खिडकी खंडू - हृषीकेश गुप्ते

खिडकी खंडू

खंडूच्या नावाला ‘खिडकी’ चिकटण्यामागे त्याची विवाहित दांपत्यांच्या खिडक्यांमधून आत डोकावण्याची सवय कारणीभूत होती, का गावाने दोन ‘ख’मधला निव्वळ अनुप्रास साधला होता, याविषयी माझ्या मनात आजही साशंकता आहे. मुळात खंडूला लहानपणापासूनच उपाधींची कमतरता कधी पडलीच नव्हती. सुरुवातीला ‘स्मगलर खंडू’, मग ‘मुतर्‍या खंडू’, मग ‘खिडकी खंडू’ आणि सरतेशेवटी ‘कोयत्या खंडू’ हा खंडूला चिकटलेल्या बहुमानांचा प्रवास जेवढा रोमहर्षक आहे, तेवढाच हृदयद्रावकही आहे. गावानं खंडूवर कायम कांकणभर अन्यायच केला. जयवंतांच्या मृणालचा अपवाद वगळता या अन्यायी भूमिकेतून कुणीही सुटलं नाही; अगदी मीही. या लेखाच्या निमित्ताने खंडूच्या व्यक्तिमत्वाचं शब्दचित्र रेखाटताना मलाही शीर्षक म्हणून दोन ‘ख’मधल्या अनुप्रासाचा मोह आवरला नाहीच.

Khidki Khandu

गावासाठी खंडू भगत म्हणजे महाद्या भगताचा नातू. जिताडेबाबांचा गोठा सांभाळणं हे महाद्या भगताचं मुख्य काम. गोठ्यातल्या पाच-पन्नास गाईम्हशींची देखभाल करणं, त्यांचं शेण-सारवण काढणं, त्यांच्या पेंड-पेंढ्याची काळजी घेणं, दुभत्या जनावरांचं दूध काढून रोज सकाळी गावातल्या उकडेकरांकडे त्याचा रतीब घालणं आणि हे सगळं करून वेळ उरलाच तर जिताडेबाबांच्या घरातली इतर कामं, हे सगळं महाद्या भगत रामाप्रतीच्या हनुमानाच्या निष्ठेने करायचा. महाद्याचं बोट धरून जिताडेबाबांकडे येणारा एक अतिकृश अंगकाठीचा मुलगा त्या काळात सतत नजरेला पडू लागला होता. गबाळ्या शर्टाची खालीवर लावलेली बटणं आणि सतत कुल्ल्यांपर्यंत गळणारी चड्डी घालणार्‍या त्या लंबुळक्या मुलामध्ये काहीतरी खासं चुंबकत्व होतं. मी तेव्हा शिशुवर्गात जायला सुरुवात केली होती. शाळेतून एकदा का परतलं, की समवयीन मुलांसोबत दिवसभर घराजवळच्या वाडेवाड्यांमधून भटकण्याव्यतिरिक्त त्या काळात जिवाला काही विरंगुळा नसे. याच काळात कधीतरी एक लक्षवेधी घटना घडली. दुपारच्या जेवणानंतर सहस्रबुद्ध्यांच्या बागेतल्या बकुळीखाली जमून मातीतले खेळ खेळणार्‍या आम्हा मुलांची संख्या हळूहळू रोडावू लागली. आधी येईनासे झाले ते पिंगळ्यांचे अजय-विजय, मग हळूहळू रमेश शहासने आणि मोती ओसवाल यांनी बकुळीखाली जमणं बंद केलं. पाठोपाठच बन्सीशेठचा नंदकिशोर आणि परखांचा गुणवंत. बकुळीखालचा कोरम कमी होऊ लागला आणि सहस्रबुद्ध्यांची बाग ओकीबोकीशी वाटू लागली. एरवी त्या अर्ध्या एकरातल्या बागेतल्या चिमण्यांचा चिवचिवाटही दडपून टाकणारा आम्हा लहान मुलांचा कलकलाट हळूहळू कमी होत गेला. दुपारची जेवणं झाल्यानंतर कधी एकदा बागेत जातो याचा ध्यास घेतलेली सगळी मुलं आताशा बागेत फिरकतही नाहीत यामागचं रहस्य काही फार काळ दडून राहिलं नाही. सहस्रबुद्ध्यांच्या बागेतून आपला मुक्काम आता सगळ्यांनी जिताडेबाबांच्या गोठ्यात हलवला होता. या निष्ठाद्रोहामागचा खरा सूत्रधार महाद्या भगताचा नातू आहे आणि त्याचं नाव खंडू आहे हे कळताच खरं तर मला खंडूचा दु:स्वास वाटण्याऐवजी त्याच्याविषयी कुतूहलच जास्त वाटलं. ह्या महाद्या भगताच्या नातवात एवढं काय आहे, की सगळी पोरं बकुळीखाली खेळायचं सोडून जिताडेबाबांच्या गाईम्हशींच्या शेणामुताचा वास घोंघावणार्‍या गोठ्यात जातात, हे पाहण्यासाठी एके दुपारी मीही जिताडेबाबांच्या गोठ्याच्या कुंपणाशी रेंगाळलो. मुळात जिताडेबाबांचा गोठा म्हणजे जवळपास पावेक एकरात वसलेली जागा. जिताडेबाबांचं घर आणि गोठ्यात जेमतेम माणसा-दोन माणसांएवढ्या रुंदीचा बोरकर चौकाकडे जाणारा रस्ता. गोठा तसा मोकळा. माती आणि कारवीच्या काठ्यांनी गाईम्हशी राहण्यासाठी बांधलेलं ढोरघर. सोबतीला गाईम्हशींना खाण्यासाठी पेंढा साठवायला बांधलेली दोन मचाणं, याव्यतिरिक्त जिताडेबाबांचा गोठा तसा ओसाडच असायचा. पहिल्या पावसानंतर बरेचदा गोठ्यात टाकळ्याची गुडघाभर उंचीची रोपं उगवायची. पुढे काही वर्षांनंतर तिथे निर्वासित म्हणून आलेल्या, पुरुष-पाऊण पुरुष वाढणार्‍या बेशरमीच्या रोपांनी या मूळनिवासी टाकळ्याला गोठ्यातून हद्दपार करून टाकलं. पुढे हा टाकळा बांभरुटाच्या पाल्यासोबत जिताडेबाबांच्या गोठ्याच्या कुंपणावर एखाद्या आश्रितासारखा कालपरवापर्यंत वाढत राहिला. काही वर्षांपूर्वीच जिताडेबाबांच्या सदोबानं राहत्या घरासोबत त्यांचा गोठाही बिल्डरकडून डेव्हलप करून तिथे रहिवासी इमारत बांधवली. त्यामुळे आता गोठाही नाही. घुसखोर बेशरमही नाही आणि स्वत:च्याच भूमीतून हद्दपार झालेला टाकळाही नाही.

जिताडेबाबांच्या गोठ्याला पूर्वी कारवीच्या काठ्यांची, वरून शेणाचं सारवण दिलेली अत्यंत लोभस अशी वही (कुंपण) घातलेली असायची. पुढे कारवीच्या काठ्यांची जागा करवंदांच्या दाट आणि घट्ट झुडुपांपासून बनलेल्या कुंपणानं घेतली. गोठ्यातल्या चार मचाणांवर साठवून ठेवलेला पेंढा पाहून गावातल्या अनेक भटक्या गाईम्हशींच्या तोंडाला पाणी सुटायचं. अशावेळी काही धीट गाईम्हशी कसलाही मुलहिजा न बाळगता कुंपण तोडून आत घुसायचा प्रयत्न करायच्या. तो प्रयत्न कायमच अर्धयशस्वी ठरायचा. पण गाईम्हशींच्या या घुसखोरीमुळे कारवीच्या काठ्यांनी तयार केलेल्या वहीचं मात्र नुकसान व्हायचं. हे नुकसान टाळण्यासाठीच मग जिताडेबाबांनी एके वर्षी कारवीच्या काठ्यांची वही काढून गोठ्याला करवंदाचं काटेरी कुंपण घातलं. या घट्ट काटेरी कुंपणामुळे गाईंची घुसखोरी थोड्याफार प्रमाणात का होईना, पण कमी झाली.

त्या दुपारी याच काटेरी करवंदांच्या जाळीदार कुंपणातून मी आत पाहिलं, तेव्हा मला बकुळीशी द्रोह करून जिताडेबाबांच्या गोठ्यात जमलेली सगळी मुलं दिसली. गोठ्यातल्या जिताडेबाबांच्या मोती गाईभोवती सगळी मुलं गराडा करून उभी होती, आणि त्या मुलांच्या मध्ये, गाईच्या आचळाला हात लावत एक साधारण आमच्याच वयाचा मुलगा चरवीत दूध काढत बसला होता. चरवीत दूध काढता काढता तो मध्येच मोतीचं आचळ तिरकस फिरवत दुधाची धार कुणा मुलाच्या तोंडावर मारत होता. मुलं हसत होती, खिदळत होती. एरवी गावात जिताडेबाबांची मोती गाय मारकुटी गाय म्हणून प्रसिद्ध पावली होती. रस्त्यावरून मोती येताना दिसली की आमच्या वयाचं कुणीही त्या काळात रस्ता बदलून आडवाट पकडणं पत्करत असे. हा नियम निव्वळ लहान मुलांसाठीच नव्हता, तर त्या काळातले पूर्ण वाढ झालेले बाप्येही समोरून मोती येताना दिसली, की क्षणभर थबकत, थांबत मोतीच्या एकूण मनस्थितीचा आढावा घेत आणि मगच आपली पुढची वाट ठरवत. मान खाली घालून चालण्याची मोतीची स्वतंत्र अशी एक शैली होती. त्या मान खाली घालून चालण्याच्या पद्धतीमुळे मोती कायम शिंग उगारून अंगावर धावून येण्याच्या आविर्भावात आहे असा आभास होई. गावातल्या कोणत्याही गुराच्या गळ्यात त्या काळी मालकाने घंटा बांधली नव्हती. अर्थात मोती याला अपवाद होती. मोतीच्या गळ्यात जिताडेबाबांनी महादेवाच्या देवळातली भलीथोरली घंटा बांधलेली. मागे कधीतरी, म्हणजे माझ्या जन्माच्याही आधी गावातल्या महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि देवळाचं नूतनीकरण झालं, तेव्हा देवळातल्या जुन्या घंटा बदलून नव्या घंटा बसवण्यात आल्या. त्या जुन्या घंटांपैकीच एक घंटा जिताडेबाबांनी देवळाचा विश्वस्त असण्याचा अधिकार वापरून मोतीच्या गळ्यात बांधली. या जाडसर आणि वजनदार घंटेमुळे मोतीची मान कायमची खाली गेली आणि स्वभाव वाकडा झाला. मोतीच्या गळ्यातल्या या घंटेचा नाद त्या काळात वेळीअवेळी गावात कधीही आणि कुठेही निनादत असे. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र अगदी वेळकाळ कशाचाही मुलाहिजा न बाळगता मोतीच्या गळ्यातली ही घंटा सतत ‘जागते रहो’चा सतर्क नारा देत गावभर अव्याहत फिरत असायची. कित्येकदा कुणी देवळातली घंटा वाजवली, तरी देवळाशेजारून जाणारी व्यक्ती थबकून इतरत्र नजर फिरवत जवळपास कुठे मोती तर नाही, असा अदमास घेत असे. मोतीच्या तुसड्या आणि मारकुट्या स्वभावामुळे गावातल्या जवळपास प्रत्येक खोंडाने (वयात आलेला बैल) मोतीकडे दुर्लक्ष केलं. खरं तर रंगारुपाने देखणी असूनही निव्वळ गळ्यात बांधलेल्या घंटेमुळे सतत तुसडी, चिडचिडी आणि मारकुटी झालेली मोती गावातल्या खोंडांच्या नजरेपासून कायमच दुर्लक्षित राहिली. कुणा खोंडानं किंवा बैलानं कधी मोतीकडे मान वर करून पाहण्याची हिम्मत दाखवली नाही किंवा कधी कुठला खोंड-बैल मोतीच्या अंगाला अंग घासण्यासाठी तिच्याजवळ गेला नाही. अर्थात प्रत्येक नियमाला अपवाद असतो या न्यायाने मोतीच्या आयुष्यातही अपवाद आला. तो अपवाद होता सुभाष सुटेच्या माई गाईला झालेल्या काळ्या खोंडाचा. काळ्या बालपणापासूनच अंगापिंडानं धट्टाकट्टा होता. त्याचं सारं शरीर पीळदार होतं. त्याचं वशिंड पाहून एखाद्या पर्शियन बैलाची आठवण सहजच होई. शिवाय शिंगांची कमानही इतकी रेखीव की एखाद्या सोंदर्यवतीच्या कोरीव भिवयाच. आपल्या वासरूपणाची वेस काळ्यानं ओलांडली आणि तो गावात भटकू लागला तेव्हा त्याचं पहिलं लक्ष गेलं ते मोतीवरच. कभिन्न कृष्णवर्णीय काळ्याच्या आणि तजेलदार धवलवर्णी मोतीच्या हृदयाच्या तारा पहिल्या नजरेतच बहुधा छेडल्या गेल्या असाव्या. दोघांच्या वयात तसं एका पिढीचं अंतर. पण निसर्गधर्माच्या ओढीने दोघं एकमेकांजवळ आले. गळ्यातल्या घंटेच्या ओझ्यामुळे होणारी चिडचिड मोतीने आपल्या प्रेमालापाआड येऊ दिली नाही. यथावकाश मोती गाभण झाली. मोतीला छान गुटगुटीत, काळ्या रंगावर पांढरे ठिपके परिधान केलेली तीन वासरंही झाली. वासरं झाल्यावर तर मोतीचा मूळचा चिडचिडा स्वभाव अधिकच आक्रमक झाला. ती माणूस दिसताच दुरूनच शिंगे रोखून रागाने फुरफुरु लागली. क्वचित प्रसंगी खुराने जमीन उकरू लागली. आम्हा लहान मुलांनी तर त्या काळात मोतीच्याच नव्हे, तर जिताडेबाबांच्या गोठ्याजवळून जाण्याचाही धसका घेतला होता. अशा काळात मारकुट्या मोतीच्या नुसतं जवळ जाणारंच नव्हे, तर तिच्या आचळाला हात घालून तिचं दूध काढणारं आमच्याच वयाचं कुणीतरी आहे हे पाहताच माझा ऊर अभिमानाने फुलून आला. ती माझ्याच वयाच्या अल्याडपल्याड असणारी मूर्ती माझ्या बालमनात ठसून राहिली. खंडूकडे पाहताक्षणी खंडू माझा मित्र झाला.

महाद्या भगताचा हात धरून गावभर फिरणार्‍या खंडूची प्रतिमा आजही डोळ्यांसमोरून हलत नाही. ही प्रतिमा हळूहळू विस्तारत गेली ती गोष्ट वेगळी. महाद्या भगताचं बोट धरणारा खंडूचा हात पुढे भगताच्या खांद्याला धरून त्याला आधार देता झाला. म्हणता म्हणता भगताच्या गुडघ्यापर्यंत लागणारी खंडूची उंची धावत्या वयासोबत वाढत वाढत जाऊन पुढे आपल्या आज्याला म्हणजेच महाद्या भगताला उचलून घेत एखाद्या लहान मुलाप्रमाणे कडेत घेऊन झुलवू शकेल एवढी वाढली. खंडू उंच नव्हता. तो अतिउंच होता. आम्ही शालेय जीवनाच्या अगदीच अलीकडल्या वयात असताना खंडूचा काका रामा भगत हायवेवरच्या एका अपघातात दगावला. काका गेल्यानंतर खंडूनं डोक्यावरचे सारे केस उतरवले. त्या काळात वयाच्या मापदंडात न बसणारी वाढीव उंची, किंचित लांबुळके कान, तरतरीत नाक आणि डोक्याचा केलेला गोटा यामुळे खंडू अगदी हुबेहूब एखाद्या परग्रहवासियासारखा दिसे. पुढे खंडूचे केस वाढले. पण वाढताना त्या केसांनी प्रमाणबद्धतेची ऐशीतैशी केली. खंडूचं डोकं शहाळं सोलून काढलेल्या नारळासारखं एका बाजूने सोलीव तुळतुळीत, तर दुसर्‍या बाजूने नारळाच्या शेंडीसारखं दिसू लागलं. खंडूच्या भुवयाही जन्मत:च कोरीव आणि वळणदार होत्या. नंदा, साधना, बबितासारख्या त्या काळातल्या भुवईदार नट्यांनी लाजून मान खाली घालावी अश्या. त्या भुवयांना खाली दोर बांधून त्यांचा धनुष्यबाण तयार करता येईल अशी काहीशी अगम्य कल्पना आमच्या वर्गातला वसंत बापट खंडूकडे पाहून अनेकदा मांडे. लहानपणापासूनच खंडूला भटकायला आवडायचं. खंडूच्या भटकण्याच्या वृत्तीला भटकंती हा शब्द वापरायला मात्र मी धजावणार नाही. भटकंती वेगळी, भटकेपण वेगळं आणि खंडूचं भटकणं वेगळं. पहाटेचा ब्रह्ममुहूर्त, टळटळीत मध्यान्ह, किंवा करकरीत तिन्हीसांज – कोणत्याही वेळी गावातल्या कोणत्याही कानाकोपर्‍यात अवचित दृष्टीस पडणं किंवा अवतरणं हा खंडूचा स्थायीभाव होता. खंडूला भीती अशी कोणत्याही गोष्टीची नव्हती. पावसाळ्यात रौद्ररूप धारण केलेल्या नदीत उडी मारणं असो, किंवा रात्रीअपरात्री गावातल्या कोणत्याही चौका-तिठ्यावरून घुटमळत फिरणं असो. एरवी गाव जी गोष्ट करताना क्षणभर का होईना विचार करेल ती खंडू कसलाही आगापिछा न पाहता बिनधास्त करून मोकळा व्हायचा. माट्यांच्या तळ्याचं पाणी पावसाळ्यात दुथडी भरून वाहू लागलं, की ते रामटेक्यांच्या ओहोळापर्यंत सोडण्यासाठी फार पूर्वी गावानं तळ्याच्या बांधाला दोन भलेमोठाले पाईप जोडून एक चांगला आठ-दहा पुरुष लांबीचा भुयारी जलमार्ग तयार केला होता. उन्हाळ्यात तळ्याचं पाणी आटलं, की रात्रीच्या वेळी गावातले चरसी, गांजेटे बरेचदा याच भुयारात बसून ब्रह्मानंदी टाळी लावत. दुपारनंतर गावातले निवांतवीर याच पाईपात आपला रमीचा अड्डा जमवत. या पाईपांत रिकामी जागा पाहून इतरही अनेक नैतिक, अनैतिक, न-नैतिक व्यवहार चालत. उन्हाळ्याची सुट्टी पडल्यानंतर आम्ही मुलंही याच भुयारी जलमार्गात ठिय्या मांडून बसत असू – कधी गोट्या खेळत, कधी करवंदं-कैर्‍या खात तर कधी नुसतंच स्वप्नरंजन करीत. पण जसजसा पावसाळा जवळ येई, आणि जसजसं बाहेरचं वातावरण अधिकाधिक मलीन आणि अंधारं होत जाई, तसतसा गावाचा या भुयारातला वावर कमीकमी होत जाई. पावसाचे ढग भरून येऊ लागले की भुयारातला पूर्वापार अंधार जास्तच घट्ट आणि गर्द वाटत असे. एकदा का पाऊस सुरू होऊन तळं भरलं, की पुढचे सहा महिने हा भुयारी मार्ग पूर्णत: जलमय होऊन तिथला मनुष्यवावरच संपूर्णत: बंद होत असे. आषाढातल्या एका करवंदी संध्याकाळी केवळ मन्या सुटेनं लावलेल्या पैजेखातर खंडूनं माट्यांच्या टम्म भरल्या तळ्यात उडी घेतली आणि पाण्यात बुडी मारून तो त्या भुयारी पाईपमार्गाने रामटेक्यांच्या ओहोळात उतरलेला मी ‘याचि देहि याचि डोळा’ पाहिला! खंडूचं हे धाडस कल्पनातीत होतं. गावातल्या थोर्‍यामोठ्यांनीही ही घटना ऐकल्यावर तोंडात बोटं नव्हे, तर उभा हात घातला. आपल्या रांगड्या, तिरपागड स्वभावासाठी आणि आडनिड्या धीटपणासाठी प्रसिद्ध असलेला सुभ्या सुर्वे ही घटना ऐकून इतका अस्वस्थ झाला, की त्यानं खंडूला पुन्हा एकदा ते प्रात्यक्षिक करायला लावलं. खंडूनं ते धाडसी प्रात्यक्षिक पुनश्च करून दाखवलं आणि ते पाहण्यासाठी तळ्याशी जमलेल्या उभ्या गावाचे डोळे पांढरे केले. खंडू भुयारी पाईपमार्गाच्या दुसर्‍या बाजूने म्हणजेच रामटेक्यांच्या ओढ्याच्या बाजूने बाहेर पडला आणि सुभ्याने तात्काळ स्वत:चा सदरा काढून तळ्यात उडी घेतली. तोवर गावात सुभ्या सुर्वेच्या नावावर अनेक साहसगाथा होत्या. जंगलात म्हणे एकदा त्याने बिबट्याला पिटाळून लावलं होतं. घरात शिरलेला दहा फुटी नागराज त्याने शेपटाला धरून गरगर फिरवत जमिनीवर आपटून आपटून मारला होता. सुभ्या सुर्वे मोठ्या शाळेमागे लावलेल्या निलगिरीच्या झाडावरही चढला होता म्हणे. सुभ्या सुर्वे गावाच्या धैर्य, धाडस आणि निधडेपणाचं एक जिवंत प्रतीक होता. भर पावसाळ्यात जलमय झालेल्या भुयारी पाईपमार्गाद्वारे तळ्यातून पलीकडे रामटेक्यांच्या ओढ्यात निघणं हा सुभ्यासाठी साहसप्रदर्शनाचा एक अनोखा मार्ग होता. सुभ्यानं ही संधी बिलकुल दवडली नाही. मागचा-पुढचा कसलाही विचार न करता सुभ्यानं तळ्यात उडी घेतली, पण खंडूनं साधलेली करामत काही सुभ्याला साधता आली नाही. सुभ्यानं हे आव्हान पार पाडण्यासाठी चार वेळा पाण्यात बुडी मारली खरी, पण चारही वेळा तो भुयारी पाईपाशी जाऊन हार मानत पुन्हा पाण्याच्या पृष्ठभागाशी येऊन मोठमोठ्याने श्वास घेता झाला. भुयारी जलमार्गातला किण्ण शेवाळी हिरवट काळोख सुभ्याच्या पराक्रमातला मुख्य अडसर ठरला. सुभ्या जसजसा त्या भुयारी पाईपाच्या मुखाशी पोहोचत होता तसतसा पाण्यातला अंधार अधिकच तीव्र होत दृष्टी अंध करून टाकत होता. शेवटी सुभ्यानं माघार घेतली. तळ्याबाहेर येताच सुभ्यानं खंडूच्या पाठीवर शाबासकीची एक थाप दिली, मग पंच्यानं अंग पुसत सदरा अंगावर घालून सुभ्या मुकाट परीट आळीची वाट चालू लागला. भर पावसाळ्यात भुयारी जलमार्गाने पलीकडल्या बाजूला निघण्याचा पराक्रम हा गावातल्या एकट्या खंडूच्या नावावर अबाधित राहिला, तो आजतागायत. खंडूच्या अश्या अनेक कीर्ती वडिलांच्या कानावर पडल्या तेव्हा त्यांनी मला, “यापुढे खंडूसोबत फिरायचं नाही.” अशी सक्त ताकीद दिली; पण अर्थात खंडूच्या सहवासाच्या आकर्षणापुढे ही ताकीद फारच तकलादू ठरली. आपल्या दरडावून सांगण्याचा किंवा धमकीवजा दमाचा काही उपयोग होत नाही हे दिसल्यावर वडिलांनी पुढे आपली ताकीद “खंडूसोबत पार्वतीच्या माळावर किंवा गावाबाहेर जायचं नाही.” इतपत शिथिल केली.

महाद्या भगताला एकूण चार अपत्यं. दोन मुली आणि दोन मुलं. त्यात थोरली मंदा, मग कुंदा. त्यानंतर खंडूचा बाप लक्ष्मण आणि लक्ष्मणाच्या पाठीवर रामा. थोरल्या मुलाचं नाव लक्ष्मण आणि त्याच्या पाठीवर झालेल्या मुलाचं नाव रामा ठेवण्यामागे महाद्या भगतानी खरंतर कोणतंही तर्कट शोधलं नव्हतं. त्यांनी त्यांना तेव्हा सुचली आणि भावली तशी मुलांची नावं ठेवली. पण गाव अशा साध्या-सहज घटना तर्कहीन ठेवत नाही. अश्या गोष्टींना स्वत:चं तर्कट जोडल्याशिवाय गावाला समाधान मिळत नाही. महाद्या भगताच्या मुलांच्या अश्या असंगत नावांमागचं कारण शोधताना गावाने एक नवी कहाणी रचली. असं म्हणतात की, पहिल्या मुलीच्या पाठीवर दुसरा मुलगा व्हावा म्हणून भगतांनी रामाला नवस केला, की आता मुलगा झाला तर त्याचं नाव राम ठेवीन म्हणून. नवस करूनही जेव्हा दुसरी मुलगीच झाली, तेव्हा कुणीतरी त्यांना म्हटलं, की राम तर बंधूप्रेमी. त्याला स्वत:च्या नावाची काय फिकीर? त्यापेक्षा तू मुलगा झाला तर त्याचं नाव लक्ष्मण ठेवीन असा नवस कर. बंधूप्रेमापोटी राम वर देईलही. महाद्या भगतानी रामाला तसा नवस केला आणि दोन मुलींच्या पाठीवर महाद्या भगताला मुलगा झाला. त्याचं नामकरण भगतानं मोठ्या थाटामाटात लक्ष्मण असं करवलं. योगायोगानं महाद्या भगताला तीन अपत्यांच्या पाठीवर चौथाही मुलगाच झाला, तोही नेमका रामनवमीलाच. मग त्या मुलाचं नाव रामा ठेवण्यावाचून भगताकडे दुसरा पर्याय नव्हता. महाद्या भगताच्या घरी थोरला भाऊ म्हणून लक्ष्मण आणि धाकला म्हणून राम जन्माला यावा ही गावाच्या दृष्टीने खरोखरीच एक अभूतपूर्व घटना ठरली. थोरला लक्ष्मण चार यत्ता शिकला आणि कोकणातून शहराकडे सुरू झालेल्या अव्याहत स्थलांतराच्या रेट्यात थेट मुंबईत जाऊन पोहोचला. दादरच्या एका मोठ्या मिठाईच्या दुकानात हलवाई म्हणून कामाला लागला. असं म्हणतात, की कुरकुरीत आणि रसदार जिलेबी बनवण्यात त्या काळात लक्ष्मणचा हात धरणारं उभ्या दादरमध्ये कुणी नव्हतं. लक्ष्मणने चार पैसे गाठीला जोडले. गावाकडच्या घराची चांगली डागडुजी केली. महाद्या भगताला नवी सायकलही घेऊन दिली. एका सुट्टीत लक्ष्मण गावी आला असताना महाद्याने संधी साधून लक्ष्मणाचे दोनाचे चार हात करूनही टाकले. शेजारच्याच गावातल्या एका बर्‍यापैकी कुटुंबातल्या मुलीशी लक्ष्मणचं लग्न झालं. लक्ष्मण आपल्या नव्या नवरीला घेऊन मुंबईला गेला. दोघांचा राजाराणीचा संसार मोठ्या आनंदाने सुरू झाला. संसाराच्या या वेलीवर खंडू नामक फूलही उगवलं. पण माशी कुठे अन् कशी शिंकली कुणास ठाऊक! खंडूच्या जन्मानंतर पाच-सात वर्षांनी लक्ष्मण अचानक लहानग्या खंडूला घेऊन एकटाच गावी परतला. खंडूची आई, म्हणजेच लक्ष्मणची बायको त्याच्याच सोबत हलवाई म्हणून काम करणार्‍या एका राजस्थानी कारागिरासोबत घरदार, मूलबाळ सोडून पळून गेली होती म्हणे. खंडूच्या आयुष्यातल्या दुर्दैवाच्या दशावताराचा पहिला अध्याय तसं पाहता त्याच्या आईनं त्याच्या लहानपणीच लिहून ठेवला होता.

वयानं माझ्यापेक्षा वर्षा-दोन वर्षांनी मोठा असूनही खंडू दैवयोगाने माझ्याच वर्गात आला. त्या काळात वयानं चारचार-पाचपाच वर्षं मोठी असणारी मुलं इयत्तांच्या शिडीवर आपल्या अगदी पुढेमागे किंवा सोबत असणं ही काही फार नवलाईची गोष्ट नव्हती. पहिली-दुसरीत असताना महाद्या भगताचं बोट धरून वर्गात प्रवेश घेणारा खंडू मला आजही स्पष्ट आठवतो. खंडूला वर्गात आणल्यानंतर महाद्या शिदोरेबाईंशी दोन शब्द बोलला आणि मग त्याने वर्गभर इतस्तत: विखुरलेल्या मुलांकडे एक नजर फिरवली. माझ्याकडे नजर जाताच त्याने खंडूला पुढे लोटत म्हटलं, “बस तिथे.” आणि खंडू निमूट येऊन माझ्याशेजारी बसला. साक्षात मोती गाईच्या आचळाला हात घालणारा खंडू माझ्या शेजारी येऊन बसला हे पाहून माझा ऊर आनंदाने अक्षरश: भरून आला. मी हसून खंडूकडे पाहिलं, आणि खंडूनं माझ्याकडे. आमची नजरानजर झाली, पण खंडूच्या चेहेर्‍यावर कोणतेही भाव उमटले नाहीत. तो नुस्त्या कोर्‍या चेहेर्‍याने माझ्याकडे पाहात राहिला. काही दिवसांपूर्वी जिताडेबाबांच्या गोठ्यात बसून दुधाची धार आमच्या अंगावर उडवणार्‍या खोडकर खंडूचा लवलेशही त्याक्षणी त्याच्या चेहेर्‍यावर दिसत नव्हता.

धीरगंभीरपणा हा काही खंडूचा स्थायीभाव नव्हता, पण तो अधनंमधनं वेगळ्या जगात जात असे हेही नक्की. किंबहुना खंडूच्या स्वभावाइतके बहुविध पैलू एखाद्या मौल्यवान आणि जगद्‌विख्यात हिर्‍यालाही नसतील. दु:ख, हर्ष, खेद, खंत, आणि विस्मयादि भावभावना जणू काही खंडूच्या आत सातत्याने नांदत असत. एखाद्या जादूगाराने आपल्या पोतडीतून वेगवेगळ्या गोष्टी लीलया बाहेर काढाव्यात तसं खंडू या मानवी भावभावनांचं प्रदर्शन करण्यात वाकबगार होता. हे प्रदर्शन तो हेतुपुरस्सर करत नसे. यात कोणताही अभिनिवेश किंवा नाटकीपणाही नसायचा हेही नक्की. सकाळी आनंदाने ओसंडून वाहणारा खंडूचा चेहेरा दुपार होईस्तोवर एखाद्या आदिम आणि अनामिक दु:खाने पिचून जायला फार अवधी लागत नसे. एक उभी दुपार दु:खाचा मुखवटा ल्यालेला खंडू एका पावसाळ्यातल्या तिन्हीसांजेला नदीकाठी लुकलुकणार्‍या काजव्यांमागे अभूतपूर्व विस्मयाच्या ओढीने धावतानाही मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. खंडूचे हे भावनाबदल एखाद्या जनुकीय अपघाताचा परिणाम असतील किंवा नियतीने बालपणापासूनच खंडूच्या पदरी पाडलेल्या दुर्दैवाच्या दानाने आपला कार्यभाग साधला असेल. खंडूच्या या घडोघडीला बदलणार्‍या भावनाविष्कारांच्या मागे नेमकं काय कारण होतं याचा पाठपुरावा मी फारश्या गांभीर्याने कधीही केला नाही हे मात्र खरं.

खंडू वर्गात माझ्या शेजारी बसू लागला आणि खंडूच्या स्वभावाचे, भावनाप्रदर्शनाचे विविध पैलू मला अगदी जवळून पाहायला मिळाले. सुरुवातीच्या काळात खंडू बरेचदा त्याच्या दादरच्या घराच्या आठवणी सांगे – तिथली शाळा, तिथले मित्र, वडील काम करत असलेलं मिठाईचं दुकान. अश्या एक ना अनेक. या आठवणी जेव्हा कधी आईच्या आठवणींशी महिरपी कंस करीत तेव्हा मात्र खंडू एकाएकी आक्रसून जाई, पाठीत मान घालणार्‍या कासवासारखा स्वत:लाच आतल्या आत मिटून घेई. आईविषयी प्रश्न विचारल्यावर तो अगदी कोरड्या स्वरात म्हणे, आई पळून गेली. भाषेचा अदमास घेत ती अंगीकारण्याच्या त्या बालवयात हे वाक्य ऐकल्यावर माझ्या मनात खंडूच्या आईची जी प्रतिमा उभी राहायची ती अर्थबोधाच्या पातळीवर अगदीच बाळबोध आणि मूलभूत स्वरूपाची असे. त्या काळात ‘पळणं’ म्हणजे गुल झालेल्या पतंगीमागे धावणारी शेजारच्या मोहल्ल्यातली मुलं एवढीच प्रतिमा माझ्या डोळ्यांसमोर होती. आई पळून गेली असं खंडूने जेव्हा जेव्हा म्हटलं तेव्हा तेव्हा माझ्या चक्षुंसमोर शरीराची, जीवाची, स्थलकालाची पर्वा न करता पतंग पकडायला धावणार्‍या मुलांप्रमाणेच धपधप पावलं टाकत पळणारी खंडूची आईच कायम उभी राहिली. बालवयीन प्रश्नांच्या निर्हेतुक सरबत्तीत जेव्हा जेव्हा कुणी ‘तुझी आई का पळून गेली?’ असं खंडूला विचारलं, तेव्हाही त्याने ‘बा तिच्या अंगावर कोयता उगारून धावत गेला.’ असं उत्तर दिलं. खंडूच्या बापानं असं का केलं हे विचारल्यावर खंडूने तेवढ्याच रुक्ष स्वरात ‘आई पांडेकाकासोबत झोपली होती.’ असं भावनाहीन उत्तर दिलं. मुळात खंडूच्या आईने दुसर्‍या एका माणसासोबत झोपून एवढा काय मोठा गुन्हा केला, की खंडूच्या बापाने तिच्या अंगावर कोयता घेऊन धावून जावं, यामागचं कारण मला त्या बालवयात कधीही कळलं नाही. साधारणत: तिसरी चौथीत गेल्यावर वर्गातल्या वसंता बापटला तो अर्थ थोडाफार कळला आणि मी शाळेच्या पायरीवर ठेवलेल्या रांजणातलं पाणी पीत असताना त्याने तो मला सांगितला. अर्थात मला तो तेव्हाही कळला नाही. मग वसंतानं वैतागत मला विचारलं, की मागच्या आठवड्यात व्हिडीयो सेंटरवर लागलेला संजीव कुमारचा ‘कत्ल’ नामक सिनेमा मी पाहिला की नाही? त्या सिनेमाची गोष्टही खंडूच्या आई-बाबांच्या गोष्टीसारखीच होती म्हणे. मी तो सिनेमा पाहिला नव्हता म्हणून त्या सिनेमाच्या कथेचा आधार घेत वसंताने मला खंडूच्या वडिलांनी त्याच्या आईवर कोयता उगारून जाण्यामागचं कारण समजावून सांगितलं. खरंतर ते कारण वसंताला स्वत:लाही पुरतं कळलं नव्हतं; आणि वसंताने समजावून सांगण्याचा प्रयत्न करूनही मला बिल्कुलच कळलं नाही. पण त्या घटनेनंतर माझ्या मनात संजीव कुमारचा ‘कत्ल’ पाहण्याची एक अनामिक उत्सुकता रुजली. त्या उत्सुकतेचं रोप झालं. ते फोफावत गेलं. शेवटी अकरावी-बारावीत गेल्यावर कधीतरी ‘कत्ल’ पाहण्याचा योग अवचित जुळून आला. अर्थात तोवर माझ्या मनातल्या उत्सुकतेच्या रोपाला अर्थांची अनेक फळं आली होती.

बालवय ते जाणतं वय हा प्रवास काही शाळेतल्या इयत्तासांरखा नसतो की शिडीवरल्या पायर्‍यांसारखाही नसतो. या प्रवासाचे टप्पे इयत्तांसारखे किंवा पायर्‍यांसारखे अधोरेखित करता येत नाहीत. पांडेकाकाच्या शेजारी झोपून खंडूच्या आईने एवढा काय मोठा गुन्हा केला, की त्याच्या बापाने तिच्या अंगावर कोयता उगारून धावून जावं? हा माझ्या मनाला पडलेला प्रश्न वाढत्या वयागणिक हळूहळू विरळ होत गेला. या प्रश्नाचं उत्तर वाढत्या वयाच्या प्रवासात कधी तरी कुठे तरी मिळूनही गेलं असेल, पण ते मिळाल्याची रीतसर नोंदही कधी आठवणींनी ठेवण्याइतकं महत्त्व मी त्या घटनेला दिलं नाही. अर्थात ही झाली माझ्यासारख्या त्रयस्थ व्यक्तीची प्रतिक्रिया. पण साक्षात ज्या खंडूच्या आईच्या बाबतीत ही घटना घडली, त्या खंडूला या घटनेचा कार्यकारणभाव जेव्हा सर्वप्रथम समजला असेल, तेव्हा त्यावर त्याची काय प्रतिक्रिया झाली असेल याचा अंदाज, एक मित्र म्हणून खंडूला आठवताना मला यत्किंचितही बांधता येत नाही. मुळात या घटनेचे अन्वयार्थ सांगणारा तो क्षण खंडूच्या आयुष्यातला एकमेव क्षण असेल? का कलाकलाने वाढत जाणार्‍या वयाच्या चंद्रकोरीने क्षणोक्षणी पूर्णचंद्राकडे जाणार्‍या त्या घटनेचा पूर्ण वाटोळा अर्थ खंडूच्या लक्षात आणून दिला असेल? अर्थात, जाणत्या वयाकडे नेणार्‍या प्रत्येक टप्प्यावर, बालवयात घडलेल्या त्या घटनेचे घाव खंडूला वेळोवेळी सहन करावे लागले असतीलच. या घटनेच्या वेळोवेळी लागत गेलेल्या अधिकाधिक गहन अन्वयार्थांनीच बहुधा खंडूला वयात आल्यावर विवाहित दांपत्यांच्या खिडक्यांमधून डोकवायला भाग पाडलं असेल का? हा प्रश्न खंडूचं आख्यान लिहिण्याच्या निमित्ताने माझ्या मनात डोकावल्याविना राहत नाही.

किंबहुना, खंडूविषयक एकूणच आठवणींचा धांडोळा घेताना असं लक्षात येतं, की खंडूला गावाकडून जेवढ्या उपाधी मिळाल्या तेवढ्या इतर कुणालाही मिळाल्या नसाव्यात. गाव उपाधी देण्यात जेवढं तत्पर असतं तेवढंच चोखंदळही असतं. या पार्श्वभूमीवर निव्वळ खंडूच्या उपाधी आणि त्याच्या आयुष्यातल्या घटना यांची सांगड घातली तरी बहुरंगी प्रकाशझोतांनी एखादा रंगमंच उजळावा तसं खंडूचं आयुष्य उजळून निघू शकेल. अर्थात या प्रकाशझोतातले रंग हे हर्ष, खेद, राग, लोभ, विस्मय, खंत आदि मानवी भावभावनांपासून बनलेले असतील हेही नक्की.

साधारणत: आम्ही सातव्या यत्तेत जाईस्तोवर खंडू उभ्या शाळेत ‘स्मगलर खंडू’ या नावाने ओळखला जाऊ लागला. शाळा सुटल्यावर इतर मुलांची वर्गाबाहेर पडण्यासाठी जी झुंबड उडे, त्याला खंडू अपवाद होता. शाळा सुटल्याचे टोल पडताच खंडू अधीर न होता सावध होत असे. सगळी मुलं बाहेर पडल्यावर उभ्या वर्गभर एक नजर फिरवून मुलांच्या दप्तरातून खाली पडलेल्या जिनसा ताब्यात घेण्याकडेच त्याचं सारं लक्ष असायचं. कुणाची पट्टी, कुणाची पेन्सिल, कुणाचा रंगीत खडू आणि क्वचित, अगदीच दैवानं साथ दिली तर कुणाच्या दप्तरातून खाली पडलेल्या विलक्षण रंगसंगती आणि चित्ररचनांच्या छापा!

छापा म्हणजे आगपेटीच्या खरखरीत कडा फाडून उरलेले दोन छोटेखानी दर्शनी पत्ते! त्या काळात आम्हा लहान मुलांमध्ये या छापांचं प्रचंड आकर्षण होतं. सहसा राजस्थान-गुजराथ भागात बनणार्‍या आगपेट्यांवर वेगवेगळी आकर्षक चित्रं असत. वर्गातल्या गुजराथी-मारवाडी मुलांच्या दप्तरातून या अशा रंगीबेरंगी छापा वेळीअवेळी बाहेर डोकवायच्या. खंडूचं सारं लक्ष या छापांवर असे. अशा छापा गोळा करून, प्रसंगी चोरून त्या जहरू मोहल्ल्यातल्या रझाक रंडीला द्यायच्या आणि त्या मोबदल्यात त्याच्याकडून गोट्या किंवा क्वचित एखादी छोटी पतंग घ्यायची हा खंडूचा आवडीचा उद्योग. या प्रकारची तस्करी खंडूने साधारणत: तिसर्‍या-चौथ्या यत्तेपर्यंत केली. त्यानंतर खंडूने आपल्या तस्करीचा माल बदलला. पाचवीत गेल्यानंतर खंडूने मिलन सुपारी सदृश गोड बडीशेपेच्या छोट्या पाकिटांतून मोफत मिळणार्‍या सिनेमांच्या स्टिकर्सची तस्करी सुरू केली. ही अशी स्टिकर्स जमवायची आणि मोहल्ल्यातल्याच वेगवेगळ्या वयातल्या मुलांना विकायची. त्या काळात मुस्लीम मोहल्ल्यातल्या आमच्या वयाच्या मुलांमध्ये सिनेमाचं आकर्षण अंमळ जास्त होतं. बरेचदा खंडू शहासन्यांच्या किराणा मालाच्या दुकानाच्या मागच्या गोदामात जाऊन वर्तमानपत्रांची रद्दी चिवडत बसे. शहासन्यांकडे उभ्या भारतभरातली रद्दी येई. त्यात वेगवेगळ्या भाषेतली नियतकालिकं, वर्तमानपत्रं असत. खंडूचा बाप लक्ष्मण दादरहून आपला बाडबिस्तारा गुंडाळून गावी परतला तो सुरुवातीला काही काळ शहासन्यांच्या किराणा मालाच्या दुकानात कामाला लागला. त्यामुळे खंडूला शहासन्यांच्या गोदामातल्या रद्दीरूपी खजिन्याच्या गुहेत मुक्त प्रवेश होता. त्या रद्दीत खंडूला अनेक दुर्मीळ रत्नं सापडली. ‘बारह आना’ अशी किंमत लिहिलेला जुन्या ‘मायापुरी’ अंकांचा एक भलामोठा गठ्ठा खंडूने एके दुपारी आमच्याच ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम करणार्‍या आणि गावभर मॅटिनी महंमद म्हणून ओळखल्या जाणार्‍या मोहम्मदसमोर ठेवला तेव्हा त्याचे हरखून चमकणारे डोळे मला ‘जमाने को दिखाना है’ सिनेमातल्या ऋषी कपूरच्या ओंजळीतल्या हिर्‍यांसारखे भासले होते. त्या काळात हिंदी सिनेमात हिरे दिसले की एक विशिष्ट प्रकारचं पार्श्वसंगीत वाजे. दुपारच्या त्या रुक्ष वेळीही मोहम्मदच्या डोळ्यांत वाजलेलं ते हिरणमयी पार्श्वसंगीत आजही माझ्या कानात ताजं आहे. मोहम्मदने खिशातून दहा रुपयांची करकरीत नोट काढून खंडूच्या हातात दिली आणि तो गठ्ठा घेऊन तो एखाद्या विजयी वीरासारखा घराचा रस्ता चालू लागला. पुढची अनेक वर्षं मोहम्मदने मायापुरीच्या त्या अंकांच्या पानांतून विहरण्यात घालवली. हिंदी सिनेमाचा नायक बनण्याची मोहम्मदची अपुरी राहिलेली इच्छा त्याने त्या कागदावर छापलेल्या मायानगरीत रममाण होऊन भागवली. ‘षटकार’, ‘चौकार’, ‘क्रीडांगण’ असे अनेक अंक खंडूने आमच्या क्रिकेटप्रेमी गणिताच्या सरांना, म्हणजेच रमाकांत पाटलांना त्या काळात मुबलक प्रमाणात पुरवले आणि त्यांची विशेष मर्जी संपादन करून घेतली. तस्करीच्या या धंद्यात खंडूने स्वत: नेमकं काय कमावलं माहीत नाही, पण शहासन्यांच्याच रद्दीच्या गोदामातून खंडूने मला मिळवून दिलेल्या ‘इंद्रजाल कॉमिक्स’मधून मी जे काही कमावलं त्याची गणती आकड्यांत किंवा शब्दांत मांडता येणार नाही हे नक्की.

अगदी नीट आठवायचं म्हटलं, तर ‘मुतर्‍या खंडू’ या नावाने खंडू ओळखला जाऊ लागला तो आम्ही साधारणत: सातव्या इयत्तेत असताना. आळीच्या गोविंदा पथकात त्याचा शिडशिडीत बांधा आणि थर चढून जाण्यातली त्याची चपळाई पाहून मोठाल्या बाप्यांच्यात खंडूची निवड झाली होती. आमच्या वयाच्या कुणाची तरी निवड आळीतल्या मोठ्या बाप्यांच्या गोविंदा पथकात झालेली पाहून आम्हाला त्या काळात कोण अप्रूप वाटलं! त्या वर्षीच्या गोपाळकाल्याच्या दिवशी आळीने दुपार होईस्तोवर गावातल्या छोट्यामोठ्या दोन-तीन हंड्या फोडल्या होत्या. सरदार चौकातली मानाची हंडी फोडण्याचा मानही आमचीच आळी पटकावणार याविषयी कुणाच्याही मनात शंका नव्हती. त्यावर्षी चौकातल्या हंडीला बक्षीसही मोठं होतं आणि हंडीची उंचीही वाढवलेली. इतर एक-दोन आळ्या सरदार चौकातली हंडी फोडण्यात अयशस्वी ठरल्यावर आमची आळी पुढे सरसावली. हांहां म्हणता पहिला थर लागला. पहिला थर दशरथ लाड, मानसिंग परदेशी, रतन राऊत अश्या रुंद अंगापिंडाच्या बाप्यांचा लागला. दुसर्‍या-तिसर्‍या थराला थोडे काटक पुरुष, चौथ्या तीन आणि पाचव्या दोन पुरुषांच्या थराला नुकतीच कॉलेजात जाऊ लागलेली आमच्याच आळीतली पोरं उभी राहिली. पाच थरांच्या या मानवी मनोर्‍याकडे खंडूने एक नजर टाकली आणि पहिल्या थराला उभ्या मानसिंग परदेशीच्या कंबरेवर आधी आपला डावा पाय मग खांद्यावर उजवा पाय टाकत खंडू तो मानवी मनोरा डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच सपासप चढून गेला. पाचव्या थराला उभ्या मोहन सरदार आणि रंजन रोडे यांच्या अंगाखांद्यावरून वर चढत खंडूने जेव्हा दोरीला बांधलेली हंडी गाठली, तेव्हा खाली जमलेल्या गर्दीने टाळ्याशिट्यांचा अभूतपूर्व कडकडाट केला. गावातल्या सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या सरदार चौकात बांधलेल्या हंडीला खंडूने स्पर्श केला तेव्हा माझा ऊर खंडूविषयीच्या अभिमानाने फुलून आला. सरदार चौकातल्या चारही रस्त्यांवरून गावातली बाजारपेठ अरुंद, चिंचोळी आणि गर्दी करून पसरलेली आहे. सगळीच घरं माडीची – खाली दुकान आणि माडीवर निवास अशी व्यवस्था असणारी. सहसा चौकातून गणेशविसर्जनाची मिरवणूक, कुणाच्या लग्नाची वरात किंवा देवदेवतांची पालखी निघाली, तर इथे राहणार्‍या व्यापार्‍यांची कुटुंबं माडीवरच्या खिडकीत येऊन उभी राहत आणि वरून हा सगळा गर्दीदार सोहळा अनुभवत. खंडूने पाच थरांवर उभं राहत जेव्हा सरदार चौकातल्या हंडीला स्पर्श केला, तेव्हाही अशीच गर्दी बाजारपेठेतल्या माड्यांवरच्या खिडक्यांमध्ये जमून हे सगळं पाहत होती. प्रत्येकाचीच नजर खंडूवर होती. खंडूने हंडीला स्पर्श करत मनोभावे नमस्कार केला आणि – मला आजही स्पष्ट आठवतं – खंडू मिश्किल हसला. मी बन्सीशेठच्या माडीवर उभा राहून त्या वर्षीचा गोपाळकाला पाहात होतो. बन्सीशेठचा किशोर माझ्याच वर्गात शिकणारा. त्यामुळे त्यांच्या घरात मला मुक्त प्रवेश असे. मुळात हंडी बांधलेल्या रस्सीचं एक टोक बन्सीशेठच्या खिडकीच्या कठड्यालाच बांधलेलं. त्यामुळे हंडीच्या अगदी तोंडाशी उभ्या खंडूचा चेहेरा मला खिडकीतून पाहताना सिनेमातल्या नायकाच्या क्लोजअपसारखा स्पष्ट दिसत होता. खंडूचं हसणं मिश्किल होतं. हसता हसता खंडूने किंचित डोळे मिटले, हलकं स्मित करताना विलग झाल्या ओठांतून एक तेवढाच हलका सुस्कारा सोडला. खंडूने डोळे मिटले आणि मिटलेलेच ठेवले. एवढ्यात खंडूच्या पायाखाली पाचव्या थराशी उभ्या रंजन रोडेने खंडूला एक अर्वाच्य शिवी दिली. पाठोपाठच रंजनच्या पायाखाली उभ्या पप्पू चिलेने ‘थू थू’ करत काही तरी थुंकल्यासारखं केलं आणि खांद्याने ओठ पुसण्यासाठी तो किंचित हलला. पाठोपाठच आधी पप्पू चिले, मग रंजन रोडे आणि मग हंडीशी उभा खंडू असा टोकाचा थर ठपकन खाली कोसळला. क्षणभर सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला आणि मग उभी बाजारपेठ व्यापून टाकणारा एक निराशेचा उद्गार सर्वत्र उमटला. खाली पडलेल्या रंजन रोडे, पप्पू चिले आणि खंडू यांना उचलायला लोक धावले आणि मग सर्वत्र एकच गोंधळ उडाला. खाली पडलेल्या पप्पू चिलेने उठल्याउठल्या खंडूला बुकलायला सुरुवात केली. मागोमाग रंजननेही खंडूला लाथा घातल्या. कुणालाही काही कळेना. शेवटी कसंबसं लोकांनी पप्पू आणि रंजनपासून खंडूला दूर केलं. रात्री आमच्या घराच्या ओसरीवर बसून रंजन रोडेने खंडूला शिव्यांची लाखोली वाहत घडली घटना जमलेल्या लोकांना सांगितली. खंडू हंडीशी पोहोचताच, खंडूला आधार देऊन खाली उभ्या रंजनला खांद्यावरून एक उष्ण ओहोळ वाहत खाली पाठीपर्यंत जाताना जाणवला. दिवसभर गाव फिरून, पावसात भिजून, लोकांनी अंगावर टाकलेल्या पाण्यात न्हाऊन आधीच गार पडलेल्या रंजनच्या शरीराला त्या ओहोळाचा उबदारपणा न जाणवता, तरच नवल! क्षणात तो उष्ण ओहोळ रंजनच्या पाठीपासून पायामार्गे खाली उभ्या पप्पू चिलेच्या केसांतून ओठांपर्यंत पोहोचला. त्या उष्ण ओहोळाची चव आणि गंध कळताच पप्पूचा कधीपासून सावरून धरलेला तोल ढळला आणि पप्पू, सोबत रंजन, सोबत खंडू आणि सोबतच त्या वर्षीची सरदार चौकाची हंडी फोडण्याचं आमच्या आळीचं स्वप्नही खाली कोसळलं. तो ओहोळ दुसरा तिसरा कसला नसून खंडूच्या मूत्राचा होता. खंडूने वर चढल्यावर डोळे मिटून ओठ विलग करत, आतापर्यंत रोखून धरलेल्या मूत्राशयाच्या धरणाचे बांध मोकळे करत आतल्या प्रवाहाला मुक्त वाट करून दिली होती. त्या दिवसापासून खंडूला नवं नाव मिळालं – मुतर्‍या खंडू. ही घटना घडल्यावर काही दिवसांनी मी खंडूकडे विषय छेडला तेव्हा तो एक वेगळंच विकट हसू हसत मला म्हणाला, “याला म्हणतात गावावर मुतणं.”

गावावर मुतण्याची एवढी मोठी आकांक्षा खंडूने उरी बाळगण्याचं मुळात कारण तरी काय होतं, हे मला कधीही कळलं नाही. पण खंडू असाच गुंतेदार पद्धतीने वाढत गेला, मोठा झाला. खंडूला मी खोडकर म्हणणार नाही, गमतीदार तर नाहीच नाही. खंडूचं उभं व्यक्तिमत्व धुतल्या तांदळासारखं स्वच्छ कधीच नव्हतं, पण त्याच्या व्यक्तिमत्वात तांदळातल्या खड्यासारखी कचही नव्हती.

गावावर मुतून झाल्यानंतर एक घडलं, की खंडू गावभर कुख्यात झाला. येताजाता तो लोकांच्या रागाचा विषय बनला. पप्पू चिले तर कधीही चुकूनमाकून खंडू जवळून गेला तरी त्याला पकडून बुकलून काढे. पण ख्याती किंवा कुख्यातीमुळे काळ सरायचा थांबत नाही. खंडूच्या बाबतीतही हेच झालं. गोपाळकाल्याच्या त्या घटनेनंतर उभ्या गावाचं लक्ष खंडूवर खिळून राहिलं. त्या एका घटनेनं खंडूने गावाची जी खिल्ली उडवली होती, ती गाव कधीही विसरलं नाही. पुढे एक अशी घटना घडली जी खंडूच्या उभ्या आयुष्याचं रंगरूप बदलवून गेलीच, पण गाव सूड घेतं आणि गावाने घेतलेला सूड जहरी असतो हेही दाखवून गेली. ती एक घटना खंडूच्या गळ्यात ‘खिडकी खंडू’ ही अपमानाची, अवहेलनेची आणि उपमर्दाची माळ घालून गेली.

त्या एका घटनेकडे वळण्यापूर्वी खंडूच्या आयुष्यातल्या आणखी एका महत्त्वाच्या, पण छोट्या अध्यायाकडे नजर टाकणं गरजेचं ठरतं. हा अध्याय महत्त्वाचा यासाठी, की तो खंडूच्या बापाचा, म्हणजेच लक्ष्मणाचा आहे आणि छोटा एवढ्यासाठी, की खंडूच्या वयाच्या साधारण बाराव्या-पंधराव्या वर्षापासून आयुष्याने त्या अध्यायाची पानं मिटून ठेवलेली आहेत.

आम्ही साधारण सहावीत असताना लक्ष्मण गायब झाला. म्हणजे ज्यांनी त्याला शेवटचं पाहिलं त्यांच्या हकीकतीवर विश्वास ठेवायचा झाला, तर शब्दश: गायब झाला. त्यावर्षी होळीचा पिला तोडायला आळीतली माणसं जंगलात गेली होती. त्यांच्यासोबत लक्ष्मणही होताच. अगदी क्षणभरासाठी तो इतरांच्या नजरेआड झाला आणि त्यानंतर कधीही कुणालाही दिसला नाही. पुढचा आठवडाभर उभ्या गावाने शेजारच्या दोन-चार गावांच्या मदतीने उभं जंगल पालथं घातलं. गावातलं जंगल म्हणजे काही लहानखुरं जंगल नव्हतं. गावाला कवेत घेत हे जंगल दोन्ही टोकांना अक्षरश: मैलोनमैल पसरलेलं आहे. पण तरीही गावानं लक्ष्मणाचा शोध घेताना अगदी जंगजंग पछाडलं. पण कुणालाही लक्ष्मणाचं अगदी नखही सापडलं नाही. त्या दिवसानंतर लक्ष्मण गायब झाला तो झालाच. कुणी म्हणालं त्याला बिबट्यानं ओढून नेलं. कुणी म्हणालं तो रानभुलीत हरवला. त्याच रात्री कुणाला तरी तो हायवे नाक्यावर मुंबईकडे जाणार्‍या ट्रकमध्ये बसताना दिसला होता, तर कुणाला एकटाच कोकण रेल्वेच्या रुळांवरून चालताना! लक्ष्मणाच्या गायब होण्यावर गावाने स्वत:चे असे अनेक अंदाज बांधले. मी जेव्हा खंडूला त्याच्या बापाच्या गायब होण्याविषयी सर्वप्रथम विचारलं, तेव्हा तो कोरड्या स्वरात उत्तरला, “तो गायब व्हणारच होता. आय गेल्यावर अजून दुसरं काय करणार तो?” मला खंडूच्या त्या गहन उत्तराची खोली त्यावेळी कळली नाही. आधी आई आणि मग बाप सोडून गेल्यावर खंडू आता पुढच्या आयुष्यात काय करणार असा कूटप्रश्न मात्र मला त्या वयातही पडला. लक्ष्मण गायब झाल्यानंतर खंडूच्या आज्यानं म्हणजेच महाद्या भगतानं आणि खंडूच्या काकीनं म्हणजेच रामा भगताची बायको गुलाबनं त्याला अगदी जिवापाड सांभाळलं. तसंही गुलाबला स्वत:च्या पोटचं पोर नव्हतंच, त्यामुळे तिनेही खंडूवर आपल्या मायेची पुरेपूर पाखर केली.

साधारण दहावी-बारावीनंतर माझा आणि खंडूचा संपर्क कमी होत गेला. आमच्या शिक्षणाच्या वाटा बदलल्या, आवडीनिवडी, आकांक्षा आणि ध्येयाच्या वाटाही अलग झाल्या. खंडूचं शिक्षण तर दहावीत नापास झाल्यावर थांबलंच. त्यानंतर तो सरळ जिताडेबाबांच्या सॉ मिलवर कामाला लागला. आधी शिक्षण आणि त्यानंतर नोकरीधंद्याच्या निमित्ताने माझी गावाकडची वाटही विरळ झाली. सुरुवातीला महिन्या-पंधरा दिवसांनी गावाकडे वळणारी माझी पावलं हळूहळू वर्षा-सहा महिन्यांपर्यंतचा गावाचा दुरावा सहन करायला शिकली. अर्थात आपण गावापासून कितीही दूर गेलो, तरीही गाव काही आपल्यापर्यंत पोहोचण्यावाचून राहात नाही. मी गावापासून दूर असूनही गावाच्या बित्तंबातम्या मला कळत राहिल्या, माझ्यापर्यंत पोहोचत राहिल्या. एकदा रात्री बारा वाजता मी पुण्याला जाणार्‍या रातराणीची वाट पाहत पनवेल बस स्टँडवर थांबलो असताना मला गावाकडे जाणार्‍या एसटीची वाट पाहत थांबलेला रंजन रोडे भेटला. पाऊस धोधो कोसळत होता, त्यामुळे स्थानकात शिरणार्‍या गाड्यांची आवक तशीही विरळच होती. त्या कोसळणार्‍या पावसात चहाचे घोट घेत रंजनने मला खंडू कसा ‘खिडकी खंडू’ बनला त्याची हकीकत मोठ्या चवीने सांगितली.

गावातल्या दौंडकर दांपत्याच्या माडीवर चढून खिडकीतून आत डोकावताना गावानं खंडूला म्हणे रंगेहाथ पकडलं होतं. या घटनेनं गावात एकच गहजब उडाला. भर मध्यरात्री गावानं खंडूला चौकात उभं करून चपलेनं बडवून काढलं. खंडूच्या तोंडाला शेण फासण्यात आलं. त्याच्या डोक्यावरचे केस न केस वस्तर्‍याने कापून त्याचा चकोट केला गेला. खंडूच्या अब्रूचे धिंडवडे काढण्यासाठी गाव इतकं अधीर झालं होतं, की दहा मैलांवरच्या एका शेतात उतरलेल्या धनगरांकडून गावानं एक गाढव भाड्याने आणलं आणि त्यावरून खंडूची धिंड काढण्याचा घाट घातला गेला. वेळीच जयवंतांची मृणाल मध्ये पडली आणि तिनं गावाला खडे बोल सुनावून पुढे घडणारं आक्रीत रोखलं. त्या रात्री अपमानित आणि उपमर्दित खंडूला मृणाल स्वत:च्या घरी घेऊन गेली. त्या रात्रीनंतर खंडू कायमचाच जिताडेबाबांच्या घरी आश्रयाला गेला.

दौंडकरांच्या खिडकीची घटना घडल्यानंतर गावानं खंडूची बेअब्रू करताना कोणतीही कसर मागे ठेवली नाही. नजीकच्या काळात गावातली वेगवेगळी दांपत्यं वेगवेगळ्या वेळी खंडू आपल्याही खिडकीतून कसा आत डोकावला होता याविषयीची ग्वाही द्यायला पुढे सरसावली. खंडू अधिकाधिक बदनाम होत गेला, होतच गेला.

गावाचं एक असतं. गाव बेरकी असतं, गाव विखारी असतं, गाव कुटिल आणि जहरीही असतं. पण अगदी त्याचप्रमाणे गावाकडे काही ओलसर, मऊ-मृदू भावनाही असतात. अर्धंअधिक गाव खंडूवर खार खाऊन होतं, त्याचवेळी उरलेल्या गावाच्या मनात खंडूविषयी एक सहानुभूतीही होती. या सहानुभूतीचा मुख्य भार जिताडेबाबांच्या सुनेच्या म्हणजेच जयवंतांच्या मृणालच्या खांद्यावर होता, हे इथे नमूद केल्यावाचून पुढे सरकता येणार नाही. अत्यंत नाजूक बाबतीत गावानं खंडूला कात्रीत पकडलं होतं. अशावेळी खंडूविषयी मनात आस्था ठेवणं म्हणजे उभ्या गावाविरोधात पाऊल टाकण्यासारखं होतं, पण मृणालनं ते सहजीच केलं. महाद्या भगतासोबत जिताडेबाबांच्या घरी येणार्‍या खंडूला मृणालनं लहानाचा मोठा होताना पाहिलं होतं. खंडूविषयी तिला खात्री होती म्हणा, किंवा अजून काही, पण मृणाल नसती तर खंडूबाबत गावानं काय केलं असतं याची कल्पनाही आज करवत नाही. त्या रात्री नेमकं काय घडलं हे खंडूला विचारण्यासाठी मी माझी जीभ पुढे रेटण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण आयुष्यात काही क्षण असे असतात, की त्यावेळी आपली जीभ आपल्या मनामेंदूचंही ऐकत नाही. दौडकरांच्या खिडकीतून खंडू आत का डोकावला? किंवा खरंच डोकावला का नाही? हा प्रश्न माझ्या आयुष्यातला असाच जीभ पुढे न रेटण्यामुळे उत्तर अडलेला एक अग्रप्रश्न आहे.

त्या घटनेनंतर जिताडेबाबांचं घर ते त्यांची सॉ मिल एवढा रस्ता वगळता खंडूने गावात फिरणं बंद केलं. तसंही हा रस्ता विरळ वस्तीचा. तरीही येताजाता जेव्हाजेव्हा खंडू नजरेस पडेल, तेव्हा तेव्हा गावानं त्याला ‘खिडकी खंडू’ म्हणून चिडवण्याची, डिवचण्याची एकही संधी सोडली नाही. ही खिडकी नामक शिवी कातडीवर गोंदवून खंडूला उभं आयुष्य काढावं लागलंही असतं कदाचित; पण त्याच काळात एक अशी घटना घडली, की खंडूच्या बाबतीतला गावाचा तोवरचा पवित्राच पार बदलून गेला. गावाच्या मनात खंडूची दहशत बसली.

एके दुपारी खंडू थोडा अवेळीच जिताडेबाबांच्या घरी आला आणि त्याने सुमाकाकूकडे कोयता मागितला. सुमाकाकूकडून कोयता घेऊन खंडू थेट गेला तो किरकिर्‍यांच्या दुकानात. रमेश किरकिर्‍यांनी त्या काळात हायवेवर दुचाकी वाहनांच्या सुट्या भागांचं एक छोटं दुकान टाकलं होतं. त्यांचा लहान मुलगा दीपक ते दुकान सांभाळे. खंडू दुकानात शिरला आणि त्यानं दीपक किरकिरेच्या अंगावर कोयत्याने सपासप वार करायला सुरुवात केली. दीपकचा डावा हात खंडूच्या कोयत्याच्या वारामुळे मोडला. छातीवर, पाठीवर आणि पोटावर कित्येक टाके पडतील एवढ्या मोठ्या जखमा झाल्या. खंडूनं केलेला एक वार अगदी ओझरता दीपकच्या मानेला स्पर्शून गेला. जिवावरचं बोटावर निभवावं असं काहीसं झालं, अन्यथा दीपक आज जिवंत राहिला नसता हे नक्की. दीपकच्या ओरडण्याने, किंचाळण्याने आजूबाजूची लोकं जमली आणि त्यांनी खंडूला दीपकपासून दूर केलं, तेव्हा दुकानातल्या फरशीवर पसरलेल्या रक्ताच्या थारोळ्यात दीपक तडफडत पडला होता आणि खंडूचं पूर्ण शरीर दीपकच्या रक्तानं अक्षरश: न्हाऊन निघालं होतं.

त्यानंतर मी ही घटना गावातल्या अनेकांच्या तोंडून वेगवेगळ्या पद्धतीने ऐकली. प्रत्येक निवेदनातून स्पष्ट आणि ठळक जाणवत राहिलं ते खंडूतलं अमानुष! त्या काळात जयवंतांच्या मृणालचं नाव गावातल्याच एका शासकीय अधिकार्‍याशी जोडलं गेलं होतं. गावात त्याविषयी छुप्या स्वरात आणि दडल्या कानाने चर्चाही चाले. खंडूची जिताडेबाबांच्या सॉ मिलकडे जाणारी वाट किरकिर्‍यांच्या दुकानावरूनच होती. किरकिर्‍यांचा दीपक मृणालवरून खंडूला येताजाता अत्यंत अश्लाघ्य भाषेत टोमणे मारे. बरेचदा अत्यंत अश्लील हावभाव करून खंडूला डिवचे. त्या दिवशी खंडूचा संयम सुटला आणि त्याने कोयत्याने दीपकच्या अश्लाघ्यतेची अक्षरश: खांडोळी केली. या प्रकरणावरून गावात चर्चा झाल्या, वेगवेगळया स्तरांवरच्या बैठका झाल्या. प्रकरण अर्थात पोलिसांतही गेलं. खंडूला काही दिवसांची कोठडीही मिळाली. या सार्‍या प्रकरणात मृणाल मात्र खंडूच्या पाठीशी ठाम उभी राहिली. आतली सारवासारव काय झाली कुणास ठाऊक, पण शेवटी प्रकरण मिटलं. किरकिर्‍यांनी केस मागे घेतली. खंडू सुटला. असं म्हणतात, की किरकिरे मागे हटायला तयारच नव्हते, तेव्हा मृणालने त्यांच्या मुलावर म्हणजेच दीपकवर विनयभंगाची उलटी केस दाखल करण्याची धमकी त्यांना दिली. एक मात्र नक्की, त्या दिवसानंतर खंडूविषयी लोकांच्या मनात एक प्रकारचं भय आणि दहशत निर्माण झाली. खंडूला एक नवं नावही मिळालं. कोयत्या खंडू!

आजही गावात गेल्यावर कधी हायवे नाक्यावर फेरफटका मारला, तर जिताडेबाबांच्या धाकट्या मुलाच्या, म्हणजेच माधवच्या बिल्डिंग मटेरियल सप्लाय करणार्‍या दुकानात काउंटरमागे बसलेला खंडू दिसतो. सॉ मिल आगीत भस्म झाल्यानंतर खंडू आता माधवचा हा धंदा सांभाळतो. आत नजर टाकली, तर खंडू आतूनच हात दाखवतो, बाहेर येतो आणि दुकानात बसवून अगत्याने चहा पाजतो. मधल्या काळात घडलेल्या घटनांचे व्रण खंडूच्या मनावर आहेत का? याचा अदमास घेत मी बोलत राहातो, पण खंडू त्या व्रणांना बिल्कुलही पृष्ठभागावर येऊ देत नाही.

आताशा खंडू मला अहोजाहो हाक मारतो. खंडू मला शेठ म्हणतो. खंडूच्या अश्या शेठ संबोधण्याचा मला संकोच वाटतो. वाटतं उठावं त्याच्या खांद्यावर हात ठेवावा आणि म्हणावं, की तू मला अरेतुरेच म्हण, शेठ नको म्हणू. पण मी असं करत नाही. शहरी नेमस्तपणानं माझ्या गावाकडल्या मोकळेपणाच्या मार्गावर प्रतिष्ठेचे असे अनेक गतिरोधक निर्माण केलेले आहेत, जे मी पुरेपूर पाळतो. खंडूचा निरोप घेऊन तिथून बाहेर पडताना माझ्या मनात एकच विचार कायम घुटमळतो – त्या क्षणी खंडूच्या मनात नेमकं काय चाललं असेल, हा. खंडूच्या मनात काय चाललेलं असतं हे मला आजतागायत कळलेलं नाही. खंडूच्या मनोवस्थेचा आढावा घेऊ लागलं, की माझ्या मनात विंदा करंदीकरांच्या ‘बागुलबुवा’मधल्या ओळी आपोआपच उमटू लागतात.

‘रात्र पसरते जेव्हा भवती,
समोरच्या त्या आंब्यावरती
येऊन बसतो बागुलबुवा,
कुणा न कळतो त्याचा कावा.’

खंडूच्या आतही एक असा बागुलबुवा कायमच वास करतोय – ज्याच्या मनातला कावा ना मला कळला, ना गावाला, ना अजून कुणाला.

हृषीकेश गुप्ते
---------
ऋणनिर्देश : लेखमालेतील काही भाग 'अक्षरधारा' मासिकात पूर्वप्रकाशित झाले होते.
रेखाचित्र : गिरीश सहस्रबुद्धे

कोकणातले मासले भाग १ - सुलतान पेडणेकर
कोकणातले मासले भाग २ - जिताडेबाबा
कोकणातले मासले भाग ३ - जयवंतांची मृणाल
कोकणातले मासले भाग ५ - मॅटिनी मोहम्मद

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

जबरी व्यक्ती आणि शब्दचित्रण.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

khoopach chhaan likiley.. aawadale

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बऱ्याच वर्षांनी, इतकं प्रभावी व्यक्तिचित्र वाचलं! खंडुच्या वागण्याची इतकी उत्कृष्ट मानसशास्त्रीय उकल मनाला स्पर्शून गेली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.