IFFI इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग १)

गोव्यात लोक दारू प्यायला येतात. इथे यायचं आणि नुसती दारू प्यायची, हे काही खरं नाही. तसं करताना संवेदनशील मनाला अपराधी वाटत रहातं. आपण आपला वेळ काहीतरी अनैतिक कृत्य करण्यात वाया घालवत आहोत, अशी टोचणी लागते. मग ना दारू एन्जॉय करता येते, ना मित्रकंपनी बरोबर असल्याने दारूपासून दूर रहाता येतं.

म्हणून गोव्यात काम घेऊन यावं. जसं की इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया. दर वर्षी २० ते २८ नोव्हेंबर या आठ दिवसांमध्ये गोव्यात पणजीला हा महोत्सव गेली कित्येक वर्षं भरत आला आहे. तो बघायच्या मिषाने गोव्यात यायचं आणि फिल्मा बघता बघता जमेल तशी दारू, बियर प्यायची. टोचणी लागत नाही. मस्त एन्जॉय करता येतं. महाराष्ट्रापेक्षा गोव्यात दारू, विशेषतः बियर अत्यंत स्वस्त आहे. त्यामुळे तासनतास पिण्याचं सुख घेत बसता येत आणि तरीही प्रमाणाबाहेर पिणं होत नाही. असा तो फेस्टिवलअलंकृत, स्वस्त दारूयुक्त गोवा.

Despite the Fog (2019)

या वर्षी आम्ही दोन दिवस लवकर येऊन थडकलो. ज्या कारणासाठी लवकर आलो, ते जरी विरून गेलं तरी एकदा काढलेली तिकिटं काही रद्द करून ऐन वेळी पुढची काढता येत नाहीत. परिणामी २० तारखेला सुरू होणार्‍या महोत्सवासाठी आम्ही १८ तारखेच्या सकाळीच गोव्यात दाखल. मग मिळालेल्या जादा दोन दिवसांचा सदुपयोग केला. फेस्टिवल सुरू झाला की समुद्र बघायला फुरसत होत नाही; ते केलं. लोकप्रिय बीचेस सोडून माजोर्डा नावाचा वेगळा बीच निवडला. बीच साधारण होता; पण गर्दी कमी होती. गोरे जास्त होते. रशियन भाषेत बोर्ड लागले होते. आणि एकीकडे पॅरासेलिंग चालू होतं. बाराशे रुपयांमध्ये दोन तीन मिनिटं आकाशात तरंगणे. आमच्यातल्या दोघांनी ते केलं. बाकीच्यांनी बियर पीत पाहिलं. समुद्राचे, सूर्यास्ताचे फोटो काढले. समुद्र तोच, जो मुंबईला असतो; पण किनारा तो नाही. माजोर्ड्याचा किनारा स्वच्छ. निवांत. फिरताना पायाखाली बारीक शंखशिंपले चुरडताना होणारा कुर्रकुर्र आवाज. कसले कसले वास नाहीत. थेट वाळूत तंबू आणि तंबूत खुर्च्या टेबलांच्या जोडीला विविध दारवांच्या बाटल्या. दार नको असेल तर चहा कॉफी आणि नारळपाणी. बसा निवांत. खावंसं वाटलं तर छोटे मोठे मासे. चखणा म्हणून तळलेले चविष्ट लेपो किंवा मांदेळी किंवा बोंबील. वा. वा. गोवा.

बॅजेस घेतले. आमच्यात एक फिल्म प्रोफेशनल. तिला पहिल्याच दिवशी कॅटलॉग आणि पहिल्या चार दिवसांचं शेडयूल मिळालं. मग घनघोर अभ्यास. चित्रपटांचे सारांश वाचणं. दिग्दर्शकाची, चित्रपटाला मिळालेल्या पारितोषिकांची माहिती काढणं. त्यांची एक संदर्भयादी बनवणं. चर्चा करणं. त्यानिमित्त गेल्या, त्याच्या मागच्या, त्याच्याही मागल्या वर्षी पाहिलेल्या चित्रपटांच्या आठवणी काढणं. हळू हळू जगण्यातल्या बाकी सर्व अवधानांचा विसर पडणं. आता पुढचे आठ दिवस केवळ सिनेमामय.

मुंबईतसुद्धा फिल्म फेस्टिवल्स होतात. हा इफ्फी झाला की लगेच इथलेच चित्रपट मुंबईत यशवंतरावला दाखवले जातात. शिवाय मामि, वगैरे असतातच. पण एकतर मुंबईतली अंतरं पार करणं दिवसेदिवस दुस्तर होत चाललं आहे. दुसरं म्हणजे, बाकी कामं, घरच्या कटकटी, सगळं लटांबर आपल्यासोबत फिरतच असतं. रोज घरी यायचं आणि रोज घरून तिथपर्यंत जायचं, यात तिथला असा, सिनेमाचा माहोल मनात नांदायला येत नाही. अर्धी मजा कमी होते. म्हणून गोवा! केवळ दारू-बियरसाठी नाही!

सिनेमा का बघावा? करमणूक करून घेण्यासाठी. अर्थात करमणुकीचा अर्थ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. रंग, प्रसन्न वातावरण, नाचगाणी, दिवास्वप्नसम जग यात काहींचं मन रमतं; तर काहींना बुद्धीसाठी खाद्य हवं असतं. संवेदना चाळवून घ्यायच्या असतात. आपल्याच मनात खोल डोकावण्याची संधी हवी असते. सिनेमा या माध्यमातून हे सगळं मिळतं. इफ्फीसारख्या आंतरराष्ट्रीय महोत्सवामधून यापेक्षा जास्त काही मिळतं. सिनेमा कसाही असला तरी वेगळे देश, वेगळी संस्कृती समोर येते. अगदी कलेसंबंधी जाणही वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी जोपासली जाते. आपल्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन असणे म्हणजे चुकीचंच काहीतरी, असं नसतं. त्यामागे कारणं असतात. ती शोधणं आणि स्वत:ला लावून बघणं हे मोठं रंजक, उद्बोधक असतं. आपल्या देशात माणसामाणसातले संबंध कसे असतात, कसे फुलतात या सगळ्याची दिशा वेगळी असते आणि रशिया, आर्जेंटिना, स्लोवेनिया किंवा अगदी चीन इथले सांस्कृतिक ताणेबाणे वेगळे असतात. त्यांच्यातल्या वेगळेपणात मानवी मनाचे सूक्ष्म कंगोरे, पापुद्रे सापडतात आणि आपलं अ-भौतिक जगणं समृद्ध होतं. जे एरवी आपोआप होणार्‍यातलं नसतं.

काल इफ्फीची उद्घाटनाची फिल्म बघितली. ‘डिस्पाइट द फॉग’. इटालियन होती. या फिल्मचा दिग्दर्शक यापूर्वी भारतात, इफ्फीला येऊन गेला होता. एकदा तर ज्यूरी होता. बोलायला उभा राहिला आणि तोंड उघडून ‘नमस्कार’ म्हणाला. अर्थातच लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. भारतीय लोक स्वत:च्या संस्कृतीचा अभिमान बाळगतात; इतकंच नाही स्वत:ची संस्कृती जगात श्रेष्ठ असल्याचा गर्व त्यांना वाटतो. पण बाहेरच्या कुणी, विशेषत: गौरवर्णीयानं भारताविषयी चांगले उद्गार काढले, नुसती भारतीय उपचारांची दखल घेतली, तरी त्यांना अत्यंत धन्य वाटतं. यात काही विरोधाभास असल्याचं त्यांच्या लक्षात येत नाही. इटलीत जाऊन भारतीय माणसानं तिथल्या भाषेत ‘नमस्कार’ म्हटलं, तर त्यांना कृतकृत्य वाटेल की नाही, मला माहीत नाही. जाणकारांनी प्रकाश टाकावा.

पाऊस आणि धुकं. त्यातून चालणारा एक तरुण आणि त्याच्याबरोबर एक लहान मुलगा. मुलगा थकतो. तरुण त्याला एका बसस्टॉपवर सोडून पुढे निघून जातो. आपलं काम संपवून चाललेला पावलो त्याला बघतो आणि घरी नेतो. योगायोगाने पावलोचा लहान मुलगा देवाघरी गेलेला असतो आणि तेव्हापासून त्याची बायको व्हॅलेरिया डिप्रेशनमध्ये गेलेली असते. इटालियन भाषेचा गंध नसलेल्या त्या मुलात ती गुंतत जाते आणि जगण्याला प्रयोजन मिळाल्यामुळे पुन्हा ‘जगू लागते’. नवराबायकोत पुन्हा शारिरीक संबंध होऊ लागतात.

पण मुलगा मुसलमान असतो. समाजाला हे मान्य होत नाही. पावलोचा पुतण्या नव्या पाहुण्याशी आडदांड वागतो. पावलोच्या दाराशी डुकराचं मुंडकं आणून टाकतो. ‘मुस्लिम बास्टर्ड’ असा आरडाओरडा करत तो आणि त्याचे मित्र पळून जातात. व्हॅलेरिया त्या मुलाच्या - महम्मदच्या - जागी स्वत:च्या मुलाला पाहू लागते आणि त्याला तसंच बनवू पहाते. पण तिच्याशी प्राथमिक संवाद करू लागलेला महम्मद नित्यनेमाने नमाज पढत रहातो. शेवटी जेव्हा ती त्याला कुटुंबासोबत ख्रिसमससाठी चर्चमध्ये नेते तेव्हा तो बंड करतो. ‘मी मार्को नाही, मी महम्मद आहे’ असं स्पष्टपणे बजावून निघून जातो. जणू धार्मिक ओळख ठेवण्यासाठी कौटुंबिक स्वास्थ्य नाकारतो.

शेवटी जेव्हा पावलो महम्मदची खबर पोलिसांना देतो आणि पोलीस त्याला न्यायला येतात; तेव्हा महम्मदला घेऊन व्हॅलेरिया दूर चाललेली असते. पुन्हा एका धुक्याने भरलेल्या रस्त्याने. आणि पडद्यावर आकडेवारी येते, जी सांगते की इटलीत दर वर्षी हजारो लहान निर्वासित मुलं येतात आणि नाहीशी होतात. त्यांचा पत्ता लागत नाही. त्यांचं काय होतं हेच जणू व्हॅलेरियाच्या रूपाने आपल्यासमोर दिग्दर्शक मांडतो.

ही झाली चित्रपटाची गोष्ट. प्रत्यक्ष चित्रपट मुळीच ‘तरल’ नाही. सगळी पात्रं ढोबळ आहेत आणि आपापली ओळख पडद्यावर येताक्षणी सांगतात आणि धरून ठेवतात. एका व्हॅलेरियात बदल घडतो, तोही अपेक्षित रस्त्यानेच जातो. कोणाच्याही अभिनयात त्यांच्या ढोबळ ओळखीपलीकडे फार काही उमटत नाही. हे तेव्हाच योग्य ठरतं, जेव्हा त्यातील आशयावरून लक्ष विचलित होऊ नये, म्हणून तपशिलांना मुद्दाम दुय्यम महत्त्व दिलेलं असतं. इथे तसं काही नाही. त्यामुळे एकूण आशयकथन हे बाळबोध आहे, असं म्हणण्याला पर्याय उरत नाही.

मग म्हणून माझा वेळ वाया गेला, असं मुळीच नाही. महम्मदला पोर्क नको म्हणून व्हॅलेरिया पावलोला म्हणते, आपण पोर्क खाणं सोडून देऊया. पण महम्मद जेव्हा मार्कोच्या चाकाच्या खुर्चीत बसलेला दिसतो तेव्हा प्रथम आपल्या आठवणींना धक्का बसल्यासारखं तिला होतं. पावलोचा सासरा श्रीमंत असतो. त्याचंच रेस्टॉरंट पावलो चालवत असतो. पावलोवर सासर्‍याचं कर्जही असतं. ‘ते मी आता फेडीन,’ असं पावलो म्हणाल्यावर सासरा उत्तरतो, ‘कर्जाची मला काळजी नाही; व्हॅलेरियाची मन:स्थिती ताळ्यावर यायला हवी. ते काम तू नीट करशील.’ अशा वर्तनावरून जाणवतं की ‘तिथे’ आणि इथे, माणसामाणसातल्या संबंधांमध्ये, अपत्य गमावलेल्या स्त्रीच्या भावभावनांमध्ये फारसा फरक नाही. कथानक पुढे सरकवण्याची ट्रीटमेंट जरी सरळसोट असली, तरी सर्वसाधारण सामाजिक मूल्यांशी प्रतारणा केली नसावी, असं गृहीत धरल्यास काही बाबतीत तरी भावना, सामाजिक संकेत, माणसामाणसातलं संबंध जगातली माणसं सारखी असावीत, असं मनाशी धरून पुढची निरीक्षणं करावीत, इतकं हाती लागतं.

चित्रपटाच्या शेवटी येणारी आकडेवारी चित्रपटाला वास्तवाशी जोडते. व्हॅलेरिया-पावलो-महम्मद यांची कहाणी अपवादात्मक नसून प्रातिनिधिक आहे, असं सुचवते. यामुळे पात्रांविषयीचे ग्रह बदलू शकतात. पण एक प्रश्न उभा रहातो. वास्तवाशी सलगी, हे कलामूल्य आहे का? विषयाला द्यायले मार्क कलाकृतीच्या मार्कांमध्ये मोडावेत का?
मला वाटतं, असं करू नये. कलाकृतीकडे एक कलाकृती म्हणून बघावं. कलावंतानं त्याच्या प्रतिभेद्वारे केलेली निर्मिती म्हणून बघावं. वास्तवाचा विचार करू नये. उदाहरणार्थ, या चित्रपटातली पात्ररचना ढोबळ, सरळसोट आहे, तर ‘पण अशी असतात माणसं’ किंवा ‘हे असं घडलेलं आहे’ अशा तर्कावर त्या ढोबळपणाचं समर्थन करू नये.

पण एखाद्या डॉक्युमेंटरीचं काय? तिथे तर वास्तवापासून फारकत घ्यायचीच नसते. तर तिथे डॉक्युमेंटरीमधून आशय किती प्रभावीपणे मांडला जातो आहे, हा मुद्दा असावा. इथेही विषयाचे मार्क कलाकृतीला देऊ नयेत.

हे ‘लर्निंग’ प्राथमिक वाटण्याची शक्यता आहे. पण हे निव्वळ तर्कातून आलेलं नाही. किमान एका निरीक्षणातून आलेलं आहे. आणि मराठी-हिंदीत होणार्‍या नाटक-सिनेमांमधली समांतर उदाहरणं आठवा आणि त्यांना हा नियम लावा बघू!

भाग २

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

किंवा असंही असेल की ही आकडेवारी बघून, बातम्या वाचून ह्याबद्दल सिनेमा काढावासा वाटला असेल. ते सुचवण्यासाठी शेवटी आकडे आले असतील...?

मी फार फिल्म फेस्टिवलला गेले नाहीये; पण (छद्म) अकॅडमिक परिषदांना अनेकदा गेल्ये. हल्लीच बऱ्याच परिषदा आमच्या गावात भरल्यात असं झालंय; आधी बरेचदा दुसऱ्या गावात जावं लागलं आहे. त्यातही तुम्ही म्हणता ते दिसतं. गावातल्या परिषदेला गेलं की घरच्या-दारच्या बऱ्याच गोष्टी आठवत राहतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मस्त. मुंबईतला फेस्टिव्हल एकदाच अटेण्ड केला. पण मुंबईत असताना आठवडाभरासाठी सगळी व्यवधानं बाजूला ठेऊन थेट्रं गाठणे नाहीच जमत. परत हव्या त्या थेट्रात, तेव्हाच ती फिल्म असणार आणि आपल्याला तिकीटही मिळणार वगैरे सगळं दुर्मिळच. गोवा माहौल आहे.
तुमच्या या लेखमालेमुळे याहीवर्षी सगळी मजा बुडली हे परत अधोरेखित होतंय. सलग तीन वर्षे बुडला इफ्फी. पुढच्यावर्षी जायलाच हवे. गोवा नाहीतर मग केरळ तरी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी