कोविड डायरी (पहिला सप्ताह) : डॉ . तुषार पंचनदीकर

कोविड डायरी : पहिला सप्ताह
पूर्वपीठिका

भारतात, महाराष्ट्रात आणि त्यातही पुण्यात करोनाचा कहर व्हायला लागल्याने खासगी वैद्यकीय महविद्यालयाशी संलग्न असलेल्या हॉस्पिटलमध्ये माझी ड्युटी चालू होणार होती. सरकारी अधिनियमांच्या आधीच या हॉस्पिटलने स्वेछेने “कोविड हॉस्पिटल” म्हणून उद्घोषणा केली होती. आणि अशा संस्थेतील एक वरिष्ठ डॉक्टर असणं ही बाब मला निश्चितच अभिमानाची होती.

वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तसं म्हटलं तर डॉक्टरांची फौज असते.

  • अ. शिक्षणार्थी डॉक्टर

यामध्ये नुकतेच एमबीबीएस उत्तीर्ण झालेले इंटर्न्स (Interns), पदव्युत्तर शिक्षण (MD/MS) करणारे रेसिडेंट डॉक्टर्स (Resident Doctors), सुपर स्पेशालिटीसाठी (DM, MCh, Fellowship) काम करणारे सीनियर रेसिडेंट डॉक्टर्स (Senior Resident Doctors/Fellows) यांचा समावेश होतो.

आणि

  • ब. वैद्यकीय शिक्षक

यामध्ये अधिव्याखाता (लेक्चरर), सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभागप्रमुख अशी एक रचनात्मक शिडी असते. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या सर्वांना पुस्तकी शिक्षणसोबत हॉस्पिटलमधील सर्व पेशंटची सर्व जबाबदारी घ्यावी लागते.

हे विस्तृतपणे सांगण्याचे कारण की हॉस्पिटलमधील फौज नेहमीच्या कामाव्यतिरिक्त कोविडचा अधिभार सांभाळायला सज्ज होती. वयाने साठ वर्षांपेक्षा मोठ्या डॉक्टरांना, कोविडच्या निर्देशनानुसार यातून वगळण्यात आले होते. ५८ वर्षांचे वय घरच्यांसाठी जरी काळजीचे असले तरी मला कोविडसाठी काम करण्याची ही एक यथोचित संधी वाटली.

आणि मी या लढाईत सामील झालो.

१२ सप्टेंबर २०२०ला दुपारी प्रशिक्षणाचे वेळापत्रक हाती पडले तेव्हा.... ‘काय जरूरी याची?.....अनुभवाने सर्व माहीत आहे मला’ या नेहमीच्या नमुनेदार वरिष्ठपणाच्या मानसिकतेतून मी जरा नाखुषीनेच हजर राहिलो.

एका ज्युनियर डॉक्टरने Power Point Presentation सुरू केले आणि एक कनिष्ठ पण त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्ती किती मुद्देसूद बोलू शकते याचा पुनर्प्रत्यय आला.

यावर कडी म्हणजे एका Nurse Educator ने Hand Wash, PPE Donning आणि Doffingचे सुंदर प्रात्यक्षिक दिले.

वरिष्ठाच्या मानसिकतेतून बाहेर पडून जेव्हा परत शिक्षक म्हणून परतलो तेव्हा शिक्षण ही प्रक्रिया वयोमानाशी कधीच निगडित नसते हा मूलमंत्र परत ठायी आला.

कोविड डायरी : पहिला सप्ताह
वॉर्ड क्रमांक २ : पहिला दिवस

वॉर्ड क्रमांक २ हा खरं तर माझ्या वहिवाटीचा.. स्त्रीरोग व प्रसूती विभागाशी संलग्न; पण आता त्याचा काही भाग कोविड वॉर्ड म्हणून दुभागलेला. येथे प्रामुख्याने कोविडचे स्त्री रुग्ण भरती होत होते. आणि कोविडची सौम्य लक्षणे असणारे काही पुरुष रुग्ण (फक्त प्रायव्हेट रूममध्ये) भरती करता येणार होते.

१४ सप्टेंबरला वॉर्ड २चा प्रवेशमार्ग सुद्धा वेगळा केला होता. ही पेशंट आणि डॉक्टर यांच्या सुरक्षिततेची सुरुवात होती – Safety Protocol प्रशिक्षणातील एक धडा प्रत्यक्षात येत होता.

या डायरीमध्ये काही गोष्टी सर्वांसाठी हेतुतः नमूद करून ठेवत आहे.

१. हातांची स्वच्छता : मूलभूत कानमंत्र

SUIMAN
SUIMAN

ही एक आदर्श पद्धत आहे. दिवसातून निदान २ ते ३ वेळा हात स्वच्छ पाण्याने वा नेहमीच्या साबणाने धुतल्यास संसर्ग कमी होतो हे सिद्ध झाले आहे.

२. हातांची स्वच्छता : सॅनिटायझर (Sanitizer)

सॅनिटायझर अल्कोहोलमिश्रित असले तरच ते उपयोगी असतात. हाताच्या तळव्याला तसे ते सुरक्षित असतात; परंतु नितळ त्वचेला ते घातक ठरू शकतात. म्हणूनच त्याचा अतिरेकी वापर करू नये.

३. डॉक्टरांची सुरक्षितता : PPE (Personal Protective Equipment)

हॉस्पिटलमध्ये कोविड पेशंट ॲडमिट होताना त्याचे कोविडच्या स्थितीनुसार वर्गीकरण केले जाते आणि त्यानुसार डॉक्टरांना PPE दिले जाते. माझ्याकडे सौम्य लक्षणांचा वॉर्ड असल्याने मला प्राथमिक (Level 1) श्रेणीचे किट मिळणार होते.

: वॉर्डमध्ये प्रवेश :

घरून घातलेला Scrub & Mask
घरून घातलेला Scrub & Mask
वॉर्डामध्ये बदललेला  Scrub, Mask & Cap
वॉर्डामध्ये बदललेला Scrub, Mask & Cap
PPE Kit
पेशंटला तपासायला जाताना घातलेले PPE Kit
(Dress + Gown + Cap +Face Shield+ Mask+ Double Gloves+Shoe Cover)

४. पेशंट आणि डॉक्टर यांचा एकमेकापासूनचा संसर्ग बचाव
पेशंटशी बोलताना आणि तपासताना करोनाच्या काळात सुरक्षित अंतर ठेवावे लागणार होते. कमीतकमी वेळात पण नेमकी शारीरिक तपासणी करणे गरजेचे होते. विविध चाचण्या पाठवताना विशेष काळजी घ्यावी लागणार होती. नर्सेस, वॉर्ड बॉय आणि त्याच बरोबर इतर सपोर्टिंग स्टाफचीसुद्धा काळजी घेणे अनिवार्य होते. करोनापासून बचाव करण्याबरोबर त्याचा फैलाव होणार नाही हे पाहणे ही खूप महत्त्वाची जबाबदारी होती.

अशा रीतीने एक नवीन अनुभव गाठी ठेवण्यासाठी अस्मादिक.. प्रोफेश्वर तुषार पंचनदीकर “गुड मॉर्निंग एव्हरीबडी” असे म्हणत वॉर्ड २मध्ये प्रवेश करते झाले.

दिनचर्या अशी असणार होती :

ड्युटीवर हजर – हँड वॉश – Donning (PPE किट घालण्याची पद्धत) – पेशंटचा राऊंड – रेसिडेंट डॉक्टर्सना सूचना – डिस्चार्ज होणाऱ्या पेशंटला सर्व सूचना – Doffing (PPE किट काढण्याची आणि विल्हेवाटीची पद्धत) - नवीन भरती होणाऱ्या पेशंटची विचारपूस – नातेवाईकांशी फोनवरून बातचीत व त्यांचे शंका निरसन – अचानक प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यास पेशंटची प्रसूती कक्षात रवानगी – वेळ मिळेल तेव्हा चहापाणी नाष्टा (एकट्याने एका खोलीत... एकत्र नाही) – ४ वाजता हँड वॉश घेऊन घरी.

कोविड डायरी : पहिला सप्ताह
वेगळ्या अनुभूतींचा आठवडा

१. कोविड वॉर्ड २ची क्षमता : २८ रुग्ण
सरासरी रुग्ण संख्या : २४ ते २५
रोजचे ॲडमिट आणि डिस्चार्ज : २ ते ६
गर्भारपण आणि प्रसूतीसाठी भरती असलेले रुग्ण : ८ ते १०
वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित (डॉक्टर्स, सिस्टर्स, वॉर्ड बॉय इ.) : ६ ते ८
ज्येष्ठ नागरिक प्रमाण : ३० ते ४०%
(आकडेवारी दिली आहे; त्यात वेगळेपण आहे म्हणून.)

२. करोना प्रौढ नागरिकांमध्ये जास्त प्रमाणात असतो. हा वॉर्ड प्रसूतीशी संलग्न असल्याने येथे तरुण रुग्णांची संख्या जास्त होती.

३. वैद्यकीय क्षेत्राशी निगडित रुग्णांची संख्या लक्षणीय होती. करोना कोणाला वगळत नाही. व्यक्तिगत काळजी घेतली नाही वा लक्षणविरहित रुग्णांशी जास्त संपर्क आल्यास डॉक्टर, नर्स यांना लागण होणारच.

४. ज्येष्ठ नागरिकांमध्ये ब्लड प्रेशर, डायबेटीस सारख्या अन्य व्याधी असतील तर त्यांचा हॉस्पिटल मुक्काम १० ते १२ दिवसांपर्यंत वाढतो कारण त्यांची प्रतिकारशक्ती क्षीण झालेली असते.

५.ज्येष्ठ नागरिकांमध्ये असहाय्यता लगेच प्रकट होते. घरचा पाठिंबा असेल नसेल तरी “माझं सगळं झालंय.. मला घरी सोडा लवकरात लवकर.. घरीच सेफ वाटतं.. काय व्हायचं ते घरी होऊ द्या..” अशी मागणी दिवसागणिक वाढत जाते. किंवा “काहीतरी असं करा डॉक्टर की माझी रवानगी कधीच ऑक्सिजन वॉर्डमध्ये होणार नाही.”

अशा वाक्यांना औषधांपलीकडील ट्रीटमेंट मला द्यावी लागत होती.. ती म्हणजे.. ज्यांच्या कडून धीर घ्यायचा त्यांना धीर देण्याची.

६. प्रौढ आणि तरुण पेशंट त्यामानाने बिनधास्त वागत होते. त्यांना खरंतर डांबूनच ठेवावं लागत होतं.

७. गर्भारपणातील करोना लागण झालेल्या स्त्रियांची वेगळीच प्रश्नावली होती. “गर्भारपणात बाळाकडे करोना संक्रमित होतो का?”.. “डिलिव्हरीनंतर माझ्या बाळाला करोना होणार नाही ना ?”.. “माझ्या बाळाला स्तनपान देता येईल ना?”.. “समजा सीझर झालं तर ऑपरेशनदरम्यान आणि नंतर, माझा करोना वाढणार तर नाही ना?”

स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याने बहुतेक सर्वांची उत्तरे माझ्यापाशी होती. तरीसुद्धा त्या मातेची घालमेल.. स्वत:पेक्षा बाळासाठी.. पाहून, आई म्हणजे नक्की काय काय असते याची उत्तरे कोणाकोणाला द्यावीत हा यक्षप्रश्न होता !!!

अशावेळी एक निर्विकार मन तयार झालं आणि तुकोबारायांच्या एका अभंगाशी मनाने जवळीक साधली.

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ।।

(क्रमशः)
मागील भाग
पुढील भाग

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet