जयवंतांची मृणाल - हृषीकेश गुप्ते

जयवंतांची मृणाल

मी इयत्ता आठवीत असतानाची घटना. उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा नव्यानं सुरू होऊन जेमतेम दोन-चार दिवस उलटले होते. अद्यापि वर्गाला कुणी म्हणून कायमस्वरूपी शिक्षक लाभले नव्हते. इंग्रजी शिकवायला भाटे मॅडम नको, गणितासाठी म्हात्रे सरच हवेत अशी साकडी मनातल्या मनात घालत दिवसच्या दिवस उभा वर्ग नुस्ता कलकलाट करत बसे. वर्गातला गोंधळ वाढला, की कुणीतरी शिक्षक अचानक वर्गात शिरून गोंगाट करणार्‍या मुलाला बडवून काढत; पण कुणीही शिक्षक वर्गात शिरून शिकवण्याचा श्रीगणेशा करण्याचं नाव घेत नव्हते. बरेचदा कंटाळा आल्यावर आम्हा मुलांपैकीच कुणीतरी शिक्षक बनून शाळेच्या आवारातच कुठेतरी सापडलेल्या खडूनं उभा फळा चित्रविचित्र आकाराच्या आकृत्यांनी भरून टाके. यंदा आपल्याला कुणीही शिकवायला येणार नाही आणि आपण असेच एखाद्या बेवारशी वर्गाप्रमाणे शिक्षक आणि शिक्षणविरहित वर्ष घालवणार अशी दिवास्वप्नं आम्ही सर्व मुलं आनंदाने पाहत असतानाच एके सकाळी पहिल्या तासालाच वर्गात अचानक मृणाल अवतरली. मृणाल वर्गात शिरताच सर्वत्र शांतता पसरली. त्या शांततेची घनता इतकी तीव्र होती, की मृणालने हातातल्या डस्टरने फळा पुसला, तेव्हा हवेत उडालेल्या खडूच्या भुकटीच्या पांढर्‍या धुळीचा आवाजही कानांना ऐकू आला. मृणालने फळ्यावर स्वत:चं नाव लिहिलं आणि मग वळून आमच्याकडे पाहत ती म्हणाली, “मी मृणाल जयवंत दुर्वे. मी आजपासून तुमची क्लासटीचर आहे. मी तुम्हाला विज्ञान आणि गणित असे दोन विषय शिकवणार.” त्यानंतर संपूर्ण तासभर वर्गातल्या एकाही मुलाच्या तोंडून अवाक्षरही बाहेर पडलं नाही.

मृणाल जयवंत दुर्वे या नावावरून कुणी मधल्या ‘जयवंत’ची मृणालच्या तीर्थरूपांच्या नावाशी सांगड घालण्याची गल्लत केली, तर तो मृणालवर मोठा अन्याय ठरेल. भक्ती बर्वे इनामदारांसारख्या तारांकित महिलांनी माहेरचं आडनाव कायम ठेवत मग मागे नवर्‍याचं आडनाव लावायला जेव्हा सुरुवातही केली नव्हती, त्या काळात मृणालनं आपलं माहेरचं जयवंत हे आडनाव जागीच ठेवून मग पुढे दुर्वे हे नवर्‍याचं नाव लावणं म्हणजे एकूणातच गावासाठी मोठा सांस्कृतिक धक्का होता.

गावाला सांस्कृतिक धक्के नवे नसतात. असे अनेक सामाजिक, सांस्कृतिक धक्के पचवून गाव कायम सुस्त पडून असतं. असं असलं तरी मृणालने गावाच्या संकुचित सुरकुतल्या कपाळावर काही आठ्या कायमच उमटवल्या. यात गावाच्या डोळ्यादेखत दिवसाढवळ्या साजरं केलेलं प्रेमप्रकरण असो, स्वत:च्या श्वशुरांना म्हणजेच जिताडेबाबांसारख्या गावातील वलयांकित व्यक्तिमत्त्वाला चारचौघात सुनावलेले खडे बोल असोत, वा सासरच्या राहत्या घराला वाळवी लागल्यावर ती जागा बिल्डरला विकसित करायला देण्याचा एकखांदी निर्णय घेणं असो. मृणाल तिच्या तेजानं गावात कायम तळपत राहिली. या तेजात सदोबा म्हणजेच तिच्या नवर्‍यासारख्या ज्यांनी ज्यांनी न्हाऊन घेतलं त्यांची आयुष्यं कृतकृत्य झाली; आणि या तेजाच्या धारेचं पातं ज्यांना ज्यांना स्पर्शून गेलं ती आयुष्यं विद्धही झाली. मृणाल माझ्या स्मरणातल्या गावाच्या इतिहासातली पहिली वीरांगना होती, जिनं हाती कधीही तलवार न धरता गावाचे डोळे दिपवले. जिभेचा फटकळ वापर न करताही लोकांना चार हात दूर ठेवत आपला आब जपला. मोघम बोलणं आणि दुर्मुखलेली अंतर्मुखता यांतला नेमका फरक मृणालला ठाऊक होता. स्पर्श होताच स्वत:ला मिटून घेणारी ती गोगलगाय नव्हती आणि पाय पडताच डंख मारणारी नागीणही नव्हती. मृणालचं आयुष्य पिसारा फुलवलेल्या मोरासारखं होतं. डौलदार, स्वाभिमानी आणि तरीही स्वत:चा तोल ढळू न देणारं संतुलित.

गावातला बोरकर चौक तसा बर्‍यापैकी लांबरुंद आणि सुटसुटीत. गावात कुणी बोरकर वास्तव्याला असणं सोडा, पण गावात कधी कुणा बोरकर नामक इसमानं प्रवेशही केल्याचं गावकर्‍यांच्या स्मरणात नाही. तरीही चौकाचं नाव मात्र बोरकर! आता जुनी घरं, वाडे जाऊन त्या त्या ठिकाणी नव्या काँक्रीटच्या इमारती वसल्यापासून चौकाचं आभाळ हरवलंय. पण पंधरावीस वर्षांपूर्वीपर्यंत गावाच्या आंतरिक सौंदर्याची कल्पना येण्यासाठी कुणीही निव्वळ बोरकर चौकात उभं राहून एक नजर चौफेर फिरवणं पुरेसं होतं. आमच्या घरापासून चौकात जाणार्‍या रस्त्यावर प्रधान, मांडगवणे, कवितके, शहासने अशा लोकांची घरं. प्रत्येक घरासमोर विपुल प्रमाणात वृक्षराई. त्यातही फळझाडांचं प्रमाण अधिक. आंबे, चिकू, पेरू, सीताफळ, पपई, बोर, जांभूळ, काजू, फणस, केळी अशी अनेक. त्या खालोखाल फुलझाडं. त्यातही चाफा बहुसंख्य. मग गुलमोहर, मोगरा, रातराणी, मधुमालती, बकूळ, चिंच, उंबर इत्यादी. तगर आणि जास्वंदी तर लोकांच्या राहत्या जागेची हद्द निश्चित करणार्‍या लक्ष्मणरेषेसारखी कुंपण म्हणून आखलेली. धुळमाखली, गुलबक्षी रंगाची कागदी बोगनवेल तर कुठे कुठे आणि कशी कशी पसरलीय याची काही कल्पनाच करायला नको. कुठं अंगणात, तर कुठं कुंपणाच्या कडेकडेनं नांदणारी ही सगळी झाडं बोरकर चौकातल्या रस्त्यांवर सावल्यांची रांगोळी आखत. चौकात डाव्या कोपर्‍याला जिताडेबाबांचं घर; आणि चौकातून जिताडेबाबांच्या घराला वळसा घालत पुन्हा डावीकडे वळलं की लागलीच पुन्हा डाव्याच हाताला जयवंतांचं घर.

जयवंतांचं सगळंच जगावेगळं! असं म्हणतात, की जयवंतांचे वडील, म्हणजे मृणालचे आजोबा वक्रतुंड जयवंत ब्रिटिशांच्या चाकरीतले त्या काळातले उच्चशिक्षित! स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी भारतीय शासकीय सेवेतही काही काळ काम केलं. मूळ इंदूरचे असणारे हे वक्रतुंड जयवंत कधीकाळी कामानिमित्त कोकणात आले आणि त्यांना इथला परिसर एवढा आवडला, की ते गोठण्यात जमीनजुमला घेऊन, घर बांधून कायमचे राहते झाले. वक्रतुंड जयवंतांना सुधाकर, मधुकर आणि दिवाकर अशी तीन मुलं, आणि उर्मिला, अनुसया या दोन मुली. मोठा सुधाकर वायुदलात गेला. त्याने पुढे बासष्ठ आणि पासष्ठ सालच्या युद्धात पराक्रमी कामगिरी बजावली. त्याला राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आलेल्या पदकाचा फोटो आजही मोठ्या शाळेतल्या व्हरांड्यात दर्शनी भिंतीवर लावलेला नजरेस पडतो. रांगण्या-दुडदुडण्याची सुरुवातीची काही वर्षं सोडली तर जयवंतांच्या थोरल्या सुधाकरचं पाऊल कधीही गावाच्या जमिनीवर स्थिरावलं नाही. सुधाकरला वक्रतुंडांनी शिक्षणासाठी शिशुवर्गापासूनच मुंबईत ठेवलं. तिथे तो वक्रतुंडांच्या सख्ख्या बहिणीकडे राहिला, वाढला आणि पुढे मोठा होऊन हवेत भरारी घेता झाला. पुढे सुधाकर एका आंग्ल विदुषीसोबत विवाहबंधनात अडकला आणि नरिमन पॉईंटच्या समुद्रकिनार्‍याजवळ एका प्रासादी मनोर्‍यात कायमचा वास्तव्यास गेला. त्यानंतर घटिका-दोन घटिकांसाठी सुधाकर जेव्हा जेव्हा गावी परतला, तेव्हा तेव्हा गावकर्‍यांनी त्याच्या स्वागतासाठी जमिनीवर पायघड्या अंथरल्या. सुधाकरचे पाय गावच्या जमिनीला असे कधी लागलेच नाहीत. जयवंतांच्या जुन्या घरात शिरतानाही शेणानं सारवलेल्या जमिनीचा स्पर्श होऊ नये म्हणून तो पायातली पादत्राणं कधीही काढत नसे. चपला घालून किंवा गावाच्याच भाषेत ‘बुटा घालून’ स्वत:च्याच घरात वावरणारा सुधाकर हा कायमच गावकर्‍यांसाठी एक अप्रूप ठरला. आपल्या मुलानं घरात बिनदिक्कत वावरावं, आल्यासरशी दोन दिवस राहावं आणि मुख्य म्हणजे गावच्या धुळीचा स्पर्श होऊन त्याची पदकमलं मलिन होऊ नयेत म्हणून वक्रतुंडांनी घराला त्या काळात संगमरवरी फरशीही बसवून घेतली; पण मोठ्या सुधाकरचं पाऊल कधी गावात फार काळ रेंगाळलं नाहीच.

तीन मुलांच्या पाठीवर जन्माला आलेली वक्रतुंड जयवंतांची उर्मिला आणि अनुसया ही दोन कन्यारत्नं म्हणजे कोळशाच्या खाणीत सापडलेली दोन दुर्मीळ माणकं होती. दोघींमध्ये एका वर्षाचंच अंतर. अगदी जेमतेम तेवढंच अंतर त्यांच्या रूपात, बुद्धिमत्तेत आणि देहबोलीत. लखलखता गोरा रंग, तांब्याच्या घंटिकेसारखा किणकिणणारा आवाज आणि धारदार, तळपळती बुद्धिमत्ता हे या दोघींचंही सामाईक वैशिष्ट्य होतं. अनुसयापेक्षा वर्षाभराने मोठी असणारी उर्मिला प्राथमिक शिक्षण घेऊन गावाबाहेर पडली, मुंबईत जाऊन त्या काळातलं उच्चशिक्षण घेऊन पुढे ऑल इंडिया रेडियोमध्ये कामाला लागली आणि उच्चपदस्थ म्हणून अनेक वर्षांपूर्वी निवृत्तही झाली. धाकली अनुसया अभ्यासात उर्मिलापेक्षा कांकणभर पुढे! तरीही अनुसयाचं मात्र नुस्तंच लग्न झालं. लग्न होऊन घराबाहेर पडलेल्या अनुसयेच्या काही आठवणी तरीही गावानं चिरकाल ध्यानात ठेवल्या. त्या आठवणींचा अध्याय हा आण्णा उतेकरांपासून सुरू होतो. जयवंतांच्या अनुसयेच्या या ऐकीव आठवणींकडे एक ओझरता कटाक्ष टाकल्याशिवाय जयवंतांच्या मृणालच्या अध्यायालाही परिपूर्तता येणं शक्य नाही.

आता मोडकळीला आलेल्या स्मृतींच्या आधारे अजूनही काही जुनाट गावकरी सांगतात, की खूप खूप वर्षांपूर्वी गावात एक प्रेमकहाणी घडली. उभ्या गावानं पिढ्यानपिढ्या पुढे प्रसृत केलेल्या या प्रेमकहाणीचे नायक-नायिका होते अनुसया जयवंत आणि महादेव तथा आण्णा उतेकर!

तश्या गावागावांना प्रेमकहाण्या काही नव्या नसतात. उमलणार्‍या प्रत्येक पिढीगणिक प्रत्येक गावात एक नवी प्रेमकहाणी उदयाला येतेच. पिढी जितकी जुनी तेवढी प्रेमकहाणीही जुनीच. साधारण सहा-साडेसहा दशकांपूर्वी गावात घडलेली एक प्रेमकहाणी लोकांच्या स्मरणात राहते तेव्हा त्या प्रेमकहाणीचं पान पिकतं, पण देठाकडे खोडाला कायम घट्ट धरून राहतं. माझ्याच वर्गातल्या वसंता बापटचा काका अभिराम बापट एका वारापडल्या संध्याकाळी माट्यांच्या तळ्यावर मला आणि वसंताला भावविव्हळ स्वरात म्हणाला होता, “जगातल्या सगळ्याच महान प्रेमकहाण्या या नेहेमी अधुर्‍याच राहतात.” खरंतर या शब्दांएवढे जड शब्द मी तोवरच्या आयुष्यात कधीही ऐकले नव्हते. त्या शब्दांमध्ये दडलेल्या अर्थाचा मागोवा मनातल्या मनात घेत असतानाच अचानक त्याने ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’ हे भावगीत व्याकूळ स्वरात म्हणायला सुरुवात केली.
सर्वत्र अंधार पडू लागला होता. हवा ठप्प होती. हळूहळू गडद होऊ पाहणारा कोवळा काळोख पांघरून तळ्याचं पाणीही निपचीत पडून होतं. रिमझिम पावसागत नाजूक कोसळणार्‍या त्या काळोखात अभिरामचा चेहेरा अधिकाधिक काळवंडत गेला. दूर कुठेतरी एक गाय हंबरण्याचा आवाज सोडला तर सभोवताल नीरव होता. अभिरामच्या आवाजाच्या पोताविषयी किंवा स्वरांच्या ज्ञानाविषयी मला आता काहीच सांगता येणार नाही; पण त्या दिवस बुडत्यापळी अभिरामच्या आवाजातली आर्तता माझं काळीज स्पर्शून गेली, हे आजही अगदी स्पष्ट आठवणीत आहे. अभिरामचा कंठमणी ते गीत गाताना सातत्याने खालीवर होत होता. अधनंमधनं आवंढा गिळण्यासाठी घेतलेल्या श्वासामुळे त्या गीतातल्या काही ओळी तुटत होत्या, पण त्यामुळे त्या गाण्यातलं आर्त किंचितही कमी होत नव्हतं. थोड्या वेळानं चंद्राची सावली तळ्याच्या पाण्यावर पडली. मघापासून ठप्प वाटणार्‍या तळ्यावर एक हलका तरंग पसरलेला दिसला. त्या हलक्या तरंगांवर तळ्यात पडलेल्या चंद्राचं प्रतिबिंब हलक्या गटांगळ्या खाऊ लागलं. माझे डोळे पाण्यात गटांगळ्या खाणार्‍या त्या चंद्रावर, तर कान अभिरामच्या गीताकडे खिळलेले होते. शेवटी एक अनोखी आर्त लकेर घेत अभिरामनं गाणं थांबवलं आणि मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाण्याचा एक चंदेरी पडदा तळ्यातल्या चंद्रासारखाच लकाकत होता. घरी गेल्यावर मी जेव्हा नकळत ते गाणं गुणगुणू लागलो, तेव्हा भावानं विचारलं, “तुला कसं हे गाणं माहीत?” मी त्याला घडलेली घटना माझ्या शब्दांत सांगितली तेव्हा तो बराच वेळ हसायचा थांबेचना. थांबला तेव्हा म्हणाला, “त्या अभिरामचा प्रेमभंग झाला. तो हेच गाणं गाणार.” आठवड्याभरातच जयवंतांच्या मृणालचं जिताडेबाबांच्या सदोबाशी लग्न झालं. अभिरामच्या मृणालवरच्या एकतर्फी प्रेमाचे अनेक किस्से त्या नंतर गावाने चघळले, वर्षानुवर्षं रवंथ केले.

चौकाचौकातून, अंधारल्या हॉटेलांतल्या जुनाट लाकडी बाकड्यांवर बसून जेव्हा जेव्हा गावानं रिकामटेकड्या गप्पांचे फड बसवले, तेव्हा तेव्हा प्रेमभंगाच्या उल्लेखानंतर बापटांच्या अभिरामचं नाव निघालं नाही असं क्वचितच झालं. पुढे तर अभिरामने दाढीही वाढवली. वाढल्या दिवसापासून ती दाढी पांढरी होती म्हणून की काय, पण अभिरामच्या त्या वाढल्या पांढरट दाढीनं त्याच्यावरचा प्रेमभंगाचा शिक्का अजूनच ठळक करून टाकला. पुढे अनेक वर्षांनंतर माझ्याच वर्गातला अमोल थळे मुंबईतल्या जे. जे. कला महाविद्यालयात कलाशिक्षणासाठी गेला, तेव्हा त्याने देवदास या प्रोजेक्टवर काम करताना जी पेंटिंग्ज केली, त्या पेंटिंग्जमधला देवदास हा अगदी जसाच्या तसा पांढर्‍या दाढीतल्या अभिरामसारखा दिसत होता. प्रेमभंग म्हणजे अभिराम हा ठसा आमच्या पिढीवर उमटवण्याला गाव जबाबदार होतं, का अभिरामची पांढरी दाढी, का जिच्यावर त्याने एकतर्फी प्रेम केलं ती जयवंतांची मृणाल? मला सांगता येणार नाही. एवढं नक्की, की त्या व्याकूळ संध्याकाळी अभिरामच्या चेहेर्‍यावरचे विव्हळ भाव आणि स्वरातलं आर्त ऐकून पुढली अनेक वर्षं मी प्रेमभंगाचं एक अनोखं दिवास्वप्न काळजाशी गुप्तपणे बाळगून ठेवलं.

गावाला विषयांतराचं वावडं नसतं. एका विषयातून दुसर्‍या विषयात आणि दुसर्‍यातून तिसर्‍यात जायला गावगप्पांना वेळ लागत नाही. आजही चावडी नाक्यावरच्या नाकेदाराच्या किंवा गिरणी चौकातल्या फकिराच्या हॉटेलात गेलं, तर गाव नवेजुने विषय निवांत रवंथ करत पहुडलेलं दिसतं. पावसाळ्यात सहसा गावातला धंदा सुस्तावतो. मग गाव वेळ घालवायला हमखास अश्या छोट्यामोठ्या हॉटेलांतून टोळक्याटोळक्यांनी जमा होतं. बाहेर पाऊस कोसळत असताना, अंधारल्या बोळागत काळवंडल्या हॉटेलातल्या प्राचीन लाकडी टेबलांवर बसून कधी गावातल्या प्रेमप्रकरणांचा विषय छेडला, तर गाव खुलतं आणि ताज्या महाविद्यालयीन प्रेमप्रकरणांपासून व्हाया अभिराम बापट अगदी पार आण्णा उतेकरांपर्यंत जाऊन पोहोचतं. चावडी नाक्यावरल्या नाकेदाराच्या हॉटेलात हा विषय निघाला तर, नाना शिदोरे मोठ्यानं गडगडाटी हसून कुचेष्टेच्या स्वरात हमखास म्हणणार, “तो म्हातारा आण्णा उतेकर अजूनी एकटाच जाऊन दिघ्यांच्या बकुळीखाली बसतो. त्याला वाटतं वक्रतुंडांची अनु येईल आणि त्यानं गोळा केलेली फुलं ओंजळीत घेऊन हुंगेल.”

गावाच्या प्रेमभंगाच्या कालपटलावरची अभिराम बापट आणि आण्णा उतेकर ही दोन टोकं. या दोघांमध्ये मृणाल सामायिक. अभिराम बापट मृणालच्या प्रेमात पडला तर आण्णा उतेकर मृणालच्या आत्याच्या म्हणजेच अनुसयेच्या प्रेमात पडले. गावानं अयशस्वी प्रेमप्रकरणांची कायम हुर्यो उडवली. मृणालनं मात्र गावाच्या नाकावर टिच्चून आपलं प्रेम यशस्वी केलं. गावानं मृणालच्या या यशस्वी प्रेमप्रकरणाचा कायम छुपा दुस्वासही केला.

बोरकर चौकातून मोठ्या शाळेच्या दिशेनं वर गेलं, की वीर हनुमानाच्या मंदिराशी वळतावळता दिघ्यांची बकूळ लागते. दिघ्यांच्या बकुळीपासून जो रस्ता वर जातो, तो गावाच्या वेशीवर म्हणजेच मुंबई-गोवा महामार्गावर जाऊन संपतो. महामार्गाच्या पलीकडे डोंगराच्या पायथ्याशी मोठी शाळा. बरेचदा गावात न शिरणार्‍या बाहेरच्या डेपोच्या शासकीय परिवहन मंडळाच्या एसट्या मुंबईहून आलेल्या प्रवाशांना वेशीपाशीच उतरवतात. वेशीवर उतरण्याच्या अश्या वेळा सहसा गावकर्‍यांवर रात्रीअपरात्रीच येतात, कारण रात्री दहानंतर एकदा का गावात शिरणारी शेवटची मुंबई-महाड गेली, की मुंबईहून गावाकडे येणार्‍या जवळपास सर्वच एसट्या ह्या दूरच्या पल्ल्याच्या रातराण्याच असतात. मध्यरात्री महामार्गावरल्या वेशीपासून गावातली दहा-पंधरा मिनिटांची पायपीट मोठी रम्य असते. महामार्गावरली गावाची वेस ते बोरकर चौक हा रस्ता म्हणजे गावाचं एक भौगोलिक आणि पर्यावरणीय वैशिष्ट्य आहे. यातही मध्यान्हीच्या आणि मध्यरात्रीच्या अश्या दोनही विभिन्न वेळच्या रस्त्यांना दोन पूर्णत: विभिन्न परिमाणं लाभलेली असतात. रात्र चांदण्यांची असेल, तर खाली सांडलेला चंदेरी प्रकाश दुतर्फा उभ्या झाडांच्या सावल्यांची रांगोळी रस्त्यावर कोरतो. या रस्त्यावरच्या विजेच्या खांबांवर ठरावीक अंतरावर पंचायतीने दिवे लावलेले आहेत. ते दिवे चालू असतील तर त्यांच्या प्रकाशाने रात्रीचा अंधार थोडा आक्रसला जाऊन कोपर्‍याकोपर्‍यावर पुंजक्यापुंजक्यांनी उभा राहातो. दिवसभर गाव उनाडून दमून आडोश्याशी झोपलेली भटकी कुत्री सोडली, तर अश्यावेळी रस्त्यावर चिटपाखरूही नसतं. या वेळी वीर मारुतीच्या मंदिरापल्याड उभ्या दिघ्यांच्या बकुळीपाशी नजर टाकली तर खाली बांधलेला पारही ओसाड आणि रिकामारिकामासा भासतो. अनेक पिढ्यांचा अंधार गोळा करून बकूळ मात्र व्रतस्थ उभी असते. गावात उमललेल्या, बहरलेल्या, कोमेजलेल्या, प्रसंगी यशस्वीरित्या गळ्यात हार होऊन पडलेल्या अनेक प्रेमप्रकरणांसाठी दिघ्यांची बकूळ म्हणजे तीर्थक्षेत्रच!

दीड-दोन फूट रुंदीच्या दिघ्यांच्या बकुळीच्या खोडावर गावातल्या प्रत्येक प्रेमीयुगुलानं त्यांचं नाव कोरलेलं आहे. सरून गेलेल्या प्रत्येक वर्षागणिक, झडून गेलेल्या प्रत्येक सालीगणिक दिघ्यांच्या बकुळीनं काही नावं आपल्या कांतीवरून पुसूनही टाकलेली आहेत, तर काही वर्षानुवर्षं आपल्या खोडावर गोंदण म्हणून जपून ठेवलेली आहेत. यातलंच एक ठसठशीत गोंदण म्हणजे ‘मनु’. या ‘मनु’चा अर्थ अनेकांनी अनेकदा वेगवेगळा लावला. अनेक तर्कांचं काथ्याकूट करून गाव नेहेमीच एका अंतिम निष्कर्षाशी येऊन थांबलं. तो निष्कर्ष म्हणजे, महादेव-अनुसया! महादेवमधला ‘म’ आणि अनुसयातला ‘नु’! या गोंदणाची राखण करत आजही या ‘मनु’तला ‘म’ म्हणजेच महादेव तथा आण्णा उतेकर वेळीअवेळी दिघ्यांच्या बकुळीखाली विमनस्क बसलेले आढळतात. टळटळीत मध्यान्ही जमिनीवर पडलेल्या सावल्यांच्या सांगाड्यातून आण्णा उतेकर नेमके कसले अवशेष शोधत असतील हा प्रश्न मला कायमच पडतो.

गावाच्या स्मरणातलं; किंबहुना गावानं पाहिलेलं पहिलं प्रेमप्रकरण हे उतेकरांचा महादेव आणि जयवंतांच्या अनुसयाचंच होतं. हे प्रेम रुजलं, उगवलं, तरारलं ते दिघ्यांच्या बकुळीखालीच!

शहरी संस्कृतीत वाढलेल्या आणि शासकीय शिस्तीच्या परीटघडीचं आयुष्य जगलेल्या वक्रतुंड जयवंतांनी गावात येऊन निव्वळ जमीनजुमला घेऊन राहतं घरच बांधलं नाही, तर त्या अनुषंगाने येणारा सधन कोकणी माणसाचा व्यवसायही त्यांनी पत्करला. विकत घेतलेल्या जमिनीवर वक्रतुंडांनी शेती करायला सुरुवात केली. राहत्या घरामागे डझनभर गायीम्हशींसाठी गोठा बांधून स्वत:च्या कुटुंबाच्या आणि थोड्याफार प्रमाणात गावाच्या दुभत्याची सोयही लावून टाकली. या कामांसाठी अर्थात वक्रतुंडांनी गडीमाणसं नेमली. गवळीपाड्यातल्या मोरेश्वर उतेकरांचा थोरला मुलगा महादेव उतेकर तथा आण्णा उतेकर वक्रतुंडांच्या गोठ्यातल्या गायीम्हशींचं दूध काढण्याच्या कामावर लागला; आणि तिथेच त्याची वक्रतुंडांच्या अनुसयेशी नजरगाठ झाली. ही नजरगाठ गाठीशीच थांबली, की या दोघांच्या प्रेमाच्या या अनामिक रज्जूने पार हृदयाला वेटोळे घातले याविषयी खुद्द गावकर्‍यांच्या मनातही साशंकता आणि मतमतांतरं आहेत. कुणी म्हणतं आण्णा उतेकरांचं अनुसयेवर एकतर्फी प्रेम जडलं, तर कुणी म्हणतं वक्रतुंडांची अनुसयाही आण्णा उतेकरांच्या प्रेमात तितकीच आकंठ बुडाली होती. वक्रतुंडांच्या कानावर गावातली कुजबुज पडताच त्यांनी गायीम्हशी विकून, घरामागचा गोठा पाडून टाकला आणि त्याचवेळी अनुसयेला आपल्या इतर मुलांप्रमाणेच पुढील शिक्षणासाठी मुंबईला धाडून दिलं. असं म्हणतात की, वक्रतुंडांनी या दोन कोमल मनांच्या प्रेमीयुगुलावर शिस्तभंगाची कारवाई करण्याआधीच दिघ्यांच्या बकुळीखाली त्यांच्यातलं प्रेम उमललं होतं, आणि त्या प्रेमाला कढ येऊन ते उतूही गेलं होतं. या दोघांच्या दुतर्फा प्रेमाची ग्वाही देणारी अनेक माणसं आज काळाच्या उदरात गडप झालेली आहेत. उरल्यासुरल्या म्हातार्‍याकोतार्‍यांच्या स्मृतीवर विस्मृतीची कोळीष्टकं चढलीयेत. तरीही वृद्धावस्थेच्या शिडीवर वयाच्या कोणत्याही पायरीवर उभा गावातला प्रत्येक म्हातारा दिघ्यांच्या बकुळीचा विषय निघताच खवचट हसून बिचार्‍या आण्णा उतेकरांची कुचेष्टा करतोच.

आण्णा उतेकरांपासून स्फूर्ती घेऊन त्यानंतर गावात प्रेमाची इवलीइवली रोपं उमलत्या वयाच्या प्रत्येक पिढीच्या मनात रुजली; पण ती खर्‍या अर्थाने वाढवली ती जयवंतांच्याच मृणालनं. सख्ख्या आत्याचा, म्हणजेच जयवंतांच्या अनुसयेचा वसा मृणालने पुढे जोपासला. तो अर्धवट न सोडता नेटाने पूर्णत्वालाही नेला. हट्टाने जिताडेबाबांच्या सदोबाशी लग्न करून गावातल्या पहिल्या प्रेमविवाहाचा मान जयवंतांच्या मृणालनेच मिळवला.

वक्रतुंडांच्या थोरल्या सुधाकरच्या पाठोपाठ जन्माला आलेल्या मधुकरनेही त्याचाच कित्ता गिरवला. प्राथमिक शिक्षण गावात घेतल्यानंतर त्याची रवानगी थेट पुढच्या शिक्षणासाठी मुंबईत करण्यात आली. मधुकरची वर्णीही यथावकाश केंद्रशासनाच्या अधिकारीपदावर लागली. सातत्याने होणार्‍या बदल्यांमुळे ‘विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर’ या न्यायाने मधुकर कुटुंबकबिला घेऊन देशाभरातील अनेक राज्यं फिरत राहिला. मृणालच्या जन्मानंतर मात्र त्याने हे पाठीवरचं बिर्‍हाड उतरवलं आणि पत्नीसहित मुलीला म्हणजेच मृणालला गावी ठेवलं. पुढे काही वर्षांनंतर मधुकरने शासकीय चाकरी सोडली आणि तो एका परदेशस्थ कंपनीच्या मुंबईतल्या मुख्यालयात लठ्ठ पगारावर संचालकपदी रुजू झाला. पुढे काही काळ नोकरी करून मग व्हिआरएस घेऊन मधुकर गावी परतला आणि त्याने मृणालला पुढील शिक्षणासाठी मुंबईत स्वत:च्या बहिणीकडे म्हणजेच अनुसयेकडे पाठवले.
जयवंतांच्या तीनही पिढ्यांचा प्रवास नीट पाहिला तर एक गोष्ट तात्काळ ध्यानात येईल, की जयवंतांची प्रत्येक थोरली पिढी गावातून शहरात आली खरी; पण गावी परतणार्‍या प्रत्येक पिढीने आपली पुढली पिढी ऐहिक उन्नतीसाठी शहरात जाईल याची तजवीज मात्र केली. वक्रतुंड शहरातून गावाकडे आले आणि त्यांनी आपल्या दोनही मुलांना आणि मुलींना शिक्षणासाठी शहरात धाडलं. वक्रतुंडांचा तिसर्‍या क्रमांकाचा मुलगा दिनकर मात्र या सगळ्याला अपवाद ठरला. तो गावातच शिकला, गावातच राहिला. त्याने विवाहच न केल्यामुळे त्याच्या पुढच्या पिढीने शिक्षणासाठी गाव सोडण्याचा वगैरे कधी प्रश्नच उद्भवला नाही. समस्त जयवंतांच्या गाव ते शहर आणि शहर ते गाव या स्थलांतरणाच्या पार्श्वभूमीवर म्हणूनच मृणालनं घेतलेला जिताडेबाबांच्या सदोबाशी प्रेमविवाह करण्याचा निर्णय गावाच्या इतिहासाच्या नोंदींत जास्त ठळकपणे उठून दिसला.

तसं पाहता वयाच्या फुटपट्टीवर मोजायचं झालं तर मृणाल आणि माझ्यात तब्बल दशक-दीड दशकाचं अंतर. पण घरातल्या इतरांच्या संबोधनांमुळे मी कधी मृणालला अहोजाहो केलं नाही. अर्थात माझ्या जिभेला लागलेलं हे एकेरी वळण पुढे मृणाल आमची शिक्षिका म्हणून आम्हाला शिकवायला आली, तेव्हा कायमचं तुटलं; पण ते पुढे.

वयाची बारा तेरा वर्षं उलटेस्तोवर माझ्या पिढीला बालपणात मृणाल फारशी कधी दिसलीच नाही. अर्थात एखाद्या सकाळी बागेतल्या रोपावर अवचित ब्रम्हकमळ उमलावं, तसे काही योग आले; पण ते काही थोडेच होते. मृणालला सातव्या इयत्तेनंतर जयवंतांनी शिक्षणासाठी मुंबईत पाठवलं. तोवर माझी पिढी जन्माला आली होती किंवा काही प्रमाणात अजूनही काळाच्या उदरातच होती. तरीही माझ्या शालेय जीवनाची सुरुवातीची अर्धी वर्षं मृणालची कौतुकगाथा ऐकण्यात गेली. एक मुलगी म्हणून गावाला मृणालचं कौतुक होतं, काही अंशी अप्रूपही होतं. अर्थात या मुलीचं जेव्हा एका पूर्ण स्त्रीत रूपांतर झालं आणि त्या स्त्रीने बंडाचा हलकासा का होईना झेंडा फडकवला, तेव्हा उभ्या गावाचा कौतुकाचा मुखवटा तात्काळ गळून पडला आणि गावाच्या कपाळावर आठ्या पसरायला सुरुवात झाली.

मृणाल इतर सर्वच जयवंतांप्रमाणे जन्मत:च हुशार होती. लहानपणी ती आमच्यासमोरच राहणार्‍या तेंडुलकर बाईंकडे शिकवणीला यायची. पुढे मी आणि माझ्या वयाची इतर मुलंही त्यांच्याकडे शिकवणीला जाऊ लागलो, तेव्हा आमच्यासमोर त्या मृणालच्या हुशारीचं कौतुक हटकून करायच्या. पाचवीतच म्हणे मृणालचे तीसपर्यंतचे पाढे पाठ होते हे ऐकल्यावर आमच्या मनात मृणालविषयी एक आदरमिश्रित अनामिक, पण अनिवार कुतूहल दाटून आलं. मृणालला म्हणे, निमकी-दीडकी-पाऊणकी असे आता गणिताच्या पुस्तकातून नामशेष झालेले, पण त्या काळात अवगत असले तर कुशाग्र बुद्धिमत्तेचं द्योतक समजले जाणारे पाढेही पाठ होते. लसावि-मसावि तर मृणालच्या डाव्या हाताचा खेळ होता. मृणालला थोरामोठ्यांनी लिहिलेल्या शंभर कविता पाठ होत्या. तिला फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, अमेरिकन राज्यक्रांती अशा कुठल्या कुठल्या क्रांत्या, त्या क्रांत्यांमध्ये क्रांतिकारक कामगिरी करणार्‍या क्रांतिकारकांच्या नावासह माहीत होत्या. मृणालला पेंग्वीन, शहामृग यासारखे पक्षी आणि झेब्रा, जिराफसारख्या पशूंची, त्यांच्या राहणीमानाची, त्यांच्या अवयवांची आणि सगळीच खडानखडा माहिती होती. टुंड्रा प्रदेश, सूचीपर्णी वृक्षांचे प्रदेश तर मृणालला ती तिथली रहिवासी असल्यागत माहीत होते. हे कमी म्हणून की काय पण तिला नागरिकशास्त्रात कायम पैकीच्या पैकी मार्क्स मिळत!
तेंडुलकर बाईंच्या मृणाल-कौतुकाख्यानाला आव्हान देणारी अहमहमिका आळीतल्या इतर बायांमध्ये कायमच लागलेली असे. गावातल्या आया मृणालचे दाखले देत सतत आपल्या वयात आलेल्या मुलींच्या कानीकपाळी ओरडून म्हणत, “ती जयवंताची मृणाल बघ! दहावीत नाही गेली, पण किती छान चपात्या करते, दिवाळीत कानोले भरते, होळीला पुरण घाटून देते. तिला कांदा चिरता येतो, नारळ खवता येतो, प्रसंगी पाट्यावर वाटणंही वाटते! आण्णासाहेब जयवंतांच्या कपड्यांना इस्त्रीही तीच करते. नाहीतर तुम्ही?”

बंदुकीतल्या गोळ्यांच्या फैरींप्रमाणे सटासट कानावर पडणार्‍या या मृणाल-कौतुकाच्या तिखट वाक्यांनी आळीतली कोणतीही मुलगी कधी घायाळ झाल्याचं मला आठवत नाही. अशा तुलनात्मक टोमण्यांमुळे त्या काळातल्या मृणालच्या समवयस्क अशा कोणत्याही मुलीच्या मनात मृणालविषयी हेवा किंवा मत्सर कधीच निर्माण झाला नाही. उलट यामुळे त्यांच्या मनातला मृणालविषयीचा आदर अधिकाधिकच द्विगुणित होत गेला. एकदा अशी धारदार तलवार खुद्द माझ्या आईनेच माझ्या मोठ्या बहिणीविरोधात उपसली, तेव्हा ताई शांतपणे आईला प्रत्युत्तर देती झाली, “मृणाल फक्त एवढंच करत नाही. ती रोज सकाळी त्यांच्या घरामागच्या विहीरीत पोहायलाही उतरते. ही सगळी घरकामं मीही करेन, पण मग मला मोघ्यांच्या हौदावर पोहायला पाठवशील?” बहिणीचं हे उत्तर ऐकून आई पुढला महिनाभर गप्प होती.

Mrunal

मृणालचं पोहणं हे तिच्या दृष्टीने एक साप्ताहिक कार्य असलं, तरी गावाच्या दृष्टीने मात्र एक इव्हेन्ट होती. तसं पाहता गावागावांमध्ये मुलींचं पोहणं ही काही आश्चर्य व्यक्त करावं अशी घटना नव्हती. आमच्या गावातही पट्टीच्या पोहणार्‍या बाया होत्या. माझी स्वत:ची आई, मोगरामावशी ही माझ्या डोळ्यासमोरची उदाहरणं. त्या काळात माझ्या आईच्या वयाच्या बर्‍याचश्या बायकांना पोहता येत असे. मोगरामावशीनं तर म्हणे एकेकाळी नारळी पोर्णिमेच्या दिवशी नदीत फेकलेला नारळ मिळवण्याच्या शर्यतीत उभ्या गावातल्या पुरुषांना मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला होता. पण कालानुरूप गावाच्या मनातली गणितं बदलतात. त्या बदलणार्‍या गणितांना नेमके कोणते सामाजिक, सांस्कृतिक नियम लागू होतात कल्पना नाही, पण बहुधा असंच काहीतरी घडून त्या मधल्या वीसेक वर्षांत गावाकडलं बायकांचं पोहणं मागे पडलं असावं. मधल्या दशक-दोन दशकांत गावातल्या मुलींनी पोहणं शिकण्याबाबतचा जो दुष्काळ पडला होता, त्यावर जयवंतांच्या मृणालनं परसातल्या का होईना, पण विहिरीत उडी घेणं हा वळवाच्या पावसाचा जणू शिडकावाच होता.

माझ्या आठवणीतलं गावातलं पोहण्याचं शिक्षण हे अगदी चार दोन पद्धतींपुरतं मर्यादित आहे. पाच-दहा लिटरचा प्लास्टिकचा रिकामा ड्रम किंवा रबरी टायरची ट्यूब कंबरेभोवती लावून, क्वचित प्रसंगी पाठीला दोर बांधून तळ्याविहिरींतून पोहणं या गावासाठी त्या काळात पोहायला शिकण्याच्या अभिनव पद्धती होत्या. माझ्या वर्गातल्या खंडू भगताला त्याच्या आज्यानं म्हणजेच महाद्या भगतानं कुत्र्याची पोहाणी शिकवलेली मला आजही स्पष्ट आठवते. पारंग्याच्या झाडाचा ओंडका मधोमध छिद्र पाडून, त्यातून दोर टाकून कंबरेभोवती बांधून पोहणं शिकण्याच्या पद्धतीला गावाकडे कुत्र्याची पोहाणी म्हणत. कुत्रा पोहताना जसे आपले चारही पाय जवळ घेऊन पोहतो अगदी तशाच प्रकारे पारंग्याच्या ओंडक्याच्या वजनाखाली दबलेलं आमच्या वयाचं लहान पोर आपले दोनही हातपाय जवळ घेऊन ते कुत्र्यासारखे हलवून पोहत असे. अशा पद्धतीने पोहणं शिकून नेमकं काय साधलं जायचं यामागचं शास्त्र मला माहीत नाही, पण खंडूला थोरल्या विहिरीत अशा रीतीने पारंग्याचा ओंडका बांधून कुत्र्यासारखं पोहताना मी पाहिलेलं आहे.

बरेचदा होळीनंतर उरलेलं शीत, म्हणजेच होळीच्या मधोमध लावलेल्या सावरीच्या न जळलेल्या पिल्याचा ओंडका गावातली मुलं ओढत नेऊन तळ्यात टाकत. आतला चिकट द्रव कालांतराने निघून गेल्यावर तो ओंडका टम्म फुगून संपूर्ण तळ्याच्या परिघाभोवती मग सावकाशीने प्रदक्षिणा घालत फिरे. माझ्या बालपणी काही मुलं या ओंडक्याला धरून धरून त्या आधाराने पोहायला शिकली होती.

गावातल्या पोहणं शिकण्याच्या या अत्यंत निखळ ग्रामीण पार्श्वभूमीवर मृणालसाठी तिच्या वडिलांनी मुंबईहून येताना खास स्विमिंग स्युट आणला. नुकतंच पोहायला शिकू लागलेल्या किंवा शिकणार्‍या मुलांसाठी हे एक अधिकचं अप्रुप होतं. मृणालचा हा स्विमिंग स्युट वा स्विमिंग स्युट घातलेली मृणाल तिच्या समवयस्क पिढीला ‘याचि देही याचि डोळा’ पोहताना कधीच दिसली नाही, पण तोवर गावागावात रुजलेल्या हिंदी सिनेमानं गावाची दृश्यात्मक प्रतिभा वाढीला लावली होती. सिनेमातत्त्वाच्याच भाषेत सांगायचं झालं, तर स्विमिंग स्युटमधल्या मृणालचा तो क्षणिक कल्पित फ्लॅशही गावाचे डोळे विस्फारण्यासाठी पुरेसा होता. मृणाल निव्वळ पोहणं शिकून थांबली नाही, पुढे मुंबईत गेल्यावर तिने म्हणे ठाण्याची खाडीही पोहून काढली वगैरे वगैरे बातम्या गावात लवकरच पसरल्या. आता मृणाल इंग्लिश खाडी पोहायचा मान मिळवून गावाची मान अभिमानाने उंच करणार अशी वदंता उभ्या पंचक्रोशीत दुमदुमत असतानाच, अचानक मृणाल तिची पदवी परीक्षा संपवून गावी परतली आणि थेट जिताडेबाबांच्या सदोबाच्या गळ्यात लग्नाची माळ घालून मोकळी झाली.

मृणालला खर्‍या अर्थाने मी सर्वप्रथम पाहिलं, ते चौथ्या इयत्तेतल्या दिवाळीतल्या पाडव्याच्या पहाटे. त्या आधीच्या मृणालच्या स्मृती अगदीच क्षीण आहेत; आणि त्यानंतर शिक्षक म्हणून मला शिकवणार्‍या मृणालच्या आठवणी गावातल्या तिच्या तोवरच्या झगमगीत कौतुक आणि स्तुतीपर वदंतेखाली झाकोळलेल्या आहेत.

त्या वर्षी गावातल्या काही ज्येष्ठांनी दिवाळीतल्या पाडव्याच्या पहाटे शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम जुन्या महादेव मंदिरासमोरच्या पिंपळाच्या पारावर आयोजित केला. कार्यक्रमासाठी खास डोंबिवलीहून शास्त्रीय संगीतातले एक ज्येष्ठ अध्वर्यू बोलावण्यात आले. त्यांच्यासोबत त्यांचा चार-सहा जणांचा छोटा संघही होता. सकाळी साडेचार वाजता झुंजूमुंजू व्हायच्या आधीच गायकांनी गायला सुरुवात केली. गावातली दोनचार दर्दी माणसं वगळता गायकांनी गायलेली सगळीच गाणी एखाद्या द्रुतगती गोलंदाजाने फेकलेल्या उसळत्या चेंडूसारखी गावकर्‍यांच्या डोक्यावरून गेली. गावकरी दोनही हात एकमेकांत घट्ट गुंफून, प्रसंगी दातांवर दात रोवून गाण्यांमागे गाणी संयमानं ऐकत राहिले. प्रत्येक सरत्या गाण्यागणिक टाळ्यांचा कडकडाट आणि ओठांतून वाहवा करत राहिले. सत्कार आणि सन्मानाचे गावाने पांघरलेले मुखवटे अनोखे असतात. कुचेष्टा आणि टिंगल-टवाळीचा एक सूक्ष्म अंत:स्तर त्या मुखवट्याखालून छद्मीपणानं सतत प्रसृत होत असतो. पहाटे साडेचार वाजता सुरू झालेला डोंबिवलीकरांचा तो शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम एखाद्या शिस्तशीर लष्करी कवायतीप्रमाणे पहाटे साडेसहा वाजता संपलाही. इशस्तवनाने कार्यक्रमाची सांगता होईस्तोवर पिंपळाच्या पारासमोरचं मैदान गावकर्‍यांनी तुडुंब भरलं होतं. गावातला कोणताही कार्यक्रम, मग तो लग्नाचा मुहूर्त का असेना, कधीही वेळेत सुरू होत नाही हे बाळकडू गावानं वसतानाच प्यायलेलं असतं. या न्यायाने साडेचारच्या कार्यक्रमाला सहा-साडेसहा वाजेस्तोवर जमेलेले गावकरी कार्यक्रम संपला म्हणून खट्टू व्हावं, का एकूणच कार्यक्रमाचं स्वरूप पाहता आनंदी व्हावं, या द्विधावस्थेत असतानाच काही तरुण मुलांनी तात्काळ स्थानिक विविधगुणदर्शनाचे कार्यक्रम जाहीर केले आणि गावकर्‍यांच्या चेहेर्‍यावरची मालवलेली कळी तात्काळ उमलली. स्थानिक गुणदर्शन म्हणून गावातल्या स्थानिकांनी उधळलेले गुण डोळ्यांचं पारणं फेडणारे होते. कुणी येऊन बाजा वाजवला, कुणी येऊन नाच केला, दादेगावकर्‍यांच्या आप्पांनी कावळ्याचा, कबुतराचा आणि कोकिळेचा आवाज काढला. वयाच्या चाळिशीत आलेल्या, दोन पोरांचा बाप असलेल्या, सहा फूट उंचीच्या, केसाळ छातीच्या आणि आकडेबाज मिश्यांच्या अर्जुन कुंभाराने ‘उठा राष्ट्रवीर होऽ’ म्हटले. रानडेकाकूंनी ताट वाजवत भोंडल्यातली गीतं सादर केली. स्थानिकांच्या या प्रत्येक गुणदर्शनासाठी गावाने उदार अंत:करणाने टाळ्याशिट्ट्यांचा कडकडाट केला. आपला कार्यक्रम संपल्यावर सन्मानार्थी म्हणून पहिल्या रांगेत बसलेला, डोंबिवलीहून आलेला उच्च अभिरुचीच्या, शास्त्रीय संगीतातल्या तज्ज्ञांचा संघ गावाचे विविधगुणदर्शन पाहून दंग झाला. असं म्हणतात, की त्यातल्या कित्येकांच्या वासलेल्या तोंडाचा आऽ पुढली काही वर्षं मिटलाच नाही. कलागुणांची अशी मुक्त उधळण आजवर त्या प्रतिभावंतांनी कधीही पाहिलेली नव्हती. दादेगावकर आप्पांनी जेव्हा ओठांची मोळी वळत खुडका आलेल्या कोंबडीचा आवाज तोंडातून काढला, तेव्हा पहिल्या रांगेतल्या लाल रंगाच्या मखमली खुर्चीत बसलेले ते ज्येष्ठ संगीतज्ञ सद्गदित झाले. त्यांच्या हृदयावरचा हळवा ताण अधिक वाढू न देण्याची तजवीज जणू नियतीनेच केली, आणि पुढच्या गुणदर्शनासाठी स्टेजवर मृणाल उभी राहिली.

मृणाल रंगरूपात गावात सर्वात उजवी होती. तिची हुशारी, बुद्धिमत्ता, वागणं, बोलणं, पोहणं या सगळ्याचंच गावाला कमालीचं कौतुक होतं. यात मृणालच्या गाण्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. मृणालचा आवाज कमालीचा मोहक होता. मुंबईला गेल्यावर विलेपार्ल्यात ती गाणं शिकलीही होती. तिच्याच उर्मिलाआत्यानं तिला ऑल इंडिया रेडियोत अनाउन्सर म्हणून नोकरीही देऊ केली होती. गावात नुकत्याच लोकप्रिय होऊ लागलेल्या दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून झळकण्याची संधीही मृणालकडे आपणहून चालत आली होती. गावानं काही काळ तर मृणाल आता सिनेमातली पार्श्वगायिका म्हणून उदयाला येणार आणि भल्याभल्या गायिकांची छुट्टी करून टाकणार अशीही स्वप्नं पाहिली होती. पण मृणालने हे सारं नाकारलं आणि ती सदोबाशी लग्न करून गावी कायमची निघून आली.

त्या वर्षी मुंबईत शिकणारी मृणाल दिवाळीच्या सुट्टीत म्हणून गावी आली होती. पाडव्याच्या पहाटे स्थानिक गुणदर्शनाचा कार्यक्रम सुरू झाल्यावर कुणीतरी जयवंतांच्या घरी जाऊन तिला बोलावून आणलं. मृणालही न भीता धीटपणे स्टेजवर गायला उभी राहिली. स्टेजवर उभं राहण्यापूर्वी तिनं डोंबिवलीहून आलेल्या त्या ज्येष्ठ गायकांचा आशीर्वाद घेतला. त्या गृहस्थांनीही मघापासून झालेल्या कलागुणदर्शनाने गळ्याशी दाटलेला आवंढा गिळत, घसा खाकरत कोरड्या कंठाने मृणालला आशीर्वाद दिला. मृणाल स्टेजवर उभी राहिली आणि गाऊ लागली.

त्या दिवाळी पाडव्याच्या पहाटे मी जेव्हा मृणालला सर्वप्रथम पाहिलं, तेव्हा ती मला काही वर्षांपूर्वी माझ्या बहिणीने आणलेल्या एका जुन्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावरच्या युवतीसारखी सुंदर, मोहक आणि आकर्षक वाटली. त्या दिवशी ती लाल-पिवळ्या रंगांची मोठाली फुलं असणारी साडी नेसली होती. अगदी त्याच रंगाची साडी त्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावरल्या युवतीच्या अंगावरही होती. मी नंतर घरी जाऊन ते कव्हरचित्र पुन्हा पाहिलं. आता त्या अंकाचं नाव आठवत नाही; पण ते दीनानाथ दलालांचं चित्र होतं हे आजही स्पष्ट आठवतं. त्या दिवसापासून, त्या क्षणापासून मृणालची माझ्या मनातली प्रतिमा दलालांच्या त्या चित्राने काबीज केली. मृणालला आजही आठवू पाहिलं तर तिची छबी म्हणून दलालांचं ते चित्रच डोळ्यासमोर येतं.

मृणाल गाऊ लागली आणि आधीचा बराच काळ हसणारे-खिदळणारे गावकरी शांत झाले. खरक-सरक असे पत्र्याच्या खुर्च्या सरकवल्याचे आवाज करीत गावकरी स्थानापन्न झाले आणि मृणालच्या गायनात भान विसरून डुंबत राहिले. मृणालने त्या दिवशी गाणी गायली तीही गावाच्या काळजाला हात घालणारीच! पहिलं गीत होतं ते आशा सिनेमातलं ‘शीशा हो या दिल हो.’, त्यानंतर ‘एक दुजे के लिये’मधलं ‘सोलह बरस की बाली उमर को सलाम’, मग पाठोपाठच नुकत्याच रिलीज झालेल्या ‘अर्पण’मधलं ‘लिखने वाले ने लिख डाला’. एकापाठोपाठ एक मृणाल लता मंगेशकरांची गाणी गात राहिली आणि हळूहळू त्या वर्षीच्या दिवाळीतला पाडवा गावासमोर गोडाधोडानं सजवलेल्या फराळाच्या ताटासारखा साजरा होत गेला. गावानंही आपल्या लाडक्या मृणालला भरल्या डोळ्यांनी पाहून घेतलं, दोनही कानांत साठवून घेतलं. मृणाल गायची थांबली तेव्हा टाळ्याशिट्ट्यांचा कडकडाट दीर्घकाळ थांबलाच नाही. हा टाळ्यांचा कडकडाट एवढा मोठा होता, की तो गावाच्या एका टोकाला असणार्‍या धरण-खोरे प्रकल्पात राहणार्‍या माझ्याच वर्गातल्या वैभव मनोरेलाही ऐकू आला.

‘मृणाल गायला लागली तेव्हा, भल्या पहाटे उठून कुहू कुहू करू लागलेल्या कोकिळांनी ओशाळून आपलं कुंजन थांबवलं. पिंपळाच्या झाडावर वास्तव्यास असणार्‍या अनेक साळुंक्या मृणालच्या तानेसोबत लकेरी घेऊ आकाशास गवसणी घालू लागल्या. नुकत्याच फुटलेल्या पहाटेच्या तांबडानेही आपला रंग बदलून गुलाबी केला.’

वरच्या परिच्छेदात वर्णन केलेली वाक्यं माझी नसून अभिराम बापटची आहेत. अभिरामला लिखाणाचा ओढा होता. मुंबई-पुण्याहून निघणार्‍या नियतकालिकांतून त्याच्या कथा-कविता त्या काळी प्रसिद्ध होत. पाडवा पहाटेच्या त्या कार्यक्रमातल्या मृणालच्या गायनानंतर तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा अभिराम इतका प्रभावित झाला, की त्याने तिच्यावर अश्या अनेक रूपकं-प्रतिमांची उधळण करणारं एक कवन लिहिलं. वसंताने आपल्या काकाच्या कौतुकाखातर ते मला दाखवलं. मी त्या काळात तसा एकपाठी असल्याने ते कवन माझ्या बर्‍यापैकी लक्षातही राहिलं. या उपमांनी ओतप्रोत भरलेलं ते कवन जेव्हा मी भोळसटपणे बोरकर चौकातल्या टोळभैरवाला ऐकवले, तेव्हा त्या प्रत्येकाच्या चेहेर्‍यावर उमटलेले वेगवेगळे भाव हे एकमेवाद्वितीय होते. बराच वेळ कुणीही काही बोललं नाही. मग एक, मग दुसरा, मग तिसरा आणि पाठोपाठ सगळेच शोलेतल्या गब्बरपाठोपाठ हसणार्‍या डाकूंसारखे गडगडाटी हसू लागले. बराच वेळानं हास्याची ती मुसळधार थांबली, तेव्हा त्यांच्यातलाच एक खुदखुदत म्हणाला, “त्या अभ्याला म्हणावं, मृणालचं गाणं ऐकून पोट्यांच्या रमणची काय हालत झालीय ते लिही.” मग पुन्हा एकवार हास्याची मुसळधार सुरू झाली, ती पुढे बरेच दिवस अभिरामला खिजवून खिजवून तो पार ओशाळं होऊन घरातून बाहेर पडायचं बंद करेस्तोवर चालूच राहिली.

बोरकर चौकातल्या टोळभैरवांविषयी पुन्हा कधीतरी लिहिणं होईलच, पण पोट्यांच्या रमण आणि मृणालमध्ये घडलेल्या एका प्रसंगाला टाळून पुढे सरकणं मृणालसाठी अन्यायकारक ठरेल.

रमण पोटे, म्हणजे धनदांडगा म्हणावं असं गावातलं व्यक्तिमत्व! बापजाद्यांनी ठेवलेली वारेमाप इस्टेट रमणने स्वत:च्या धंदेवाईक चातुर्याने वाढवली खरी, पण रमणच्या अंगी माज आणि रग आकंठ भरलेली. अभिराम आणि गावातल्या इतर अनेकांप्रमाणेच मृणालवर त्याचं एकतर्फी प्रेम. पण त्यानं आपलं प्रेम इतरांसारखं अव्यक्त न ठेवता मृणालसमोर मोठ्या हिंमतीने व्यक्त केलं. त्या काळात मृणाल मुंबईतलं शिक्षण संपवून गावी परतली होती. एव्हाना जिताडेबाबांच्या सदोबाशी जुळलेली तिच्या हृदयाची तार बर्‍यापैकी छेडली जाऊन त्या तारेतून निर्माण होणारे मंजूळ ध्वनी गावाच्या कानावर पडू लागले होते. एके दुपारी रमणनं न राहावून म्हणे ताम्हाण्यांच्या कुंपणाशीच मृणालला थांबवलं आणि विचारलं, “त्या जिताडेबाबाच्या सदोबात असं काये, जे माझ्यात नाही?” मृणाल म्हणाली, “मला तुझं नाव नाही आवडत.” यावर रमण छद्मी हसत म्हणाला, “ लग्न नावाशी करणार आहेस का अंगाशी?” यावर मृणाल जे उत्तरली, त्या उत्तरानं रमणचा एरवी एखाद्या सुतळी दोरखंडासारखा भासणारा दांडगा पीळ होळीत जळल्या ओंडक्याप्रमाणे भुकटी होऊन पार वार्‍यावर फुंकून गेला. मृणाल रमणला म्हणाली, “आड नुसता वारेमाप मोठा असून उपयोग नाही, त्या आडाला पाणीही हवं. ते पाणी नसेल तर कितीही रहाट ओढा. हाती काहीच लागत नाही.”

वरची घटना पूर्णत: ऐकीव आहे. त्यातली सत्यासत्यता मला ठाऊक नाही. ती पूर्णत: कपोलकल्पित असेल किंवा अर्धसत्य. रमण पोटे आता थकलाय. वरच्या नाक्यावरच्या त्याच्या भातगिरणीच्या आवारात आजही तो खुर्ची टाकून बसलेला दिसतो. त्याच्या चेहेर्‍यावरची पूर्वीची रग, माज आणि मद आता पार ओसरून गेलाय. गावातले लोक आजही रमणच्या अंगी एकेकाळी वस्तीला असलेल्या माजाच्या गोष्टी सांगतात; आणि पुढे न विसरता, मृणालने त्याचा माज कायमचा कसा उतरवला याची टिप्पणीही जोडतात. ही घटना खरी असेल तर एका बाईने केलेल्या उपमर्दाचा एका पुरुषाच्या आयुष्यावर किती मोठा परिणाम होऊ शकतो याचं हे एक कायमस्वरूपी आणि व्यवच्छेदक असं उदाहरण आहे.

बापटांचा अभिराम वा पोट्यांचा रमण वगळता मृणालची अभिलाषा गावातल्या दुसर्‍या कुणीही उरी बाळगली नाही अशी समजूत करून घेणं हा खुळेपणा ठरेल. मनातल्या मनात, अगदी स्वत:पासूनही लपवून गावातल्या त्या पिढीतल्या अनेकांनी मृणालविषयी प्रीतीची भावना हृदयी बाळगली यात नवल असं काहीच नाही! अगदी यादीच करायची झाली तर या दोघांच्या पाठोपाठ गावातल्या इतर अनेकांची नावं जोडणं काही खूप कठीण काम नसेल. आपल्या प्रीतीचा दीप गावातल्या अनेक तरुणांच्या मनात प्रज्वलित करूनही मृणालने निरांजनाचा मान मात्र जिताडेबाबांच्या सदोबारूपी खापराच्या पणतीला द्यावा हा गावासाठी मोठा धक्का होता. मुळात गावाला मृणाल गावात नकोच होती. मृणालसारख्या व्यक्तिमत्वांनी गावाबाहेर पडून उंच अवकाशात झेपावत गगन गवसणी घालून गावाचं नाव उज्ज्वल करावं ही अपेक्षा गावानं कायमच रास्त मानली.

रसायनशास्त्राच्या शालेय पाठ्यपुस्तकात एका वायूचं वर्णन असायचं. रंगहीन, गंधहीन, चवहीन. जिताडेबाबांचा सदोबा मला कायम त्या वायूसारखा वाटायचा. सदोबाला ना चव होती, ना रंग-रूप होतं, ना गंध होता. ही रंग-चव-गंधहीन वायूची सदोबाबाबतची प्रतिमा माझ्या मनात रुजण्यामागेही मृणालच आहे. आमच्या वर्गावर वर्गशिक्षिका म्हणून रुजू झाल्यानंतर सहा आठ महिन्यांनी कधीतरी रसायनशास्त्रातल्या याच वायूची माहिती देतादेता मध्येच मृणाल कोणत्याही कारणाविना खुदकन हसली. मृणाल मॅडम अश्या का हसल्या याची चर्चा शाळा सुटल्यानंतर आम्हा मुलांमुलांमध्ये चांगलीच रंगली. तेव्हा मागच्या बेंचवर बसणारा अणि आमच्यापेक्षा वयानं मोठा असल्याने थोराड दिसणारा प्रताप जाधव डोळा मारत म्हणाला, “काय नाय! तिला नवर्‍याची आठवण आली.” जाधवच्या मेंदूतला विषयी किडा माझ्या डोक्यात काही वळवळला नाही. पण तो वायू, मृणाल आणि जाधवने उच्चारलेले शब्द यांची एकत्रित सांगड माझ्या मेंदूत कायमची घातली जाऊन माझ्या दृष्टीने सदोबा म्हणजे रंगहीन, चवहीन, गंधहीन वायू हे समीकरण एकदम चपखल बसलं.

मृणाल आणि सदोबा हा गावातला सर्वाधिक विरूप जोडा होता. आजही गावातल्या सर्ववयीन विवाहित जोड्यांची यादी केली, तर विरूप जोड्यांमध्ये मृणाल आणि सदोबा अग्रस्थान मिळवतील हे नि:संशय. सदोबा मृणालला कोणत्याही दृष्टीने लायक नव्हता. रंग, रूप, बुद्धिमत्ता किंवा इतर गुणांचा विचार करताही सदोबा मृणालच्या पासंगालाही पुरला नसता. मृणाल सदोबाच्या प्रेमात नक्की कधी, केव्हा आणि कशी पडली याविषयी गावात अनेक आख्यायिका आहेत. त्यांची रसभरित वर्णनं आजही गावात गेल्यावर कानावर पडतात. मी त्या आख्यायिकांकडे कानाडोळा करतो. मृणालनं सदोबाशी लग्नं केल्यानं उभ्या गावासोबत मीही खट्टू झालो होतो, त्यामुळेच त्या दोघांची प्रेमगाथा ऐकताना कान कायम आपोआपच मिटले जातात.

अर्थात, मृणालनं सदोबाशी लग्न केल्यानंतर त्याला नखशिखान्त बदलवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. टेरीकॉटची पँट आणि बुशशर्ट घालणार्‍या सदोबाच्या अंगावर मृणालने जीन्स आणि टी-शर्ट चढवला. जंगलातल्या लाकडांच्या मालकीत जाताना एरवी सदोबा त्याच्या ‘चेतक’ स्कूटरवर जाई. मृणालने त्याला बुलेट घेऊन दिली. मृणालने सदोबाचं नावही सरकारी दफ्तरी जाऊन कागदोपत्री सदाशिवचं संदीप असं बदलून घेतलं. अर्थात बुडाखालची चेतकरूपी तट्टाणी जाऊन तिथे बुलेटरूपी ऐरावत आल्याने सदोबातल्या श्यामभट्टाचा काही इंद्र झाला नाही. कागदोपत्री सदाशिवचं संदीप झाल्यानं गावाच्या जिभेला लागलेलं सदोबा हे वळण काही सुटलं नाही. सदोबाचं व्यक्तिमत्व बदललं; पण काही प्रमाणातच.

मृणालनं सदोबाशी लग्न करून गावाची घोर निराशा केलेली असली, तरी ती आज स्वत:च्या संसारात पूर्णत: सुखी आहे. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत, म्हणजे जिताडेबाबांचं जुनं घर पाडून तिथं मोठाली रहिवासी इमारत होईस्तोवर, जर कधी जिताडेबाबांच्या घरामागच्या गल्लीतनं संध्याकाळी चालत गेलं आणि क्षणभर मागच्या खिडकीशी रेंगाळलं, तर सदोबासाठी मृणाल म्हणत असलेलं गाणं न चुकता हमखास ऐकू यायचं. एकदाच जिताडेबाबांच्या घरी एका अवचित संध्याकाळी मी अचानकच डोकावलो, तेव्हा त्यांच्या मागच्या खोलीत सदोबासाठी तल्लीन होऊन गाणं म्हणणारी मृणाल मी पाहिली होती. सदोबा तिच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपला होता आणि मृणाल त्याच्या केसांतून बोटं फिरवीत होती. मी ओशाळं होत तात्काळ मागे फिरलो. सदोबासाठी म्हटल्या जाणार्‍या या गाण्याचा रिवाझ पुढची अनेक वर्षं न थांबता चालूच राहिला. मध्येच कधीतरी गावात कार्यरत असणार्‍या एका शासकीय अधिकार्‍याशी मृणालचं नाव जोडलं जाऊन गावातली हवा एकदम दुषित झाली. त्या काळात जिताडेबाबांच्या घरातून ऐकू येणारं हे संध्याकाळचं गाणं थांबलं. या चर्चेमुळे जिताडेबाबांच्या घराची एकूण चर्याच बदलली. लग्नानंतर जीन्स-टी शर्टात वावरणारा सदोबा या काळात अचानकच पुन्हा जुन्या कपड्यांमध्ये दिसू लागला. संध्याकाळी मागल्या खिडकीतून मृणालच्या गीतांचे स्वर कानावर पडण्याऐवजी, एरवी तोंडून ब्रही न निघणार्‍या सदोबाचा चढा आवाज कानावर पडू लागला. अध्येमध्ये त्याच खिडकीत मृणाल आसवं ढाळताना दिसू लागली. एके संध्याकाळी या दैनंदिन शोकनाट्यानं रौद्ररूप धारण केलं. जिताडेबाबांच्या घरातून भांडी आपटण्याचे, रडण्याचे, किंचाळण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. आळीतली चार माणसं आपापल्या उंबर्‍याबाहेर पडून आपापल्याच पायरीवर थांबली; पण पायरी उतरून जिताडेबाबांच्या घरात प्रवेश करण्याची हिंमत कुणाचीही झाली नाही. मृणालच्या तेजस्वी सत्वापुढे आळीतल्या लोकांची उत्सुकता, कुतूहल आणि काळजी विझून गेली. दुसर्‍या दिवशी सकाळी जिताडेबाबांच्या घराला कुलूप लागलेलं गावाने पाहिलं. घरातले सगळेच पुढचे आठ दिवस कुणालाही दिसले नाहीत. या आठ दिवसांत हे कुटुंब नेमकं कुठे गेलं आणि त्यांनी तिथं जाऊन नेमकं काय केलं याविषयी कुणालाही खात्रीशीर माहिती नाही. पण या आठ दिवसांनंतर सगळे जेव्हा परतले तेव्हा जिताडेबाबांचं घर पूर्वीसारखंच हसतमुख झालं होतं हे नक्की. त्या दिवशी बर्‍याच दिवसांनंतर मृणालचं गाणं आळीला ऐकायला मिळालं. ते गाणं चक्क मृणाल घराबाहेरच्या पायर्‍यांवर बसून गात होती. आजही ते गाणं लख्ख आठवतं. ते गाणं होतं, उंबरठा सिनेमातलं, ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या...’

त्यानंतरच्या काळात तिच्या श्वशुरांच्या म्हणजेच जिताडेबाबांच्या प्रतिष्ठेची आणि तालेवारपणाची गावातली रया जशी ढासळू लागली, तसे मृणालने काही असे निर्णय घेतले ज्यामुळे गावाने तिला खलनायिकेच्या पारड्यात तोलायला सुरुवात केली. पण मृणालचे सर्वच निर्णय हे अचूक आणि अंतिमत: तिच्या कुटुंबाच्या फायद्याचेच ठरले. मग तो गावाबाहेरची शेतजमीन विकण्याचा निर्णय असो; की राहत्या घराला वाळवी लागल्यावर ती जागा बिल्डरला विकसित करायला देण्याचा निर्णय असो.

जिताडेबाबा निर्वतल्यानंतर वर्षाभरातच जेव्हा सदोबाच्या मागे लागून मृणालने गावाबाहेरची शेतजमीन विकली, तेव्हा गावानं मृणालला दूषणं दिली. पण मृणालचा निर्णय खरा ठरला. पुढच्या आठ-दहा वर्षांतच ती जमीन महामार्गाच्या विस्तारीकरणात गेली आणि तिच्या तत्कालीन मालकाला त्या जमिनीची अगदीच नगण्य किंमत मिळाली.

जिताडेबाबांच्या राहत्या घराला वाळवी लागली, तेव्हा मृणालने त्या जागेवर रहिवासी इमारत बांधण्याविषयी सूतोवाच केलं. तेव्हा सदोबापेक्षा वयानं वर्षाभरानंच लहान असणार्‍या ज्योतीनं आणि एरवी सुताप्रमाणे सरळ असणार्‍या धाकल्या माधवनेही आकांडतांडव केलं, पण मृणाल कुणालाही बधली नाही. ती आपल्या निर्णयावर अडून राहिली. काही दिवसांनी सर्व भावंडांनी निमूट कागदपत्रांवर सह्या केल्या आणि नंदन मारवाड्यानं तिथं इमारत बांधायला घेतली. मृणालने हा सर्व व्यवहार करताना स्वत:च्या, पर्यायाने जिताडेबाबांच्या उभ्या कुटुंबाच्या पदरात चांगलं घसघशीत दान पाडून घेतलं. शिवाय व्यवहार करताना कागदपत्रात एक ग्यानबाची मेखही मारून ठेवली. त्यायोगे इमारतीसाठी लागणारं सर्व बांधकामाचं साहित्य पुरवण्याचं कंत्राट सदोबाच्या लहान भावाला म्हणजेच माधवला देणं नंदन मारवाड्यासाठी बंधनकारक होतं. या व्यवहारातून घरची लाकडं कापण्याची मिल जळाल्याने घरी बसलेल्या माधवला एक नवा उद्योग मिळाला. मृणालनं सदोबाच्याच नव्हे, तर सर्वच दुर्व्यांच्या भविष्याला उजळून टाकलं हे मात्र खरं.

मृणाल आता मोठ्या शाळेची मुख्याध्यापिका आहे. पुढल्या पाच-सात वर्षात ती निवृत्तही होईल. आता जिताडेबाबाही नाहीत आणि सुमाकाकूही नाही. जयवंतांच्या ज्येष्ठ पिढीतलंही दिवाकर वगळता कुणीही उरलेलं नाही. मृणालने जिताडेबाबांच्या घरावर रहिवासी इमारत बांधून घेतलेली असली, तरी तिथे आता राहत असं कुणीच नाही. मालकीचे सगळे फ्लॅट सदोबानं भाड्याने दिलेत. गेली काही वर्षं ओकंबोकं असलेल्या जयवंतांच्याच घरात आता मृणाल आपल्या कुटुंबासोबत म्हणजेच सदोबा, छोटा आदित्य, तिचा धाकला दीर माधव आणि काका दिनकरसह राहाते. जयवंतांच्या घरी माझी ये-जा पूर्वीही नव्हती, आत्ता तर एकदमच कमी. पण आजही वाटतं अचानक एखाद्या संध्याकाळी जयवंतांच्या घरी जावं. घरात न शिरता पायरीशीच थांबून आतला अदमास घ्यावा. नीट कान देऊन ऐकून पाहावं. मला खात्री आहे मृणाल आजही सदोबाला मांडीवर झोपवून त्याच्यासाठी तेवढ्याच तल्लीनतेने गाणं गात असेल!

हृषीकेश गुप्ते

---------
ऋणनिर्देश : लेखमालेतील काही भाग 'अक्षरधारा' मासिकात पूर्वप्रकाशित झाले होते.
रेखाचित्र : गिरीश सहस्रबुद्धे

कोकणातले मासले भाग १ - सुलतान पेडणेकर
कोकणातले मासले भाग २ - जिताडेबाबा
कोकणातले मासले भाग ४ - खिडकी खंडू
कोकणातले मासले भाग ५ - मॅटिनी मोहम्मद

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अर्धंच वाचलंय. मस्तं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सदोबा आणि मृणालने एक आठवडा गावाबाहेर जाऊन काय केले आणि ते कुटुंब हसतमुखाने परत कसे आले हे जाणून घेण्याची उत्कंठा आहे. ते प्लीज कधी तरी सांगा . बाकी लेखमाला बहारदार आहे. पुढच्या लेखाची वाट बघत आहे. 

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्तं गोष्ट आहे ! आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

व्यक्तीचित्रण छानच. या सर्व व्यक्तीचित्रणामधुन, मला मृणालचा आवडलेला गुण म्हणजे तिचा व्यावहारीकपणा, हिशेबीपणा. हुषार आहे की ती आणि दूरदर्शीही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या गोष्टींबद्दल ऐसी अक्षरेस धन्यवाद.
---
लेखक महाशय कधी सभासद होऊन एखादा प्रतिसाद/ प्रतिक्रिया देतील तर बरेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0