खिडकी

क्षितिजावरचा
निळसर पर्वत
कातळमाथा
ढगात घुसळत
भूशास्त्राला
कोडी घालत
खोल ठेऊनी
लाव्हा धुमसत
पुरातनाचे
सूक्त गुणगुणत

नभरेषेवर
उंच उसळुनी
दिसे अनाहूत माझ्या खिडकीत

निळे पाखरू
पहाटफुटणीत
पंखभिजवत्या
दवास झटकत
चोच मुलायम
पिसात फिरवीत
पंखांतील
अचपळ बळ जोखीत
साद घालुनी
अधीर, अवचित

नभांगणाला
उभे छेदुनी
उतरे अलगद माझ्या खिडकीत

आखीव रेखीव
खिडकी चौकट
निळ्या नभाचा
कापुनी आयत

इंद्रजाल
निळसर पसरवुनी
जड चेतन द्वैताला मिटवीत

field_vote: 
0
No votes yet