जिताडेबाबा - हृषीकेश गुप्ते

जिताडेबाबा

सोनुबाईच्या नावानं नव्हे तर हातातल्या कथलाच्या वाळानं माणसाची ओळख शोधण्याची गावागावांची सवय आदिम आहे. या धर्तीवर ‘चिंतामणी केशव दुर्वे तथा तात्या दुर्वे’ अशी वजनदार ओळख असणारा माणूस पुढे उभ्या पंचक्रोशीत ‘जिताडेबाबा’ या नावाने उदयास आला यात आश्चर्य असं काहीच नाही. तात्या दुर्व्यांना जिताडेबाबा ही उपाधी कशी चिकटली याचा तपास घेतला तर आजही तात्यांच्या जिताडाप्रेमातून उद्भवलेल्या किमान डझनभर आख्यायिका तरी कानावर पडतील. यात जिताड्याची पैदास करणारा गावातला पहिला माणूस ते जिताड्याच्या कालवणासाठी परसातल्या दोरीवर वाळत घातलेलं बायकोचं भरजरी लुगडं विकण्यापर्यंतच्या अनेक दंतकथांचा समावेश आहे. तात्यांचं निर्वाण होऊन आज दोन दशकं उलटलीयत. तरीही त्यांच्या जिताडाप्रेमाच्या सुरस आणि चमत्कारिक कथांची गावावरची मोहिनी अद्यापी ओसरलेली नाही. मुळात गावानं जसं तात्या दुर्व्यांना जिताडाप्रेमापुरतं सीमित करून ठेवलं तसं मला करता येणार नाही. तात्यांच्या एकूणातल्याच मत्स्य- आणि मांसाहारप्रेमाचे अद्भुत नमुने स्वत:च्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर तर नाहीच नाही.

जिताडा हा साधारणत: दोन-अडीच ते आठ-दहा किलोपर्यंत वाढू शकणारा मासा आहे. गावाकडे माणसं आजही वीसवीस-बावीसबावीस किलोचे जिताडे सापडल्याच्या आणि तो खाल्ल्याच्या सुरस कथा चवीने सांगतात. अर्थात, मी स्वत:ही आजवर आठदहा किलोपेक्षा जास्त वजनाचा जिताडा पाहिला किंवा खाल्ला नसला तरी, मोठ्या जिताड्यांना चव नसते आणि ते निबर लागतात हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. जिताडा कोकणातल्या रायगड जिल्ह्यातला एक महत्त्वाचा मासा आहे. राष्ट्रीय प्राणी किंवा पक्षी या धर्तीवर जिल्हास्तरीय मत्स्य अशी निवड करायची ठरवली तर जिताडा जिल्ह्यात निर्विवादपणे अग्रस्थान पटकावेल, इतपत महत्त्वाचा. आम्हा रायगडवासीयांची अशी ठाम श्रद्धा आहे, की जिताडा फक्त आमच्या जिल्ह्यातच मिळतो. तोही विशेषत: खारेपट्ट्यात. खाडीच्या मुखाशी. थोडं वर गेलं तर उरण किंवा ठाणे जिल्ह्यातल्या आगरपट्ट्यातही जिताडा मिळतो. पण ‘जिताडा खावा तर गोठणे-पोयनाडचाच’ हे शब्द ऐकतच मी लहानाचा मोठा झाल्यामुळे जिताड्याबाबत माझी अस्मिता कायमच जागरूक असते. जिताडा जरी गोड्या पाण्यातही वाढू शकत असला, तरी खार्‍या पाण्यातल्या जिताड्याची चवच काही और असते. चवीच्या बाबतीत धरमतरच्या खाडीतला जिताडा संपूर्ण प्रजातीचा मेरुमणी मानला जातो. आजही जिल्ह्यातल्या छोट्यामोठ्या गावांतून भरणार्‍या कबड्डी किंवा क्रिकेट स्पर्धांमध्ये बक्षीस म्हणून जिताडा ठेवला जातो. प्रथम क्रमांक मिळवणार्‍या संघाला अकरा जिताडे, द्वितीय क्रमांकाला सात जिताडे – पासून अगदी मॅन ऑफ दी मॅच, उत्कृष्ट झेल वगैरे सर्व बक्षिसं जिताड्याच्या स्वरूपातच असतात. हे जिताडे जिंकण्यासाठी संघ त्वेषाने खेळतात, लढतात. स्नेहभेट म्हणून जिताडा दिला गेल्याची उदाहरणं तर माझ्या अगदी घरातली. साधारणत: वीस वर्षांपूर्वी माझा भाऊ नोकरीनिमित्ताने परदेशी गेला, तेव्हा आमच्या एका स्नेह्यांनी भेट म्हणून त्याला चांगला पाच किलोचा जिताडा दिल्याची आठवण आजही मनात ताजी आहे. रात्री आलं-लसणाच्या फोडणीवर आईनं बनवलेलं तिखटजाळ जिताड्याचं कालवण चवीनं चाखताना भावाच्या परदेशी स्थलांतरित होण्याच्या निर्णयाचं दु:ख किंचितसं निवलं.

माशांची कालवणं बनवण्याच्या असंख्य पद्धती असतील, पाककृती असतील. मला स्वत:ला भरपूर खोबरं घातलेलं आणि पुरेशी कोकमं टाकून बनवलेलं कालवण आवडतं. ही साधारणत: तळकोकणातली पद्धत. अशा कालवणांना एक वेगळीच चव असते. अशा कालवणांतल्या खोबर्‍याचा खवाळ आणि दुधाळ स्पर्श जिव्हेला सुखावतो. आमच्या भागातल्या कालवणांमध्ये तळकोकणाच्या तुलनेत खोबरं बेताचं असतं. कोकमं नसतील तर बरेचदा चिंचेच्या कोळावर वेळ मारून नेली जाते. या कालवणांचा युएसपी म्हणजे लसणाच्या मुबलक पाकळ्यांची बारीक चिरलेल्या कांद्यासोबत दिलेली फोडणी. या पाकळ्या करपून काळ्या पडून कालवण शिजल्यानंतर पृष्ठभागावर तरंगतात तेव्हा लालकाळ्या रंगाचं एक वेगळंच मनोहारी दर्शन घडतं. अशा कालवणांना एक अनोखी जळजळीत आणि झणझणीत चव असते. लसणाच्या मुबलक मार्‍यामुळे प्रत्येक घासागणिक एक अंतरंग चेतवणारा गंध नाकात शिरतो. चवीपेक्षाही माशांना निसर्गत: येणारा उग्र दर्प दडपणं हाच आलं-लसणाच्या मुबलक मार्‍याचा मुख्य उद्देश असावा!

त्या काळी सोमवार, गुरुवार, शनिवार असे मांसाहारासाठी निषिद्ध असणारे दिवस एखाद्या महामार्गावरच्या गतिरोधकासारखे घरातल्या मांसाहारी प्रवासाचा वेग नियंत्रित करण्याचं काम करायचे. जोडीला चतुर्थी, एकादशी, शिवरात्री असे भलेमोठे थांबे असायचेच. या दिवसांत आईला मांसाहारातला ‘म’ही चालायचा नाही. त्यामुळे मांसाहारासाठी म्हणून वेगळी भांडीच घरात असायची. खास माशांच्या कालवणासाठी आमच्या घरी एक मोठालं पातेलं होतं. माशांची कालवणं कायम त्यातच शिजायची. अजूनही आठ-दहा माणसं जेवायला असली, की माशांच्या कालवणासाठी तेच पातेलं काढलं जातं. किंचित तेलसर तवंग असलेल्या कालवणाच्या रक्ताळल्या रंगावर काळपट पडलेल्या लसणाच्या पाकळ्यांची कलेवरं तरंगताना पाहिली, की शरीरभर विखुरलेली चवीची हरएक इंद्रियं उद्दीपित होतात. ताटात मऊसूत वाफाळणारा आंबेमोहराचा भात आणि सोबतीला चार-सहा माणसं, अशी एकदा का जेवायला बसली, की एखाद्या गहन डोहासारखं भासणारं ते पातेलं काही मिनिटांत उन्हाळ्यात आटलेल्या हौदासारखं पार खपाटीला जायला वेळ लागत नाही. ही अशी कालवणं खाताना जिभेची आणि शरीराची अक्षरश: जुगलबंदी लागते. चरचरणारा तिखट जाळ घशातून पोटात उतरतो तेव्हा भर उन्हाळ्यात डांबरी रस्त्यावरून चालणार्‍या एसटीत बसल्याप्रमाणे वाफाळल्यागत वाटतं. अ‍ॅसिडिटीची वगैरे चिंता वाहणार्‍या लोकांनी या कालवणांच्या वाटेलाही फिरकू नये. दर बुधवार-शुक्रवार किंवा रविवारकडे जिताड्याची कालवणं खाऊन ‘अ‍ॅसिडिटी, अ‍ॅसिडिटी’ करत मेडिकल स्टोअरमधून झिन्टॅक शोधणारी माणसं माझ्या लहानपणी गावी विपुल प्रमाणात आढळत. ‘अ‍ॅसिडिटीच्या गोळ्या खाऊ, पण कालवण खाणं सोडणार नाही’ हा कोकणी बाणा मला कायमच ‘प्राण गेले तरी बेहत्तर...’ सारखाच झुंजार आणि लढाऊ वाटतो. शिवाय इतर अनेक कोकणी बाण्यांएवढाच महत्त्वाचाही!

जिताडेबाबा आमच्या घरासमोर राहायचे असं मला म्हणता येणार नाही. मुळात जिताडेबाबा कुणाच्याही घरासमोर राहायचे नाहीत. सगळेच जिताडेबाबांच्या घरासमोर राहायचे. चांदणभरल्या काळवंडल्या रात्री उत्तरेकडल्या आभाळात जसा ध्रुव तार्‍याचा मान अढळ, तसाच गावाच्या भौगोलिक नकाशावर जिताडेबाबांच्या घराचा मान अढळ. गावातले पत्ते सांगताना जिताडेबाबांच्या घराचा उल्लेख अपरिहार्य. जिताडेबाबांच्या घराजवळ किंवा घरासमोर अशी ओळ आज जिताडेबाबा जाऊन दीड दशक ओलांडल्यानंतरही गावात येणार्‍या कित्येक पत्रांवर पत्ता म्हणून सापडणं, ही जिताडेबाबांच्या अजरामर होण्याला मिळालेली अघोषित शासकीय मान्यताच आहे. आजही बदली होऊन जाणारा प्रत्येक जुना पोस्टमन येऊ घातलेल्या नव्या पोस्टमनला गाव फिरवून प्रशिक्षण देताना आधी जिताडेबाबांचं घर दाखवतो. आपली विस्मृतीत गेलेली कुळं शोधत जुन्या ग्रामस्थाचा कुणी वंशज गावात शिरताना वेशीजवळ ग्रामदैवताच्या मंदिराचा पत्ता विचारतो, तेव्हा जिताडेबाबांच्या घराचा उल्लेख अपरिहार्य असतो. देवांमध्ये गणपतीला जसा पूजेचा आद्य मान, तसाच गावातला पत्ता सांगताना जिताडेबाबांना! आज सदोबानं, म्हणजेच जिताडेबाबांच्या थोरल्या मुलानं सदाशिवनं, बिल्डरला घर विकून तिथे मोठी रहिवासी इमारत बांधवलीय. इमारतीला छान ‘चंद्रलोक’ वगैरे नाव आहे; पण आजही गावकर्‍यांसाठी ती जिताडेबाबांची बिल्डिंग या नावानेच ओळखली जाते. सामान्यत: माणसं निर्वतल्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या दंतकथा बनतात; पण जिवंतपणीच दंतकथा बनण्याचा जो बहुमान जिताडेबाबांनी पटकावला तो नि:संशय अपवादात्मक आहे.

जिताडेबाबांविषयीची माझी पहिली ठळक आठवण मी साधारण सहा-सात वर्षांचा असतानाची आहे. एके दुपारी आमच्याकडे घरकाम करणार्‍या बनकर मावशींची वासंती घाबर्‍या चेहेर्‍याने घरी धावत आली आणि मोठाले डोळे करत, “जिताडेबाबांना काहीतरी झालंय.” असं तेवढ्याच मोठ्या आवाजात ओरडून सांगू लागली. वडील त्यावेळी नेमके घरीच होते. आधी ते उठून घराबाहेर पडले. त्यांच्यापाठोपाठ आई. मग दोन मोठ्या बहिणी आणि भावामागोमाग मीही. जिताडेबाबांच्या दारात एव्हाना माणसं जमली होती. आतून ‘घुऽऽऽघुऽऽ’ असा, काहीसा गुळण्या करणार्‍या माणसाच्या घशातून आल्यासारखा आवाज कानावर पडत होता. दारात उभ्या माणसांना बाजूला सारत आम्ही आत शिरलो. माजघरातच जिताडेबाबा भिंतीला पाठ टेकून, एक हात गळ्याशी तर दुसरा जमिनीवर ठेवून नजर आढ्याकडे खिळवल्या अवस्थेत आ वासल्या तोंडातून, रस्त्यापर्यंत ऐकू येणारा तो विचित्रसा आवाज काढत बसलेले दिसले. वडिलांना पाहताच सुमाकाकू घाबर्‍याश्या स्वरात म्हणाली, “घशात काटा अडकलाय जिताड्याचा.” सुमाकाकू म्हणजेच सौ. जिताडेबाबा – तर वडील म्हणाले “कोरडा भात दे की.” त्यावर सुमाकाकू म्हणाली, “चुलीवरच आहे, अजून वाफ नाही गेली.” हा संवाद कानावर पडतो ना पडतो तोच, एखाद्या बंदुकीतून सटासट गोळ्या सुटाव्यात तशी जिताडेबाबांच्या घरातून वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या दिशांना धावली आणि मिळेल त्या भांड्यांतून आपापल्या घरांमधनं कोरडा भात घेऊन परतली. वडिलांनी डावा हात जिताडेबाबांच्या डोक्याशी धरत उजव्या हाताने त्यांना कोरड्या भाताचा एक छोटा गोळा भरवत म्हटलं, “गिळा आता. सावकाशीने गिळा.” जिताडेबाबांनी भाताचा तो कोरडा गोळा जिभेवर ठेवत घशात लोटला आणि गिळला. जवळच उभ्या मला जिताडेबाबांचा कंठमणी हालल्याचं स्पष्ट दिसलं. मग वडिलांनी पाठोपाठच चांगले आठ-दहा घास कोरडा भात जिताडेबाबांना गिळायला लावला. कोरड्या भाताच्या मार्‍यानं जिताडेबाबांना थोडं सुसह्य वाटू लागलं. एव्हाना कुणीतरी बोलावून आणल्यामुळे डॉक्टरही आले होते. डॉक्टरांनी सिरींजला सुई लावत इंजेक्शन भरलं आणि जिताडेबाबांच्या दंडाला टोचलं. त्या काळी गावात फट्‌ म्हणता ब्रम्हहत्येच्या धर्तीवर, डॉक्टर फट्‌ म्हणता इंजेक्शन टोचत! कोरड्या भातानं घशात रुतलेला काटा पोटात गेला आणि डॉक्टरांच्या इंजेक्शननं जिताडेबाबांच्या मनात रुतलेल्या काट्याचं किल्मिषही गिळलं गेलं. मग जिताडेबाबांना सुमाकाकूनं माजघरातच अंथरुण टाकून दिलं. ते त्यावर लवंडले. थोडा वेळ गेला. काही लोक आपापल्या घरी परतले तर काही जिताडेबाबांच्या अंगणातल्या पेरूच्या झाडाखालीच थांबले. त्या काळी गावाकडे कुणाच्याही घरी काही सुखदु:खाचं घडलं, की लोक गोळा व्हायचे ते बरेचदा दिवसदिवसभर आपापल्या घरी परतायचेच नाहीत. नुस्तं रेंगाळत त्या त्या घराच्या अंगणात, ओसरीवर किंवा जवळपास बसून राहणं हे कोकणी माणसाच्या स्थितीशील जडत्वावस्थेचं जिवंत द्योतक आहे.
माजघरातच लवंडलेले जिताडेबाबा थोड्या वेळातच उठले आणि सुमाकाकूला किंचितश्या दबक्या आवाजात म्हणाले, “वाफ गेली असेल तर थोडं कालवण-भात खाईन म्हणतो.” जिताडेबाबांनी दबक्या आवाजात आणि किंचित अपराधी स्वरात उच्चारलेले हे शब्द गावाने मात्र सुस्पष्ट ऐकले. हे शब्द वार्‍यासारखे आधी पंचक्रोशीत, मग दिवसा-दोन दिवसांत अगदी तालुक्याच्या गावापर्यंत पसरले. तात्या दुर्वेंच्या घशात मोठाला काटा अडकूनही त्यांनी जिताड्याचं कालवण आणि भात ह्यावर यथेच्छ ताव मारत तो कसा फस्त केला याची साग्रसंगीत वर्णनं करताना गावानं आपलं अतिरंजित कथाकथनाचं कसब पुरतं वापरून घेतलं. घडलेली एकूण घटना पुढे सांगणार्‍या प्रत्येकाने पुढे ऐकणार्‍या प्रत्येकाला पळीभर फोडणी देऊनच सांगितली. चिंतामणी केशव दुर्वे तथा तात्या दुर्वेंचा ‘जिताडेबाबा’ या नावाने खरा उदय घडण्याला हीच घटना निमित्तमात्र ठरली.

पुढल्या काही वर्षांत तात्या दुर्वे आणि जिताडा हे समीकरण उभ्या गावाच्या चर्वणाचा विषय ठरलं. त्यात नवल काहीच नव्हतं. परसातल्या दोरीवर वाळत घातलेलं बायकोचं भरजरी लुगडं जिताडा घ्यायला पैसे नाहीत म्हणून तात्यांनी चंद्री कोळणीला दिल्याचा किस्सा ऐकून तर भल्याभल्यांचे डोळे पांढरे झाले. या बातमीचा सोक्षमोक्ष आईसमोर करताना मोगरामावशीचा चेहेरा सात्त्विक संतापानं अक्षरश: लाल झाला होता. “लुगडं विकून मासे खायला तात्यांच्या घराचे वासे किडले नाहीत अजून. ती चंद्री येऊ दे समोर. नाही तिचं इकडचं तोंड तिकडे केलं तर नावाची मोगरी नाही मी. माणसानं खाल्ल्या मिठाकडे एवढीही पाठ फिरवू नये. अंगावरच्या लुगड्याच्या चिंध्या झालेल्या पाहून तात्यानं दया येऊन वहिनीचं नवंकोरं लुगडं दिलं चंद्रीला. आणि ही या अश्या बोंबा मारतेय काय गावातून?” पुढले बरेच दिवस चंद्री मासे घेऊन गावात शिरलीच नाही. मोगरामावशीचा संताप उभ्या गावाला परिचित होता. मावशी जशी आमची वाळवणं घालायची, मिरच्या कुटून मसाले करून द्यायची, तशीच तात्यांच्या घरीही करायची. सुमाकाकूचं आणि मोगरामावशीचं तर विशेष सूत. दोघीही मूळ मुरुडच्या आणि नंतर लग्न होऊन आमच्या गावी आलेल्या. त्यामुळे त्या दोघींत माहेरच्या ओढीचा एक धागा सामाईक होताच. त्यात तात्या तालेवार होते – वृत्तीनं आणि धनानंही; आणि हे उभ्या गावाला ठाऊक होतं. पण ‘जिताड्याच्या कालवणासाठी बायकोचं लुगडं विकणं’ हा कपोलकल्पित का होईना, पण गावासाठी एक अभूतपूर्व किस्सा होता. दंतकथांची अशी बीजं गावगाडा शक्यतो वाया जाऊ देत नाही. त्यामुळेच गावानं तात्यांचा हा किस्सा धादांत असत्याच्या भूमीवरही पेरला, रुजवला आणि अजरामर केला.

गाव कायमच वृद्ध असतं. वृद्ध, अनुभवी आणि अधिकारी. आजवर बाल्यावस्थेतलं किंवा भर तारुण्यातलं गाव माझ्या पाहण्यात आलेलं नाही. अफवा उठवण्याचा, वदंता पसरवण्याचा अधिकार गावाकडे येतो तो याच वर्षानुवर्षांच्या अनुभवांतून. गाव दंतकथा निर्माण करतं तेही अनेक पावसाळे रिचवल्यानंतरच. या पार्श्वभूमीवर तात्यांना ‘तात्या’ म्हणावं का ‘जिताडेबाबा’, याविषयी आजही माझी जीभ द्विधावस्थेत असते. म्हणजे घशात काटा अडकल्यानंतर तात्यांचं ‘जिताडेबाबा’ हे नामकरण गावातल्या त्याकाळच्या मध्यमवयीन पिढीसाठी सर्वमुखी झालेलं असलं तरी तात्यांना ‘तात्या’ असं म्हणतच मोठ्या झालेल्या मला हे संबोधन आजही किंचित अवघडल्यासारखंच करतं. त्याकाळी शाळेतल्या इतर मुलांच्या जोडीने मीही एकदोनदा तात्यांना ‘जिताडेबाबा’ असं नकळत संबोधल्यानंतर वडिलांच्या भल्यामोठ्या तळहाताचा तोंडावर उमटलेला पंचबोटी प्रहार आठवून आजही हात नकळत गालाकडे जातोच. तात्या गावासाठी जिताडेबाबा असले तरी आमच्यासाठी तात्याच होते.

Jitadebaba

जिताडेबाबांना आजही आठवू पाहिलं, की डोळ्यासमोर येते ती सोनेरी रंगाचा कुर्ता घातलेली आणि धोतराचा कासोटा बांधलेली, ‘डोईवरती केस रुपेरी तुरळक टक्कल छान’ अवतारातली मूर्ती! कवळी न लावल्या तोंडाचं बोळकं कायम आ वासल्यागत उघडं. उजव्या हातात लाल रंगाची कापडी पिशवी आणि डाव्या हातात एखाद्या तलवारीप्रमाणे शेपटाकडून धरलेला जिताडा! हातात जिताडा धरल्या अवस्थेत मी प्रत्यक्ष कधी तात्यांना पाहिलं आहे किंवा नाही याविषयी खरं तर माझ्याही मनात एक अंधूक साशंकता आहे. पण आठवण म्हणून तात्यांची ही अशी मूर्ती मनात ठसण्यामागेही एक गमतीशीर आठवणच आहे.

त्या काळी गावात जिताडा, पाला, करळी अशा माशांना प्रचंड मागणी असे. पाले तर पावसाळ्यातच येत. तेही बरेचदा नदीला पूर आल्यावर. पाला हा खरा समुद्रातला मासा. पण पावसाळ्यात बहुधा तो अंडी टाकण्यासाठी थव्याथव्यांनी खाडीमुखाशी येतो आणि कोळ्याच्या जाळ्यात फसतो. हा मासा चवीबाबत मत्स्यसम्राट म्हणावा असा. पाल्याची मादी चवीच्या बाबतीत अवर्णनीय रुचकर! पाल्याच्या मादीच्या अंगावर मांद (म्हणजेच चरबी) आणि पोटात गाभोळी (म्हणजेच अंडी) असतील तर हिच्या चवीला एक वेगळीच बहार येते. या मत्स्यसम्राटाचं सिंहासन मात्र काटेरी. म्हणजेच याच्या शरीरात प्रचंड काटे. मोठ्या काट्यांपासून आकाराने लहानलहान होत गेलेल्या छोट्याछोट्या तंतुमय काट्यांची याच्या शरीरभर पखरण झालेली असते. गावात एकदा का पाले आले की बाजारहाटीसाठी एखाद्या सणासुदीसारखी लगबग सुरू व्हायची. पाले घेण्यासाठी आणि अर्थात विकण्यासाठीही एकप्रकारची चढाओढ लागायची. त्यातनं पाला गाभोळीचा असेल, तर ही चढाओढ एखाद्या स्पर्धेत, आणि स्पर्धा पुढे अक्षरश: इभ्रतीच्या लढाईत रुपांतरित होई. पाले, जिताडे अश्या माशांच्या बाबतीत तर उभी टोपली विकत घेण्यासाठी लोक आपापली पत आणि खिसा पाहून भाव करत.

अशाच एका गाभोळीनं भरलेल्या जिताड्याच्या टोपलीसाठी तात्या आणि पठाण मोहल्ल्यातील मूसा दफेदार यांच्यात एकदा चांगलीच जुंपली होती. आजही कोळीबाजारात गेलं आणि योगायोगाने गवळीपाड्यातले उतेकर आण्णा भेटले, तर जिताडेबाबा आणि मुसाच्या वादाची आठवण हटकून निघतेच. उतेकर आण्णा आपल्या जाड भिंगाच्या चष्म्यातून एका विवक्षित ठिकाणी बोट दाखवत म्हणतात, “हितंच जमली होती गर्दी! आन हितंच जिताडेबाबानं मुसा दफेदाराला लोळवला होता.”

आताशा आण्णांना स्मृतीभंश जडलाय. त्यांना कालपरवाचं किंवा दोन-चार वर्षांपूर्वीचं काहीही आठवत नाही; पण वर्षांच्या गणितात थोडं अजून मागे नेलं तर आण्णा गावाच्या गतकाळाला आरसा दाखवू शकतील अशा अद्भुत आठवणी सांगतात. मागे उपचारासाठी म्हणून आण्णा उतेकरांचा थोरला मुलगा शशी त्यांना पुण्यात घेऊन आला होता, तेव्हा त्याने आण्णांच्या गतकातर होण्याच्या अनेक आठवणी मला हॉस्पिटलच्या व्हरांड्यात उभ्याउभ्याच सांगितल्या. खरंतर आण्णा उतेकर हेही गावाच्या मोरपंखी मुकुटात खोवलेलं एक अनोखं बहुरंगी पीसच! पण त्यांच्याविषयी पुन्हा केव्हातरी!

आण्णा उतेकर कोळीबाजारातल्या ज्या ठिकाणी अंगुलीनिर्देश करतात तिथे आता महेंद्र खाडेचं ब्रॉयलर कोंबड्या विकण्याचं दुकान आहे. तीन बाजूंनी विटांच्या भिंती, डोक्यावर पत्र्याचं छप्पर आणि पुढची बाजू पूर्ण उघडी. दुकानाला दार नाही, कारण चोरीला जाण्याजोगं कोंबड्या वगळता दुकानात काहीच नाही. त्या कोंबड्याही दिवस उताराला येईस्तोवर विकल्या जातात, किंवा उरलेल्या महेंद्र घरी घेऊन जातो. आधी त्या ठिकाणी नुस्ती मोकळी जमीन होती. पूर्वी बरेचदा गावाबाहेरचे मासे विकणारे त्याच ठिकाणी बसत. एखाद्या कपिलाषष्ठीच्या योगाला आजही कोळीबाजारात जाणं झालं आणि महेंद्रने हाक मारली, तर त्या ठिकाणाच्या ऐतिहासिक महत्त्वाचा विषय हटकून निघतोच; आणि मग महेंद्र त्राग्याने म्हणतो, “अरे, या जुन्या खोडांना दुसरं काही आठवतच नाही. जेव्हा बघावं तेव्हा जिताडेबाबा-मूसा, जिताडेबाबा-मूसा.” अशावेळी मी स्वत:च्या डोळ्यांनी प्रत्यक्ष न पाहिलेला, पण गावातल्या शेकडो मुखांतून सहस्र वेळा ऐकलेला तो प्रसंग क्षणार्धात माझ्या चक्षूंसमोरून तरळून जातो.

लकाकणार्‍या, खवलेमय आणि चंदेरी कांतीच्या जिताड्यांनी भरलेली टोपली. टोपलीमागे, डोक्यावर चिमुळ ठेऊन बसलेला धर्मा मोकल. त्या काळी धर्माच्या डोक्यावर कायम चिमुळ असे. चिमुळावर टोपली असेल नसेल! धर्माच्या उजव्या हाताला जिताडेबाबा, तर डाव्या हाताला मूसा. कधी जिताडेबाबा मूसानं केलेल्या भावा-वरचढ बोली लावतायत, तर कधी मूसा जिताडेबाबांनी लावलेल्या भावावर कुरघोडी करतोय. त्या दिवशी दोघेही माघार घ्यायला तयार नव्हते. जसजसा भाव चढत गेला आणि बोल्या गरम होत गेल्या, तसतशी गर्दी वाढत गेली. हळूहळू त्या गर्दीने आपापल्या बाजूही निवडल्या. मूसाच्या बाजूने शेजारीच असलेल्या मोहल्ल्यातल्या माणसांची गर्दी जमली, तर तात्यांच्या मागे हळूहळू उरलेला गाव एकवटत गेला. सुरुवातीला नुसत्या सुस्कार्‍यांवर आणि आश्चर्योद्गारांवर सीमित असलेल्या गर्दीच्या प्रतिक्रिया हळूहळू परस्परविरोधी टिप्पण्यांमध्ये बदलत गेल्या. धर्मा मात्र स्थितप्रज्ञासारखा दोनही बाजूंनी कानावर पडणारी वाढीव बोली मेंदूत साठवत आकडेमोड करत राहिला. हळूहळू बघ्यांच्या गर्दीत एक अनामिक आवेश संचारला. आवेशाचं रुपांतर त्वेषात व्हायला वेळ लागला नाही. त्वेषाचं रुपांतर द्वेषात होण्याआधी मूसानं समजूतदारपणा दाखवत माघार घेतली. मूसानं माघार घेताच तात्यांच्या मागे जमलेल्या गर्दीनं एकच जल्लोष केला. काही उत्साही गावकर्‍यांनी तात्यांना खांद्यावर घेतलं आणि गावातून एक ‘न भूतो न भविष्यति’ अशी मिरवणूक निघाली. ते साधारण चौर्‍याऐंशी-पंच्याऐंशी साल असावं. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांमुळे जनमानस तापायला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर तात्यांनी मूसाच्या घशात हात घालून जिताड्याची टोपली कशी काढून घेतली याची चर्चा एखाद्या क्रिकेट सामन्याच्या समालोचनासारखीच गावभर रंगली. या घटनेचा परिणाम गावानं दीर्घकाळ टिकवला. पुढे पाकिस्तानविरोधात जिंकलेल्या प्रत्येक क्रिकेट सामन्याच्या वेळी गाव एकवेळ ‘हिंदुस्थान जिंदाबाद’च्या घोषणा द्यायला विसरला, पण ‘जिताडेबाबा की जय’ ही घोषणा मात्र गावच्या क्रिकेट सामन्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरात कोरली गेली. वडिलांना जेव्हा ही घटना कळली तेव्हा ते त्राग्याने म्हणाले, “हा तात्या, एक दिवस रस्त्यावर येणार आहे.”

तसं पाहता निव्वळ संपत्तीचा विचार करता मूसा दफेदाराच्या पासंगालाही तात्या पुरले नसते. तात्या तालेवार होते यात वाद नाही; पण तात्यांची संपत्ती बापजाद्यांनी ठेवलेला जमीनजुमला इथवरच मर्यादित होती. मूसा दफेदार मात्र धनाढ्य होता. रेवसला समुद्राकाठी त्याचं त्या काळात असलेलं फार्महाऊस पाहून साक्षात दिलीप कुमारच्या डोळ्यांचं पारणं फिटलं होतं असं म्हणतात. त्याचे अनेक व्यवसाय होते. त्याच्या मालकीच्या म्हणे मोठाल्या बोटी होत्या. असं असूनही इभ्रतीच्या या लढाईत मूसा दफेदारानी माघार का घेतली, अशी चर्चा आमच्याच ओसरीवर एकदा झडली असता बापट वकील म्हणाले होते, “धनिक समजूतदार असतो. इभ्रत कुठं पणाला लावायची ते त्याला कळतं.”

त्या रात्री टोपलीतल्या जिताड्यांचा खमंग बेत तात्यांच्या घरी पार पडला. सकाळी कोळीबाजारात तात्यांच्या पाठीशी उभ्या गावातल्या सगळ्यांना जेवणाचं आमंत्रण मिळालं. जिताड्याच्या मधल्या मांसल भागाच्या तुकड्या करून त्या तळण्यात आल्या. डोक्याच्या आणि शेपटीकडल्या भागाचं कालवण शिजलं. मोगरामावशीसह कातळपाड्यातल्या चार बायका अविश्रांत भाकर्‍या थापत बसल्या. चुलीवर भाताची मोठी डेग रटरटू लागली. त्या रात्रीपर्यंत निव्वळ थट्टेनं आणि अपरोक्षच उच्चारली जाणारी ‘जिताडेबाबा’ ही उपाधी गावानं तात्यांना मग सन्मानानं बहाल केली. दुसर्‍या दिवशी शाळेत वसंता बापट म्हणाला, “कालची लढाई आपण जिंकली. तात्या दुर्वे मोगलांशी निकराने लढले.” त्यानंतर दिवसभर माझ्या डोळ्यांसमोर एका हातात धरलेला जिताडा तलवारीसारखा सपसप फिरवत मूसा दफेदाराशी लढणारे तात्या तरळत होते. रात्री स्वप्नात कोळीबाजाराच्या युद्धभूमीवर अंगावर माशांच्या खवल्यांचं चंदेरी चिलखत घातलेले आणि तलवारीला मत्स्यमुखी मूठ असलेले तात्या आले. तात्यांची ही प्रतिमा मनातून आजही पुसली गेलेली नाही. त्यामुळे तात्या म्हटलं, की एका हातात लाल रंगाची कापडी पिशवी आणि दुसर्‍या हातात शेपटाकडनं धरलेला जिताडा डोळ्यासमोर येतोच येतो.

तात्यांच्या हातातली लाल रंगाची पिशवी माझ्याच नव्हे तर तात्यांना पाहिलेल्या गावातल्या सगळ्यांच्याच स्मृतीत ठसलेली आहे. आजही तात्यांची आठवण निघाली, की त्या लाल रंगाच्या कापडी पिशवीचा हटकून उल्लेख होतो. बाजारात जाताना तात्या पिशवीची छान घडी घालून सदर्‍याच्या खिशात ठेवत. परतताना मात्र एखाद्या नवविवाहितेनं आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र मिरवावं तशी उभ्या गावातून त्या पिशवीची अभिमानाने मिरवणूक काढत. तात्यांच्या पिशवीत सहसा बाजारहाट असे, तीही मांस किंवा मासे या स्वरुपातलीच. सोबतीला ओला मसाला म्हणजे मिरची-कोथिंबीर-आलं; आणि बरेचदा नाकेदाराच्या हॉटेलमधल्या शेवचिवड्याची किंवा शेवबुंदीची पूडी! शेवचिवडा किंवा शेवबुंदी हे तात्यांचं अत्यंत आवडीचं खाद्य होतं. दुपारच्या वामकुक्षीनंतरचा चहा झाला, की संध्याकाळी गावभर रपेट मारायला बाहेर पडण्यापूर्वी तात्या बरेचदा ओसरीवर बसून शेवचिवडा खात बसलेले दिसायचे. संध्याकाळी आईकडे काही खायला मागितलं आणि घरात काही नसलं, की आई हटकून ‘तात्यांकडे जा’ म्हणायची. अशावेळी ओसरीवर बसलेल्या तात्यांच्या मांडीला मांडी लावून शेवचिवडा खाताना छाती अभिमानाने फुलून यायची.

तात्यांचं आणि सुमाकाकूचं अगत्य, आग्रह आणि औदार्य यांबद्दल त्यांचा शत्रूही शंका घेणार नाही. त्रयस्थपणे तात्यांचं व्यक्तिमत्व जाणून घेणार्‍या एखाद्या परक्या माणसाला तात्या अजातशत्रू होते असं वाटू शकेल, पण ते धादांत असत्य ठरेल. तात्यांनाही शत्रू होते. या शत्रुत्वामागेही तात्यांचं अपार मत्स्यप्रेमच होतं. तात्या ज्या सहजतेने मांस आणि मासे विकत घेत, ज्या चवीने मत्स्य आणि मांसाहार करीत ती सहजताच अनेकांच्या मनातल्या तात्यांच्या असूयेचा विषय बनली होती. या असूयेतही बरेचदा तात्यांच्या ज्ञातिबांधवांचाच भरणा जास्त असे. आमच्याच आळीतले दादा गडकरी रस्त्यावरून हातातल्या पिशवीत मासे घेऊन जाणारे तात्या दिसले, की मोठमोठ्याने तात्यांचा उद्धार करणारे उद्गार स्वत:च्याच पत्नीपाशी काढत. सोबतीला पारसनीस, राजे, सुळे वगैरे मंडळीही होतीच. या सार्‍यांचीच असूया चुलीतल्या फुंकर मारल्या निखार्‍यागत तप्त व्हायची ती नवरात्रात. नवरात्रात गावातल्या लोकांच्या मुखी देवीचं नाव कमी तात्यांचंच जास्त असे.

नवरात्रात तात्यांच्या घरी देव बसायचे आणि पुढचे नऊ दिवस निव्वळ जल्लोष असायचा. तात्यांचे अगदी ठाणे-मुंबई-पुणे-बडोदा असे दूरदूरवर पसरलेले नातलग, एखाद दिवस का होईना, पण घरी बसलेल्या देवीच्या दर्शनाला या काळात येऊन जायचे. तात्या या नऊ दिवसांत कडक उपास करत; आणि या गोष्टीचं उभ्या गावाला अप्रूप असे. एरवी सोमवारी किंवा गुरुवारी अभक्ष्यभक्षण करता येणार नाही म्हणून आदल्या दिवसापासून व्यथित असणारे तात्या नवरात्रातला हा उभा सप्ताह वशाट खाल्ल्यावाचून कसे राहतात याचं नवल करत गावकरी रोज रात्री तात्यांकडे आरतीला जमत. नवरात्रात तात्यांच्या घरातून रात्रीची आरती सुरू झाल्याचे आवाज कानावर पडले, की गावात शुकशुकाट होई. जो तो हाती असेल ते कामधाम सोडून तात्यांच्या घराकडे कूच करी. तात्यांच्या घराचं माजघर मी पाहिलेल्या गावातल्या सर्व घरांच्या माजघरांपेक्षा मोठं होतं. नवरात्रीत तात्यांचं हेच माजघर, अगदी माजघराचा कोपरा न् कोपरा माणसांनी भरून जायचा. माजघरात गर्दी तुंबली, की तो ओहोळ ओसरीवर ओघळायचा. मग पडवीत. मग अंगणात. बायापोरी स्वयंपाकघरात उभ्या राहून देवीच्या आरतीत रममाण होत. एके रात्री आरतीच्या वेळी तात्यांच्या घरी गर्दीचा एवढा मोठा महापूर आला, की काही लोक न्हाणीघरात उभे राहिलेलेही मी पाहिले आहेत! आरती संपता संपता तात्यांच्या अंगात येई आणि मग ते मागेपुढे, डावीउजवीकडे झुलू लागत. सरतेशेवटी अंगाला एक मोठा झटका देत बुभुत्कार केल्यागत आरोळी ठोकून मगच तात्या शांत होत. तात्यांची ही आरोळी गावाच्या वेशीपर्यंत ऐकू जाई. कुणालाही हे वर्णन अतिशयोक्त वाटेल, पण माझ्याच वर्गातला वैभव मनोरे गावाबाहेर असणार्‍या धरणखोरे विकास वसाहतीत राहायचा. दुसर्‍या दिवशी शाळेत गेल्यावर तो तात्यांची आरोळी ऐकल्याची ग्वाही द्यायचा. तात्यांची आरोळी आरती संपण्याचं द्योतक असायचं. मग तिथे लोटलेला गर्दीचा महापूर हळूहळू कमी होत जायचा. सांदीकोपर्‍यातून वाहून गेलेल्या पाण्याप्रमाणे तात्यांच्या घरी जमलेली ती असंख्य माणसं गावातल्या गल्लीबोळातून ओसरून जायची. अर्थात या विरलेल्या गर्दीच्या सामूहिक मनात एकच प्रतीक्षा अखंड प्रज्वलित असायची. किंबहुना ही प्रतीक्षाच जणू लोकांना नवरात्रीतले नऊही दिवस तात्यांकडच्या आरतीला सर्व विघ्नांवर मात करीत खेचून आणायची. ती असायची अष्टमीची प्रतीक्षा!

आजवरच्या गावातल्या ‘टॉप टेन इव्हेन्ट्स’ काढायच्या झाल्या, तर तात्यांकडे साजरा केला जाणारा नवरात्रीतला अष्टमीचा दिवस सहजच अग्रस्थान मिळवेल. अष्टमीला तात्यांकडे महाप्रसाद असे. या महाप्रसादात गावाला तोवर ठाऊक असलेल्या प्रत्येक मांसाहारी पदार्थाचा समावेश असायचा. नवरात्रीतली तात्यांकडच्या आरतीला लागणारी हजेरी ही या महाप्रसादाच्या भोजनाच्या आमंत्रणाची प्रवेशपत्रिकाच असायची. आरतीला येणार्‍या प्रत्येक माणसाची नोंद महाद्या भगत ठेवायचा. महाद्या भगत म्हणजे माझ्या वर्गातल्या खंडू भगताचा आज्या. महाद्या कायम तात्यांच्या ओसरीवर बसलेला असे. पावसाळ्यात तात्यांची शेतीकामं, उन्हाळ्यात आमराईतून येणार्‍या आंब्यांचा हिशेब आणि इतर वेळी तात्यांच्याच घरातली, गायीम्हशींचं दूध काढणं वगैरे किडूकमिडूक कामं हे सगळं महाद्या भगत बघायचा. अष्टमीला रात्री महाप्रसादाला कुणाकुणाला जेवायला बोलवायचं याची यादीही महाद्याच करायचा. या नऊ रात्रींत एखाद दिवसच आरतीला हजेरी लावणारे लोक वगळले जायचे. चार किंवा पाच दिवस येणारे लोक वेटिंग लिस्टवर असायचे. सर्व दिवस नित्यनेमाने आरतीला येणार्‍या गावकर्‍यांना मात्र खास महाद्या घरी जाऊन निमंत्रण देत असे.

तात्यांना मुलं तीन. थोरला सदोबा, धाकटा माधव; आणि मधली ज्योती. सदोबाचं खरं नाव सदाशिव; पण त्याला लहानपणापासूनच उभं गाव सदोबा म्हणे. त्याचं लग्न गावातल्याच जयवंतांच्या मृणालशी झालेलं. सदोबा-मृणाल किंवा ज्योती आणि माधव यांच्यात आणि माझ्यात चांगलं पंचवीस-तीस वर्षांचं अंतर; पण त्यांना दादा, ताई, काका, आत्या अशा नावानं संबोधावं हे लहानपणापासून मला कुणी शिकवलंच नाही. त्यामुळे मी त्यांना कायमच अरेतुरे करत आलो. माधव अविवाहितच राहिला. तो तात्यांच्याच जंगलतोड करून आलेल्या लाकडांपासून फळ्या कापणार्‍या सॉ मिलची व्यवस्था बघायचा. ज्योतीचं लग्न मला आठवत नाही, पण तिला अंबरनाथला कुठंतरी दिलेली. ज्योतीच्या नवर्‍याला सगळे यजमान म्हणत. ते अंबरनाथच्याच कुठल्यातरी फॅक्टरीत कामाला होते. सासुरवाडीला आल्यावर यजमान कायम टेर्‍यात राहात. रस्त्यावरून चालताना ते ताठ मानेनं आणि बिलकुल डावीउजवीकडे न झुकता सरळ रेषेत चालत. यजमानांना पाठमोरं पाहिलं, की मला कायमच कडक इस्त्री केलेली शर्ट-पॅन्ट रस्त्यावरून चालतेय असं वाटायचं. यजमानांचा चेहेराही इस्त्री केल्यासारखाच ताठर असायचा. सहसा त्यांच्या चेहेर्‍यावरल्या इस्त्रीची घडी कधी मोडायची नाही. एकदा वडिलांसोबत मी अंबरनाथला गेलो असताना आम्ही अचानकच ज्योतीच्या घरी डोकावलो. तेव्हा यजमानांचं जे रूप मला दिसलं, त्या रुपानं यजमानांच्या माझ्या मनातल्या प्रतिमेवरून पार बोळा फिरवून टाकला. चार ठिकाणी ठिगळं असलेली बिनबाह्यांची बनियान आणि चट्टेरीपट्टेरी कापडी अर्धलेंग्यातले यजमान पाहून मला त्या बालवयातही नैराश्य आलं. गावी आल्यावर कडक इस्त्रीत वावरणारे यजमान त्याक्षणी मला चार दिवस वापरून धुण्याच्या बादलीत टाकलेल्या कपड्यांसारखे अजागळ, अस्ताव्यस्त आणि चुरगाळलेले वाटले. ज्योती सहसा नवरात्रातच माहेरवाशीण बनून गावी येई. अष्टमीच्या महाप्रसादाच्या मांसाहारी महाभोजनाची जी काही तयारी करायची असे त्यात ज्योतीच अग्रणी असे. ज्योतीनं एकदा का स्वयंपाकघराचा ताबा घेतला, की मृणालच्या गोर्‍यापान चेहेर्‍यावर आठ्यांचं जाळं उमटे. पण तात्यांच्या स्वयंपाकघरात अष्टमीच्या रटरटणार्‍या धामधुमीत त्या आठ्या कुणालाही दिसत नसत.

अष्टमीच्या सकाळी बाजारहाटासाठी बाहेर पडलेले तात्या ‘याचि देही याचि डोळा’ गावातल्या ज्यांनी ज्यांनी पाहिलेले आहेत त्यांची आयुष्यं धन्य झाली अशी माझी प्रामाणिक श्रद्धा आहे. पुढे तात्या, तात्यांच्या मागे उजव्या हाताला धाकटा माधव, डाव्या हाताला महाद्या आणि क्वचित या तिघांच्या मागून मी आणि खंडू! एरवी एकट्याने बाजारहाटासाठी पडणार्‍या तात्यांना त्या दिवशी मात्र सोबतीला सैनिकांची गरज पडे. अष्टमीच्या दिवशी सकाळी तात्या कोळीबाजाराच्या दिशेने चालू लागले, की गावातले लोक एखाद्या महापुरुषाची मिरवणूक पाहावी तसे खिडकीबाहेर डोकावत. खिडकीबाहेर डोकावलेला प्रत्येक चेहेरा तात्या दिसताच मग घाईघाईने मान मागे वळवून घरातल्या इतर सदस्यांना ओरडून म्हणे, “अहो, लवकर बाहेर या. तात्या मासळीबाजारात निघालेत!” ती हाक ऐकताच कामधाम सोडून लोक घराबाहेर डोकावून एखाद्या मोहिमेवर निघालेल्या योद्ध्याचं डोळ्यांची पारणं फेडणारं दर्शन घ्यावं तसे रस्त्यावरून चालणार्‍या तात्यांना दोनही डोळ्यांत साठवून घेत. माझ्या मनातले सभोवतालचे सारे आवाज अशावेळी लुप्त होत आणि मनातल्या मनातच ढोल-ताशे-नगारे-तुतार्‍या वाजू लागत. मध्येच कुणीतरी शंख फुंकल्याचा आवाजही मनात घुमायला लागे. तो शंखरव उभ्या आसमंताला गवसणी घालत आभाळाला स्पर्श करून अनेक उच्च-आवर्तनं पार करत थांबे, तो नेमका गुलाम खाटकाने सोललेल्या बोकडाचं दर्शन दोनही डोळ्यांना झाल्यावरच!

परतीच्या वाटेवर सदोबा आणि महाद्या दोघांच्याही दोनही हातात दोन-दोन मोठाल्या पिशव्या असत. दोघांच्या हातातल्या त्या चारही पिशव्यांत मिळून गुलाम खाटकाने सोललेला एक उभा-आख्खा बोकड सामावलेला असे. परतीच्या वाटेवरचा एक थांबा अकबर भाजीवाल्याच्या दुकानाशी असे. अष्टमीच्या दिवशी मिरची-कोथिंबीर आणि आल्याचा साठा जास्तच ठेवायचा हे एव्हाना अकबरला सवयीने उमजलेलं असायचं. त्यानं आधीपासूनच बांधून ठेवलेल्या ओल्या मसाल्याच्या गड्ड्या पिशवीत टाकून तात्यांच्या घरापर्यंत वाहण्याचं काम मग मी आणि खंडू करीत असू. अष्टमीच्या दिवशी तात्या एखाद्या सरसेनापत्यासारखे नुसते युद्धभूमीवरून चालण्याचं काम करत. त्या दिवशी तात्यांच्या हातातली लाल रंगाची पिशवीही त्यांच्याच खिशात घडी घातल्या अवस्थेत आराम करी. आमची ही विजयी मिरवणूक घरी पोहोचते ना पोहोचते तोच गावातल्या चार-सहा कोळणी आपापल्या टोपल्या घेऊन तात्यांच्या दारातच उभ्याच असायच्या. जिताडे, शिवडे, कटले, बोईट, घोळ अशा मिश्र माशांच्या मिळून आठदहा टोपल्या तात्यांच्या परसात रिकाम्या व्हायच्या. खंडूची काकू म्हणजे रामा भगताची बायको गुलाब आणि मोगरामावशी ते मासे कोयत्याने साफ करून माशांच्या तुकड्या करायला बसायच्या. उन्हं थोडी कलायला लागली, की कातळपाड्यातल्या चार-सहा बाया यायच्या. तात्यांकडे साधारणत: एक-दीड मीटर व्यासाचा एक मोठाला वडिलोपार्जित पाटा होता. त्या पाट्याभोवती या बाया वर्तुळ करून वरवंट्यानं आलं, मिरची, लसणाचं वाटण वाटत बसायच्या. पाट्यावर वाटल्या जाणार्‍या वरवंट्यांच्या आवाजाचा ‘वुरुंग वुक...वुरुंग वुक...’ असा एक अत्यंत कर्णमधुर कोरस कानावर पडायचा. आलं, मिरची, लसूण जसजसं वरवंट्याखाली ठेचलं जायचं, वाटलं जायचं; तसतसा घ्राणेंद्रियं उद्दीपित करणारा एक तिखटसर दर्प आसमंतात दरवळायचा. त्या दर्पाने कुंपणावर बसलेले कावळे अस्वस्थ व्हायचे आणि एकमेकांकडे टकामका पाहत बसायचे.

अष्टमीच्या बाजारहाटावरून परतल्यानंतर गावात फेरी मारली असता, लोक अडवून अडवून प्रश्नं विचारत. प्रश्न साधारण ‘बोकड किती किलोचा होता?’पासून ते ‘एवढं मटण पुरेल?’पर्यंतच्या पल्ल्यामधले असत. अष्टमीच्या दिवशी बरेचदा लोक पारावर, ओसरीवर किंवा चौकाचौकात बसून ‘रात्रीच्या महाभोजनाला तात्या कोणाकोणाला बोलावणार?’ याचा अंदाज बांधत बसत. गावकर्‍यांनी बांधलेले अष्टमीच्या जेवणाच्या निमंत्रणाचे अंदाज वेधशाळेनं वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजासारखे बेभरवशाचे असत. बरेचदा अपेक्षा असूनही एखाद्याला आमंत्रण मिळत नसे, तर एखाद्याच्या पदरी अचानकच महाभोजनाचा योग अनपेक्षितरीत्या पडत असे. अमुकतमुकला तात्यांच्या घरचं महाभोजनाचं निमंत्रण न मिळावं म्हणून लोक रीतसर काड्या करत, छोटीमोठी राजकारणं खेळत. संध्याकाळी महाद्या भगत निमंत्रणाला बाहेर पडला, की लोक आवर्जून त्याला नमस्कार करत. महाद्याला वाटलं तर तो तात्काळ नमस्काराच्या मोबदल्यात रात्रीच्या महाभोजनाचं आमंत्रण त्या त्या गावकर्‍याला देऊन टाके. कधीकधी एखादा बेरक्या उभ्याउभ्याच महाद्याचे कान एखाद्याविषयी भरून महाद्याची निमंत्रणाची पावलं स्वत:ला हव्या त्या दिशेने वळवून टाके.

अष्टमीच्या रात्री आरती संपता संपता तात्यांच्या सोबतीला इतरही काही गावकर्‍यांच्या अंगात येई. तात्यांनी त्यांची ती चिरपरिचित आरोळी ठोकली, की सोबतीला तात्यांच्या जवळपास, दूर किंवा अगदी अंगणात उभा कुणीतरीही जागच्या जागी घुमू लागे, स्वत:भोवतीच झुलू लागे. मानसशास्त्राच्या परिप्रेक्ष्यात या घटनेची कारणमीमांसा शोधायची झाली, तर अष्टमीच्या महाभोजनाची प्रतीक्षा अनावर होणे यापलीकडे माझ्या हाती काहीही लागत नाही. यथावकाश तात्यांचं झुलणं थांबलं, की मग त्या इतर दोघातिघांचंही थांबायचं. लोक अंगात आल्या तात्यांच्या पाया पडत, मात्र सोबतीला घुमलेल्या त्या दोघातिघांच्या वाट्याला मात्र तुच्छतेची नजरच पडे. आरती झाल्यानंतर तात्यांच्या पाया पडायला येणार्‍या सगळ्यांचीच नजर खिळलेली असे ती महाप्रसादाच्या ताटावर. तात्यांकडे महाप्रसादाचं म्हणून जे ताट देवीसमोर ठेवण्यात येई ते ताट इतर सामान्य ताटांपेक्षा किमान चौपटीनं मोठं होतं. मी आजवर एवढं मोठं ताट प्रत्यक्षात पाहिलेलं नाही. तात्यांच्या पूर्वजांना म्हणे ते ताट मुरुडच्या शिद्दीकडून भेट मिळालं होतं. अष्टमीच्या दिवशी त्या ताटाचा मान पुरेपूर राखला जाईल एवढे पदार्थ जेवणात असत. एकदा मी आणि खंडूने ताटातले पदार्थ मोजले असता ते संख्येने शेहेचाळीस भरले होते. आत्ता सर्वच पदार्थांची नेमकी नावं आठवणार नाहीत; पण अगदी आजवरच्या आठवणीतला तात्यांच्या घरच्या अष्टमींच्या जेवणाचा धांडोळा घेतला आणि निव्वळ बोकडाच्या मटणाच्या पदार्थांची यादी केली, तर त्यात मटणाचा रस्सा, सुकं मटण, चाप फ्राय, भेजा फ्राय, कलेजी फ्राय, चुलीवर भाजलेली तिल्ली, खिमा, मुंडीचं सार, पाया सूप, रक्ती, वजडी अशी मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढतच जाणारी यादी करता येईल. एकदा तात्यांकडेच अष्टमीचं जेवण जेवताजेवता दादा गडकरी हात दाखवून अवलक्षण केल्यागत कुत्सितपणे म्हणाले होते, “तात्या तुम्ही बोकडाचे कान, डोळे आणि शिंगं तरी का टाकून देता? तीही शिजवायची की.” तात्या गप्प बसणारातले नव्हते. “तुमच्या श्राद्धाच्या जेवणाला आपण तो बेत करू हं!” असं तात्या थंडपणे उद्गारले. त्या दिवसानंतर दादा गडकरी आणि तात्या दुर्व्यांच्यात वितुष्ट आलं, ते कायमचं. मटणाच्या या सर्वच पदार्थांसोबत तात्यांच्या घरी त्या रात्री कोंबडीचेही अनेक प्रकार शिजत. सोबतीला कोळंबीची खिचडी, माशांची डोकी आणि शेपटीचं कालवण, सोबतीला अनंत प्रकारच्या तळलेल्या माशांच्या तुकड्या. यातही जिताडा अग्रक्रमावर. सोबतीला तळलेला जवळा, तळलेली अंबाडी सुकट, तव्यावर भाजलेले सोडे, चुलीवर भाजलेले सुके बोंबील, सुक्या बोंबलाचं सार आणि हे सारं कमी म्हणून की काय, भर म्हणून धाकट्या माधवला खास अलिबागला पाठवून तिथून आणलेल्या तिसर्‍या आणि कालवं! या लेखाच्या निमित्ताने हे सारं आठवताना क्षणभर धाप लागली. तात्यांच्या घरी अष्टमीला महाप्रसादाच्या निमित्ताने हे सर्व पदार्थ शब्दश: शिजत असत.

हे सर्वच पदार्थ काही प्रत्येकाच्याच वाट्याला येत नसत. महाप्रसादाची महाथाळी संपवण्याचा मान तात्यांचा असे. रुढीपरंपरेनुसार प्रसादाच्या ताटातलं काहीही म्हणजे काहीही टाकून चालत नसे. एवढे सारे पदार्थ एकट्याने संपवूनही तात्या साधा ढेकरही देत नसत. नीलगिरीच्या झाडागत सडपातळ बांधा असणार्‍या तात्यांच्या पोटात हे एवढं सारं तात्पुरतं का होईना, पण मावायचं कसं याचं आश्चर्य मला त्या अनादि काळापासून आजतागायत वाटत आलेलं आहे. अष्टमीच्या महाभोजनाची तात्यांच्या घरातली बैठक साधारणत: प्रतिष्ठेच्या अग्रक्रमानुसार असे. माजघरात तात्यांसह काही ज्ञातिबांधव, महाद्यासारखे तात्यांचे जिवलग आणि गावातली इतर प्रतिष्ठित माणसं बसत. पडवी, ओसरी आणि अंगणात मात्र ज्याला जिथे जशी जागा मिळेल तो तो तिथे तसा बसून घेई. माजघरातल्या बैठकीला या मांसाहारी महाप्रसादासोबतच खास उंची मद्य तीर्थ म्हणून वाढले जाई. पडवी आणि ओसरीवर जमलेल्या लोकांनाही तीर्थ मिळे, पण ते बरेचदा संत्री-मोसंबी असं देशी स्वरुपातलं तीर्थ असे. अष्टमीच्या रात्री तात्यांच्या घरी होणारं तीर्थवाटप हे मर्यादित असलं, तरी जेवणाला मात्र कोणतीही मर्यादा नसे. लोक पोटाला तड लागेस्तोवर जेवत आणि तेच जेवण चढल्यागत झोकांड्या देत जड पोटाने घरी जात. पुढले कित्येक दिवस गावात त्या रात्रीच्या जेवणाचे गौरवोद्गार काढणार्‍या अभूतपूर्व गप्पा रंगत. यातही बरेचदा ‘कुणाच्या ताटात कसा कलेजीचा तुकडा आला, कुणाला कशी नळी मिळाली’ इथपासून ते ‘यावेळी थोडं कमी जेवलो, पुढच्या वेळी मात्र चांगला ताव मारायचा’ अशी मनाशी खूणगाठ बांधणार्‍या गप्पांचा समावेश असे.

जिताडेबाबांच्या प्रतिष्ठेची, मानमरातबाची आणि इभ्रतीची नौका डळमळू लागली ती त्यांनी माट्यांचं तळं पंचायतीकडून लिलावात तीन वर्षांच्या भाडेकरारावर घेतलं तेव्हा. अर्थात तोवरच्या मांस आणि मत्स्याहारावर केलेल्या अपार उधळपट्टीने तात्यांच्या तालेवारपणाचा पाया डगमगू लागला होताच. पण तात्यांच्या अंतकाळाची मुहूर्तमेढ रोवली, ती त्यांच्या डोक्यात शिरलेल्या जिताड्यांच्या पैदाशीच्या अवदसेनेच.

एव्हाना खाडीतल्या जिताड्याला सभोवतालच्या केमिकल कंपन्यांनी पाण्यात सोडलेल्या निरुपयोगी रसायनांचा वास येऊ लागला होता म्हणे. या वासानं जिताड्याची मूळ चव हरवून बसली होती. पाटशेतीत जिताड्याचं बीज विकसित करून ते पुढे मोठाल्या जिताड्यात रुपांतरित करण्याचं व्यावसायिक शेतीतंत्र अद्यापी दशक-दीडदशक दूर होतं. याच दरम्यान तात्यांच्या डोक्यात अलिबागजवळच्याच एका गावातल्या कुणीतरी तळ्यात किंवा हौदात जिताड्याची पैदास करण्याची कल्पना भरवली. आपलं उभं आयुष्य जिताड्याच्या संहारार्थ वाहून घेतलेल्या तात्यांना ही कल्पना आजवरच्या कृत्याप्रति प्रायश्चित्त करण्याची संधी वाटली; किंवा जिल्ह्यातला जिताडा तुटवडा भरून काढणार्‍या जिताडा संवर्धनाचा त्यांचा उदात्त हेतू त्यामागे होता, हे गावातल्या कुणालाही कळले नाही. तात्यांच्या डोक्यात जिताडापालनाचा हा किडा वळवळायला आणि माट्यांच्या तळ्याचा भाडेकरार संपायला एकच गाठ पडली. गावातली मोठी तळी सहसा पंचायत मत्स्य-उत्पादनासाठी म्हणून तीन-तीन किंवा पाच-पाच वर्षांसाठी भाड्याने देई. लिलावात मोठी बोली लावून जिंकणार्‍याला तळ्यात त्या त्या विशिष्ट काळापुरती माशांची पैदास करून ते मासे विकण्याचा अधिकार मिळे. गेले कित्येक लिलाव तळं घेण्याचा मान शेजारच्या गावातल्या गुंजनशेठला मिळायचा. गुंजनशेठची ब्रॉयलर कोंबड्यांची पोल्ट्री होती. तो जोडीला असे बरेच उद्योग करीत असे. त्यावर्षी जेव्हा तात्यांनी लिलावासाठी कंबर कसली, तेव्हा गुंजनशेठनं त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण तात्या बधले नाहीत. अखेरीला लिलावात तात्यांच्या आक्रमक आणि चढ्या बोलींपुढे गुंजनशेठनं माघार घेतली. ‘न भूतो न भविष्यति’ अशा किंमतीत तीन वर्षांच्या करारावर माट्यांचं तळं भाड्यानं घेऊन तात्या पंचायतीच्या इमारतीतून बाहेर पडले, तेव्हा उभं गाव एका वेगळ्याच चिंतित नजरेनं त्यांच्याकडे पाहात होतं.

एक उभा उन्हाळा तर तात्यांनी माट्यांच्या तळ्याचं पाणी पूर्ण आटवून इतर माशांचं निर्बीजीकरण करण्यात घालवला. पावसाळ्यात जेव्हा तळं पुन्हा भरलं तेव्हा तात्यांनी जिताड्याच्या नरमाद्यांच्या जवळपास शंभर जोड्या तळ्यात सोडल्या. तळ्याचा मान म्हणून त्या दिवशी तळ्यालाही बोकडाचा नैवेद्य दाखवण्यात आला. तात्यांच्या या जिताडापालनाच्या कृतीविषयी चिंतित असणारे गावकरी मटणाच्या जेवणाला मात्र हिरिरीने हजर राहिले. माट्यांचं तळं गावातलं सगळ्यात मोठं तळं! तळ्याशेजारी राहणार्‍या लोकांनी अतिक्रमण केलं नसतं तर तळ्याचा परीघ आज सहजच दीड-दोन किलोमीटर भरला असता. या एवढ्या मोठाल्या तळ्यात तात्यांनी सोडलेल्या जिताड्यांची जवळपास शंभर प्रेमयुगुलं स्वच्छंदीपणे विहरू लागली. निसर्गानं आपला डाव साधला आणि मग त्या शंभर जोड्यांच्या सहस्त्र जोड्या व्हायला वेळ लागला नाही. जिताड्यासोबतच आपण याच तळ्यात एकाच वेळी कोळंबीही वाढवू शकतो असा चतुरस्र विचार तात्यांच्या सुपीक डोक्यात नेमका कोणत्या क्षणी अवतरला असावा याचा आजवर असंख्य वेळा विचार करूनही मला अंदाज बांधता आलेला नाही. आर्किमिडीजप्रमाणेच तात्यांसाठीही तो युरेका क्षणच असावा. फक्त एका युरेका क्षणाने जग बदलले, दुसर्‍याने एका व्यक्तिगत आयुष्यात घराचे वासे फिरवले. कुणाचाही सल्ला न घेता, कुणालाही न कळवता तात्यांनी पालघरजवळच्या एका गावातून कोळंबीची बीजं आणून माट्यांच्या तळ्यात सोडली. त्या नंतरच्या अनेक रात्री तात्यांनी माट्यांच्या तळ्याच्या रम्य परिसरात खुर्ची टाकून, पाण्यात पडलेलं चांदणं पाहात हळूहळू मोठ्या होणार्‍या कोळंबीची स्वप्नं रंगवण्यात घालवल्या. एकदा भरून आल्या उरानं माझ्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवत तात्या मला गदागदा हालवत म्हणाले, “यंदा अष्टमीला कोळंबीचा पुलाव कमी नही पडणार! सगळ्यांनी यथेच्छ ताव मारा म्हणावं.”
तात्यांचा खयाली कोळंबी पुलाव काही अंतापर्यंत शिजला नाही. तात्यांच्या एव्हाना हात-अर्धा हात मोठ्या झाल्या जिताड्यांनी तळ्यात सोडलेली कोळंबीची बीजं टिपून टिपून मटकावली. तळ्यात घडलेला तात्यांच्या कोळंबीचा हा अमानुष संहार तात्यांना शेवटापर्यंत दृष्टीला पडला नाही. अर्थात तात्या काही एवढ्यानं निराश होणारे नव्हते. कोळंबी आपल्याला नाही; पण आपल्या जिताड्यांना तर खायला मिळाली, असा विचार करून तात्यांनी दुधाची वाट ताकावर पाहिली. यथावकाश तळ्यातले जिताडे झुंडीझुंडीने पाण्यावर फिरताना दिसू लागले; आणि तात्यांनी एक मुहूर्ताचा दिवस निवडून जाळं टाकून तळ्यातल्या जिताड्याचा पहिला लॉट बाहेर काढला. पोटाकडून काळसर, पण पाठीकडे चंदेरी होत जाणारा, ताजा, फडफडता जिताडा पाहून तात्या सद्गदित, तर गावकरी अचंबित झाले. एक एक जिताडा चांगला आठ-आठ, दहा-दहा किलोचा! महाद्या भगतानं पहिला जिताडा कोयत्यानं सोलला आणि कापला तेव्हा उभ्या गावाच्या काळजाचा ठोका चुकला! तात्यांनी मोठ्या खटाटोपानं वाढवलेल्या जिताड्याच्या पोटात चक्क माती होती. तात्यांचा जिताडा मातकट निघाला ही बातमी कर्णोपकर्णी व्हायला वेळ लागला नाही. पण तात्या एवढ्यानंही खचले नाहीत. त्या रात्री तळ्याशेजारीच चुलीवर त्यांनी नुकताच पकडलेला जिताडा शिजवला आणि गावाला खायला घातला. पण लोकांनी वातड, निबर, चावता येत नाही असं म्हणत तोंडं वेंगाडली. स्वत: तात्यांनाही त्यांनीच पराकाष्ठा करून वाढवलेल्या जिताड्याचा घास गोड लागला नाही. व्यथित तात्यांनी त्याच रात्री माट्यांच्या तळ्याशी आणि तळ्यात विहरणार्‍या जिताड्याशी सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकले. ज्यांनी ज्यांनी तात्यांच्या जिताड्याला निबर, वातड अशी नावं ठेवली होती ते सगळेच रातोरात जाळी घेऊन आले आणि तात्यांनी मोठ्या अपेक्षेने वाढवलेला जिताडा पकडून घरी घेऊन गेले. दुसर्‍या दिवशी गावातल्या अनेकांच्या चुलीवर जिताडा शिजला. स्वत:च्या घरच्या चुलीवर शिजलेला जिताडा कुणालाही वातड लागला नाही. सगळ्यांनीच जीभ मटकावत तो खाल्ला.

जिताड्याच्या शेतीत पदरी पडलेल्या सपशेल अपयशातून तात्या शेवटपर्यंत सावरले नाहीत. मधल्या काळात सॉ मिलला आग लागली आणि त्या धक्क्याने माधवही खचला. तो जो घरी बसला, तो बसलाच. त्याच दरम्यान कधीतरी ज्योतीचा हातातोंडाशी आलेला कॉलेजात जाणारा मुलगा रेल्वे अपघातात पंगू झाला. तात्यांच्या अंतकाळाचा अध्याय हा खिन्न, विषण्ण आणि करड्या काळसर रंगाच्या छटांनीच झाकोळला होता. तो रंगवून सांगायचा म्हटला तर सभोवतालचे सारेच गडद रंग कमी पडतील. तात्यांचा अंत म्हणजे त्यांच्या आजवरच्या आयुष्याशी नियतीने साधलेला कुटिल विरोधाभास होता. या विरोधाभासाकडे एक नजर टाकल्याशिवाय तात्यांच्या अध्यायाला पूर्णता येणार नाही.

त्या वर्षी शिवरात्री नेमकी शनिवारी आली होती. रविवारी शिवरात्रीचा उपास सोडायचा होता आणि सोमवारी सोमवार. तात्यांच्या मांसाहारात आजवर एवढे मोठाले अडथळे क्वचितच आले होते. शिवरात्रीच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारीही सुमाकाकूनं सुक्या बोंबलांच्या सारावरच तात्यांची बोळवण केली होती. पुढचे तीन दिवस रेटणं तात्यांना कर्मकठीण गेलं. शनिवारची शिवरात्र सरली. एक आख्खा हक्काचा रविवार शिवरात्रीचा उपास सोडण्यात वाया गेला. सोमवारी सकाळी हवालदिल झालेले तात्या सुमाकाकूला पुटपुटल्या स्वरात म्हणाले, “शंकर म्हणजे स्मशानातला देव! त्याला निदान आंबाडी सुकट, तळलेले सोडे असं काही चालायला हरकत नव्हती, नाही का?” सुमाकाकूच्या लक्षात तात्यांची ही अधीर तगमग यायला वेळ लागला नाही. एव्हाना तात्यांनी बाजारहाटीसाठी बाहेर पडणं सोडून दिलं होतं, म्हणून काकूनं मोगरामावशीकरवी चंद्री कोळणीला, ‘उद्या काहीतरी ताजी मासळी घेऊन ये.’ असा निरोप धाडला. दुसर्‍या दिवशी चंद्री कोळीण आली, पण ती सुमाकाकूच्या सांत्वनाला. त्या रात्रीच तात्या हृदयविकाराच्या धक्क्याने दगावले.

असं म्हणतात की, तात्यांच्या दहाव्याला पिंडाला कावळा शिवता शिवत नव्हता. शेवटी सदोबानं हात जोडून मनातल्या मनात तात्यांना काहीतरी कबूल केलं आणि कुठून तरी एक दूरदेशीचा कावळा उडत उडत आला आणि पिंडाला शिवला.

तात्यांचं पहिलं वर्षश्राद्ध मात्र तात्यांच्या आयुष्याप्रमाणेच अभूतपूर्व होतं. सदोबानं प्रसाद म्हणून उभ्या गावाला जिताड्याचं कालवण खाऊ घातलं.

आजच्या आधुनिक अन्नपदार्थांच्या मांदियाळीत जिताडा हे नाव हळूहळू लोकांच्या विस्मरणातही जाईल. भेटकी, बट्टासारखी परप्रांतीय समनामं जिताड्याला लोकांच्या जिभेवरून हळूहळू हद्दपार करतील. या पार्श्वभूमीवर जिताडेबाबांची स्मृती मात्र कायम गावाच्या मनात जिताड्याचं स्थान ढळू न देण्यासाठी चिवटपणे लढत राहील हे नक्की.

हृषीकेश गुप्ते
---------
ऋणनिर्देश : लेखमालेतील काही भाग 'अक्षरधारा' मासिकात पूर्वप्रकाशित झाले होते.
रेखाचित्र : गिरीश सहस्रबुद्धे

कोकणातले मासले भाग १ - सुलतान पेडणेकर
कोकणातले मासले भाग ३ - जयवंतांची मृणाल
कोकणातले मासले भाग ४ - खिडकी खंडू
कोकणातले मासले भाग ५ - मॅटिनी मोहम्मद

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अस्सल अस्सल वठलय व्यक्तीचित्र. मजा आली. मस्त मस्त!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0