"दूर ग्रहांच्या धुळकट वाटांवर आमच्या पाऊलखुणा राहतील"

"दूर ग्रहांच्या धुळकट वाटांवर
आमच्या पाऊलखुणा राहतील"

'देनिसच्या गोष्टी' या पुस्तकात ओझरते नमूद केलेल्या या वाक्याने डोळ्यांसमोर एक विलक्षण चित्र उभे राहिले होते - अथांग अंतराळात कोण्या ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालणारा एक ग्रह. त्या ग्रहांवरून पृथ्वीकडे परतणारे अंतराळयान. आणि त्या निर्जन ग्रहावर त्या अंतराळवीरांच्या आगमनाची राहिलेली एकमेव खूण - त्या निर्वात स्थळी कायमस्वरूपी राहिलेल्या त्यांच्या पाऊलखुणा.

त्या पाऊलखुणांचा मागोवा घेण्याची संधी काही वर्षांपूर्वी प्राप्त झाली. मराठीत अनुवादित वाक्याचे बाळबोध रशियन भाषांतर करून गूगलमध्ये शोधले आणि एका अप्रतिम गाण्याशी ओळख झाली. या गाण्याबद्दल अधिक शोध घेतला तेव्हा त्याचा रोचक इतिहासही वाचनात आला.

१९५० नंतरचा काळ खऱ्या अर्थाने अंतराळ युगाचा होता. दुसऱ्या महायुद्धात पाडाव झालेला जर्मनी आणि जिंकूनही अपरिमित हानी सहन केलेला ब्रिटन यांचा अंतराळ युगात सहभाग फारसा नव्हता. या युगाचे खरे शिलेदार होते जगातील तत्कालीन दोन महासत्ता - अमेरिका आणि सोविएत संघ.

अंतराळ स्पर्धेतील बऱ्याच बाबतींत पहिली बाजी सोविएत संघाने मारली - पहिला मानवनिर्मित उपग्रह स्पुतनिक, अंतराळात गेलेला पहिला सजीव - लायका नावाची कुत्री, अंतराळ प्रवास करून पृथ्वीवर सुखरूप परतणारे पहिले सजीव - बेल्का आणि स्ट्रेल्का. यानंतरचे पाऊल होते - मानवाचे अंतराळात गमन!

सोविएत शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ यासाठी तयारी करत होते, आणि या सुमारास अंतराळ प्रवासाबद्दल एक गीत रचण्याची कल्पना मांडली गेली. व्लादिमीर वोइनोविच यांनी १९६० च्या शरद ऋतूमध्ये "14 минут до старта" ("१४ मिनिटांत उड्डाण") हे गीत रचले. ऑस्कर फेल्त्समॅन यांनी संगीतरचना केली, आणि काही काळात हे गीत प्रसारित झाले.

यानंतर काही महिन्यातच - १२ एप्रिल १९६१ रोजी - युरी गागारीन यांनी व्हस्तोक ३KA या अंतराळयानातून अंतराळ झेप घेतली आणि मानवी अंतराळ संशोधनाच्या युगाची सुरुवात झाली.

त्यानंतर "14 минут до старта" ("१४ मिनिटांत उड्डाण") या गीताची प्रसिद्धी झपाट्याने वाढली. गागारीन आणि त्यानंतर टिटोव्ह, निकोलायेव्ह, पोपोविच इत्यादींच्या यशामुळे सामान्य सोविएत नागरिकांना अंतराळाबद्दल आकर्षण वाटणे आणि त्यांच्या अंतराळवीरांबद्दल सार्थ अभिमान वाटणे स्वाभाविक होते. याचे पडसाद त्या काळच्या पुस्तकांमध्ये सुद्धा आढळतात. उदा. "देनिसच्या गोष्टी" नावाच्या नितांतसुंदर पुस्तकात देनिस आणि त्याचा मित्र मीषा हे एकमेकांना हाक मारण्यासाठी निकोलायेव्ह आणि पोपोविच यांची अंतराळातील टोपणनावे - सोनेरी गरूड आणि बहिरी ससाणा - वापरतात आणि "१४ मिनिटांत उड्डाण" हे अंतराळगीत म्हणतात.

सोविएत संघाच्या अंतराळ कार्यक्रमाने यानंतरही बरेच यश प्राप्त केले. पहिली महिला अंतराळवीर वॅलेंतिना तेरेश्कोव्हा, अंतराळयानाबाहेर जाणारा पहिला अंतराळवीर अलेक्सेई लिओनोव्ह, चंद्राच्या पृष्ठभागावर प्रवास करणारा पहिला 'यंत्रमानव' लुनोखोद हे या कार्यक्रमातील काही उल्लेखनीय टप्पे होते.

अंतराळ कार्यक्रमामध्ये इतर देशांबरोबर सहकार्य करण्याची तयारी सोविएत संघाने वेळोवेळी दाखवली. इंटरकॉसमॉस कार्यक्रमांतर्गत भारताच्या एकमेव अंतराळवीराने - राकेश शर्मा यांनी - सोयूझ T११ या अंतराळयानातून साल्यूत ७ या अंतराळ स्थानकापर्यंत प्रवास केला.

यातील एक गमतीची बाब अशी, की सोविएत संघाच्या आणि सोविएत (आणि पुढे रशियन) अंतराळयानांमधून प्रवास करणाऱ्यांना इंग्रजीत cosmonaut म्हणतात, astronaut नाही. म्हणजे राकेश शर्मा यांचा उल्लेख कॉस्मॉनॉट असा केला जातो.

सोविएत (आणि पुढे रशियन) अंतराळ कार्यक्रमाची उद्दिष्टे, यश, क्वचित अपयश याबद्दल बरेच वाचण्यासारखे आहे. परंतु या प्रवासातील दुर्दम्य आशावाद समजून घेण्यासाठी "१४ मिनिटांत उड्डाण" चे ध्रुवपद आपणांस मदत करते -

"दूर ग्रहांच्या धुळकट वाटांवर
आमच्या पाऊलखुणा राहतील"

(अलेक्सेई लिओनोव्ह, ऑस्कर फेल्त्समॅन आणि गायक ईयोसिफ कबझोन यांनी गायलेले "१४ मिनिटांत उड्डाण" येथे उपलब्ध आहे - https://www.youtube.com/watch?v=pxCG4WdZSLU )

मित्रवर्य विनील भुर्के यांच्यासोबत केलेला या गानाच्या मराठी भावानुवादाचा हा प्रयत्न -

कुपीत आहे ठेवला,
नकाशा अंतराळाचा
मार्ग आम्ही आखला,
कप्तान सांगे यानाचा...
मित्रहो तय्यार व्हा,
चला समूहगानाला
क्षणही अल्प मोजके,
राहिले प्रयाणाला...

निर्धार आहे आमचा
मोहिमा फत्ते होतील
यानांचे ताफे आम्हां
ताऱ्यांवर घेउन जातील...
दूर ग्रहांच्या
धुळकट वाटांवर
आमच्या
पाऊलखुणा राहतील... (ध्रुवपद)

गर्वाने फुलेल छाती,
सिंहावलोकनात
शोधिली आम्हीच की,
पहिली अंतराळवाट...
पहिलीच पाऊले पण,
अद्भूत ध्येयप्राप्ती
विश्वोपरी पसरली,
वसुंधरेची कीर्ती...

ध्रुवपद

वेधून लक्ष्य पाहूया,
सुदूर त्या ग्रहांना
शीत, स्तब्ध जाणूया
अनोळखी प्रदेशांना...
परंतु अत्यधिक जी,
ओढ लावूनी मनी,
वाट आपुली पाहील,
प्रिय हीच धारिणी...

ध्रुवपद

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सोनेचका ... मस्तच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणखी कुठली आलीय सोनेचका? मी सोनेरी गरूड! Smile

('देनिसच्या गोष्टी' वाचलं नसेल त्यांना कदाचित हा inside joke कळणार नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभारी आहे बहिरी ससाण्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(अवांतर: या लाल अस्वलाचे खरे नाव 'मिशा' वगैरे तर नाही ना? (१९८० ऑलिंपिक्स फेम...))

(त्या एका ऑलिंपिक्समध्ये भारताने कधी नव्हे ते सुवर्णपदक वगैरे जिंकले होते. (एक. हॉकीत. अर्थात.) तसा अर्ध्या जगाने त्या ऑलिंपिक्सवर बहिष्कार टाकला होता म्हणा, परंतु तरीही.)

- ('तिमूर आणि त्याची बालचमू'पलिकडे मराठीअनुवादित रशियन साहित्यातले काहीही न वाचलेला, मिशाप्रेमी, अमेरिकन) 'न'वी बाजू.

......‌‌‌‌....

आणि इंग्रजीअनुवादित रशियन (पॉपवैज्ञानिक) साहित्यापैकी या. ई. पेरेलमान. (पलिकडे काहीही न वाचलेला.)

मिशा गोग्गोड होता.

आणि गोर्बाचेवप्रेमीसुद्धा.३अ, ३ब

३अ गोर्बाचेवसुद्धा गोग्गोड होता. भले त्याच्या कारकीर्दीत सोविएत संघाचा३अ१ बोऱ्या वाजला असला, तरीही.

३ब गोर्बाचेवसुद्धा मिशाच.

३अ१ आंतरराष्ट्रीय राजकारणात भारतीय हितसंबंधांच्या दृष्टीने सोविएत संघ हा एक भरवशाचा उपयुक्त पशू होता. एरवी कसाही असला, तरीही. गेऽला बिचारा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गाण्यात नाविन्य आहे. रश्यन लोकांचा घोगरा आवाजही मजेदारच असतो.
इथे दिल्याबद्दल अनेक आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त ओळख

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।