जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं! …..7

वेल्थ ऑफ नेशन्स (1776)
-अ‍ॅडम स्मिथ (1723-1790)

xxxx 'अ‍ॅन इन्क्वायरी इंटु दी नेचर अँड कॉजेस ऑफ दी वेल्थ ऑफ नेशन्स' एवढे लांबलचक शीर्षक असलेले हे पुस्तक अ‍ॅडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाने लिहिलेले आहे. सामान्यपणे हे पुस्तक वेल्थ ऑफ नेशन्स या छोटया शीर्षकानेच ओळखले जाते. अमेरिकन क्रांतीच्या वर्षी प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला क्रांतीपेक्षाही जास्त प्रसिध्दी मिळाली. जगातील बहुतेक राष्ट्रामधील आर्थिक गतिशीलता या स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञाने लिहिलेल्या वेल्थ ऑफ नेशन्स या पुस्तकामुळेच आलेली आहे. अ‍ॅलन ग्रीनस्पॅनसारखे अनेक अर्थतज्ञ आजही अ‍ॅडम स्मिथच्या बिनतोड मांडणीची कौतुक करतात.

वयाच्या 28व्या वर्षी ग्लॅस्गो विद्यापीठात तर्कशास्त्र व नैतिक तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर अ‍ॅडम स्मिथ यानी अर्थशास्त्राचा अभ्यास चालू केला. आर्थिक व्यवहारांना शास्त्रीय चौकटीत बसवता येते हे प्रथमच जगाला कळले. तोपर्यंत राजकीय अर्थव्यवहाराला शास्त्र म्हणून मान्यता नव्हती. तार्किकरित्या विश्लेषण करून जागतिक आर्थिक घडामोडीमधील सूत्रबध्दता शोधून व्यक्ती, समाज व राष्ट्र यांच्यातील परस्पर संबंध, त्यांचे नैतिक व्यवहार, इतर क्षेत्रांवर त्याचे होणारे परिणाम इत्यादी सर्व गोष्टींचा विचार करून एक स्थूल कल्पना त्यानी मांडली. माणूस हा केवळ अन्न, वस्त्र, निवारा यासाठी जगणारा प्राणी नसून नैतिक व सामाजिक जवाबदारींची जाण असणारा एक स्वतंत्र सजीव आहे, यावर त्याचा भर होता. म्हणूनच विज्ञानाने माणसाचा विचार करताना त्याच्या जैविक व मानसिक जडणघडणीबरोबरच मानवी स्थिती-गती, भोवतालची परिस्थिती, त्याचे सामाजिक व्यवहार, इत्यादींचा पण सहानुभूतीपूर्वक विचार करावा असा त्याचा आग्रह होता.

त्याकाळी या पुस्तकाचे जगभर अभूतपूर्व स्वागत झाले. औद्योगिक क्रांतीला जे अधिष्ठान हवे होते तेच अ‍ॅडम स्मिथने या पुस्तकामधून दिले. ब्रिटनची विस्कटलेली आर्थिक घडी नीट बसवण्यात या पुस्तकाचा फार मोठा वाटा होता. फ्रान्सच्या राज्यक्रांतीची बीजं या पुस्तकात सापडतील. या पुस्तकाच्या अभ्यासकाने नंतरच्या शतकातील जागतिकीकरण व उदारीकरण यांची मुहुर्तमेढ रोवली. रोनाल्ड रीगन, मार्गारेट थॅचर या विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील राज्यकर्ते आपल्या आर्थिक मनमानीसाठी अ‍ॅडम स्मिथची साक्ष काढत होते.

या पुस्तकातील मांडणीवर टीका करण्यासाठी भरपूर वाव आहे. अ‍ॅडम स्मिथने तळागाळातील गोरगरीबांचा कधी काळी विचार केला होता का? सामान्य लोकांविषयी कळवळा दाखवण्याचे आग्रही प्रतिपादन त्याच्या पुस्तकात सापडते का? माणसांच्या वैयक्तिक स्वार्थामधूनच परोपकारी प्रवृत्ती वाढते या धारणेवरच त्याच्या सिध्दांताचा डोलारा उभा आहे, व या धारणेला नंतरच्या अनेकांनी आव्हान दिले आहे. परंतु स्मिथच्या मते, प्रत्येकाला स्वतंत्रपणे जगण्याची मुभा दिल्यास, त्याच्या जीवन व्यवहारात कुठलीही बंधनं नसल्यास त्याचे जीवन समृध्द होते व राष्ट्राच्या संपत्तीत आपोआपच भर पडत जाते व त्यातच सर्वांचे कल्याण आहे. आता पर्यंतच्या वेगवेगळया आर्थिकव्यवहारांचा अभ्यास केल्यास भांडवली व्यवस्था हीच सर्वात श्रेष्ठ व्यवस्था असून या व्यवस्थेत सुधारणेला भरपूर वाव आहे, यावर त्याचा दृढ विश्वास होता.

या पुस्तकामुळे त्या काळच्या समाजात बदलाचे वारे वाहू लागले. नशिबाला कोसत जगणाऱ्या सामान्य माणसाला आपणही काही करू शकतो, आपली स्थिती बदलू शकतो, प्रयत्न केल्यास जीवनाचा स्तर बदलणे शक्य आहे, या विचारामुळे समाजात नव चैतन्य प्राप्त झाले. बापाचा धंदा मुलाने, मुलाचा धंदा त्याच्या मुलाने असे पिढयान पिढया चालत आलेल्या उद्योग व्यवसायाच्या साखळीत या पुस्तकातील संदेशामुळे खंड पडू लागला. याच कालखंडात तंत्रज्ञानात भर पडू लागल्यामुळे अ‍ॅडम स्मिथच्या विधांनाना पुष्टी मिळाली. मिळालेली संधी व स्वत:तील कौशल्यांच्या जोरावर आपणही कुठल्या कुठे पोचू शकतो, हा आत्मविश्वास वाढू लागला. अ‍ॅडम स्मिथच्या मार्गदर्शी तत्त्वामुळे जग बदलता येते, परिस्थिती बदलता येते यावर सर्व जगाचा विश्वास बसू लागला.

प्रत्येकात स्वयंविकासाची आंतरिक ओढ असते. हीच दृष्टी विसाव्या शतकात विकसित झाली, हे लक्षात येईल. स्वयंविकासाचा दहशतवाद, वसाहतवाद, निर्वंशीकरण, खच्चीकरण इत्यादीशी संबंध जोडता येत नाही. तरीसुध्दा स्मिथची जीवनदृष्टी बाजारीकरणाकडे वाटचाल करणारी होती. चांभार, लोहार, कुंभार, सुतार इत्यादी बलुतेदार इतरांचे भले करण्यासाठी व्यवसाय करत नसून त्यांच्यामधील स्वंयंहिताचा स्वार्थच त्यांना प्रेरणा देत असते. आपण त्यांच्यामधील माणुसकी शोधत बसण्याऐवजी त्याच्या स्वयंहिताला साद घालायला हवे. आपल्या गरजांच्यापेक्षा त्यांच्या फायद्याच्या गोष्टी करायला हव्यात. हा त्याचा सांगण्याचा मूळ हेतू होता. कदाचित यामधून खाजगीकरणाची इमारत चढली असेल. परंतु खाजगीकरणाने घातलेल्या गोंधळाकडे पाहिल्यानंतर सामान्य माणसाचे हाल बघवत नाहीत, हेही तितकेच खरे. परंतु स्मिथच्या दृष्टीपथामध्ये सामान्य माणसाला, गरीबाला, दुर्बलाला, स्थान होते तरी कुठे?
स्मिथची घणाघाती टीका ब्रिटिशांनी अनेक शतके पोसलेल्या व्यापारी भांडवलवादावर होती. या सिध्दांतानुसार व्यापारवाढीतूनच संपत्ती निर्माण होते व त्यातून देशाचा फायदा होतो. अशा व्यापारवाढीला उत्तेजन देण्यासाठी, संरक्षण देण्यासाठी, सवलती, अनुकूल कायदे-कानून असावेत यावर ब्रिटिशांचा कटाक्ष होता. स्मिथच्या मते अशी बंदिस्त व संरक्षित व्यवस्था बिनकामाची असते. ईस्ट इंडिया कंपनी अशाच व्यापार व्यवस्थेचे अपत्य होते. भांडवली व्यवस्थेला अशा प्रकारची संरक्षित भूमिका धोकादायक ठरू शकेल. राष्ट्राची संपत्ती सोन्या-नाण्यातून किंवा नफा-नुकसानीतून न मोजता त्या राष्ट्रातील लोकांच्या राहणीमानावरून, त्यांच्या जीवनशैलीवरुन मोजावे, यावर स्मिथचा कटाक्ष होता. ही व्यापारी व्यवस्था विक्रेत्याचा लाभ व ग्राहकाचे नुकसान यावर भर देते. परंतु निखळ भांडवली व्यवस्थेत विक्रेता व ग्राहक या दोघांनाही आर्थिक व्यवहारामधून संपूर्ण समाधान मिळू शकते. वस्तु योग्य भावात मिळाल्याचा आनंद ग्राहकाला व वस्तू विकून नफा कमावल्याचे समाधान विक्रेत्याला व उत्पादकाला. स्मिथची ही मांडणी भुरळ पाडणारी होती. याच तत्त्वाचे विकृत परिणाम रेनॉल्ड रीगन व मार्गारेट थॅचर यांच्या राजकीय कारकिर्दीत बघावयास मिळाले.

तरीसुध्दा वेल्थ ऑफ नेशन्स या पुस्तकाचा मोठेपणा नाकारण्यात अर्थ नाही. औद्योगिक क्रांती, तंत्रज्ञानातील झेप याच कालखंडात घडत होत्या. हीच नेमकी वेळ साधल्यामुळे या पुस्तकाचा फार गवगवा झाला. त्या काळातील अभ्यासू नेत्यांनी हे पुस्तक वाचून आपली ध्येयधोरणं राबवली. त्यामुळे युरोपियन समाजाला अत्यंत वेगळे वळण लागले. युरोपातील आर्थिक विकासाने उच्चांक गाठला. फ्रेंच राज्यक्रांतीतील अध्वर्यूंनासुध्दा हेच पुस्तक मार्गदर्शी ठरले. अमेरिकेतील भांडवलशाहीला या पुस्तकामुळे तात्त्विक अधिष्ठान मिळाले. वैयक्तिक सुखाच्या मागे लागलेला हा समाज त्यासाठी कुठल्याही थराला जाण्याच्या तयारीत होता. शोषणाला धरबंद राहिला नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमालांना योग्य भाव व संरक्षण देणारे कॉर्न कायदे कालबाहृ ठरले.

स्मिथने मांडलेल्या अनेक तत्त्वांपैकी भांडवलशाहीचे उदात्तीकरण एवढेच तत्त्व सोईस्करपणे अनेक राष्ट्रांनी उचलून धरली. स्मिथने शिक्षणाच्या खाजगीकरणाला विरोध दर्शविला होता, हे विसरले. कुठल्याही प्रकारचे आक्रमण, बंधन, बळजबरी, यांना त्याचा विरोध होता. सामान्यावरील कराचे ओझे कमी करावे, असा त्याचा आग्रह होता. प्रशासनात न्याय वागणुकीची तो अपेक्षा करत होता. नैसर्गिकरित्या आर्थिक वाढ व्हावी, यावर त्याचा भर होता. पिळवणूक, जुलमी व जबरदस्ती करणाऱ्या प्रशासनाला त्याचा सक्त विरोध होता. परंतु युरोपीय भांडवलदारांनी या पुस्तकाचा आधार घेऊन भरपूर धुमाकूळ घातला, हे आपण विसरू शकत नाही.

स्मिथच्या मते खाजगीकरण व बाजारीकरण यांच्यात सुसूत्रता आणण्यासाठी अदृष्य हात सतत कार्य करत असते. त्यामुळे वेगळया नियंत्रकाची गरज नाही. परंतु वरचेवर ठिकठिकाणी आर्थिक अरिष्ट कोसळताना हा अदृष्य हात कुठे गायब होतो याचे स्पष्टीकरण अ‍ॅडम स्मिथ किंवा त्याचे समर्थक देवू शकले नाहीत. एकीकडे मार्क्सचे समाजवादी आर्थिक तत्त्वज्ञान व दुसरीकडे स्मिथचे भांडवलशाही आर्थिक तत्त्वज्ञान याच संभ्रमातून जगाचा प्रवास चालला आहे. तरीसुध्दा वेल्थ ऑफ नेशन्समधील तत्त्वज्ञानाचे आकर्षण संपलेले दिसत नाही.

(क्रमशः)

1..... प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका
2..... ऑन दि ओरिजिन ऑफ स्पीसीज
3..... एक्स्पिरिमेंटल रिसर्च इन इलेक्ट्रिसिटी
4…. ऑन दि अबॉलिशन ऑफ स्लेव्ह ट्रेड
5….ए विंडिकेशन ऑफ दि राइट्स ऑफ वुमन
6…. मॅग्नाकार्टा

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख आवडला. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।

लेख आवडला.

पुस्तक वाचण्याचा क्षीण प्रयत्न एकदा करून बघितला होता. पण मुळात विषयाबद्दल फार गोडी नाही आणि जुनी भाषा वाचून लवकरच कंटाळले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कसलेच बंधन नसले ली खुलली स्पर्धा च संपत्ती निर्माण करू शकते हे तत्त्व ज्ञान वाचायला खूप छान वाटत आहे पण तशी स्थिती आहे का.
पाहिले परंपरे नी व्यवसाय काय करायचा हे ठरत होते म्हणजे त्यांना एक प्रकारचं संरक्षण च होते .

आणि परंपरेने चालत आलेल्या व्यवसाय मुळे कौशल्य सुधा वाढत होते.
आता पण संरक्षण दिलेच जाते फक्त ते गरिबांना नाही तर उद्योग पतीना .
वीज दर हे स्पर्धे तून ठरवले जाताच नाहीत ते निश्चित केले जातात.
पेट्रोल च्या किमती ठराविक पातळी च्या खाली कृत्रिम पण येवू दिल्या जात नाहीत म्हणजे तिथे पण स्पर्धा नाही.
अमेरिकी शेतकरी हजारो ऐकर जमिनीचा मालक त्या शेतकऱ्यांशी गरीब देशातील एक दोन एकर शेती असणाऱ्या नी स्पर्धा करावी ही विचार सरणी मात्र आहे. पण तेच ह्या दुसऱ्या उदाहरणात उलट विचार सरणी दिसून येत आहे.
Petant च्य नावा खाली आर्थिक हिताचे रक्षण आणि भरमसाठ नफा कमावण्याचा पूर्ण अधिकार मात्र मोठ्या कंपन्यांनी दिला आहे बिलकुल स्पर्था न करता.
खूप मोठा विरोधाभास आहे खुलली स्पर्धा आहे हे सत्य नाही तर तर बलवान लोकांना स्पर्धाच नको आहे एकाधिकार शाही हवी आहे आणि तशीच धोरण सरकारी पातळीवर घेतली जात आहेत
भांडवल शाही व्यवस्था तारतम्य बाळगून राबवली गेली नसल्या मुळे असंख्य संकट सुद्धा घोगावत आहेत.
स्वार्थ हाच भांडवली शाही चा पाया आहे आणि हा स्वार्थ च माणसाच्या विनाशाचे कारण सुद्धा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परमार्थ कसा असतो मग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।