करोना आणि धारावीची गोष्ट : राजू कोरडे

करोना आणि धारावीची गोष्ट
राजू कोरडे (रहिवासी आणि स्वयंसेवक)

सामूहिक कामाचा परिणाम

माझा जन्मच धारावीतला. त्यामुळे धारावीची पहिल्यापासूनच तपशिलात माहिती होती. त्यामुळे, कोविडकाळात काम सुरू करणं, त्यासाठी इतरांची मदत घेणं, लोकांपर्यंत पोचणं सोपं गेलं. माझ्या परिसरातील लोकांसाठी मी ते कर्तव्य भावनेनेच केलं. धारावीतील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण सुरू झाली आणि आमचा धारावी कलेक्टिव्ह ॲक्शन गृप सज्ज झाला. धारावीसारख्या भागात क्वॉरंटाईन राहणे, एकमेकांपासून अंतर ठेवणे या कृती लोकांनी ठरवल्या तरीही करणं अशक्य आहेत.

धारावीतल्या नाईकनगर, महात्मा गांधी नगर, प्रेमनगर, इंदिरानगर, अण्णानगर, माटुंगा लेबर कँम्प अशा अनेक छोट्याछोट्या वस्त्यांमध्ये प्रत्येक नागरिकापर्यंत पोचणं, त्यांना मानसिक आधार देणं हे मोलाचं काम या काळात खूप अवघड असूनही माझ्याबरोबर काम करणाऱ्या २०० स्वयंसेवकांमुळे शक्य झालं. क्षयरोगग्रस्त अनेक रुग्ण धारावीत आहेत. तसंच अनेक साथीच्या रोगांचा सामना धारावीकरांनी आतापर्यंत केला आहे. त्यामुळे येथील सर्वच नागरिकांमध्ये कोरोनाशी लढण्याची सामूहिक क्षमताही सुरुवातीच्या काळापासूनच होती. त्यामुळेच नागरिकही धीराने तोंड देऊ शकले.

आमच्यासोबत महाराष्ट्र एकता अभियान,धारावी फाउंडेशन, धारावी पुनर्विकास समिती, टाटा ट्रस्ट, केअरिंग फ्रेंडस, उडान, आर निसर्ग फाउंडेशन, युनुस सोशल बिझनेस सेंटर, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे, पोद्दार फाउंडेशन, परिसर आशा, अशा विविध संस्था एप्रिलपासून सतत काम करत आहेत. धारावीतील सर्वच राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी आपापल्या क्षमतेप्रमाणे कामे केली आहेत. इथल्या चाळ कमिट्या, रहिवासी संघ, मित्रमंडळ, सोसायट्या यांनीही नियम बनवले, ते पाळण्यासाठी लोकांना भाग पाडलं.

कल्पना जगताप

लोकांना धान्य वाटण्याकरिता तर काही स्वयंसेवकांनी स्वत:च्या खिशातले पैसे खर्च केले. इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही धान्यवाटप करण्यात आलं. या काळात महानगरपालिकेकडून तयार जेवणाचे किट्स मिळाले. धारावी कलेक्टिव्ह ॲक्शन ग्रुप यामध्ये अनेक सेवाभावी डॉक्टर काम करतात.

जी औषधं मिळाली ती आम्ही १० हजार घरांमध्ये वितरित केली. या साऱ्या कामात धारावीतील एक वैद्यक व्यावसायिक डॉ. कैलास गौड यांचे सहकार्य होते.

धारावीतल्या ९० टक्के लोकांच्या घरात शौचालय नाही. इथले बहुसंख्य लोक सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. तिथे स्वच्छता आणि सुरक्षा बाळगण्याची फारच गरज होती. यासाठी १० हजार लिटर हँड सॅनिटायझर ठिकठिकाणच्या २०० शौचालयांमध्ये पुरवण्याचं काम आम्ही केलं.
धारावीतल्या सर्व विभागांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी शौचालयं, रस्ते, गल्लीबोळात निर्जंतुकीकरण पंप बसवण्यात आले. त्यासाठी लागणारं औषध आम्ही पुरवलं. यासाठी ३०० हँडपंपांचं वितरण केलं. धारावीतील गल्लीबोळ, गटारं, सार्वजनिक शौचालये इत्यादी ठिकाणी २५ स्प्रे-पंपही ठेवण्यात आले.

मात्र, आमच्या कामाच्या मर्यादांची आम्हाला जाणीव होती. म्हणूनच आम्ही मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. इथे क्वॉरंटाईन, आयसोलेशन सेंटर तयार करण्याकरिता महापालिकेने मदत केली. तसेच सायन रुग्णालयातील वॉर्डबॉय, नर्सेस, डॉक्टर्स या सगळ्यांनी या काळात जे काम केलं त्याची प्रशंसा करावी तेवढं थोडंच आहे. काही ठिकाणी दोन लोकं एका बेडवर तर काही वेळा जमिनीवरही रुग्णाला राहावं लागायचं अशीही परिस्थिती होती. कारण रुग्णालयात जागाच नव्हती. हळूहळू परिस्थितीत सुधारणा झाली. सफाई कामगार, अंगणवाडी आणि हेल्थ पोस्टमधील कर्मचारी या सर्वांनीच आपापले काम चोख बजावले. धारावी आयुष डॉक्टर्स असोसिएशन, माहीम धारावी मेडिकल प्रॅक्टीशनर असोसिएशन अशा सर्व डॉक्टर संघटनांनी केलेल्या कामाचाही हा परिणाम आहे.

धारावीबद्दल बाहेरचे लोक टोकाची मतं व्यक्त करत होते. हा कोरोनाचा हॉटस्पॉट आहे, सगळ्या मुंबईला धारावीमुळे धोका आहे, धारावी बॉम्ब टाकायला हवा, ही वस्ती नाहीशी व्हायला हवी वगैरे. धारावीच्या मुंबईसाठी असलेल्या योगदानाविषयी माहिती नाही, असेच हे लोक असणार. अन्यथा ते असं बोलले नसते.

तरीही धारावी या आजारावर नक्कीच नियंत्रण मिळवेल याची आम्हाला खात्रीच होती. कारण इथल्या लोकांमध्ये संकटाशी लढण्याची झगडण्याची वृत्ती आहे. या त्यांच्या वृत्तीनेच बळ दिले. धारावीतल्या लोकांनी स्वतःची काळजी घेतली. आणि एकमेकांनाही मदत केली.

कल्पना जगताप

कोरोना झाला की, लोकं एकमेकांना मदत करत नाहीत, आजाऱ्याला वाळीत टाकतात असं अनेक ठिकाणी घडतंय. पण आमच्या धारावीत तसं नाही झालं. रहिवाशांनी अशा परिस्थितीतही शेजाऱ्यापाजाऱ्यांना मदत करणं, जेवण पुरवणं अशी कामं केली. ही त्यांची एकमेकांना मदत करण्याची प्रवृत्ती यावेळी कामी आली. हेच धारावीकरांचं सामूहिक यश आहे.

आता भीती जाऊन आपण सावधानता बाळगली पाहिजे, असं सतर्कतेचं वातावरण सध्या धारावीमध्ये निर्माण झालं आहे.

---
शब्दांकन: व्ही.नमिता
(समाप्त)


हा लेख 'नवी उमेद'च्या फेसबुक पानावर जुलै महिन्यात क्रमशः प्रकाशित झाला होता. 'ऐसी अक्षरे'वर प्रकाशित करण्यासाठी अनुमती दिल्याबद्दल 'नवी उमेद'च्या मेधा कुळकर्णी आणि स्नेहल बनसोडे शेलुदकर यांचे आभार.

मागील भाग

field_vote: 
0
No votes yet

धारावी कोरोना साथीबद्दल माहिती आणणाऱ्या मंडळींचे आभार मानावेत तितके कमी आहेत.
एकंदरीत जनमानसात धारावीबद्दल मत वाईट आहे. त्यात महासाथीचा मुंबईतील हॉट स्पॉट. त्यामुळे लोकांचे मत अजूनच कलुषित .
परंतु धारावीतील मंडळी असा चिवटपणे प्रयत्न करतील असे कुणाला वाटले होते.
वाचून बरे वाटले.
नवी उमेदचे आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0