं – माझ्यासारख्या पाश्चिमात्य स्वप्नाळू, उदारमतवादी, सुखासीन लोकांचे महापाप. धर्मेरत्नम यांच्या मते राष्ट्रवाद, पत्रकारिता किंवा पाश्चिमात्य शैलीतल्या इतर बौद्धिक वाटा दुर्लक्षून किंवा नाकारून चालणार नाही हे जरी खरं असलं तरी त्यांना असंही वाटतं की त्या सगळ्यांना एक प्रकारचा "उतारा" आहे – जसा जेट विमान उतरताना हवेचा मोठा झोत बाहेर पडावा तसा. आणि त्याचाच, धोरणीपणानं उपयोग करून दुय्यम ध्येयं साध्य करता येतात, असंही. मात्र तसं करताना या परिभाषेचं प्राथमिक चलन विसरून चालत नाही. नेमकं हेच धर्मेरत्नम, कमी-अधिक यशस्वीपणे, राष्ट्रवाद, पत्रकारिता आणि क्वचित (त्यांच्या लिखाणात आणि माझ्याशी असलेल्या नात्यात) मानववंशशास्त्र वीसेक वर्षं वापरत होते. त्यामुळे तमिळनेट.कॉमची कोणी दखल न घेण्याच्या समस्येवर त्यांनी सुचवलेल्या उपायाचं मला आश्चर्य वाटलं नाही.

उपाय म्हणजे प्रथम बॉड्रिलार्ड यांचे कठोर शब्द वापरायचे तर अमर्याद चंगळवाद मान्य करायचा; श्रीलंकेचं पाश्चिमात्य छापील माध्यमांत आणि शैक्षणिक क्षेत्रात रुळलेलं बाजारप्रिय वाटणारं, सकृतदर्शनी वस्तुनिष्ठ, तटस्थ सत्यचित्रण खरं धरून चालायचं. मात्र नंतर त्यातून दिसणारे ("तमिळ दहशतवादी", "शांततेची बोलणी", "वांशिक दंगल" इत्यादींचं) प्रतिबिंब काळजीपूर्वक नष्ट करायचं आणि त्याला वेगळ्या, तमिळकेंद्री प्रचाराची दिशा द्यायची. सगळी मेख "वस्तुनिष्ठ तटस्थ" सूर लावण्यात असेल. यासाठी खेड्यांतल्या तमिळ वार्ताहरांना पाश्चिमात्य वार्तांकनाची तंत्रं शिकवायची. सर्व घटनांचा उल्लेख करताना ती दोन स्रोतांकडून तपासून घ्यायची आणि वाक्यरचना तीन-तीनदा तपासायची. सगळ्या मुलाखती शक्यतोवर रेकॉर्ड करायच्या, आणि राष्ट्रवादी प्रचारकी थाटाची सगळी वाक्यं संकेतस्थळावरून काढून टाकायची. आता कोणतीही अव्वाच्या सव्वा आकडेवारी, देशभक्तीपर काव्य, लिट्टेच्या कोणाही सैनिकाच्या मृतदेहाचे फोटो किंवा इच्छित तमिळईलमची हाक यांतलं काहीही नसणार. त्याऐवजी, केवळ सपाट सूर, भावनाविरहित, अत्यंत आत्मविश्वासपूर्ण, "केवळ तत्थ्यं, बाकी काही नाही" असा आंतरराष्ट्रीय पत्रकारितेचा आणि बहुतेक सामाजिक शास्त्रांचा एकसुरीपणा बाणवायचा.

(९/११ नंतर अमेरिकेतील पत्रकारांनी असा तटस्थ सूर सोडून तारस्वर लावला याबद्दल मी धर्मेरत्नम यांच्याशी कधी, काहीच बोललो नाही हा एक उपरोधच म्हणायचा.) शिवाय हा बदललेला सूर काही केवळ दाखवण्यापुरता नसला पाहिजे. निव्वळ पाश्चिमात्य पत्रकारितेची नक्कल करणं तमिळनेट.कॉमला परवडणारं नव्हतं. त्यांना पाश्चिमात्य पत्रकारितेपेक्षा अधिक चांगली कामगिरी करायला हवी होती – अगदी एपी, रॉयटर्स, बीबीसीपेक्षाही अचूक, अथक, समन्यायी. तसं करताना दृष्टी आणि उद्दिष्ट्यं यांत सूक्ष्म फरक मात्र असणार होता. हा सूक्ष्म फरकच तमिळनेट.कॉमला एकाच वेळी "बाजार" आणि तमिळ लोक दोघांनाही सेवा देता येण्यास सक्षम करणार होता.

किंवा तसं धर्मेरत्नम यांनी आग्रहान प्रतिपादन केले. शेवटी बरीच भवती न भवती होऊन त्यांच म्हणणं मान्य झालं. त्यानंतर ते संकेतस्थळ काही काळ पूर्ण बंद झालं. जेव्हा १९९७ साली ते पुन्हा चालू झालं तेव्हा त्याचा अवतार धर्मेरत्नम यांनी सांगितल्याबरहुकुम होता. लवकरच लिट्टे बॉम्बहल्ले, लिट्टे-श्रीलंकन सैन्य यांच्यातल्या लढाया, श्रीलंकन सरकारचे फतवे व वादविवाद, सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक, पत्रकारितेला अभिप्रेत तटस्थतेनं, पाश्चिमात्य अभिरुचीला धरून, बाकी तशाच पद्धतीनं लिहिलेल्या इतर विषयांच्या बातम्यांबरोबर येऊ लागल्या. त्या इतर बातम्या युद्धाचे लोकांच्या दैनंदिन जीवनावर कसे परिणाम होत होते, श्रीलंकेच्या दूरवरच्या खेडोपाड्यांतील सामान्य तमिळ नागरिकांना काय परिस्थितीतून जावं लागत होतं याबाबत असत. उदाहरणार्थ, पल्लईच्या श्रीलंकन सैनिकी तळावर ताबा मिळवण्याच्या लढाईच्या पार्श्वभूमीवर २९ एप्रिल १९९७ रोजी प्रसिद्ध झालेल्या या दोन बातम्या पाहा -

नौदलाच्या बॉम्बहल्ल्यांनंतर शाळेच्या जागेत बदल

श्रीलंकन नौदलाकडून पुन्हा हल्ले होण्याच्या भीतीने इल्लकंथई येथील सरकारी मुलामुलींची शाळा अधिक सुरक्षित अशा अंतर्भागात हलवण्यात आली असे मुथुर येथील शिक्षणविभागातील अधिकाऱ्यानी आज सांगितले. कालच्या हल्ल्यानंतर वर्ग झाडांखाली भरत आहेत कारण अंतर्भागात शाळेसाठी इमारत नाही असे त्यांनी सांगितले.

आणि

श्रीलंकन नौदलाचा गावावर हल्ला, दोन ठार

काल सकाळी त्रिंकोमालीपासून सुमारे १५ किमी असलेल्या इलक्कंथई या प्रामुख्याने कोळ्यांची वस्ती असलेल्या मुतुर भागातील गावात श्रीलंकन नौदलाच्या गनबोटींनी केलेल्या हल्ल्यात दोन नागरिक ठार तर एक जखमी झाला.

अशा तऱ्हेनं सरकार व लिट्टे यांच्या कारवायांच्या स्थानिक जनतेवर होणाऱ्या परिणामाचे दस्तावेजीकरण करणं हेच तमिळनेट.कॉमच्या रचनेचं उद्दिष्ट होतं. ते इतकं नावीन्यपूर्ण होतं की १९९७ साली त्याचं पुनरुज्जीवन झाल्यानंतर वर्षभरात संस्थळाला दरमहा तीस लाख लोक भेट द्यायला लागले. छोट्या प्रमाणात का होईना, हा आवाज बुलंद झाला होता.

निष्कर्ष :

तमिळनेट.कॉम हे आंतरजालावरचं लोकप्रिय मानववंशशास्त्राचं उदाहरण आहे का? मला वाटतं की ज्या प्रकारचं वांशिक वर्णन अमेरिकेतील सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ करतात त्या अर्थानं मानववंशशास्त्राकडे पाहिलं असता ते नक्कीच आहे. मला तर असंही वाटतं की तमिळनेट.कॉमनं हे सोदाहरण दाखवून दिलं आहे की आंतरजाल हे कसं एका विशिष्ट प्रकारच्या लोकप्रिय मानववंशशास्त्रासाठी योग्य आहे. आणि कोणी सांगावं, पारंपरिक सांस्कृतिक मानववंशशास्त्राला पूरक कदाचित बऱ्याच प्रमाणात (पण पूर्णांशानं नाही) पर्याय म्हणूनही ते पुढे येऊ शकेल. पण हे सगळं पाहण्यासाठी आपण थोडं अंतर राखून या घटिताचा मानववंशशास्त्र, लोकप्रियता आणि आंतरजाल यांच्याबाबतच्या माझ्या प्रास्ताविकाच्या संदर्भात आढावा घेऊ.

एक तर तमिळनेट.कॉम हे मेरी लुइस प्राट यांच्या व्याख्येतल्या स्ववंशकेंद्रित लोकप्रिय मानववंशशास्त्राचं ठळक उदाहरण आहे. तमिळनेट.कॉमनं केलेला पत्रकारितेच्या प्रथांचा "उपरोधिक" उपयोग हा खरोखरच, दुर्बल अशा तमिळ गटानं त्यांना आणि त्यांच्या सर्व लोकांना दुसऱ्या श्रेष्ठ गटासमोर – इथे जागतिकीकरणानं समोर आलेलं सगळं जग – त्यांचा समाज त्यांना पटेल-रुचेल अशा स्वरूपात सादर करण्यासाठी केला. त्यांची संवादी, प्रातिनिधिक भूमिका ही वसाहतवादी काळात शैक्षणिक मानववंशशास्त्र बजावत असे. मला इथे मार्गरेट मीड यांच्या रेडबुकची आठवण होते. त्यात त्यांनी पौगंडावस्थेतील अमेरिकन मुलांची मानसिकता त्यांच्या आयांना समजावण्यासाठी सामोअन लोकांच्या लैंगिक वर्तनाचा आधार घेतला. त्याद्वारे, मला वाटतं, त्यांना अशीही आशा होती की उपनगरीय अमेरिकनांची आपण या "आगळ्या" लोकांपेक्षा काही फार वेगळे नाही अशी भावना व्हावी. तमिळनेट.कॉमच्या बाबतीत दुसऱ्याला समजावून सांगण्याची ऊर्मी ही मुळात धोरणात्मक (तमिळ लोकानुवर्ती राष्ट्रवादाचा हेतू साध्य करणं) आणि म्हणून, आपल्या संज्ञेनुसार अस्मिता-रक्षक लोकप्रियता.

तमिळनेट.कॉमच्या लोकप्रियतेला आणखीही पैलू आहेत. इथे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लोकप्रियतांचा एकत्रित गुंफण-गुंता सोडवत आहोत.
१. आंतरजालाची बाजारकेंद्री लोकप्रियता – (संकेतस्थळ म्हणून आणि अनेक भाषांचा वावर असलेले ठिकाण म्हणून);
२. आंतरजालाची अस्मिता-रक्षक लोकप्रियता (असं संकेतस्थळ जिथे कोणीही प्रवेश करू शकतात आणि htmlच्या माध्यमातून प्रत्येकाची अभिव्यक्ती दुसऱ्या कोणाही इतकीच समान दर्जाची असते.
३. पत्रकारिता आणि शिक्षणक्षेत्रातील बाजारतंत्री लोकप्रियतेच्या भाषेतला मजकूर
४. आणि शेवटी, तमिळ राष्ट्रवादाची अस्मिता-रक्षक भाषा.

धर्मेरत्नम यांनी तमिळनेट.कॉमच्या रचनेत जाणीवपूर्वक हा निरनिराळ्या प्रकारच्या लोकप्रियतांचा गुंफण-गंता त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या समूहाच्या अस्मिता-रक्षक ध्येयांसाठी वापरला. स्पष्टच सांगायचं तर तमिळनेट.कॉमद्वारे आंतरजालातला सहज प्रवेश हा World Wide Webची बाजारतंत्री भाषा व रचना यांचा उपयोग तमिळ अस्मिता-रक्षक प्रश्नांना बाजारतंत्री पत्रकारितेच्या भाषेत, वरचढ अशा जागतिक समूहाला समजावून व पटवून दिले. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर तमिळनेट.कॉम त्याच्या निर्मात्यांनी "उपरोधिकपणे" रचून लोकप्रियतेचे निरनिराळे प्रकार एकमेकींना साहाय्य आणि खच्ची करण्यासाठी वापरले. ही तमिळनेट.कॉमची कामगिरी एकमेव मात्र नाही. आता आंतरजालावर कित्येक स्ववंशकेंद्री संकेतस्थळं या विभिन्न लोकप्रियतांचा फायदा घेताना दिसून येतात. अशा तऱ्हेच्या धोरणीपणे रचलेल्या, मात्र त्याची कबुली न देणाऱ्या, एका सांस्कृतिक प्रथेचे दुसरीवर अवलंबित्व असलेल्या, पण एकमेकींशी तुलना होऊ न शकणाऱ्या अशा कार्यप्रणालीला मी दुसऱ्या एका लेखात "सौहार्दपूर्ण विसंगती" म्हटलं आहे. नाव काहीही दिलं तरी तमिळनेट.कॉमचं आणि त्यासारख्या इतर संकेतस्थळांचं काम गुंतागुंतीच्या लोकप्रियतेचं उदाहरण आहे. त्यांचं स्पष्ट उद्दिष्ट लक्षात घेता, आणि विशेषतः त्याचे अंतर्गत विसंगती असलेले लोकप्रिय पैलू यांमुळे ते लोकप्रिय मानववंशशास्त्राचा प्रकार बनतं. शिवाय हा प्रकार लोकप्रिय मानववंशशास्त्राच्या बाकीच्या प्रकारांपेक्षा प्रसार आणि प्रभाव या दृष्टीने वरचढ ठरतो. मार्गरेट मीडलाही कधीही महिन्याकाठी तीस लाख वाचक मिळाले नाहीत.

ह्या सर्वाला माझ्या राष्ट्रीय प्रकल्प संरक्षणाच्या मोठ्या परिप्रेक्ष्यात कोणतं स्थान आहे? धर्मेरत्नमचा आवडता मुद्दा, ज्यांना राष्ट्र नाही अशा लोकांचा, अस्तित्वात असलेल्या राष्ट्र-राज्यात आपले राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करताना अशा राष्ट्र-राज्याचा विरोध असताना दोन महत्त्वाच्या अवघड आव्हानांना तोंड द्यावं लागतं. पहिलं म्हणजे अर्थातच अस्तित्वात असलेल्या राज्याची बळाची मक्तेदारी. श्रीलंकन तमिळांच्या बाबतीत त्याला तोंड देण्याऱ्या लिट्टेनं, आत्यंतिक हिंसेचा मार्ग अवलंबत वीस वर्षांत छोट्या प्रमाणात साध्या गनिमी काव्याच्या 'मारा आणि पळा' अशा दहशतवादी हालचाली करणाऱ्या अपारंपरिक संघटनेपासून ते संघटित सैन्य उभारून श्रीलंकन सरकारला स्वतःच्या अटीशर्तींवर वाकवणारी संघटना असं स्वरूप धारण केलं. लिट्टे हिंसक, कोणत्याही विरोधाबाबत असहिष्णु असूनही, श्रीलंकन तमिळांना आपलीशी वाटते याचं हे एक कारण असेल; अनेकांना वाटतं की तिच्या बंदुकांमुळेच सूडबुद्धीनं वागू शकणाऱ्या श्रीलंकन सरकारपासून त्यांचा बचाव होत आहे. केवळ तमिळ श्रीलंकनच नव्हे तर अनेकांना असेही वाटते की लिट्टेच्या बंदुका आहेत म्हणूनच श्रीलंकन सरकार वाटाघाटीला तयार आहे. याचा प्रत्यय २००४ साली निवडून आलेल्या अल्पमतातल्या UPFA (United People's Freedom Alliance) सरकारनं निवडणूकपूर्व घोषणांविपरीत वाटाघाटींची तयारी दाखवली तेव्हा आला.

राष्ट्र नसलेल्या लोकांसमोरचं दुसरं, राज्याच्या बळाच्या मक्तेदारी इतकंच महत्त्वाचं आव्हान म्हणजे वर्चस्ववादी वा थेट नियंत्रणवादी सरकारचं प्रसारमाध्यमांवर असलेलं नियंत्रण. हे नियंत्रण दोन प्रकारचं असतं -- राज्याच्या सीमांतर्गत बहुमतवादी सरकार कायदे करून (वृत्तनियंत्रण, सरकारी मालकीची वृत्तपत्रं) किंवा स्थानिक ग्राहकांची संख्या नियंत्रित करून; तर सीमांपलीकडे अप्रत्यक्ष नियंत्रण "अधिकृत निवेदन" देऊन सरकार आपल्या कृती आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा मांडायच्या याचं नियंत्रण करतं. राष्ट्र नसलेल्या लोकांसमोरची समस्या अशी राज्याची बातम्यांवरील नियंत्रणाची मक्तेदारी कशी मोडून काढायची ही असते. त्यासाठी पर्यायी "स्थानिक प्रसारमाध्यम" व पर्यायी "अधिकृत आवाज" तयार करावा लागतो. हे तितकं सोपं नाही. केवळ पर्यायी "सार्वजनिक अवकाश" तयार करण्याचं काम राष्ट्रवादी आकांक्षा असलेले लोक करतात आणि त्याद्वारे ते राज्य किंवा सारे जग यांना "समाजाच्या" मालकीची वृत्तपत्रं आणि रेडिओ जे सांगणार नाहीत अशा आपल्या विरोधी, अस्मिता-रक्षक आवाजानं भरून टाकतात. अशा प्रकारची राष्ट्रवादी भाषा बाहेरच्यांना दुर्बोध असते. शिवाय ती जेव्हा "अनधिकृत" (म्हणजे बिनसरकारी) स्रोतांकडून होते तेव्हा अनेकदा ती धुडकावून लावली जाते किंवा नाकारली जाते. थोडं थेट दमन करून तो आवाज निदान काही काळ दडपलाही जाऊ शकतो. मग काय करायचं?

तमिळनेट.कॉमने या दडपणांना तोंड देण्यासाठी जे केलं ते रोचक आहे : त्यांनी त्यांची गाडी पूर्ण वेगळ्या पर्यायी इंजिनाला जोडली – जागतिक भांडवलवादाची बाजारतंत्री लोकप्रियता. त्याद्वारे तमिळनेट.कॉमचे राष्ट्रवादी जागतिक, बाजारतंत्री आंतरराष्ट्रीय पत्रकारितेची सत्ता व अधिकार श्रीलंकन सरकारच्या नियंत्रणातील स्थानिक प्रसिद्धी माध्यमांपार जाण्यासाठी वापरत होते. त्यांनी राजकीय खेळी वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवली. या उंचावलेल्या स्तराद्वारे तमिळनेट.कॉमला जागतिक प्रवाहात राष्ट्रीय सार्वभौमत्वाला खीळ घालू शकणाऱ्या जागतिकीकरणाचे वेगळे नियम आणि बळ यांचा वापर करता आला आणि एका राष्ट्र-राज्याविरुद्ध दुसरं राष्ट्र-राज्य निर्मितीचे स्वप्न पाहणाऱ्यांचा रेटा वाढवता आला. अशा तऱ्हेची मखलाशी राष्ट्रवादी प्रकल्पांमध्ये प्रसारमाध्यमांच्या जवळजवळ एकाधिकारशाहीला तोंड देताना केलेली आढळते. उदाहरणार्थ मेक्सिकोतल्या चिआपासमधील झापातिस्ता आर्मी ऑफ नॅशनल लिबरेशन (EZLN) या तमिळनेट-पूर्व आणि त्यांचा तसा प्रेरणास्रोत म्हणता येईल अशा संघटनेनं बाजारतंत्री पत्रकारितेचा उपयोग करून घेतला. पण तमिळनेट.कॉमला या रणनीतीनं कितपत यश मिळालं? आजमितीला, मे २००४मध्ये, श्रीलंकेतली सगळी राष्ट्रीय वृत्तपत्रं (सिंहली, तमिळ, इंग्रजी) शिवाय पाश्चिमात्य आणि भारतीय वृत्तसंस्था श्रीलंकेबाबत कोणतीही बातमी देताना तमिळनेट.कॉमचे वृत्तांत वापरतात; अगदी एकीकडे संपादकीयांमध्ये अनेकदा त्यांचा निषेध करत असले तरीसुद्धा. यशाची सर्वांत मोठी पावती विरोधकांकडून मिळते. तमिळनेट.कॉम नव्या रूपात सुरू झाल्यापासून गेल्या आठ वर्षांत लिट्टे आणि श्रीलंकन सरकार यांनी अनेकदा त्यांच्या वार्तांकनाबाबत टोकाची नाराजी दर्शवली. पण लिट्टेनं त्या संकेतस्थळाची सुप्त राष्ट्रवादी मांडणी जाणून फक्त नाराजी व्यक्त केली तर श्रीलंका सरकारनं मात्र, शस्त्रसंधीपूर्वी दोनदा तमिळनेट.कॉमच्या वार्ताहरांना आणि (श्रीलंकेतल्या, म्हणून आवाक्यातील) संपादकांना "देशद्रोहा"साठी अटक करण्याच्या धमक्या दिल्या; शिवाय मी वर सांगितल्याप्रमाणे "अनियंत्रित" सिंहली अतिरेकी काही बेकायदा हत्येसारखी कृत्ये करण्यास उद्युक्त होतील अशी अप्रत्यक्ष धमकी दिली. दोनदा ह्या सरकारी धमक्या परतवण्यासाठी पीटर आर्नेट यांच्यासारखे पत्रकार आणि माझ्यासारखे मानववंशशास्त्रज्ञ यांना मध्ये पडून मानवाधिकारावर काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी यांचा आधार घ्यावा लागला होता. कदाचित पत्रकारिता व मानववंशशास्त्राचे हे पद्धतशीर उपयोजन आमच्या जुन्या, भागलेल्या, अ-लोकप्रिय विषयाची "औपरोधिक" भूमिका सुचवू पाहत असेल. कसंही असलं तरी एक गोष्ट स्पष्ट आहे – आता जनसमूह आंतरजालाकडे वळत असताना मानववंशशास्त्रासाठी पूर्वीसारखं काहीच राहणार नाही.

मूळ प्रकाशन - Antropological Quarterly, Vol 77, No 3 (Summer 2004) pp 469-498
कायमस्वरूपी दुवा

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बारीकसारीक टंकनाच्या चुका दुरुस्त झाल्या. मी लेख स्वतः चढवला नसल्यामुळे मला संपादित करता येत नव्हतं. संपादकांचे आभार.
हा व आशिष नंदी यांचा लेख भाषांतरित करताना मला पुष्कळच बौद्धिक आनंद मिळाला. प्रबोधन झाले ते वेगळेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उज्ज्वला, भाषांतर झकास आहे. भाषांतर केलंय असं वाटतही नाही. तू भाषांतरित केलेल्यांतला हा लेख मला जास्त आवडला ... कदाचित विषय जास्त जवळचा वाटला म्हणून असेल.‍

आजपर्यंत मानववंशशास्त्रातलं काहीही मी वाचलं नव्हतं; किंवा ह्या विषयाबद्दल एवढं तपशिलवार, सोदाहरण लेखन वाचलं नव्हतं. तंत्रज्ञानाचा आपल्यावर होणारा परिणाम म्हणून हे वाचायलाही मजा आली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काही कळलं नाही.
-----–
तमिळ लोक जे श्रीलंकेत मजूर म्हणून गेले होते त्यांच्या पुढच्या पिढ्यांना तिथले नागरिकत्व आणि मताधिकार मिळाला नाही/ देण्यात आला नाही हे विरोधाचं मूळ कारण होतं असं मी ऐकलं होतं. समजा तसं झालं असतं तर काही लिट्टेबिट्टेचं प्रयोजनच नव्हतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख लिट्टे किंवा तमिळांच्या मागण्यांबद्दल नाही. लेखाचा विषय तमिळनेट.कॉम आणि त्यांनी आंतरजाल हे माध्यम आपल्या कामासाठी कसं वापरलं हा आहे. शीर्षकातूनही हेच सांगण्याचा प्रयत्न आहे. लेखक चुकूनही तमिळ आणि/किंवा सिंहलींच्या बाजूनं किंवा विरुद्ध लिहीत नाही.

दोन समाजांत दरी पडलेली असताना, एक समाज सत्ताधारी आणि दुसरा सत्तेपासून चिकार लांब असताना, सत्ता नसणाऱ्या गटानं - तमिळनेट.कॉम चालवणारे, जगाची सहानुभूती आपल्याकडे वळवण्यात कसं यश मिळवलं ह्याची चिकित्सा, विश्लेषण करणं, हा लेखाचा विषय आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हम्. ठीक आहे. मग तो उद्देश साध्य झाला म्हणायचा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

> उपाय म्हणजे प्रथम बॉड्रिलार्ड यांचे कठोर शब्द वापरायचे तर

उत्सुकतेतून उद्भवलेला प्रश्न: ह्या ठिकाणी फ्रेंच उच्चार का नाही लिहिला?! ‘बॉड्रिलार्डां’चे शब्द कठोर असतील, पण खुद्द त्यांच्या नावाचा उच्चार मृदु नको का?! (ह.घ्या.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)

होय. बोद्रियार पाहिजे. लेखकाने उधृत केलेले बोद्रियार यांचे लेखन इंग्रजीतील आहे. त्यामुळे घुटमळायला झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0