जग गेले उडत!

आज रविवार होता. कदाचित शनिवारही असेल. काय फरक पडणार होता? काही वाटेल ते झालेतरी तरी तो आज काम करणार नव्हता. उठून चहा करून घ्यावा असं वाटलं होतं पण नाही उठला. अंथरुणात लोळत पडण्यातली मजा काही औरच. अर्धवट झोपेत अर्धवट.....
तेवढ्यात टेलिफोन वाजला. त्याने घड्याळात पाहिले. जवळ जवळ दहा वाजत होते. आता कोण फोन करत होतं? टेलेफोन वाजायचा थांबला. चला सुंठीवाचून खोकला गे ... पुन्हा घंटी वाजायला सुरुवात झाली. आता घ्यायलाच पाहिजे. त्याने आळसटलेल्या हाताने फोन उचलला.
“हॅलो साहेबगारू, चला लवकर ऑफिसला या. मी पण येतोय. चांगली बातमी आहे. फंडिंग मिळणार अशी चिन्हं आहेत. आजच्या आज काही कागद बनवायचे आहेत आणि कुरिअर करायचे आहेत.”
“रामू, आज रविवार आहे.... उद्या नाही का होणार?” ऑफिसला जायचे अगदी जीवावर आलं होतं.
“असा कसा रे तू? हाता तोंडाशी आलेला घास...?”
“येतो येतो.” त्याचे बरोबर होतं. ते दोघे फंडिंगविना संशोधन पुढे नेणार कसे? “उडप्याकडे जाऊन काही खातो आणि येतो.”
उठून चहा बनवला. चहा प्याल्यावर थोडा उत्साह आला. फंडिंग मिळत असेल तर मग घरी बसायची तरी वेळ येणार नव्हती. घाई करायला पाहिजेच. रामू वाज राईट.
थोडक्यात आवरले. महत्वाचे कागद आणि फाईली घेतल्या आणि तो बाहेर पडला.
उडप्याच्या हॉटेलात स्वस्थ बसून नाश्ता करावा, खाता खाता प्रेझेंटेशन बद्दल विचार करावा, फंडिंगवाले संशोधनाचा सोशल रिलेव्ह्ंस विचारणार याची त्याला खात्री होती. मानवसमाजाचे दुःख थोडे कमी व्हावे एव्हढाच माफक हेतु. तो कसा मांडावा? विचार, विचार, विचार.
त्याने इडली, डोसा आणि कडक कॉफीची ऑर्डर दिली.
समोर एक तरुण जोडपे बसले होते. तो असेल पंचवीसचा आणि ती असेल विशीची. रंग गोरापान.त्याला पाठीमागून तेव्हढेच जाणवले. विचारात व्यत्यय. ती तरुणाला मोबाइल वरचे फोटो दाखवत असावी.
“हा पहा. किती क्यूट आहे ना? गोल्डन रिट्रिव्हर आहे. किती लाईक्स मिळाले आहेत बघ.” ती सांगत होती हा ऐकत होता.
मधेच तरुणाने मागे वळून त्याच्याकडे बघितले. दोघांच्या नजरा भिडल्या. तरुण ओशाळला. त्याने चटकन मान वळवली.
आता ती त्या तरुणाला अगदी खेटून बसली. तिचे कुरळे केस तरुणाच्या गालाला स्पर्श करत होते.
च्यायला उगाच आपण इथे आलो.
“आणि हा बघ. हा माझ्या फ्रेंड्स ना खूप आवडला. हा आता जाईल स्पर्धेत.”
“खरच तू खूप सुंदर दिसतेस.आणि पाठीमागचे ते पिंपळाचे झाड आहे का? का उंबराचे? छान डेरेदार दिसते आहे.”
“तू म्हणजे जोकी आहेस. देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा तू टॉयलेट गेला असणार. अरे वेड्या ते वडाचे झाड आहे. बायका ज्याला दोरा गुंडाळतात तो वड. ह्याचे तेल काढून ते वांग्याच्या भरीतात टाकतात तो.” ती त्याच्याकडे सिरिअस पण बालिश चेहरा करून बोलली. काहीतरी समजल्यासारखे दोघेही एकदम हसायला लागले. “सोडून दे रे. असे चू एक धुंडो तो हजार मिलते है. बंदर क्या जाने अदरखका स्वाद!” पुन्हा दोघे खळखळून हसायला लागले. त्याला तिचा हा भाव मस्त आवडायचा. सिरिअस पण बालिश. सध्या अशा तरुणी विरळाच! त्याने खूप ट्राय केला असे भाव आणायचा. शेवटी त्याला समजले कि हे बायकाच करू जाणे.
“आता सिरिअस बोलतो आहे मी. हा ड्रेस तुला शोभून दिसतो आहे. पण एक सांगू का?”
“अरे सांग ना.”
“त्या मधल्या दृश्याने सगळा मजा किरकिरा झाला बघ.” तो तरुण मनापासून बोलत होता.
“अरे तीच तर मजा आहे. मीना काय म्हणते की त्या दृश्याने माझे सौंदर्य अजून निखारले आहे. तुला माहित आहे पॅरीस मध्ये सुंदर स्त्रिया बरोबरीने एका कुरूप स्त्रीला कंपॅनिअन म्हणून बरोबर घेत असत. तेव्हाची फॅशन!!”
तिने मोबाईल बंद केला. “नाऊ बी सीरीअस. बाबा विचारत होते की तुझ्या USA पोस्टिंगचे काय झाले.”
“चल, आपल्याला अजून खूप शॉपिंग करायचे आहे. वर डिनरचा कार्यक्रम आहे. उशीर होईल.”
त्याला उत्तर द्यायचे नव्हते हे उघड होते. दोघेही बाहेर पडले.
वेटर बिल घेऊन आला. “एक कॉफी घेऊन ये.”
कॉफी पिता पिताना त्याने प्रोजेक्टचे कागद पुन्हा चाळले.
प्रोजेक्ट सिरिअस होती पण काही लोकांना ती बालिश वाटत होती. समांतर विश्वाची कल्पना मांडणाऱ्या एवेरेटची पण लोकांनी अशीच चेष्टा केली होती. त्याच्या स्वतःच्या डिपार्टमेंटमध्ये निअँनडरथाल आणि मिसिंग लिंक होतेच! त्याने टॅक्सी बोलावली ती हॉटेल समोर थांबली असावी.
चला जायची वेळ झाली होती.
टॅक्सीचा दरवाजा उघडून तो आत बसला. ड्रायव्हरने काहीही विचारले नाही. कदाचित त्याला माहीत असावे कुठे जायचे ते.
टॅक्सी थांबली. तेव्हा तो दिवास्वप्नातून जागा झाला. समोर पोलिसांनी अडथळे लावले होते. दोन पोलीस लाठ्यांवर रेलून गप्पा मारत होते. टॅक्सी बघून एकजण पुढे झाला. त्याने ड्रायवरलां निरखून बघितले.
“काय रे भडव्या दिसत नाही. नाकाबंदी आहे ती?” हवालदाराने लाठी मडगार्ड वर आपटत आवाज लावला.
“हवालदार साहेब, भाडं बसवले आहे. माहीत असतं तर नसतं घेतलं.” ड्रायवर हात जोडून बोलला.
“साहेब कुठपोत्तर जायचे आहे?” जंटलमन माणूस बघून हवालदाराच्या आवाजात थोडं मार्दव आले असावे.(असं आपलं त्याला वाटलं.)
“युनिवर्सिटीला. औंधला.”
कॉन्स्टेबल वॉज सुटेब्ली इम्प्रेसेड.
“त्याच काय आहे. इकडे फायरिंग झाले आहे.”
“फायरिंग? अन ते कशापाई?”
“दोन मिरवणुका भिडल्या. झाली हाणामारी.”
जग कुठे जातेय आणि हे कुठे?
“तुम्ही असं करा ही बाजूची गल्ली पकडा. डावी उजवी करत सरळ खडकीला पोचा. तिथून मग औंधला. तो रूट सेफ पडेल. लांबचा फेरा पडेल पण सेफ रहाल. अबे ओ, साहेबाला नीट घेऊन जा. चल लायसन काढ.” हवालदाराने डिटेल लिहून घेतले.
डावी उजवी करा. आपलं मुक्कामाचे ठिकाण आले की बस. तोपर्यंत डावी उजवी.
ड्रायवरने गाडी मागे घेऊन गल्लीत घातली. मधेच त्याला फोन आला. त्याने गाडी बाजूला घेवून थांबवली.
“हा बोल......अरे बापरे. तुम ऐसा करो. अभी गाडीमे भाडा लीयेला है. तू अब्बास चाचाला घेऊन आगे निकल. मै सीधा वहीच पहुचा. क्या समझी ना.” त्याने पाण्याची बाटली काढली. थोडं पाणी तोंडावर शिपडले. एक घोट प्याला.
“साहेब, मै एक कटिंग मारके आया .अभी गया और अभी आया.”
ड्रायव्हर गेला. चहाच्या ठेल्या जवळ एक बाकडं होते त्यावर बसला. दोनी हातांनी डोके गच्च धरून बसला.
त्याला जबरदस्त इच्छा झाली की विचारावे, काय झाले? कुणाचा फोन होता? पण मध्यमवर्गीय भिडस्त स्वभाव आडवा आला. त्यापेक्षा मोबाईल बघावा. त्याने मोबाईल उघडला. कुठले पान होते कुणास ठाऊक, गार्डीअन असेल वा सीएनएन असेल. वॉशिंटन पोस्ट असेल. पुणे वार्ताहार सुद्धा असेल.
पहिल्या पानावरच तिचा फोटो होता. तीच ती. नो डाऊट! तेच ते अपरं नाक, तीच ती जिवणी, कुरळे केस. मागे ते वडाचं झाड, त्या दोघांच्या मध्ये सायकलवर पांढऱ्या कापडात बांधलेली डेड बॉडी. हॅंडलपासून सीटला बांधलेली. सायकल धरून जाणारा तरुण मागे खाली मान घालून चाललेली कोणी एक बाई. जणू काय सगळा दोष तिचाच होता.
क्यामेरात बघून स्माईल देणारी सुंदरी, मागे पुरातन वड साक्षीला. मध्ये मृत्यू. त्या फोटोमध्ये जिवंतपणाची एकच खूण होती ती म्हणजे ती डेड बॉडी!!
हाच तो डेथली कॉन्ट्रास्ट! पहील्या क्रमांकाच्या बक्षिसास पात्र फोटो.
त्याच्या पोटात ढवळून आले. आतून कोणीतरी बाहेर पडण्यासाठी तडफडत होते. टॅक्सीवाला चहा पिऊन परत आला होता. टॅक्सीचा दरवाजा उघडून तो बाहेर पडला. तोल जात होता. तसाच रस्त्याच्या कडेला कसाबसा पोचला. इलेक्ट्रिकच्या खांबाला पकडून त्याने वाट करून दिली. सकाळचा डोसा, इडली, दोन कॉफ्या उलटून पडले तेव्हा कुठे आराम पडला. हिरवट पिवळा रंग. ड्रायव्हर पाण्याची बाटली घेऊन धावत आला.
“चूळ भरा साहेब. बर वाटेल. चला तिकडे सोडा लेमन घ्या. पोटातली खलबली शांत होईल.”
ड्रायव्हरने गाडी रिवर्स मध्ये घेतली, “बंद गली है जणू.”
डेड एंड!!
असं डावी उजवी करत गाडी चालली होती. शेवटी युनिवर्सिटीचे मुख्य द्वार आले.
“साहेब, आत घालू की कसं?”
“कुठे आत बाहेर नको करू. सरळ मला जिथून उचललेस ना, तिथे परत चल.”
“परत कॉलनीत?”
यू टर्न मारून गाडी परत चालली.
रामूचा फोन होता. त्याने फोन स्वीच ऑफ केला. आता कशाची गरज नव्हती.
क्रीस्पर वापरून जीन्स बदलायची गरज नव्हती. क़्वांटम मेकॅनिक मधून वास्तवाचा शोध घायची गरज नव्हती. आंग्रे घराण्याचा कुलवृत्तांत संशोधित करायची गरज नव्हती. मराठी साहित्यातील दलितांचा आवाज उठवण्याची ..... कशाची म्हाणजे कशाचीही.
आपण निअॅंदरथाल जास्त आणि होमो सेपिअंस कमी असतो तर?
मधेच इराण्याचे रेस्टारंट दिसले. ड्रायव्हरने गाडी थांबवली. “थोडा चहा नाश्ता. पोटात काहीतरी पाहिजे.”
ह्याला माझ्या मनातली खलबली दिसली की काय
गल्ल्यावर लालबुंद चेहऱ्याचा इराणी गल्ल्यातल्या सुट्ट्या नाण्यांना कुरवाळत बसला होता.
“ड्रायव्हरसाहेब, तुम्हाला घरी लवकर पोहोचायची घाई होती न?”
“वो ऐसाच. असलमे क्या है न. मेरे जानेसे या नही जानेसे कोई फरक नही गिरता साहेब! होनी को कोई टाल सकता है क्या?”
“ये भी दुरुस्त है फिरभि......”
जो खाएगा उसका भी भला, जो नाही खाएगा उसका भी भला. तू काही केले नाहीस म्हणून जग थांबणार नाहीये. रामू त्याला म्हणायचा आईन्सटाईनने “ते“ समीकरण शोधून काढले. ठीक आहे. त्याने काढले नसते तर अजून कोणी शोधले असते. जगाचे कुणावाचून अडत नाही. जग गेले झालनात. आपण थोडाच त्याला सुधारायचा मक्ता घेतला आहे? एवढे प्रेषित आले, धर्मगुरू आले, महात्मा आले नि गेले, काय झाले? पाच हजार वर्षांपासून जे चालले आहे ते तसेच चालणार!!
मग जगायचे कसे?
त्याचे काय आहे जगायला नशा पाहिजे. कुणाला प्रेमाचा तर कुणाला दुखाःचा. कुणाला तंबाखूचा. कुणाला दारूचा. अफू गांजा, चरस, धमटा, लसडा, लाल परी....
तसं मला नशा संशोधनाचा! लॅबच्या बाहेर मला कुत्रं सुध्दा विचारणार नाही. पर्वा इल्ले. लॅब हेच माझे घर. Home, sweet Home!
त्याने रामूला फोन लावला.
“साहेब, तुमचे मुक्कामाचे ठिकाण आले”
Indeed! He has arrived.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet