कोरोना आणि माध्यमे.

कोरोना आणि माध्यमे...
कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगात असंख्य जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु या विषाणूपेक्षाही कितीतरी वेगाने अफवांचा विषाणू जगभर पसरतो आहे. कोरोना विषाणूच्या मास्कच्या आड तोंड झाकून वांशिक भेदभावाचा विषाणू आजकाल गल्लीबोळातून फैलावतो आहे.त्यामुळे ज्याप्रमाणे साथीच्या रोगाकरिता आपण इंग्रजी भाषेमध्ये ‘इपिडीमिक’ असा शब्द वापरतो तसा सध्याच्या अफवांची साथ बघता त्याला ‘इन्फोडेमिक’ असा शब्द प्रचलित होत चालला आहे.
आपल्या देशात आणि इतरत्र दिवसागणिक कोरोनाचे विषाणूमुळे बळी जाणाऱ्यांची संख्या ज्या वेगाने वाढते आहे, त्याच्या दुप्पट वेगाने सोबत अफवा, फेक न्यूजला नवे उधाण येत आहे. महत्त्वाचे म्हणजे या फेक न्यूज किंवा अफवा फक्त आपल्याकडेच आहे असं नव्हे तर त्या संपूर्ण जगभर फिरतांना दिसतात. साथीच्या रोगाच्या असोत नाही तर अफवांच्या, त्या इतक्या वेगाने पसरण्यासाठी काही करणे निश्चितच आहे. जागतिकीकरणाच्या सोबत आंतरराष्ट्रीय दळणवळण सुविधेमध्ये झपाट्याने प्रगती झाली. म्हणूनच जगातील एक कोपऱ्यातील साथीच्या आजारा सोबत अफवांचा आणि फेक न्यूजचा संसर्ग जगाच्या पार दुसऱ्या टोकाला काही दिवसांचाच अवधी पुरेसा ठरतो आहे. स्वाईन फ्ल्यूच्या वेळेस देखील आपण बघितले आहे. लोकांची दिशाभुल करणाऱ्या बातम्यांचा झपाट्याने प्रसार होण्यासाठी माहिती तंत्रज्ञानातील क्रांती, इंटरनेट, सोशल मिडिया या माध्यमांचे महत्वपूर्ण योगदान आहे. तुलनाच करायची झाली तर २००३ मध्ये जेव्हा सार्स या विषाणूचा उद्रेक झाला तेव्हा जगातील अगदी वीस टक्के लोकसंख्या इंटरनेट इत्यादी गोष्टी वापरत नव्हते. सोशल मिडिया, प्रसार माध्यमे आजच्या सारखी बोकाळली नव्हती. आणि जी काही माध्यमे उपलब्ध होती ती टीआरपी साठी चेकाळलेली नव्हती, सगळ्यात महत्वाचे म्हणजे ती विकली गेली नव्हती. थोडक्यात असं म्हणता येईल की सोशल मिडिया, प्रसार माध्यमे नुकतीच जन्माला येत होते. आज जगातील जवळपास साठ टक्के लोकसंख्या ऑनलाईन आहे म्हणजे इंटरनेटचा वापर करते. आणि दररोज सुमारे नवीन दहा लाख लोक या माध्यमांचा वापर करण्यास सुरवात करत आहे. या अनेक गोष्टींमुळे खोट्या बातम्या, अफवां पसरण्याचा वेग प्रचंड वाढला आहे. असं म्हणतात ‘सत्य चप्पल घालेपर्यंत खोटं अख्खं गाव फिरून येतं’, ही गावाकडची म्हण या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात अगदी काही क्षणातच कलियुगातील या तिन्ही लोकात काही सेकंदातच क्रिया प्रतिक्रिया घडवून आणतात. खरं खोटं, अफवा, भूलथापा पुर्वीपण होत्याच, परंतु आजच्या युगात त्याचा वेग, व्याप्ती आणि म्हणूनच परिणाम देखील मोठा होत आहे.
अशा कठीण परिस्थितीमध्ये किंवा इतर सामान्य वेळेस देखील माणसे खोटं कां बोलतात किंवा अफवा कां पसरवतात हे तुम्हाला आम्हाला एक न उलगडणारे कोडे आहे, निदान मला तरी. माझ्या माहितीनुसार खरं म्हणजे त्यांना खोटे बोलायचे नसते. परंतु त्याच्या मनातील मृत्यूचे भय, चिंतेचे ढग, किंवा काहीतरी करून लोकांना वैचारिक त्रास द्यायचा आणि शेवटी मानसिक विकृती यातून ते काहीतरी करत असतात. या सगळ्या आडनिड्या आणि बिनबुडाच्या गोष्टींमध्ये चिंता असते, काळजी असते, आम्हाला यातले सारे काही माहित आहे हे दाखवून स्वत:ला तुमच्यापेक्षा जास्त शहाणे किंवा हुशार असल्याचं म्हणून सिद्ध करण्याची केवळ हौस असते. जे चीनमध्ये कोरोंनाच्या बाबतीत घडलें तेच आपल्या किंवा इतर देशात घडत आहे. परंतु प्रत्येक माध्यम इतरांपेक्षा वेगळ सांगून दिशाभूल करत आहे. कोणी म्हणतो गरम पाण्याची वाफ घ्या, कुणी म्हणतो लसुणाच्या कच्च्या पाकळ्या खा तर कुणी म्हणतो लसूण भाजून खा. कुणी म्हणतो कडुलिंबाचा पाला खा तर कुणी म्हणतो कढी पत्ता खा. तर कुणी सांगतो हे खाऊ नका ते खाऊ नका. आधार कोणत्याच म्हणण्याला नसतो. प्रत्येकजण मरणाच्या भीतीने सगळं काही मुकाट्याने सहन करतो आहे. जणू काही फक्त या प्रसार माध्यमांनाच आपल्या आरोग्याची काळजी आहे.
या माध्यमांच्या द्वारे काही अफवा या मार्केटिंग गिमिक किंवा एखाद्या वस्तूची, गोष्टीची जाहिरात देखील असू शकते. कोरोनाचे औषध, किंवा एखाद्या असाध्य रोगावरचे औषध आमच्याकडे आहे, असं खोटे सांगून आपल्याला ते खरंच आहे असं वाटू लागते. अनेक आजारांमध्ये अत्यंत गुणकारी औषध आहे असे फसवे संदेश माध्यमातून व्हायरल करतात लोकांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक करून ते स्वत:चे आर्थिक हीत जपण्यात धन्यता मानतात. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या मास्कच्या संदर्भात सर्वसामन्यांची झालेली प्रचंड लुट ही मानसिक दिवाळखोरीच आहे. मास्क, रेमिडीसेव्हर इंजेक्शनचा काळाबाजार, खाजगी दवाखान्यात कोरोना रुग्णांची होणारी लुटमार या सर्व प्रकारात अनावश्यक माध्यमांनी आपले हितसंबंध जपण्यासाठी नको तेवढे आपले नाक खुपसून लोकांच्या मनात कोरोनाविषयी भीतीची भावना निर्माण करण्यास हातभार लावला असं माझं मत आहे.
माध्यमांच्या चुकीच्या धोरणांमुळे घाबरट किंवा संधीसाधू माणसे भीतीदायक गोष्टी पसरवत जातात. चीनमध्ये त्या देशाचे सरकार सर्व कोरोना रुग्णांना मारणार असल्याची खोटी बातमी सोशलमिडिया आणि आपली मुख्य प्रवाहातील माध्यमे ती दाखवतात, छापतात. अशा माध्यमांना आता काय म्हणणार. असल्या बातम्यांमुळे संशयित रुग्ण आपला रोग लपवून ठेऊ लागले, योग्य उपचारांच्या अभावी त्यातले बरेच दगावले देखील, पण या बातमीमुळे रोग लपवून ठेवल्यामुळे असंख्य लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. आपल्या बातमीमुळे लोक आपला आजार लपवतील, आणि त्याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागतील याचा साधा विचारही हा संदेश किंवा खोटी बातमी पसरविणाऱ्या माध्यमांच्या लक्षात कसा येत नाही हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल. थोडक्यात व्हायरस अफवा होते आणि अफवा व्हायरल होते हेच खरं.
कोरोना, स्वाईन फ्ल्यू, इबोला अशी संकटे येतात तेव्हा आपल्या माणूसपणाच्या आणि माणसाच्या समाजाचा, देशाचा कस लागलेला असतो. काही प्रमाणात भीतीचे वातावरण राहू शकेल, पण विनाकारण खोट्या बातम्या आणि संदेश या मधून मिळणाऱ्या माहितीची सत्यता पारखून न घेताच कोरोनाची भीती बाळगून आपले मनोबल कमी करुन काहीच साध्य होणार नाही. केंद्र आणि राज्य सरकारतर्फे वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन केले तर आपण सगळे सुरक्षितच राहणार आहे. प्रेमापेक्षा, काळजी आणि जिव्हाळ्यापेक्षा भेदभाव अधिक संसर्गजन्य असतो की काय ? या ना त्या कारणाने एकमेकांना वाळीत टाकणे किंवा बहिष्कार टाकणे मानव समाजाला आवडतं असंच आपल्याला नाईलाजाने म्हणावे लागेल. हा त्रास केवळ सर्वसामान्यांना होतो आहे असं नाही. डॉक्टर, नर्सेस यांनाही माध्यमातील चुकीच्या संदेशांमुळे लोकांच्या रोषाला समोर जावे लागत आहे हे नक्कीच दुर्दैवी म्हणावे लागेल.
प्रत्येक साथ आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असते. कोरोनाची साथ देखील त्याला अपवाद नाही. आपण सर्वांनीच अंतर्मुख होऊन आपल्या भूमिका समजून घेणे गरजेचं आहे. येणारा कोणताही विषाणू तुमचे माझे माणूसपण संपवण्याइतका बलवान असता कामा नये. कोणत्याही संसर्गजन्य आजारांच्या उद्रेकप्रसंगी माध्यमांची भूमिका अधिक जबाबदार असण्याची गरज आहे. विशेषतः इलेक्ट्रोनिक माध्यमांवर आपण अशा साथींच्या बातम्या खूपच नाटकीय स्वरुपात बघतो. एक्सक्लुजिव आणि ब्रेकींग न्यूजच्या नादात आपण माणूसपणाला पारखे न होण्याची काळजी घेणे आवशयक आहे....!!!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet