मॅटिनी मोहम्मद - हृषीकेश गुप्ते

मॅटिनी मोहम्मद

मोहम्मद इब्राहीम अली पेडणेकर तथा मॅटिनी मोहम्मद या माणसाचं गावाच्या जडणघडणीतलं महत्त्व अनन्यसाधारण आहे. गावाचा इतिहास लिहिताना जेव्हा जेव्हा ‘सिनेमा’ हा शब्द उच्चारला जाईल, तेव्हा तेव्हा मॅटिनी ध्रुवतार्‍यासारखा उत्तरेकडल्या क्षितिजावर लुकलुकताना दिसेल. मला कायम असं वाटत आलेलं आहे, की मॅटिनी ही एक व्यक्ती नसून, जो चितारल्याशिवाय गावाच्या चरित्राला पूर्णता येणार नाही असा गावातला एक अध्याय आहे.

मॅटिनीचं शब्दचित्र रेखाटताना सुरुवात कुठून करावी हा प्रश्न मला एखाद्या कूटप्रश्नासारखा सतावतो. कित्येकदा म्हणूनच मॅटिनीविषयी लिहायला सरसावलेले माझे हात मी मागे घेतले आहेत. मॅटिनीविषयी लिहिणं म्हणजे एखादा सिनेमा लिहिण्यासारखं आहे. नुस्ता सिनेमा लिहिणंच नाही, तर ध्वनी, प्रकाश, संकलन इत्यादी तांत्रिक बाबींवर पूर्ण नियंत्रण ठेऊन तो मोठ्या जबाबदारीने दिग्दर्शित करण्यासारखं आहे. किंबहुना मॅटिनी सिनेमा नाहीच. मॅटिनी ही सिनेविषयक उभा हिंदुस्थान कवेत घेणारी एक डॉक्युमेंट्री आहे. हिंदुस्थानातल्या प्रत्येक खेड्यातल्या ऐंशी आणि नव्वदीच्या दशकातली सिनेवेडाची मानसिकता चितारणारी डॉक्युमेंट्री!

Matinee Mohammad

मॅटिनी चरित्राला सुरुवात करण्याआधी थोडासा पूर्वार्ध जोडणं गरजेचं आहे. लेखकासाठी पूर्वार्ध म्हणजे बरेचदा एक प्रकारची वातावरणनिर्मिती असते. ते वातावरण निर्माण करून तो हलक्या पावलांनी मूळ विषयाकडे वाटचाल करू लागतो. मॅटिनीसारख्यांच्या चरित्रासाठी आवश्यक असणारं वातावरण हे साधारणत: पावसाळी आणि कुंद असतं. यावरून कुणी असा कयास बांधला, की पुढच्या लिखाणात एक अनावर गहिवर आणि करुणा दाटलेली असेल तर तो अंदाज पूर्णत: चुकणार आहे. मॅटिनी-चरित्राला न्याय देण्यासाठी सभोवार भरपूर वेळ हवा आणि वृत्तीत थोडा खेडवळ रिकामटेकडेपणाही. मॅटिनीविषयी सांगताना गावाविषयी सांगणं अपरिहार्य आहे, कारण गाव मॅटिनीला घडवतं; मॅटिनी गावाला नव्हे.

साधारणत: सरता ज्येष्ठ आणि आषाढाच्या आरंभकाळात गाव सुस्त असतं. जे लोक भातशेती करतात त्यांच्यासाठी हा लगबगीचा काळ; पण मुळात आमच्या भागात शेतीवरची उपजीविका अशी कमीच. घरी वंशपरंपरेनं चालत आलेली शेती आहे, आणि ती कसावीच लागते म्हणून नेमाने पहिल्या पावसानंतर भात लावणारी कुटुंबं गावात आहेत, नाही असं नाही; पण शेती हे गावाच्या मुख्य उपजीविकेचं साधन पूर्वीही नव्हतं आणि आता तर नाहीच नाही. त्या काळी साधारणत: शेती करणारी सगळीच माणसं उदरनिर्वाहासाठी काहीतरी वेगळा व्यवसाय किंवा काम करत. यात रोजंदारीपासून ते सरकारी नोकरीपर्यंतच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि विविधांगी कामांचा समावेश असायचा. म्हणजे लोकांच्या कपड्यांना इस्त्री करणारा गणेश लाँड्रीवाला असो, सुतारकाम करणारा वरच्या आळीतला नाम्या रहाळकर असो, किंवा आम्हाला बीजगणित शिकवणारे कमलाकांत पाटील सर असो, या सगळ्यांनाच पहिल्या पावसानंतर शेतीचे वेध लागत. पावसाच्या या दोन-चार महिन्यांच्या काळात पार पेरणी-लावणीपासून कापणीपर्यंतच्या सगळ्या कामांत ही माणसं हिरिरीने सहभागी होत; पण या व्यतिरिक्त कमलाकर पाटील सरांसारख्या नोकरपेशा माणसाचा अपवाद वगळता शेती करणारी किंवा न करणारी सगळीच माणसं पावसाळ्यात तशी थोडी निवांत असत. गावाचा मुख्य आधार असणारा ट्रकचा व्यवसाय या काळात थंड पडे. गावातल्या निम्म्याहून अधिक ट्रकची पावसाळ्याच्या या चार महिन्यांत आरटीओच्या दफ्तरी ‘नॉन-यूज’ म्हणजे ‘वापरात नाही’ अशी नोंद केली जाई. या चार महिन्यांत वापरात नसल्याने अशा ट्रकना मग करमाफी मिळे. दिवसभर ठाक-ठूक अशा ठोकाठाकीच्या किंवा ‘झुर्रर्रर्र..’ अशा वेल्डिंग कामाच्या किंवा इतर कोणत्याही परिचित-अपरिचित आवाजांनी भरून गेलेला हायवे नाका या काळात पार नीरव होऊन जाई. गावातून वेळीअवेळी मोठमोठ्याने हॉर्न वाजवत इकडून तिकडे फिरणारे ट्रक या दिवसांत ताडपत्री अंगावर गुंडाळून मालकाच्या अंगणात एखादा आडोसा पाहून गुडूप झोपी जात. त्यांना जाग येई ती मग साधारणत: नवरात्राच्या पहिल्या-दुसर्‍या दिवशी. पावसाळ्याचे चार महिने निद्रेच्या आहारी गेलेले हे ट्रक पुन्हा जागे होताना मात्र भयंकर आळस करत. बरेचदा मालकाच्या नाकी नऊ आणत. चार महिने बंद असणार्‍या या ट्रकना पुन्हा जागं करणं हा एक मोठ्या कसरतीचा भाग असे.

साधारण ऐंशी-नव्वदच्या दशकातल्या पावसाळ्यांत लोकांची गावातल्या काळवंडल्या हॉटेलात गर्दी होई. निमशहरी प्रगतीकडे वेगाने वाटचाल करू पाहणार्‍या आमच्यासारख्या गावांतून या हॉटेलांतल्या मळकट बाकड्यांवर बसून शहरी प्रगतीच्या गप्पा छाटणं हे उद्यमशीलतेचं लक्षण मानलं जायचं. गावातल्या भिन्नस्तरीय लोकांचे या काळात एकत्र जमण्याचे वेगवेगळे अड्डे असत. बापट वकील, ओसवाल शेठ, माझे वडील आणि मूसा दफेदारसारखे गावातले प्रतिष्ठित लोक शहासन्यांच्या ओटीवर ब्रिजचा डाव टाकायचे. हा ब्रिजचा डाव निव्वळ पावसाळ्यातल्या रिकाम्या काळातच नव्हे, तर ऋतुमानाचे कोणतेही अडसर मनी न बाळगता तिन्हीत्रिकाळ अहोरात्र खेळला जाई. शहासन्यांच्या ओटीवर बसून ब्रिज खेळताना मूसा दफेदार आखातातून आणलेली गडद तपकिरी रंगाची सिगरेट ओढत. मूसा सिगरेटच्या धुराची वलये सोडत शहासन्यांच्या ओटीवर ब्रिज खेळत बसले, की रस्त्यावरून जाणारे अनेक शौकीन क्षणभर थबकत. शहासन्यांच्या ओटीवरच्या छतावर आदळून फुटणार्‍या त्या विखुरल्या धुराचे काही उष्टे, खरकटे धूम्रकण आपापल्या फुफ्प्फुसात ओढून घेत आणि घरी जाऊन मूसाची सिगरेट प्यायल्याच्या आनंदात रममाण होत. मूसा सिगरेट पीत ब्रिज खेळायला बसले, की बरेचदा मी आणि खंडू शहासन्यांच्या ओटीवर रेंगाळायचो. मूसांकडे निव्वळ सिगरेटच विलायती नसत, तर सिगरेट पेटवायला लागणारी आगपेटीही विलायती असे. वरकरणी नजरेला प्लास्टिकच्या वाटणार्‍या त्या चकचकीत इवल्याश्या आगपेटीत हस्तिदंताप्रमाणे शुभ्र आणि बोटाच्या वरच्या पेराएवढ्या लहानलहान काड्या असत. त्या काड्यांवर गंधात बुडवलेल्या अनामिकेप्रमाणे लालसर रंगाचा गूल चिकटलेला असे. बरेचदा काड्या संपल्या, की मूसा रिकामी आगपेटी टाकून देत. टाकून दिलेली रिकामी आगपेटी झडप मारल्यागत हस्तगत करून मग मी आणि खंडू थेट घरचा रस्ता धरत असू. त्या आगपेटीचा दर्शनी भाग फाडून मग आम्ही त्या छापा म्हणून वापरायचो. मूसाशेठच्या आगपेट्यांपासून बनलेल्या छापांना त्या काळात गावातल्या लहान मुलांमध्ये मोठी किंमत मिळे.

चावडीवरच्या नाकेदाराचं हॉटेल हे गावातलं पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारं अजून एक ठिकाण. इथे भिडे गुरुजींपासून कवितके भाऊसाहेबांपर्यंत आणि नाना शिदोर्‍यांपासून फत्तेखान तांबोळ्यांपर्यंत सगळ्यांचा राबता असे. मॅटिनी चरित्रात नेपथ्य म्हणून या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे अधोरेखित केल्याशिवाय पुढे सरकणं हे त्या ठिकाणावर अन्याय केल्यासारखं होईल. (ट्रकची केबिन, ट्रकचा मागचा रिकामा भाग, ट्रकचं बोनेट ही या मॅटिनीचरित्रातली आणखी काही महत्त्वाची नेपथ्यं.)

नाकेदाराच्या हॉटेलात सर्वधर्मीय, सर्वश्रेणीय लोकांची कायम ये-जा. नाकेदाराची मिसळ पंचक्रोशीत प्रसिद्ध. कोणत्याही मोसमात गेलं तरी सकाळी साधारण सात ते अकरा या वेळेत नाकेदाराचं हॉटेल पूर आल्या नदीसारखं भरून वाहत असायचं. गावातल्या कानकोपर्‍यांतून, वेगवेगळ्या आळ्यांतून त्या काळात मिसळ खायला नाकेदाराच्या हॉटेलात लोक जमत. बारीक शेव, गाठी आणि पापडीमध्ये पातळ पोह्याचा हिरवट पिवळसर चिवडा टाकून नाकेदार त्यावर वाफाळलेला रस्सा ओतत. आमच्या भागातल्या मिसळीचा रस्सा म्हणजे आदल्या रात्री भिजवलेल्या हिरव्या वाटाण्याची झणझणीत आमटी. ना वेगळी शिजवलेली मटकी! ना वेगळा बनवलेला कट! ना तेलावर मसाला टाकून बनवलेली लाल रक्ताळली वेगळी तर्री! हिरव्या वाटाण्याच्या त्या एका रश्श्यात तिन्हीलोकीचं रुचकर अवगुंठित झालेलं असे. अगदी पसंतीतलं गिर्‍हाईक असेल, तर नाकेदार मिरचीच्या ठेच्याची फोडणी दिलेली बटाटेवड्याची भाजी मिसळीत टाकत. क्वचित कांदाभजीचा चुराही मिसळत. नाकेदारांच्या लेखी कांदाभजी म्हणजे कांदाभजी. तिला दुसरं नाव नाही. गोलभजीपासून कांदाभजीला वेगळं काढण्यासाठी तिचं केलेलं खेकडाभजी हे नामकरण ऐकून नाकेदारांचे डोळे पाणावलेले मी प्रत्यक्ष पाहिले आहेत. नाकेदारांची त्यांच्या हॉटेलातल्या पदार्थांच्या चवीविषयी, नावाविषयी किंवा घटक पदार्थांविषयी असलेली अस्मिता ही कोणत्याही स्थानिक राजकीय पक्षाच्या भाषा वा प्रांतीय अस्मितेपेक्षा जास्त प्रखर होती. “असं असतं का रेऽ कधी? मिसळीत का कुणी पोहे टाकतं?” किंवा “कांदाभजी म्हणजे कांदाभजी ना? तिचं नाव खेकडा असं बदलायला ती काय जिल्हा आहे?” अशी अनेक विधानं सद्गदित झाल्या कंठाने नाकेदार काउंटरशी थांबल्या कुणाही गिर्‍हाईकासमोर उद्गारत. नाम्या रहाळकरसारखं एखादं शाणं गिर्‍हाईक असेल तर ते नाकेदारांची दुखरी नस हेरून त्यांना अधिक भावुक बनवत आतपाव शेवचिवड्यासोबत एखादा खाजा मोफत मिळवी. त्याच सुमाराला केव्हा तरी आमच्या जिल्ह्याचं नाव कुलाब्यावरून रायगड झालं होतं. त्या नामकरणाचं नाकेदारांना मोठं वैषम्य वाटे. पुढे या नामकरणाची सल त्यांच्या हृदयात एवढी खोल रुतून बसली, की ते जगभरात, देशाभरात किंवा राज्याभरात घडणार्‍या प्रत्येक नामांतराची स्वत:च्या वहीत नोंद ठेवू लागले. लवकरच हिशेबाच्या लाल वहीसोबत त्यांच्या काउंटरवर एक अधिकची चोपडी दिसू लागली. सकाळी येणार्‍या वर्तमानपत्रातल्या अश्या नामांतर नोंदी त्या चोपडीत लिहून ठेवण्याची पुढे नाकेदारांना सवयच लागली. नाकेदारांनाही गावानं ‘नामांतर दाजी’ असं एक टोपणनाव दिलं. नाकेदारांना गावातले बरेच लोक प्रेमाने दाजी म्हणत. नाकेदारांचं लग्न गावातल्याच दशरथ भोप्याच्या मुलीशी झालेलं. दशरथ भोप्याचा ताडासारखा आडमाड वाढलेला मुलगा गोकर्ण भोपी नाकेदारांना दाजी म्हणायला लागला आणि गावानंही त्याचीच री ओढली. नामांतर किंबहुना नाकेदारांच्या नशिबातच. मुळात नाकेदारांच्या व्यक्तिमत्वात नामांतराचा विषाणू सोडून ते आमूलाग्र बदलवण्याचे श्रेय जाते ते दादा बापटांच्या साडूंना. दादा बापट म्हणजे बापट वकिलांचे थोरले चिरंजीव आणि माझ्या वर्गातल्या वसंताचे वडील. पुण्याहून एकदा दादांचे साडू गावी पाहुणे आले. पुण्यातल्या प्रसिद्ध मिसळीचे आकंठ गोडवे ऐकल्यामुळे दादा बापटांच्या मनात गावाची अस्मिता जागी होऊन त्यांनी पुण्यातल्या आपल्या नेमस्त पाहुण्यांना नाकेदाराच्या हॉटेलात मिसळ खायला नेलं. पाहुणे नाकेदाराच्या हॉटेलातलं मळकट अंधारं नेपथ्य पाहून खूश झाले असले, तरी त्यांच्या कपाळावर पहिली आठी चढली ती हॉटेलातली जर्मेन धातूची भांडी पाहून. स्टीलच्या चकचकणार्‍या भांड्यांना अद्यापि गावातली हॉटेलं सरावली नव्हती. त्या काळात गावातल्या हॉटेलांतून जर्मेनच्या चंदेरी रंगाच्या ताटल्या आणि चमचे सर्रास वापरले जात. त्या ताटल्या-चमच्यांच्या चंदेरी त्वचेवर काळसर खोलगट दाण्यांची हलकी पखरण असे. एक शुभ्र चंदेरी रंग सोडला तर बरेचदा मला त्या ताटल्या रात्रीच्या चांदण्यानं बहरल्या आभाळासारख्या वाटत. ताटल्यांमधले काळसर खोलगट दाणे म्हणजे आभाळात विखुरल्या असंख्य चांदण्याच जणू. पुढे तंत्रज्ञानाच्या रेट्यात या ताटल्या भूतकाळात गडप झाल्या, सोबतीला नाकेदारांच्या मिसळीच्या चवीचा एक अविभाज्य हिस्साही कायमचा घेऊन गेल्या.

तर, दादा बापटांच्या पुण्याहून आलेल्या साडूंना या ताटल्या आणि चमचे खटकले याकडे नाकेदारांनी ओशाळं हसत दुर्लक्ष केलं. जर्मेनच्या ताटलीत शेव, गाठी आणि पापडी या पिवळ्या मालासोबत फरसाणातलं इतर कुठलंही लालसर मटेरीयल नाही हे पाहून साडूंनी नाक मुरडलं. दादा बापटांच्या साडूंच्या या नाक मुरडण्याकडेही नाकेदारांनी कानाडोळा केला. शेव-गाठी-पापडीत पातळ पोह्याचा चिवडा टाकून वर बटाटेवड्याची आलं-लसणाच्या ठेच्याची फोडणी दिलेली भाजी मिसळत नाकेदारांनी जेव्हा त्यावर गरम वाफाळता रस्सा ओतला तेव्हा साडू “अहो, अहो हे काय करताय?” असं म्हणत इतक्या जोराने किंचाळले, की त्यांच्या आवाजाने रस्त्यावर उभी माझ्या वयाची दोनचार शाळकरी मुलं इतस्तत: निरुद्देश पळाली. त्या काळात गावातली माझ्या वयाची मुलं खुट होताच कुठंही पळून जात.

“पोहे कुठायत?” साडूंनी सवाल केला. नाकेदार आपल्या चष्म्याच्या भिंगातून काहीच न कळल्यागत साडूंकडे पाहत राहिले. दादा बापटांच्या नेमका प्रकार लक्षात आला आणि ते मध्यस्थी करत म्हणाले, “अहो, आमच्या भागात मिसळीत पोहे नाही टाकत.” साडूंचा आ वीतभर वासला गेला. “पोहे नाही टाकत!” त्या वासल्या तोंडाचा आ किंचितही न मिटता साडू उद्गारले. दादा बापटांनी उत्तरादाखल नकारार्थी मान हालवली. “आणि मटकी?” या अडाणी लोकांना मिसळ कशी बनवतात हे माहीतच नाही हा साक्षात्कार होऊनही साडूंनी नवा प्रश्न उभा केला.

“मटकी? मटकीचं काय? ती आम्ही रात्री भिजवतो आणि सकाळी कोंबड्यांना खायला घालतो.” नाकेदार उद्गारले. “आणि मटकी खायची असेल तर पितरपाखात या. ज्याच्याकडे कावकाव आहे त्याच्या घरी ढिगाने मिळेल मटकीचा रस्सा.” मागच्या टेबलावर बसलेल्या नाम्या रहाळकरने आगपेटीतल्या उरल्यासुरल्या काडीने कान कोरता कोरता छद्मीपणे म्हटलं. साडू अचंबित झाले. आपण कुठल्या अज्ञात प्रांतात येऊन पोहोचलोय या भावनेने त्यांच्या पोटात खड्डा पडला. त्यांनी क्षणभर सभोवार पाहिले. नाकेदाराच्या हॉटेलातली प्रत्येक व्यक्ती एखाद्या सर्कशीतल्या प्राण्याकडे पाहावे तशी साडूंकडेच पाहत होती. साडू एकदम भानावर आले. या अशिक्षित, अडाणी आणि रुचिभ्रष्ट लोकांच्या गर्दीत आपलं अधिकच अध:पतन होऊ नये यासाठी आपण इथून लवकरात लवकर निघालेलं बरं या विचाराने त्यांना धीर आला. टेबलावरची वाफाळत्या रश्श्याने भरलेली मिसळीची ताटली त्यांनी डाव्या हाताने बाजूला सारली, उजव्या हाताने बाकड्यावरच शेजारी ठेवलेला आपला रुमाल उचलला आणि साडू नाकेदाराच्या हॉटेलातून तडक बाहेर निघाले. नाकेदाराच्या हॉटेलच्या पायर्‍या उतरण्याआधी साडूंनी एक अद्भुत प्रतिक्रिया दिली. पायर्‍या उतरता उतरता साडूंनी आपली मान अंग भिजल्या कुत्र्याप्रमाणे गदगदा हालवली. त्यानंतर साडू खालच्या चौकातून डावीकडे वळत दिसेनासे झाले. साडूंच्या मागे त्यांना सावरायला म्हणून काही वेळाने भानावर आलेली दादा बापट आणि गावातली इतर दोनचार मंडळीही पळाली. नाकेदार घाटावर जमलेल्या कावळ्यासारखे भांबावल्यागत इकडेतिकडे पाहू लागले. साडूंनी स्पर्शही न केलेली मिसळ “आता ही फुकटच जाणार आहे.” असं पुटपुटल्यासारखं म्हणत जवळच बसलेल्या नाम्या रहाळकरने खायला सुरुवातही केली. एखाद्या वेगवान इंग्रजी चित्रपटात घडल्याप्रमाणे समोर साकारणारा हा घटनाक्रम नाकेदारांच्या हॉटेलातली एक व्यक्ती न्याहाळून पाहत होती. ती व्यक्ती मग तिथून तडक निघाली आणि येऊन थांबली ती शहासन्यांच्या ओटीवर. शहासन्यांच्या ओटीवर ब्रिज खेळणार्‍या गावातल्या दिग्गजांना त्या व्यक्तीने नाकेदाराच्या हॉटेलात घडलेली ती घटना शारीरिक प्रात्यक्षिकांसह यथासांग वर्णन करून दाखवली. मी आणि खंडू त्यावेळी शहासन्यांच्या पायरीवरच बसलो होतो आणि म्हणूनच मला त्या व्यक्तीने साकारलेला तो जिवंत प्रयोग याचि देहि याचि डोळा पाहता आला. त्या पुढच्या आयुष्यात मी अनेक नाटकं पाहिली, लाईव्ह शोज पाहिले, एकपात्री कार्यक्रम आणि स्टॅन्डअप कॉमेडीज वगैरे वगैरे बरंच काही पाहिलं. पण त्या व्यक्तीने साकारलेला तो छोटेखानी, काही मिनिटांचा साक्षात्कारी अंगविक्षेप माझ्या आयुष्यभर स्मरणात राहिला. संपूर्ण घटना इत्थंभूत वर्णन करून समोर मांडल्यावर मग त्या व्यक्तीने आपल्या प्रयोगातला शेवटचा कळसाध्याय रचला. तिने साडूंनी नाकेदारांच्या पायरीवर हालवलेल्या मानेचं एक रोमहर्षक प्रात्यक्षिक करून दाखवलं. जे पाहून शहासन्यांच्या ओटीवर ब्रिज खेळणारे सगळेच दिग्गज दिग्मूढ झाले.

ते प्रात्यक्षिक करून दाखवणारी व्यक्ती होती, अर्थात मॅटिनी!

तुम्ही अमिताभ बच्चनचा ‘हम’ पाहिलाय? मुकुल आनंद दिग्दर्शित, किमी काटकरचं प्रसिद्ध ‘जुम्मा चुम्मा’ नृत्य असलेला ‘हम’! या सिनेमात केसभिजल्या अमिताभ बच्चनचा स्लो मोशनमध्ये जोरजोराने मान हलवण्याचा एक सिग्नेचर सीन आहे. ती मान हलवताच अमिताभच्या डोईवरचे सर्व केस पिंगा खेळल्यागत हळुवार गतीने इतस्तत: विखुरतात आणि केसात अडकलेलं पाणी तेवढ्याच हळुवारपणे चोहोबाजूंनी भिरकावलं जातं. सिनेमातल्या या सीनला लोकांच्या प्रचंड टाळ्या मिळाल्या. किंबहुना सिनेमाच्या ट्रेलरमधूनही ‘जुम्मा चुम्मा’पेक्षा या एका सीनची, सीनची नव्हे खरंतर शॉटची, जास्तीत जास्त जाहिरात लोकांपर्यंत पोहोचवली गेली. मुंबईतल्या रस्त्यांवरून विजेच्या दिव्यांच्या पांढर्‍या खांबावर लावलेल्या पोस्टर्समधूनही हा ‘मान हालवणारा अमिताभ’च सगळ्यांसमोर आणला गेला. पण या नेमक्या प्रसंगाचा खरा प्रणेता दिग्दर्शक मुकुल आनंद किंवा अभिनेता अमिताभ बच्चन नव्हताच. तो मॅटिनी होता! आणि हे मी कोणत्याही न्यायालयात प्रतिज्ञापूर्वक लिहून द्यायला तयार आहे. बापटांच्या साडूंनी नाकेदारांच्या पायरीवर भिजल्या कुत्र्याप्रमाणे जी मान हलवली – त्या मान हलवण्याला मॅटिनीने एक वेगळीच शोभा, एक वेगळीच अदा बहाल केली. मॅटिनीच्या त्या मान हलवण्यात कोणत्याही प्रकारची सिनेमॅटिक स्लो मोशन नव्हती, पण तो प्रसंग मला स्लो मोशनमध्ये दिसला हे मी शपथपूर्वक सांगू शकतो. पुढेमागे कधी ‘सिक्रेट हिस्टरी ऑफ इंडियन सिनेमा’ असा कोश तयार झाला आणि त्या कोशात नोंदी करण्याची संधी मला मिळाली, तर मी ‘हम’ सिनेमातल्या अमिताभ बच्चनच्या त्या मान हलवण्याच्या सिग्नेचर सीनचं श्रेय निर्विवादपणे मॅटिनीला देईन.

मुळात मी तिसरी-चौथीत असताना कधी तरी मॅटिनी कौसे सोडून आमच्या गावी कायमचा स्थलांतरित झालेला असला, तरी त्याच्या सिनेप्रेमामुळे मॅटिनीची कीर्ती फार पूर्वीच कौश्या-मुंब्र्यातून आमच्या गावासह पार श्रीवर्धन-गुहागरपर्यंत पोहोचलेली होती. मॅटिनीच्या बापाने दोन लग्नं केली. पहिलं कौश्यातल्या फातिमा बेगमशी आणि दुसरं गावातला पहिला पेंटर नसरू लंबातेच्या मुलीशी, म्हणजे रेहानाशी. दुसर्‍या लग्नापासून मॅटिनीच्या बापाला सुलतान पेडणेकर नामक अद्भुत माणिक प्राप्त झालं, तर पहिल्या बायकोपासून काही वर्षं आधीच मॅटिनी नामक रत्नखचित पुत्रप्राप्ती. हिजरीसनाच्या प्रारंभी जन्माला आला म्हणून मॅटिनीच्या बापाने म्हणजे इब्राहीम तथा इबूने मॅटिनीचं नाव मोठ्या श्रद्धाभावाने मोहम्मद असं ठेवलं; पण गावाने तेवढ्याच इमानेऐतबारे त्याच्या नावातून प्रेषिताचा उल्लेख वगळून त्याला मॅटिनीपुरतं मर्यादित केलं. सुलतान जन्माला येताच काही दिवसांतच त्याची आई कावीळ होऊन अल्लातालाला प्यारी झाली. आईविना पोरक्या झाल्या सुलतानला इबूने त्याच्या पहिल्या बायकोकडे कौश्यात ठेवलं. आपल्या सावत्र आईला सुलतान खाला हाक मारी. सुलतानच्या सावत्र आईला म्हणजेच खालाला एक सख्खा मुलगाही होता. तो सुलतानपेक्षा तब्बल दहा वर्षांनी मोठा होता. मोहम्मद त्याचं नाव! आपल्यापेक्षा वयानं दहा वर्षांनी लहान असणार्‍या सुलतानवर मोहम्मदचा जीव जडला. कौश्यातल्या सुलतानच्या बालपणाच्या बंधुप्रेमाच्या आठवणी खरंतर सुलतानच्या तोंडूनच ऐकाव्या. आज सुलतान पन्नाशीला आलाय, पण मॅटिनीच्या सहवासात घालवलेल्या बालपणीच्या कौश्यातल्या आठवणींनी सुलतान आजही गहिवरतो, त्याचा कंठ दाटून येतो. असे भावनाविष्कार सुलतानला साकारता येत नाहीत. देवाने त्याचा चेहेरा किंबहुना अश्या भावनाविष्कारांसाठी बनवलेलाच नाही. भावुक सुलतान मला कायम एखाद्या मॅड कॉमेडीत भावुक झालेल्या विनोदी नटासारखा वाटतो. हँगओव्हर मधला झॅक गॅलिफियानाकिस अश्या वेळी मला न चुकता आठवत राहातो. सुलतान साधारण बारा-तेरा वर्षांचा झाला तेव्हा इबूने सुलतानला त्याच्या सावत्र आईसह पुन्हा गावी आणून ठेवलं. मॅटिनी कौश्यात एकटाच उरला. असं म्हणतात की, सुलतानला गावी नेण्यावरून मॅटिनीचे स्वत:च्या बापाशी म्हणजेच इबूशी खूप खटकेही उडाले. मॅटिनीने काही नातलगांनाही मध्यस्थ करून पाहिले; पण इबूने कोणाचंही ऐकलं नाही. मॅटिनीच्या मनात इबूच्या या वागण्याने बापाप्रती एक कायमचा सल तयार झाला. बंधुविरहाने कष्टी झालेला मॅटिनी पुढे फार काळ कौश्यात राहू शकला नाही. एका नामांकित ट्रान्स्पोर्ट कंपनीतली ड्रायव्हरची नोकरी सोडून तोही कौसे सोडून आमच्या गावी कायमचा स्थलांतरित झाला.

आजवर प्रियकर-प्रेयसीने एकमेकांसाठी, आईवडिलांनी अपत्यासाठी केलेल्या त्यागाच्या कथा मी ऐकलेल्या आहेत; पण बंधुविरह सहन न होऊन मॅटिनीने जो त्याग केला त्यासाठी माझ्याकडे पौराणिक उदाहरणांखेरीज दुसरे दाखले नाहीत. मॅटिनीचा आमच्या गावातला प्रवेश आणि गावातल्या त्याच्या पुढच्या रहिवासाविषयी सांगण्याआधी मॅटिनीच्या या मधल्या बंधुविरहाच्या काळाबद्दल थोडं भाष्य करणं मला अत्यावश्यक वाटतं. या बंधुविरहाच्या काळात मॅटिनी सुलतानला मोठमोठाली पत्रं लिही. त्या पत्रात उभ्या ब्रम्हांडातला गहिवर दाटलेला असे. पत्रं बरेचदा मराठीमिश्रित हिंदीत असत, आणि पत्राची सुरुवात नेहेमीच ‘मेरे प्यारे भाय’ या वाक्याने होत असे. सुलतानचा आणि अक्षरओळखीचा त्या काळात तरी दुरान्वयानेही संबंध नसल्याने तो ही पत्रं कायम माझ्याकडे वाचायला आणे. माझ्या भाषिक जडणघडणीत जसा सुलतानचा महत्त्वाचा वाटा आहे तसाच, अगदी खारीचा का होईना, पण मॅटिनीच्या त्या सुलतानला पाठवलेल्या पत्रांचाही आहे. माझ्या आयुष्यातल्या अवांतर वाचनाचा श्रीगणेशाच जणू मॅटिनीने सुलतानला पाठवलेल्या त्या पत्रांच्या वाचनाने केला होता. मॅटिनीचं अक्षर टपोरं होतं. तो भरपूर जागा सोडून सात-आठ ओळींतच नेमक्या भावना मांडून पत्र संपवत असे. सुलतानला लिहिलेली पत्रं मॅटिनी त्या काळात साधारणत: महाग वाटणार्‍या आंतरदेशीयावर पाठवे. पत्रात बरेचदा बापाला म्हणजे इबूला दोष दिलेला असे. आईच्या आठवणीचा एक दुःखद अंतःस्वर त्या पत्रांतून सतत जाणवे; पण पत्रातली बहुतांश जागा ही सुलतानच्या विरहाच्या रुदनाने व्यापलेली असे. मॅटिनीच्या या पत्राची वाचनं बरेचदा आमच्या माजघरात सर्व कुटुंबियांसमोर होत. सगळेच हसत. सुलतानही त्याच्या त्या काळ्याभोर चेहेर्‍यावरच्या शुभ्र दंतपक्तींनी उमलवलेल्या अपरिहार्य हास्याचं प्रदर्शन करत सगळ्यांकडे टकामका पाहत राही. असं असलं, तरी हिंदी सिनेमातली ती नाट्यपूर्ण भाषा मला मात्र अंतर्बाह्य थरारून टाके.

मेरे प्यारे भाय,
मेरे जिगरके टुकडे सुलतान!
तु ठिक तो है ना?
जिस जाहील बापने तेरे मेरे रिश्तेके बीच ये दरार लायी है, मै उसे जिंदगीभर माफ नही करुंगा.
हर वक्त, हर पल मै अपने आल्लाताल्लासे एकही दुवा मा़ंगता हूं मेरे भाय.
याह परवरदिगार! बस मेरे सुलतानको मुझसे मिलादे.
मै आऊंगा. तुझसे मिलने जरुर आऊंगा.
और जब मै आऊंगा तो धरती फट जायेगी, आसमान रो पडेगा मेरे भाय.
मै आऊंगा.
मै जरुर आऊंगा.
तेरा प्यारा बडा भाई,
मोहम्मद

मॅटिनीची ती दर्दभरी पत्रं वाचताना माझ्या आतून भावनांचा एक वेगळाच कल्लोळ दाटून येई. अनेकदा कंठी हुंदके दाटत. कित्येकदा मग घरातले सारे मॅटिनीच्या त्या भाषेवर हास्यविनोद साजरे करत असताना मी मात्र एका कोपर्‍यात जाऊन मुकाट आसवं ढाळत बसे. त्या पत्रातल्या ओळींत मला कायम मॅटिनीचा मी आजवर न पाहिलेला; पण जुन्या हिंदी सिनेमातल्या पत्रांत दाखवत असलेल्या नायक-नायिकेच्या चेहेर्‍याप्रमाणे सुपरइंपोज केलेला चेहेरा तरळताना दिसे. कारण ठाऊक नाही, पण तो चेहेरा बरेचदा शशी कपूरचा असे. हिंदी सिनेमानं प्रत्येक भारतीय व्यक्तिगत आयुष्यावर गारूड करण्याचं काम त्या त्या व्यक्तीच्या जन्मत:च सुरू केलेलं असतं. ही घटना म्हणजे याचा जिवंत प्रत्यय आहे.

बालपणी माझ्या आत दु:खी होण्याची एक वेगळीच अभिलाषा कायम दाटलेली असे. मॅटिनीची सुलतानला लिहिलेली ही पत्रं माझ्या आतल्या त्या भिकेच्या दारिद्र्याला खाद्य पुरवत. ती पत्रं वाचून पुढचा बराच काळ माझ्यापेक्षा आठ वर्षांनी मोठ्या असलेल्या माझ्या भावात आणि माझ्यात असाच दुरावा निर्माण व्हावा आणि त्याने मला अशीच दर्दभरी पत्रं लिहावी अशी दिवास्वप्नं मी पाहू लागलो. कालांतराने असा दुरावा खरोखरीच निर्माण झाला, पण तो वेगळ्या कारणांनी आणि अर्थात नात्यात पुरेसा ओलावा असूनही आमच्यात कधी अश्या प्रकारचा पत्र- वा इतर संवादव्यवहार झाला नाही.

आयुष्य नेमकं नको तेव्हाच आतवर मुरलेला हिंदी सिनेमा बेमालूमपणे छाटून टाकतं.

आपला भाऊ आपल्याला एवढी पत्रं लिहितो, तर आपणही त्याला एक पत्र लिहायला हवं असं सुलतानच्या मनानं घेतलं. त्याने माझ्या मागे “शेट. भायला पत्र लिवायचाय.”चा घोषा लावला. तेव्हा मी बहुदा तिसरीत असेन. शालेय आयुष्यातल्या पत्रलेखनाचे मसुदे वगैरे अजून किमान काही इयत्ता भविष्यात होते. पण परगावी असणार्‍या थोरामोठ्या नातलगांची पत्रं त्या काळात सातत्याने घरी येत. मी ती वाचतही असे. त्यामुळेच माझ्या मनातही कुणाला तरी पत्र लिहिण्याच्या अनावर आकांक्षेचे उमाळे त्या काळात वेळी-अवेळी कायम उसळी मारत. सुलतानने जेव्हा मॅटिनीला पत्र लिहिण्याचा विचार माझ्यासमोर मांडला तेव्हा मी तो पडत्या फळाच्या आज्ञेप्रमाणे झेलला. माझ्या आयुष्यातलं पहिलं पत्रलेखन हे एका व्यक्तीने तिसर्‍या व्यक्तीला दुसर्‍या व्यक्तीद्वारे लिहिलेला एक द्रविडी प्राणायाम होता. असा द्रविडी प्राणायाम मी पुढच्या आयुष्यात बरेचदा केला. त्यातल्या महत्त्वाच्या पत्रांत खुद्द मॅटिनीने स्वत:लाच लिहिलेल्या एका पत्राचा आणि रंजन रमाकांत रोडेने कुंतल देवधरला लिहिलेल्या पत्राचा समावेश होतो. पण त्याबद्दल पुढे कधी तरी.

मी सुलतानसाठी मॅटिनीला लिहिलेले पत्र हे माझ्या फसलेल्या लिखाणात अढळस्थान मिळवणारा ध्रुव तारा आहे. ‘मेरे प्यारे भाय’ अशी हृदयद्रावक साद घालणार्‍या मॅटिनीच्या शब्दांपुढे, सुलतानच्या उत्तरादाखल मी लिहिलेले ‘तीर्थरूप बंधुराज’ हे शब्द मला कायमच फिकेफिके आणि बेचव वाटत आलेले आहेत. ब्ल्यू नाईल, दिल्ली दरबार किंवा तत्सम हॉटेलांतल्या मटण बिर्याणीसमोर ‘क्षुधाशांती, आरोग्यभुवन’सारखी नावं असणार्‍या मराठी खाणावळीतल्या मुगाच्या डाळीच्या खिचडीसारखे! मॅटिनीच्या शब्दांत काळजात खोलवर रुतलेल्या हिंदी सिनेमाच्या भावुक संवादांचे आर्त होते, तर माझ्या शब्दांत मध्यमवर्गीय संस्कार झालेल्या नेमस्त परंपरेतला नीरस भावार्थ. मी सुलतानसाठी मॅटिनीला लिहिलेल्या पत्राची माझ्या स्मरणाच्या इतिहासात नोंद नाही. ते मॅटिनीला पोहोचलं का? त्याने ते वाचलं का? याविषयी मला काहीही माहिती नाही. पण ते माझं पहिलंवहिलं लिखाण होतं आणि ते माझ्याकडे कधीही परत आलेलं नसतानाही ते एक ‘साभार परत’ लिखाण होतं याची मला खात्री आहे.

भूतकाळातल्या प्रत्येक टप्प्यासाठी, वर्षासाठी आयुष्याने आपल्या स्मरणात एखादं तरी गाणं वहीत लपवल्या पिंपळपानासारखं दडवून ठेवलेलं असतं. कालांतराने त्याचं छान जाळीदार सोनं होतं. बदलत्या ऋतूंच्या प्रत्येक सांध्यावर उगवणारे नवे दिवस, नवे गंध भूतकाळातल्या त्या गीताची आठवण पहिल्या पावसामुळे दरवर्षी येणार्‍या, तरीही नावीन्यपूर्ण वाटणार्‍या मृद्गंधासारखी न चुकता जागृत करतात. साधारण माघ संपून फाल्गुनाचे दिवस सुरू झाले अणि संध्याकाळी हवेतल्या थंडाव्याला तडा देणारे उबदार वारे वाहू लागले, की माझ्या कानात आपोआपच ‘क्या करते थे साजना’चे प्रतिध्वनी फेर धरायला लागतात. चैत्र संपून वैशाखाचा वणवा तापू लागला की हेच कानात गुणगुणणारं गाणं एखादी एफएम वाहिनी बदलावी तसं बदलतं आणि त्याची जागा ‘जिहाले मस्कीन मकूनबरंजीश’ घेतं. वैशाख जेष्ठाकडे सरकला, की ‘डफलीवाले डफली बजा’ तर आषाढस्य प्रथम दिवसे ते गाणं ‘तेरी मेहेरबानीया, तेरी कदरदानीया’चा हृदयद्रावक टाहो फोडतं. लोक स्मरणरंजनावरून किती का खडे फोडेनात, एक नक्की; स्मरणरंजन पक्षपाती नसतं. आपण कितीही अभिरुचीसंपन्न झालो, अभिजन झालो तरी आठवणी गतकाळाशी कधीही प्रतारणा करत नाहीत.

ऋतू बदलतात, मास बदलतात तश्या आठवणी मनात दरवळणारी गाणीही बदलत राहतात. मॅटिनीची आठवण म्हणून माझ्या मनात डॉन सिनेमातलं ‘अरे दिवानोऽ मुझे पेहचानो’ हे गाणं घुमत असतं. म्हणूनच कदाचित मॅटिनीच्या गावातल्या प्रथमप्रवेशाची आठवण माझ्या मनात कायमच अँग्री यंग मॅन अमिताभच्या कोणत्याही लार्जर दॅन लाईफ सिनेमातल्या एंट्रीशी साधर्म्य साधते. मॅटिनी कौश्याहून गावी आला तोच थाटात. ज्या शहा रोडवेजमध्ये तो कामाला होता, त्याच रोडवेजच्या ट्रकमधून त्यानं आपला कुटुंबकबिला गावात आणला. खास मोराच्या केकाटण्यासारखा ध्वनी असणारा हॉर्न वाजवत मॅटिनीचा ट्रक गावातल्या बाजारपेठेतून आत शिरला तेव्हा पाहणार्‍या प्रत्येकाचे डोळे उत्सुक उत्तेजनेने ताणले गेले. ड्रायव्हिंग करणार्‍या मॅटिनीच्या शेजारीच ट्रकच्या पुढच्या केबिनमध्ये त्याची नवविवाहिता बेगम बसली होती. मॅटिनीची बायको म्हणजे परवीन. ती गावातल्याच जीना गोलंदाजच्या मुंबईतल्या चोर बाजारात स्थायिक झालेल्या जेष्ठ बंधुराजांची चौथ्या क्रमांकाची मुलगी.

मॅटिनी गावात शिरला आणि त्याने ट्रक येऊन थांबवला तो आमच्या दारात. त्या काळात आमच्या दारात ट्रक थांबणं ही काही नवलाईची गोष्ट नव्हती. आमचा स्वत:चा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय असल्यामुळे आमच्या दारात आमचेच नव्हे तर इतरांचेही ट्रकही वेळीअवेळी थांबत असत. पण या ट्रकचा दिमाख काही वेगळाच होता. कपाळावर नॅशनल परमिट लिहिलेला, पूर्ण बाह्यांगावर गोंडे आणि चकचकीची पखरण असणारा आणि मुळात काचेसमोर बॉनेट नसलेला तो एक एलपी बनावटीचा ट्रक होता. असा ट्रक आपल्या दारात थांबलाय हे पाहताच आधी वडील अवाक होत बाहेर आले. आपल्या मालकीचा एक तरी एलपी ट्रक असावा असं स्वप्न वडील मला आठवतंय तेव्हापासून कायम पाहत असत. एलपी ट्रक आणि निकोलस बॉडी असलेली महिंद्राची जीप हे वडिलांचं स्वप्न होतं. त्यांच्या हयातीत ते कधीही पूर्ण झालं नसलं; तरी ते गेल्यावर का होईना भावानं ते यथावकाश पूर्ण केलं. वडिलांच्या मागोमागच मीही दारातून बाहेर डोकावलो. तो काळच असा होता, की बाहेर चिमणी चिवचिवली तरी गावातली माणसं घराबाहेर डोकावत. एक उभा नवाकोरा आणि आजवर कधीही न पाहिलेल्या बनावटीचा धिप्पाड ट्रक घराबाहेर थांबताच माझी उत्सुकता कमानीतून सुटल्या तीराप्रमाणे दाराबाहेर पडली. मी बाहेर डोकावायला आणि ट्रकमधून मॅटिनी खाली उतरायला एकच गाठ पडली. ते मॅटिनीचं मला झालेलं पहिलं दर्शन होतं. गर्द हिरव्या रंगाचा शर्ट आणि त्या खाली मातकट रंगाची बेल बॉटम. डोळ्यावर गॉगल आणि कानावर केसांचे वाढलेले कल्ले. शर्ट इन केलेला आणि कंबरेभोवती नाभीखाली मोठाला बिल्ला असलेला चामड्याचा पट्टा. गावातल्या ‘गणेश हेअर कटिंग मार्ट’मध्ये वर्षानुवर्षं जीर्ण झालेलं ‘कच्चे धागे’ सिनेमाचं पोस्टर होतं. मॅटिनी आमच्या दारात त्या पोस्टरमधल्या विनोद खन्नाच्या थाटात उभा होता. मॅटिनीने डोळ्यांवरचा गॉगल काढला तेव्हा कुठे वडिलांनी त्याला ओळखलं. “अरे मोहम्मद!” असे उद्गार वडिलांनी तोंडून काढले आणि मॅटिनीने तात्काळ पुढे होत वडिलांना खाली वाकून नमस्कार केला. मग मॅटिनी आपल्या नवपरिणित वधूसह आमच्या घरात शिरला. त्याने सगळ्यांचे आशिर्वाद घेतले. आईने गावात नव्याने आलेल्या वधूवरांसाठी खास गोडाचा शिराही केला. मॅटिनीचे वडील इब्राहीम अली म्हणजेच इबू हा माझ्या वडिलांचा शागीर्द. वडील जेव्हा ट्रक ड्रायव्हर म्हणून मुंबईत काम करायचे तेव्हा इबू त्यांच्यासोबत क्लीनर होता. वडिलांनी पुढे स्वत:चे ट्रक घेऊन गावात व्यवसाय सुरू केला तेव्हा इबू तिथेही वडिलांच्या चाकरीत रुजू झाला. इबूच्या निष्ठेचा हाच वारसा कौसे सोडून गावी आलेला मॅटिनी पुढे चालवू पाहत होता. त्याने वडिलांकडे हलक्या स्वरात नोकरीची पृच्छा केली. वडिलांनी वरवरचं आश्वासन दिल्यासारखं करत हो म्हटलं खरं, पण त्या काळी आमच्या दोनही ट्रकवर आधीपासून ड्रायव्हर होते. त्यातला एक म्हणजे मॅटिनीचाच बाप इबू आणि दुसरा वरच्या आळीतला बच्चू धाडसे. दोघांपैकी एकाला कामावरून काढून मगच मॅटिनीला ड्रायव्हर म्हणून ठेवणं शक्य होतं. वडिलांपुढे कूटप्रश्न उभा होता, पण सप्ताहाभरातच इबूने आपली जागा मॅटिनीला देत तो सोडवला. इबूने पुत्रासाठी केलेल्या त्यागाची लोकांनी त्या काळातही वाहवा गायली. पुढे असाच त्याग मॅटिनीने सुलतान मोठा झाल्यावर बंधूप्रेमापोटी त्याच्यासाठी केला. अजूनही मॅटिनीच्या खानदानात त्यागाचे वारे काळवेळ न पाहता कधीही वाहत असतात.

मॅटिनीने मोठ्या थाटात गावात प्रवेश केला, तो आमच्या ट्रकवर ड्रायव्हर म्हणून रुजू झाला; आणि उभ्या गावाचं लक्ष त्याने स्वत:कडे वेधलं. रोज रंगीबेरंगी कपडे घालायचे, डोळ्यांवर गॉगल चढवायचा आणि लांब कल्ले कोरायचे यामुळे मॅटिनीचं कौतुक गावाच्या नजरेत अधिकाधिक ठसत गेलं. ज्या काळात हिंदी सिनेमातले हिरो फुलाफुलांचे रंगीबेरंगी कपडे घालत त्या काळातही मॅटिनीने आपलं वेगळेपण जपलं. तो शक्यतो भडक रंगाचे शर्ट घाली आणि त्यावरची पँटही अनेकदा त्याच रंगाची असे. म्हणजे लाल रंगाच्या शर्टवर लाल पँट, हिरव्यावर हिरवी, पिवळ्यावर पिवळी. रंगीलामधला पिवळ्या पँटवर पिवळा शर्ट घातलेला आमीर खान हाही मॅटिनीच्याच बहुरंगी वेशभूषेपासून प्रेरित आहे, याची मला खात्री आहे.
‘सिक्रेट हिस्टरी ऑफ इंडियन सिनेमा’मधली माझी दुसरी नोंद अर्थात ही असेल!

मॅटिनी गावात आला ते साधारण पंच्याऐंशी-शहाऐंशी साल असेल किंवा, कुणास ठाऊक, शहाऐंशी- सत्यांशीही. बालपणाला साल नसतं. असतात त्या निव्वळ इयत्ता. बालपण आठवायचं झालं तर इयत्ता आठवतात. भूतकाळ आठवताना सनावळी आठवाव्या लागणं हे मला कायमच वृद्धावस्थेचं लक्षण वाटतं. मी तेव्हा चौथीत होतो आणि मॅटिनी मुंबई कायमची सोडून गावात राहायला आलेला आहे, ही बातमी माझ्या वयाच्या सर्वच शाळकरी मुलांमध्ये चर्चेची बनली होती. मॅटिनी गावात येताच त्याच्याभोवती गावातल्या बहुजनांनी एकदम गर्दी केली. मॅटिनीभोवती एक वेगळंच आकर्षक वलय गावातल्या या गर्दीने तयार केलं. गावातली बहुजन आणि अभिजन, किंवा मासेस आणि क्लासेस ही श्रेणीरचना कधीही जात, घराणं किंवा अजून कोणत्याही भेदाभेद पाळणार्‍या निकषांवर केली जात नाही. ती नेहेमीच रुची आणि अभिरुचीच्या पारड्यात आपापली निवड टाकते. गावात मासेस आणि क्लासेस आजही एकाच घरात नांदताना पाहायला मिळतात. आमच्या गावाचंच त्या काळातलं उदाहरण द्यायचं झालं तर, जिथे दादा बापटांचे मोठे बंधू बापट वकील ‘घेई छंद’सारखी शास्त्रीय संगीतातली अभिरुची बाळगत तिथेच दादा बापटांची रुची मात्र ‘कुन्या गावाचं आलं पाखरू’मध्ये स्वत:चा जीव रमवी. गावात सहसा रुचींभोवताली गर्दी जमते आणि अभिरुचीची हुर्यो उडवली जाते. गाव अभिरुचीची शुभ्र कॉलर धारण केलेल्या सदर्‍यावर टवाळीचे शिंतोडे उडवतं. गावागावांतून जोवर अभिरुचीची रेवडी उडवली जातेय तोवर समाजातल्या कलास्वास्थ्याची चिंता करण्याचं कोणतंही कारण नाही असा माझा ठाम विश्वास आहे. या पार्श्वभूमीवर नुकताच शहरातून परतलेला मॅटिनी गावातल्या रुचिप्रिय लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला यात नवल असं काहीच नव्हतं. त्या काळात गावातल्या लोकांकडे सिनेमा पाहण्यासाठी शहरातल्या चित्रपटगृहांशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसे. तालुक्याच्या गावी म्हणजे रोह्याला आणि जवळच्या पेणला चित्रपटगृह होतं, पण तिथे बरेचदा दोन चार वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले सिनेमे लागत. लोक तेही पाहायला गर्दी करत. त्या काळात नव्या सिनेमांची उत्सुकता आजच्यासारखी ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’नंतर उतरणीला लागत नसे, तर विरजण लावल्या दह्यासारखी कालानुरूप जास्तीत जास्त घट्ट होत जाई. दर आठवड्याला प्रदर्शित होणार्‍या नव्या सिनेमांच्या बातम्या मायापुरीसारखी नियतकालिकं गावागावांतून न चुकता टाकीत आणि गावाची सिनेमाची उपेक्षा अधिकाधिक ठळक करीत. गावातले अनेक उत्साही सिनेप्रेमी दीड-दोन रुपयांची तजवीज करून वेळेला मिळेल त्या गाडीने तालुक्याच्या गावी म्हणजे रोह्याला जात आणि फिरोझ टॉकीजला लागला असेल तो सिनेमा पाहून येत. गावातला व्हिसीआरप्रवेश आणि व्हिडियो सेंटरची नांदी अजून वर्ष दीड वर्षं दूर होती. दूरदर्शनवरचा शनिवार संध्याकाळचा मराठी आणि रविवार संध्याकाळचा हिंदी सिनेमा अजूनही गावउंबर्‍याच्या आतबाहेरच होता. गावात त्या काळात फारसे टीव्ही नव्हते. ज्या हाताच्या बोटांवर मोजण्यापुरत्या लोकांकडे टीव्ही होते त्यांच्या घराला रविवारी संध्याकाळी जत्रेचं रूप प्राप्त होई. आमचं घर त्यातलंच एक. साधारण सिनेमा सुरू व्हायच्या अर्धा तास आधीपासून लोक घराभोवती जमायला लागत. काही लोक रस्त्यावर ताटकळत, काही उगाचच आपलं चढता येतंय म्हणून झाडावर चढून बसत. एके रविवारी धर्मेंद्रचा ‘शालिमार’ दूरदर्शनवर दाखवणार असल्याची बातमी गावभर झाली आणि आमच्या घराभोवती न भूतो न भविष्यति अशी गर्दी जमली. ती गर्दी पाहून नेमक्या त्याचवेळी मुंबईहून अचानक गावी आलेल्या माझ्या मामाच्या काळजात हृदयविकार असलेल्या माझ्या वडिलांच्या प्रकृतीच्या कुशंकेनं चर्र झालं. मामा आत आला तोच धडधडत्या हृदयानं. माजघरातच उभ्या वडिलांना पाहून मामाने मोठा नि:श्वास टाकला. रात्री सिनेमा संपून गर्दी ओसरल्यावर मटणाचं जेवण जेवताना मामाने विनोदाने मनात आलेला विचार सगळ्यांना बोलून दाखवला, त्यावर घरातले सगळेच हसले. मी हसलो का नाही कुणास ठाऊक; पण मला मामाचे ते उद्गार आजही स्पष्ट आठवतात. मामाची कुशंका आणखी काही वर्षांनी खरी ठरली. रविवारच्याच एके दुपारी वडिलांचा तडफडता मृत्यू मी माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहिला, तेव्हा मला मामाचे तेच उद्गार आठवले. इयत्तांच्या फूटपट्टीवर मापायचं झालं तर तेव्हा मी दहावीत होतो.

रविवारचा दूरदर्शनवरचा सिनेमा पाहायला येणारे लोक घरात भयंकर कचरा करत. तो कचरा सहसा शेवेचे तुकडे, चणे-शेंगदाण्यांची सालं, भुईमुगाच्या उकडलेल्या शेंगांची टरफलं आणि क्वचित उकडलेल्या अंड्यांच्या कवचाचा असे. हा कचरा पाहून वडिलांच्या अंगाचा तीळपापड होई. बरेचदा मग ते पुढच्या रविवारी लोकांना घरातच घेत नसत. तरीही लोक आशाळभूतपणे घराबाहेर थांबत, झाडावर चढून ताटकळत बसत. त्यांच्याकडे पाहून मग मध्येच वडिलांचं मन द्रवलं, की मग ते उदार अंत:करणाने अश्या लोकांना घरात येऊ देत. रविवारचा सिनेमा आपल्याला कायमचा निर्धोक पाहता यावा यासाठी काही लोक स्वत:हून स्वयंसेवकाची भूमिका अंगावर घेत. आमच्या अंगणात प्रवेश घेणार्‍या कुणाचेही खिसे तपासून मगच त्याला आत सोडत. सिनेमा चालू असतानाही गाणी लागली, की हे स्वयंसेवक संशयितांच्या तोंडाकडे लक्ष ठेऊन कुणी काही गुप्तपणे आत आणलेले खाद्यपदार्थ चघळतंय का याचा आढावा घेत. त्या काळात या स्वयंसेवकांनी स्वत:लाच काही विशिष्ट अधिकार बहाल करून घेतले होते. सहा वाजता सुरू झालेल्या सिनेमाला इंटरव्हल असे ते साडेसातच्या मराठी बातम्यांचं. या मध्यांतरात तट्ट फुगल्या फुग्यातून एकदम हवा जावी तसं आमचं माजघर रिकामंरिकामंसं होऊन जाई. या रिकाम्या माजघरात मग उभ्या गावाचा वास तुंबून राही. पाच मिनिटात सिनेमा पुन्हा सुरू झाला, की माजघर यथोचित भरून जाई आणि लोकांच्या गर्दीत गावाचा वास विरून जाई. साडेसातच्या बातम्यांच्या या मध्यांतरात बरेचदा परीट आळीतला विष्णू दोडके आमच्या घरासमोरच्या रस्त्यावर येऊन टोपलीत चणेशेंगदाणे विकायला बसे. कधीकधी जहरू मोहल्ल्यातला अलादीन साहेबराव उकडलेली अंडी विकायला बसे. नाम्या रहाळकरसारखे स्वयंसेवक या लोकांना पुडीभर दाणे आणि एखाद्या उकडलेल्या अंड्याच्या मोबदल्यात वडिलांच्या वक्रदृष्टीपासून वाचवत. गावात त्या काळात पाच-सहा टीव्ही होते. रामेश्वर मंदिरासमोर राहणार्‍या इंगळे आजी तर एरवी येणार्‍या एकटेपणापासून कंटाळल्याने लोकांना विनाशर्त मुक्त प्रवेश देत. इंगळे आजींचा मुलगा त्या काळात अमेरिकेत होता आणि त्याने त्यांच्यासाठी तिथून टीव्हीही आणला होता. असं असलं तरीही दर रविवारी सिनेमा पाहायला लोकांची सर्वाधिक गर्दी आमच्या घरीच व्हायची; आणि या गर्दीच्या केंद्रस्थानी दुसरंतिसरं कुणीही नसून मॅटिनी होता. मॅटिनी रविवारचा सिनेमा पाहायचा तो आमच्या घरीच. किंबहुना दर रविवारी लोकांच्या दृष्टीने आमच्या घरी सिनेमा पाहणारा मॅटिनी ही एक विशेष उपस्थिती असे. आदल्या दिवशी टीव्हीवर ‘उद्याचा चित्रपट’ची घोषणा झाली आणि सकाळच्या वर्तमानपत्रात ‘आजच्या चित्रपटा’चं नाव प्रसिद्ध झालं, की मॅटिनी एकदम कार्यरत होई. सिनेमा कोणताही असो, तो मॅटिनीने आधी पाहिलेला तरी असे किंवा त्या सिनेमाची इत्थंभूत माहिती तरी त्याला असे. मग त्या सिनेमाची भली-बुरी जाहिरात मॅटिनी मोठ्या हिरिरीने करे. शिवाय सिनेमा संपल्यावर आमच्या घरासमोरच्या सागाखाली उभं राहून मॅटिनी प्रत्येक सिनेमाचं स्वत:चं असं एक वैशिष्ट्यपूर्ण रसग्रहण करे. हे रसग्रहण कित्येकदा पहाटेपर्यंत चाले. एके वर्षी प्रजासत्ताक दिन नेमका सोमवारी आला. मी प्रात:काली उठून शाळेतल्या ध्वजारोहणासाठी बाहेर पडलो तेव्हा दारासमोरच्या सागाखाली आठदहा लोकांचं टोळकं शेकोटीवर हात शेकत बसलं होतं. त्या टोळक्याला आदल्या दिवशीच टीव्हीवर लागलेल्या संजीव कुमारच्या ‘नमकीन’ या सिनेमाचं निरुपण मॅटिनी एखाद्या निष्णात कीर्तनकाराच्या रसाळ वाणीतून देत होता.

“संजू कुमारला काय तुमी हिरो नाय बोलू शकत. मंज्ये काय झैला? पिच्चरमद्ये हिरो नाय. हिरोईन कुनाला बोलनार तुमी? पिच्चरमद्ये चारचार हिरोयनी. मंज्ये झैला काय? पिच्चरमद्ये हिरो पन नाय. हिरोइन पन नाय. ऐशी पिच्चर देकलीव कदी? हिरो नाय, हिरोईन नाय, फायटींग नाय. तरी तीन घंटे आपन पिच्चर देकत र्‍हयलो. मंज्ये पिच्चरमंद्ये दम हाय.”

ध्वजवंदनाला निघालेला मी मॅटिनीचं ते सिनेमाविवेचन कानावर पडून क्षणभर तिथेच रेंगाळलो. एवढ्यात वडिलांनी बाहेर येऊन सगळ्यांना पिटाळून लावलं तेव्हा कळलं मॅटिनीसह भोवताली जमलेली ती माणसं रात्रभर घरीच गेली नव्हती.

सिनेमा गावाच्या गात्रागात्रात भिनलेला असतो. गावाच्या मनामेंदूत तो मेंडोलीनप्रमाणे झंकारत असतो. काळजाची वीण कधी हलकेच छेडून तो दर्दभरे आर्त निर्माण करतो, तर कधी एखाद्या अस्सल तबलजीने तबल्यावर आरोह पकडावे तसा सिनेमा गावाच्या त्वचेवर उत्तेजनेचे रोमांच फुलवत राहतो. सिनेमा गावाचा आत्मा असतो. मॅटिनीने गावाच्या या आत्म्यात नवे प्राण फुंकले. मॅटिनीने गावाचं सिनेप्रबोधन कसं केलं याकडे येण्यापूर्वी ‘मोहम्मद पेडणेकर’चा ‘मॅटिनी मोहम्मद’ कसा झाला यामागची आख्यायिका जाणून घेणं अत्यावश्यक ठरतं.

मॅटिनी मोठ्या उत्साहाने कौसे सोडून आमच्या गावी आला आणि त्याच्या व्यक्तिमत्वातली झगमग पाहून वडिलांनी त्या काळात त्या मानाने नव्या असलेल्या टाटाच्या ‘बारा दहा डी’ मॉडेलची चावी त्याच्या हातीही सोपवली. खरंतर ‘बारा दहा डी’ तोवर वरच्या आळीतला बच्चू धाडसे चालवायचा. पण मॅटिनी आल्यावर बच्चूची पदावनती झाली. त्याला आमची जुनी रॉकेट मिळाली. यावरून बच्चू आणि मॅटिनीत काही काळ वैमनस्यही आलं होतं. रॉकेट पासष्ट सालचं मॉडेल, तर ‘बारा दहा डी’ साधारण ऐंशी सालचं. नव्या मॉडेलचा ट्रक चालवायला मिळूनही मॅटिनीच्या कपाळावर आठी चढलीच, अर्थात त्याने वडिलांना ती दिसू न देण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. पण आजवर निव्वळ बहारदार व्यक्तिमत्वाचे आणि एखाद्या मोठाल्या, पीळदार बॉडीबिल्डरप्रमाणे रस्त्यावरून धाक दाखवत वावरणारे एलपी मॉडेलचे ट्रक चालवणार्‍या मॅटिनीला ओपन फालक्याची ‘बारा दहा’ इंद्राच्या ऐरावतापुढे शामभट्टाची तट्टाणी वाटली. गावात येताक्षणी आयुष्यातल्या वास्तवाने समोर वाढलेल्या या विरोधाभासामुळे मॅटिनी विषादग्रस्त झाला. मनातल्या मनात खंतावू लागला. त्याचं रंगीबेरंगी व्यक्तिमत्व हळूहळू फिकं पडू लागलं. पण हिंदी सिनेमाच्या नायकानं त्याच्यात रुजवलेल्या चिवट जीवनेच्छेने त्याला या परिस्थितीवरही उपाय शोधण्याला भाग पाडलं. मॅटिनीला उपाय सापडला. गावाकडून अलिबागकडे जाणार्‍या पोयनाड रस्त्यावर गांधेफाट्यापाशी कांताशेठची राईस मिल होती. उभ्या तालुक्यात पिकणारा भात त्यांच्याकडे दळायला येई आणि नंतर तो देशभर वितरित करण्यासाठी त्यांच्याच वडीलधार्‍या बंधूंच्या चेंबूरच्या गोदामात पाठवला जाई. वडिलांची आणि कांताशेठची जुनी यारी. पण आजवर कधी दोघांची व्यावसायिक हातमिळवणी झाली नव्हती, ती मॅटिनीने घडवून आणली. कांताशेठकडे एक जुन्या डॉज मॉडेलचा ट्रक होता. तीस तेहेतीस त्या ट्रकचं नाव! त्या काळात आरटीओ रजिस्ट्रेशन नंबर, म्हणजेच वाहनांचे नंबर हीच त्या त्या वाहनांची नावं असत. नंबरवरूनच लोक वाहनांना हाका मारीत, संबोधीत. आमच्या एका ट्रकचं नाव होतं सत्याहत्तर पन्नास, दुसर्‍याचं त्रेसष्ठ ब्याऐंशी. मूसाशेठच्या एका ट्रकचं नाव बावन्न बावन्न होतं. तर कांताशेठच्या डॉजचं नाव होतं तीस तेहेतीस. ट्रकमध्येही त्यांच्या रुपड्यावरून साधारणत: स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असे भेद ठरत. म्हणजे रॉकेट आणि डॉज वगैरे बनावटीचे किंवा रुपड्याचे ट्रक सरळ सरळ स्त्रीलिंगी असत, तर थोडे मॉडर्न मॉडेल्सचे ट्रक पुल्लिंगी असत. असा लिंगभेद ठरवण्यासाठी त्या काळात कोणताही तांत्रिक निकष नसे. ट्रकमधील लिंगभेद पूर्णत: पाहणार्‍याच्या नजरेवरून ठरत.

कांताशेठची तीस तेहेतीस रस्त्यावरून चालू लागली की, घश्यातून एक विचित्रसा आवाज काढी. मॅटिनीने अनेकदा तो आवाज ऐकला होता आणि वेळ येताच संधी साधत त्याने कांताशेठच्या कानावर ‘शेठ इंजीन खोलायला लागेल, नाहीतर डाऊन होईल’ असे सूचनावजा शब्दही टाकले होते. मुंबईहून आलेल्या ज्ञानी मॅटिनीने कानावर टाकलेले शब्द कांताशेठचा मेंदू पोखरू लागले. दिवसेंदिवस त्यांना ‘तीस तेहेतीस’च्या घशातून येणारा आवाज जास्तच घोगरा वाटू लागला आणि ऐन भातदळणीच्या सुगीवर त्यांनी गावातल्या कुणाही जेष्ठ ट्रकतज्ज्ञाचा सल्ला न घेता ‘तीस तेहेतीस’च्या इंजिनाचं काम काढलं. ‘तीस तेहेतीस’च्या इंजिनाचं काम करायला खास पुण्यातल्या सातारा रोडवरच्या डिमेलो गॅरेजच्या आजीमभायना बोलावण्यात आलं. तिकडे ‘तीस तेहेतीस’च्या इंजिनाचं काम सुरू झालं आणि इकडे आमच्या त्रेसष्ठ ब्याऐंशीवर हूड चढायला सुरुवात झाली!

भातदळणीतून तयार होणारा तांदूळ फार काळ मिलमध्ये पडून राहणं कांताशेठला परवडणारं नव्हतं. त्यांनी वडिलांना विनंती केली आणि वडिलांनी आमचा एक ट्रक कांताशेठच्या दिमतीत रुजू केला. कांताशेठने आपल्याशी एका शब्दानेही सल्लामसलत न करता ट्रकच्या इंजिनाचं काम सुरू करावं हे मात्र वडिलांना बुचकळ्यात पाडून गेलं. ट्रकतज्ज्ञ म्हणून वडिलांची जिल्ह्यात ख्याती होती. गावातला कोणताही ट्रक निव्वळ इंजिनाच्या आवाजावरून ते घरबसल्या ओळखत. जिल्ह्यात कोणालाही ट्रक घ्यायचा असेल तर ट्रकच्या पूर्वतपासणीसाठी ती ती व्यक्ती निरीक्षक म्हणून वडिलांना घेऊन जाई. त्या काळात नवे ट्रक कुणी घेतच नसे. साधारणत: सहा ते कितीही वर्षं जुने ट्रकच विकत घेणं लोकांना परवडे. साधारणतः नारायणगाव, मंचर, चाकण आणि आळेफाटा हे जुने ट्रक मिळण्याचे बाजार समजले जात. ट्रक विकत घेणं हा त्या काळात एक मोठा उपद्व्यापी सोहळाच असे. वडिलांच्या पश्चात जेव्हा आमचा ट्रकचा व्यवसाय नोकरीनिमित्ताने परदेशी जाण्याआधी काही काळ भावाने सांभाळला, तेव्हा भावासोबत मी एकदा अश्याच ट्रकशोधार्थ पार बेळगावपर्यंत जाऊन आलो होतो. शेवटी बेळगावात भावाला मनाजोगता ट्रक मिळाला आणि आमचा ट्रकशोध संपला. ते एकोणीसशे पंच्याण्णव साल होतं. या ट्रकशोधाची कहाणी एखाद्या खजिन्याच्या शोधापेक्षा जास्त रोचक आहे. पण तो आताचा विषय नव्हे.

त्या काळात आमचे दोनही ट्रक ओपन फालक्याचे होते आणि मॅटिनीला नेमका ओपन फालक्याच्या गाड्यांचा तिटकारा होता. ट्रकच्या मागच्या भागात जिथे सामान ठेवलं जातं, त्या भागाकडच्या तीनही बाजूच्या लाकडी तटबंदीला फालका म्हणतात. हा फालका ट्रकच्या बॉडीच्या मागच्या लाकडी तळाशी जेव्हा कायमस्वरुपी ठोकून बंद केलेला असतो, तेव्हा त्याला पॅक फालका म्हणतात आणि जेव्हा तो नटबोल्ट आणि रॉडच्या सहाय्याने लाकडी तळाशी खालीवर करता येण्याजोगा जोडलेला असतो तेव्हा तो ओपन फालका बनतो. डंपरचा उदय होण्याआधीच्या दिवसात साधारणत: वीट, डबर, रेती, खडी अश्या स्थानिक मालाची वाहातूक या ओपन फालक्यामुळे सुकर व्हायची. खुंटी काढून फालका उघडला, की रेतीसारखा वहनशील माल अर्ध्याहून अधिक आपोआपच विनासायास बाहेर पडायचा. ओपन फालक्याचे ट्रक मजुरांचं काम सोपं करत, पॅक फालक्यात फक्त ट्रकची मागची बाजू उघडता येत असल्यामुळे असे ट्रक मजुरांची सत्त्वपरीक्षा पाहत. त्यामुळे त्या काळात पॅक फालक्याच्या ट्रकमध्ये सामानाची चढउतार करायला ओपन फालक्याच्या मानाने जास्त मजुरी द्यावी लागे. ओपन फालक्याचे ट्रक नटबोल्टने जोडलेले असल्याने बरेचदा प्रचंड आवाज करीत. असे ‘गडमगुडूम’ आवाज करणारे ट्रक मुंबईत मोठमोठाले श्रीमंत ट्रक चालवलेल्या मॅटिनीच्या कायम कानात जात.
त्रेसष्ठ ब्याऐंशीवर हूड चढलं. हूड चढवण्यासाठी मॅटिनीने स्वत: मेहनत घेतली. फालक्याच्या दोनही बाजूंनी धातूच्या कमानी जोडून त्यावर ताडपत्री आणि रस्सी बांधली जात जेव्हा त्रेसष्ठ ब्याऐंशीचं हूड साकारलं गेलं, तेव्हा मॅटिनीला गदगदून आलं. हुडातली त्रेसष्ठ ब्याऐंशी एखाद्या पदरओढल्या नवपरिणित वधूसारखी दिसत होती. दुसर्‍या दिवसापासूनच मोहम्मद पेडणेकरचा मॅटिनी मोहम्मद बनण्याकडचा प्रवास सुरू झाला.

गांधे फाट्यावरून सकाळी आठ वाजता ट्रकमध्ये नुकताच दळलेला भाततांदूळ भरायचा आणि चेंबूरकडे कूच करायचं हा मॅटिनीचा दिनक्रम बनला. सकाळी आठ वाजता निघालेला ट्रक साधारणत: अकरा वाजेपर्यंत चेंबूरमध्ये पोहोचे. कांताशेठच्या ज्येष्ठबंधूंच्या गोदामात उभ्या महाराष्ट्रातून तांदूळ येत असे. त्यामुळे ट्रकमधून तांदळाची पोती रिकामी करायला मोठाली रांग असायची. आमच्या ट्रकचा नंबर लागून तो रिकामा होईस्तोवर बरेचदा दुपारचे दोन वाजत. अश्या वेळी नुस्त्या विड्या फुंकून फुंकून मॅटिनी कंटाळे. कांताशेठच्या ज्येष्ठबंधूंच्या त्या कंटाळवाण्या रणरणत्या वाळवंटरूपी गोदामात मोहम्मदला अचानकच दोन मरुद्यानं दिसली. ती मरुद्यानं होती चेंबूरमधली सहकार आणि नटराज ही सिनेमागृहं! एकदा का ट्रक आणून गोदामाच्या रांगेत उभा केला, की मोहम्मद ट्रकची चावी क्लीनरकडे देऊन स्वत: नटराज किंवा सहकारपैकी एके ठिकाणी मॅटिनी शो पाहायला जाऊन बसे. दवा खान त्या वेळी मॅटिनीसोबत ट्रकवर क्लीनरचं काम करे. दवा खानचं खरं नाव खलील दावूद खान, पण उभं गाव का कुणास ठाऊन त्याला ‘दर्द की दवा’ म्हणे. यावरूनच पुढे कधीतरी त्याचं नाव दवा खान पडलं. दवा खानला ट्रक पुढेमागे घेणं, गरजेनुसार इकडेतिकडे करणं एवढं काम जमायचं. दवा खान आज पंचावन्न वर्षांचा आहे आणि तो तहहयात क्लीनरच राहिलाय. आखातात जाऊन तिथले लोण्याप्रमाणे मृदू स्टियरींग असणारे ट्रक चालवण्याचं स्वप्न त्याने आईच्या पोटात असल्यापासून पाहिलं, पण गावाने त्यात त्याला कधीही यश येऊ दिलं नाही. मधल्या काळात मोठ्या शाळेच्या विस्तीर्ण प्रांगणात मूसांचा ट्रक रिव्हर्स घेताना पूर्ण उलटा करण्याचं कसब दवा खानने गावाला दाखवलं. तेव्हापासून गावाने त्याची कुत्सित हसत ‘खलील पलटी’ किंवा ‘पलटी दवा’ असं म्हणून अवहेलना केली. त्यानंतर दवा खानच्या हाती कधीही गावानं खर्‍या ट्रकचंच काय खेळण्यातल्या ट्रकचंही स्टियरींग दिलं नाही.

गाव एखाद्या आयुष्याची कधीकधी क्रूर चेष्टाही करतं.

मधला वेळ घालवण्यासाठी मॅटिनी नटराज आणि सहकार सिनेमागृहात सिनेमांचे रतीब टाकू लागला आणि त्याची गावी आल्यापासून सुस्तावलेली सिनेरसिकता कात टाकल्या सापाप्रमाणे पुन्हा तकतकीत झाली. रोज न चुकता नवनवीन किंवा तेच ते सिनेमे पाहायचे आणि रात्री गावी परतल्यावर त्या सिनेमांच्या ष्टोर्‍यांचं कीर्तन गावकर्‍यांना जमवून त्यांच्यासमोर गायचं हा मॅटिनीचा दिनक्रम बनला. अशातच पहाटेच्या रोहा-मुंबईने एकदा काही कामानिमित्त दादरला गेलेले माझे वडील दुपारी परतताना आपल्याच ट्रकने यावं असा विचार करून अचानकच चेंबूरच्या गोदामी हजर झाले, तेव्हा ट्रकजवळ मॅटिनी नाही हे पाहून त्यांनी दवा खानकडे “मोहम्मद कुठाय?” अशी विचारणा केली. त्याने तो “मॅटिनीला गेलाय.” असं उत्तर दिलं. वडिलांचा आणि सिनेमाचा तसा बादरायणच संबंध. वडिलांनी सिनेमागृहात जाऊन पाहिलेला एकमेव सिनेमा होता ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’. त्यांना मॅटिनी शब्दाचा अर्थ कळणं दुरान्वयानेही शक्य नव्हतं. मॅटिनीचा अर्थ काळाच्या मानाने थोडं पुढचंच इंग्रजी ज्ञान असणार्‍या माझ्या वडिलांनीही कसा कुणास ठाऊक ‘लॅट्रीन’ असा घेतला. दोन तास झाले तरी मोहम्मद लॅट्रीनहून का परतत नाही हा प्रश्न वडिलांना भेडसावू लागल्यावर क्लिनर दवा खानने त्यांना मॅटिनीचा नेमका अर्थ उलगडून सांगितला. मॅटिनी म्हणजे सिनेमागृहातला दुपारच्या बाराचा शो, हा अर्थ लागल्यावर वडील हर्षभरित झाले. त्यांच्या इंग्रजी शब्दकोशात एका नव्या शब्दाची भर पडली. गावी येताच वडीलांनी ही हकीकत शहासन्यांच्या ओटीवर ब्रिज खेळणार्‍या सहकार्‍यांना सांगितली. ती हकीकत मूसांच्या सिगरेटचे उष्टे धूर स्वत:च्या फुप्फुसात ओढून घेणार्‍या महाकाल गोठणेकरने ऐकली. मग ती गावभर झाली. मोहम्मदमागे मग ‘मॅटिनी’ चिकटायला वेळ लागला नाही. गावाने बहाल केलेली मॅटिनी ही उपाधी मोहम्मदने भारतरत्न प्राप्त झाल्याच्या प्रतिष्ठेने स्विकारली. पुढे मॅटिनी या नावाने मोहम्मद इतका पछाडला, की त्याने “ट्रकच्या कपाळपट्टीवर तुम्ही मॅटिनी एक्स्प्रेस रंगवा.” अशी गळ वडिलांना घातली. वडिलांनी त्यावर “तू उद्या नोकरी सोडून गेलास तर?” असा प्रतिप्रश्न उपस्थित करताच मोहम्मदने “मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो” असं वचन वडिलांना दिलं. वडील धर्मसंकटात पडले, पण त्यांनी कपाळपट्टीवर नाही तर ट्रकच्या मागच्या फालक्यावर मोहम्मदला ‘मॅटिनी एक्स्प्रेस’ असं ठळक अक्षरात रंगवण्याची परवानगी दिली. मोहम्मदने तात्काळ गावातले पहिले पेंटर आणि त्याचे सावत्र आजोबा नसरू लंबातेंना बोलावून रंगकाम साकारलं. मग ‘मोहम्मद पेडणेकर’चं ‘मॅटिनी मोहम्मद’ हे नामकरण ‘मुंबई-गोवा’ महामार्गावरच्या प्रत्येक मैलाच्या दगडाच्या कानापर्यंत पोहोचलं.

पुढे जवळपास पाऊस सुरू होईस्तोवर मोहम्मदने सहकार आणि नटराज सिनेमागृहात मॅटिनी शोजचा रतीब घातला. पावसाळ्यात जसं भात गोदाम बंद झालं आणि वडिलांनी ट्रक ‘नॉन-यूज’ केला तसा मॅटिनीने आपल्या रिकाम्या वेळेचा मुक्काम नाकेदारांच्या हॉटेलात वळवला. फ्रीजजवळच्या कोपर्‍यातलं एरवीपेक्षा जास्त अंधारं आणि मळकट टेबल मॅटिनीसाठी अघोषितरीत्या राखीव झालं. दरवर्षी भातदळणीच्या मोसमात चेंबूरच्या सिनेमागृहांत मॅटिनी शोज पाहायचे आणि मग येणार्‍या पावसाळ्यात त्या पाहिलेल्या सिनेमांचा उत्सुक गावकरी गोळा करून रवंथ करायचा हा मॅटिनीचा शिरस्ता बनला.

नाकेदारांच्या हॉटेलात बसून सिनेमांचा रवंथ करताना मॅटिनी प्रत्यक्ष उदरभरणासाठी कायम उसळपाव खाई. त्याचे पैसेही त्या रसाळ रसग्रहणाला साक्षी असणारा एखादा रसिक न सांगता काउंटरवर चुकते करे. मॅटिनीला उसळीसोबत पावही लागत ते, न जाणो कोणत्या काळात सुरू झालेल्या पण नाव अजूनही मॉडर्न असलेल्या, शेजारच्याच बेकरीतले. नाकेदार मॅटिनीसाठी खास तिथून पाव आणण्याची तजवीज करत. गरम गरम आणि हाताला मऊसूत स्पर्श करणार्‍या पावांची जोडी आणि वाफाळणारी उसळ समोर आली की मॅटिनीची सिनेकीर्तनाची कळी विशेष खुले. मॉडर्न बेकरीतले पाव हाताला कायमच उष्ण आणि मऊमृदू लागत. माझ्या वर्गातल्या वसंता बापटचा काका अभिराम बापट नाकेदाराच्या हॉटेलात आला, की किती तरी वेळ मॉडर्न बेकरीतले ते पाव हातात घेऊन कोपर्‍यातल्या कोळिष्टकांकडे पाहत निरुद्देश बसून राही. समोरची मिसळ हळूहळू थंड होई. रश्श्यात बुडालेल्या शेवपापडीचा मऊ लगदा होउन जाई; पण अभिरामची कोपर्‍यातल्या कोळ्याच्या जाळ्याकडे लागलेली तंद्री काही तुटत नसे. तो हे असं का करत असेल या विषयीचा अंदाज मी वसंताकडे मांडला असता, वसंता म्हणाला होता, “काकाला वाटतं, की त्याने हातात घेतलेला पाव, पाव नसून जयवंतांच्या मृणालचा हात आहे!”

मी हे ऐकून हरखून गेलो. जयवंतांच्या मृणालने गावाच्या नाकावर टिच्चून जिताडेबाबांच्या सदोबाशी लग्न केल्याने अभिराम बापटचा झालेला प्रेमभंग सर्वश्रुत होता. नंतरचा मोठा काळ मी आपलाही प्रेमभंग झालाय आणि आपणही तो पाव हातात घेऊन प्रेमाचा दु:खालाप आळवत नाकेदाराच्या हॉटेलात बसलोय असं दिवास्वप्न पाहण्यात घालवला. मी माझं हे दिवास्वप्न जेव्हा वसंताला सांगितलं, तेव्हा त्याने निरागसपणे विचारलं, “पण तुझा प्रेमभंग करणार कोण?” यावर माझ्याकडे तेव्हा उत्तर नव्हतं, पण निरुत्तर होण्याचा स्वभाव नसल्याने मी बोलून गेलो, “प्रेमभंग होण्यासाठी तो कोणी करायलाच हवा असं नाही.”

गाव तुम्हाला सिनेमाचे संवादही शिकवतं!

व्हिडियो सेंटरची नांदी होण्याच्या खूप आधीपासून ते अगदी अलीकडच्या काळापर्यंत गावात मोकळ्या मैदानांवरून वा आळ्याआळ्यांमधल्या चौकाचौकांतून दाखवले जाणारे ओपन सिनेमे हा गावाची सिनेमाची भूक भागवण्याचा अजून एक हुकमी मार्ग होता. दत्तजयंतीच्या निमित्ताने गावात दररोज रात्री एकेक असे सलग तीन दिवस सिनेमे दाखवत. शिवाय शिवजयंती, शिवरात्री, अध्येमध्ये गावातल्या छोट्यामोठ्या मंडळांतून किंवा वस्त्यांमधून होणार्‍या सत्यनारायणाच्या पूजा हीसुद्धा या ओपन सिनेमांसाठीची निमित्तं ठरत. अशा प्रकारचे सिनेमे दाखवण्याचा मुख्य व्यवसाय करण्यासाठी आमच्या जिल्ह्यातले मुंब्र्याचे मुंबईकर आणि पेणचे अजून एक व्यावसायिक प्रसिद्ध होते. मोकळ्या जागेत प्रोजेक्टर लावून समोर काही अंतरावर पडदा बांधून हा सिनेमा दाखवण्याचा प्रकार तेव्हा गावोगावी चाले. लोक अशा सिनेमांना अफाट गर्दी करत. मॅटिनी गावात आला आणि अश्या प्रकारच्या सिनेमानिवडीसाठीचा मुक्त सल्लागार बनला. कोणता सिनेमा दाखवावा यासाठी गावात सहसा आयोजक मॅटिनीशीच संवाद साधत. ही सिनेमानिवड मोठ्या विचक्षण रीतीने करून मॅटिनीने गावाच्या अभिरुचीचा तोल कायमच सावरला. म्हणजे एके नवरात्रीत गावाच्या स्थानिक कमिटीने सिनेमे दाखवायचे ठरवले तेव्हा मॅटिनीकडे जणू कुबेराच्या खजिन्याची पेटी उघडण्याची चावीच स्वत:हून चालत आली. त्यावर्षी दाखवलेले ते सिनेमे मला आजही स्पष्ट आठवतात. त्या काळात अशा सिनेउत्सवाच्या प्रसंगी पहिल्या दिवशी साधारणत: धार्मिक सिनेमे दाखवायचा प्रघात होता. ‘जय संतोषी माँ’, मनोज कुमारचा ‘शिर्डी के साईबाबा’, सचिनचा ‘अष्टविनायक’ हे अश्या निमित्ताने गावोगावी सर्रास दाखवले जाणारे धार्मिक सिनेमे होते. मॅटिनीने हा प्रघात मोठ्या खुबीने मोडला. गावकीच्या सभेत त्याने अमिताभ बच्चनचा ‘नास्तिक’ हा सिनेमा कसा धार्मिक आहे हे हिरिरीने पटवून दिले. यावर वाद झडले, गुद्दागुद्दीही झाली, पण गावकीने मॅटिनीची निवड मान्य केली. मग पहिल्या दिवशी धार्मिक सिनेमा म्हणून अमिताभ बच्चनचा ‘नास्तिक’, दुसर्‍या दिवशी दादा कोंडकेंचा ‘पांडू हवालदार’, मग जॅकी श्रॉफचा ‘अल्लारखा’, मग ‘फांदेबाज-कातिलों के कातिल-चरस-हुकुमत-प्रतिज्ञा’ अशी, मॅटिनीच्या गळ्यातला ताईत असणार्‍या धर्मेंद्रच्या सिनेमांची माळ, मग नवमीच्या दिवशी पुन्हा अमिताभ बच्चनचा ‘सुहाग’. ‘सुहाग’मध्ये ‘ओ शेरोवाली’ गाण्यावर टिपर्‍या वाजवत नाचणारी रेखा आणि अमिताभ बच्चन होते. या सिनेमानं गावाच्या इतिहासातली अभूतपूर्व गर्दी खेचली. याच सिनेमानं गावातल्या दांडियाची मुहूर्तमेढही रचली. सुहागमधलं ‘ओ शेरोवाली’ सुरू होताच गावातले वेगवेगळ्या वयातले स्त्री-पुरुष काळवेळेचं भान विसरून पडद्यासमोरच भक्तीनृत्य करू लागले. काहींनी जवळपासच्या झाडाच्या फांद्या तोडल्या आणि त्या फाद्यांचा वापर टिपर्‍या म्हणून केला. सिनेमा चालू असताना ‘वन्स मोअर’ मिळणं ही एक नियमित घटना असेल, पण तो वन्स मोअर स्वीकारला जाण्याची अभूतपूर्व आणि एकमेवाद्वितीय घटना त्या दिवशी गावात घडली. ‘ओ शेरोवाली’ गाणं पुन्हा पुन्हा वाजवण्याची विनंतीवजा धमकी प्रोजेक्टर ऑपरेटरला देण्यात आली. त्यानेही ते तेवढे सोपे नसणारे काम रीळ तुटू न देण्याची तारेवरची कसरत करत निभावून नेले. तो दिवस गावाच्या इतिहासात आजही सुवर्णाक्षरात नोंदवला गेला आहे. रामेश्वर मंदिराच्या प्रांगणात गेलं की सळसळणारा अश्वत्थ आजही त्या आठवणींची सुवर्णाक्षरांकित पाने सांडतो.

या पार्श्वभूमीवर ज्या दिवशी खरा उत्सव साजरा व्हायचा तो दसर्‍याचा दिवस मात्र उपेक्षित राहिला. म्हणजे दसर्‍याच्या दिवशीही दहावा सिनेमा दाखवला गेला, पण तो खास मॅटिनीने स्वत:चं वजन वापरून गावाच्या बोकांडी मारलेला सिनेमा होता. तो सिनेमा पाहायला लोकांची गर्दी जमली खरी, पण ती अगदी सिनेमाचं शीर्षक येताच ओसरायला लागली. पहिल्या अर्ध्या तासातच रामेश्वर मंदिराच्या प्रांगणात शुकशुकाट झाला. मध्यांतरानंतर प्रोजेक्टर ऑपरेटर आणि मॅटिनी वगळता सिनेमा पाहायला चिटपाखरुही उरलं नाही. सिनेमा संपल्यावर मॅटिनी एकटाच घरी परतला तेव्हा सर्वत्र शुकशुकाट होता. गावानं लुटलेलं आपट्याचं सोनं तेवढं रस्त्यावर बेवारस विखुरलं होतं. मॅटिनीसाठी ही घटना म्हणजे त्याच्या सिनेरसिकतेच्या प्रतिष्ठेवरचा एक भलामोठा डाग होता. या अपयशाने अस्वस्थ मॅटिनी त्या रात्री घरी गेलाच नाही. तो अर्ध्या वाटेतूनच रामेश्वर मंदिराकडे माघारी परतला. दहा दिवसांची सुपारी संपवून आपलं सिनेमाचं सामान भरून पुन्हा मोर्ब्याला परतणारा मुंबईकरांचा टेम्पो मॅटिनीने थांबवून धरला. त्याने मुंबईकरांच्या मुलाला अजून एक दिवसाने सुपारी वाढवण्याची गळ घातली. प्रसंगी स्वत:च्या खिशातले पैसे काढून मुंबईकरांच्या मुलाला दिले. मुंबईकरांच्या टेम्पोचा गावातला मुक्काम अजून एका दिवसाने वाढला. पहाट होताच मॅटिनीने आयोजकांच्या घरी जाऊन त्यांना काय पट्टी पढवली कुणास ठाऊक! पण त्याने या एका दिवसाच्या अधिकच्या सिनेमासाठी आयोजकांना तयार केलं. मग मॅटिनीने गावातल्या प्रत्येक घराचं दार वाजवून घरातल्या सदस्यांशी त्या सिनेमाविषयी संवाद साधला. सर्वप्रथम जहरू मोहल्ला, मग हुजरा मोहल्ला, मग खान मोहल्ला, मग बाजार पेठ, मग परीट आळी, मग वरची आणि खालची आळी, मग बौद्ध वस्ती, मग आमची प्रभू आळी असं करत मॅटिनी जेव्हा ब्राम्हण आळीत पोहोचला तेव्हा तिन्हीसांज झाली होती. रात्रभर न झोपल्याने डोळे लालझाल्या, केसपिंजारल्या मॅटिनीने नुकत्याच संध्या उरकलेल्या बापट वकिलांचं दार ठोकलं तेव्हा क्षणभर वकिलांच्या कपाळावर आठी गेलीच; पण मॅटिनी हटला नाही. आदल्या रात्री लोकांची गर्दी खेचू न शकलेल्या त्या अपयशी सिनेमाचं असं काही रसग्रहण त्याने गावातल्या सर्वोच्च अभिरुचीच्या त्या इसमाकडे केलं, की वकीलही स्तंभित झाले! मग मॅटिनीने त्या सिनेमाची गीतं संगीताचा विशेष कान असलेल्या त्या पंडितासमोर गुणगुणून दाखवली. सिनेगीतांचा असला मोहक आणि काव्यमय आविष्कार बापट वकिलांसाठी नवा होता. आळ्याआळ्यांतून, वस्त्यावस्त्यातूंन विखुरलेल्या आपल्या समर्थकांद्वारे वकिलांनी तात्काळ फतवा फिरवला. त्या अधिकच्या रात्री दाखवला जाणारा आदल्या दिवशीचा सिनेमा पाहायला साक्षात बापट वकील हजर राहाणार होते. संध्याकाळी नऊ वाजता प्रोजेक्टरच्या डाव्या हाताला मॅटिनी आणि उजव्या हाताला वकील बसले आणि ऑपरेटरने पुन्हा एकदा तोच सिनेमा सुरू केला तेव्हा रामेश्वर मंदिराचं प्रांगण तुडुंब भरलं होतं. पुढला अडीच-तीन तास नसीर आणि रेखाच्या अभिनयाच्या रसायनात गाव डुंबत राहिलं. या रासायनिक प्रक्रियेत उत्प्रेरक म्हणून काम करायला गुलजारांच्या लेखणीने आरडीच्या मधाळ संगीतात भिजवलेली गीतं होती. सिनेमा संपला तेव्हा कुणीही टाळ्याशिट्या वाजवल्या नाहीत. गाव मूक होऊन घरी परतलं. सिनेमा प्रेक्षकांचा अंत:करणास भिडण्यासाठी कायम मेलोड्रामाच अत्यावश्यक असतो असं नाही, हे मॅटिनीने त्या दिवशी गावासह उभ्या जगाला दाखवून दिलं. तो सिनेमा होता गुलजारांचा ‘इजाजत’! ‘इजाजत’चं बॉक्स ऑफिसवरचं नशीब काय असेल ते असो, पण गावात मात्र दुसर्‍या फेरीत तो सुपर डुपर हिट झाला होता.

एखादा सिनेमा लोकांना बघायला लावण्याच्या मॅटिनीच्या कसबाचं अजून एक उदाहरण पाहिल्याशिवाय मॅटिनी चरित्राला पूर्णत्वाकडे नेता येणार नाही. जो लोकांनी पाहावा म्हणून मॅटिनीने जंग जंग पछाडले तो आणखी एक सिनेमा होता अमिताभ बच्चनचा ‘शान’! ‘शान’ प्रदर्शित झाल्याझाल्या धारातीर्थी पडला होता. काही वर्षांनी पेणच्या अनंत टॉकीजला ‘शान’ लागला. पेण एसटी स्थानकासमोरच असणारं हे जुनं सिनेमागृह नंतर पाडण्यात आलं, पण त्या काळी गावातल्या लोकांची त्या मानाने नव्या (प्रदर्शित झाल्यावर तीन चार वर्षांनी येणार्‍या) सिनेमांची भूक भागवणारं ते एकमेव जवळचं ठिकाण होतं. मॅटिनीने ‘शान’ त्या आधीही आपल्या मॅटिनी शोजच्या रतीबादरम्यान अनेकदा पाहिला होता. तो पाहून मॅटिनी हरखून गेला होता आणि त्याच्या मते भारतीय सिनेमाच्या इतिहासातला तो एक महत्त्वाचा सिनेमा होता. त्याच्याच भाषेत सांगायचं झालं तर, “असली पिच्चरच बनली नाय अजून तक!” ‘शान’चे गुणगान गाताना मॅटिनीची वाणी कधीही थकायची नाही. असं असलं तरी ‘शान’च्या अपयशाच्या वार्ता तोवर सर्वदूर पसरल्या होत्या. यशाची पताका कायम आभाळात झळकते, ती पाहण्यासाठी मान वर करावी लागते. अपयशाचा मात्र कचरा होतो आणि तो वार्तेच्या वार्‍यावर सर्वदूर पसरतो. तो पायदळी तुडवला जातो आणि पायानेच दूर सारला जातो. मॅटिनीचं शानप्रेम ‘शान’च्या अपयशाच्या वार्‍यांपुढे केव्हाचंच नमलं होतं. एरवी मॅटिनीचं सिनेमाविषयीचं मत बिलकुलही खाली पडू न देणारे गावकरी त्याने ‘शान’चा विषय काढल्यावर मात्र “शान सोडून बोल मोहम्मद.” असं म्हणून पाठ फिरवत. मॅटिनीने सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केलं, पण ज्याक्षणी शान पेणच्या अनंत टॉकीजला लागतोय ही बातमी त्याच्या कानावर पडली त्याक्षणी मॅटिनीने खिंड लढणार्‍या बाजीप्रभूसारखी कंबर कसली. गावातल्या जवळपास प्रत्येकाने ‘शान’ पाहावा यासाठी मॅटिनीने बाह्या सरसावून प्रयत्नांची शर्थ केली. सर्वप्रथम त्याने आमच्या घरून वडिलांच्या मिनतवार्‍या करून नव्याने आणलेला टेपरेकॉर्डर चार दिवसांसाठी उसना घेतला. मूसांकडून ‘शान’ची ऑडियो कॅसेट मिळवली आणि आधीच लोकप्रिय झालेलं ‘शान’चं संगीत नाकेदारांच्या हॉटेलात वाजवून वाजवून अधिकाधिक लोकप्रिय केलं. त्यातही ‘प्यार करनेवाले प्यार करते है शानसे’ या गाण्यातले मधले म्युझिकपीस वारंवार वाजवून त्याने गावातल्या लोकांचे म्युझिकल अ‍ॅड्रनलिन वाढवले. मग त्याने त्या काळात हेलिकॉप्टरमधून घेतलेल्या ‘शान’मधल्या एरियल शॉट्सचे, कुत्र्यांनी केलेल्या सुनील दत्तच्या पाठलागाचे आणि शाकालच्या त्या शोलेतल्या गब्बरपेक्षाही अद्भुत असणार्‍या अड्ड्याचे साग्रसंगीत वर्णन करून लोकांचं लक्ष वेधलं. पार्श्वभूमीवर संगीत असेल तर कोणतीही गोष्ट लोकांच्या गळी उतरवता येते हे मॅटिनी नाकेदारांच्या हॉटेलात शानची गाणी पुन्हा पुन्हा वाजवून सिद्ध करू पाहत होता. शेवटच्या काही दिवसांत तर मॅटिनीने बैलगाडीवर लाऊडस्पीकर बांधून शानच्या उद्घोषणा करणारी जाहिरातही केली. लोकांनी शान पहावा यासाठी मॅटिनीने हरएक प्रयत्न केले. गावातल्या शहा अलींच्या दर्ग्यामागच्या पडक्या डाकबंगल्यात राहाणार्‍या नूर भिखारीसमोर मॅटिनीने शानची अशी स्तुतीसुमनं उधळली, की तो पुढचे काही दिवस गावातल्या लोकांकडे ‘एक चम्मच सालन और मुठ्ठीभर चावल’ची याचना करण्याऐवजी ‘मिलके देखेंगे शान’चे आर्जव करू लागला. नूरचे पाय पूर्वी कधीतरी झालेल्या अपघातात गुडघ्यापासून गेले होते. तो चाकं असलेल्या लाकडी फळीवरून गावभर फिरत लोकांकडे उपजीविकेसाठी मदत मागे. मॅटिनीने त्याला ‘शान’मधल्या अब्दुलची अत्यंत प्रभावी लस टोचली आणि मग नूरच्या आयुष्याचं अंतिम ध्येयच जणू शान पाहणं बनलं. मॅटिनीने सर्वात शेवटचं हत्यार बाहेर काढलं ते अत्यंत हुकुमी होतं. त्या काळात लोकांना सिनेमात प्राणी असण्याचं प्रचंड आकर्षण होतं. ‘कर्तव्य’मध्ये धर्मेंद्र वाघाशी मुठभेड करतो, ‘हाथी मेरे साथी’मध्ये राजेश खन्ना हत्तीशी मैत्री करतो – आणि या सर्वांचा मेरुमणी ठरलेल्या ‘तेरी मेहेरबानीया’मध्ये जॅकी श्रॉफच्या मृत्यूचा बदला त्याचा कुत्रा घेतो या गोष्टी गावासाठी वर्षानुवर्षं अप्रूप ठरत आल्या होत्या. नव्वदीच्या दशकात एका मराठी सिनेमाच्या वर्तमानपत्रातल्या जाहिरातीत मी प्रतिथयश कलाकारांच्या पुढे शेपटीप्रमाणे जोडलेली – सोबत मोती कुत्रा, हंपी माकड, चांद घोडा आणि बाबू नाग – ही श्रेयनामावली स्वत:च्या डोळ्यांनी वाचलेली आहे!

‘शान’च्या क्लायमॅक्सला अमिताभने केलेलं मगरीसोबतचं युद्ध हा मॅटिनीच्या गावभर केलेल्या ‘शान’च्या जाहिरातीतला कळसाध्याय ठरला. जनमत तयार झालं. उभ्या गावाने पेणच्या अनंत टॉकीजमधला संध्याकाळच्या सहाचा शो बुक केला. आमचा, मूसांचा आणि कांताशेठचा असे तीन ट्रक डिझेल टाकण्याच्या सहकारी तत्त्वावर ठरवण्यात आले. ट्रक भरभरून माणसं ‘शान’चा जयजयकार करत पेणला निघाली. आमच्या ट्रकमध्ये ड्रायव्हिंग करणार्‍या मॅटिनीच्या शेजारी भावासोबत मी आणि दोन बहिणी होत्या. ट्रकच्या टपावर बसलेला नूर भिखारी विरुद्ध दिशेने वाहणार्‍या वार्‍याला तोंड देत ‘नाम अब्दुल है मेरा’ मोठ्या निकराने म्हणत होता. यथावकाश गाव पेणमध्ये पोहोचलं. गाव सिनेमागृहात शिरलं. गावाने ‘शान’ पाहिला. उषा उत्थुपच्या ‘दोस्तोसे प्यार किया’ या शीर्षकगीतापासूनच ‘शान’ने गावाला आपल्या मगरमिठीत जखडून टाकलं, ती सैल झाली ते शेवटचे ‘द एन्ड’ हे शब्द आल्यावरच! देशाभरातल्या ‘शान’च्या काळ्याभोर अपयशाच्या पार्श्वभूमीवर त्या दिवशी पेणच्या अनंत टॉकीजमध्ये संध्याकाळी सहाच्या शोला मिळालेलं ते अभूतपूर्व यश कायमच दुर्लक्षित राहिलं. यासाठी खिंड लढवणारा मॅटिनी गावासाठी सामनावीर ठरलेला असला, तरी बाकी कुणी त्याची साधी दखलही घेतली नाही. या संपूर्ण शानाख्यानादरम्यान मॅटिनीने जे जिवाचं रान केलं त्यातली त्याची सिनेनिष्ठा वादातीत होती. मॅटिनी सिनेमाऐवजी राजकारणाची आवड घेऊन जन्माला आला असता, तर तो सहजच आजचा स्टार पॉलिटिकल कॅम्पेनर असता याबाबत दुमत असण्याचं कारण नाही.

मॅटिनीच्या सिनेमाप्रेमात आयुष्याने बरेचसे गतिरोधक मांडून ठेवले होते याकडे मात्र ठरवूनही दुर्लक्ष करता येणार नाही. मॅटिनी जेवढं स्वत:चं आयुष्य रंगीबेरंगी करण्याचा प्रयत्न करत होता, आयुष्य तेवढेच गडद काळे रंग त्याच्या नशिबाच्या कॅनव्हासमध्ये भरत राहिलं. सारं काही आलबेल चालू असताना आलेला पक्षाघाताचा झटका असो, की तीनपैकी एका मुलाचा नदीत बुडून झालेला मृत्यू असो; मॅटिनीच्या आयुष्याची साईडपट्टी कायमच खाचखळग्यांनी भरलेली राहिली.

पक्षाघाताचा झटका आल्यावर जेव्हा उजवा हात निकामी झाला, तेव्हा मॅटिनीने ड्रायव्हिंग सोडलं. गावात काही वर्षांपूर्वी सुरू झालेल्या व्हिडियो सेंटरमध्ये तो कामाला लागला. तिथे रोजचे सिनेमे निवडणं, शो वेळच्या वेळी सुरू करणं, सिनेमांची माहिती देणारे फळे रंगवण्यापासून ते व्हिडियो सेंटरमधला केर काढण्यापर्यंतची सगळी कामं मॅटिनी मोठ्या निष्ठेने करायचा. गावात त्या काळी मुख्य व्हिडियो सेंटर्स दोन होती. दोन्ही एकमेकांचे प्रतिपक्षी. मॅटिनीने व्हिडियो सेंटरमध्ये नोकरीला लागताच सिनेमाच्या निवडीबाबतच्या रुढ व्यावसायिक धोरणाविरोधात मालकाचं मन वळवलं. त्या काळात कोणताही सिनेमा लागला तरी व्हिडियो सेंटरच्या फळ्यावर त्या सिनेमाचं वर्णन करताना ‘फुल फायटींग’ असं लिहिलं जाई. ‘फुल फायटींग’ ही अक्षरं जणू व्हिडियो सेंटरच्या फळ्यावर पत्राच्या शिरोभागी ‘श्री’ लिहावं एवढ्या सराईत श्रद्धेने असत. यातून कोणतेही सिनेमे चुकले नाहीत. ‘मासूम-अर्थ’सारख्या प्रायोगिक आणि ‘प्यार झुकता नही-संसार’सारख्या कौटुंबिक सिनेमांनाही हा जुलुमाचा रामराम ठोकावा लागला. मॅटिनीने इथेही विद्रोह केला. फळ्याच्या शिरोभागावरून त्याने ‘फुल फायटींग’ पुसून टाकलं आणि त्याच्या जागी ‘इंटरेष्टींग ष्टोरी’ असे शब्द लिहिले. व्हिडियो सेंटरच्या प्रेक्षकांत साधारणत: गावातल्या बहुजनांचा समावेश असे. यात आळ्याआळ्यांमधील तरुणांचा भरणा जास्त. सोबत ठाकरं, कातकरी, मजूरवर्ग आणि कर्नाटकातून आलेले गावातल्या वीटभट्ट्यांवर काम करणारे कभिन्नकाळे पाटले मोठ्या प्रमाणात असत. मॅटिनीच्या व्हिडियो सेंटरचा एकही शो कधी पूर्ण रिकामा गेला नाही. साधारणत: आठवड्यातून एकदा तो थोडे हटके सिनेमे दाखवी. यात ‘आल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यो आता है’, ‘एक रुका हुवा फैसला’, ‘सलीम लंगडे पे मत रो’ अश्या सिनेमांचा भरणा असे. ग्रीष्मातल्या रविवारी भर दुपारी बाराच्या शोला एकदा मॅटिनीने ‘जाने भी दो यारो’ दाखवला. ठासून उष्मा भरल्या त्या चौकोनी व्हिडियो सेंटरमध्ये खुर्च्यांवर कोंबलेल्या गावातल्या बहुजन गर्दीने तो टकामका पाहिला. लोक हसत होते, टाळ्या पिटत होते आणि मध्येच अंतर्मुखही होत होते. या गर्दीत गावातला मजूर वर्ग होता, रोजंदारीवर काम करणारे कष्टकरी होते आणि रानावनांतून आपल्या अस्तित्वाची मुळं आजही घट्ट टिकवून ठेवणारे ठाकरं-कातकरीही होते. मॅटिनीने लावलेला सिनेमा चांगलाच असणार यावर गावाची गाढ निष्ठा होती. मॅटिनी त्याच्याही नकळत भारतीय सिनेप्रेक्षकांच्या रसिकतेचा डीएनए बदलण्याचं एक अनोखं काम करत होता. ‘इंटरेष्टींग ष्टोरी’ या परवलीच्या शब्दाच्या साहाय्याने मॅटिनी उभ्या गावाची रुची हळूहळू अभिरुचीत बदलत होता.

अंगाप्रत्यांगात सिनेमा भिनलेली गावातली माणसं बारशानिमित्त आपल्या मुलांची नावं ठरवण्यासाठीही बरेचदा मॅटिनीकडे येत. मॅटिनी त्यांना खास हिंदी सिनेमांतली नावं सुचवी. यातूनच गावातल्या एका आख्ख्या पिढीत दोन चार डझन विजय उदयाला आले. असं म्हणतात की गावात साधारण सत्याऐंशी साली जन्माला आलेल्या मुलांना शाळेत टाकायची वेळ आली, तेव्हा सोळा मुलांची नावं विजय आहेत हे पाहून शाळेतल्या लिपिकाचीही भंबेरी उडाली होती. मॅटिनी बरेचदा नावातही वैविध्य जपे. त्यातही दिलावर, इक्बाल, विरू, राजू अशी नावे असत. धर्मेंद्रचा ‘राजतिलक’ रिलीज झाल्यावर मॅटिनीने अनेकांना ‘जोरावर’ हे नाव सुचवले. आजही गावात चार ‘जोरावर’ आहेत. रजनीकांतच्या ‘गंगवा’वरून प्रेरित एक ‘गंगवा’ही आहे. रजनीकांत, अमिताभ बच्चन आणि कमल हासन वगैरे बहुरंगी कलाकार असलेला ‘गिरफ्तार’ मॅटिनीला त्या काळात एवढा आवडला होता की, त्याने गावातल्या रामा पोटेला त्याच्या नवजात मुलाचं नाव त्या सिनेमातल्या रजनीकांतच्या नावावरून म्हणजेच ‘इन्स्पेक्टर हुसेन’वरून हुसेन असं ठेवायचं सुचवलं. ‘सिगरेट पिना बहुत बुरी बात है’ हा ‘गिरफ्तार’मधला संवाद अंगी भिनल्यामुळे रामाही हे नाव ठेवायला तयार झाला. पण हिंदू मुलाचं नाव मुस्लीम ठेवण्यावरून गावात वादंग झाला, त्यामुळे रामाने माघार घेतली. पण आपल्या स्वत:च्या पोटच्या पोराला आपल्याला आपल्या आवडीचं नाव देता येत नाही म्हणून रामा व्यथित झाला. यावर मॅटिनीने ‘हुसेन नाव ठेवता येत नाही तर तू मुलाचं नाव नुस्तं इन्स्पेक्टर ठेव.’ असं रामाला सुचवलं. त्यानंतर जे घडलं ते अभूतपूर्व होतं. रामाने आपल्या मुलाचं नाव इन्पेक्टर ठेवलं. ही घटना ज्याला अतिशयोक्त वाटत असेल, त्याने ‘इन्स्पेक्टर रामचंद्र पोटे’ नामक व्यक्तीच्या अस्तित्वाचा पुरावा आजही आमच्या गावात जाऊन शोधून काढावा.

खरंतर मॅटिनीचं आयुष्य अश्या अनेक अध्यायांनी नटलेलं आहे. प्रत्येक अध्यायाचा सविस्तर परामर्श घ्यायचा झाला, तर पानं कमी पडतील. यात नुस्ता सिनेमाच नव्हे तर मॅटिनीची भाषा, त्याचं खासगी आयुष्य अश्या अनेक गोष्टींचा समावेश करता येईल. मॅटिनी सिनेमावर निस्सीम प्रेम करणारा एक ऐंशी-नव्वदीतला सामान्य माणूस होता. त्याने सिनेमा-सिनेमांमध्ये क्लासेस आणि मासेस असं विभाजन करणारी लक्ष्मणरेषा कधीही ओढली नाही. एकदा दूरदर्शनवर लागलेला ‘सजा ए मौत’ नावाचा सिनेमा पाहून गाव ‘त्यात एकही गाणं नाही’ या विचाराने व्यथित झालं असताना, गावाला त्या सिनेमाच्या बाजूने चार खडे बोल सुनावणारा मॅटिनी मी स्वत: पाहिलेला आहे. विधु विनोद चोप्रा जगाला कळण्याआधी रायगड जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात राहाणार्‍या मॅटिनी नामक अशिक्षित जवाहिर्‍याच्या नजरेत भरला होता हे वास्तव मला तरी नाकारता येत नाही. मॅटिनी जसा ‘अर्धसत्य’, ‘इजाजत’, ‘सजा ए मौत’सारख्या चित्रपटांच्या बाजूने बहुजनांशी (मासेस) भांडला. तसाच तो ‘वक्त हमारा है’, ‘फूल और काटे’, ‘धडकन’सारख्या सिनेमांच्या बाजूने गावातल्या अभिजनांशी (क्लासेस) भांडला. मॅटिनी कर्करोगाने गेला त्याआधी, म्हणजे शेवटच्या दिवसांतही त्याच्या मुलाने आणून दिलेल्या व्हिसीडी प्लेयरवर तो सिनेमेच पाहत होता. मॅटिनी गेल्यावर या व्हिसीडीज त्याच्या मुलाने माझ्याकडे सुपूर्द केल्या. त्यातल्या ‘राशोमान’ आणि ‘सोलॅरीस’च्या व्हिसीडीज पाहून मीही थक्क झालो. सोबत ‘स्नेक इन द मंकीज शाडो’, ‘रम्बल इन द ब्राँक्स’ होते; शिवाय अनेक गल्लाभरू म्हणून हिणवले गेलेले हिंदी, मराठी सिनेमेही होते. समतेची हाकाटी करणार्‍या भाऊगर्दीत मला मॅटिनीचं स्थान कायमच महत्त्वाचं वाटत आलेलं आहे. मॅटिनीने कधीही कलेतली विषमता पाळली नाही, मॅटिनीने कधीही कलाभेद जोपासू दिला नाही. मॅटिनीने सर्व सिनेमांना एकाच पारड्यात तोललं.

सिनेमाच्या आवडीच्या आणि अभिरुची विकासाच्या अनेक टप्प्यांवर मी बर्‍याच जाणकारांकडून सिनेमाच्या सौंदर्याचं विश्लेषण ऐकलं, सिनेमातल्या तंत्रादि अवयवांचं मूल्यमापन जाणून घेतलं. या सार्‍या घटनाप्रसंगी मला कायम आठवत राहिला तो मॅटिनीच. एका प्रतिथयश फिल्म फेस्टीव्हलमध्ये एका परदेशी सिनेअभ्यासकाचं व्याख्यान ऐकताना माझ्या डोळ्यासमोर मॅटिनीच उभा राहिला. मॅटिनी या कोणाही सिनेअभ्यासकांपेक्षा कांकणभरही कमी नव्हता; किंबहुना तसूभर का होईना, पण सिनेमाच्या आत्म्याचं जास्तीचं भानच मॅटिनीच्या पारड्यात जन्मत:च पडलं होतं. मॅटिनी इब्राहम अली पेडणेकरांच्या पहिल्या बायकोच्या पोटी जन्माला आला नसता तर; किंवा मॅटिनी दहावी पासच्या पुढे शिकला असता तर; किंवा मॅटिनी ट्रक ड्रायव्हर न बनता पत्रकारितेत गेला असता तर; किंबहुना मॅटिनी कौसे सोडून आमच्या गावी येण्याऐवजी जवळच असलेल्या मुंबईत गेला असता तर; मॅटिनीच्या नशिबी काय असतं याचा कल्पनाविलास करणं मला आजही फार आवडतं! या सर्व शक्यता जुळून आल्या असत्या तर मला खात्री आहे, मॅटिनी आज भारताच्या सिनेविश्वातला एक मोठा ट्रेड अ‍ॅनॅलिस्ट बनला असता. चकचकीत केबिनमध्ये बसून त्याने करण जोहर, एकता कपूर आणि अनेक मोठ्या व्यावसायिक निर्मात्यांना ठणकावून सांगितलं असतं, “सर, ये मसान, ये आँखो देखी! इन फिल्मोमे पैसा लगाओ सर. येही अपना फ्युचर है.”

हृषीकेश गुप्ते
---------
ऋणनिर्देश : लेखमालेतील काही भाग 'अक्षरधारा' मासिकात पूर्वप्रकाशित झाले होते.
रेखाचित्र : गिरीश सहस्रबुद्धे

कोकणातले मासले भाग १ - सुलतान पेडणेकर
कोकणातले मासले भाग २ - जिताडेबाबा
कोकणातले मासले भाग ३ - जयवंतांची मृणाल
कोकणातले मासले भाग ४ - खिडकी खंडू

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाह!!! एकदम रंगीबेरंगी व्यक्तीचित्र आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0