डिप्रेशनवर बोलू काही

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे नैराश्य हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. मला यासंदर्भातील माझा अनुभव लिहावासा वाटला, म्हणून हा लेखप्रपंच.

२०११ साली बंगळुरात असताना सलगची रात्रपाळी(२ महिने सलग), त्यात अगदी सामान्य वकुबाचे, मोनॉटोनस, नीरस, आणि त्यामुळेच नावडते काम, एकटे राहणे या सगळ्यांचा परिणाम हळूहळू मानसिक आरोग्यावर होऊ लागला होता. कंपनीने हॉटेलमध्ये ठेवले होते. सुरवातीला कोरमंगलामध्ये एका हॉटेलात असताना आणि कंपनीच्याच गेस्ट हाऊसमध्ये राहताना फार काही जाणवले नव्हते. कारण बाहेर जिवंत वातावरण होते. पण त्यानंतर सिंगसंद्राच्या हॉटेलात हलवल्यानंतर एकटेपणा फार जाणवू लागला. तो भाग तेव्हा भकास होता. भलं मोठं सहा-सात मजली हॉटेल आणि माझ्या विचित्र वेळेमुळे मी एकटाच तिथं भुतासारखा राहतोय असे वाटे. बाहेर भटकावे तर काही मनोरंजनाची साधने नाहीत, चांगले रेस्तराँ नाहीत की रस्त्यावर काहीतरी रोचक घडणे नाही. दुपारी झोप उघडली की मी खिडकीतून बाहेर भकासपणे पाहत बसे. कधी-कधी खिडकीतून बाहेर बघताना हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये काही पोरं-पोरी खेळताना दिसत, तेव्हा आपला एकटेपणा अधिकच जाणवून जाई. आपलं आयुष्य वाया चाललंय, अशा जगण्यात काही अर्थ नाही वगैरे विचार बळावत गेले. हे सगळे विचार दुपारीच जास्त येत. रात्री ऑफिसला गेलो की आपलं ऑनलाईन येऊन टाईमपास करत मन रमत असे.(तेव्हा माझ्यापाशी स्वतःचा लॅपटॉप नव्हता.) पण दुपार आणि संध्याकाळ भयाण असत निव्वळ! आपोआप रडू फुटत असे. कशातही मन रमत नसे. उत्साह असा काही उरलेलाच नव्हता. नुसतं झोपून राहावंसं वाटे. घरी फोन करून 'मला हे काम नकोय, मला इथं राहायचं नाहीये, नाही सहन करू शकत.' वगैरे म्हणत असे. बाबा म्हणत सोड नोकरी! (आमच्या बाबांचे हे चांगलंय, आपल्याला काही करावंसं वाटलं तर करून टाकावं, मनात ठेवू नये, असं म्हणत असतात.) पण मीच, 'नाही सोडणार, दोन वर्षे तरी टिकून राहीनच निर्धाराने' असं उत्तर देई.

एके दिवशी, नेमकी तारीख आठवते पण सांगणार नाही, दुपारी चारच्या सुमारास असाच खिडकीतून बाहेर बघत बसलो होतो. खाली मुलं स्विमिंग पूलमध्ये खेळत होती. मला आणखीनच उदास वाटू लागले. त्या हॉटेलच्या खिडक्यांना ग्रील नव्हते. मला अक्षरशः खिडकीतून उडी मारावी असे वाटू लागले. माझ्या डोक्यात अशा कल्पना कायम येत याआधी, पण त्या म्हणजे कवीकल्पना असत, म्हणजे असं केलं की त्यानंतर काय होईल, याची कल्पना करत कथा रचणे वगैरे माझा छंद होता. त्या कथांचा नायक मी असे. अभद्र कथा म्हणा हवं तर, पण आत्महत्येचा त्या कल्पना काल्पनिकच असत. यावेळी मात्र मला सिरियसली उडी मारून टाकावी असं वाटलं. सुदैवाने मी स्वतःलाच 'नाही' म्हणालो, चटकन खिडकीपासून दूर झालो. मग आईला फोन केला. आईशी बोललो. पण फार नाही. मला बोलायला कोणीतरी पाहिजे होते. एका जुन्या मित्राला फोन केला, तर त्याने आता बिझी आहे, म्हणून फोन ठेवला. मला आणखीच एकटं पडल्यासारखं वाटलं.

मग मी फेसबुकवर या आशयाची पोस्ट टाकली. मला लगेच मुंबईतील एका मित्राने मेसेज केला आणि सातासमुद्राकडे राहणाऱ्या एका मैत्रिणीने कॉल. दोघांनी आधी मला खोलीबाहेर पडून लॉबीत जायला सांगितलं. त्यानंतर पुढचे चारेक तास ती फोनवर आणि हा टेक्स्टवर होता. माझे रिप्लाय थांबायला नकोत हे त्याने पाहिले. त्यानंतर पुढे रोज ती कॉल करत असे आणि अगदी ४-५-६ तास बोलत असे. विरुद्ध टाइमझोनला असल्याने तिला हे सुदैवाने सहजपणे शक्य होते. ती तिकडचे किस्से सांगेल, किंवा कविता किंवा कथा वाचून दाखवेल, वगैरे. हळूहळू मी पूर्णपणे सामान्य झालो. पुन्हा आत्महत्येचे विचार कधी आले नाही. पण त्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मी काही गोष्टी ठरवल्या:-

१. माणसांत राहायचे.
२. स्वतःला आनंदी ठेवायचे. त्यासाठी, त्याक्षणी जे करावेसे वाटते, ते करावे. बाकी गेलं खड्ड्यात.

पहिल्यावर लगेच अंमलबजावणी सुरू केली. कंपनीने दिलेल्या हॉटेलमध्ये राहायचे नाही, असं ठरवलं. आपण बिल दिलं की कंपनी रीइम्बर्स करणार होतीच! एक वर्गमित्र BTMला राहतो, हे ठाऊक होते. त्याला कॉल केला, म्हणालो की मला माणसांत राहायचं आहे, तो म्हणाला की माझ्याबरोबरच राहायला ये. मी इथं पोरांच्या होस्टेलमध्ये राहतो आणि इथं २४ तास पोट्टे उधळत असतात आणि योगायोगाने माझा रूममेट पुढच्या आठवड्यात बंगळूर सोडतोय. चला, माझी व्यवस्था झाली. पुढच्या महिन्यात मी हॉटेल सोडले आणि मित्राच्या हॉस्टेलमध्ये राहायला गेलो. माझ्या रात्रपाळी सुरू होत्याच, पण इथं दिवसादेखील जिवंत वातावरण होते. काही स्ट्रगलर होते, काही पोरं कोर्स करत होते, बाकीचे नोकरदार होते. स्ट्रगलर पोरं वॉक-इनला जाऊन परत आली की त्यांचे अनुभव ऐकणे, गप्पा मारणे, हे सगळं करत दिवस मजेत जाऊ लागले.

२. सुट्टी घ्यावीशी वाटली की सुट्टी घेऊ लागलो. दिवाळीत अठरा दिवस सलग सुट्टी घेतली. तसेच,दिनपाळीचा बेक्कार आग्रह धरल्याने आता मला सामान्य वेळात काम करायला मिळू लागले. पण, शरीराचे घड्याळ बिघडल्याने झोप येईना, तेव्हा बीटीएम ते ब्रिगेड रोड, बीटीएम ते फोरम मॉल ते परत बीटीएम, अशी पायपीट करू लागलो. आल्यावर गाढ झोप लागत असे.

२०१२च्या जानेवारीत मी पुण्याला परतलो. डिसेंबरमध्ये नोकरी सोडली. २०१४ ला भारतीय प्रशासकीय सेवेचा चा पहिला प्रयत्न दिला. तेव्हापासून दरवर्षी मेन्सपर्यंत पोचून तिथं आपटू लागलो. पण एकदाही निराश झालो नाही, रडलो नाही, की हताश झालो नाही. दिल्लीत खोली शोधताना 'गजबजलेल्या भागात घेणे' हा एक निकष होता. दिल्लीत एकटा राहूनही एकटेपणा कधी वाटला नाही. कारण इथेही माणसांचे आवाज सतत येतील अशी खोली घेतली. मी सलग २-३ आठवडे खोलीबाहेर पडत नसे. पण ऑनलाईन राहत होतोच आणि माझ्या गल्लीतल्या जाटांचे दिवसरात्र ऐकू येणारे बुलंद आवाज मला आपण माणसांमध्ये असल्याची जाणीव करून देत.

बंगळुरुच्या त्या दिवसांमध्ये शांतपणे बसून विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला खूप काही करता येतं! आपल्यापाशी एकच कौशल्य नाहीये, तर डझनभर कौशल्ये आहेत. आपण उपाशी मरू शकत नाही कधी. त्याक्षणी भविष्याचा ताण गेला. चार पैशांसाठी आपले समाधान, आपले आरोग्य गमवायचे नाही म्हटलं. पुढच्या वर्षी नोकरी सोडायचा निर्णय घेताना फार विचार करायची गरज पडली नाही. नोकरीत पाच वर्षांचा खंड पडल्यानंतरही पुन्हा कमावणे सुरू करायला मला फक्त १५ दिवस लागले.

आता आपण आपल्या मस्तीत जगतो! अमुकच एका क्षेत्रात करिअर केलं पाहिजे, हा विचार डोक्यातून काढून टाकल्याने युपीएससी मेन्सच्या सलगच्या अपयशांनी मानसिक त्रास झाला नाही, उलट वेगवेगळ्या क्षेत्राचे अनुभव घ्यावेसे मनापासून वाटू लागले. आणि मस्तीत, मजेत जगता येऊ लागले.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही फेजेस या ना त्या प्रकारे येतात.
पुर्वी नात्यांच्या ईकोसिस्टीममुळे नैराश्यावर प्राथमिक अवस्थेतच उपचार होउन जात. आता नात्यांची वीण बदलली आहे. आता ही नात्यांची इको सिस्टीम मानसिक आरोग्य क्षेत्रातील सेवा सेक्टर मधे गेली आहे. अर्थात आताच्य सेवा या सेवा नसून तो व्यवसाय असतो. त्याचेही महत्व आहेच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अती इमोशनल असणाऱ्या व्यक्ती नैराश्य च्या गर्तेत गटांगळ्या जास्त खातात.
माणसाने इमोशनल असण्या पेक्षा कठोर आणि व्यवहारी असावे.
दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्य शी आपल्या आयुष ची तुलना करू नये.
स्वप्न असावीत,ध्येय असावीत पण ती फक्त भावनिक नसावीत तर व्यवहारिक असावीत आणि प्रयत्न वादी वृत्ती नी स्वप्नांचा पाठलाग करता आला पाहिजे.
मुळात यश अपयश असे काही नसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

बाडिस...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखन आवडलं, माझा पास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कशामुळे आपल्याला नैराश्य येतं, हे तुला समजलं आणि त्यावर तू कृतीही करू शकलास. जवळच्या लोकांनी तुला मदतही केली. किती तरी लोकांना ह्या गोष्टी चटकन समजत नसतीलही; किंवा त्यांचं नैराश्या ह्यापेक्षा अधिक तीव्र प्रकारचं असेल ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नक्की भेटू कधी योग आला तर, मी सुद्धा कोरमंगलात होतो त्यामुळे BTM ते ब्रिगेड रोड म्हणजे दणदणीत पायपीट केलीत असे नक्की म्हणेन.
करिअर माझ्यासाठी आहे मी करीअर साठी नाही असे माझेही ठाम मत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खेळ आपला पण बॅट माझी म्हणून नियम माझे... अन्यथा चपला विसरू नका.