जग बदलू शकलेले विचारवंत व त्यांची पुस्तकं! …..9

दास कॅपिटल (3 खंडात: 1867,1885,1894)
-कार्ल मार्क्स (1818-1883)

xxया त्रिखंडात्मक ग्रंथांचा लेखक कार्ल मार्क्स व या ग्रंथांचे शीर्षक समानार्थी शब्द म्हणून आजकालचे अभ्यासक वापरत असतात. इतके ते एकमेकात समावून गेलेल्या आहेत. ही पुस्तकं मार्क्सच्या दीर्घकाळ केलेल्या अभ्यासाचे फलित आहेत. आयुष्यातील ऐन उमेदीची पंचवीस वर्ष त्यानी अर्थशास्त्राच्या व्यासंगात घालवली. राजकीय आर्थिक व्यवहाराला विज्ञानाच्या चौकटीत बसवून एखाद्या वैज्ञानिक संशोधकाप्रमाणे त्यानी त्याचा अभ्यास केला. राजकीय अर्थशास्त्र म्हणजे समाजाचे शरीरशास्त्र, असे त्याचे ठाम मत होते. त्या शास्त्राचा सखोल अभ्यास करून त्या अभ्यासाचा पूर्ण आशय त्यानी या तीन ग्रंथात मांडला. यातील पहिला खंड 1867 साली मार्क्सच्या हयातीतच प्रसिध्द झाला. इतर दोन्हींची हस्तलिखित तयार होती. त्याच्या मृत्युपश्चात (1883) फ्रेडरिक एंगल्स या त्याच्या जिवलग मित्राने उरलेले दोन्ही ग्रंथ संपादित करून प्रसिध्द केले.

5 मे 1818 रोजी जन्मलेल्या कार्ल मार्क्सला मोठा झाल्यावर वडिलाप्रमाणे वकील होणे अपेक्षित होते. परंतु त्याने वकिलीचे शिक्षण न घेता तत्त्वज्ञान व इतिहास या विषयांचा अभ्यास करू लागला. संपूर्ण आयुष्य मानवजातीच्या खऱ्या - खुऱ्या सुखासाठी झटण्यात घालवले; अथक परिश्रम केले; अनेक हाल अपेष्टा सोसल्या; व प्रचंड ग्रंथ निर्मिती केली. माणसाला सुख आणि स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या समाजाची स्थापना कोणत्या परिस्थितीत करता येईल, याचे विश्लेषण केले; मार्गदर्शन केले. भांडवलशाही समाजात उत्पादनांची साधनं प्रचंड प्रमाणात निर्माण झाली आहेत; विज्ञानाची आश्चर्यकारक प्रगती झाली आहे; आणि इतिहासाच्या या टप्प्यावर माणसाच्या खऱ्या - खुऱ्या स्वातंत्र्याची शक्यता निर्माण झाली आहे; असे त्यानी शास्त्रीय विश्लेषणातून दाखवून दिले आहे.

मार्क्स याच्यापुढे प्रश्न होता तो स्वत:ला हरवून बसलेल्या, स्वत:च्या शक्तीची व शक्यताची विस्मृती झालेल्या, स्वत:चीच निर्मिती ज्याला परकी वाटू लागते अशा समाजव्यवस्थेत दुरवस्थेला पोचलेल्या माणसांच्या मुक्तीचा. माणसाचे दु:ख, त्याचे दैन्य हे इथल्या समाजव्यवस्थेशी निगडित आहेत, माणसानेच निर्मित केलेल्या समाजरचनेत त्याची पाळमुळं आहेत, हे मार्क्सला दाखवायच होतं. माणसात परात्म भाव निर्माण करणाऱ्या प्रक्रियेचे ज्ञान झाले की तोच माणूस मग स्वत:चा इतिहास घडवेल तेवढी क्षमता त्याच्याजवळ आहे हे मार्क्सला मांडायच होत. मार्क्सच्या सर्व लेखन साहित्यावर अ‍ॅडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, मिल, हेगेल इत्यादी विचारवंतांचा प्रभाव जाणवतो. भांडवलवादाचे विश्लेषण करत असताना अरिस्टॉटल व इतर ग्रीक तत्त्वज्ञांचा संदर्भ त्यानी घेतला होता. विद्यापीठातील त्यानी लिहिलेला शोधनिबंध क्रि. श.पू. तिसऱ्या शतकातील डेमाक्रिटस व एपिक्युरस या ग्रीक तत्त्वज्ञांशी संबंधित होता.
yyy
मार्क्सच्या मते भांडवलशाहीची गतिमानता कामगारांच्या शोषणावर व त्यांच्या खच्चीकरणाभोवती फिरत असते. श्रमशक्ती ही क्रयवस्तू बनून तिची खरेदी-विक्री करणे हे भांडवलशाहीचे खास वैशिष्टय आहे. भांडवली व्यवस्थेत उत्पादन साधनं व श्रमशक्ती या क्रयवस्तू असतात. उत्पादकाकडे साधनं व भांडवल या दोन्ही असल्यामुळे श्रमशक्तीवर अतिरिक्त मूल्य लावून नफा कमावतो. परंतु या प्रकारच्या व्यवस्थेत समाज कसा रसातळाला जावू शकतो यावर त्यानी लक्ष केंद्रित केले होते. त्याचे ग्रंथ नीतीचे प्रवचन देत नाहीत. वा केवळ सिध्दांत सांगून वाचकांना वाऱ्यावर सोडून देत नाहीत. समाजव्यवस्था बदलण्यासाठी काय कार्यक्रम हवेत याची चर्चा त्यात केलेली आहे. भांडवली व्यवस्थेतील गतीमानतेचे विश्लेषण करून त्याची भविष्यातील अवस्था काय असू शकेल हे शोधण्याचा तो प्रयत्न होता. भांडवलवृध्दी, आर्थिक गतीशीलता, स्पर्धा, बँकिंग प्रणाली, कर्ज, भाग भांडवल, नफ्याच्या दरातील उतरंड, मालकी हक्क, इत्यादी अनेक आर्थिक विषयावर त्यानी आपल्या पुस्तकात भाष्य केले आहे.

मार्क्सने आपल्या दास कॅपिटल या ग्रंथात वर्गीय लढयापेक्षा रचनात्मक अंतर्विरोधावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. हा लढा श्रम व भांडवल यांच्यामधला नसून श्रमिकवर्ग व मालकांच्यामधला आहे. त्यामुळे ‘कॅपिटल’ हा ग्रंथ क्रांतीची मांडणी करत नसून क्रांतीक्षमता असलेल्या परिस्थितीचे विश्लेषण करते. यात प्राचीन समाजवाद, जमीनदारी, सामंतशाही, भांडवलशाही व भविष्यातील समाज यावर विस्तृतपणे चर्चा केलेली आढळते. भांडवलशाही व्यवस्था अस्तित्वात कशी येते; तिचा विकास कसा होतो; आणि त्या विकासप्रक्रियेतच भांडवलशाहीनंतर येणाऱ्या नव्या व्यवस्थेला जन्म देणारे घटक कसे निर्माण होतात, हे त्यानी विशद केले आहे. भविष्याचे चित्र रंगवताना वर्गभेद, व वर्गविरोध यानी युक्त असलेला जुना भांडवलशाही समाज नाहिसा होऊन त्याऐवजी एकमेकाच्या सहकार्याने राहणारा शोषणमुक्त समाज अस्तित्त्वात येईल, या नव्या समाजात प्रत्येक व्यक्तीचा मुक्त विकास होणे हीच पहिली अट असेल , यावर त्याचा भर होता.

परंतु या अवस्थेपर्यंत अजूनही समाज पोचलेला नाही. एकाप्रकारे मार्क्सचा हा अपेक्षाभंगच आहे. भांडवली व्यवस्थेत तंत्रज्ञान व उत्पादन साधनेतील जलद विकासामुळे अनेक अनपेक्षित बदल होत गेले. परंतु तळागाळातल्यांच्या परिस्थितीत फार फरक जाणवला नाही. अजूनही जग भांडवली व्यवस्था की समाजवादी व्यवस्था याच संभ्रमावस्थेतून मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहे. भांडवली व्यवस्थेत सातत्याने आर्थिक अरिष्ट येत राहतात. फक्त त्याचे बाहृस्वरूप बदललेले असते. अशा स्थितीत समाजाला नेमके काय करावे हेच कळेनासे होते. परंतु फिनिक्स पक्षीप्रमाणे भांडवलशाही पुन्हा डोके वर काढते. शोषणाचे रंग बदलतात. काही वेळा साम्यवादी क्रांतीच्या भीतीने प्रशासनांना शांतता व सुव्यवस्था यांचे निमित्त करुन समाजावर लादलेल्या पोलीस स्टेटची कल्पना सोडून द्यावी लागते. जनतेची प्रगती व सुरक्षितता या कल्याणकारी राज्याच्या कल्पना स्वीकाराव्या लागतात. थातुर मातुर उपाय योजून असंतोष दडपला जातो. काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला काम मिळण्याची ग्वाही, केलेल्या कामाच्या मोबदल्यात प्राथमिक गरजा पूर्ण होण्याची ग्वाही, बालपणात विकासाची ग्वाही, वृध्दत्वात समाधानाची ग्वाही, अशा समाजाची निर्मिती करण्याचे लालूच दाखवत भांडवलवाद सर्वांना झुलवत ठेवत असते. त्यामुळे मार्क्सला अपेक्षित असलेली क्रांती होऊ शकली नाही. याचबरोबर भांडवलशाही व त्यानंतर येणारा साम्यवाद यामधील संक्रमण काळात समाज व्यवस्था कशी असेल, संक्रमणकाळाची कालावधी किती असेल, भांडवलशाही खिळखिळी झाल्यानंतर जे पक्ष सत्तेवर येतील त्यानी कोणत्या प्रकारची समाज रचना करावी, राजकीय, सामाजिक, आर्थिक संघ-संस्था, संघटना कशा असाव्यात इत्यादीसंबंधीचा उल्लेख मार्क्स करत नाही. व शेवटपर्यंत त्या अनुत्तरित राहिल्या आहेत.

तरीसुध्दा हे ग्रंथ रशियासारख्या अत्यंत बलाढय देशात क्रांती घडवण्यासाठी स्फूर्तीदायी ठरल्या. साम्यवादी राजवटीने अनेक स्थित्यंतर पाहिली. काही आघातामुळे रशियातील साम्यवादी व्यवस्था शेवटपर्यंत रुजू शकली नाही हे खरे असले तरी त्याचा दोष मार्क्स किंवा दास कॅपिटलच्या माथी मारणे योग्य ठरणार नाही. बाजारविरहित अर्थव्यवस्था असू शकते, संपूर्ण मालमत्तेचे स्वामित्व सरकारकडे सोपूनही अर्थव्यवस्था सुरळित चालू शकते, समाजवादाला लोकशाही प्रणालीची गरज नसते, ही तिन्ही गृहितके प्रत्यक्षाच्या कसोटीवर चुकीच्या ठरल्या. अंमलबजावणीतील चुकीमुळे सिध्दांतच हद्दपार झाला. म्हणूनच जग बदलण्याची क्षमता या पुस्तकात होती असे म्हणण्यास भरपूर वाव आहे.

(क्रमशः)
1.....प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका
2..... ऑन दि ओरिजिन ऑफ स्पीसीज
3..... एक्स्पिरिमेंटल रिसर्च इन इलेक्ट्रिसिटी
4…. ऑन दि अबॉलिशन ऑफ स्लेव्ह ट्रेड
5…..ए विंडिकेशन ऑफ दि राइट्स ऑफ वुमन
6…..मॅग्नाकार्टा
7……वेल्थ ऑफ नेशन्स
8……पेटंट स्पेसिफिकेशन फॉर आर्कराइटस् स्पिन्निंग

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet