वण्डरफुल मिनारी

मी लहान होते तेव्हापासून माझं एक स्वप्न आहे आपली स्वतःची चिकार मोठी जमीन पाहीजे शेती करण्यासाठी. मोठ्या शहरात रहायला लागल्यापासून मला याची जाणीव अधिकच होऊ लागली. आपण काहीकाळानं गावी परत जायचं आणि स्वतःची छोटीशी का असेना शेती करायचीच. मातीशी जोडलेली मूळं असल्यामुळं हे सतत अन् वारंवार वाटत राहतं. कामाच्या व्यापात आपल्या या इच्छेला थोडंसं मागे सारावं लागतं, पण कधीतरी काहीतरी निमित्त घडतं अन् आपल्याला याची परत आठवण होतेच. तसंच एक निमित्त काल घडलं, ते म्हणजे एक चित्रपट, मिनारी, अमेरिकन मेड कोरियन सिनेमा. एका कोरियन कुटुंबाची गोष्ट.

जेकब, मोनिका हे तरूण जोडपं अमेरिकेतील शहरी कॅलिफोर्नियातलं गर्दीचं, गजबजाटाचं, सोयीसुविधांचं वातावरण सोडून अर्कान्सामध्ये दूर कुठेतरी येउन राहतात. कारण जेकबचं स्वप्न असतं आपली शेती करायचं. त्यासाठी तो तिकडे पन्नास एकर शेती घेतो, शेतातच घर उभारतो- हे घर म्हणजे चाकं असलेलं घर असतं. मोनिकाला इथं आवडत नसतं कारण तिला शहरात रहायचं असतं. या त्यांच्या घराच्या आसपास एकही दुसरं घर नसतं, की शाळा नसते की, दवाखाना नसतो की चर्चही नसते. त्यामुळे मोनिका नाखूष असते. यावरून जेकबमोनिकमधे भांडणं होत राहतात. पण त्यांची मुलं, थोरली मुलगी ॲन जी आईला मदत करणारी, शांत अशी मुलगी असते तर धाकटा मुलगा डेव्हिड जो स्वतःच हृदयविकारानं आजारी असतो. मोनिकाला मुलांसाठी म्हणूनच शहरात रहायचं असतं तर जेकबला शेती करून दरवर्षी कोरिआतून अमेरिकेत येणाऱ्या लोकांना कोरियन जेवणाची अठवण येत असणार म्हणून स्वतःच्या शेतात कोरियन भाजीपाला घेउन विकायचं असतं. स्वतःच्या शेतीसाठी लागणारी सर्व आखणी तो एकहाती करतो. नवराबायको मिळून एका पोल्ट्री मधे कोंबडीच्या पिल्लांचं लिंग ओळखण्याचं काम करत असतात. त्यातून थोडीच मिळकत होत असते. दूरवरचं घर, आपण दिवसभर बाहेर यामुळे जेकब मोनिका मोनिकाच्या आईला सून-जा हीला मुलांना सांभाळायला म्हणून दक्षिण कोरियातून बोलवून घेतात. तिकडून येताना ती खूप खाऊ आणि काही खास अशा कोरियन पाल्याच्या, वनसपतीच्या बिया घेऊन येते. जेकबला त्याच्या शेतीत यश मिळतं, पण ते तोंडाशी लागेपर्यंत असं काही होतं की तो आणि त्याचं कुटुंब अगदीच निराश होतं पण काही गोष्टी घडतात अन् ते कुटुंब पुन्हा एकदा उभं राहतं. ही या चित्रपटाची कथा.

या चित्रपटात कालखंड दाखवला आहे तो साधारण १९८०च्या दशकातला. हे कोरियन जोडपं चांगलं आयुष्य जगण्याच्या उद्देश्यानं कोरिया सोडून अमेरिकेत येतं, त्यांची मुलं अमेरिकतच जन्माला येतात अन् तिथंच ती वाढत असतात त्यामुळं ती अमेरिकनच असतात. दिग्दर्शकानं हा फरक उत्तम दाखवला आहे. आईवडील आपसात बोलताना कोरियन भाषेत अन् मुलांशी बोलताना इंग्लिश मिश्रीत कोरियन भाषेत बोलत असतात. हे अगदी इकडून तिकडे रहायला गेलेल्या कुठल्याही भारतीय पालकाला आपलं चित्रण वाटूच शकेल. अमेरिकेतच मोठं होत असलेल्या मुलांचं अमेरिकी असणं आणखी काही गोष्टीतून ठळक केलंय ते म्हणजे आईवडील नाष्टा करताना, जेवण करताना कोरियन जेवण करतील पण मुलं, सिरियल्स, पास्ता असं खातील. मुलं कार्बोनेटेड ड्रिंक घेतील पाण्याऐवजी प्यायला हेही एक अगदी अमेरिकन चित्र आहे. या चित्रपटातले बारकावे अगदीच नेमके आहेत. कोरियाहून आज्जी येताना खूपसारा खाऊ घेऊन येते. जसं की कोरियन चिली पाउडर, किमची, खारवलेले मासे आणि हे सर्व बघून मोनिकाला भरून येतं अन् ती रडू लागते. हे दृश्य पाहताना घरातले लोक परदेशी असणाऱ्या ताईदादाकडे गेल्यानंतर आपली माणसं आली आहेत या आनंदाबरोबरच आपल्यासाठी आणलेला खाऊ बघून जे भरून येतं ते आठवलं.
आज्जी आणि नातवाला एकाच खोलीत रहावं लागणार असतं अन् नातू अज्जिबात तयार नसतो. त्यामुळं नावडत्या आज्जीपासून मैत्रिण आज्जीपर्यंतचा हा प्रवासही बघण्यासारखा आहे. सून-जाचं काम निव्वळ देखणं आहे. सून जा येताना जे काही सामान घेऊन येते त्यात मिनारी या कोरियन वनस्पतीच्या बियाही आणते.
मिनारी ही अशी वनस्पती आहे की जी पाणथळ जागी, तलावाच्या डोहाच्या कडेनं उगवते अन् तिच्याकडे विशेष लक्ष नाही दिलं तरी तिची ती उगवत राहते. मिनारी -वाॅटर सेलेरी हे जगभरात वापरलं जाणारं हर्ब आहे. अनेक ठिकाणी कोथिंबीरीसारखं पदार्थाच्या वर भुरभुरवून, सलाडमधे, सूपमधे, नुसतंच परतून, चटणी म्हणून, चहात उकळून वगैरे खातात, तशीच ही कोरियातही खाल्ली जाते. कोरियन लोकांचा समज आहे की मिनारी ही औषधी वनस्पती आहे आणि ती खाल्ल्यास अनेक विकार नाहीसे होऊन तुम्ही तंदुरुस्त होता. असाच समज सून-जा हीचाही आहे. आणि म्हणून ती जेकबच्या शेतात एका झाडीत दडलेल्या पाणथळ जागी या मिनारी लावून टाकते. तिथं जाताना, गेल्यावर सून-जा आणि डेव्हिड यांच्यातले संवांद फार उत्तम आहेत. तिथं फारसं इंग्यजी न येणाऱ्या सून जाचे "वन्डरफुल मिनारी" हे शब्द ऐकून डेव्हिड एक गाणं तयार करतो या दोनच शब्दांचं.
सारंकाही बरं चाललेलं असताना या कुटुंबाच्या बाबतीत एक अनपेक्षित घटना घडते. पण अशाच एका अनपेक्षित छोट्याशा घटकामुळे हे कुटुंब तगतंही.
चित्रपटाचं संगीत हा फार मोठा भाग आहे. कुठेही भडक नसलेलं संगीत हाही फार महत्त्वाचा घटक आहे.
म्हटलं तर इतकी साधी गोष्ट. पण यात between the lines असे अनेक संवाद आहेत, प्रसंग आहेत.
खुद्द मिनारी हेच एक उत्तम रूपक आहे. चित्रपटात एकाच वाक्यातून अमेरिकेत त्यावेळी होत असलेल्या वंशभेदाची झलक दाखवली आहे. त्याचबरोबर शहरी सोयीसुविधा हव्या आहेत मात्र शहरी लोकांना, त्यांच्या गोष्टींना, विचारांना नावं ठेवायची हेही जेकबच्या काही संवादातून दाखवलं आहे. पण याहीपेक्षा मिनारीच्या माध्यमातून, एका कुटुंबाच्या माध्यमातून तगून रहायचा, सकारात्मकतेनं आयुष्याकडं पाहण्याचा एक संदेश दिला आहे ते पाहणं फार जास्त रोचक आहे.
सध्याच्या या अशाश्वत अशा, भयाच्या काळात हा चित्रपट सर्वांनी पहावा असा आहे.

आपण काही करूच शकलो नाही तर पुरुष म्हणून आपलं जीवन व्यर्थ आहे म्हणून काहीतरी (शेती) करून दाखवण्याचा भार वाहणारा जेकब, कुटुंबाला चांगलं- शहरी आयुष्य मिळावं, मुलांना चांगलं शिक्षण अन् धर्माची बरी शिकवण असावी, उत्तम आरोग्य असावं याचा भार वाहणारी मोनिका, आईवडलांच्या भांडणाचा, घरच्या परिस्थितिचा, आजारी धाकट्या भावाला समजून घेण्याचा न बोलता शांतपणे भार वाहणारी ॲन, कुटुंबाच्या वाताहतीला आपण जबाबदार आहोत का हा भार वाहणारी सून-जा, अन् आपलं आजारपण, मित्र नसणं, पळताखेळताही न येणं अन् काहीच न कळणाऱ्या वयाच्या मानानं होणाऱ्या मोठ्या स्थित्यंतरांचा भार वाहणारा छोटासा डेव्हिड, या साऱ्यांचा हा चित्रपट पाहून झाल्यावर, शेवटाकडं आल्यावर मला आरती प्रभूची कविता आठवली.

भारवाही म्हणून चालताना
विचार करु नये
भार कशाचा वाहतोय त्याचा.

सगळा भार वाहून नेताना
एखाद्या गवताच्या हिरव्यागार पात्याला
विचारावं,
"तू कसा वाकतोस?"

आणि पहाटेच्या प्रहराला,
उत्तरासाठी हात पुढे करावा त्याच्यासमोर.
हाताच्या तळव्यावर पडेल एक दंवबिंदू नम्रपणे
तीर्थासारखा..

खूप आहे खूप आहे हा दंवबिंदू
प्रेमस्वरुप..
सगळा भार वाहून नेताना.

~अवंती

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अप्रतिम रसग्रहण केलेले आहेस. कविता तर खासच पण बारकावे, त्यावरचे चिंतन मस्त. सिनेमा बघेनही. कारण उत्सुकता वाढलीआहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वण्डरफुल परीक्षण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0