करोनाकाळातील वस्त्रहरण

करोनाकाळातील वस्त्रहरण
डॉ. अनिल जोशी

आंतरजालीय माहितीचा विस्फोट झाल्यानंतर आलेली पहिली साथ म्हणून आपण या कोरोनाच्या साथीकडे बघू शकतो. त्यामुळे कोरोना आणि माहिती अशा दोन साथींना आपल्याला एकत्रित तोंड द्यावे लागते आहे. अशा प्रसंगी अधिकृत व विश्वासार्ह माहिती देणाऱ्या स्रोतांचे एक वेगळेच महत्त्व आहे. वैद्यकीय व्यावसायिकांच्या दृष्टीने खात्रीची माहिती मिळणे उपचारासाठी फारच महत्त्वाचे असते. कोरोना हा विषाणू पूर्णपणे नवीन असल्याने त्याचे वेगवेगळे पैलू जगात ठिकठिकाणी तपासून पाहिले जात आहेत. त्यासाठी वेगवेगळे संशोधन विविध ठिकाणी चालू आहे. त्याचे निष्कर्ष वेगवेगळ्या वैद्यकीय नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत आहेत. याबाबतीत जी वैद्यकीय नियतकालिके जागतिक स्तरावर मानली जातात त्यात The Lancet, The New England journal Of Medicine (NEJM) व The Journal Of American Medical Association (JAMA) ही तीन अग्रणी नियतकालिके आहेत.

कोरोनावर रामबाण उपाय नाही हे साथ सुरू झाल्यावर स्पष्ट झाले. संसर्गाची तीव्रता कमी करता येते का व त्यासाठी काही औषधे देता येतील का याची चाचपणी सुरू झाली. HCQ किंवा HydroxyChloroquine हे मलेरियावर वापरले जाणारे औषध घेतल्यास प्रतिकारशक्ती वाढून कोरोना संसर्गाची शक्यता व तीव्रता कमी होते असे तज्ज्ञांच्या लक्षात आले आणि रोगप्रतिबंध व रुग्ण उपचारात आघाडीवर असणारे वैद्यकीय व इतर कर्मचारी यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हे औषध दिले जावे अशा आशयाच्या सूचना काही देशांमध्ये दिल्या गेल्या. कोरोनाच्या उपचारातही या औषधाचा प्रायोगिक वापर इतर औषधांसोबत सुरू झाला. कोणतेही औषध हे शेवटी रासायनिक द्रव्य असते. त्यामुळे त्याचे काही अनिष्ट परिणामही असतात. तसे ते या औषधाचे पण आहेत. परंतु योग्य ती सर्व काळजी घेऊन औषध घेतले जावे असे इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) या भारतातल्या अग्रणी संस्थेने सुचविले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील आपण हे औषध घेत असल्याचे अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. असे जरी असले तरी या औषधाच्या बाजूने व विरोधात अधूनमधून उलटसुलट बातम्या येत राहिल्या त्यामुळे स्वाभाविकपणे संभ्रमाचे वातावरण कायम राहिले. अशा वातावरणात The Lancetने एक लेख प्रसिद्ध केला. “Hydroxychloroquine or chloroquine with or without a macrolide for treatment of COVID-19: a multinational registry analysis” असा या लेखनाचा मथळा होता. HCQच्या वापरामुळे हृदयगतीत अनियमितता निर्माण होण्याची शक्यता असल्याने या औषधाचा वापर धोकादायक ठरू शकतो असा या लेखाचा निष्कर्ष होता. हा लेख खूप मोठ्या अभ्यासाअंती प्रसिद्ध केल्याचा दावा हा लेख लिहिणाऱ्या संशोधकांनी केला होता. सहा खंडातल्या ६७१ रुग्णालयातील ९६,०३२ रुग्णांची २० डिसेंबर २०१९ ते १४ एप्रिल २०२० या कालावधीतील कोरोना उपचारांची माहिती मिळवून व त्याचे विश्लेषण करून या लेखातील अभ्यासातील निष्कर्ष काढले गेले होते असा या लेखकांचा दावा होता. या लेखापूर्वी “द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन”मध्ये असाच एक लेख प्रसिद्ध झाला. रक्तदाबासाठी दिली जाणारी काही औषधे, ज्यांना ACE Inhibitors व ARB Blockers म्हणून ओळखले जाते; ही औषधे कोरोना साथीच्या वेळी देणे सुरक्षित आहे असा या अभ्यासाचा अंतिम निष्कर्ष होता व तो या लेखाद्वारे जाहीर केला गेला होता. कोरोना विषाणू मानवीय पेशीवर हल्ला करताना ACE Receptors वापरतात असा काही संशोधकांचा दावा आहे. त्यामुळे ही औषधे वापरणे सुरक्षित आहे की नाही हा ही एक गंभीर चर्चेचा विषय होता. या दोन्ही लेखांमुळे अर्थातच वैद्यकक्षेत्रात खळबळ उडाली.

HCQच्या वापराबाबत अनेक देशांमध्ये संशोधन चालू होते. जागतिक आरोग्य संघटना देखील याबाबत वेगळे संशोधन करत होती. लेख आल्यानंतर अनेक ठिकाणची संशोधने थांबविण्यात आली. त्याला एक महत्त्वाचे कारण होते. ही दोन्ही नियतकालिके Peer Reviewed आहेत. याचा साधा सोपा अर्थ सांगायचा झाल्यास या नियतकालिकांमध्ये कोणताही लेख प्रसिद्ध होण्यापूर्वी या लेखातील प्रतिपाद्य विषयाचे एक तज्ज्ञमंडळ त्या लेखात नमूद माहितीचा आढावा घेते व लेखातील माहिती योग्य असल्याची खात्री करते. अशी खात्री झाल्याखेरीज कोणतेही लिखाण प्रसिद्ध केले जात नाही. NEJM चे स्थापना वर्ष इसवी सन १८१२ आहे तर Lancet १८२३ सालचे आहे. अर्थात गेली सुमारे २०० वर्षे ही नियतकालिके आपला आब राखून आहेत. यात आलेल्या एखाद्या लेखाने जागतिक आरोग्य संघटनेने आपले एखादे महत्त्वाचे संशोधन अर्धवट सोडून द्यावे एवढे या नियतकालिकात छापून आलेल्या शब्दांना वजन आहे. वैद्यकीय नियतकालिकांचे वजन हे नुसतेच स्थापनेच्या वर्षावर अवलंबून नसते. या नियतकालिकांचा प्रभाव मोजण्यासाठी एक मापदंड आहे. त्याला Impact Factor असे संबोधन आहे. आपण त्याला “प्रभाव निर्देशांक” म्हणूयात. हा प्रभाव निर्देशांक सर्वसाधारणपणे दोन वर्षांचा काढतात. म्हणजे आज वीसशेवीसमध्ये आपण बोलत असताना २०१८-२०१९ या कालावधीतील त्या नियतकालिकाची कामगिरी लक्षात घेऊन हे गणित मांडता येते. गेल्या दोन वर्षात इतर मान्यताप्राप्त नियतकालिकांमध्ये (Indexed Journals ) संदर्भ म्हणून घेतल्या गेलेल्या एखाद्या नियतकालिकातील लेखसंख्या, भागिले या दोन वर्षात या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एकूण लेखांची संख्या म्हणजे त्या नियतकालिकाचा प्रभाव निर्देशांक असतो.

२०१८ साली The Lancetचा प्रभाव निर्देशांक ५९.१०२ इतका होता तर NEJMचा ७०.६७०! जितका हा निर्देशांक मोठा तितका त्या नियतकालिकाचा दबदबाही मोठा.

आता या दोन लेखांचे पुढे काय झाले ते थोडेसे विस्ताराने पाहू या. २२ मे २०२० रोजी “Hydroxychloroquine or chloroquine with or without a macrolide for treatment of COVID-19: a multinational registry analysis” या मथळ्याखाली हा लेख The Lancetमध्ये प्रसिद्ध झाला. याचे एकंदरीत चार लेखक आहेत. प्रो मनदीप मेहरा, सपन देसाई, अमित पटेल व प्रो फ्रांझ रूजचीत्झ्का अशी ही चार मंडळी आहेत. २६ मे रोजी काही ऑस्ट्रेलियन संशोधकांनी या लेखातील आकडेवारीबाबत शंका व्यक्त केल्या. संपादकांनी त्याची चौकशी करून या आकडेवारीत काही दुरुस्ती केली. २८ तारखेला विविध देशातील १८० ख्यातनाम संशोधकांनी The Lancetच्या संपादकांना खुले पत्र लिहून या लेखातील निष्कर्षाविषयी आपले गंभीर आक्षेप नोंदवले. त्यानंतर पुन्हा एकदा संपादक मंडळाने या अभ्यासाची फेरतपासणी करून लेखकांना त्यांनी गोळा केलेल्या आकडेवारीविषयी अधिक तपशील मागितला. चारपैकी तीन लेखकांनी असा तपशील देण्यास नकार देऊन हा लेख आम्ही माघारी घेत आहोत अशा आशयाचे पत्र दिले. त्यानंतर ४ जून २०२० रोजी The Lancetने एक अधिकृत घोषणा करून हा लेख मागे घेतला. ही घोषणा खालीलप्रमाणे:

After publication of our Lancet Article, several concerns were raised with respect to the veracity of the data and analyses conducted by Surgisphere Corporation and its founder and our co-author, Sapan Desai, in our publication. We launched an independent third-party peer review of Surgisphere with the consent of Sapan Desai to evaluate the origination of the database elements, to confirm the completeness of the database, and to replicate the analyses presented in the paper.

Our independent peer reviewers informed us that Surgisphere would not transfer the full dataset, client contracts, and the full ISO audit report to their servers for analysis as such transfer would violate client agreements and confidentiality requirements. As such, our reviewers were not able to conduct an independent and private peer review and therefore notified us of their withdrawal from the peer-review process.

We always aspire to perform our research in accordance with the highest ethical and professional guidelines. We can never forget the responsibility we have as researchers to scrupulously ensure that we rely on data sources that adhere to our high standards. Based on this development, we can no longer vouch for the veracity of the primary data sources. Due to this unfortunate development, the authors request that the paper be retracted.

We all entered this collaboration to contribute in good faith and at a time of great need during the COVID-19 pandemic. We deeply apologise to you, the editors, and the journal readership for any embarrassment or inconvenience that this may have caused.

घोषणा सविस्तरपणे मुद्दामून दिली आहे. यामध्ये Surgisphere Corporation या कंपनीचा स्पष्टपणे उल्लेख आहे. या लेखाचे जे तीन भारतीय वंशाचे लेखक आहेत ते या कंपनीशी संबंधित आहेत. वैद्यकीय संशोधनात लागणारी आकडेवारी ही कंपनी गोळा करून प्रसंगी तिचे पृथक्करण करून संशोधकांना उपलब्ध करून देण्याचे काम करते.

आता थोडेसे NEJMमधील लेखाविषयी. लेखाचे नाव “Cardiovascular Disease, Drug Therapy, and Mortality in Covid-19.” लेखकसंख्या एकूण पाच. पैकी मेहरा, देसाई व पटेल हे त्रिकुट तेच! लेखाच्या प्रसिद्धीची तारीख एक मे २०२०. हा लेख देखील NEJMने ४ जून २०२० रोजी मागे घेतला. कारण होते :

Because all the authors were not granted access to the raw data and the raw data could not be made available to a third-party auditor, we are unable to validate the primary data sources underlying our article, “Cardiovascular Disease, Drug Therapy, and Mortality in Covid-19.” We therefore request that the article be retracted. We apologize to the editors and to readers of the Journal for the difficulties that this has caused.

हे लेखकांनीच संपादकांना लिहिलेले पत्र. आता आकडेवारीची खातरजमा या लेखकांनी लेख प्रसिद्ध करण्यापूर्वीच का केली नाही असा प्रश्न स्वाभाविकपणे येतो. त्याला सध्या तरी काही उत्तर नाही. या दोन्ही नियतकालिकांनी यापूर्वी काही वेळा पूर्वप्रकाशित लेख मागे घेतले आहेत, त्यात काही चुकीचे संदर्भ आले असल्यास त्याची दुरुस्ती प्रसिद्ध केलेली आहे. मग याला वस्त्रहरण म्हणण्याचे कारण काय? तुम्ही २०० वर्षे एखादे नियतकालिक चालवत आहात. त्यामुळे लेख प्रसिद्ध करण्यापूर्वी त्यातली आकडेवारी बरोबर असल्याची खातरजमा करणे ही तुमची प्राथमिक जबाबदारी आहे. The Lancetने हा लेख प्रसिद्ध करताना बरीच घाई व गडबड केली व लेख मिळाल्यापासून फक्त चार आठवड्यात प्रसिद्ध झाला. लेखाचा विषय होता एक औषध, HCQ नावाचे. हे औषध सहज उपलब्ध आहे, ते स्वस्त आहे व भारतासारख्या विकसनशील देशात हे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. हे औषध परिणामकारक आहे असे ठरल्यास कोरोनाबाबत बाजारात येऊ घातलेली इतर औषधे आपले वेगळेपण हरपून बसतील काय अशी साधार भीती आहे. अशाप्रकारे येऊ घातलेल्या नवीन औषधांचे अवमूल्यन होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक लेख प्रसिद्धीचा हा कट आहे की काय अशी भीती काही जाणकारांनी याबाबत व्यक्त केली आहे. या सगळ्या प्रकारात ज्या Surgisphere कंपनीने ही आकडेवारी मिळवून त्यावर प्रक्रिया केली तिची व तिच्या मालकांची नक्की काय भूमिका होती याबाबत खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोरोना कधी संपणार या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे, उत्तराच्या प्रतीक्षेतला!

जाता जाता अजून एक गोष्ट सांगतो : १६ मे २०२०च्या आपल्या संपादकीयात The Lancetने अमेरिकन नागरिकांना ‘आगामी जानेवारीमधील अध्यक्षीय निवडणुकीत ज्याला सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेचे महत्व कळते अशा उमेदवाराला मत द्या’ असे जाहीर आवाहन केलेले आहे. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना याबाबत अजिबात गांभीर्य नाही असा या लेखाचाच एकंदरीत सूर आहे व डोनाल्ड ट्रम्प हे सर्व जगाला मी HCQ घेतो हे उच्चरवाने सांगत असतात. यात काही परस्पर संबंध आहे का? माहीत नाही!! आपल्या शेकडो वर्षांच्या विश्वासार्हतेला या नियतकालिकांनी असे पणाला का बरे लावले असावे?

Hydroxychloroquine Trump

“Torture the data, and it will confess to anything.” – Ronald Coase (British Economist and author)

---
डॉ अनिल जोशी
९४२२६४७२८३
jaysss12@gmail.com

मूळ लेखाचा दुवा
हे लिखाण 'ऐसी अक्षरे'ला उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. अनिल जोशी आणि भूषण पानसे यांचे आभार

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

लेख आवडला.

विज्ञानाच्या बाबतीत मी अजून थोडीतरी रोमँटिक आहे; लँन्सेटनं केलेली चूक मुद्दाम असेल असं अजूनही वाटत नाही. पण तिथलं राजकारण काय असेल, कुणास ठाऊक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

औषध निर्माण कंपन्यांची लॉबी? सध्या स्वस्तात उपलब्ध असलेले औषधच लागू पडलं तर नवीन महागडं औषध कोण घेणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0