मुंबई कुणाची?

मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
लढणाऱ्यांची की लुटणाऱ्यांची?
मुंबई कुणाची ?

बकाल झोपड्यांची की गगनचुंबी सोसायट्यांची
किनाऱ्यावरच्या आगरी कोळ्यांची की शेठ लोकांची
फसवलेल्या कामगारांची की धूर्त कारखानदारांची
मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
कष्टकऱ्यांची की लुबाडणाऱ्यांची?
मुंबई कुणाची ?

गोरगरीब भैय्यांची की खंगलेल्या भूमिपुत्रांची
अलिशान बंगल्यांची की जीर्ण झालेल्या चाळींची
झगडणाऱ्या कलाकारांची की मुजोर घराण्यांची
मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
विस्थापितांची की प्रस्थापितांची?
मुंबई कुणाची ?

बुजलेल्या मध्यमवर्गीयांची की फुगीर उच्चभ्रू वर्गांची
बरबटलेल्या नाल्यांची की गजबजलेल्या वस्त्यांची
विस्तारलेल्या पश्चिमेची की पसरलेल्या पुर्वेची
मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
व्हेजवाल्यांची की नॉनव्हेजवाल्यांची?
मुंबई कुणाची ?

गब्बर गुंतवणूकदारांची की लढवय्या संघटनांची
कोंडलेल्या घरांची की गुर्फटलेल्या कुटुंबांची
विदीर्ण जंगलांची की आत्ममग्न उपनगरांची
मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
महत्वकांक्षांची की अपेक्षाभंगांची
मुंबई कुणाची ?

कीर्द कल्लोळ्ळाची की कोंदट वातावरणाची
लब्बाड आश्वासनांची की कर्कश भूलथापांची
उपऱ्या लोंढ्यांची की घाटावरल्या माणसांची
मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
फसवणाऱ्यांची की फसलेल्यांची
मुंबई कुणाची ?

उर्मट कार्यकर्त्यांची की उद्धट पुढाऱ्यांची
अट्टल भांडवलदारांची की कृश समाजवाद्यांची
करपलेल्या अस्मितांची की चिघळलेल्या जखमांची
मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
एकल भाषिकांची की बहुभाषिकांची
मुंबई कुणाची ?

निगरगट्ट ठेकेदारांची की बनेल मध्यस्थांची
प्रशासकीय अधिकाऱ्यांची की राजपत्रित बाबूंची
केविलवाण्या निषेधांची की उग्र आंदोलनांची
मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
संप करणाऱ्यांची की बंद करणाऱ्यांची
मुंबई कुणाची ?

दर्जेदार सेवासुविधांची की तुंबलेल्या गटारांची
कष्टाच्या घामाच्या धारांची की रक्तरंजित संघर्षांची
भैसाटलेल्या नेत्यांची की भरकटलेल्या मंत्र्यांची
मुंबई कुणाची गं बाई कुणाची?
राडा संस्कृतींची की ऐतिहासिक वारश्यांची
मुंबई कुणाची ?

मुंबई सगळ्यांचीच...
हाल-अपेष्टा, सुख-दुःख, स्वप्न, ईच्छा-आकांक्षा
उराशी बाळगून अहोरात्र अजस्र महानगरी चालवणाऱ्यांची...
जीवाची मुंबई करणाऱ्यांची...
मुंबई देशाची... मुंबई महाराष्ट्राचीच...!

© भूषण वर्धेकर,
२० नोव्हेंबर २०२०,
दौंड

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ह्याचे मुंबई हे उत्तम उदाहरण आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0