इमले अक्षरतेचे, अर्थात अष्टाश्वमेध नाटक - १

संकल्पना #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

इमले अक्षरतेचे,
अर्थात अष्टाश्वमेध नाटक - १

- जयदीप चिपलकट्टी

अंक पहिला

(स्थळ: दिवाणखाना. संपूर्ण नाटक इथे घडतं. बाहेरचं जग, बंगल्याचा वरचा मजला आणि खालच्या मजल्यावरचा आतला भाग यांना जोडणारी अशी एकूण तीन दारं दिवाणखान्याला आहेत. अमुक पात्र अमुक प्रसंगी यांपैकी कुठल्या दारातून ये जा करतं हे संदर्भावरून स्पष्ट व्हावं.

दिवाणखान्यात एकोणीसाव्या शतकातल्या इंग्रजी पद्धतीचं शिसवी फर्निचर आहे. पायाखाली भारी गालिचा आहे. छताला झुंबर आहे, ह्यातला दिवा लावण्या-विझवण्यासाठी भिंतीलगत जाड दोर आहे. याखेरीज नेपथ्यासाठी गरजेच्या असलेल्या वस्तू पुढीलप्रमाणे: टेलिफोन, बुद्धिबळाचा मोठ्या आकाराचा भपकेबाज सेट, पुरुषभर उंचीची प्रशस्त अलमारी, भिंतीवर लटकवलेली लांब नळीची बंदूक, ड्रिंक्स कॅबिनेट, ग्रॅन्डफादर क्लॉक. यात पाचला एक मिनिट कमी आहे.

पडदा उघडतो तेव्हा पन्नाशीचा नोकर रावजी एका कुंच्याने फर्निचरवरची धूळ झटकताना दिसतो. पांढरा सदरा आणि धोतर असा त्याचा पेहराव आहे. फोन वाजतो. तो घेण्याची रावजीला विशेष घाई नाही. सावकाश चालत ग्रॅन्डफादर क्लॉककडे जाऊन तो निरखून वेळ पाहतो आणि मग फोन उचलतो.)

रावजी : गुड आफ्टरनून! नो-नो-नो-नो. आय मीन येस, धिस बॅरिस्टर जातेगावकर्स बंगलो. धिस मोस्ट डेफिनेटली बंगलो ऑफ एमिनंट बॅरिस्टर जातेगावकर फ्रॉम मिडल टेंपल. बट गुड इव्हिनिंग नो. गुड आफ्टरनून येस, बट गुड इव्हिनिंग नो. अकॉर्डिंग टू रेनमार्टिन्स मोस्ट लर्नेड गाईड ऑन द यूसेज ऑफ इंग्लिश लँग्वेज, टिल फाइव्ह ओ क्लॉक इट इज गुड आफ्टरनून. आफ्टर फाईव्ह ओ क्लॉक गुड इव्हनिंग इज ॲप्रोप्रिएट. (घड्याळाकडे वाकून पाहतो.) नाउ येस! नाउ ॲप्रोप्रिएट. नाउ मोस्ट गुड इव्हिनिंग सर!

येस-येस-येस. आय मराठी ऑल्सो स्पीक. आय अनस्टम्बल्ड मराठी स्पीक. आय द रावजी ऑफ मराठी लँग्वेज. नो-नो-नो. शिवाजी नो. रावजी. आय नॉट द शिवाजी ऑफ मराठी लॅँग्वेज. मी मराठी भाषेचा रावजी आहे. शिवाजी नाही. मराठी भाषेचे शिवाजी म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर. ते मेले. ते जुन्या पुण्यात राहायचे. इथे नाही. लकडी पुलाच्या पलिकडे जे कळकट्ट पुणं आहे तिथे ते राहायचे. आम्ही तिथे राहात नाही. आमच्या सरांचा बंगला नव्या पुण्यात आहे. डेक्कन जिमखान्यावर. नाही, सर घरी नाहीत. हो, सरांचा बंगला पुण्यात आहे, पण सर पुण्यात नाहीत. दि मोस्ट एमिनंट बॅरिस्टर जातेगावकर इज इन बॉम्बे. ही विल रिटर्न टु पूना इन द इव्हिनिंग बाय डेक्कन क्वीन. आपले कंत्राटदार मोटवानी आहेत ना, त्यांच्यावर लाच दिल्याचा आरोप आहे. त्यांची केस आहे बॉम्बे हाय कोर्टात. म्हणून गेलेत. ते एक झालं. आणि इथे पुणे मंडईत एक माथाडी कामगार संघ आहे, त्याच्यावर बेकायदा संप केल्याचा आरोप आहे. ती पण केस त्याच कोर्टात त्याच दिवशी आहे. सर इज किलिंग टू बर्ड्स इन वन स्टोन. दोन्ही केसेसची आर्ग्युमेंटस् एकापाठोपाठ करून ते परत येणार आहेत. पण दोन्हीत तसा चांगलाच फरक आहे बरं का! अल्दो दे आर किल्ड विथ वन स्टोन, दे आर नॉट बर्ड्स ऑफ वन फेदर. माथाडी कामगार म्हणजे एकजात लेकाचे भणंग. त्यामुळे त्यांची केस प्रो-बोनो आहे — सर त्यांच्याकडून पैसे घेणार नाहीत. पण मोटवानी काही भणंग नव्हेत; बक्कळ पैसेवाले आहेत. तेव्हा त्यांची केस ॲन्टिबोनो आहे — त्यांच्याकडून आमचे सर दाबून फी घेणार. असं ते एकूण आहे.

ओके देन. मला इथे बरीच कामं आहेत. तुमच्याशी बोलत बसलो तर कामं कोण करेल? ओके देन. उद्या या, परवा या, केव्हाही या. डेक्कन जिमखान्यावर 'तमसा' बंगला म्हणून विचारा. कुणीही सांगेल. 'त-म-सा'. काय तुम्ही तरी?! तुम्हाला तमसा नदी माहित नाही? अहो, टॉवर ब्रिजच्या खालून वाहते ती तमसा. आपल्या लंडनमधल्या जुन्या दिवसांची आठवण राहावी म्हणून सरांनी बंगल्याचं नावच तसं ठेवलं. त्याचं असं आहे की बाईसाहेबांचं नाव सावित्री. म्हणजे लग्नापूर्वीचं नाव गोदावरी, पण साहेबांनी लग्नात बदलून 'सावित्री' केलं. लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री सर बाईंसाहेबाना म्हणाले की आपल्याला दोन मुलं असणार. आणि तसंच झालं. बॅरिस्टरसरांचा होरा कधीही चुकत नाही. पहिला मुलगा झाला. त्याचं नाव 'तनय' ठेवलं. त्यानंतर सहा वर्षांनी मुलगी झाली. तिचं नाव 'मधुरा' ठेवलं. तनय-मधुरा-सावित्री म्हणजे 'त-म-सा'. आहे की नाही?

काय म्हणता? छे-छे! मी कसला जातोय? इथे सगळ्या घराचा डोलारा मीच पेललेला आहे. मला कुठे सवड होतेय ते लंडन आणि फिंडन बघायला? बट नूक-ॲन्ड-क्रॅनी ऑफ लंडन आय नो व्हेरी वेल. समजा मला सर नुसते म्हणाले की 'चिसविक मॉलपासून टूट्वेंटीवन बी बेकर स्ट्रीटपर्यंत घेऊन चल', तर एकाही बॉबीच्या डोक्यावरच्या घमेल्याला धक्का न लावता डोळे झाकून व्हिक्टोरिया हाकत सरांना घेऊन जाईन. एव्हरी पार्ट-ॲन्ड-पार्सल ऑफ द ग्रेट मेट्रॉपोलिस ऑफ लंडन आय नो व्हेरी वेल.

ओके देन. या मग. किंवा असं करा, आधी रीतसर पत्र पाठवा. तुमची केस काय आहे ते स्वच्छ शब्दांत लिहून कळवा. पत्र वाचून सर तुम्हाला सांगतील केस घेणार की नाहीत ते. काय? पत्ता? घ्या, पत्ता नीट लिहून घ्या: 'बॅरिस्टर यदुनाथ वामन जातेगावकर, 'तमसा' बंगलो, डेक्कन जिमखाना, पूना-अपॉन-मुठा.' गॉट इट? ओके देन. सरांनी अपॉइंटमेंट दिली तर या. तसेच नका येऊ. पण येणार असाल तर बंगला सापडायला अगदी सोपा आहे. 'तमसा' म्हणून विचारलंत तर कुणीही सांगेल. अक्रोडाच्या लाकडात ठसठशीत देवनागरी अक्षरांनी नाव लिहिलेलं तुम्हाला दिसेल. शेजारच्या बंगल्याचं नाव 'श्रमसाफल्य'. पण ती खूण लक्षात ठेवू नका. डेक्कनवर 'श्रमसाफल्य' नावाचे किमान एक डझन बंगले आहेत. तेव्हा ती खूण लक्षात ठेवून काही उपयोग नाही. उगीच भरकटाल. ओके देन. गुड इव्हिनिंग.

(फोन ठेवतो.)

कुणीही लुंगेसुंगे उगीच फोन करत राहतात. सरांच्या नावाचा दबदबाच असा आहे की सगळ्यांना वाटतं आपली केस त्यांनीच घ्यावी. मग त्यांची फी काय, आपल्याला परवडेल का, त्यांचे बाकी अशिल किती आहेत याचा काही विचार नाही. पण ते असायचं ते असो. मी आपला सगळ्यांशी मऊपणाने वागतो. कुणाचं वकिलपत्र घ्यायचं आणि कुणाचं नाही हा निर्णय सरांचा. हां. तर इथे काय करत होतो मी? सफाई करत होतो. हा बुद्धिबळाचा सेट साहेबांनी जाकेस ॲन्ड सन्सकडून दोनशे गिन्न्या मोजून घेतला. याच्यावर धूळ चढलेली सरांना मुळीच खपत नाही. (कुंचा नाजुकपणे फिरवत मोहरे साफ करू लागतो.) आज रात्री ते परत येतील तेव्हा झुंबराच्या प्रकाशात कसा लखलखीत दिसायला हवा.

(मोठा मुलगा तनय आत येतो. त्याने जांभळ्या रंगाचा सिल्क शर्ट आणि गुलाबी रंगाची सलवार घातली आहे. पायात मोजड्या आहेत. केस भरघोस आहेत. आळोखेपिळोखे देतो.)

तनय : रावजी, अरे रावजी. चहा आण बाबा. मोठी मेहेरबानी होईल.

रावजी : उठलात का एकदाचे?

तनय : आत्ताच उठलो. अजून दात घासायचे आहेत. ते नंतरच केव्हातरी घासेन. चहा आण.

रावजी : आणतो. संध्याकाळचे पाच वाजताहेत म्हणजे आपल्या हिशेबाने झुंजूमुंजू झालंच आहे. व्हेन मॉर्निंग बिकम्स इव्हिनिंग इट इस ओन्ली प्रॉपर दॅट इव्हिनिंग बिकम्स मॉर्निंग.

तनय : मान्य आहे रे बाबा. पण नेमाने झोपून नेमाने उठायला मी काही अभ्यासू आणि कष्टाळू कॉलेजतरुण नव्हे. अभ्यास करून, कष्ट करून आयुष्यात मला काही मिळवायचं आहे का? नाही. जरी कष्ट केले तरी काही मिळणार आहे का? नाही. तशी धमक माझ्यात आहे का? नाही. मला महत्त्वाकांक्षा नाही. यापूर्वी नव्हती आणि आत्ताही नाही. मग निष्कारण सकाळी लवकर उठून आपल्या उर्वरित आयुष्याचा हा पहिला दिवस आहे असं स्वत:ला बजावून सांगून पुढे मी काय करणार आहे? काही नाही. म्हणून मग कालची रात्र अशीच काहीबाही वाचत विचार करत मनन करत जागून काढली. या निशा सर्वभूतांना तस्यां जागर्ति संयमी. शितावर जमलेली भुतं जेव्हा झोपलेली होती तेव्हा संयमाने निशापाणी करीत विश्वाची चिंता करीत मी आपला जागा होतो. ह्या चिंतेचं ओझं जेव्हा पेलवेनासं झालं तेव्हा श्रान्त आणि क्लान्त मनाने रामप्रहरी जो डोळा लागला तो हा आत्ता उठतो आहे. माझ्या उर्वरित आयुष्याची ही पहिली संध्याकाळ आहे. तेव्हा चहा घेऊन ये.

रावजी : निशापाणी केलंत हे मला ठाऊक आहेच. काल संध्याकाळी मी डीकॅन्टर भरून ठेवला होता तो आता बराच खाली गेलेला दिसतो आहे. तुम्ही त्याला संयम म्हणा हवं तर, पण डीकॅन्टरकडे पाहता तसं वाटत नाही.

तनय : अरे, संयम-संयम म्हणजे तरी शेवटी काय? निशापाण्याचा खळाळ असा जबरदस्त असतो की संयमाच्या खडकाची भुसभुशीत माती करून सोडल्याखेरीज त्याचं शांतवन होत नाही. तेव्हा त्या मातीतच देह टाकावा आणि ह्या खळाळातून उमटणाऱ्या अनाहत नादाची बेहोशी अंगावर लपेटून घ्यावी इतकंच काय ते शेवटी आपल्यापाशी उरतं:

कुशीत आली जेव्हा अलगद ओली उत्तररात्र

शरीर माझे अवघे बनले मदिरेचे पात्र

थोडक्यात सांगायचं तर काल जास्त झाली. तेवढं कबूल करतो.

रावजी : ही ओली बेहोशी की काय जी म्हणता ती स्वत:च्या खर्चाने साजरी झाली तर बरं होईल.

तनय : कबूल आहे बाबा, कबूल आहे. पण निदान या जन्मी ते होणार नाही. पैशांतलं मला काही कळत नाही. ते मला लागतात इतकंच कळतं. तेवढे जो कुणी देईल त्याचा मी आभारी असतो. आमचे आबा उर्फ बॅरिस्टर जातेगावकर यांच्या पैशावर मी जगत आलो आहे, तेव्हा त्यांचा आभारी आहे. त्यांनी आम्हाला जन्म दिला, आभारी आहे. पैसे देताहेत, आभारी आहे. स्वत्व मात्र दिलं नाही, पण आभारी आहे. आमच्या आबांनी ठरवूनच टाकलं होतं की आपण शरीराने पुण्यात आणि मनाने लंडनला राहायचं. डेक्कन जिमखान्यावर त्यांचा बंगला असणार आणि त्याचं नाव 'तमसा' असणार हे आमच्या जन्माआधीच ठरून गेलेलं होतं. त्यामुळे माझं नाव 'त' ने सुरू होणार हेही ओघाने आलंच. ह्या बेताला अनुसरून अस्मादिकांचं नाव ठेवलं काय तर मारे 'तनय'! म्हणजे 'मुलगा'! आपल्या मुलाचं नाव मुलगा ठेवावं इतकीच आमच्या आबांच्या लेखी आमची किंमत. 'बाबारे, तू खास कुणी नाहीस' असं मला सांगण्याचा हा त्यांचा मार्ग. पण ठीक आहे. जे आहे ते आहे. आभारी आहे.

रावजी : स्वत:ची किंमत स्वत: ठरवायची असते. द वर्ल्ड इज ॲज इज. मॅन हू इज नथिंग हॅज नो प्लेस इन इट. रिमेंबर दॅट.

तनय : I always remember that, Raoji. I never forget that. जीवनाची लढाई सुरू होण्यापूर्वीच ती हरलेला मी माणूस आहे. बाहेरच्या जगात मला स्थान नाही इतकं मला चांगलं ठाऊक आहे. ह्या घराच्या सांदीकोपऱ्यातच फक्त कुठेतरी माझी जागा आहे. आमच्या उच्चशिक्षित, धनदांडग्या बापाच्या जिवावर मी जगणार, यकृताला शिलिंगच्या नाण्याएवढी मोठ्ठाली भोकं पडेपर्यंत त्याच्या खर्चाने दारू पिणार आणि शेवटी मरून जाणार. हेच माझ्या नशिबी आहे. त्यात बदल होणार नाही. आबांनी हाकलूनच दिलं तर शेजारच्या बंगल्यात जागा मागेन. पण सकाळी साध्या भाताबरोबर फोडणीचं वरण आणि संध्याकाळी फोडणीच्या भाताबरोबर साधं वरण खाणारे ते निरुपद्रवी आणि पापभीरू लोक मला त्यांच्यात सामावून घ्यायचे नाहीत. तेव्हा जा रावजी, कषायपेय घेऊन ये, जेणेकरून तिच्यात पडलेल्या मक्षिकेप्रमाणे मला माझी दु:खं बुडवून टाकता येतील. पण ती तसली टी-सर्व्हिस वगैरे विलायती नखरे नकोत. सावित्री हे पवित्र नाव धारण करणाऱ्या अतिसात्विक स्त्रीच्या अंगावरील गर्भरेशमी नऊवारी साडीतून ह्या पृथ्वितलावर आम्ही पडलेलो आहोत. झग्यातून नव्हे. तेव्हा चहा नुसत्या कपात घेऊन ये. आबा तर इथे नाहीत ना?

रावजी : ते मुंबईला गेले आहेत. डेक्कन क्वीनने परत येतील.

तनय : उत्तम. म्हणजे त्यांच्याकडून पाणउतारा करून न घेता मला चहा पिता येईल. पण त्यात आता कंजुषी करू नकोस. काठोकाठ भरू दे प्याला, फेस भराभर उसळू दे!

रावजी : आणतो, पण कवित्व आवरा.

(कपाळाला आठ्या घालत रावजी आत जातो. तनय अलमारीतली पुस्तकं चाळतो, पण थोड्याच वेळात कंटाळून खिडकीबाहेर विमनस्कपणे पाहात राहतो. पोटात कळ येते आहे असं त्याच्या चेहऱ्यावर दिसतं, पण तो भाव चेहऱ्यावरून पटकन पुसून घेतो. बॅडमिंटनची उघडी रॅकेट हातात घेतलेली मधुरा येते. हिने खेळायचे कपडे घातले आहेत, पण लिपस्टिक लावली आहे आणि केस लांबसडक आहेत.)

मधुरा : मेरे प्यारे भैया!

तनय : मेरी प्यारी बेहेना! आलीस का क्लबातून? How was the tournament?

मधुरा : फॅन्टॅस्टिक! मस्त! सुपर! काय खेळलेय मी! अरे, ती फॅनी डिसूझा ना मॅचच्या आधी सॉलिड भाव खात होती. म्हणे माझी रॅकेट विलोवूडची आहे, मेड इन जलंधर आहे, यंव आहे आणि त्यंव आहे. मी म्हटलं बघतेच तुला. आज ना दादा, तिला मी लव्हगेमच दिला. अस्से एकेक स्मॅश मारले की तिला घेताच येईनात! (बॅडमिंटन खेळल्याचा अभिनय करते.) खटॅक-खटॅक-खटॅक-टॉक! नुसती जीव खाऊन पळतेय इकडून तिकडे. गेमपॉइंटला तिच्या नाकाडावरच शटल मारलं. फटॅक-टपॅक! फिफ्टीन-लव, गेम ॲन्ड मॅच मिस मधुरा जातेगावकर. क्लॅप-क्लॅप-क्लॅप! सॉलिड मज्जा आली. नंतर तिला मी माझ्या रॅकेटवरचा लोगोच दाखवला: Made in England by Appointment to His Royal Highness the Duke of Cambridge! काय पण तोंड उतरलं तिचं! दादा, you should have seen it ! नंतर कोच मॅडमनी कित्ती कौतुक केलं माझं. त्या म्हणाल्या की अशीच खेळलीस तर बॉम्बेला जिमखाना टूर्नामेंटमध्ये नक्की सिलेक्ट होशील. दादा, मी सिलेक्ट झाले ना तर पप्पा आणि तू दोघांनी पण माझा गेम बघायला बॉम्बेला यायचं. आपण चौपाटीवर मस्त भेळ खायची, एअर कंडिशनिंगमध्ये बसून सिनेमा बघायचा आणि मग कफ परेडला शॉपिंग करायचं! त्या रीना ओबेरॉयचा कसा कश्मीरी एम्ब्रॉयडरी केलेला आकाशी रंगाचा ड्रेस आहे ना अगदी तसाच मला पण पाहिजे. And I want new red shoes! ड्रेसवर काय मस्त दिसतील! (काल्पनिक ड्रेस चिमटीत उचलून धरून दिवाणखान्यात इकडून तिकडे मिरवत चालत जाते.) पप्पांच्या सुटाच्या खिशाला भोकच पाडणार आहे मी. But he loves me! He won't mind a bit. आणि त्यांना काय, मोटवानीसारखा आणखी एक क्लाएंट मिळाला की भोक पुन्हा आपोआप बुजेल.

तनय : Don't worry, मेरी बेहेना. We will go to Bombay together. पण आबांच्या खिशाला भोक पडेल का याची काळजी करू नकोस. त्याआधी माझ्या यकृताला भोक पडणार आहे. पिऊनिया व्हिस्की, जाई माझा झोक, यकृताला भोक, पडले गा!

मधुरा : झालं का तुझं सुरू?! काही भोकबीक पडत नाही. तू चांगला ठणठणीत आहेस. आणि पप्पांना सारखं आबा-आबा का म्हणतोस? किती घाटी आहेस! त्यांना आवडत नाही हे तुला माहित आहे.

तनय : अगं, त्यांना आवडत नाही म्हणूनच म्हणतो. मी जीए कुलकर्णी वाचायला सुरुवात केली ना, तेव्हा त्यांचं संपूर्ण नाव काय असेल याबद्दल मला फार उत्सुकता होती. 'ए' म्हणजे एकनाथ असं मी ठरवून टाकलं होतं, पण 'जी' म्हणजे काय ते सुचेना. 'जीवाजी' असं एक सुचलं, पण ते बरोबर वाटेना. मग विचार केला 'जीमूतवाहन' असेल का? तू कल्पना कर: 'जीमूतवाहन एकनाथ कुलकर्णी' आत आहेत स्लॅश नाहीत अशी पट्टी बाहेर दारावर लावायची! शेजारी हबकतील की नाही? पण शेवटी एकदाचं कळलं: जीए कुलकर्णी म्हणजे गुरुनाथ आबाजी कुलकर्णी! त्यांच्या वडिलांचं 'आबाजी' हे नाव मला इतकं आवडलं की आपल्या बाबांचं मी तेच नाव ठेवून टाकलं. आता जरासे चडफडले, पण मी पडलो त्यांचा कुलदीपक. सांगणार कुणाला?! सारांश काय तर तुझे जे पप्पा तेच माझे आबा. मधुरा is to पप्पा as तनय is to आबा. After cross multiplying, मधुरा times आबा is equal to तनय times पप्पा. म्हणजे मधुरा times आबा minus तनय times पप्पा is equal to zero. A big big zero. माझ्या यकृतावर कोरला गेला आहे तेवढा मोठा झीरो! पण आता हे समीकरण कसं सोडवणार? Who will solve this equation?! And what is the point of solution when it leads to dissolution? समीकरण सुटताना विरघळत जाणारे कंस जर पुन्हा एकदा हातमिळवणी करून तुमच्या गळ्याभोवतीच वेढा देणार असतील —

(रावजी खाकरतो तसं तनयला भान येतं. मधुरा सुटकेचा निश्वास सोडते. रावजीच्या हातात चांदीची टी-सर्व्हिस आहे. 'हे काय?' असा चेहरा करून तनय रावजीकडे बघतो.)

रावजी : दोघांसाठी आणला आहे. तोंड वाईट करू नका. मुकाट्याने प्या. तुम्ही लाख म्हणाल मला नुसता कपात चहा आण म्हणून. आम्हाला तसं कसं करता येईल? या घराचं काही एक वळण म्हणून आहे की नाही? (मधुराला उद्देशून) टी फॉर टू, मिस जातेगावकर. विथ स्कोन्स ॲन्ड क्रीम. ऑल्सो कुकुंबर सॅन्डविचेस.

मधुरा : रावजी, तुला किती वेळा सांगितलं आहे: 'क्यूकंबऽ' असं म्हणायचं. 'कुकुंबर' नव्हे. तो काय औदुंबर आहे का?

रावजी : येस मिस, सॉरी मिस. परवा त्या गाडगीळमॅडम आल्या होत्या तेव्हा मी असंच म्हणालो. पण मी काय बोलतोय ते त्यांना कळलं नाही.

मधुरा : नाही तरी ती गाडगीळीण जरा बॅकवर्डच आहे. नवरा साधा डेप्युटी कलेक्टर आहे तर मिजास किती मारते! परवा क्लबात आली होती मारे बॅडमिंटन खेळायला. सिंगलची लॉबी आणि डबलची लॉबी कळत नाही आणि म्हणे मी बॅडमिंटन खेळते!

रावजी : येस, मिस.

मधुरा : रावजी, तू उगीच आगाऊपणा करू नकोस. You may go now. I will make the tea. इथे होस्टेस मी आहे.

रावजी : येस, मिस. (जातो. ती दिवाणावर बसून सराईतपणे चहा तयार करू लागते. तनय पुढे होऊन एक सॅन्डविच उचलतो.)

मधुरा : ई! कसला घाणेरडा वास येतोय?! दादिटल्या, आंघोळ केली नाहीयस ना?

तनय : आत्ताच झोपेतून उठलो. अजून दात घासायचे आहेत.

मधुरा : शी! तरीच शिळ्या दारूचा वास येतोय. असा कसा रे तू? सगळे पुरुष मेले असेच घाणेरडे असतात. Dirty fellows all and one.. अगदी किळस येते मला!

तनय : बबडे, फार शेफारली आहेस हं तू! तुला उजवून टाकून, लाल साडीच्या बोंग्यात कोंबून, हातात मसाला दुधाचा पेला सोपवून छपरी पलंगावर ढकलून द्यायला पाहिजे. झुळझुळीत सदऱ्यातल्या मिशाळ बाप्याने गच्चम मिठी मारली म्हणजे सगळी किळस कुठल्या कुठे पळून जाईल!मग अगदी लाजत लाजत दुसऱ्या दिवशी उखाणा घेशील:

पहाटेच्या साखरझोपेत होते गं मी कशी
सुभानरावांनी जवळ घेऊन टोचली मला मिशी!

मधुरा : ई! घाणेरडा आहेस! (चेहरा झाकून घेते.) मला लग्नच करायचं नाहीय. मी आपली तशीच राहणार. (स्वप्नाळू चेहऱ्याने) मला एक मुलगी असेल मात्र.

तनय : (चहा पिताना ठसका लागतो.) बबडे, लग्न नाही केलंस तर मुलगी कुठून होणार तुला?

मधुरा : मला नाही माहित. पण होईल.

तनय : अगं, अशी कशी होईल? नुसता तो झारा घेऊन बुंद्या पाडायला जातेस त्याऐवजी कोकशास्त्र वाचत जा जरा. इथेच अलमारीत कातडी बांधणीतली व्हिंटेज एडिशन असेल कुठेतरी. आबांनी चेरिंग क्रॉसहून आणलेली. म्हणून तर आपला जन्म झाला, बबडे!

मधुरा : शी! घाणेरडं बोलू नकोस! मला तसलं काही नको आहे. (खट्टू होते.) पण मला माझं असं मूल हवं आहे. (स्वत:मध्ये हरवून जाते.) दाद्या, मला एवढं म्हणतोस तर तूच पहिल्यांदा लग्न का नाही करत? एवढा मोठ्ठा घोडा वाढला आहेस तो. माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठे आहात आपण दादासाहेब. क्यूमध्ये तुमचा नंबर आधी आहे.

तनय : कर, तू पण माझी चेष्टा कर! अगं, माझ्याशी कोण लग्न करणार? तुम्ही मुली म्हणजे सगळ्या इथून तिथून सारख्याच असता. तुम्हाला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, मानसन्मान पाहिजे, क्लबात मिरवायला पाहिजे म्हणून नुसतं संसाराचं सोंग आणता झालं. हे सगळं पुरवायला म्हणून फक्त तुम्हाला नवरा हवा असतो. शरीरसुखाचे चार चव्वल त्याच्या अंगावर फेकून हे सगळं तुम्ही घाऊक भावानं विकत घेता. सरसकट नुसतं बेगडी, बाजारू, मुलामा दिलेलं आयुष्य! अरे, शिसारी येते शिसारी मला तुमची! तुमच्यावर प्राण ओवाळून टाकून जो जीव लावतो त्याची तुम्हाला कवडीची किंमत नसते. जो पैसे मिळवू शकत नाही, ज्याच्या नावावर पार्टीला जाऊन मिरवता येत नाही तो पुरुष तुमच्या लेखी अगदी कुचकामी! काळ्याशार डोहात असा पाय टाकून शांत बसलेला औदुंबर तुमच्या लेखी भिकारी! कारण काय तर तुमच्या ह्या चकचकीत झगमगीत खोट्या दुनियेत तो रमत नाही म्हणून! नको. नकोच मुळी! मला यातलं काही नको. मी आहे तसाच बरा आहे —

नको क्षुद्र संभोग तो दुर्बळांचा
तुझी दूरता त्याहुनी साहवे

दूरच राहा माझ्यापासून! दूरच राहा! मला लग्न नको, प्रेम नको, काही नको. मूर्खांनो, द्विभार्याप्रतिबंधक कायदा कसला आणता? एकभार्याप्रतिबंधक कायदा आणा! राष्ट्राला त्याचीच आज गरज आहे! एकल्या वाटेवरी सूर माझा एकला —

(हे बोलत असताना तो तिच्यापासून दूर चालत जाऊन तिला पाठमोरा झाला आहे. ती मागून जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवते.)

मधुरा : दादा, तू असा का रे वागतोस? का असा स्वत:ला दुखवून घेतोस? पप्पा आणि आई किती काळजी करतात तुझी. त्यांना वाटतं तू नीट अभ्यास करावास, पप्पांसारखं बॅरिस्टर व्हावंस, त्यांना अभिमान वाटेल असं काही करावंस. चारचौघात त्यांची मान खाली होईल असं वागू नयेस. दोघांचं किती प्रेम आहे तुझ्यावर. पण तू दारू पितोस, एवढ्या सोन्यासारख्या शरीराची हेळसांड करतोस यामुळे त्यांना किती त्रास होतो. आई तुझ्या काळजीपोटी रात्र रात्र रडत असते. का बरं असं तिच्या मनाला दु:ख देतोस?

तनय : पण मग मी काय करू? मी फार एकटा आहे गं. मला माझं असं कुणी नाही. (रडू लागतो.)

मधुरा : हे बघ, तू माझा मोठ्ठा दादा आहेस ना?! मग असं रडायचं नाही. डोळे पूस बघू. छान हसून दाखव मला. (हसतो.) आणि हे बघ. इतकी दारू नको रे पीत जाऊ! हे व्यसन म्हणजे माणसाला आतून पोखरून टाकतं अगदी. दादा, मी तुझी छोटी बहिण आहे की नाही?! पण आजच्यापुरती तुझी आई होऊन सांगते. ही दारू म्हणजे वास्तवापासून पळून जायचा एक भ्याड आणि भेकड मार्ग आहे. तसं नको करू. शहाण्यासारखा वाग. निरोगी हो. बलदंड हो. पुरुषासारखा पुरुष ना तू? मग असं रडतभेकत नाही जगायचं. आयुष्याला निधड्या छातीने सामोरं जायचं. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. कुटुंबाच्या प्रेमाची पाखर हीच शेवटी वैफल्याच्या कटुतेवर साखर म्हणून गुणकारी ठरते.

तनय : पण मला मरून जावंसं वाटतं गं.

मधुरा : वेडा कुठला! असं नाही बोलायचं. काही कुणी मरूनबिरून जात नाहीय. मी म्हटलं की नाही तुला, मला एक गोड मुलगी असणार म्हणून? मग तिचा तू मामा असणार की नाही? तिचे तू लाड करायचेस, तिला चित्र काढायला शिकवायचंस, कविता म्हणायला शिकवायचंस, रोज रात्री झोपताना तिला गोष्ट सांगायचीस! आणि तिचे डोळे मिटायला लागले की पापण्यांची हळूच पापी घ्यायचीस..

(दाराच्या फ्रेममध्ये बसवण्णा दिसतो. त्याच्या डाव्या हातात विडी, उजव्या हातात फुलांची परडी आणि डाव्या खांद्याला कापडी पिशवी आहे.)

बसवण्णा : कुणाची पापी घेतं म्हटलं तर मधुराताई?! आमची घेतं का? पाहिजे तितकं घ्या हो. आमचं काहीपण ऑब्जेक्षन नसतं. आमच्या गावात एक फादर होतं. आमचं फादर नव्हे हो. चर्चात राहतं ते फादर म्हटलं तर. ते फादर आम्हाला येशूचं शिकवण बोलून सांगायचं: एका गालाचं पापी घेतलं तर दुसरा गाल पुढे करा म्हणून. तेव्हापासून आम्ही पण तसंच करतं. (याला विडी उलटी ओढायची लकब आहे, म्हणजे जळतं टोक तोंडात धरून. आत येऊन फुलांची परडी आणि पिशवी टेबलावर ठेवतो.) हे पारिजातकचं परडी आणलंय. मॅडमच्या इव्हिनिंग डिव्होशनसाठी.

मधुरा : बसवण्णा, शी घाणेरड्या! इथून दूर हो बघू. आणि ती बिडी इथून बाजूला घे आधी. काय घाणेरडा वास आहे पण! तुम्ही सगळे पुरुष म्हणजे असेच: नुसते घामाचे आणि धुराचे वास.

तनय : बसवण्णा, लेका तू फार माजला आहेस हं!

बसवण्णा : अहो, आता माजायचंच की. आमचं प्रेष्टीज असतं की हो तसं. मायसोर कंट्री क्लबात मी चीफ गार्डनर होतं. माझं रोज असं रेडभडक असायचं बघा म्हणजे आल मायसोर स्टेट आफिसर्स ॲन्युअल कॉम्पिटिशनमध्ये सहा वर्षं फर्स्ट प्रैझ मिळवलं. तुमचं बॅरिस्टरसर मायसोर हायकोर्टात केससाटी आलं तेव्हा क्लबात रेसिडेन्ट होतं. ही वॉज सो इम्प्रेस्ड टू सी माय रोजबेड. मला म्हटलं यू कम टू पूना विथ मी. माझं तिथे विराट बंगला असतं. मी सरांना बोलून म्हटलं की स्वामी, ननगे पूना ग्वत्तिला. मायसोर कंट्री क्लबाचं गार्डन करायचं ते सोडून बंगल्याचं गार्डन करायचं म्हणजे डिमोशन की हो. बट सर वाज इम्पॉर्च्युनेट. सर प्रपोज्ड की ड्रायव्हरची ड्यूटीपण तुलाच देतं. आय आस्क्ड सर की विच कार यू हॅव्ह. सर म्हटलं ओरिजनल इंग्लिश ऑस्टिन समरसेट असतं. देन आय सेड येस. नीन होगित्री स्वीकार बेकु. तेव्हापासून मी डबल ड्यूटी करतं. हिकडे पूना जिमखाना क्लबचं फॉर सेवन स्ट्रेट इअर्स फर्स्ट प्रैझ मिळवतं तर तिकडे डेक्कनवर ऑस्टिन समरसेट चालवतं. पूना ड्रैव्हिंग म्हणजे नुसतं वैताग माडी. सगळीकडे रोडवर नुसतं सायकली असतं नाहीतर टॉमी नावाचं अल्सेशियन असतं. बट आय ड्रैव्ह ग्रेसफुली. आय ॲम प्रौड ऑफ मायसेल्फ. तेव्हा जरा माजायचंच की हो. (विडीचा झुरका घेतो.)

मधुरा : शी! घाणेरडा! एकदा बिडीचं जळतं टोक घुसून जिभेला भोक पडेल तेव्हा कळेल.

बसवण्णा : अहो, बिडीचं काय हो ते? माझं जन्म निपाणीचं असतं. तिथलं बेबी म्हटलं तर मदर्स मिल्कनंतर एकदम टोबॅकोच सुरू करतं. आमचं टोबॅको आम्हाला कडकच लागतं की हो. कडक पाहिजे म्हटलं तर बिडीचं पापीच घ्यावं लागतं. विथ फुल्ल कान्सन्ट्रेशन गार्डनिंगचं काम करायचं तर बिडीचंच काय ते एक कंपॅनियनशिप असतं. कडक धूर आत घुसलं की रोज कसं एकदम रेडीरेड फ्लरिश होतं की हो. यू नीड ए रीअल मॅन टु ग्रो अ रोज.

(रावजी येतो.)

रावजी : यू डॅम फूल! इथे आत विडी ओढत आलास? काय घाण वास येतोय —

बसवण्णा : तुमच्या सरच्या पाईपचं ते ष्ट्रांग फ्रेग्रन्स चालतं तर विडी का नाही चालत म्हणतो मी? हे घ्या हो, पारिजातकचं परडी आणलं आहे. मॅडमला इव्हिनिंग प्रेयरला पाहिजे म्हणून. पारिजातक उगवायला गार्डनर कशाला पाहिजे हो? साधं माळी चालतंय की. मायसोर कंट्री क्लबचं चीफ गार्डनर असतंय की हो मी. पारिजातक उगवायचं म्हणजे वेष्ट ऑफ माय प्रेशस टॅलेंट की हो. नशीब माझं वडाचं झाड उगवून त्याला सूत गुंडाळायला कापूस उगव म्हणून सांगितलं नाही. इतकं सतत डिवोशन म्हणजे कोण करणार?! सर म्हणून सहन करतंय बघा ते. ही इज अ व्हेरी पेशंट मॅन.

(सावित्रीबाई आत येतात. ह्या तुडतुडीत आहेत. हिरवं नऊवारी पातळ, अंबाडा आणि गळ्यात ठसठशीत मंगळसूत्र असा वेष आहे. ह्या संपूर्ण प्रवेशात तनय काहीच बोलत नाही. घुम्यासारखा दिवाणावर बसून राहतो.)

सावित्रीबाई : (हसून टाळ्या वाजवत) बबडी, तन्या आणि बसवण्णा! सगळे रिकामटेकडे मेले इथेच जमलेत! रावजी, अरे बाबा पानसुपारीचं तस्त आणि पिकदाणी घेऊन ये बरं! पाहुणचार कसा व्यवस्थित व्हायला हवा. आपल्या घरचं वळणच आहे तसं. पुण्यात राहात असलो म्हणून पुणेरी का वागायचं?

मधुरा : ई! मम्मा! पानसुपारी कसली खातेस?! तू म्हणजे अशी घाटी आहेस ना!

सावित्रीबाई : हे बाकी बरोब्बर ओळखलंस गं बाई! अगं, मेणोलीच्या त्र्यंबकशास्त्री नामजोशांची मी मुलगी. तुला सांगते, माझे खापरपणजोबा नशीब काढायला म्हणून पेशवाईत रत्नाग्रीहून मेणोलीला आले ते तिथ्थंच राहिले. त्यांचा पोरगा तिथ्थंच उपजला, पोराचा पोरगा तिथ्थंच उपजला आणि पोराच्या पोराचा पोरगा पण तिथ्थंच उपजला. तेव्हा तशी मी जन्माआधीपासून घाटीच की गं.

मधुरा : आहेस्सच मुळी. पण माझी लाडकी मम्मा आहेस. म्हणून आहेस तश्शी चालवून घेते तुला.

सावित्रीबाई : न घेऊन सांगशील कुणाला बबडे?

बसवण्णा : मॅडम, ते गार्डनमधलं पारिजातकचं परडी आणलं आहे.

सावित्रीबाई : हो हो. चाललेच आहे मी पूजेला. आणि मंडईत जाऊन अळीव, खोबरं, कोल्हापुरी गूळ आणि बदाम आणायला सांगितले होते ते सारं आणलंस का? आज रात्री बसून लाडू वळायचे आहेत मला.

बसवण्णा : येस मॅडम, ते सगळं पिशवीत ठेवलं आहे.

मधुरा : (तिच्या जवळ जाऊन) आई, केव्हा बाळंत होते आहेस गं? लब्बाडच आहेस. आम्हाला एवढं नवं भावंड येणार पण तू बिलकुल पत्ता लागू दिला नाहीस ना? (तिच्या पोटावरून हात फिरवते.)

सावित्रीबाई : हात मेले! म्हातारीची चेष्टा करतेस होय गं? मी कसली बाळंत होतेय या वयात? फार सोकावली आहेस बरं तू. आता मीच तुझ्यासाठी एक गोरागोमटा पोरगा शोधून देणार आहे. दोघं मिळून लगेच कामाला लागा आणि मांडीवर मुतायला एक छानसा नातू द्या मला. (तिला जवळ घेते.) ह्या तन्याला सांगून सांगून थकले पण तो काही लग्नाचं मनावर घेत नाही. बघ कसा शुंभासारखा कोपऱ्यात तोंड खुपसून बसलाय. माझ्याशी एक शब्द तरी बोलतोय का बघ! आता तुझ्यावरच सगळी भिस्त आहे गं बाई.

मधुरा : असं गं काय आई?! मी नाही जा —

सावित्रीबाई : अगं वेडाबाई, 'मी नाही जा' काय? इतकी घोडी वाढलीस तरी अल्लडपणा गेला नाही तुझा. मी तुझ्या वयाची होते तेव्हा पदरात एक पोर पडलेलं होतं.

मधुरा : (तनयला वेडावून दाखवत त्याच्या तोंडासमोर ओवाळते.) त्या पोरानं असे काय दिवे लावलेत ते दिसतंच आहे.

(सर्वत्र अवघडलेली शांतता पसरते. फोन वाजतो.)

सावित्रीबाई : यांचाच असणार. मीच घेते — हॅलो. न्हायीत, बालिष्टरसर घरी न्हायीत. म्या त्यांची गावाकडनं आनलेली बाईल बोलत्येय. सर ममईला गेल्यात. कोडतात दोन केसी हरून मग येत्याल. काय म्हनता? बालिष्टरसरच बोलताय? अगं बया! आवाज वळिकलाच न्हायी की हो म्या.. (खळखळून हसत) बोला! डेक्कन क्वीननेच येताय ना? (बराच वेळ ऐकत राहात) ठीक, ठीक. रावजीला सांगून ठेवते. अहो ऐका, तो जमशेद भेटेल तुम्हाला. त्याला म्हणावं बायकोला वेळेवर दवाखान्यात नेण्यात हलगर्जीपणा करू नकोस. वेडा पारशीपणा दाखवायची ही वेळ नव्हे. (आणखी थोड्या वेळाने) हो, हो. ते काय तुम्ही द्यालच. सढळ हाताने द्या मात्र. बिचारा गरीब आहे हो. हे पारशी मेले गब्रू तरी असतात नाहीतर गरीब तरी असतात. अधलंमधलं काही नाही. (आणखी थोड्या वेळाने) बरं, बरं. अहो, त्यात काय एवढं मेलं? विलायतेत होतात तेव्हा तीन वर्षं नाही का वाट पाहिली मी? (आणखी थोड्या वेळाने) बरं, बरं. ठेवते. या तुम्ही.

मधुरा : तू म्हणजे अगदी जगाची काळजी वाहतेस बाई! हा जमशेद कोण आता?

सावित्रीबाई : अगं, तो डेक्कन क्वीनमध्ये खानसामा आहे. तुझ्या पप्पांची आणि त्याची जुनी ओळख आहे. दर खेपेला यांना मावा केक आणून देतो. त्याच्या बायकोला नववा म्हैना लागलाय आता. पुढच्या वेळी हे मुंबईला जातील तेव्हा अळवाचे लाडू पाठवीन त्यांच्याबरोबर. म्हणून तर हे एवढं सामान मागवलं. बरं का रावजी, सरांचा फोन आला होता.

रावजी : हो, ते कळलंच.

सावित्रीबाई : आगाऊपणा करू नकोस. माथाडी कामगारांचा खटला जिंकले म्हणे. जिंकतील नाहीतर काय. फर्डं इंग्रजी बोलून जज्जाची कानशिलं पांढरी केली असतील. तेव्हा स्टेशनवरून परस्पर कामगार कचेरीतच मीटिंगला जाणार आहेत. जेवणबिवण तिथंच करून येतील. बोकड खाणार असतील मेले. नंदिनीपण आहे त्यांच्याबरोबर. तेव्हा मी यांना म्हटलं की तिला रात्री इथेच घेऊन या. इतक्या उशीराची लेडीज हॉस्टेलात परत कुठे जाईल ती? उद्या रविवारच आहे. झोप घेऊन सावकाश दुपारचं जेवणबिवण करून मग जायची तेव्हा जाईल. तेव्हा मी काय म्हणते रावजी, नीट ऐक. तिच्यासाठी गेस्ट बेडरूम साफसूफ करून घे.

रावजी : ती नेहमी साफसूफच असते मॅडम. आपल्या घराचं वळणच तसं आहे.

सावित्रीबाई : आगाऊपणा करू नकोस. गेस्ट बेडरूम पुन्हा साफसूफ करून घे आणि मधुरेचा एखादा चांगलासा गाऊन तिला झोपताना घालायला काढून ठेव. (मधुराला उद्देशून) चालेल ना गं तुला? ती मेली लेडीज हॉस्टेलात राहणारी झुंजार पत्रकारीणबाई आहे. माझ्या काकूबाई थाटाच्या साड्या काही नेसायची नाही.

मधुरा : (गोरीमोरी होत) इश्श! चालेल की.

सावित्रीबाई : आता यात 'इश्श' करण्यासारखं काय आहे गं? ती काय पुरुष आहे? तुम्हा अलिकडच्या पोरींना 'इश्श' केव्हा वापरायचं हे पण मीच शिकवायचं का? बरं, मी येते आता. दर शनिवारचा खुन्या मुरलीधराचा नेम असतो माझा. (फुलांची परडी उचलते.) रावजी, ते लाडवांचं सामान स्वयंपाकघरात नीट ठेव. बसवण्णा, मंडईचा हिशेब काय झाला तो रावजीला सांगून ठेव.

बसवण्णा : येस मॅडम. फोर्टी नाईन रुपीज ट्वेन्टी फाईव्ह पाईस लागले. चेंजपण पिशवीतच ठेवलं आहे.

सावित्रीबाई : दुकानदारानं मागितले तेवढे पैसे तडकाफडकी देऊन टाकले असशील. तू तरी काय तुझ्या सरांचाच ड्रायव्हर.

बसवण्णा : नो मॅडम. मंडईत जोराचं घासाघीस केलं. हे पुण्याचं दुकानदार म्हणजे - व्हाट इज द वर्ड - नाट थीफ ॲज सच. हां! हे पुण्याचं दुकानदार म्हणजे एक नंबरचं भामटा असतं. नॉन-पूनाऐट गिऱ्हैक दिसलं की काय पण रेट सांगतं. पण मी निपाणीचं असतं हे त्या पाप बिचाऱ्याला माहितच नसून नसतं! देन आय सेड टु मैसेल्फ — अडिगी वेंडु प्रामाणिक मनुष्यं तर्री. तू पुण्याचं भामटा असलं तर मी निपाणीचं लखोबा लोखंडे असतं. रेट पाडून घेतलं आणि वर त्या दुकानदारालाच एक बनावट पावली खपिवलं.

सावित्रीबाई : चांगलं केलंस हो. तू तरी काय तुझ्या सरांचाच ड्रायव्हर. वकील आणि भामटे. दोन्ही मेले एकाच माळेचे मणी. चला, मला उशीर होतोय बाई.

बसवण्णा : पण मॅडम, कशाला तुम्ही इतकं धोका पत्करून तिकडे नदीच्या पलिकडे जातं म्हणतं मी. ओल्ड पूना इज अ व्हेरी डेंजरस प्लेस. ते मुरलीधर स्वत:च एक मर्डरस असतं! आणि देऊळच्या बाजूला सगळं नुसतं भामटा असतं, बुधवारातलं ते वाईट-साईट बाई असतं. व्हेरी डेंजरस प्लेस. मी म्हणतो हितेच डेक्कन जिमखान्यात एक देऊळ शोधून सोडा की. डेक्कन इज व्हेरी सेफ. सगळीकडे नुसतं अल्सेशियन कुत्रा हिंडत असतं. भामटा हिम्मतच करायचं नाही इथे यायचं.

सावित्रीबाई : हात मेल्या. मला रे कसली भामट्यांची भीती दाखवतोस?! माझे खापरपणजोबा मेणोलीच्या वाड्यात कारकून होते. तिथे खुद्द नाना फडणवीसालाच हिशेबात कापायचे. त्याच्याकडे येणाऱ्या सगळ्या वाईट-साईट बायांची बिदागी ह्यांच्याच हातून तर जायची. रंगीला इतके द्यायचे न कमळीला तितके द्यायचे. त्यातसुद्धा रुपयातले दोन आणे ह्यांच्याच खिशात पडायचे. तेव्हा सारौंश काय तर मला फसवणाऱ्या भामट्याची आयशी अजून जन्माला आलेली नाही. चला, येते मी. बसवण्णा, तू गाडीत पेट्रोल भरून हवा भरून तयार ठेव. कामगार कचेरीतून फोन आला की तिथे जाऊन त्या दोघांना घेऊन ये. (बसवण्णा जातो.) आणि शुंभांनो, तुम्ही दोघे पटापट आंघोळी करून घ्या. काय पण पोरं दिलीत मला तुमच्या बापानं. आणि तन्या, तू आधी दात घासून घे रे बाबा. शिळ्या दारूच्या वासात घामाचा वास मिसळून मळमळायला लागलंय मला इथे. जा! निघा!

मधुरा : मम्मा, तू म्हणजे ना कजाग आहेस अगदी! (फुरंगटून पाय आपटत निघून जाते.)

सावित्रीबाई : बेटा तनय, आता मी जास्त काही बोलत नाही. आंघोळ करून घे बेटा. आणि दुपारी मी तुपातला शिरा केलाय तो थोडासा खाऊन घे. देवळातून परत आले की तू, मी आणि बबडी एकत्र जेवायला बसूयात. एवढं कर बाबा माझ्यासाठी. म्हाताऱ्या आईला उगीच त्रास नको देऊस.

तनय : मला भूक नाहीय. (निघायला उठतो, पण पोटात कळ येते. ती लपवण्यासाठी एक मोठ्ठालं पुस्तक पोटाशी धरतो.) हे इथेच विसरत होतो. (हळूहळू चालत निघून जातो. सावित्रीबाई त्याच्या मागोमाग दाराच्या चौकटीपर्यंत जातात आणि डोळ्याला पदर लावतात.)

सावित्रीबाई : रावजी —

रावजी : येस मॅडम.

सावित्रीबाई : सर यायच्या आत तो डीकॅन्टर पुन्हा पहिल्यासारखा भरून ठेव.

रावजी : येस मॅडम.

सावित्रीबाई : तुझे सर आणि नंदिनी रात्री उशीरा येतील. दिवसभर कोर्टकचेऱ्या आणि मीटिंगा करून दमून आलेले असतील. गाडीचा आवाज आला की ताबडतोब दार उघडायला जा. त्यांचा खोळंबा करू नकोस. जाते मी. (फुलाची परडी उचलून सावित्रीबाई जातात.)

रावजी : (स्वत:शीच, मान हलवत) ऑस्टिन सॉमरसेटचा कधी आवाज येतो का?

सावित्रीबाई : आगाऊपणा करू नकोस. इथून ऐकू येतंय मला. (रावजी जीभ चावतो.) पण आता जातेच रे..

(रावजी बसवण्णाने ठेवलेली पिशवी उचलतो. त्यातल्या एका रुमालाच्या पुरचुंडीतली मोड बाहेर काढतो आणि ती नीट मोजून अलमारी उघडून एका डबीत ठेवून देतो. त्याच अलमारीतून एक भपकेबाज कातडी बांधणीची कीर्द-खतावणी आणि फाउंटन पेन बाहेर काढतो. पानावर आकडेमोड करता करता..)

रावजी : फोर्टी नाईन रुपीज ट्वेंटी फाईव्ह पाईस. एकूणपन्नास पूर्णांक पंचवीस शतांश गुणिले अठरा म्हणजे आठशे शहाऐंशी पूर्णांक पाच दशांश. आठशे शहाऐंशी भागिले दोनशे चाळीस म्हणजे तीन पूर्ण आणि बाकी राहिली एकशे सहासष्ट. एकशे सहासष्ट भागिले बारा म्हणजे तेरा पूर्ण आणि बाकी दहा. झालं तर. अळवाच्या लाडवांचे साहित्य घेतले. खर्च: तीन पाउंड, तेरा शिलिंग, दहा पेन्स, दोन फार्दिंग. (इतकी नोंद करून पेनसह कीर्द-खतावणी व्यवस्थित परत ठेवतो आणि अलमारी बंद करून निघून जातो.)

(दिवाणखान्यातल्या घड्याळात अकराचे टोले पडतात. झुंबरातले दिवे उजळलेले आहेत. नंदिनी आणि बॅरिस्टर जातेगावकर दाराच्या फ्रेममध्ये दिसतात. नंदिनी निळी किनार असलेली पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली आहे. खांद्याला शबनम पिशवी आणि पायात कोल्हापुरी चपला आहेत. बॅरिस्टर थ्री-पीस सूटमध्ये आहेत. पायात पॉलिश केलेले काळे बूट आहेत.)

बॅरिस्टर : After you!

(नंदिनी आधी येते आणि तिच्यामागून बॅरिस्टर येतात.)

बॅरिस्टर : बस, नंदिनी. सकाळपासून आपली धावपळ खूप झाली. पण कामगार संघाचा निकाल मनासारखा लागला हे उत्तम झालं. सन्मानाने जगता यावं यासाठी वेळप्रसंगी संप करण्याचा कामगारांना घटनात्मक हक्क आहे असा निकाल हायकोर्टाने दिला. फार चांगलं झालं.

नंदिनी : येस, सर. तुम्ही फार ब्रिलियंट आर्ग्युमेंट केलंत सर. जस्टिस नरीमन म्हणजे एरवी अगदी निर्विकार माणूस. पण तोही भारावून गेलेला दिसला.

बॅरिस्टर : तुला सांगतो, मी विशेष असं काहीही केलं नाही. (बोलता बोलता टाय सैल करून स्वत:साठी एक स्कॉचचा पेग सावकाशीने ओतून घेतात. पण हे करण्याआधी एका छोट्या क्रिस्टल ग्लासमध्ये शेरी ओतून नंदिनीला देतात.) Some cream sherry for you. (ती ग्लास ओठाला न लावता तसाच समोर ठेवते. मात्र बॅरिस्टर स्कॉचचे घुटके घेत राहतात.) अशा हक्काला घटनेत आणि कायद्यात अधिष्ठान आहे इतका साधा मुद्दा मी कोर्टाला पटवून दिला. पण नंदिनी, एकोणीसशे एकवीस सालच्या बकिंगहॅम ॲन्ड कर्नाटक मिल्समधल्या संपाबद्दल तू जी कात्रणं शोधून काढलीस त्यांचा मात्र आपल्या आर्ग्युमेंटला बळकटी आणण्यासाठी खूप उपयोग झाला. जस्टिस नरीमननी आपल्या जजमेंटमध्ये म्हटलं सुद्धा की 'The historical data uncovered by the indefatigable journalist Ms Nandini Gokhale has proved to be of immense value et cetera et cetera.. '

नंदिनी : काय लाजवताय सर.

बॅरिस्टर : लाजवत नाही, तुला फक्त तुझ्या वाट्याचं श्रेय देतो आहे. पण प्रांजळपणे सांगायचं तर माझ्या पोटात जराशी बाकबूक होतीच. अगं, जस्टिस नरीमन म्हणजे इनर टेंपल. मी मिडल टेंपल. आम्हा दोघांची लंडनमधली जुनी खुन्नस! तेव्हा म्हटलं म्हातारा तीच तेवढी लक्षात ठेवून बसतो की काय! पण तसं काही झालं नाही. शेवटी न्यायाची बाजू खरी ठरली. मी म्हणेन की असे न्यायाधीश जोपर्यंत न्यायासनावर आहेत तोपर्यंत ह्या देशाची अगदीच वासलात लागलेली नाही. असेंब्लीत बसून तंबाखू चघळणाऱ्या गावंढळ खाबूंच्या ताब्यात तो पूर्णपणे गेलेला नाही. थोडासा तुकडा अजून कुठेतरी शिल्लक आहे. पण आम्ही आता थकत चाललो. आमची उमेद संपत चालली. आता तुमच्या नव्या पिढीवरच आमच्या सगळ्या आशा केन्द्रित झालेल्या आहेत.

नंदिनी : असं म्हणू नका सर. उलट तुम्ही आम्हाला स्फूर्तिस्थानी आहात. कायद्याचं आणि घटनेचं सखोल ज्ञान असलेले वकिल म्हणून तुमचं केवढं नाव आहे सर.

बॅरिस्टर : तू असं म्हणतेस हा तुझा मोठेपणा झाला, पण यात माझं श्रेय फार थोडं आहे. पहिल्यापासून आम्ही घरचे तसे बरे होतो. वडिलोपार्जित जमीनजुमला थोडाफार होता; मागे भावंडं कुणी नाहीत, त्यामुळे त्यांच्या जबाबदाऱ्या नव्हत्या. इतकं सगळं पाठबळ होतं म्हणूनच मला इंग्लंडला पाठवणं बाबांना शक्य झालं. सासऱ्यांचाही हातभार लागला. ज्याला वकिली डोकं म्हणतात ते सुदैवाने मला मिळालेलं आहे, त्यामुळे तिथून शिकून आल्यानंतर ह्या क्षेत्रात थोडंफार नाव झालं, पैसा मिळाला. पण नंदिनी, याबाबतीत माझ्याइतके भाग्यवान सगळे नसतात हे मी विसरलेलो नाही. स्वत:च्या कुटुंबाला उर्जितावस्था यावी म्हणून जिवापाड कष्ट करणाऱ्या, हातावर घट्टा उठवून घेणाऱ्या माणसांबद्दल मला कणव वाटते, त्यांच्या हक्कांसाठी झगडावंसं वाटतं यामागचं कारण इथे कुठेतरी आहे.

नंदिनी : पण तुम्हाला एक विचारू सर? असं असेल तर मोटवानीसारख्या भ्रष्टाचारी माणसाचं वकिलपत्र तुम्ही का घेता? अशा माणसाला कायद्याच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी तुम्ही आपली कुशाग्र बुद्धी का खर्ची घालता? याची तुम्हाला कुठे बोच नसते का? सॉरी सर, लहान तोंडी मोठा घास घेते आहे, पण विचारल्याखेरीज राहवत नाही म्हणून विचारते.

बॅरिस्टर : असते ना, बोच असतेच. नोटांची मऊमऊ थप्पी खाली अंथरली की ती बोच जराशी कमी होते इतकंच. पण बोच अजूनही असते. या व्यवसायात कितीही पावसाळे काढले, स्वत:ची कातडी कितीही जाड करून घेतली तरी ती पूर्णपणे जात नाही. लंडनला असताना आम्हाला क्रिमिनल लॉ शिकवणारे एक विद्वान प्राध्यापक होते: प्रोफेसर जॉन ॲशवर्थ नावाचे. नेहमी बो बांधायचे, टाय नाही. नेमका हाच प्रश्न त्यांना मी एकदा विचारला होता. ते मला म्हणाले होते की तुला पुस्तकी उत्तर देतो, पटतं का पाहा. तर नंदिनी, आता तेच पुस्तकी उत्तर मी तुला देतो. पटतं का पाहा.

नंदिनी : सांगा सर.

बॅरिस्टर : मी म्हणेन की मोटवानी भ्रष्टाचारी आहे की नाही हे ठरवण्याचं काम माझं नाही. सरकारी यंत्रणेने त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे इतकं मला मान्य आहे. पण तो आरोप अजून सिद्ध झालेला नाही. जोपर्यंत तो सिद्ध होत नाही तोपर्यंत न्यायासनासमोर स्वत:चा बचाव करण्याचा कायदेशीर हक्क मोटवानीला आहे. आता असं पाहा की कायदा ही वस्तू एखाद्या प्रचंड जुनाट राजवाड्यासारखी आहे. हा राजवाडा एकाच वेळी एकाच माणसाने बांधलेला नाही. इकडचा सज्जा एका शतकात एकाने बांधला, तिकडचं दालन दुसऱ्या शतकात दुसऱ्या कुणीतरी बांधलं असा तो एकूण प्रकार आहे. त्यामुळे ह्या राजवाड्यात शिरलेला माणूस म्हणा, किंवा ढकलला गेलेला माणूस म्हणा, एकदा आत गेला की वाट चुकणार हे नक्की. पण असं जर असेल तर आत आलेल्या माणसाचं बोट धरून त्याला घेऊन जाणारा कुणीतरी वाटाड्या पाहिजे. हे काम मी करतो. आता हा वाटाड्या जितका निष्णात तितकी तो बिदागी जास्त मागणार हे साहजिक आहे. तर एकूण मी पुस्तकी उत्तर म्हणालो ते हे!

नंदिनी : थोडंसं पटलं, सर.

बॅरिस्टर : (हसत) तू चाणाक्ष आहेस हे मी केव्हाच हेरलेलं आहे. मलाही ते पुरतं पटलेलं नाहीच. पण शेवटी होतं काय की तत्त्व आणि व्यवहार यांची कुठेतरी तडजोड ही करावी लागते. ह्या मोटवानीबरोबर मी काव्यशास्त्रविनोद करत बसणार नाही, पण त्याच्याबरोबर काम करायचं म्हणजे मनातल्या मनात नाक धरून का होईना पण ते पार पाडावं लागतं. तेवढं मी करतो. तेव्हा एकूण मी काय म्हणतो नंदिनी, की हा आपला पैसेबाज पण भोळाभाबडा मोटवानी राजवाड्यात भरकटून हरवू नये इतकी दक्षता मी घेतो आहे. याबद्दल मला जी रीतसर बिदागी मिळते, त्यातला अल्पसा हिस्सा खर्च करून ही स्पॅनिश शेरीची बाटली मी विकत घेतली आहे. तुला ती चाखून बघायला हरकत नाही. आजच्या दिवसात तू खूप झुंजारपणा केलेला आहेस, तेव्हा आता थोडी चैन केलीस तर तुला कुणी बोल लावणार नाही.

नंदिनी : (चाखून बघते.) चव छान आहे! (पुन्हा चाखून बघते.) तुम्ही माझ्या सवयी बिघडवताय सर. अशा गोष्टी माझ्या पगारात मला परवडत नाहीत. (थांबून) लहान होते तेव्हा आमच्या घरी काही नव्हतं. वडिल लवकर गेले. आई साधी नर्स होती. तिचा सगळा वेळ काबाडकष्टांत जायचा. फार त्रासलेली असायची. तिची इच्छा होती मी मोठ्या घरात पडावं अशी. ही मी पत्रकार-बित्रकार झाले ना, ते काही तिला आवडलं नव्हतं सर. ती म्हणायची पोरीच्या जातीनं सासरचे गाकर भाजावेत. लष्करच्या भाकऱ्या भाजू नयेत. पण मला माझं काम आवडतं. खूप लोक भेटतात. खूप बघायला मिळतं.

बॅरिस्टर : पण अशी पोटात आग असलेली तुझ्यासारखी कुणीतरी आहे हे बघून बरं वाटतं. ती नसेल ना तर जगण्यात काही मजा नसते. माझी दोन्ही पोरं तशी नाहीत. तनयनं फार निराशा केली. अहोरात्र दारूच्या नशेत राहून वैफल्याच्या आहारी जाऊन उभ्या आयुष्याची माती करून घेतली. मन लावून कधी अभ्यास केला नाही की आईबापांनी तळतळून सांगितलेलं ऐकलं नाही. सबब काही नव्हती. सगळ्या सुखसायी होत्या, कुटुंबाचं प्रेम होतं. तुला सांगतो नंदिनी, यशस्वी माणसाच्या हृदयात सर्वात खोलवर रुतणारं शल्य कोणतं असेल तर ते म्हणजे पोटचा पोरगा नालायक निपजणं.

नंदिनी : असं म्हणू नका सर. त्याला समजून घेणारं कुणी मिळालं तर अजूनही तो यातून बाहेर पडू शकेल.

बॅरिस्टर : त्याला समजून घ्यायचा मी काही थोडा प्रयत्न केला का? पण नाही. बापाशी काही बोलायचं नाही, बापाला काही सांगायचं नाही असं जे एकदा त्याने एकतर्फी ठरवून टाकलं ते टाकलं. काय त्याच्या मनात चालत असतं काही कळत नाही.

नंदिनी : तुमच्यासमोर यायची त्याला लाज वाटत असेल सर.

बॅरिस्टर : असेलही तसं. त्याच्या भावना मी समजू शकतो कारण त्याला मुलगा म्हणायची मलाही लाज वाटते. पण जाऊ दे तो विषय. काही प्रश्न निधड्या छातीने तोंड देऊन सोडवायचे असतात, तर काही प्रश्न असे असतात की त्यांच्याकडे मुर्दाडपणे पाठ फिरवल्याखेरीज ते सुटत नाहीत. चल बेटा. उशीर झालाय. रावजीने तुझ्यासाठी गेस्ट बेडरूम तयार ठेवली असेल. छान आराम कर. मुळीच लवकर उठू नकोस. उद्या ब्रेकफास्टला भेटू.

नंदिनी : (शेरी पिऊन टाकत) Yes sir. Good night.

बॅरिस्टर : Good night, नंदिनी. (जाताना दोर खेचून झुंबरामधला दिवा विझवतात.)

(दुसऱ्या दिवशीची सकाळ. रावजी बटलरच्या वेशात आहे. सकाळी आलेल्या 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या अंकाला इस्त्री करतो आहे. बॅरिस्टर खुर्चीवर बसून एक जाडजूड ग्रंथ वाचताहेत. त्यांच्या अंगात सिल्कचा महागडा गाऊन आहे. तोंडात पाईप आहे. दाराच्या फ्रेममध्ये सावित्रीबाई आणि डॉक्टर दिसतात. डॉक्टर साठीचे आहेत. अंगात सफारी सूट आहे आणि गळ्यात स्टेथोस्कोप. हातात ब्रीफकेस. सावित्रीबाई साध्या साडीत आहेत.)

बॅरिस्टर : गुड मॉर्निंग डॉक्टर, या.

डॉक्टर : अहो, येणारच! रविवारी सकाळी बॅरिस्टर जातेगावकरांकडे ब्रेकफास्टला यायचं हा आमचा इतक्या वर्षांचा वहिवाटीचा हक्कच आहे मुळी! तेव्हा आम्ही येणारच. (बसतात.) मी काय म्हणतो की सरळ कूळकायदा लागू करून तुमच्या डायनिंग टेबलाची एका खुर्ची मी चक्क माझ्या नावे करून घेतो. बघा चालतं का! माई, इतकी वर्षं बॅरिस्टरांशी मैत्री असल्यामुळे कायद्यातल्या खाचाखोचा आम्हालाही थोड्याशा समजायला लागल्या! काय?! हो की नाही?

सावित्रीबाई : (बॅरिस्टरांना उद्देशून) मी डॉक्टरांना म्हटलं की सरांना एकदा तपासून घेतलेलं बरं. सुखाचा जीव दु:खात घालून उगीच तिकडे मुंबईला जायचं. तिथे कोडतात जाऊन तो डोमकावळ्यासारखा गाऊन पांघरायचा आणि बाकीच्या डोमकावळ्यांशी शिरा ताणून भांडायचं. अशानं मेलं ब्लडप्रेशर वाढलं तर काय घ्या.

डॉक्टर : तपासतो, माई, तपासतो. पण वकिल म्हणजे शेवटी दुसऱ्याचं ब्लडप्रेशर वाढवणारा माणूस. हे स्वत: आपले नामानिराळे राहणार. (दोन्ही दंडांचं ब्लडप्रेशर तपासतात.) मी काय म्हणतो माई, की कामगार संघाचा निकाल मनासारखा लागला हे ठीक झालं. पण मोटवानीची भ्रष्टाचाराची केस काही बरी चाललेली नाही. कितीही अंग घुसळलं तरी तो लेकाचा त्यात अडकणार. याचा परिणाम म्हणजे बॅरिस्टरांच्या डाव्या दंडातलं प्रेशर कमी झालेलं आहे आणि उजव्या दंडातलं वाढलेलं आहे! डाव्या आणि उजव्या! आलं की नाही लक्षात? झाला की नाही मर्मभेद?!

बॅरिस्टर : (माफक हसत) डॉक्टर, अहो विनोद राहू द्या. आम्ही केव्हा मरणार ते सांगून टाका एकदाचे. म्हणजे आम्ही सुटलो आणि आमचं कलत्रही सुटलं.

डॉक्टर : छ्या! तुम्ही कसले इतक्यात मरताय? ब्लडप्रेशर वगैरे सगळं नॉर्मल आहे. तुम्हाला काहीही झालेलं नाही आणि काळजीचं काही कारण नाही. पण एक सांगतो, तो पाईप थोडा कमी करा आणि वजनावर ताबा असू द्या. मटणबिटण बेताने खात जा.

बॅरिस्टर : काळजी नको. ते मी बेतानेच खातो. आता केस जिंकल्याप्रीत्यर्थ माथाडी कामगार संघवाल्यांनी काल रात्री आग्रह करकरून वाढलं तेव्हा त्यांचं मन मोडवेना. मग काय करणार? थोडंसं खाल्लं.

डॉक्टर : थोडंसंच खाल्लंत ना, मग हरकत नाही. शिवाय विजयानंद साजरा करायचा म्हणून थोडीशी स्कॉचपण घशाखाली उतरवून झाली असणारच. कबूल करा. झाली की नाही?

बॅरिस्टर : झाली ना. मी कुठे नाही म्हणतोय? आता इथेतिथे आम्ही थोडेसे देहाचे चोचले पुरवतो हे मान्य आहे. पण स्कॉच प्यायल्याचं पापक्षालन म्हणून तुमच्या माई आम्हाला कसले कसले कडू काढे पाजतच असतात.

डॉक्टर : त्या जे काही देतील ते डोळे झाकून पीत जा. कडू काढ्यामुळे संसाराचा गोडवा वाढत असेल तर काय हरकत आहे म्हणतो मी?!

(रावजी पेपर बॅरिस्टरांना देतो आणि खाकरतो.)

रावजी : सर, तुम्ही मुंबईला गेलात तेव्हापासूनची डाक अजून साचलेली आहे. बऱ्याच संभाव्य अशिलांची पत्रं आहेत. तुम्ही म्हणाला होतात की अजून काही महिने तरी प्रो-बोनो केसेस घ्यायच्या नाहीत म्हणून.

बॅरिस्टर : हो, ते बरोबर आहे. ह्या कामगार संघ प्रकरणात पुष्कळ श्रम झालेले आहेत. आणि शिवाय आमच्या बबडीला खरेदीसाठी एकदा मुंबईवारी घडवून आणायची आहे. तिथे गेल्यावर पप्पाला लाडीगोडी लावून ती त्याचा खिसा कापणार हे नक्की! एकूण काय तर थोडेफार पैसे मिळवणं हे आजच्या घटकेला अत्यंत गरजेचं आहे.

सावित्रीबाई : (डॉक्टरांकडे बघून हसत) बघा! काय पण आव आणताहेत! (यावर डॉक्टर 'चालायचंच' असा आविर्भाव करतात.)

रावजी : तुम्ही सूचना दिल्या होत्यात त्याप्रमाणे पाठवणाऱ्यांची आडनावं बघून पत्रांचं वर्गीकरण केलं आहे सर. लेले, आपटे आणि करंदीकरांची पत्रं केराच्या टोपलीत टाकली आहेत. श्रॉफ, मेहरा आणि डिसूझांची तुमच्या टेबलावर ठेवली आहेत. मे आय ब्रिंग टी, सर?

बॅरिस्टर : हो, घेऊन ये.

सावित्रीबाई : आणि देवाघरची फुलं कुठे आहेत? उठलीत की नाही? मला मेलीला एवढीच ऱ्हायमिंग स्लँग येते.

रावजी : नंदिनीताई आणि मधुराताई उठल्या आहेत. थोड्या वेळात खाली येतील. चिरंजीव खूप रात्रीपर्यंत जागे होते. ते अजून झोपले आहेत.

बॅरिस्टर : यात काय आश्चर्य?

सावित्रीबाई : तुम्ही त्याच्यावर सारखे धार धरू नका हो.

बॅरिस्टर : मी कुठे काय म्हणालो? धार धरायला तो समोर तर यायला हवा ना?

(अवघडलेली शांतता. नंदिनी येते. हिच्या अंगात फुलाफुलांचं डिझाईन असलेला रेशमी गाऊन आहे.)

सावित्रीबाई : (त्यांची नंदिनीकडे अर्धवट पाठ आहे.) बस मधुरा. (नंदिनीकडे बघून खळखळून हसत कपाळावर हात मारून घेतात.) अगं, तू आहेस होय! गाऊनमुळे फसलेच मी. छान दिसतोय गं तुला.

नंदिनी : हो, मला आवडला. (बसते. गाऊन स्वत:भोवती लपेटून घेते.)

सावित्रीबाई : झोप लागली का छान? कामगार क्रांतीची स्वप्नं नाही ना पडली?

नंदिनी : हो. नाही. म्हणजे हो, झोप छान लागली. पण स्वप्नं नाही पडली.

(नंदिनी बसते.)

सावित्रीबाई : मधुरा आली की सगळे ब्रेकफास्टला एकत्रच जाऊ.

नंदिनी : हो.

सावित्रीबाई : इतकं रोखून काय बघतेयस?

नंदिनी : बंदूक! (हसते.)

डॉक्टर : जे कुणी अशिल फी देणार नाही त्याला धमकावण्यासाठी बॅरिस्टरांनी ती अशी ढळढळीत समोर लटकवून ठेवली आहे. काय बिशाद आहे कुणी चुकारपणा करेल?!

(बॅरिस्टर ती भिंतीवरून खाली काढून नंदिनीच्या हातात देतात.)

बॅरिस्टर : ही कसली बंदूक आहे माहित आहे का नंदिनी? हिला म्हणतात पॅटर्न एटीन फिफ्टी थ्री एनफील्ड रायफल-मस्केट. नळीखाली पाहिलंस तर 34BNI अशी अक्षरं कोरलेली तुला दिसतील. सहा मे अठराशे सत्तावन्न रोजी इंग्रज सरकारने जेव्हा थर्टीफोर्थ बेंगॉल नेटिव्ह इन्फन्ट्री बरखास्त केली तेव्हा या बंदुकी कुठे कुठे विखुरल्या गेल्या. लंडनला एका ॲन्टीक डीलरकडे ही मला मिळाली. एका मोठ्या खटल्याची सगळी फी यात खर्ची पडली!

नंदिनी : नुसती हातात घेऊनच मनावर सावट येतं सर.

बॅरिस्टर : (हसतात) घाबरू नकोस, तिच्यात गोळी नाहीय.

(रावजी चहाचा ट्रे घेऊन येतो आणि टेबलावर ठेवतो.)

रावजी : इट्स ॲन एनचॅन्टिंग स्टोरी, मॅडम. याचं काडतूस म्हणजे एक कागदाचं निमूळतं आवरण असतं. दातानं त्याचं टोक फाडून काढायचं आणि आतली दारू बंदुकीच्या नळीत ओतायची. त्याच आवरणात एक शिशाची गोळी असते ती मागोमाग नळीत टाकायची आणि बंदुकीला लावलेली ही सळई आहे ती आत खुपसून गोळी घट्ट बसवायची. तर काय झालं की त्या कागदाला डुकराची आणि गाईची चरबी लावलेली आहे अशी सैन्यात अफवा पसरली. गाईची चरबी म्हणून हिंदू बिथरले आणि डुकराची चरबी म्हणून मुसलमान बिथरले. त्याचमुळे सत्तावन्नचं बंड झालं. मंगल पांडे हा थर्टीफोर्थ बीएनआयचाच होता मॅडम. त्याला फाशी दिला आणि त्याची अख्खी रेजिमेंट बरखास्त करून टाकली. इट वॉज डिसऑनरेबली डिसबँडेड! सगळ्या शिपायांच्या बंदुकी काढून घेऊन त्यांना घरी हाकलून दिलं. सरांनी ही विकत घेतली तेव्हा त्याबरोबर काडतूस मात्र नव्हतं. कसं असतं ते मला एकदा पाहायचं आहे. इट इज द गन विच इग्नायटेड द ग्रेट सिपॉय म्यूटिनी.

(नंदिनी बंदूक रावजीकडे परत देते. ती रुमालाने नीट पुसून तो पुन्हा भिंतीवर लावून ठेवतो. मधुरा येते.)

मधुरा : सॉरी पप्पा, उशीर झाला.

बॅरिस्टर : Never mind, my girl ! बस, चहा घे.

(मधुराचा आणि नंदिनीचा रेशमी गाऊन खूपच एकमेकांसारखे आहेत. मधुरा नंदिनीशेजारी येऊन किंचित अवघडून बसते.)

मधुरा : गाऊन फार गोड दिसतोय गं तुला.

(नंदिनी लाजून हसते.)

डॉक्टर : तुला सांगतो नंदिनी, उशीर करणं ही मधुराची जुनीच सवय आहे. तनय झाला त्यानंतर बॅरिस्टर आणि माई दोघेही वाट बघून थकले, पण आमची मधुराणी काही येईना. सरांना काळजी वाटायला लागली की बंगल्याचं नाव 'तमसा' ऐवजी 'तसा' ठेवावं लागतं की काय! म्हणजे आजूबाजूचे म्हणणार की आमचा बंगला असा तर यांचा 'तसा'. काय?! झाला की नाही मर्मभेद?! शेवटी सहा वर्षांनी एकदाची आली आणि सगळ्यांना हुश्श झालं! तर सांगायचा मुद्दा काय की उशीरा येणं ही तिची जुनीच सवय आहे.

मधुरा : डॉक्टर, you are sometimes so silly! आता उशीरा तर उशीरा. आले की नाही मी शेवटी? पण तन्या कुठे आहे?

(अवघडलेली शांतता.)

सावित्रीबाई : अगं, त्याला भूक नाहीय म्हणाला. आपण कशाला त्याच्यासाठी खोळंबून राहायचं? आपण आपली खळगी भरून घेऊ. काल रात्री जागून मी अळवाचे लाडू केलेत, त्यातला एकेक मिळणार आहे प्रत्येकाला.

डॉक्टर : मग उशीर कशाला? चलूयाच! रावजी, ब्रेकफास्टचा बेत आपला नेहमीचाच ना?

रावजी : हो डॉक्टर. खिचडी आणि केजरी.

नंदिनी : केजरी? म्हणजे काय?

सावित्रीबाई : अगं, तो नुसता अगोचरपणा आहे. त्याचं काय आहे तुला सांगते. आपल्याकडचे लोक खूप आधीपासून मुगाच्या डाळीची खिचडी खायचे. टोपीकर हिंदुस्तानात आले तेव्हा त्यांना आमचं सुख बघवेना. म्हणून त्यांनी खिचडीचा विचका केला. त्यात आधी हाडूक टाकलं आणि वरून उकडलेली अंडी कुस्करून टाकली. पण इतकं करून समाधान होईना म्हणून नावाचा विचका केला. आता दाईचं दूध प्यायले म्हणून काय ह्यांना खड्ड्यातला ख, चरकातला च आणि डग्ग्यातला ड म्हणता येणार आहे? म्हणून मग खिचडीचं झालं केजरी.

नंदिनी : हे हाडूक म्हणजे कसल्या प्राण्याचं असतं?!

मधुरा : नाही गं. आमची मम्मा ना पूर्ण घाटी आहे. हाडूक कसलं आलंय? त्यात हॅडक मासा असतो. फार मस्त लागते केजरी. तू आज खाऊन बघ. माझ्याच शेजारी बसायचंस तू.

नंदिनी : बरं बाई!

बॅरिस्टर : चला तर. (सगळे जायला निघतात.)

रावजी : फॉर युअर काइंड परयूजल, नंदिनी मॅडम..

(नंदिनीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटतं.)

रावजी : सर कॉलिन कॅम्पबेल सरांनी सत्तावन्नच्या बंडावर फार चांगलं पुस्तक लिहिलंय मॅडम. गेस्ट बेडरूमच्या टेबलवर मी कॉपी ठेवतो. जरूर वाचून बघा. काडतुसाला लावलेल्या चरबीचं प्रकरण चौथ्या पानावर आहे. पेज फोर.

नंदिनी : पेज फोर?

रावजी : येस मॅडम. जरूर वाचून बघा.

क्रमशः

अंक दुसरा, अंक तिसरा

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुढचे भाग वाचायचे आहेत. पण अर्धं वाचल्यावर वर जाऊन लेखकाचं नांव 'बाळ कोल्ह्टकर ' तर नाही ना, याची खात्री करुन घेतली. पुढच्या अंकापर्यंत तनय आमच्यावर दुर्वांच्या जुड्या फेकणार नाही अशी अपेक्षा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हसवण्यासाठी कानडी वळणाने मराठी बोलणारं एक पात्र, आणि इतर वातावरण. बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0