टॅक्सी दिवस ११: ८ मार्च २०२० (विमेन्स डे)

आज शनिवारी रात्रीच टॅक्सी घेतली.

हे आमचे दिनेशभाई!

Dinesh

ह्यांनी टॅक्सी दिली नसती तर मी अजूनही टॅक्सीच शोधत बसलो असतो सो त्यांचे अनेकानेक आभार.

रविवारी सकाळी टॅक्सी काढताना बायकोनी आयड्या दिली की आज महिला दिन असल्यामुळे सर्व चिकिता उर्फ सेनोरिटा उर्फ मादाम...किंवा खरं तर ही सगळी विशेषणं तद्दन क्लिशेड करून टाकण्याची अपरिमित ताकद आणि विस्मयकारी गुंतागुंत असलेल्या बायकांकडून आज मी भाडं घेऊ नये.

मला ही आयड्या पटली आणि मी रविवारच्या प्रसन्न वगैरे सकाळी मोठया उत्साहाने वगैरे टॅक्सी बाहेर काढणार तर टॅक्सी चालूच व्हायला नाय माँकी.

वरच्या दिनेशभाईंबरोबरच्या फोटोत ही गाडी नाकाड फुटलेल्या आडमुठ्या पण मनाने तशा चांगल्या असलेल्या गट्टू - बटल्या पैलवानासारखी दिसतेय...
आणि ती एक्झॅक्टली तशीच आहे.
बॅटरीचा प्रॉब्लेम असल्याने कधी कधी सकाळी स्टार्ट व्हायलाच मागत नाही.
पण नशीबाने आमच्या कॉलनीचं गेट थोड्या उतारावर असल्याने तीन-चार भल्या शेजाऱ्यांची आणि सिक्युरिटीवाल्यांची मदत घेऊन गाडी धक्का स्टार्ट केली.

हे पहिलंच भाडं एका आई आणि मुलीचं: कापड बाजार ते माहीम स्टेशन.
(सेल्फी ह्या गोष्टीसाठी मी अंमळ टू ओल्ड असल्यामुळे वाईट सेल्फीज काइंडली ऍडजस्ट!)

Babu

तिकडून शिवाजी पार्क:
पार्काजवळ माझा खास मित्र मंदार रहातो.
त्याला बरेच दिवसांपासून टॅक्सी आणि माझा युनिफॉर्म दाखवायचा होता... म्हणून त्याला एक धावती भेट दिली.

त्याच्या चाळीच्या गॅलरीतून दिसलेला हा गच्चम फुललेला कवठी चाफा आणि उद्याच्या होळीची तयारी:

Chafa

पार्कातून एका मुलीला प्रभादेवीच्या एका कॉर्पोरेट ऑफीसला सोडलं.
तिच्याकडूनही पैसे घेतले नाही आणि तिला सेल्फीसाठी विनंती केली.
तिनं ती थोडी घाईत असल्याचं पोलाईटली सांगितलं आणि मी ताणून धरलं नाही.
कदाचित त्या अंमळ अंधाऱ्या पार्कींगमध्ये माझी रिक्वेस्ट तिला फ्रीकी वाटली असू शकते.

हे नकार स्वीकारण्याबद्दल थोडं बोलूयात:

जे लोक्स साल्सा / स्विंग / बचाता / टॅंगो किंवा तत्सम सोशल डान्सिंगमध्ये थोडेफार ऍक्टिव्ह आहेत...
त्यांना मुलींच्या किंबहुना कुणाच्याही कुठल्याही नकाराचा आदरानेच स्वीकार करायला हवा हे नीटच माहिती असतं.

सोशल डान्सिंगमध्ये मुलींचा गमतीदार अप्पर हॅन्ड असतो.
म्हणजे तुम्हीच मुलीकडे जाऊन डान्ससाठी विचारायचं शास्त्र असतंय.
मुलगी डान्सला होकार किंवा नकार तिच्या मर्जीने अर्थातच देऊ शकते.

तिच्या नकार देण्याला कैक कारणं असू शकतात...
आधी नाचनाचून ती दमलेली असू शकते,
किंवा गाणं तिच्या आवडीचं नसू शकतं,
किंवा तिनं तुम्हाला आधी वाईट नाचताना पाहिलं असू शकतं,
किंवा आधी कधीतरी सोशलमध्ये जेन्युइनली चुकून तिच्या बूबीला तुमचा ओझरता हात लागल्यामुळे तुम्ही मनुष्यरूपातील वासनाधारी अजगर असल्याचा तिने समज करून घेतलेला असू शकतो,
किंवा डोळे वटवटारून पाहणाऱ्या, नाचण्याचा गंध नसणाऱ्या औरंगजेबी पझेसीव्ह बॉयफ्रेंडशी पंगा घेणं त्या रात्रीपुरतं तरी तिला नको असू शकतं,
किंवा तुमच्यापेक्षा सहापटीने चांगलं लीड करणाऱ्या त्या दुसऱ्या स्मार्टीसाठी तिनं स्वतःला राखून ठेवलं असू शकतं.
किंवा ती तुमच्या एक्सची बेस्ट फ्रेंड असल्यामुळे तिला तुमच्यावर खुन्नस असू शकते.
किंवा तिला तुम्हाला काहीही कारणाशिवाय ऍंवीच नाही म्हणून तुमच्या ओशाळत्या चेहेऱ्याचा इव्हील आनंद लुटायचा असू शकतो.

कारण X Y Z काहीही असो तुम्हाला तो नकार ग्रेसफुली आणि ग्रेसफूलीच स्वीकारायचा असतो.

चेहेऱ्यावरचा पोपटी ओशाळेपणा शिताफीनी लपवून तुम्ही दुसऱ्या मुलीला विचारू शकता किंवा तिसऱ्या नाहीतर चौथ्या...
कधी कधी तर लायनीत सगळ्या मुलींनी दिलेले नकार गिळून तुम्हाला झक मारत कोपऱ्यात उभं रहावं लागतं...
तुमच्या आवडत्या ट्रॅकवर पार्टनरसह नाचायची तुमची कितीही अपरंपार इच्छा असली तरीही!
पण हे नकार अजिबातच पर्सनल आणि सिरीयसली घ्यायचे नसतात हे चांगल्या सोशल डान्सरला नीटच माहिती असतं.
आणि अर्थात तुम्ही एकटे धुवांधार नाचूच शकता.

एकंदरीत काय तर सोशल डान्सिंग तुम्हाला नकार ग्रेसफुली पचवण्याचं उत्तम बाळकडू देतं.

ऍसिड हल्ल्याच्या, नी ब्लेडनी वार केल्याच्या, नी रेपच्या बातम्या वाचल्याकी आपल्या सगळ्या समाजाला नकार पचवण्यासाठी तरी साल्सा शिकवायला पाहिजे असं तुटून तुटून वाटत राहतं!
...
...
...

प्रभादेवीवरून ह्या तीन महिला कॉन्स्टेबल्सना वरळी पोलीस हेड-क्वार्टर्सला सोडलं.
जालना-औरंगाबाद साईडच्या होत्या बहुतेक.
डिपार्टमेंटच्या कोणत्यातरी परीक्षेसाठी आल्या होत्या.
कलमांची सटासट सटासट उजळणी करत होत्या, ऐकायला मस्त वाटत होतं.
त्यांनी भाडं न देण्याची ऑफर साफच नाकारली पण सेल्फीला मात्र आनंदानी तयार झाल्या.
माझी मर्यादित सेल्फी कौशल्ये आणि कुवत स्वतः:च ओळखून ह्यापुढचे सगळे सेल्फी मी पॅसेंजरनाच काढायला दिलेत हे सूज्ञ वाचकांच्या लक्षात आलं असेलच.

Police

बाय द वे वरळीला आत पोलीस मुख्यालयाचा एवढा मोठ्ठा आणि बऱ्यापैकी हिरवागार परिसर आहे हे आज पहिल्यांदाच कळलं.

तिकडून एका मल्लू कॉन्ट्रॅक्टरला कोस्टगार्ड्स ऑफीसला सोडला.
परत हा आतला रस्ता एव्हढा सुंदर आहे मला हे मला माहितीच नव्हतं.
एका साईडला कोस्टगार्डसच्या सुबक भिंती दुसरीकडे छोटेखानी डोंगराचा कातळ आणि समोर चमचमणारा समुद्र
फकींग गॉर्जस.

ही मुंबईपण ना...
वीस वर्षं लग्न झालेल्या सवयीच्या बायकोनी एका मंडेन रात्री अचानकच अनंगरंगाचा नवीन डाव टाकून नवर्याला चकीत करावं
तशी आहे ही साली मुंबई.
अजूनही तिच्या गजबजत्या गुदमरत्या क्लॉस्ट्रोफोबीक पोटातनं अशी काही झळझळती रत्नं अवचित मिळतात हेच खरं!

बाकी दिवसभर मारलेल्या भाड्यांतील महिलांबरोबरचे हे आणखी काही सेल्फी.

Wadala

Pooja

ही वरच्या फोटोतली माझी मैत्रीण पूजा.
सगळ्या महिलांना राईड फ्री असल्याची पोस्ट सकाळीच टाकल्याने तिनं राईडसाठी फोन केला होता.

तिला सायन गुरुकृपा हॉटेलवरून उचललं आणि बी. के. सी. ला साधारण ८ वाजता सोडलं आणि
(बाय द वे 'गुरुकृपा'चे समोसे आख्ख्या मुंबईच्या थिएटर्समध्ये जातात. त्याविषयी इथे वाचू शकाल :
https://bohemianfoodies.wordpress.com/2016/02/15/super-samosas-at-gurukripa-sion-mumbai/

बी. के. सी. सगळा कॉर्पोरेट एरिया असल्यामुळे संध्याकाळी त्यातही रविवारी सामसूम असते.
इकडे निवांत दोन मिनटं थांबून ब्रेक घेणार इतक्यात बलराम बिल्डिंगच्या मागल्या शांत रस्त्यावर मला ही पोरं दिसली:

मालाड गोरेगाववरून ही पोरं खास बी एम एक्स स्टंट्सची प्रॅक्टिस करायला इथे येतात असं कळलं.

आपल्यालापण अडनिड वयात सलमानची मैने प्यार किया मधली बी एम एक्स वरची क्लायमॅक्सची फाईट जाम आवडलेली.
घरी मागे लागून A-1 ची छान मोरपिशी रंगाची बी एम एक्स सुद्धा घेतली होती.

तेव्हा सलमान आणि बी एम एक्स दोन्ही भारी वाटायचे
नंतर हळूहळू ह्यातल्या एका गोष्टीचं आकर्षण घटलं आणि दुसऱ्या गोष्टीबद्दल जवळ जवळ तिटकाराच...

पण ही पोरं मात्र भारी स्टंट्स करत होती.

हिरोसारखा छावा दिसणारा युसूफ नावाचा पोरगा त्यांचा लीडर कम कोच होता.
ही त्यांची सगळी गॅंग

gang

बाकी बरीच भाडी विनामूल्य सोडल्यामुळे आज कमाई फारशी नव्हती.
पण एकंदरीत मजा आली.

आजची कमाई: ४०० रुपये

क्रमश:
आधीचे दुवे:
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २८ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ नोव्हेंबर २०१६
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३१ जानेवारी २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ मार्च २०१७
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २०१८
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ जानेवारी २०१९ उत्तरार्ध
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ५ व १२ जानेवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १६ फेब्रुवारी २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १८ मार्च २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २४ मार्च ते १२ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २६ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ३० एप्रिल २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: ४ मे आणि २९ मे २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: १५ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २२ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २९ जून २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट माईलस्टोन: २० जुलै २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: २० जुलै ते डिसेंबर पहिला आठवडा २०१९
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १ (८ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस २ (१५ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ३ (२२ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ४ (२९ डिसेंबर २०१९)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ५ (१९ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ६ (२६ जानेवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ७ (२ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ८ (९ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस ९ (२३ फेब्रुवारी २०२०)
काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: टॅक्सी दिवस १० (१ मार्च २०२०)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

It was about time I got my 'fix'!! मित्रा, धन्यवाद. विचारच करत होतो की साधारण मार्चात करोना प्रकरण सुरू झाल्यामुळे थांबलायस का काय ?


"गच्चम" हा शब्द बऱ्याच वर्षानी भेटला - " ...... म्हणताना मी प्रभीचा हात 'गच्चम' धरला होता हे सोडवताना लक्षात आलं ..." नंतर आत्ता Smile

पण नशीबाने आमच्या कॉलनीचं गेट थोड्या उतारावर असल्याने तीन-चार भल्या शेजाऱ्यांची आणि सिक्युरिटीवाल्यांची मदत घेऊन गाडी धक्का स्टार्ट केली.

या बद्दल जरा अजून सविस्तर लिहिशील का? अगदी स्पष्टच बोलायचं तर;
- हे असले लोकं नेमके बरे आमच्याच सोसायटीत निघतात
- नसते कायतरी उद्योग चाललेत **व्याचे
- नोकरी शोध म्हणावं दुसरी त्यापेक्षा
असलं काही नाही आलं वाट्याला? आणि शेजारीच असं नाही, नातेवाईकांची प्रतिक्रिया पण आली यात.


पुन्हा कधी त्या बी एम एक्स वाल्या पोरांचे स्टंट्स बघायचा योग आला तर व्हिडीओ घेऊन शेअर कर यूट्यूबवर. फोटोंवरून भारी प्रकार वाटतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

नकार पचवायला मदत म्हणून साल्सा शिकणे आणि बायकोचा अनंगरंग हे दोन्ही कन्सेप्ट अत्यंत आवडले आहेत Smile लेख भारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ग्रेट रीड!! वाचून मस्त वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिहिते रहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळ्यांचे आभार:
आत्ता व्हिडिओज टाकलेयत.
व्हिडियोज टाकण्याविषयी मार्गदर्शन केल्याबद्दल ३_१४ विक्षिप्त अदिती ह्यांचे आभार Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ए थँक्यू हां भावसाहेब! शेवटून दुसरा व्हिडीओ बेष्ट आहे. आय वंडर की त्या मुलाला परत हे असंच कर सांगितलं तर जमेल का. अर्थात this is more like jamming session right? आमचे येथे "At the spur of the moment" जे काही सुचेल ते करण्यात येईल!! जिमनॅस्ट मॅटवर / ट्रॅम्पोलिनवर जे काही ....... सादर करतात (च्यायला त्या चापल्याला एखादा चपखल शब्द पण माहीत नाहीये मला) ते त्याना मुळात सुचतं कसं? सुचलेलं प्रत्यक्षात आणायला जमतं कसं? त्यांचा कोच हे कसं सादर करायचं याचं SOP कसं तयार करतो?? वगैरे अनेक प्रश्नांची भेंडोळी डोक्यात आहेत त्यात अजून थोडी भर पडली हे व्हिडीओज बघून Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....