वाचनसंस्कृती बद्द्ल श्री. राम जगताप यांचा लेख

श्री. राम जगताप यांच्या ब्लॉगचा (http://ramjagtap.blogspot.in/) उल्लेख मी आधीही एका लेखात केलेला आहे. लेखन/वाचन संदर्भातले, मराठीतली नवनवीन चांगली पुस्तकं , या संदर्भातली जगतापांची मतं, त्यांचे विचार या सार्‍याचं प्रतिबिंब त्यात पडत असतं.

प्रस्तुत लेखाचं कारण म्हणजे जगतापांचा वाचनसंस्कृतीबद्दलचा अलिकडचा लेख. लेखाचा दुवा : http://ramjagtap.blogspot.in/2012/04/blog-post_22.html.

लेख वाचून झाल्यावर श्री. जगताप यांना प्रतिसाद लिहायला घेतला; परंतु ब्लॉगर या साईटवरील अक्षरसंख्येच्या मर्यादेमुळे तो टाकता आलेला नाही. तोच इथे देतो आहे. ऐसीअक्षरेवरील वाचकांनी मूळ लेख आणि माझा प्रस्तुत प्रतिसाद वाचून या निमित्ताने आपली मतं मांडावीत अशी माझी आशा आहे.

माझा प्रतिसाद :
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वप्रथम एका उत्तम टिपणाबद्दल अभिनंदन.

प्रस्तुत लिखाण विस्तृत आहे आणि अनेक चांगले मुद्दे आहेत. एकेका मुद्द्याचा परामर्श जमेल तसा घ्यावा म्हणतो.
१. इपुस्तके ही छापील पुस्तकांच्या मुळावर आलेली आहेत काय ? आणि तशी आलेली असल्यास वाचन-लेखन संस्कृतीच्याच मुळाशी आलेली आहेत काय ?

तुम्ही म्हणल्याप्रमाणे, वाचनसंस्कृतीच्या बाबतीत जगबुडी आली आहे असं मानण्यात काही अर्थ नाही. संगीत आणि चित्रपट आदि गोष्टी अधिकाधिक लोकांपर्यंत जशा गेल्या दशकांमधे पोचल्या तेच सूत्र इथे लागू होतं. अधिकाधिक लोकांना वाचनाच्या कक्षेत सामावून घेण्याच्या बाबत हे तंत्रज्ञान परिणामकारक ठरणार यात शंका नाही. परंतु नवे तंत्रज्ञान जसं नव्या गोष्टी आणतं आणि (मुख्य म्हणजे) वापरण्याची/आस्वादाची प्रक्रिया सोपी करतं त्याचवेळी काही जुन्यातल्या चांगल्या गोष्टी जातात सुद्धा. उदा. पुण्यातल्या एका प्रसिद्ध पुस्तकालयाच्या कायमच्या बंद पडण्यावरून झालेली ही चर्चा पहा. यात "फ्लिपकार्ट उत्तम आहेच परंतु जी व्यक्तीगत संवादाची आणि मुख्य म्हणजे एखाद्या विषयातली अगदी दर्दी . मार्मिक पुस्तकं त्यात नाहीत - निदान अजून तरी नाहीत" या स्वरूपाची मत माझ्यामते परिस्थितीचं उत्तम चित्रण करतात. तस्मात् बदल घडताना जुनं जाणार आणि जुन्यातलं सर्वकाही त्याज्यच असेल असं नाही.

तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर अधिकाधिक लोकांना सामावून घेण्याच्या संदर्भातला तुमचा मुद्दा शिरोधार्यच आहे; परंतु एकंदर लोकांची रुची बदलत असण्याची आणि नवीन पिढीतले वाचक वाचनसंस्कृतीमधे सामील होण्याची प्रक्रिया निरनिराळ्या देशाप्रदेशांमधे विभिन्न स्वरूपाची आहे हा एक मुद्दा आहेच. माझ्याकडे नक्की आकडेवारी नाहीच परंतु सामान्यपणे असं मानलं जातं की प्रगत देशांमधली पीढी वेबब्राऊजिंग , व्हिडिओगेम्स, टीव्ही या स्वरूपाच्या साधनांकडे आकर्षित अधिक होते आणि टक्केवारीने पहायला जाता, नवीन पीढीतला कमी कमी टक्का पुस्तकांकडे वळतो असं दिसतं. हेही होणं नैसर्गिकच आहे; परंतु माझा मुद्दा असा की भारतीय/मराठी संदर्भातला या बाबतचा ट्रेंड हा प्रगत देशांमधल्या ट्रेंड्पेक्षा वेगळा असू शकतो. भारत हा "इमर्जिंग इकनॉमी" म्हणून पाहिला जातो आणि त्यात भारताच्या (अनेक शतकं मागे असलेल्या) अर्थव्यवस्थेने केलेल्या प्रगतीबरोबरच , भारतातली तरुणांची संख्या ही टक्केवारीने जास्त असल्याचा भागही मानला जातो. या अर्थाने भारतातले अधिकाधिक तरुण लोक वाचनसंस्कृतीच्या कक्षेत येतात असं (ढोबळमानाने) आपल्याला म्हणता येईल ; परंतु प्रगत देशांमधल्या तरुण पिढीमधे संख्येच्या बाबत हा ट्रेंड दिसेलच असं नाही. थोडक्यात वाचनाची साधनं - यात इपुस्तकं आलीच - याबाबतचे आडाखे देशकालस्थितीनुसार थोडे वेगवेगळे आहेत. तुमच्या मूळ मुद्द्याशी सहमती देऊनही हे म्हणता येईल.

२. >>>> या लेखक मंडळींचं जगाबद्दलचं आकलन नेहमीच अपुरं राहिलेलं आहे. त्यांना व्यापक परिप्रेक्ष्यात पाहता येत नाही आणि सामग्य्रानं विचारही करता येत नाही. ते कथा-कादंब-यांमध्ये स्वत:च्या, शेजा-याच्या, आजूबाजूच्या इतर पन्नास लोकांच्या अनुभवांची सरमिसळ करतील. त्यातून एक व्यापक चित्र मांडण्याचा त्यांचा दावा असतो, पण त्यात घटना (Fact), वास्तव (Reality) आणि सत्य (Truth) यांची सरमिसळच जास्त असते. त्यांना एकेका व्यक्तीचा सुटासुटा विचार करता येतो, पण अनेक व्यक्तींचा एकसमयावच्छेदेकरून विचार करता येत नाही. शिवाय कुठल्याही एका व्यक्तीच्या अनुभवाला मर्यादा असतात आणि कुठल्याही एकाच व्यक्तीच्या अनुभवाचे सामाजिक सिद्धांत होत नसतात. पण यादृष्टीनं सर्जनशील लेखकांनी स्वत:ला विकसित केलेलं नसतं. त्यामुळे आपले वैयक्तिक अनुभव किंवा इतरांचे तसेच अनुभव घेऊन त्यावरून ते निष्कर्ष काढतात. <<<<<

वरील भाग मला मनोज्ञ वाटला. शतकानुशतके विकसित होत असलेल्या साहित्याच्या व्यवहाराला एकाच एका तागडीत तोलणं आता प्रायः अशक्य आहे. या संदर्भातल्या कुठल्याही विषयाचं आकलन हे एकाच घासामधे घेता येणं म्हणजे दिवास्वप्न आहे. या व्यवहाराच्या अनेक मिती आहेत आणि एखाद्या व्यक्तीने - वाचक म्हणून किंवा लेखक म्हणून - सामग्र्याचा दावा करणे शक्य नाही. तुम्ही हा मुद्दा चांगला विशद केलेला आहे.

३. >>> चांगल्या जगण्याचा सतत युटोपिया करत राहणं ही मानवी जगण्याची मूलभूत प्रेरणा आहे. माणसं जन्माला येतात ती का? आणि मरतात ती का? या प्रश्नाची उत्तरं अजून वैज्ञानिक कसोट्यांवर शोधली जायची बाकी आहेत. तोपर्यंत जन्माला येणा-या, जन्मलेल्या माणसांनी काय करायचं? तर त्यांनी चांगल्या जगण्याचा युटोपिया करत राहायचा. ते काम नेहमी साहित्यानं केलं आहे. आणि त्याला वास्तवाचा, इतिहासाचा, भूगोलाचा, तर्कनिष्ठ विचारांचा आणि वैज्ञानिक प्रगतीचा आधार देण्याचं कामही साहित्यानंच केलेलं आहे. <<<

इथे मात्र तुम्ही काहीसं सरसकटीकरण केलेलं आहे का अशी एक शंका मला चाटून गेली. "चांगल्या जगण्याचा सतत युटोपिया करत राहणं ही मानवी जगण्याची मूलभूत प्रेरणा आहे" म्हणजे नेमकं काय ? "जगण्यातील बर्‍या वाईट गोष्टींचे निरनिराळ्या संदर्भातले निकष पुनःपुन्हा तपासून पहाणे, नवनवे आयाम शोधणे ही एक महत्त्वाची प्रेरणा आहे" हे विधान मी समजू शकतो परंतु तुमच्या विधानामधे तुम्हीच ज्याकडे बोट दाखवलेले आहे असा एकारलेपणा आहे असं मला वाटलं खरं.

४. >>>एकदा का हे समजून घेण्याच्या प्रयत्न केला तर बरेचसे प्रश्न सोपे होतील. मग वाचनाच्या बागुलबुवाला आपण आता घाबरतो तसं घाबरणार नाही. कारण तंत्रज्ञानानं कितीही नेत्रदीपक प्रगती केली तरी ते ज्ञानाला पर्याय होऊ शकणार नाही, होऊ शकत नाही, हे जाणून घेण्याची गरज आहे. आणि माहिती-ज्ञान मिळवण्याचा अजूनही सर्वात सोयीचा आणि निधरेक मार्ग पुस्तकंच आहेत. त्यामुळे प्रत्येकानं आपल्याला जमेल तसं, जमेल तितकं आणि जमेल तेव्हा वाचन केलंच पाहिजे. पुस्तकांच्या वाचनाशिवाय निदान सध्या तरी माणसाला सद्गती नाही. <<<

इथे बहुदा तुम्ही बॅलन्सिंग अ‍ॅक्ट केलेला दिसतो. "पुस्तकं ही महत्त्वाची परंतु ती साध्य नव्हेत तर साधनं आहेत, आणि जशी पुस्तकं आहेत तशी अन्य साधनंही असू शकतात, त्यांचंही महत्त्व आहे. मात्र पुस्तकांचा - पर्यायाने ज्ञान वेचण्याचा - मार्ग जो आहे त्याला पर्याय नाही" असा एकंदर मुद्दा असावा असं मी धरतो. चूभूद्याघ्या.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

मुळचा ब्लॉग ऑफीसमधे ब्यान असल्याने मुळात ब्लॉग वाचलेला नाही मात्र तुमच्या र्पतिसादावरून अंदाज केला आहे. यावर मत मागे एका चर्चेत दिले होते ते बरेचसे तसेच आहे:

माझ्यापुरता/माझ्यासारख्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला उत्तर "छे छे, कागदी-छापिल पुस्तकांचा अंत नजीकच्या काळात होणारच नाही" असे लगेच वाटावे. मात्र जरा विचार करता, नव्या पिढीकडे बघता हा विचार अजुन किती वर्षे करता येईल याची शंका मनात येते. काळाचा रेटा इतका जबरदस्त असतो की केवळ एखाद्या पिढीला किंवा काहि पिढ्यांना एखाद्या गोष्टीची सवय आहे म्हणून ती टिकून राहिल असे मानणे हा कल्पनाविलास म्हणावा लागेल. एखादी वस्तू/कल्पना किंबहुना काहीही टिकण्यासाठी त्याच्या सवयी सोबत त्याचे 'आर्थिक' मुल्यमापनही महत्त्वाची भुमिका बजावते. पुस्तकांमधेही जोपर्यंत इ-बुक्स वाचायची सोय सोपी नाहि व/ अथवा खर्चिक आहे तोपर्यंत कागदी पुस्तके ही आर्थिक दृष्ट्या ग्राहकाला आणि म्हणूनच प्रकाशकाला परवडतात / परवडतील.

जेव्हा ही पुस्तके वाचायची साधने अधिक सोपी(सुलभ) आणि परवडण्याजोगी होतील तेव्हा जुन्या पद्धती आपोआप 'महाग' होतील व केवळ 'हौस' किंवा 'प्रेस्टीज' म्हणून जिवंत रहातील. माझ्यामते पुढेही कागदी पुस्तके छापली जातील. मात्र त्यांची संख्या अगदीच कमी आणि किंमत अतिशय जास्त असेल. कागदी पुस्तक असणे हे 'श्रीमंतीचे' लक्षण होऊन, मोठाल्या पार्ट्यांमधे श्रीमंत स्त्रिया पर्समधे एखादी पेपरबॅक आवृत्ती आवर्जून ठेवताना आढळतील Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>मुळचा ब्लॉग ऑफीसमधे ब्यान असल्याने मुळात ब्लॉग वाचलेला नाही<<

हाच लेख 'प्रहार'दैनिकाच्या रविवार पुरवणीत आला होता. इथे पाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>>टीव्हीमुळे पुस्तक वाचनावर फारसा काही परिणाम झाल्याचं दिसत नाही. उलट दिवसेंदिवस पुस्तकांचा खप वाढतच आहे. <<

माझ्या मते खप हा एक निकष होऊ शकेलही, पण तो एकमेव निकष नसावा. टीव्हीसारख्या माध्यमामुळे चटपटीत गोष्टींची सवय झाली आणि संथ, गंभीर गोष्टी नकोशा वाटू लागल्या असं झालेलं असू शकेल. ते तपासायला हवं.

>>न्यूज चॅनेल्स आणि वर्तमानपत्रं ही एकमेकांना पूरकच ठरली.<<

>>टीव्ही, इंटरनेट, न्यूज चॅनेल्स, वर्तमानपत्र यापैकी कुठल्याही माध्यमानं पुस्तकांचं नुकसान केलेलं नाही. उलट ती अंतिमत: पुस्तकांना पूरकच ठरली आहेत. कारण माहिती-मनोरंजनाचं तंत्र या माध्यमांनी अधिकाधिक सोपं करण्याचं काम केलं.<<

याचा निकाल अजून लागलेला नाही. परदेशात जिथे इंटरनेट सहज उपलब्ध आहे तिथे वर्तमानपत्रं गोते खात आहेत. भारतीय वर्तमानपत्रं चांगली खपत असतील तर त्यामागे त्यांनी स्वतःचं केलेलं बाजारीकरण हा (तंत्रज्ञानाच्या अनुपलब्धतेखेरीज) आणखी एक घटक नक्कीच असावा. मराठीत प्रकाशित होणार्‍या दर्जेदार पुस्तकांविषयी माहिती आज वृत्तपत्रं किंवा टीव्हीवर जवळजवळ अजिबात मिळत नाही. त्यासाठी साहित्यविषयक नियतकालिकांचा आधार घ्यावा लागतो. २० वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती.

>>लेखक मंडळींचं जगाबद्दलचं आकलन नेहमीच अपुरं राहिलेलं आहे. त्यांना व्यापक परिप्रेक्ष्यात पाहता येत नाही आणि सामग्य्रानं विचारही करता येत नाही.<<

>>सुखात्मिका आणि शोकांतिका याच दोन परिघात ते साहित्याची मांडणी करतात.<<

>>वाचक म्हणून प्रगल्भता गाठायची असेल तर कथा-कादंब-या-कविता यांच्यापासून शक्य तेवढं लांब राहिलं पाहिजे.<<

ही फार सरसकट विधानं आहेत. त्यामागे जागतिक साहित्याचा व्यापक परिप्रेक्ष्य आहे असं वाटत नाही.

सध्या एवढंच. आणखी मुद्दे नंतर मांडेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

योग्य शब्दांत मत मांडायचा बराच व्यायाम वाचवल्याबद्दल आभार. तुमच्या आणखी मुद्द्यांच्या प्रतीक्षेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>>तुमच्या आणखी मुद्द्यांच्या प्रतीक्षेत!<<

जर चर्चा अधिक रंगली तर आणखी मुद्दे टाकेन Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

>जर चर्चा अधिक रंगली तर आणखी मुद्दे टाकेन (डोळा मारत)

हे म्हणजे अजुन चांगले कपडे दाखवा म्हणजे अजुन काहीतरी मोठी बरणी अथवा बाउलचा सेट देईन असे म्हणणारा एखादा भोवारी (कपडे घेउन भांडी देणारा भोहारी का बोहारीच ना?) आठवला..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगण्यातल्या अनेक गोष्टींत 'मार्गदर्शन' मिळालं की वाटचाल सोपी होते हे सुद्धा एक गृहितक आहे - ते कधी बरोबर निघतं तर कधी नाहीही. अनेक गोष्टी स्वतः शोधण्यात गंमत असते - त्यात झालेल्या चुकांतूनही! आणि माझ्या मते काय वाचावं हे ठरवता येत नाही - ते कळत जात. ते 'कळण' महत्त्वाचं असत - आजच कळणं उद्या अयोग्य ठरतं अनेकदा तरीही. शिवाय 'आपण का वाचतो' हा प्रश्नही आहेच. 'प्रगल्भ होणं' हे त्याच उत्तर असेल तर मार्गदर्शक उपयोगी ठरतील कदाचित - पण उत्तर वेगळं असेल तर?

(हा प्रतिसाद त्याच ब्लॉगवरच्या पुढच्या लेखावर आहे. तो काढून कसा टाकायचा हे माहिती नाही. संपादकांनी तो काढून टाकावा ही विनंती.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखाचा सूर पुस्तक-वाचनासंदर्भात थोडा पेट्रनायझिंग वाटतो. पुस्तकांना पर्याय नाही हे मान्य असलं तरीही टीव्ही, चित्रपट, इंटरनेट यांना पर्याय आहे का? आणि पुस्तकं हे पण एक प्रकारचं तंत्रज्ञानच नाही का?

जंतू, अलिकडच्या काळात एक ग्राफ पाहिला होता (बहुदा सीएनेनच्या संस्थळावर; लिंक शोधते आहे). २००१ पासून ज्या प्रकारच्या व्यवसायांमधे सर्वाधिक वृद्धी आणि घट होते आहे त्यांची यादी होती. छापील वर्तमानपत्रांचा धंदा सर्वाधिक बसलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>>पुस्तकं हे पण एक प्रकारचं तंत्रज्ञानच नाही का? <<<

या न्यायाने कुठलीही निर्जीव मानवनिर्मित वस्तू हे तंत्रज्ञानच आहे. एका अर्थाने मानव हा प्राणीच आहे. एका अर्थाने सर्व विधाने सत्यच आहेत Smile

असो. गंमत वगळली तर : चर्चा एकंदर लेखनवाचन व्यवहाराबद्दल आहे प्रस्तुत वाक्य या संदर्भात फारसं अर्थपूर्ण नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

शिलालेख --> भूर्जपत्र --> खलिते --> छापिल पुस्तके --> डीजिटल आवृत्त्या असा प्रवास डोळ्यासमोर घेतला, तर हा विचार पोहोचवायच्या तंत्रज्ञानचाच प्रवास या अर्थाने अदितीला पुस्तकांना तंत्रज्ञान म्हणायचे असावे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

यात पुस्तके मुखोद्गत करणे हा ही एक टप्पा मानता येईल.
पुस्तकाला तंत्रज्ञान म्हणणे यात स्वस्त छपाई या तंत्रज्ञानाचा संबंध आहे. हा मुद्दा या चर्चेसंदर्भात मांडला कारण तंत्रज्ञानामुळेच पुस्तकं सामान्यांपर्यंत सहजपणे पोहोचत आहेत. आणि माझा आक्षेप पुस्तकं वाचणंच अजूनही सर्वात महत्त्वाचं आहे, त्यातूनच काय ती माहिती मिळते अशा प्रकारच्या पेट्रनायझेशन आहे. एकेकाळी काशीला जाणं दिव्य समजलं जायचं त्याच्याशी तुलना करता पुस्तकात लिहीलेले व्हेनेझुएला आणि केन्या इथे जाणं फार कठीण नाही.

एकेकाळी पुस्तकांनी माहिती प्रसाराचं महत्त्वाचं काम केलेलं आहे. पण आता हे थोडं जुनं तंत्रज्ञान आहे. इंटरनेट (यात ब्लॉग्ज, पॉडकास्ट, व्हीडीओकास्ट इ आले), टीव्ही, चित्रपट, हे तंत्रज्ञान आता अधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे. अजून काही वर्षांनी ३-डी प्रिंटर्स घरांघरांत दिसतीलही, कोणास ठाऊक!
पाश्चात्य देशांमधे व्हीसीडी हा प्रकार फारसा चाललाच नाही. व्हीडीओ टेप्स ते डीव्हीडी असाच प्रवास झाला. भारतात कदाचित छापील पुस्तकांचा खप फार न वाढता कदाचित तंत्रज्ञानातून माहिती/लेखन मिळवणं सामान्य असेल.

कथा, कादंबर्‍या वाचण्याबद्दल जंतूशी सहमत. त्यानेच लिहीलेला हा लेख आठवला.

अन्य व्याख्येअभावी मानवनिर्मित सर्व यंत्रांना तंत्रज्ञानच समजलं जातं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

राम जगताप, मुंबई
सर्वप्रथम मी मुक्तसुनीत यांचा आभारी आहे. त्यांनी माझ्या लेखाविषयी आपली सविस्तर प्रतिक्रिया लिहिली आहे. शिवाय ती माझ्या ब्लॉगवर टाकता न आल्यानं इथं टाकून त्यावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर काहींनी आपापल्यापरीनं चर्चाही केली आहे. ही कुठल्याही लेखकाला समाधान देणारी, त्याचा अहम सुखावणारी गोष्ट आहे.
आता माझ्या लेखाकडे वळू. `पुस्तकांचे शत्रू आणि वाचनाचा बागुलबुवा' या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं लिहिलेल्या लेखात मी काय काय मांडायचा प्रयत्न केला आहे? लेखाच्या शीर्षकावरून दोन गोष्टी सूचित होतात. त्या म्हणजे पुस्तकाचे शत्रू आणि वाचनाचा बागुलबुवा या संदर्भातील. या लेखाची सुरुवात मी जागतिकीकरणानं कोणत्या क्षेत्रावर बदल केले आहेत, याचा नामोल्लेख करत संगीताच्या तंत्राबाबतच्या बदलांचा थोडा सविस्तर आढावा घेतला आहे. त्यानंतर चित्रपटांचा. शेवटी एकंदर तंत्रज्ञानाविषयी, `म्हणजे तंत्राची ताकद आंधळी असते. तिला चांगलं-वाईट यांच्याशी देणंघेणं नसतं. ते वरदान नसतं तसंच शापही नसतं. तुम्ही त्याचा कसा वापर करता, त्यावर ते अवलंबून असतं ' असं भाष्य करून मग पुस्तकाकडे वळलो आहे. संगीतासारखा तंत्रज्ञानाचा बदल पुस्तकाच्या बाबतीतही झाला असला तरी सध्या छापील पुस्तकाचा जो फॉर्म आहे, त्याविरोधात या तंत्रज्ञानानं कुठलंच तगडं आव्हान उभं केलेलं नाही, असं म्हटलं आहे. म्हणजे पुस्तकाचं छापील स्वरूप तेच राहून त्याच्या छपाई, निर्मिती, विक्री, वितरण यातच मोठय़ा सुधारणा झाल्याचं म्हटलं आहे. आता इ-बुक रीडर हे पहिल्यांदा छापील पुस्तकाचा शत्रू म्हणून उभा केला जात आहे, याचं सूतोवाच करून त्याविषयी फारसं काहीही भाष्य न करता याआधी कुणाकुणाला पुस्तकाचे शत्रू म्हणून उभं करण्यात आलं, याचा टीव्ही, संगणक, इंटरनेट, वर्तमानपत्रांच्या रविवार पुरवण्या आणि न्यूज चॅनेल्स यांचा थोडक्यात परामर्श घेतला आहे. इथं मात्र मी फारशी उदाहरणं, आकडेवारी न देता थेट भाष्य केलं आहे. कारण मी स्वत: हा काळ डोळसपणे पाहिला आहे. याच काळात माझी जडणघडण झाली आहे. म्हणजे हा मी प्रत्यक्ष जगत असलेला काळ आहे. त्यामुळे त्याविषयी थेट भाष्यच करणं मला अधिक संयुक्तिक वाटलं.
नंतर `मग आता पुस्तकांचं भवितव्य धोक्यात वा वाचनाला ओहोटी अशी हाकाटी का होते? तर काही लोक मुळातच तंत्रशरण असतात. उपयुक्ततेचा पुरस्कार करण्यातून ते तंत्राच्या आहारी जातात. त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात आणि इतरांना त्यातून ‘गिनीपिग’ मिळतो. पण या दोन्ही गोष्टी तात्पुरत्या असतात. कारण नवं तंत्र आलं की, हे लोक आधीचं टाकून नव्याचा स्वीकार करतात. आता लेखनासाठी किती लोक टाइपरायटर वापरत असतील, या एका उदाहरणावरून याचा अंदाज येईल. मग या हाकाटीला जबाबदार कोण? ' असं लिहून पुस्तकांच्या हाकाटीला पत्रकार आणि सर्जनशील लेखक कसे सर्वाधिक जबाबदार आहेत, याचा परामर्श घेतला आहे. सर्जनशील लेखकांना थोडं फैलावरही घेतलं आहे. सर्जनशील लेखकाविषयी मी मांडलेले मुद्दे सर्वांनाच पटतील असे नाहीत, याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यावर मतैक्य होण्याऐवजी मतभेदच जास्त होण्याची शक्यता आहे, याचीही मला पुरेपूर जाणीव आहे. इथं एका वाचकाने लिहिले आहे की, ` ही फार सरसकट विधानं आहेत. त्यामागे जागतिक साहित्याचा व्यापक परिप्रेक्ष्य आहे असं वाटत नाही.' पण या प्रश्नापेक्षा मी या निष्कर्षावर का आलो? आणि कसा आलो? असा प्रश्न विचारला गेला असता तर तो मला अधिक आवडला असता. या वाचकाच्या प्रश्नात माझा सरळ सरळ अधिक्षेप होतो आहे, याची जाणीव ठेवली गेलेली नाही. पण मी काही रागावलेलो नाही. कारण बहुतेकदा प्रतिक्रिया अशाच स्वरूपाच्या असतात.
असं का होत असावं? मला वाटतं, एखादं पुस्तक वा लेख वाचून त्याविषयी आपली मतं नोंदवताना त्या लेखकाविषयीही थोडंसं जाणून घेतलं पाहिजे. उदा- त्या लेखकाचे अभ्यासाचे मूळ विषय कोणते आहेत, तो कोणत्या क्षेत्रात काम करतो आहे वगैरे.
मी गेली आठ-दहा वर्षे मराठी प्रकाशन संस्थांमध्ये ग्रंथसंपादनाचे काम करतो आहे. मनोविकास प्रकाशन, पद्मगंधा प्रकाशन, सुगावा प्रकाशन, लोकवाङ्मय गृह यामध्ये मी काम केलेलं आहे. आणि मराठी प्रकाशन व्यवहार हा माझ्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय आहे. आणि यासोबतच विद्यार्थी म्हणून गेली दहा-बारा वर्षे इंग्रजी साहित्याचा अभ्यास करतो आहे. कारण तो माझा शैक्षणिक अभ्यासाचा विषय आहे. माझ्या ब्लॉग वर वर चाळणाऱया कुणाच्याही लक्षात येईल की, माझं इंग्रजी वाचन कशा प्रकारचं आहे.
असं असूनही माझ्याकडे व्यापक परिप्रेक्ष्य नाही, असं कुणाला वाटत असेल तर त्यावर काय उत्तर द्यावं? मला वाटतं त्यावर आपण गप्प बसावं हे जास्त सयुक्तिक. असो.
सर्जनशील साहित्यावरील मुद्दय़ांचा शेवट मी पुढील परिच्छेदांनी केला आहे-`..आणि पुस्तकं म्हणजे केवळ सर्जनशील साहित्य नव्हे. वाचक म्हणून प्रगल्भता गाठायची असेल तर कथा-कादंब-या-कविता यांच्यापासून शक्य तेवढं लांब राहिलं पाहिजे. समाजाचं आणि जगाचं आकलन करून घेण्यासाठी त्यांचा काहीच उपयोग नसतो.

चांगल्या जगण्याचा सतत युटोपिया करत राहणं ही मानवी जगण्याची मूलभूत प्रेरणा आहे. माणसं जन्माला येतात ती का? आणि मरतात ती का? या प्रश्नाची उत्तरं अजून वैज्ञानिक कसोट्यांवर शोधली जायची बाकी आहेत. तोपर्यंत जन्माला येणा-या, जन्मलेल्या माणसांनी काय करायचं? तर त्यांनी चांगल्या जगण्याचा युटोपिया करत राहायचा. ते काम नेहमी साहित्यानं केलं आहे. आणि त्याला वास्तवाचा, इतिहासाचा, भूगोलाचा, तर्कनिष्ठ विचारांचा आणि वैज्ञानिक प्रगतीचा आधार देण्याचं कामही साहित्यानंच केलेलं आहे. '

त्याविषयी मुक्तसुनीत म्हणतात की, यातल्या दुसऱया परिच्छेदात मी काहीसं सरसकटीकरण केलं आहे असं वाटतं. खरं तर तसं नाही. पहिल्या परिच्छेदात पहिल्याच वाक्यात माझ्याकडून एक छोटीशी चूक झाली आहे.
मूळ वाक्य - ..आणि पुस्तकं म्हणजे केवळ सर्जनशील साहित्य नव्हे.
त्याऐवजी `साहित्य म्हणजे केवळ सर्जनशील साहित्य नव्हे- म्हणजे कथा-कविता-कादंबऱया.' असा बदल केला असता आणि दुसरे, इथेच मग साहित्य म्हणजे काय काय हे अधिक स्पष्ट केलं असतं तर अशी शंका घेतली गेली नसती. तेव्हा ती चूक माझीच आहे.
वरच्या पहिल्या परिच्छेदावरून मी थेट साहित्याच्या व्यापक मुद्दय़ाकडे वळलो. इथेही थोडी गडबड झाली. म्हणजे दोन्ही परिच्छेदातला सांधा नीट जुळवला गेला नाही. त्यामुळे मुक्तसुनीत यांनी अभिप्राय दिला की, `जगण्यातील बर्‍या वाईट गोष्टींचे निरनिराळ्या संदर्भातले निकष पुनःपुन्हा तपासून पहाणे, नवनवे आयाम शोधणे ही एक महत्त्वाची प्रेरणा आहे" हे विधान मी समजू शकतो परंतु तुमच्या विधानामधे तुम्हीच ज्याकडे बोट दाखवलेले आहे असा एकारलेपणा आहे असं मला वाटलं खरं. ' जरा बारकाइनं विचार केला तर मुक्तसुनीत यांच्या लक्षात येईल की, चांगल्या जगण्याचा युटोपिया करत राहणं, यात त्यांनी म्हटलेल्या गोष्टी अध्याहृतच असतात. माणसाचं जगणं जसं आहे त्यापेक्षा अधिक चांगलं जगणं त्याला हवं आहे, अपेक्षित आहे आणि केवळ स्वत:चंच नाहीतर तर आपल्याबरोबर इतरांचंही. त्यामुळेच तर तो चांगल्या जगण्याचा युटोपिया करत राहतो. जगण्यातले वेगवेगळे निकष सतत तपासत राहण्यातून, आहे त्या आव्हानांचा सामना करण्यातून, वाईट टाकून देऊन आणि नव्याचा स्वीकार करण्यातूनच तर जगण्याचा युटोपिया तयार होतो.
मुक्तसुनीत यांचा चौथा आणि शेवटचा मुद्दा असा आहे- `एकदा का हे समजून घेण्याच्या प्रयत्न केला तर बरेचसे प्रश्न सोपे होतील. मग वाचनाच्या बागुलबुवाला आपण आता घाबरतो तसं घाबरणार नाही. कारण तंत्रज्ञानानं कितीही नेत्रदीपक प्रगती केली तरी ते ज्ञानाला पर्याय होऊ शकणार नाही, होऊ शकत नाही, हे जाणून घेण्याची गरज आहे. आणि माहिती-ज्ञान मिळवण्याचा अजूनही सर्वात सोयीचा आणि निधरेक मार्ग पुस्तकंच आहेत. त्यामुळे प्रत्येकानं आपल्याला जमेल तसं, जमेल तितकं आणि जमेल तेव्हा वाचन केलंच पाहिजे. पुस्तकांच्या वाचनाशिवाय निदान सध्या तरी माणसाला सद्गती नाही. <<<
इथे बहुदा तुम्ही बॅलन्सिंग अ‍ॅक्ट केलेला दिसतो. "पुस्तकं ही महत्त्वाची परंतु ती साध्य नव्हेत तर साधनं आहेत, आणि जशी पुस्तकं आहेत तशी अन्य साधनंही असू शकतात, त्यांचंही महत्त्व आहे. मात्र पुस्तकांचा - पर्यायाने ज्ञान वेचण्याचा - मार्ग जो आहे त्याला पर्याय नाही" असा एकंदर मुद्दा असावा असं मी धरतो. चूभूद्याघ्या. '

या मुद्दय़ाच्या स्पष्टीकरणाआधी मी परत थोडा माझ्या लेखाकडे वळतो. सर्जनशील साहित्याचा परामर्श घेऊन मी एकंदर साहित्याविषयी मला काय वाटतं याविषयी दोन परिच्छेद लिहिले आहेत. आणि मग थेट `वाचनाची फँटसी' असं उपशीर्षक देऊन `वाचायला हवं, वाचायला हवं' असा खूप धोशा लावणाऱया आणि खूप वाचणाऱया लोकांबद्दल ज्यांची छाती दडपून जाते, त्यांना आश्वस्त करण्यासाठी काही मुद्दे मांडून सांगायचा प्रयत्न केला आहे की, वाचनाचं असं भय बाळगण्याचं कारण नाही. सतरा-अठरा तास वाचन हीपण फँटसीच आहे. इथं एक माणूस आयुष्यभरात फार फार किती पुस्तकं वाचू शकतो, हे उदाहरणासह स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
ते करतानाच नुसताच पुस्तकांचा संग्रह करत राहणाऱया वाचकांनाही थोडंसं सुनावलं आहे. पुस्तकांचं वेगळेपण समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर मात्र काही मुद्दे एकेक दोन दोन वाक्यात सांगितले आहेत, ते असे- `त्यामुळे खूप वाचणा-या लोकांकडे पुस्तकं साठत जातात. आणि तेवढी पुस्तकं बाजारातून बाद होतात. शिवाय ज्यांची प्रत्येक पुस्तक विकत घ्यायची ऐपत नसते, त्यांना पुस्तक वाचणं शक्य होत नाही. म्हणून ग्रंथालयं, वाचनालयं निघाली. त्यामुळे वाचन काही प्रमाणात वाढलं. नंतर इंटरनेटमुळे वाढलं. पाचपन्नास वर्षापूर्वी वाचणारे लोक किती होते? फार तर दोन टक्के. मधल्या काळात शिक्षणाचा सर्वत्र प्रसार झाल्यानं ते प्रमाण आधीपेक्षा कितीतरी वाढलं. आता ई-बुक रीडरमुळे ते आणखी वाढायला मदत होईल. सध्या तर कधी नव्हे एवढी परिस्थिती अनुकूल आहे. त्याचा फायदा उठवण्यात प्रकाशक-विक्रेतेच कमी पडत आहेत. ई-बुक रीडर सध्या तब्बल 10,000 हजार रुपयांपर्यंत खाली आले असले तरी, ते सर्वाना परवडतील असे नाहीत. आणि त्यांच्याबाबतीत मोबाइलमध्ये झाली तशी किमतीची जादूई घडामोड होण्याची शक्यताही दिसत नाही. कारण ती अजूनही आपल्या आयुष्यातली नडीव गोष्ट नाहीत. खरं तर व्हायला हवीत.
कारण कुठलाही माणूस जन्मत: अडाणीच असतो. त्याला सर्व प्रकारची शिक्षणं घेत स्वत:ला समृद्ध करत राहावं लागतं. पण ही प्रेरणाही सर्वानाच सर्वकाळ सारख्याच प्रमाणात राहिल असंही नाही. प्रत्येकाची कौंटुबिक परिस्थिती, आजूबाजूची परिस्थिती, तो राहतो तो समाज, त्याच्या चालीरीती, प्रथा-परंपरा, नीतिनियम, त्याची प्रगल्भता या सर्वावर त्याची जडणघडण अवलंबून असते. पण या सर्व गोष्टींच्या पलीकडे जाण्याची संधी आणि वय प्रत्येकाला मिळतंच. म्हणूनच प्रत्येकानं आयुष्यात सर्व गोष्टी केल्या पाहिजेत, शिकल्या पाहिजेत. कारण आयुष्यभर केवळ एकाच प्रकारचं काम करणं ही समाजविकृती आहे. (आयुष्यभर केवळ लेखन, वाचन आणि मनन करणं हीही समाजविकृतीच आहे, असं इतिहासकार शेजवलकर म्हणतात.) त्यामुळे सर्वानी सर्व प्रकारची, निदान शक्य तेवढय़ा प्रकारची कामं केली पाहिजेत आणि शक्य तेवढे छंदही जोपासले पाहिजेत. एकाच वेळी या सर्व गोष्टी करता येतील असं नव्हे, पण क्रमाक्रमानं का होईना केल्या पाहिजेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा सर्वागीण विकास व्हायला मदत होईल आणि त्यातून समाजाचाही विकास होईल.
एकदा का हे समजून घेण्याच्या प्रयत्न केला तर बरेचसे प्रश्न सोपे होतील. मग वाचनाच्या बागुलबुवाला आपण आता घाबरतो तसं घाबरणार नाही. कारण तंत्रज्ञानानं कितीही नेत्रदीपक प्रगती केली तरी ते ज्ञानाला पर्याय होऊ शकणार नाही, होऊ शकत नाही, हे जाणून घेण्याची गरज आहे. आणि माहिती-ज्ञान मिळवण्याचा अजूनही सर्वात सोयीचा आणि निधरेक मार्ग पुस्तकंच आहेत. त्यामुळे प्रत्येकानं आपल्याला जमेल तसं, जमेल तितकं आणि जमेल तेव्हा वाचन केलंच पाहिजे. पुस्तकांच्या वाचनाशिवाय निदान सध्या तरी माणसाला सद्गती नाही.' केवळ पुस्तकंच वाचणाऱया किंवा केवळ अमूक एकच काम आयुष्यभर करणं, ही समाजविकृती आहे. सर्वांनी सर्व प्रकारची, निदान जमेल तेवढय़ा प्रकारची कामं केली पाहिजेत. त्यातलंच एक काम वाचन हे असायला हवं, अशी मांडणी केली आहे. हा मुद्दा मला वाटतं खूप महत्त्वाचा आहे. वाचनाच्या फायद्यांविषयी कुठेही प्रतिकूल मत व्यक्त न करताही वाचन या गोष्टीचाही बागुलबुवा करण्याचं कारण नाही, असा मुद्दा मी मांडला आहे. आणि तो नीट समजून घेतला तर पुस्तकांचा बागुलबुवाच उभा राहत नाही.
हेच मुक्तसुनीत यांनी आणखी थोडक्या शब्दात नेमकेपणानं सांगितलं आहे. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. मलाही तसंच म्हणायचं आहे, पण ते मी थेटपणे न सांगता थोडं वेगळ्या प्रकारे सांगितलं आहे.
आता माझ्याच लेखातल्या पण इथं कुणी न मांडलेल्या काही उणीवा सांगतो.
हा लेख मी तसा अल्पकाळात लिहिला आहे. वर्तमानपत्रांची तशी गरज असते आणि धबडगाही. त्यामुळे या लेखाची मांडणी आणि बांधणी फारशी काटेकोरपणे झालेली नाही. लेखाचे सरळ सरळ दोन भाग पडतात.
एक, तंत्रज्ञान, पुस्तकांचे शत्रू आणि दुसरा, वाचन, त्याबद्दलचे गैरसमज.
हे दोन्ही भाग नीट जोडायला हवे होते. आणि काही मुद्दे जे थेटपणे आले आहेत, ते पुरेशा तपशीलानिशी यायला हवे होते. म्हणजे मला जे जे म्हणायचं आहे ते ते मी मला हव्या त्या पद्धतीनं म्हटलं आहेच, पण मला अभिप्रेत असलेल्या पद्धतीनंच ते वाचणाऱयाला प्रत्येकाला समजेलच, याची मी पुरेशी काळजी घेतलेली नाही. हा लेख इतर कुणी लिहिला असता आणि मी त्याचं संपादन केलं असतं, तर ती काळजी मी नक्कीच घेतली असती. पण लेखकही मीच आणि संपादकही मीच, या दुहेरी जबाबदारीतून काही गडबडीत होतात, त्या या लेखात झाल्या आहेत.
हा लेख मी परत कधीतरी सवडीनं सविस्तर लिहिणार आहे. तेव्हा तो आता आहे त्यापेक्षा किमान चारपट होईल. कारण त्याचा मूळ ऐवज तेवढा आहे. वर्तमानपत्राच्या गरजेपोटी मला तो कसाबसा 2200-2300 शब्दांत संपावावा लागला, त्यामुळे काही चुका माझ्याकडून झाल्या.
आता इतर वाचकांचे काही मुद्दे पाहू. एक वाचक लिहितात की,
''>>टीव्हीमुळे पुस्तक वाचनावर फारसा काही परिणाम झाल्याचं दिसत नाही. उलट दिवसेंदिवस पुस्तकांचा खप वाढतच आहे. <<
माझ्या मते खप हा एक निकष होऊ शकेलही, पण तो एकमेव निकष नसावा. टीव्हीसारख्या माध्यमामुळे चटपटीत गोष्टींची सवय झाली आणि संथ, गंभीर गोष्टी नकोशा वाटू लागल्या असं झालेलं असू शकेल. ते तपासायला हवं.
>>न्यूज चॅनेल्स आणि वर्तमानपत्रं ही एकमेकांना पूरकच ठरली.......
>>टीव्ही, इंटरनेट, न्यूज चॅनेल्स, वर्तमानपत्र यापैकी कुठल्याही माध्यमानं पुस्तकांचं नुकसान केलेलं नाही. उलट ती अंतिमत: पुस्तकांना पूरकच ठरली आहेत. कारण माहिती-मनोरंजनाचं तंत्र या माध्यमांनी अधिकाधिक सोपं करण्याचं काम केलं.......

याचा निकाल अजून लागलेला नाही. परदेशात जिथे इंटरनेट सहज उपलब्ध आहे तिथे वर्तमानपत्रं गोते खात आहेत. भारतीय वर्तमानपत्रं चांगली खपत असतील तर त्यामागे त्यांनी स्वतःचं केलेलं बाजारीकरण हा (तंत्रज्ञानाच्या अनुपलब्धतेखेरीज) आणखी एक घटक नक्कीच असावा. मराठीत प्रकाशित होणार्‍या दर्जेदार पुस्तकांविषयी माहिती आज वृत्तपत्रं किंवा टीव्हीवर जवळजवळ अजिबात मिळत नाही. त्यासाठी साहित्यविषयक नियतकालिकांचा आधार घ्यावा लागतो. २० वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती.''

तो एकमेव निकष नसावा, तपासायला हवं, ही टीव्हीच्या वाचनावर झालेल्या न झालेल्या परिणामाच्या माझ्या मुद्द्याविषयी मतभेद करताना या वाचकानं हे शब्द वापरले आहेत. मी लेखात तो कुठेही आणि दुरान्वयानेही एकमेव निकष म्हणून सांगितलेला नाही. शिवाय टीव्ही, न्यूज चॅनेल यांच्या पुस्तकावरील परिणामांचा निकाल लागलेला आहे, तो कधीच लागला आहे. मी स्वत: टीव्ही-न्यूज चॅनेलमध्ये दोन-अडीच वर्षे महत्त्वाच्या पदावर काम केलं आहे, त्यामुळे याबाबतीत माझा अनुभव इतरांपेक्षा नक्कीच अधिक विश्वासार्ह आणि विश्वसनीय आहे. त्यामुळे माझ्या लेखात केलेल्या विधानांना माझा स्वानुभव, अभ्यास आणि त्या क्षेत्रातल्या मान्यवरांशी केलेल्या चर्चा यांचा आधार आहे. मला वाटलं आणि लिहिलं, असा मोघमपणा मी केलेला नाही, एवढंच मी सांगू शकेन.

नंतर एका वाचकानं लिहिलं आहे की, `माझा आक्षेप पुस्तकं वाचणंच अजूनही सर्वात महत्त्वाचं आहे, त्यातूनच काय ती माहिती मिळते अशा प्रकारच्या पेट्रनायझेशन आहे. एकेकाळी काशीला जाणं दिव्य समजलं जायचं त्याच्याशी तुलना करता पुस्तकात लिहीलेले व्हेनेझुएला आणि केन्या इथे जाणं फार कठीण नाही.'


ही विधानं अगदी स्पष्टच सांगायचं तर बाळबोध आहेत. मी नेमकं काय लिहिलं आहे ते नीट समजून न घेताच ही विधानं केली आहे. मी लिहिलं आहे की, `तंत्रज्ञानानं कितीही नेत्रदीपक प्रगती केली तरी ते ज्ञानाला पर्याय होऊ शकणार नाही, होऊ शकत नाही, हे जाणून घेण्याची गरज आहे. आणि माहिती-ज्ञान मिळवण्याचा अजूनही सर्वात सोयीचा आणि निधरेक मार्ग पुस्तकंच आहेत. त्यामुळे प्रत्येकानं आपल्याला जमेल तसं, जमेल तितकं आणि जमेल तेव्हा वाचन केलंच पाहिजे. पुस्तकांच्या वाचनाशिवाय निदान सध्या तरी माणसाला सद्गती नाही.'
दुसरा मुद्दा असा की, `काशीला जाणं' यासारख्या प्रवासांचा अनुभव आणि पुस्तकांचा अनुभव यांची या वाचकानं तुलना केली आहे, ती तर हास्यास्पद आहे. कारण तुलना करण्यासाठी त्या दोन्ही गोष्टींचा मूळ परिघ एक असावा लागतो, त्यांच्यामध्ये काही आंतरसंबंध असावे लागतात. प्रवासातून येणारं शहाणपण आणि पुस्तकांच्या वाचनातून येणारं शहाणपण यांची तुलना करता येणार नाही. या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. एकेकाळी माहितीची साधनं मर्यादित होती, त्यामुळे प्रवास करून माहिती मिळवण्यावर भर होता. आता माहितीची साधनं इतकी झाली आहेत की, आता कुणी प्रवासातून जी माहिती मिळवेल, त्यापेक्षा एखाद्यानं घरबसल्या मिळवलेली माहिती त्यापेक्षा कितीतरी पट अधिक असेल. आता माहिती मिळवण्याचं प्रवास हे साधनं तंत्रज्ञानानं मर्यादित करून टाकलं आहे. पण प्रत्यत्र अनुभव नेहमीच चांगला असतो. मात्र इथं हेही लक्षात घ्यायला हवं की, एकेकाळी काशीला जाणं जसं सर्वांनाच जमत नसतं तसंच आजही केन्याला जाणं सर्वांनाच जमेल असंही नाही. त्यापेक्षा जवळच्या ग्रंथालयात जाणं हे बहुतेकांना जमण्यासारखं असतं. सहजशक्य असतं.
एका वाचकानं मात्र `पुस्तकांचे शत्रू आणि वाचनाचा बागुलबुवा' या लेखाऐवजी `वाचन : का, कसे आणि किती?' या माझ्या ब्लॉगवरील दुसऱया एका लेखाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ती अशी- `जगण्यातल्या अनेक गोष्टींत 'मार्गदर्शन' मिळालं की वाटचाल सोपी होते हे सुद्धा एक गृहितक आहे - ते कधी बरोबर निघतं तर कधी नाहीही. अनेक गोष्टी स्वतः शोधण्यात गंमत असते - त्यात झालेल्या चुकांतूनही! आणि माझ्या मते काय वाचावं हे ठरवता येत नाही - ते कळत जात. ते 'कळण' महत्त्वाचं असत - आजच कळणं उद्या अयोग्य ठरतं अनेकदा तरीही. शिवाय 'आपण का वाचतो' हा प्रश्नही आहेच. 'प्रगल्भ होणं' हे त्याच उत्तर असेल तर मार्गदर्शक उपयोगी ठरतील कदाचित - पण उत्तर वेगळं असेल तर? '
आता वाचावं का, तर केवळ मनोरंजनासाठी असंच कुणाचं गृहितक असेल तर त्याचा प्रतिवाद करावा की करू नये? मला वाटतं करू नये. हा लेख मी वाचन तर करायचं आहे, त्याला दिशाही द्यायची आहे आणि नंतर त्याविषयी पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ द्यायची नाही अशा वाचकांसाठी म्हणजे ज्यांना वाचक म्हणून क्रमाक्रमाने एकेक इयत्ता गाठावयाची आहे, त्यांच्यासाठीच लिहिला आहे. ज्यांना ही रितसर शिक्षणाची पद्धत मान्यच नाही, त्यांच्यासाठी हा लेख नाही. हे माझा लेख वाचून कुणाच्याही लक्षात येईल.
आता शेवटचा मुद्दा. मुक्तसुनीत यांनी ज्या मुद्देसूदपणे आणि संयतपणे माझ्या लेखावरील चर्चेला सुरुवात केली होती, तशी चर्चा या ठिकाणी नंतरच्या प्रतिक्रियांमधून घडू शकली नाही. एखादं पुस्तक वाचताना वा लेख वाचताना त्या लेखकाबरोबरचे मतभेद जरूर शोधले पाहिजेत, पण त्याआधी त्या लेखकाला नेमकं काय म्हणायचं आहे, त्यानं ते कसं म्हटलं आहे, हेही नीट समजून घ्यायला हवं. तसं ते घेतलं तर त्या चर्चेला काहीएक दिशा राहते. नसता तांबट आळीतल्या ठोक-ठोक सारखा सर्व बाजूंनी नुसता मतभेदांचाच आवाज होत राहतो. त्यातून घडत काहीच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाप रे... पाहूनच दम लागला. वाचकांना शुभेच्छा.

हा लेख मी वाचन तर करायचं आहे, त्याला दिशाही द्यायची आहे आणि नंतर त्याविषयी पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ द्यायची नाही अशा वाचकांसाठी म्हणजे ज्यांना वाचक म्हणून क्रमाक्रमाने एकेक इयत्ता गाठावयाची आहे, त्यांच्यासाठीच लिहिला आहे. ज्यांना ही रितसर शिक्षणाची पद्धत मान्यच नाही, त्यांच्यासाठी हा लेख नाही. हे माझा लेख वाचून कुणाच्याही लक्षात येईल.

गल्ली (आमचीच) चुकली.

आता शेवटचा मुद्दा. मुक्तसुनीत यांनी ज्या मुद्देसूदपणे आणि संयतपणे माझ्या लेखावरील चर्चेला सुरुवात केली होती, तशी चर्चा या ठिकाणी नंतरच्या प्रतिक्रियांमधून घडू शकली नाही. एखादं पुस्तक वाचताना वा लेख वाचताना त्या लेखकाबरोबरचे मतभेद जरूर शोधले पाहिजेत, पण त्याआधी त्या लेखकाला नेमकं काय म्हणायचं आहे, त्यानं ते कसं म्हटलं आहे, हेही नीट समजून घ्यायला हवं. तसं ते घेतलं तर त्या चर्चेला काहीएक दिशा राहते. नसता तांबट आळीतल्या ठोक-ठोक सारखा सर्व बाजूंनी नुसता मतभेदांचाच आवाज होत राहतो. त्यातून घडत काहीच नाही.

हं... रोचक. लेखकाचं म्हणणं समजून घेणं म्हणजे काय? ते न समजताच मतभेद निर्माण होतात की काय? तसं असेल तर ही रोचक प्रक्रियाच दिसते. एरवी, मतभेद व्यक्त केले म्हणजे लेखकाला समजून घेतलं नाही असाही एक निकाल या वाक्यांतून निघतो. पण असो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राम जगताप यांनी आवर्जून येऊन येथील चर्चेची दखल घेतली म्हणून मी आभारी आहे.

त्यांनी दिलेल्या प्रतिसादानंतर काही गोष्टी सुचल्या त्या मांडतो.

पुस्तक विक्रीच्या खपाचे ट्रेंड्स हे पाश्चात्य देश आणि भारत-चीन सारखे वेगाने प्रगती करू पाहणारे देश यांच्यामधे वेगवेगळे असावेत हा (मी आधीही मांडलेला मुद्दा) इथे अधोरेखित व्हायला हरकत नाही.

साक्षरता, पुस्तकं घेण्याची क्षमता, पुस्तकांच्या प्रकाशनाचं प्रमाण, वैविध्य या संदर्भात भारतीय बाजारपेठेने गेल्या वीस पंचवीस वर्षांमधे सततच्या वाढीचे ट्रेंड्स दाखवलेले असावेत , याचं सोपं कारण अर्थव्यवस्थेतले बदल, वाढत गेलेला मध्यमवर्ग या (चिरपरिचित) घटकांमधे शोधावं लागेल. यातही परत शहरे-गावे, पहिल्या-दुसर्‍या-तिसर्‍या टियर्स मधली शहरं असे निरनिराळे ट्रेंड्स दिसणार. कमीअधिक फरकाने हेच ट्रेंड्स मराठीसारख्या प्रादेशिक भाषांच्या संदर्भात परावर्तित होणार.

पाश्चात्य देशांमधे याच वर्षांमधे व्हिडियोगेम्स, घरच्या घरी सिनेमे बघण्याची क्षमता, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंटरनेट यांच्या आगमनाने पुस्तकं/वर्तमानपत्रं/नियतकालिकं यांच्या विक्रीवर मोठा प्रतिकूल परिणाम झाल्याचं दिसतं.

इथे एक रोचक मुद्दा मांडावासा वाटतो. पाश्चात्य देशांमधे अनेक वर्तमानपत्रं, पुस्तकांची दुकानं बंद पडताना दिसतात. त्यांचा खप शून्यावर तर आलेला नसतो. पूर्वी जे पंधरा लाखांवर होते ते दहा लाखांच्या खाली जायला लागले की गाशा गुंडाळण्याची भाषा करतात. हे असं का होतं ? आपण सोपं उदाहरण घेऊ मानवी शरीरातल्या पाण्याच्या पुरवठ्याचं. आपलं शरीर तर ६०-७० टक्के पाण्याचं भरलंय असं म्हण्टलं जातं. मग निव्वळ दोन दिवस पाणीपुरवठा झाला नाही तर डिहायड्रेशन होऊन आपण मरणासन्न होण्याची शक्यता का ? शरीरामधे तर पाणी आहे की भरपूर शिल्लक. त्याचं कारण हेच की एखादी व्यवस्था बंद पडण्याकरता ती शून्यावर येणं गरजेचं नाही. पाण्याची पातळी अमुकच्या खाली गेली की खेळ खलास. तसंच कुठल्याही धंद्याबद्दल. तोट्याची पातळी एका विशिष्ट मर्यादेपलिकडे गेली की धंदे बंद पडतात. पाश्चात्य देशांमधल्या, पुस्तकांनी ओसंडून वाहात असलेल्या दुकानांच्या बंद पडण्यामागे हे आहे. छापील पुस्तकं/वर्तमानपत्रं छापून वितरण करण्याचा खर्च हा आता वर्गणीदारांच्या/वाचक देऊ करत असलेल्य किमतीत परवडणारा राहिलेला नाही.

भारतातल्या शहरांमधे इपुस्तकं खपायला सुरवात झालेली असली आणि या विक्रीने जरी आपले पाय रोवले असले तरी अगदी पहिल्या टियरच्या शहरांमधेही इंटरनेट्चा सर्वदूर प्रभाव आहे असं जाणवत नाही. तो दोन वर्षांपेक्षा प्रचंड वेगाने वाढत असेल तरी छापील पुस्तकांच्या इकनॉमीला भारतातल्या मोठमोठ्या शहरांमधे धोके जाणवायला कितीतरी वर्षं जातील. मग निमशहरी नि ग्रामीण विभागांची सध्या गोष्ट बाजूला ठेवू.

या सर्व विवेचनाचा उद्देश हाच की, छापील पुस्तकं भारतातून काही इतक्यात जात नाहीत. आजही ही "इमर्जिंग इकनॉमी" आहे. जेव्हा भारतीय मोठ्या शहरांमधली एक व्यक्ती पुस्तकं सोडून टिव्ही/इंटरनेट कडे वळत असेल तेव्हा काही नवे वाचक अजूनही मार्केट मधे उतरत असतील. पाश्चात्य देशांमधे हा ट्रेंड क्षींण बनल्याने तेथील छापील यंत्रणेला धोका दिसत आहे.
---- क्रमश:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

सध्या फक्त एकाच मुद्द्याविषयी प्रतिसाद देतो. विधायक चर्चा झाली तर पुढे इतर मुद्द्यांकडे वळेन.

>>लेखक मंडळींचं जगाबद्दलचं आकलन नेहमीच अपुरं राहिलेलं आहे. त्यांना व्यापक परिप्रेक्ष्यात पाहता येत नाही आणि सामग्य्रानं विचारही करता येत नाही.<<

>>सुखात्मिका आणि शोकांतिका याच दोन परिघात ते साहित्याची मांडणी करतात.<<

>>वाचक म्हणून प्रगल्भता गाठायची असेल तर कथा-कादंब-या-कविता यांच्यापासून शक्य तेवढं लांब राहिलं पाहिजे.<<

लेखकाच्या या विधानांबद्दल 'ही फार सरसकट विधानं आहेत. त्यामागे जागतिक साहित्याचा व्यापक परिप्रेक्ष्य आहे असं वाटत नाही.' असं मी म्हटलं होतं. यावर लेखक म्हणतात :

>>मी गेली आठ-दहा वर्षे मराठी प्रकाशन संस्थांमध्ये ग्रंथसंपादनाचे काम करतो आहे. मनोविकास प्रकाशन, पद्मगंधा प्रकाशन, सुगावा प्रकाशन, लोकवाङ्मय गृह यामध्ये मी काम केलेलं आहे. आणि मराठी प्रकाशन व्यवहार हा माझ्या आवडीचा आणि अभ्यासाचा विषय आहे. आणि यासोबतच विद्यार्थी म्हणून गेली दहा-बारा वर्षे इंग्रजी साहित्याचा अभ्यास करतो आहे. कारण तो माझा शैक्षणिक अभ्यासाचा विषय आहे. माझ्या ब्लॉग वर वर चाळणाऱया कुणाच्याही लक्षात येईल की, माझं इंग्रजी वाचन कशा प्रकारचं आहे.
असं असूनही माझ्याकडे व्यापक परिप्रेक्ष्य नाही, असं कुणाला वाटत असेल तर त्यावर काय उत्तर द्यावं? मला वाटतं त्यावर आपण गप्प बसावं हे जास्त सयुक्तिक. असो.<<

देशी-विदेशी साहित्याचं पुष्कळ वाचन असूनही असा परिप्रेक्ष्य नसणारे पुष्कळ वाचक मला परिचित आहेत. त्यामुळे कुणी काय वाचलं आहे यापेक्षा त्या वाचनातून त्याच्या दृष्टिकोनात काही बदल झाले का आणि झाले असतील तर ते काय यावरून काही विधान करणं अधिक सयुक्तिक वाटतं. आता उदाहरणार्थ लेखकाचं हे विधान पाहू :

>>सुखात्मिका आणि शोकांतिका याच दोन परिघात ते साहित्याची मांडणी करतात.<<

माझंही पूर्वी असं मत होतं. पण जेव्हा गाब्रिएल गार्सिआ मार्केझचं 'हंड्रेड यर्स ऑफ सॉलिट्यूड' किंवा मिलन कुंदेराचं 'अनबेअरेबल लाइटनेस ऑफ बीइंग'सारखी पुस्तकं मी वाचली, तेव्हा सुखात्मिका किंवा शोकांतिका अशी वर्गवारी करता येणार नाही अशी पुस्तकं जगात लिहिली गेली आहेत याचा मला साक्षात्कार झाला.

>>लेखक मंडळींचं जगाबद्दलचं आकलन नेहमीच अपुरं राहिलेलं आहे. त्यांना व्यापक परिप्रेक्ष्यात पाहता येत नाही आणि सामग्य्रानं विचारही करता येत नाही.<<

बाल्झाकची 'ह्यूमन कॉमेडी' किंवा चार्ल्स डिकन्स, एमिल झोला यांच्या कादंबऱ्यांत मला अपरिचित असलेल्या जगाचं दर्शन झालं. अपरिचित म्हणजे एकीकडे परदेशी संस्कृती म्हणून तर दुसरीकडे वेश्या, भिकारी, भुरटे चोर अशा, म्हणजे माझ्या मर्यादित मध्यमवर्गीय परिघाच्या बाहेरची संस्कृती म्हणून. आणि तरीही ते वाचताना असं लक्षात आलं की हे लेखक ज्या व्यक्ती-प्रवृत्तींबद्दल लिहित आहेत त्या माझ्या आसपाससुद्धा आहेत. असं महाभारत किंवा होमरच्या साहित्याबद्दलसुद्धा म्हणता येतं, किंवा शेक्सपिअर-मोलिएरबद्दलही. अशा मोठ्या पट असणाऱ्या महाकादंबऱ्या किंवा महाकाव्यं आजही लोकांना आकर्षित करतात त्यामागे असंच काहीसं कारण असावं असं मला वाटतं. याउलट लेखकाचं वरचं विधान तपासायचं तर त्यासाठी मी पुढे जाऊन असंही म्हणेन की लेखकच का, जगात कोणत्याच एका माणसाचं जगाबद्दलचं आकलन पुरेसं नसतं. आपले मर्यादित परिघ आणि आपलं छोटंसं आयुष्य या संकोचलेल्या अवकाशातून व्यापकतेकडे जाण्यासाठी म्हणून तर अनेक शतकांपूर्वी होऊन गेलेल्या द्रष्ट्या लेखकांचासुद्धा माणसांना आधार वाटतो. गुणसूत्रांमधून संक्रमित करता येत नाहीत अशा गोष्टी पुढच्या पिढ्यांना वारसा म्हणून देणं हे मानवी संस्कृतीचं एक कळीचं वैशिष्ट्य म्हणता येईल. आणि साहित्य हा त्याचा एक अविभाज्य भाग आहे, कारण गोष्टी ऐकणं हा लहानमोठ्यांना आकर्षित करणारा एक मोठा घटक आहे. त्यामुळे एरवी रुक्ष किंवा किचकट वाटणारे अनेक विचार त्या माध्यमातून मांडता आणि पोचवता येतात.

पण मग हे दिसतं की एका माणसाच्या अपुरेपणाचा हा मुद्दा आपल्याला 'लेखक मंडळी', किंबहुना व्यापक मानवजात यांच्याविषयीच्या लेखकाच्या वरच्या सरसकट विधानाविषयीच साशंक करतो. त्यामुळे मग लेखक जेव्हा 'वाचक म्हणून प्रगल्भता गाठायची असेल तर कथा-कादंब-या-कविता यांच्यापासून शक्य तेवढं लांब राहिलं पाहिजे' असं सरसकट विधान करतो तेव्हा लेखकाच्या परिप्रेक्ष्याविषयी शंका मनात येतात. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मी गेली आठ-दहा वर्षे मराठी प्रकाशन संस्थांमध्ये ग्रंथसंपादनाचे काम करतो आहे. मनोविकास प्रकाशन, पद्मगंधा प्रकाशन, सुगावा प्रकाशन, लोकवाङ्मय गृह यामध्ये मी काम केलेलं आहे...

हे वाचलंच नव्हतं. ही एवढी वाक्यं बाकी साऱ्याकडं दुर्लक्ष करावं यासाठी पुरेशी होती. मराठीत ग्रंथ आहेत, आणि त्यांचं संपादनही केलं जातं हे आम्हाला माहिती नव्हतं. छ्या... आमचं वाचनच असं राव. आम्हाला परिप्रेक्ष्य नाही, असं आता आम्ही (आणि तुम्हीही) निश्चिंतपणे म्हणू शकतो. या चिंतातूर जंतूंकडं लक्ष देऊ नका. ते उगाच जागोजागी असं काही तरी जागतीक, जागतीक असं अगतीक बोलत राहतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0