शुष्क काष्ठने आण्या पत्र

समीधाने, संध्याकाळचा वरण-भाताचा कुकर लावुन, देवापुढे उदबत्ती लावली. बाल्कनीतील जाईला पाणी घालून, साठीला आलेली, समीधा जरा खुर्चीवरती विसावली. घरात,शिजलेल्या भाताचा सुगंध, घमघमाट सुटला होता. आज मानसी तिच्या मुलीला घेउन म्हणजे समीधाच्या नातीला घेउन, भेटायला येणार होती. मानसी, समीधाला भेटायला वरचेवर येत असे. त्या दोघी यायच्या आत,तेवढी काही स्तोत्रे म्हणावीत म्हणुन, समीधा जरा विसावली होती. दत्तबावनी वाचता वाचता ती एका ओळीपाशी येउन थांबली, -
"शुष्क काष्ठने आण्या पत्र| थयो केम उदासीन अत्र|
जर्जर वंध्या केरा स्वप्न| कर्या सफळ ते सुतना कृत्स्न्||
स्वत:शीच हसता हसता, तिचे मन भूतकाळात गेले.

"माझ्या अपेक्षा जगाकडून शून्य आहेत पण तुझ्याकडून नक्कीच आहेत. लग्न का करतो माणूस, एक सहचर मिळावा, साथीदार मिळावा जो की इक्वल फुटिंगवर असेल. आपल्या सुखदु:खात सामील होइलच पण वेळ पडल्यास आपले दोषही दाखवेल." - सुमीत
"अरे पण माझा स्वभाव अतिशय संथ आहे, आय गो विथ द फ्लो. मला प्रवाहाविरुद्ध ऊर फुटेस्तोवर धावायला अज्जिबात आवडत नाही." - समीधा
.
हेच आणि हेच कारण ठरलं त्यांच्या विभक्त होण्याचं. लग्न झाले तेव्हाही समीधाला सोशल सायन्स मधली पदवी घेउन, लहान मुलांकरता काहीतरी करायचे होते. याउलट सुमीत ने इरेला पडून तिच्याकडून संगणकाचा डिप्लोमा करुन घेतला. ज्यायोगे परदेशी जाण्याचे मार्ग खुले होतील. समीधाला विरोध करता आला नाही. उर्जा घालवण्याचा तिचा स्वभाव नव्हता. अगदी स्वत:च्या दूरगामी भल्याकरताही ती भांडण तंटा करणाऱ्यातली नव्हती. पण हळूहळू त्यांच्या विवाहाची कथा अरब-उंटाची कथा बनत गेली. प्रत्येक वेळी सुमीतने आधी मनधरणी मग कटकट व शेवटी धमकीवजा सूचना करायची मग ते व्यायाम असो, खाण्यापीण्यावरील बंधने असो, की अभ्यास असो, करीयर असो, मुलेबाळे असो. समीधाला मोकळेपणाने श्वास काही घेता येत नव्हता. व्यक्ती परफेक्शनिस्ट असली ना की जोडीदाराची जी परवड होते ती तिची झाली. तिचे लहान लहान आनंद हिरावले जात होते. मग ते साय-साखर खाणे असो ..... नको फार फॅटी,
की कलिंगड खाणे असो .......... फार साखर,
फिरायला जाउ या का ........... नको आधी १ तास व्यायाम कर,
जरा साखर झोप घेउ दे का .... नको सकाळी लवकर ऊठणे आरोग्याला उत्तम.
पुस्तके वाचू का ........ नको टेक्निकल , अभ्यासाची पुस्तके वाच, हवी तितकी विकत घेउन देतो तुला,
मूल हवे ............ नको सेटल होउ यात.
दुसरे मूल हवे ............. नको अजुन जबाबदारी नको.

प्रत्येक प्रत्येक प्रत्येक गोष्ट त्याच्या मनासारखी.
.
अरे आहे काय!! दुसऱ्यालाही मनासारखं ल्याव, खावं जगावंसं वाटतं, याचा या माणसाला गंधही नाही? जिकडेतिकडे याची ताबेदारी. स्वत: परफेक्शनिस्ट तर आहेच पण इतरांकडूनही त्याच अपेक्षा. भारंभार अपेक्षा. फक्त अपेक्षा. समीधा अपेक्षांच्या भाराखाली दबून गेली. ना तिच्यात बंड करण्याइतकी आक्रमकता होती ना हा अन्याय सहन होत होता. ती आजारी पडू लागली. वरचेवर तिचे व सुमीतचे खटके उडू लागले. जेव्हा कधी भांडण होइ, तेव्हा धुमसत असलेली , कोंडलेली वाफ इतक्या आवेगाने बाहेर पडात असे की आपण इतके कुरुप होउ शकतो याचे तिलाच आश्चर्य वाटे. तोंडावर तर हिंमतच नव्हती, मनात तरी नवऱ्याला शिव्या शाप कुठे देता येतात? शाप लागून त्याची फरफट झाली तर आपली तिप्पट फरफट होणार हे आपण जाणुन असतो. 'नवरा म्हणजे शंकराच्या पिंडीवरील विंचू. ठेचता येत नाही की सहन होत नाही.' सारी उर्जा सामान्य आनंद मिळावण्यातच खर्ची होत होती. तिने पुढे जावे याकरता, सुमीत, जितका तिच्यामागे लागे, तितकी ती आडमुठेपणा करे. सगळं कसं कडू झालेलं होतं, रसहीन शुष्क .... चिपाड. विवाहाला खरच अर्थ राहीला नव्हता. समाजापुढे मिरवण्याचे एक नाते पण त्यात ना रसरशीतपणा, ना ओढ, ना आनंद. फक्त एकतर्फी अपेक्षा, व एकतर्फी विरोध. एका बाबतीत मात्र साम्य होतचं तो म्हणजे हट्ट. त्याचा तिला पुढे ढकलण्याचा, तिचा आहे तिथेच रहाण्याचा. दोघांचा हट्ट, आडमुठेपणा, मैत्रिणींना सांगीतलं तर त्या म्हणायच्या "अगं तो तुझ्या भल्याकरताच सांगतो ना?" मैत्रिणींनाही तिचे दु:ख कळू नये याचा तिला मनस्वी त्रास होइ.
.
सुमीत करीअरच्या क्षेत्रात मात्र वेगाने प्रगती करत होता. नवीन नवीन परीक्षा देत नवी पदे मिळवत, नोकरीची शिडी चढत होता. जेव्हा घरात सुख नसते तेव्हा संपूर्ण उर्जा बाहेर व्यतीत करावी लागल्याने, दिन दुगनी रात चौगुनी त्याची प्रगती भरधाव होत होती. मानसिकदृष्ट्या खचलेली, समीधा,कुठेतरी बौद्धिक दृष्ट्याही मागे मागे पडत जात होती आणि तिलाही हे कळत होते. पण वळत नव्हते. दोन दिशांना दोन प्रवासी चालत असतील तर अंतर वाढतच जाणार. आणि मग एक दिवस असाही उगवला, सकाळी सुमीतने , समीधावरती त्या बातमीचा बॉम्ब फोडला. "माझ्या ऑफिसातील एका स्त्रीवर माझे प्रेम आहे. मला घटस्फोट हवा आहे. आणि तसाही आपल्या संबंधांना औपचारीकतेपलीकडे काही अर्थ नाही हे तुलाही पटतय बरोबर?"
.
समीधा जरी संसाराची फरफट जाणुन होती, तरी, हे अनपेक्षितच होते. विशेषत: वयाच्या ५० व्या वर्षी. जरी दोघांचे आपापले, भक्कम ४०१ के होते, नोकरी होती, घर दोघांच्या नावावरती होते, एकच मुलगी, मानसी तीही आता कॉलेजमध्ये दूर हॉस्टेलवर रहात होती, पण तरी ही .... हा धक्काच होता. कारण हा सेट अप तिने स्वीकारला होता, आता या निष्प्राण विवाहाची तिला सवयच होउन गेलेली होती. जर सुटवंगच व्हायचे तर निदान तरुणपणी तरी व्हायचे. उलट आता जेव्हा म्हातारपण जवळ येणार, तेव्हा आधार लागेल, कोणाची तरी मदत लागेल.
.
'आलिया भोगासी असावे सादर.' मग मात्र तिने धीर केला, सुमीतच्या हट्टासाठी नाही तर आता स्वत:साठी सर्व सर्व करायची संधी होती. मग ते करीयरमध्ये आता होइल तितके, पुढे जाणे असो की स्वत:ची अवांतर वाचनाची, कवितांची एक लायब्ररी सेट करणे असो. ती स्वत:करता, स्वत:च्या टर्मसवरती जगणार होती.
"शुष्क काष्ठने आण्या पत्र|थयो केम उदासीन अत्र|
जर्जर वंध्या केरा स्वप्न| कर्या सफळ ते सुतना कृत्स्न्||

दत्तप्रभूंच्या कृपेने जर शुष्क काष्ठाला पालवी फुटाली, वांझ गाय दुभती झाली, साठीची नि:संतान स्त्री गर्भार झाली ...... तर , माझं ५० शी त, नवं आयुष्य का नाही सुरु होणार. का नाही माझ्या स्वप्नांना नवचैतन्य मिळणार? आणि अशा निर्धारानेच तिने एका नवीन आयुष्याची सुरुवात केली होती. एकटीची वाट! तिच्या टर्मसवरती. तिचे आयुष्य - तिचे नियम. तिच्या चूका, तिचे क्रेडीट. आता यात कोणीही भागीदार नको की कोणी ठेकेदार नको. उरलेलं आयुष्य फक्त मोकळा श्वास घेत काढायचे.
.
दाराची बेल वाजली आणि समीधा वयाला न शोभेलशा चपळपणे, नातीचे व मुलीचे स्वागत करायला उठली. दोघी आल्या की भूक भूक करतील हे तिला माहीत होते. बाल्कनीतल्या जाळीवरुन जाईचा सुगंध घेउन, मंद वारा घरात येत होता. जाईची वेल बहरली होती, फुलापानांनी लगडली होती. सारं घर त्या चैतन्याने, सुगंधाने न्हाउन निघलं होतं. उतारवयात का होइना, फासे अचूक पडले होते.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

या श्टुरीला इकडे टेकर नाहीत, वरणभाताइतकी मिळमिळीत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0