आईचं घर ( वाडा म्हणजे संस्कारांची खाण )

खरंच ! आईच्या घराशी माझं फार जवळचं भावनिक नातं आहे. माझा जन्मच मुळी शनिवार पेठेतला, १९५६ सालचा , माझ्या मोठया भावाचा , विनोद रावांचा ( आता रिटायर्ड कंपनी सेक्रेटरी ) माझ्या आधी दोन वर्ष, माझी धाकटी बहिण, वीणा ( पेंडसे - फडके ) माझ्यापेक्षा २ वर्षांनी लहान, जी सध्या ' आई रिटायर होतेय ' मधे आईची भूमिका करत असते. शनिवार पेठेत म्हणजे ३७३, शनिवार : कन्याशाळा ते सुयोग मंगल कार्यालय यांना जोडणाऱ्या गल्लीत . सुयोगच्या पलिकडे अहिल्यादेवी. आमच्या गल्लीच्या महत्त्वाच्या खुणा म्हणजे कन्याशाळेच्या बाजूला टांगा स्टॅण्ड जिथे २ -३ तरी टांगे उभे असायचे ( आजच्या पिढीतल्या मुलांना म्हणून सांगतो, टांगा म्हणजे प्रवासी घोडा - गाडी किंवा बग्गी ) मधेच पुरंदरे वाडा, नातूंची चाळ, आमच्या खिंवसर वाड्यालगतच कन्याशाळेचं ग्राउंड , मग बोधे कल्हईवाला, मुरलीधर मंगल कार्यालय ( जिथे नाटकाच्या प्रॅक्टिस चालत, ज्या आम्ही चोरुन बघायला जायचो) , समोरची कोळशाची वखार.

तसं बघितलं तर आमची गल्ली खूपच मध्यवर्ती होती , जी आता पेपर गल्ली म्हणून ओळखली जाते. मध्यवर्ती अशासाठी की गल्लीच्या एका बाजूला मेहुणपुरा , अप्पा बळवंत चौक जवळ , दुसऱ्या बाजूला रमण बाग , वीराची तालिम , खालच्या बाजूला शनिवार मारुती, , नदीकाठचे आपटे , नेने घाट जवळच .
हे सगळं ह्यासाठी सांगतो की ह्या सर्व परिसरात चोर -शिपाई , लपाछपी खेळण्यात , सायकल शिकण्यात - चालवण्यात माझे बालपण गेले .

आमचा वाडा म्हणजे एकदम लांबलचक बोगीसारखा होता, मधे १५ ते २० फुटी रस्ता आणि दुतर्फा दुमजली किंवा एकमजली घरं.
माझे वडिल म.न .पा मधे कामाला , खरं तर त्यांचा मंडईत नारळाचा गाळा होता. RSS चे / शाखेचे कार्यकर्ते, त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता. त्यामुळे त्यांचा मंडईतला नारळाचा धंदा खूप जोरात चालायचा , इतका की शेजारच्या गाळेवाल्याचा धंदा बंद पडायची वेळ आली , त्याने वडिलांना , त्याची , त्याच्या फॅमिलीची उपासमार व्हायला लागल्याची दर्दभरी कहाणी ऐकवली आणि वडिल पडले साधे भोळे , आपल्यामुळे त्याची ही दुरावस्था होतेय असं वाटून त्यांनी, त्यांचा नारळाचा तेजीतला धंदाच बंद केला आणि म.न .पा मधे सरळ नोकरी धरली .
वडिलांना तेव्हा महिना २० रू पगार होता , पण त्यातही माझी गृहकृत्यदक्ष आई काटकसर करून महिन्याला १ ग्रॅम सोनं विकत घ्यायची .

माझ्या वाड्यानं मला खूप काही आयुष्याचं तत्वज्ञान दिलं की जे एखादी प्रोफेशनल मॅनॅजमेन्ट इन्स्टिट्यूटपण देवू शकणार नाही .
ह्या वाड्याने मला शेजारधर्म शिकविला की जो आजकालच्या बंद फ्लॅट संस्कृतीमधे अभावाचेच आढळतो . आजकाल आपण पेपरमधे बातम्या वाचतो की फ्लॅटमधे एकटी म्हातारी बघून चोरटयांनी नजर ठेवून तिला मारहाण करून लुटली, पण ते शेजारपाजारच्या फ्लॅट मधल्यांना कळालेपण नाही .

आमच्या वाड्यात एकट्या एका खोलीत राहणाऱ्या पार्वतीबाई सगळ्यांचा काळजी घेण्याचा विषय होता . त्यांचं जेवण , त्यांचे औषधपाणी ह्याची काळजी अनाहूतपणे सर्व बिऱ्हाडांकडून घेतली जायची . त्याचवेळी वाड्यातल्या सर्व चिल्लापिल्लांवर, त्यांचा, स्वतःच्या नातवंडांपेक्षा अधिक जीवापाड मायेचं नातं होतं . त्यांच्यासाठी बेदाणे , मनुका , खारका त्यांनी डब्यात खाऊ म्हणून ठेवलेले असत . हे मायेचे/प्रेमाचे धागे मला खूप काही शिकवून गेले.
आमच्या समोरच्या साखराबेन , आडनाव जैन गुजराथी , माझ्या आईचं आणि त्यांचं फार जमायचं . त्यांच्या मिस्टरांचं लक्ष्मी रोडवर कापडाचं दुकान , लग्नाला अनेक वर्ष होऊनसुद्धा त्यांना मूलबाळ नव्हतं . आपल्या दुकानातल्या एका स्त्रीवर त्यांचं प्रेम जडलेलं. अशा अवघड परिस्थितीत सुद्धा साखराबेन सतत हसतमुख असत . देवावर त्यांची श्रद्धा होती . त्याच श्रद्धेनं त्यांचं आयुष्य नव्यानं खुलताना मी माझ्या डोळ्यांनी बघितले आहे . माझ्या आयुष्यात आलेल्या कठीणप्रसंगांना सामना देताना साखराबेन मला कायम स्फुर्तिस्थान राहिल्या आहेत .

आमच्या एक घर पलिकडे, शेजारी गुगळे नावाचे मारवाडी कुटुंब . त्यांची एकच खोली पण आठजण रहायचे . पती ,पत्नी , चार मुले , शिवाय निधन झालेल्या भावाची दोन मुले असे कुटुंबं . माझ्या आईतला आणि आमचा भावंडांमधला काटकसरीचा गुण ह्या मारवाडी कुटुंबामुळेच आलं असे मला वाटते . आजघडीला त्या कुटुंबातील बहुतेकजण विविध क्षेत्रात मोठे व्यापारी / धंदेवाले म्हणून आढळतात .

चाळ म्हणलं की कॉमन संडास आलेच. एवढ्या सगळ्या बिऱ्हाडात मिळून चारच संडास होते . त्यामुळे प्रत्येक संडासासमोर सकाळच्या वेळी एक –एक, दोन -दोन नंबर असायचेच. नंबर लावलेल्याने स्वतः तिथं जातीनं उभं असणं गरजेचं होतं . नुसतंच कुणी टमरेल ठेवून गेलो होतो आणि ‘ नंबर लावला होता ’ म्हणलं तर त्यावरनं भांडणं व्हायची . तुम्ही कदाचित हसाल पण घाईगडबड असली तरी मनावर संयम कसा ठेवायचा हे मला चाळीतल्या कॉमन संडासांनीच शिकवलं.
जाता जाता शेवटचं सांगतो , मला इंजिनिरिंग कॉलेज, शिवाजीनगर (COEP) मधे असताना , कॉलेजच्या लघुकथास्पर्धेमधे पहिलं बक्षिस मिळाले, ते ह्या ‘ आईच्या घरां ‘तील अनुभवांवर आधारलेल्या कथेमुळेच .
आज भले मी बंगल्यात रहात असेन , पण माझं बालपण , उमलतं तारुण्य माझ्या चाळीतल्या आईच्या घरांनच फुलवले , घडवले : वय वर्ष २८ पर्यंत . माझ्यावर अनेक चांगले संस्कार केले , की जे मला आयुष्याभराला , आत्ता ६३ व्या वर्षीपण पुरत आहेत आणि माझ्या मुलं-नातवंडांपर्यंत पोचत आहेत .

आईचं घर ( वाडा म्हणजे संस्कारांची खाण ) लेख, महाराष्ट्र टाइम्स : ११ फेब्रुवारी २०२० ला छापून आला.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आठवणी मस्त!

विणा फडकेंशी माझी ओळख आहे,
'आई रिटायर होतेय' चा प्रयोग बघितला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख फारच त्रोटक वाटला. मीही तुमच्याच पिढीचा, त्यामुळे लेखाचा अधिक विस्तार करणे शक्य होते असे माझे मत आहे. आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0