लेखाजोखा

लेखाजोखा

आयुष्याच्या अखेरीस मांडावा का लेखाजोखा?
आठवांच्या हिंदोळ्यावर सुख देई दु:खाला झोका.

शुष्क कोरड्या बागेवरती इवली शिंपण आनंदाची
हृदयी ठसले हास्य निरागस, कानी कर्तव्याच्या हाका.

कुरतडलेल्या काळजावर कुणी लावले ठिगळ सराईत
अवचित कुणीसा विणून गेला आपुलकीचा रेशीम टाका.

अंधाऱ्या अवघड रात्री स्नेहाच्या तेवल्या ज्योती
विश्वासाला अंधपणाने दिला कधी जीवघेणा धोका

तेच तेच अन् तसे निरर्थक थबकलेले सगळे क्षण,
बाळमुठीत बोटांना बिलगे पळभर जगण्याचा मोका.

दूर जाहले सखे सोबती रित्या राहिल्या काही जागा
जिवलग कोणी हरवून गेले काळाचा ना चुकला ठोका.

माझे माझे म्हणता म्हणता मुठीतून सारे झरून गेले
क्षितिजाच्या पल्याड पहाण्या आकाशी मग नवा झरोका.

आयुष्याच्या शेवटाला मांडला जो लेखाजोखा
आठवांच्या हिंदोळ्यावर सुख देई दु:खाला झोका.

कांचन

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)