म्हणींच्या गोष्टी ...(२)

मराठी भाषेचे  शब्दवैभव, मराठी भाषिकांना आणि मराठीच्या जाणकारांना चिरपरिचित आहे.   विविध प्रकारच्या म्हणी,   वाक्प्रचार आणि सुविचारांच्या  अलंकारांची  लेणी मराठी भाषेला लाभलेली आहेत.   काही म्हणी  रोजच्या  संवादात  अगदी सहजपणे  वापरल्या जातात. त्या म्हणी कशा प्रचलित झाल्या असाव्यात,   त्या मागे काय कथा असतील?


तर काही म्हणींच्या या कथा...   
 


"ह्यात नाही राम - त्यात नाही राम"  
 


काही माणसे फार चिकित्सक असतात. त्यांना काहीच पसंत पडत नाही. हे प्रत्येक बाबतीत असते. अगदी साध्या वस्तूंची खरेदी करणे असो किंवा काही महत्त्वाचा निर्णय घेणे असो. कुठलाही पर्याय त्यांच्यासमोर ठेवल्यास त्यात त्यांना काही ना काही खोट आढळतेच. 
अशा व्यक्तींच्या वृत्तीचे वर्णन करताना म्हणतात,.. त्याचे वागणे म्हणजे ह्यात नाही राम,   त्यात नाही राम, असे आहे.   
हा वाक्प्रचार जरी नकारात्मक वृत्ती दर्शविण्यासाठी वापरत असले, तरी त्याची मूळ कथा  अतिशय हृद्य आहे.   
 


मूळ कथा अशी आहे.   :-  
 


श्रीरामांनी रावणाचा पराभव केला. लंकेचे राज्य बिभीषणाच्या हाती सुपूर्त करून ते सीता मातेसह अयोध्येस परतले.  अयोध्ये मध्ये बंधू भरताने चौदा वर्षे, ज्येष्ठ बंधू श्रीरामाच्या नावाने राज्यकारभार चालविला होता.

श्रीराम माघारी आल्यानंतर, त्यांचा विधिवत राज्यारोहण सोहळा करण्यात आला होता. त्याकरिता देशोविदेशीचे राजे, महाराजे उपस्थित होते. त्यात किष्किंधा नरेश सुग्रीव आणि त्याच्या समवेत भक्त हनुमान देखिल उपस्थित होते.
सर्व अतिथींचा यथोचित मानसन्मान करण्यात आला. परंतु हनुमानाला मात्र काहीच दिले नाही. सीतामाईच्या लक्षात ही गोष्ट आली.   त्यांनी त्याबाबत विचारले असता  श्रीराम म्हणाले,   "हनुमानाला देण्यासारखे माझ्याकडे काहीच नाही. " 


परंतु सीतेला काही ते पटले नाही. सीतामाईने हनुमानाला बोलावून घेतले, स्वतःच्या गळ्यातील टपोऱ्या, पाणीदार मोत्यांचा किंमती हार स्वहस्ते हनुमानास प्रदान केला. हनुमानानेही तो आदरपूर्वक स्वीकारला.

सारे समारंभ संपले, अतिथींची भोजने देखिल झाली. त्यानंतर सीतामाई काही सख्या आणि दासी सोबत तेथील उद्यानात आल्या होत्या. तेथे विहार करीत असताना, एका झाडाखाली बऱ्याच गुलाबी, पांढऱ्या तुकड्यांचा खच पडलेला होता. प्रथमतः त्यांना वाटले फुलांच्या पाकळ्या असाव्यात. परंतु तेथे जाऊन पाहिल्यावर लक्षात आले, ते मोत्यांचे तुकडे होते. 
कुतूहलाने वर पाहिले असता दिसले, की झाडाच्या एका फांदीवर हनुमान आहे. सीतेने दिलेला मोतीहार त्याच्या हातात होता. त्यातील एक एक मोती काढून तो फोडत होता.   फुटलेल्या मोत्याकडे निरखून पाही आणि म्हणे, "यात राम नाही", मग दुसरा मोती फोडून बघे आणि परत म्हणे,   "यातही राम नाही". मग ते फोडलेले मोती खाली भिरकावून देई. असे बराच काळ चालले होते.     
 


"हे काय चालवले आहेस हनुमाना? " 
सीतेने चढ्या स्वरात विचारले. हनुमानाने पहिले सीतामाई तिच्या दासी आणि सख्यांसमवेत तिथे उभी होती. झाडावरून खाली उतरून हनुमानाने सीतेला वंदन केले, आणि हात जोडून तिथेच उभा राहिला. सीतेने क्रोधित होत त्याला विचारले,
 
"मी तुझा सन्मान करण्याकरता, माझा मोतीहार दिला, आणि तू तर सगळे मोती फोडून टाकलेस? "का असे केलेस? " 
तेव्हा हनुमानाने नम्रतेने सांगितले, 

"तुम्ही माझा सन्मान केलात म्हणून आभारी आहे, पण त्या मोत्यांचा मला काहीच उपयोग नाही. कारण त्यात राम नाही. " 

सीतेला आश्चर्य वाटले. तिचा रागही निवळला होता. हनुमानाची श्रीराम भक्ती तिच्या चांगलीच परिचयाची होती. सीतेने विचारले,

"राम तर तुझ्यातही नाही, मग ते कसं चालते तुला? " 

हनुमानाने सांगितले,
"नाही माते, श्रीराम तर सदासर्वदा  माझ्या हृदयात आहेत. "
असे म्हणत त्याने दोन्ही हातांनी हृदयावरील त्वचेचे आवरण दूर केले. आणि काय आश्चर्य, हनुमानाच्या हृदयामध्ये प्रभुरामाची मूर्ती साकारलेली होती.  
सीतेच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आले, आणि ती  उद्गारली, 

"धन्य आहे हनुमाना, तू आणि तुझी रामभक्ती." 


 
उपकथा :- 
 
सुबोध चांगला हुशार मुलगा होता. पण फार चंचल. एखादे काम हाती घेतले, की मध्येच त्याला त्याचा कंटाळा येई. त्यातले त्याचे लक्ष दुसरीकडे कुठेतरी वेधले जाई. त्यामुळे अनेक कौशल्य शिकूनही त्याला काहीच उपयोग होत नसे. 

सुबोधचे आई आणि वडील दोघेही नोकरी करीत. त्याला एक बहीण पण होती. रेवती तिचे नाव. ती तिच्या अभ्यास, खेळ आणि छंदात मग्न असे. असेच दिवस, महिने, वर्षे उलटली. 
 
रेवतीने कॉंप्युटर सायन्समधले शिक्षण पूर्ण केले आणि तिची कॅंपस इंटरव्ह्यू मध्ये निवड करण्यात आली होती. चांगल्या कंपनीत तिला नोकरीदेखील मिळाली.

सुबोधचे मात्र अजून कुठेच, काहीच जमत नव्हते. खरे तर तो रेवतीपेक्षा दोन वर्षांनी मोठा होता. बुद्धिमानही होता. पण धरसोड वृत्तीमुळे मिळालेल्या काही चांगल्या संधी त्याने वाया घालवल्या होत्या. या उलट रेवती मात्र, बुद्धिमत्ता, परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर कधीच पुढे निघून गेली होती. तिच्या यशाचे सुबोधलाही कौतुक वाटे. परंतु तरीही त्याने आपली चंचल वृत्ती काही बदलली नाही.

महाविद्यालयात प्रवेश घेताना त्याने ठरवले होते की मेडिकलला जायचे. त्याला डॉक्टर व्हायचे होते. त्या दिशेने त्याने तयारी सुरू केली होती. सुट्टीच्या काळात देखिल तो शिकवणी वर्गांना जात होता. सारे काही सुरळीत चालले होते. आई बाबा पण समाधानी होते. आपला मुलगा इतका प्रयत्न करतो आहे, त्याला नक्कीच यश मिळेल असे त्यांना वाटत होते. महाविद्यालयाचे वर्ग सुरू झाले. दिवसभर व्याख्याने, प्रयोग शाळा इत्यादी  मध्ये तो व्यस्त राहू लागला होता. त्याला अनेक नवीन मित्र मिळाले होते. बरेचदा त्यांच्यात भविष्याविषयी चर्चा होत असे. त्यातील काहींना इंजिनिअरिंग करायचे होते. त्यांचे ऐकून सुबोधला पण वाटायला लागले की मेडिकलपेक्षा इंजिनिअरिंगच चांगले.

परंतु परीक्षेचा निकाल काही मनासारखा लागला नाही. मिळालेले मार्क बघता विज्ञान शाखेत प्रवेश  घेतला. काही काळ त्याला वाटले होते वकील व्हावे. पण शेवटी त्याने वास्तुविद्या शाखेमध्ये  प्रवेश घेतला. आता मात्र आई, वडील आणि रेवतीने त्याला तो अभ्यासक्रम पूर्ण करायलाच पाहिजे असे सांगितले. ते सतत त्याला प्रोत्साहन देत असत, जेणेकरून त्याचा त्या अभ्यासक्रमातील रस टिकून राहावा. जेव्हा पदवी मिळाली, तेव्हा सगळ्यांना हायसे झाले. सुबोध मात्र फारसा खूश नव्हता. त्याच्या बरोबरीची मुलांपैकी कुणी नोकरी करत होते, तर कुणी उच्चशिक्षणासाठी परदेशी देखिल गेले होते.

सुबोधने नोकरी शोधायला सुरुवात केली. आता त्याला त्याच्या धरसोड वृत्तीमुळे झालेले नुकसान कळू लागले होते. मुलाखतीदरम्यान त्याला एक प्रश्न नेहमी विचारला जाई. पदवी मिळविण्यात त्याला इतकी वर्षे का लागली? अभ्यासाव्यतिरिक्त इतर कौशल्यांबाबतीत देखिल हेच. कुठलीही गोष्ट पूर्णत्वास नेणे नाहीच. त्याने काही नवीन उपक्रम हाती घेतला, की त्याला ओळखणारे म्हणत, "बघू किती काळ टिकतोय त्याचा उत्साह ते ". या सर्वामुळे  त्याचा  बायोडेटा  फारसा प्रभावी वाटत नव्हता.


बऱ्याच प्रयत्नांनंतर त्याला नोकरी मिळाली. कंपनी चांगली होती. त्याचे वरिष्ठ सहकारी त्याला चांगले काम करण्याची संधी देण्यास तयार होते. जन्मजात बुद्धिमत्तेमुळे तो चांगले काम करीतही  होता. त्याचे वरिष्ठ अधिकारी त्याच्यावर खूश होते. घरच्यांना हायसे झाले, की मुलगा आता मार्गाला लागला म्हणून. 
आता त्याच्या  बोलणी विवाहाची सुरू झाली.   अनेक स्थळे त्याने नाकारली. नाकारण्याची कारणे देखिल काहीवेळा अगदीच क्षुल्लक असत. अशी एक दोन वर्षे उलटली. आता त्याला सांगून येणाऱ्या स्थळांची संख्या कमी कमी होत होती. अखेर हो नाही करत एकदाचा विवाह निश्चित झाला. आई बाबांना समाधान वाटले. त्यांना वाटत होते की सुबोध मध्ये चांगला बदल घडून आला आहे. विवाहानंतर जबाबदारीची त्याला चांगलीच समज येईल, आणि त्याची चंचलता कायमची नाहीशी होईल.

सुबोधची पत्नी बीना होती सुरेखच. त्याच्यासारखीच वास्तुविद्या शाखेची पदवीधारक होती. चांगली नोकरी देखिल करीत होती ती. विवाहानंतर काही काळ जरा शांततेत गेला. सगळ्यांना वाटले, की सुबोधला आता जबाबदारीची जाणीव झाली आहे. आणि त्याच्या स्वभावातली चंचलता देखिल संपुष्टात आली आहे.
आणखी काही काळ उलटला, आणि सुबोधच्या मूळ स्वभावाने अस्तित्व दाखविण्यास सुरुवात केली. नवीन घर घ्यायचे होते. अनेक चांगले गृहप्रकल्प, त्याच्या हो नाही करण्यात हातातून निसटले. शेवटी एक घर निश्चित झाले. घराची रचना, सजावट कशी असावी यावरून आता सुबोध आणि बीना मध्ये वादावादी सुरू झाली. बीना दरवेळेस नमते घेई. परंतु एकदा जे  काही ठरेल, ते तरी पूर्ण व्हावे अशी तिची अपेक्षा असे. पण तेही नाही. त्यातही सतराशे साठ वेळा बदल. त्याचे निर्णय सतत बदलत असत. घराचे काम करायला येणारे कामगार, त्या बद्दल त्याच्या पाठीमागे बोलत. बीनाला ते ऐकताना भारी संकोचल्यासारखे होई. तिने सुबोधला त्याबाबत सांगण्याचा प्रयत्न केला तर तो दुर्लक्षच करत असे.

घर पूर्ण होऊन गृहप्रवेशाची वेळ आली, तोवर नव्या घराची नवलाई पार ओसरून गेली होती. बीनाला आता सुबोधच्या स्वभावाचा चांगलाच परिचय झाला होता. ती जास्तीत जास्त तिच्या ऑफिसच्या कामामध्ये व्यस्त राहू लागली. सुबोधचे घडीघडी बदलणारे निर्णय तिला आता जाचक वाटू लागले होते. आता त्याच्या मनात एका नव्याच विचाराने ठाण मांडले होते. त्याला स्वतंत्र व्यवसाय करायचा होता. नोकरी करून दुसऱ्या कुणाच्या हुकुमाचा ताबेदार राहू नये असे त्याला वाटू लागले होते. तो बीनाला म्हणू लागला, तू पण नोकरी सोडून दे. आपण दोघे मिळून स्वतंत्र व्यवसाय करू. परंतु आजवरच्या अनुभवाने बीना सावध झाली होती. तिचा सुबोधच्या बोलण्यावर अजिबातच विश्वास नव्हता. आज हे बोलतोय, पण उद्या त्याच्या मनात  काही दुसरेच काही आले तर...?   नकोच ते. ती म्हणाली तुझा व्यवसायात जरा जम बसला, की मी सोडीन नोकरी. इतक्यात दोघांनीही एकदम नोकरी सोडायला नको.


कसे माहिती नाही, परंतु त्याला तिचे म्हणणे पटले. त्याच्या आई वडिलांनी त्याला परोपरीने समजवले, की स्वतंत्र व्यवसाय करणे सोपे नाही. त्याकरिता भरपूर पूर्वतयारी हवी. जनसंपर्क हवा, काही कामे लगेच मिळतील याची खात्री हवी.   नाहीतर सुरुवातीलाच ऑफिसमध्ये रिकामे बसायची वेळ येईल. त्यांनी सुबोधला सांगितले की तू या सर्वांचा नीट विचार कर. नोकरी सोडायची घाई करू नकोस. 
 
परंतु ऐकेल तर तो सुबोध कसला.   तो म्हणाला, " घाई करू नकोस काय म्हणता, मी नोकरी सोडली आहे, माझा निर्णय पक्का आहे. " 
आता या पुढे काय बोलणार?   जे नशिबात आहे ते. म्हणून सर्वांनी शांत राहण्याचे ठरवले.


सुबोध फार उत्साहात होता. आता कुठे त्याच्या मनासारखे घडले आहे असे तो म्हणत होता. पण कुणी त्यावर फारसे मतप्रदर्शन केले नाही. कारण नवीन काही सुरू करताना तो दरवेळेस असेच म्हणत आला होता. त्याच्या आई बाबांना जरा अपराधी वाटू लागले. आपण बीनाला आधी याच्या स्वभावाची कल्पना द्यायला हवी होती असे त्यांना वाटले. 
 
पण बीना त्यांच्या कल्पनेपेक्षाही खूप जास्त समजूतदार होती. तिने तिच्या मानातली चिंता बाजूला करीत उसने अवसान आणले. ती म्हणाली,  
"आपण एक घरगुती समारंभ करूया, उद्घाटनाचा.
""चालेल चालेल! " सर्वजण एकसाथ म्हणाले.

घरातले चिंतेचे वातावरण निवळले. सुबोध जरा बाहेर गेल्यावर  बीना आईबाबांना म्हणाली, 
"आपण सुबोधला सर्वतोपरी मदत करायची. त्याने ठरवले आहे, ते त्याला अर्ध्या वाटेत सोडू द्यायचे नाही. तो बुद्धिमान आहे. त्याच्या क्षेत्रात निपुण आहे. जरूर आहे ती फक्त हाती घेतलेले काम तडीस न्यायचेच, या निर्धाराची. आपण सर्वांनी मिळून त्याला ती जाणीव करून द्यायला हवी."

सर्वांनी बीनाच्या म्हणण्याला मान्यता दर्शवली. 

सुबोधचा नवा प्रयोग सुरू झाला. आता त्याला कार्यालयामध्ये बसून काम मिळणार नव्हते.त्याला भरपूर फिरायला लागणार होते. वेगवेगळ्या लोकांच्या भेटीगाठी घेऊन, नवीन सुरू केलेल्या व्यवसायाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवी होती. आता त्याच्या पायाला चक्रे लागली होती. माहितीपत्रके, व्हिजिटिंग कार्डस इ. छापून आणली. दोन नवपदवीधारकांना मार्केटिंग आणि इतर ऑफिसच्या कामासाठी नेमले. सुरुवात  तर चांगली झाली होती.
त्याच्या आधीच्या नोकरीत झालेल्या व्यावसायिक ओळखीचा फायदा त्याला झाला. सुरवातीला एक दोन कामेदेखील हातात आली. परंतु ओळखींवर किती विसंबून राहायचे? व्यवसाय वृद्धीसाठी भरपूर प्रयत्न करायला हवे होते. व्यावसायिक  स्पर्धेत  टिकून राहण्यासाठी नवीन करार करणे, मिळविणे आणि यशस्वीरीत्या ते पूर्ण करणे अत्यंत  जरूरीचे होते. नुसते ओळखी आणि नावलौकिकावर विसंबून राहणे धोक्याचे होते. सुबोध तिच चूक करीत होता. त्याला वाटले, नोकरीनिमित्त इतक्या व्यावसायिकांबरोबर परिचय झालेला आहे,   त्याचा फायदा करून घेता येईल. पण व्यवसायाचे गणित इतके साधे नसते. त्याला अनेक परिमाणे असतात.

सुरुवातीच्या काही काळानंतर, दिवसेंदिवस त्याला त्याच्या कार्यालयात नुसते बसून राहावे लागे. दूरध्वनी वाजू लागला, की त्याला आशा वाटे. नवीन ग्राहक तर नसेल ना? काही वेळा वर्तमान पत्रातली जाहिरात वाचून, नुसताच चौकशीचा फोन असे. विचार करून नंतर सांगेन हा त्याचा ठराविक शेवट. सुबोध निराश होऊ लागला. नशीब, बीनाची नोकरी तरी चालू होती. ती सर्व घरखर्च निभावून नेत होती. सुबोधचे काही मित्र, जे त्याच्याप्रमाणेच सध्या चाचपडत होते, त्यांनी त्याला सुचवले, आपण जाहिरात व्यवसाय करू. वास्तुशास्त्राचा व्यवसाय काय राहीलच. जोडीला नवीन आणि तुलनेने सोपा असा व्यवसाय करावा. सुबोध लगेच तयार झाला. त्यानंतर असेच चालू झाले. अनेक छोटे छोटे उद्योग सुरू करून बंद केले.

बीना आणि आई बाबा हताश झाले होते. त्यांनी ठरविल्याप्रमाणे त्यांनी बराच प्रयत्न केला, त्याला प्रोत्साहन देण्याचा. त्याचे मनोधैर्य  वाढविण्याचा. पण काही उपयोग झाला नाही. त्यांनी सुबोधला व्यवसाय बंद करून परत एखादी नोकरी शोधावी असेही सुचवले. सुबोधला परत नोकरी शोधण्याची कल्पना पसंत नव्हती. तो परत परत नवीन व्यवसाय शोधत असे. काही काळानंतर तो बंद करून दुसरा. सुबोधला आपले अपयश स्वीकारतं येत नव्हते. तो अतिशय चिडचिडा झाला होता. घरातील वातावरण पार बिघडून गेले होते. 
 


आज घरात जरा चैतन्य, उत्साह दिसत होता. सुबोधची बहीण रेवती बऱ्याच कालावधीनंतर भारतात परत आली होती. तिचा गोंडस मुलगा, ओम इथल्या लोकांबरोबर चांगलाच मिसळला होता. त्यांच्या येण्याने घरातले तणावाचे वातावरण जरा निवळले होते. रेवतीला भेटण्याच्या निमित्ताने, नातेवाईक,   मित्रमंडळींचे येणेजाणे चालू होते. गप्पागोष्टी, खाणेपिणे, खरेदी या सर्व गडबडीत सुबोधपण जरा रमला होता. चिडचिड करणे जरा कमी झाले होते.

बीना संध्याकाळी ऑफिस मधून घरी आली. त्या दिवशी घरात जरा शांतता होती. आई, रेवती आणि बीना डायनिंग टेबलभोवती बसून बोलत होत्या. आईने सारी कर्मकथा रेवतीला ऐकवली. बीना विषण्ण होऊन न बोलता सारे ऐकत होती.

"रेवती, आता तूच त्याच्याशी बोलून बघ जरा. आम्ही सगळ्यांनी त्याला समजावण्याचा  प्रयत्न केला पण... "
आई म्हणाल्या. चेहऱ्यावर, बोलण्यावर काळजीचे सावट होते. 
रेवतीला वाईट वाटले. सुबोध तिचा भाऊ होता. त्याला सुखी झालेले बघण्याची तिलापण इच्छा होती. पण ती त्याला लहानपणापासून ओळखत होती. ती म्हणाली, 
" --असे आहे तर सारे. म्हणजे सगळे  पूर्वीसारखेच,   ह्यात नाही राम त्यात नाही राम. " 

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

उत्तम कथा , पुलेशु.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0