सवाल-जवाब करोनाचा, विथ वऱ्हाडी ठेचा!

सवाल-जवाब करोनाचा, विथ वऱ्हाडी ठेचा!
मनीषा कोरडे

करोनाविषयी लोकांच्या मनात खूप प्रश्न आहेत. अशाच काही प्रश्नांची खुमासदार उत्तरं खास विदर्भाच्या ठसक्यासह! लिहिली आहेत 'मालामाल वीकली' आणि 'भूलभुलैय्या' सारख्या गाजलेल्या सिनेमांच्या लेखिका मनीषा कोरडे यांनी.
---

पब्लिक : का होऊन का रायल बे ह्ये?
उत्तर : येक वायरस आलेला हाय.

पब्लिक : खतरनाक हाय काय ?
उत्तर : जालीम खतरनाक!...पन.. जास्त करून तं नाय म्हना कोनाले खतरनाक. हां; पन बुढ्याबाढयाईले धरते. आन अधले मधले लायने थोरले बारके पयलवान कोनाले बी मारते.

पब्लिक : तं मं आमी का करावं?
उत्तर : घरात बंद राहाव. आन यार दोस्ताईले लांब ठेवाव.

पब्लिक : मं आपल्याला नाय धरनार वायरस ?
उत्तर : अबे धरल नाय तं का सोडल ?! तुले बी धरल. याले बी धरल. समद्याईले धरल.

ब्रेक मार राजे हो ब्रेक मार
ब्रेक मार राजे हो ब्रेक मार!

पब्लिक : ब्रेक मार राजे हो ब्रेक मार. ह्ये तं आमाले कोनी बी सांगितलं नाई! थ्ये तं सांगत्येत का घरीच रायशील तं करोनाले मारशील.
उत्तर : हो न तं, आत्ता सांगून रायलो न म्या! वायरस परतेकाले पकडल. सत्तर टका तुमच्याइतलें तं पक्के धरल, हाय काय नाय काय! दिमाग चालव. वायरसची मारबत तं फिरू रायली गल्लोगल्ली पन अजून लशीचा पत्ता नाय! म्हनून आपली योजना ही हाय का बा, येका वक्ताला; आपन वायरसला फकस्त गिने चुने लोकच दाकवु. वायरस परतेंकाला धरल, पन येगयेगळ्या वख्ताला!

पब्लिक : आं?!
उत्तर : आपल्या गावात मंगल कार्यालयं किती?
पब्लिक : पाच!
उत्तर : वर्शातला येकच पन चांगला मुहूरत गावला आन गावची समदी लग्न येकाच दिवशी, येकाच टायमाला ह्या पाची मंदी घुसली तं काय व्हईल?
पब्लिक : बा बा बा !!! शिमगा!
उत्तर : हां! म्हनून गावचा पंडित कसा काडतोय पाच येगयेगळे मुहूरतं ? तसंच हाय ह्ये! वायरसचं घोडं आपल्या समद्याईच्या वरातीत नाचनार तं हाईच पण वखत येगयेगळा रायला पायजेल म्हनून घरी बसाले सांगत्येत. ट्रम्पतात्याच्या आम्रिकेत तं पन्नास लाख लोकाईच्यात घुसलेला हाय थ्यो!

पब्लिक : ब्रेक मार, ब्रेक मार न भाऊ! पन्नास लाख? बातम्यांईवाले तं फकस्त येक लाख म्हनत्येत!
उत्तर : येक लाख त सरकारी आकडा भाऊ, दफतरातला! सरकारपावतो आलेच नाय, असे कितीक पेशण्ट आसतील? आन टेस्टिंग तं आत्ता आत्ता होऊन रायलं, जनू येका तासापूर्वी! जी यक केस बाहिर येती, तिच्यामांग पाचदहापन्नास - किती बी केसेसे आसू शकत्येत. आपल्याले अजून पताच न्हाई! म्हंजी, आस पण झालं आसल का, वायरस घुसलाय; पन मानूस टग्या टनटनीतच हाय. आन आस बी आसू शकतय का मानूस आजारी तं हाय, पण इतकं पन आजारी न्हाई का ब चालल्ले हॊस्पिटलात भरती वायले! का हुबे रायले रांगेत, तपासनीच खून द्याले! पन्नास लाख तं राजा, कमी मदला कमी आकडा हाय! खराखुरा आकडा तं पाच सात करोडात जाते!

पब्लिक : करोड!! बापा बापा!!
उत्तर : हाव तं चांगलीच बातमी हाय नं! येक करोड़ मेल्याच आईकल का तुवा? न्हाय नं? समदे जित्तेच हाय अजून! महंजे चागलंच हाय का बा, हा वायरस इतका बी वंगाल नाय रावनासारका, का पुरनं जगाचिच मूंडी पिरगलते!

पब्लिक : पण तुवाच त म्ह्न्न्ल आत्ता का, समदयाईलेच -
उत्तर : धरते! धरते समदयाईलेच! आन म्हनून जोवर आपला नंबर लागत न्हाई, घरातच रायाचं.

पब्लिक : किती वखत?
उत्तर : मले वाट्टे का दोन मयने? - थांब, दोनाचे चार पकड सदयाचे -- थांब नाय तं - सरळ बाराच पकड थू! हिशेबाले सोपं!

पब्लिक : म जाईल त्यो?
उत्तर : कोन ? फुकनीचा वायरस?!... न्हाई! अटारा मईने तं आपल्या पावतो ओऊषदाची सुई याले लागतील! पण सुई तुह्या बुडात घुसन्याआदी, वायरस तुह्यात कंदी ना कंदी घुसलेला रायनारच हाय!

पब्लिक : मं ती सुई काय कामाची भोकनीची?
उत्तर : नाईच नं तं कामाची! खास करू तं पान्यापावसाच्या वख्तात. तवा तं वायरस ड्ब्ब्लल पावरनं धिंगाना घालते!

पब्लिक : म्हंजी उनाल्यात कमी तक्लीप देतं का वायरस ?
उत्तर : नाय नं वं बह्यताड्या! आपलेच अकलेचे तारे तोडतं का?

पब्लिक : तूच म्हनला ना आता हेमांडया !! का पावसात ड्ब्ब्लल तक्लिप म्हून! म्हंजी उनाल्यात कमी नाय का?
उत्तर : ओ भावजी! कोन हाय कोन तू? वैदू का मांत्रिक? का डागतर? ...नीट आइक भाद्ऱ्या! वायरसचं वासरू उधळलं समदीकडं हाय, गावोगाव, शहरशहर, गल्लोगल्ली ! पण आपन लगाम लावून र्हायलो त्याले! आपन लगाम लावला की थ्ये बाजींदं ड्ब्ब्लल उसळी मारत पावसात बी येतंय आन हिवाळ्यात बी येतंय! आन उनाला दिवस पन राहतंय आपल्या मांडीला मांडी लावून! पडला का डोक्यात परकाश?

पब्लिक : एव्हडं' हाय ते प्रकरन?!! पन मं कोण बी भनटोल आमाले ह्याचं खरंखोटं सांगून का नाय रहाईले?
उत्तर : कारन आपन खरंखोट्याले बी लंब लंब करू र्हायलो - येकमेकांपासून लंबे-लंबे राहू राहलोय तशे! .. तू राय न पडून खाटेवर पाय तानून, छपराच्या येलाचे कार्ले खाऊन! तुले का फिकीर?

पब्लिक : कारली तं गेली सुकून... पण भोपळा हाय!
उत्तर : चालतं न म! चाल रे भोपळ्या टूनूक टूनुक! भोपळा खाय पन घरात राय!

पब्लिक : पन खर्ऱ्याले तं जा च लागते गड्या चोकात !
उत्तर : थू कशाला जातं ? थ्याइलेच बल्लाव सायकलीवर! थ्यो येक गडी आला का पुऱ्या गल्लीची पावते.

पब्लिक : हां, थ्ये बेस राईल.
उत्तर : पण याद राखजो, का त्या तुह्या खर्ऱ्याच्या खाजीपाई थू थ्या खर्रा बनवनार्याचा, ईकनाऱ्याचा आन इकत घेनाऱ्याचा जीव धोक्यात घालू रायशील. इतकं आपलं-आपलं पायते का बे तू? माह्या तं दिमाग हटू राहायला तुह्या स्वार्थीपना पाऊन! सरवाईले खाईत लोटशींन, पण खर्रा खाशीन!

पब्लिक : म्हंजी.. म्या खर्रेवाल्याईले गल्लीत बलावू नको?
उत्तर : नकोच बलवाईले! पण इकडं तुहा खर्रा थांबला का तिकडे त्याईचा धंदा डूबला!

पब्लिक : मं बलावू म्हंता?
उत्तर : बिल्कूल बलाव! होऊ दे लोकाईची ज़िन्दगी बरबाद पण थू बलाव! खर्रा बलाव, कुल्फी बलाव, गन्ने का रस बलाव! रस पिजो आन बातम्या पायजो कारन ह्यो महामारी तं बा आता थांबायची न्हाई! खाय-पीय, तंगड्या तानू झोप, बिडी पीई!

पब्लिक : बिडी पेउ?
उत्तर : पे! कारन बिडी पिनाऱ्यायीले ह्यो वाला वायरस पकडत नाय, धोका कमी असतोय म्हनत्यात!

पब्लिक : पन म म्या टी बी न मरन!
उत्तर : पन वायरस न नाय न मरनार! बाकी कसरत कर जो, चालाले जा जो!

पब्लिक : आता चालाले कुटं जावं? .. हागाले बी जाता नाय येऊ रायलं!
उत्तर : काऊन? संडास नाय बांदला? आमदारानं रोकडा नाय दिला?
पब्लिक : देल्ला! पन चार भित्ती पुरता पुरला आन नेमकी शीट घेईतो संपला! आता वेशीवर गेलं सक्काळी तरी पन पोलीस मारतंय! .. कुटं जावं चालाले?
उत्तर : वावरात जाय, हाय-वे वर जाय, बगिच्यात जाय. समद्या खुल्ल्या जागा सुरक्षित हायत!
पब्लिक : गेल्लो व्हतो. समदीकडं जत्रा हाय!
उत्तर : असंन नाय तं का! तुले काय वाट्ट का तुह्यासारका सोंड्या तूच!? जन्तेला बी हाय फिकीर सोताच्या तबेतेची! तू कायला त्यांच्या संग भाईर भिरी-भिरी करतं? घरी जाय, पोराइसंग टिक-टॉक पाय! लेकरंबाळं हाईत का तुवा ?
पब्लिक : हायेत.
उत्तर : ध्यान राखजो का ते अब्यासात मांग नाई पडनार. त्याहींची बुकं-सुकं बघ जो, का लिवून रायले खरं-खरं; का निरं रेघोट्या मारू रायले! तुवा फोनबीन पण मांगत असतील नं ? हॉट्सअप वर त्याईचें सर-मॅड्म अब्यास देत असतील. थोडीक नजर ठेवजो नायतर लेकरू गेम खेळत बसल! .. आसं आईकलं, का आता तं काई शाळा ‘झूम’वर भरवू रायले!

पब्लिक : झूम??!!...आपलं बसस्टँडवालं झूम बार?
उत्तर : नाय न बे मचमच्या ! अडान्यायचं जसं हॉट्सअप, तसं शिकलेल्याईचे झूम! तुह्या लेकराले माईती आसलं. पन लेकराले; मोबाईलले चिटकून नको बसू देऊ. नायतर भोकना होईल. त्यांसी भाहीर खेळाले पाठव. शाळेची फिकीर नग करू दीऊस. महामारीचं दिस लै बेक्कार!

पब्लिक : मंगापासून पाऊन रायलो, का बोलतं गड्या तू डबल ढोलकी?! हिकडून ढांग तर तिकून ढिंग!!?? येक उल्टा त दूसरा सुल्टा! येक धार पकड़ न!
उत्तर : बिल्कुल नाय राजा, बिलकुल नाय! फुन्हा आईक! पोराइचे हातपाय घड्याळ्याच्या काट्याईले बांदून टाक! पन जीव नग खाऊस त्याहीचा. मस्त र्हावा! पिटल-भाकर खावा. आजारी पडला तर हॉस्पीटलात जावा. पन इतकं आजारी पडू नगा की करोनावाल्या हॉस्पिटलात न्यावं लागलं! कारन थीथं बी आजारी मानसच हाईत.

पब्लिक : तिच्या आईची कटकट! सम्पनार कंदी ह्यो बाजार?
उत्तर : अटरा मयने! पण आतली बात सांगतो: का, मागच्या वख्ताला आपल्याला चार वर्षं लागली व्हती लशीच औशुध शोधायला!

पब्लिक : आं ! मं ह्ये दारूची दुकानं काऊन उघडू रायले!? त्याईले ह्ये अटरा मैने आन चार वर्षाईचं बाळतपन माहीत नाई का?
उत्तर : माहितीये पण त्याईले ह्ये बी माहितीये का पब्लिक मरनार!
पब्लिक : आं!
उत्तर : पब्लिक तं मरनार! किड्यामुंगीसारके मरनार! ट्रम्पतात्याच्या आम्रिकेत, ऐका दिसाचे पन्द्रासे जरी पकडले तरी अटरा मैन्याचें आट लाख व्हतात वायरसने मरनारे! आसं मिनेसोटाचा येक शास्त्रदनं म्हनतो, खरं खोटं आपल्याईले नाई माईती. जगातल्या समद्या भारीतल्या भारी दिमागाचा हाय म्हनं त्यो! आजपावतो जे जे बोल्ला, ते ते आता पावतर पूरनं खरं निगालं म्हनत्यात.

पब्लिक : आट लाख!?? आट? लाख?!!
उत्तर : आन त्यें पण वायरसची गाडी अशीच डालमडुलम चाल्ली तं! जर का ती धावाय लागल्ली, तं मं आकडा आनकीन वाढ़न. आपलं लोकडौनच बग नं, हत्ती ग्येल अन शेपूट र्हायलं हाय!

पब्लिक : पण मरनार्या लोकाईचा आकडा कमी झाला म्हने न व!
उत्तर : कुटं राव!? शुक्करवारला तं कुटाणा व्हता न मौतीचा! आन त्यो बी समद्ये एक महिन्यापासून घरामंदी कोंडले असतांना! जन्ता जस-जसी भाईर पडाया लागलं, तस-तशी मौतीची लगोरी वाढंल!

पब्लिक : तं म ढिल्ला काऊन करू रायले लोकडॉन?
उत्तर : अर्थशास्त्र अस्तय ते.

पब्लिक : अर्धं शास्त्र?
उत्तर : अ र थ !

पब्लिक : डोस्क फुटलं पण माह्या काई पल्ले नाय पडलं!
उत्तर : आईक न फुटाण्या! लोकाईले कट्टाळा आला आता. बहीसटाले ते! त्याईले आता पायजे पैसा आन काम! आन पायजे शॉपिंग! काय नाय त काय नाय, थ्याईले थ्याइची गाडी ट्रॅफिक मंदी अटकायले पायजल नाय त आखा मानूस लोकल ट्रेनमंदी लटकाईले पाईजेल. शेवटी आस हुईन का कामाच्या बॅगिचा पट्टा ऱ्हाईल गळ्यात आन ऑक्सिजनची नळी ऱ्हाईल नाकात, फुफ्फुसचा फुगा व्हईन फुस्स आन जन्ता येकली येकली टपाटपा मरलं.

पब्लिक : मं सरकार ह्ये समदं गाडं बंद काऊन नाय करून टाकत येकदाचं? जवर ओषुदाची लशी येत नाय; धन्दा, शेती, सरकार – पुरनं-पुरनं भारत बंद! समद्ये घरी आन सरकार द्येतय पगार, घरी बसन्याचा!...आस का होउ शकत नाई?
उत्तर : बह्याड हाय का बे तू? अर्थ-शास्त्रची अरथी काडतं का? लै उचलपाचल करावी लागलं राजा थ्या साटी! गावाचं, आन राज्याचं आन द्येशाचं पाय एकत्र बांदाव लागलं.

पब्लिक : नाय जमनार का आपल्याले?
उत्तर : जमल का नाय जमल --- मले बी नाय उमगत .. नाय म्हंता-म्हंता काय-काय लागलं देश चालवाले? ... “बोटेझरी गावच्या अशोकले पगार द्येजो”, ह्ये सांगालेच बग न पंतप्रधांनाना फोन लागल, बँक लागल, काम्पुटर लागल, काम्पुटर चालवाले इज लागल, इज चालवाले मानसं लागल!

पब्लिक : एव्हडं हाय आपल्याकडं?
उत्तर : मले त वाट्ट का हाये. पन तरी खूप सारे सवाल रायतेत सोडवायचे! मंजी आस का, कोनाले किती पयशे द्याईचे हाईत, ह्ये कोनाले कसं माईती पड्न? .. कागदं गोळा करू-करू, येक यादी कराया पायजेल, का बा ह्या द्येशाची ही ही मानस!

पब्लिक : यादी त कवाचीच केली न वं? कागदं परत दाखवायची? राशन कारड चालत न्हाई?
उत्तर : अजून येक प्लानिंग आस व्होऊ शकतं - का - परतेय्क मानसाला, परतेय्क धन्दापान्याला अमुक-अमुक पैशाचा वायदा कराचा आन थ्यो पैसा, लोकाईच्यात वाटन्यासाटी मोट्या-मोट्या बँकाईला दिऊन टाकाचा! कारन बँकाईले त माईती आसनच न पैसा कसा सांबाळायचा आन कसा वाटायचा?

पब्लिक : अरारारा! लै वंगाळ हाये ह्ये पिलानींग!! हपापाचा माल गपापा! बँका घालतील सगळा माल थ्याइच्या लाडक्या मानसांच्या घशात!
उत्तर : बापा बापा! इतका अविश्वास! काय त भलं करत आसतील न मोट्या मोट्या बँका?!

पब्लिक : नाय नाय! त्या परीस, परतेय्क मान्साला, सरकारन वायरस येन्यापूर्वीची आमदनी दिऊन टाकाची. आन आपुन समद्याईनी, येकदिलानं ठरवाचं – का बा - आता समजा का हयो टायम म्हंजे आपली सर्वाईचीच जनू शालेतली मधली सुट्टी! का जनू फ़ौजेंतलं ‘जैसे थे’! समद्ये थांबून रायले, सर्व बंद पाडलं त त्या आट लाख लोकाईचे आत्मे कायले जातील परलोकात?
उत्तर : लै बोअर मारतेय, तुहिवाली प्लानिंग! काय घडामॊड नाय, काय हादसा नाय ! आरे, आपली गौरवशाली शिष्टीम कशी?! त, - लाटेवर लाट आली पायजेल धक्क्याची! नवा हफ्ता, नवी लाट! नवा मईना, नवी लाट! धंदे बंद, बँका बुडाल्या, माल इतरन येवस्थेत भगदाडं पडली - येकामागून येक घडलं पायजे ना राजा! सारीपाट हलता राहायला पाहिजेल! मंग लोकाईचे पैसे सम्पतील, लोक रस्ताईले लागतील. - इचार कर – हफ्त्या-हफ्त्याला महायेपिसोड गावतय सरकारला करतबगारी दाखवाया! परत्येक मानसाच्या हाती रकम टिकवून, त्याईले महामारीच्या आगीतून खांद्यावर बसून भाईर काडाले सरकार तुज हनुमान वाट्ट का बे? लै बोअरिंग, लै बोअरिंग!

पब्लिक : म्हनुन म काय प्लानिंग नाय कराच?
उत्तर : प्लानिंग नसन, हाच प्लान, येड्या! कवाचा कोकुन रायलो मी, आइकत नाय का तू बहिऱ्या? ...प्लॅनिंग कोनाला लावत्येत?... कुटुंबनियोजनाले! आपल्याले न्हाई!.. आपली श्टाईल तं धडाकेबाज, आपन करतो समदं अर्ध्या राती, येका घावात, कोनाले अतापता न लागू द्येता! ह्याले म्हन्तयेत कामगिरी!... आम्रिकेत, ट्रम्पतात्याच्या पांढऱ्या म्हालांत, येक गाद्या-उशा इकनार बेणं आलं आन त्याईनं तात्याच्या कानात भागवत गाईल. मं का इचारता? पूरनं गुत्थीच सुटली. अटरा मैने, आट लाख मौतीच प्लानिंग नाई. येक राज्य भिडतंय दुसऱ्याच्या गळ्याला गल्लीतल्या कुत्र्यागत औषदी आन हॉस्पिटलच्या औजारांसाटी! हमाल, दे धमाल!!

पब्लिक : माय सटवाय, वाचिव ग. ऐ राजा - मले लै घाबरं-घुबरं होऊ रायल तुह्य आईकू... म्या - निजतो म्या जरा ..
उत्तर : थू नीज न भाऊ, नीज! तुले अंगाई गाऊ का म्या देशप्रेमाची? .. आपल्या पूर्वजाईले आपला कितका अबिमान वाटला असता आताच्या घडीला ! का जसं आपुन येकदिलांनं गोऱ्याईशी लडलो, मीट उचललं, मोर्चे काडले, रेल्वे पटरीवर बॉम्ब ठिवले -- अख्खा देश पेटला व्हता!! तसंच आता बी हाय! आता बी आमची लेकरं लडत्यात! फकस्त आता आपली दिलं, जोडलेली नाईत, त ह्या धर्मात, त्या धर्मात तोडलेली हाईत. तवा भगती व्हती आता वखवख हाय.. तवा स्वातंत्र्याचं सपान व्हतं आता निव्वळ पानदान हाय... तवा गांदी, नेहरू, भगतसिंग व्हते, आता माल्या, मोदी, चोक्सी हायेत. येव्हडाच काय तो फरक हाय..

---
मूळ प्रेरणा : Flattening the Truth on Coronavirus By Dave Eggers
स्वैर रूपांतर : मनीषा कोरडे
(मनीषा कोरडे हिंदी चित्रपटसृष्टीत पटकथालेखक व संवादलेखक म्हणून काम करतात. 'मालामाल वीकली', 'भूल भुलैय्या', 'बिल्लू' अशा अनेक चित्रपटांचे लेखन त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे त्या 'स्क्रीनरायटर्स असोसिएशन' या संस्थेच्या कार्यकारिणीवर आहेत.)

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे एक नंबर आवडलंय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारी झालंय मने, लै आवडलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This too shall pass!