दुसऱ्या लाटेचा मागोवा ...

सध्या, विशेषतः कोरोना महासाथ काळात अशास्त्रीय पद्धतीने, अशास्त्रीय लेख, बातम्या लिहिल्या जाणे हे नवीन नॉर्मल झालेले आहे. यात अर्धवट माहितीच्या आधारे भडक ब्रेकिंग न्यूज देणारे चॅनेल्स आहेतच, पण काही मित्र असलेली वर्तमानपत्रेही याला अपवाद नाहीत. विषय नवीन, शास्त्रज्ञांनाही हळू हळू आकळत असलेला.. यामुळे असले लिखाण करणार्यांना मोकळं रान... या पार्श्वभूमीवर श्री. किरण लिमये यांनी दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्रातील घेतलेला मागोवा (जो जवळजवळ रोज त्यांच्या फेसबुक वॉलवर येत असे) उठून दिसतो. एप्रिल महिन्यात अधूनमधून आणि मे महिन्यात दररोज प्रसिद्ध झालेल्या माहितीवर आधारित त्यांनी लाटेचा उत्तम मागोवा घेतला. पूर्णपणे विदाधारित (डेटा बेस्ड) मागोवा होता हा. खरं तर, राज्याच्या टास्क फोर्समध्ये असा मागोवा घेण्याची क्षमता असणारे कुणी असेल तर त्याचा साथ नियंत्रणात नक्कीच फायदा होईल. ऐसीच्या वाचकांच्यासाठी त्याचा हा मागोवा संक्षिप्त स्वरूपात देत आहोत. श्री. किरण लिमये त्यांच्या पोस्टबरोबर रोज विविध आलेखही जोडत. ते मात्र जागेअभावी देता येत नाहीयेत. - ऐसी अक्षरे




१८-४-२०२१
हा महाराष्ट्राच्या ३ महानगरी जिल्ह्यांतील आणि अन्य जिल्ह्यांतील कोव्हीडच्या प्रसाराचा आलेख आहे. R(t) म्हणजे अमुक एका दिवशी, म्हणजे समजा t=१० एप्रिल २०२१, कोव्हीडबाधित व्यक्ती सरासरी किती नव्या व्यक्तींना बाधित करण्याची शक्यता आहे ह्याचे मोजमाप. प्रसाराचा वेग/दर असं आपण ह्याला म्हणू शकतो. हा दर १ पेक्षा जास्त असेल तर नव्या बाधित व्यक्ती वाढत जाणार. कारण समजा हा दर असेल १.१ असेल तर १०० व्यक्तींकडून ११०, त्यांच्याकडून १२१ अशी वाढ होत जाईल. त्याउलट हा दर १ पेक्षा कमी असेल तर केसेस घटणार आहेत. सोबतच्या चित्रात दिसतंय तसं मुंबई आणि ठाणे इथे प्रसारदर १ पेक्षा कमी झालेला आहे. पुणे जिल्ह्यात तो १ हून कमी होऊन परत वाढताना दिसतो आहे. आणि महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यात तो १ हून जास्तच आहे.
थोडक्यात दुसरी लाट मुंबई महानगर परिसरात ओसरताना दिसते आहे, पण महाराष्ट्राच्या बाकी जिल्ह्यांत परिस्थिती बिघडते आहे. चिंतेची बाब ही आहे कि गैर-महानगरी जिल्ह्यांतला प्रसारदर घटणे थांबून तो स्थिर होतो आहे असं दिसतंय. तसंच चित्र मुंबईत दिसतंय, पण तिथे केसेस घटण्याची सुरुवात आहे असे संकेत आहेत.
मुंबई महानगर परिसरात दुसरी लाट ओसरते आहे ह्याचं श्रेय अर्थात निर्बंध! एप्रिल ६ पासून महाराष्ट्रात निर्बंध आले. त्याचे परिणाम मुंबईत दिसत आहेत. ६ एप्रिलपासून केसेस कमी होण्याचा ट्रेंड सुरू झालेला आहे. तशीच अवस्था मुंबईची स्वस्त आणि कालमागास प्रतिकृती असलेल्या ठाणे जिल्ह्यातही दिसत आहे. मग बाकी जिल्ह्यांत ही अवस्था का नाही?
विषाणूप्रसार हा ऑफिसेस, प्रवाससाधने, मनोरंजन सेवा, समारंभ,आणि व्यक्तींच्या घरगुती भेटी ह्यातून होतो. महानगरात ऑफिसेसचा प्रसारातील वाटा मोठा आहे आणि ही ऑफिसेस बंद ठेवणे शासनाला सहज शक्य होते. तसंच मोठ्या स्तराच्या मनोरंजन सेवाही बंद ठेवल्या जातात.
गैर-महानगरी भागांत लॉकडाऊन तीव्रतेने राबवणे कठीण आहे. विशेषतः ग्रामीण भागांत तर गावाच्या अंतर्गत विषाणूप्रसार सुरू झाला असेल तर त्याला आळा घालणे कठीण होऊ शकते.
महानगरांना मोठे राजकीय मूल्य असते कारण तेथील घडामोडी माध्यमांत जास्त चर्चिल्या जातात. साहजिक लॉकडाऊन राबवायची राजकीय इच्छाशक्ती तिथे जास्त असते.लोक दट्ट्या दिल्याशिवाय त्यांचे स्वाभाविक वागणे बदलत नाही आणि सरकारची दट्ट्या द्यायची क्षमता ही महानगरांपासूनच्या अंतराच्या व्यस्त प्रमाणात असते.
प्रसारदरांची सध्याची अवस्था पाहता गैर-महानगरी जिल्ह्यांच्या निमशहरी आणि ग्रामीण भागात विषाणूप्रसार होत आहे आणि त्याला थांबवायला लॉकडाऊन प्रभावी ठरत नाही असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.
मुंबई महानगर परिसरात केसेस कमी होत आहेत ही थोडी बरे वाटण्याची बाब असली तरी त्यामुळे आपण पुढे जाऊन पेचात पडणार आहोत. निर्बंधांच्या १ आठवड्याने केसेस १०% ने कमी झाल्या आहेत. या आठवड्यापासून आलेल्या स्युडो-लॉकडाऊनने समजा पुढच्या २ आठवड्यांत त्या थोड्या अजून वेगाने कमी होतील. समजा, ३० एप्रिल २०२१ ला मुंबईत ६००० केसेस आल्या. मग १ मे २०२१ पासून काय करायचं? निर्बंध यशस्वी ठरले म्हणून ते तसेच राबवायचे, तीव्र करायचे का काढून टाकायचे? निर्बंध ठेवणे म्हणजे लोकांचा रोष. निर्बंध काढले कि परत केसेसची वेगवान वाढ व्हायची शक्यता. लॉकडाऊनचा परिणाम नसेलच तर निवड सोपी आहे. पण असेल तर कठीण आहे.

२१-४-२०२१

महाराष्ट्रातील कोव्हीडस्थिती आणि येऊ घातलेले लॉकडाऊन
हा महाराष्ट्राच्या ३ महानगरी जिल्ह्यांतील आणि अन्य जिल्ह्यांतील कोव्हीडच्या प्रसाराबाबतचा २० एप्रिल २०२१ चा आलेख आहे. R(t) म्हणजे अमुक एका दिवशी, म्हणजे समजा t=१० एप्रिल २०२१, कोव्हीडबाधित व्यक्ती सरासरी किती नव्या व्यक्तींना बाधित करण्याची शक्यता आहे ह्याचे मोजमाप. प्रसाराचा वेग/दर असं आपण ह्याला म्हणू शकतो. हा दर १ पेक्षा जास्त असेल तर नव्या बाधित व्यक्ती वाढत जाणार. कारण समजा हा दर असेल १.१ असेल तर १०० व्यक्तींकडून ११०, त्यांच्याकडून १२१ अशी वाढ होत जाईल. त्याउलट हा दर १ पेक्षा कमी असेल तर केसेस घटणार आहेत.
आलेखात दिसतंय तसं मुंबई महानगर परिसरात (मुंबई महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा) प्रसारदर १ हून कमी आहे, म्हणजेच दैनंदिन रुग्णसंख्येचा कल हा घटतो आहे. पुण्यात कमी पण वाढता कल आहे असं दिसतं आहे. महाराष्ट्राच्या अ-महानगरी जिल्ह्यांत मात्र रुग्णसंख्या वाढतेच आहे, पण वाढीचा वेग सावकाश घटतो आहे. ह्याआधी १७ एप्रिलची अवस्था होती तशीच ही अवस्था आहे, फक्त ठाणे जिल्ह्यातील अवस्था सुधारलेली आहे.
मुंबई महानगर प्रदेशात निर्बंधांचा फरक दिसतो आहे, पण बाकी जिल्ह्यांत नाही असा एक निष्कर्ष काढता येईल. असं होत असेल तर त्याचं एक स्पष्टीकरण आहे कि निर्बंध राबवायची सरकारी क्षमता ही महानगरी भागांत सर्वाधिक आहे आणि बाकी भागांत कमी. शिवाय महानगरी भागांत ऑफिसेस, प्रवास, मनोरंजन ह्यांचा विषाणूप्रसारात मोठा वाटा असतो. ऑफिसेस, प्रवास थांबले कि विषाणूप्रसाराला स्वाभाविक आळा बसतो.
आजपासून म्हणजे २१ एप्रिल २०२१ पासून लॉकडाऊन करण्यात येईल अशी चर्चा आहे, आणि कदाचित तसं होईलच. मुंबई महानगर भागांत सध्या केवळ किराणा/अन्नसामान ह्यांची दुकाने सुरू आहेत आणि तीही सकाळी ७ ते ११. ह्यांत लॉकडाऊनने अजून काय बदल होईल?
आंतर-जिल्हा वाहतूक बंद होऊ शकते आणि त्याचा कदाचित फरक पडेल, विशेषतः अ-महानगरी भागात. पेट्रोल पंपावरून मिळणारे पेट्रोल मर्यादित होणे, संचार करायला पासची गरज, विविध छोटे रस्ते बंद केले जाणे, मोठ्या बाजारपेठा बंद, घरगुती कर्मचारी बंद ह्याही गोष्टी होऊ शकतात. मागच्या वर्षी असे निर्बंध होते आणि त्यातून रुग्णवाढीचा दर कमी होतो हे आपण पाहिलेलं आहे.
मुद्दा हा आहे कि हे लॉकडाऊन नेमकं काय साधणार आहे? केसेस इस्पितळक्षमतेच्या कमाल पातळीच्या खाली आणणं हा लॉकडाऊनचा स्वाभाविक उद्देश आहे. म्हणजे केसेस कमाल पातळीच्या ८०%, ५०% अशा काही एक पातळीला येईपर्यंत लॉकडाऊन राबवणे. लॉकडाऊनने प्रसाराचा वेग कमी करणे आणि इस्पितळक्षमता वाढवणे असे दोन उपाय त्यासाठी करायला लागतील.
कोणत्याही निर्बंधांचे परिणाम दिसायला किमान आठवड्याचा कालावधी जावा लागतो. म्हणजे २२ एप्रिलपासून जर लॉकडाऊन सुरू होणार असेल तर त्याचा परिणाम १ मे पासूनच दिसेल. मग वांछित क्षमतेपर्यंत केसेस कमी होईपर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवणे. जर ह्याच वेळेत इस्पितळक्षमता वाढली तर हा कालावधी कमी होईल. किमान ३ आठवडे म्हणजे १२ मे २०२१ पर्यंत तरी हा लॉकडाऊन असू शकेल, कदाचित जास्त. १५-१० दिवसांच्या लॉकडाऊनने काय झालंय हे नीट कळतंच नाही आणि म्हणून तो उपयोगी नाही.
अर्थात लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला स्वाभाविक राजकीय मर्यादा आहेत. पण कमी दिवसांचा लॉकडाऊन असेल तर काहीच दिवसांत स्थिती ‘ये रे माझ्या मागल्या’ होऊ शकते. १ मेपासून लसीकरण सुरू होणार आहे आणि त्यामुळे काही दिवसांनी, म्हणजे १५ मे पासून लसीकरण हा अजून एक अडथळा आपण विषाणूप्रसारात आणू. चांगल्या प्रमाणात लसीकरण आणि दैनंदिन केसेसची कमी संख्या अशा अवस्थेला निर्बंध सैल करणं हा लॉकडाऊन थांबण्याचा योग्य बिंदू असू शकतो. पण तो केव्हा येणार हे फार अनिश्चित आहे. मे २०२१ च्या शेवटपर्यंत आपल्याला लॉकडाऊन, निर्बंध असं काहीतरी सहन करावेच लागेल असा माझा कच्चा अंदाज आहे.
खरंतर महाराष्ट्रातील कोणते जिल्हे कशा प्रकारचा विषाणूप्रसार दर्शवत आहेत ह्यानुसार निर्बधगट तयार करणे अधिक योग्य राहील. दर २ आठवड्यांनी ते बदलता येऊ शकतात. त्यातून लोकांना थोडी उमेद मिळेल. आजवर केसेस न आढळलेली किंवा अगदी कमी केसेस असलेली गावे असतील तिथे केसेस पोचणार नाहीत हे पाहावं लागेल. सरसकट निर्बंधांचा आंधळा बडगा वापरण्यापेक्षा माहितीच्या विश्लेषणाच्या आधारे कानोसा घेऊन निर्बंधांची विविधता वापरणं अधिक प्रभावी ठरू शकेल. अर्थात आग आणि जरा कमी भाजणारा फुफाटा अशीच आपली निवड आहे, जोवर आपण लसीकरणाच्या सावलीत पोचत नाही.

२२-४-२०२१

महाराष्ट्र कोव्हीड स्थिती - महानगरी आणि अ-महानगरीची दरी
महाराष्ट्रात ६ एप्रिल २०२१ पासून राज्यव्यापी निर्बंध लागू झालेले आहेत. त्यांची तीव्रता दर आठवड्याला वाढते आहे. मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या तुलनेत आता पेट्रोल सहज उपलब्ध असणं हीच एक बाब बाकी असावी. (२१ एप्रिल २१ ला रात्री आंतर-जिल्हा प्रवासाबाबतही काही निर्बंध आलेले आहेत.)
अनेक जिल्ह्यांत ६ एप्रिलच्या अगोदरच काही ना काही प्रमाणात निर्बंध आलेले होते. निर्बंधांच्या २ आठवड्यानंतर महाराष्ट्रात कोव्हीडच्या दृष्टीने जिल्हाशः काय अवस्था आहे?
सोबतच्या आलेखात ३४ जिल्ह्यांची २१ एप्रिल २०२१ ची स्थिती आहे. (हिंगोली जिल्हा डेटा इश्यूमुळे नाहीये.) ३४ पैकी ९ जिल्ह्यांत प्रसारवेग R(t) हा एकपेक्षा कमी आहे, म्हणजे तेथे केसेसचा कल कमी होण्याचा आहे. २५ जिल्ह्यांत कल रुग्णसंख्या वाढीचा आहे. पुणे, नाशिक आणि नागपूर ह्या तिन्ही जिल्ह्यांत मिळून २८% रुग्ण सापडले आणि तिन्ही ठिकाणी संख्यावाढीचा कल आहे. मुंबई आणि ठाणे मिळून २२% रुग्ण आहेत जिथे संख्या घटण्याचा कल आहे. गोंदिया आणि गडचिरोली, जे प्रामुख्याने ग्रामीण जिल्हे आहेत, तिथे केसेस वाढताना दिसत आहेत. मुंबई, जो पूर्णतः शहरी जिल्हा आहे तिथे केसेस घटताना दिसत आहेत. म्हणजेच निर्बंधांचा परिणाम शहरांत दिसतो आहे आणि शहरांच्या बाहेर कमी अशी शक्यता आहे.
दुसरी शक्यता ही आहे कि महानगरी भागांत रुग्ण रुग्णालयात लवकर दाखल होतात. सोबत मृत्यू दराचा एक आलेख आहे. त्यात दिसत आहे कि मुंबई-ठाणे-पुणे येथील मृत्यूदर हा बाकी भागापेक्षा कमी आहे. (मृत्यूदर = आजचे मृत्यू/१४ दिवसांपूर्वीच्या केसेस). ह्याचं कारण रुग्णांना लवकर कोव्हीड स्पेसिफिक उपचार मिळणं हे असू शकतं. रुग्ण जितका उशिरा कोव्हीड आरोग्यरचनेत दाखल होतो तितका तो अधिक काळ संक्रामक राहतो. ग्रामीण भागांत टेस्टिंग, विलगीकरण आणि आरोग्यसुविधा वाढवणं ह्याला पर्याय नाहीये.
शहरांची दुःखे मिडिया मांडतोय. ही दृश्ये विदीर्ण करणारी आहेत. महाराष्ट्रात मुंबई-ठाणे-पुणे-नाशिक-नागपूर मिळून ५०% केसेस आहेत. (२१ एप्रिल २१ रोजी). उरलेली अर्धी दुःखे आपल्याला दिसतही नसावीत किंवा भोगणाऱ्याना ती कळतही नसावीत.

२४-४-२०२१

लॉकडाऊनमुळे, लोकांच्या संचारस्वातंत्र्यावर घातलेल्या निर्बंधामुळे कोव्हीड-१९ च्या साथीत काही फरक पडत नाही असं अनेकांचं मत असतं. त्यांच्या मताचा पुरावा सोपा असतो, लॉकडाऊन असूनही कुठे केसेस घटत आहेत. Counter-factual किंवा प्रतीतथ्य म्हणजे समजा निर्बंध न आणता जसं चालू आहे असं चाललं असतं तर काय झालं असतं हे पटकन लक्षात येत नाही, इतके आपण वस्तुस्थितीने गारद झालेले असतो.
पंजाब आणि महाराष्ट्र ह्या दोन्ही राज्यांत साधारण फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून किंवा थोडं आधीच केसेस वाढायला सुरुवात झाली. (सोबतचा आलेख पहा.) सुरुवातीला महाराष्ट्रात प्रसारदर, म्हणजे एका कोव्हीड positive व्यक्तीकडून सरासरी किती नव्या व्यक्तींना विषाणूसंक्रमण होईल, हा महाराष्ट्रात अधिक होता. पंजाबने आजही राज्यव्यापी निर्बंध (=स्युडोलॉकडाऊन!) आणलेले नाहीत. नाईट कर्फ्यू आणि स्थानिक (शहर/जिल्हे) लॉकडाऊन हेच उपाय आहेत. महाराष्ट्रात मार्चच्या उत्तरार्धापासूनच जिल्हाशः निर्बंध आले होते. ६ एप्रिलपासून राज्यव्यापी निर्बंध-१, निर्बंध-२ अशा आवृत्या येत आहेत. सोबतच्या आलेखात फरक स्पष्ट आहे. पंजाबमध्ये एप्रिलमध्ये प्रसारदराने उसळी मारलेली आहे. महाराष्ट्रात स्थानिक निर्बंधांनी खाली येऊ लागलेला प्रसारदर राज्यव्यापी निर्बंधांच्या काळात कमी होत आहे. अर्थात तो १ पेक्षा अधिक आहे आणि त्यामुळे केसेस वाढतच आहेत. पण प्रतीतथ्य अजून विदारक असते.
पंजाबमध्ये नव्या केसेस दुप्पट व्हायचा दर २३ एप्रिल २०२१ रोजी १० दिवसांचा आहे तर महाराष्ट्रात ५ आठवड्याहून जास्त. हे निर्बंधांनीच घडले आहे असे causal विधान करता येणार नाही, पण व्यापक निर्बंधांचा अभाव काय करू शकतो ह्यासाठी पंजाबचे उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे.
लोकांच्या परस्परसंपर्कातून पसरणाऱ्या रोगाच्या प्रसाराला लोकांचा परस्परसंपर्क घटवणारे कोणतेही धोरण आळा घालेल हा (दुर्मिळ असा) कॉमनसेन्स आहे. आळा घालेल म्हणजे केसेस कमी होऊ लागतील का जे घडलं असतं त्यापेक्षा सावकाश वाढू लागतील हा तपशिलातला सैतान आहे, लक्षात घेतला कि नष्ट होणारा.

२६-४-२०२१

महाराष्ट्रात सुरु असलेले निर्बंध (=स्युडोलॉकडाऊन) हे ३० एप्रिलपर्यंत असणार आहेत. येत्या शुक्रवारी म्हणजे ३० एप्रिलला हे निर्बंध पुढे असणार का नाही हे कळेल. निर्बंधांच्या मागच्या ३ आठवड्यांत महाराष्ट्रात काय घडलंय त्यासाठीचे काही आलेख सोबत जोडलेले आहेत.
महाराष्ट्रातील रुग्णवाढीचा दर खालावायला सुरुवात होईल अशी चिन्हे आहेत, but it is too early to tell. Active केसेससुद्धा स्थिरावत आहेत. (आलेखात active केसेस आणि डेली केसेसचे अक्ष वेगवेगळे आहेत! पण त्यांचा आकार सारखा आहे हे एवढंच दर्शवतं कि दैनंदिन केसेस घटणे हे active केसेस घटायला आवश्यक आहे!) अर्थात ह्यात आश्चर्य नाही. 15 एप्रिलपासून लॉकडाऊनसदृश्य निर्बंध आले होते आणि 8 दिवसांत त्यांचा काही एक प्रभाव दिसणे शक्य आहे.
चाचण्यांमध्ये रुग्ण सापडण्याचा दर खालावत आहे (TPR ) ही आशादायी बाब आहे. पण महाराष्ट्रात दररोज होणारे मृत्यू हे पहिल्या लाटेहून अधिक झालेले आहेत. मृत्यूदर (नक्की झालेल्या केसेसचा) बराच कमी आहे, पण मागच्या आठवड्यात त्यातही वाढ दिसते आहे. मृत्यू वाढणं हे केसेस वाढण्याचं स्वाभाविक फलित आहे, पण मृत्युदर वाढणं हे नाही. रुग्णांना उपचार उशिरा मिळणं आणि आवश्यक ते उपचार न मिळणे ह्याचा वाढत्या मृत्यूदराशी संबंध आहे का हे पहायला हवं.
मी आधी म्हटले आहे तसे महानगरी महाराष्ट्र आणि अन्य महाराष्ट्र इथे निर्बंधांचे परिणाम वेगवेगळे आहेत. १२ जिल्ह्यांत प्रसारदर १ पेक्षा कमी आहे आणि २२ जिल्ह्यांत जास्त, म्हणजे तेथे केसेस वाढण्याचा कल आहे. मुंबई, ठाणे, पुणे ह्या जिल्ह्यांत केसेस घटण्याचा कल स्पष्ट दिसत आहे, विशेषतः मुंबई! बुलढाणा जिल्ह्यात आजच्या घडीला सर्वात जास्त प्रसारदर आहे. बुलढाण्यात दोनदा केसेस घटून वाढलेला आहेत. (सोबतच आलेख बघा.)
मृत्यूदर घटणे, active केसेस घटणे हे महत्वाचे असणार आहे. सुचिन्हे आहेत, पण लसीकरणाची धांदल आणि आर्थिक चक्र गतिमान करण्याची निकड ह्यामुळे प्रसाराला परत गती येऊ शकते हे लक्षात घेऊन पुढचा मार्ग ठरवायला लागणार आहे. आरोग्यसुविधा वाढवणे ह्याला पर्याय नाही आणि ज्या जिल्ह्यांत अधिक गरज आहे तिथे त्या वाढणे महत्वाचे आहे.

२७-४-२०२१

महाराष्ट्रातल्या 'ब्रेक द चेन' च्या पहिल्या टप्प्याला संपायला ३ दिवस उरले आहेत. २६ एप्रिल २०२१ ला नवी रुग्णसंख्या ६५००० च्या सवयीच्या आकड्याहून एकदम २५% कमी म्हणजे ४८७०० आली. पण हा विकेंड इफेक्ट होता. Test positivity rate (TPR) म्हणजे सापडलेल्या केसेस आणि केलेल्या टेस्ट्स ह्यांचा रेशो २६ एप्रिलला फार काही कमी नव्हता. TPR हा विषाणूप्रसार किती दाट किंवा सर्वंकष झाला आहे ह्याचे ढोबळ परिमाण आहे. सोबतच्या चित्रात दिसेल कि दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला TPR ५% होता, म्हणजे २० मधील १ टेस्ट positive येत होती. आज हा दर २२-२३% आहे. एप्रिलच्या सुरुवातीला ३०% होता. ही घट आहे, पण तशी सावकाश आहे.
चिंतेची बाब आहे ती म्हणजे २२ जिल्ह्यांत केसेस वाढण्याचा कल चढता आहे. (spread speed). मुंबईत वेग बराच मंदावलेला आहे आणि केसेसमध्ये लक्षणीय घट आहे. मुंबईची धर्मशाळा असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातही ही घट दिसत आहे. १५ एप्रिलपासून आलेल्या निर्बंधांचे हे परिणाम असावेत. पुण्यातही केसेस घटण्याचा कल आहे. लातूर आणि नांदेड इथेही कल घटता आहे. ज्या नंदुरबार शहराचे कौतुक होते आहे तिथे जिल्ह्यात केसेस घटण्याचा कल अजून दिसत नाहीये . बुलढाणा, यवतमाळ आणि रत्नागिरी इथे केसेसवाढीचा कल गंभीर आहे. त्याखालोखाल नाशिक सारख्या मोठ्या जिल्ह्यातही केसेस वाढत आहेत. केसेस घटण्याचा कल असलेल्या जिल्ह्यांत सुमारे ५७% नव्या केसेस आहेत, ही समाधानाची बाब आहे. म्हणजे अर्ध्या राज्यांत साथ आटोक्यात यायची चिन्हे आहेत.
लसीकरण केंद्रांवर डिमांड-सप्लाय गोंधळ स्पष्ट दिसत आहे. १ मे पासून तो वाढेल ह्यात फार शंका नाही. साथ आटोक्यात यायची चिन्हे नसलेल्या जिल्ह्यात लसीकरणाची धांदल धोक्याची ठरू शकते. धांदल वाढली कि धांदलीला लागणाऱ्या गोष्टी पुरवणारेही येतात, म्हणजेच नियमबाह्य खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू होते आणि डिमांड-सप्लायच्या ह्या मूलभूत बलाला आवर घालणे कठीण होते.
लसीकरण आणि १ मे पासून असू शकणारे निर्बंध (ते असणारच!) ह्यांच्यासाठी सब जिल्हे एकसाथ पेक्षा जिथे नव्या प्रसाराचा धोका कमी संभवतो तिथे अधिक लसीकरण आणि जिथे वेग मंदावलेला नाही तिथे आधी केसेस आटोक्यात आणणे अशी योजना उपयोगी ठरू शकते, अर्थात ती राजकीयदृष्ट्या काटेरी वाट आहे.

२८ एप्रिल २०२१ ला कोव्हीड केसेसच्या दृष्टीने महाराष्ट्रासाठी तसा फार उत्साहवर्धक दिवस नव्हता. १८-४५ गटासाठी लसीकरण १ मे पासून सुरू होणार नाही हे कळलं. निर्बंध ३० एप्रिलनंतरही असणार आहेत, फक्त पुढे किती दिवस हे कळायचे बाकी आहेत. Active केसेस सुद्धा फार घटलेल्या नाहीत (आलेख १). TPR (positive केसेस आणि एकूण चाचण्या ह्यांचे गुणोत्तर) हेही २३% च्या आसपास स्थिर आहे. (आलेख २). हे घटायला हवं जर परिस्थिती निवळत असेल तर.
बुलढाणा, रत्नागिरी आणि यवतमाळ इथे प्रसारवेग बराच जास्त आहे (आलेख ३). ज्या नंदुरबार जिल्ह्याच्या कामगिरीबाबत आपण काही जणांनी वाचले असेल तिथेही नव्या केसेस वेगाने वाढत आहेत. तिथल्या बाजूच्या धुळे जिल्ह्यात मात्र स्थिती सुधारत आहे.
बातम्या आणि प्रत्यक्ष परिस्थिती ह्यांच्यातल्या संबंधांची चिरफाड आपण अनुभवतच आहोत. कोणी त्यात दुःखाची मोजणी करत आहे, कोणी मानवी धैर्याला राजकारणाच्या रंगात रंगवत आहे तर कोणी चंदेरी किनार शोधत आहे.
महाराष्ट्राच्या कोव्हीड आकड्यांत अशी अर्धी चंदेरी किनार म्हणजे ५५% केसेस ह्या अशा जिल्ह्यांत आहेत जिथे केसेस घटण्याचा कल आहे.
पण मृत्यूदर वाढता आहे, अर्थात अद्याप आधीच्या लाटेतील दराएवढा तो वाढलेला नाही. (आकृती ४). मृत्यूदर मोजताना काही दिवस आधीच्या केसेस लक्षात घ्याव्या लागतात. मी १० दिवस आणि १४ दिवस अशी दोन मापने दिली आहेत. दोन्हीत निष्कर्ष बदलत नाही. योग्य उपचार मिळण्यात होणारी दिरंगाई हे मृत्यूदराचे कारण असू शकतं. अर्थात मरण पावणाऱ्या रुग्णांबद्दल अधिक तपशील उपलब्ध नसल्याने फार काही सांगता येणार नाही. आणि सांगावं तरी काय. वेदना आणि अवहेलना ह्याशिवाय दुसरे सिग्नल्स माहितीच्या लोटात दिसतच नाहीत.
Yet for the sake of hope that we must hold on to, I share one of my favorite lines - from 'Ulysses' by Tennyson
Death closes all: but something ere the end,
Some work of noble note, may yet be done,
Not unbecoming men that strove with Gods.
The lights begin to twinkle from the rocks:
The long day wanes: the slow moon climbs: the deep
Moans round with many voices. Come, my friends,
'T is not too late to seek a newer world.
Push off, and sitting well in order smite
The sounding furrows; for my purpose holds
To sail beyond the sunset, and the baths
Of all the western stars, until I die.
It may be that the gulfs will wash us down:
It may be we shall touch the Happy Isles,
And see the great Achilles, whom we knew.
Tho' much is taken, much abides; and tho'
We are not now that strength which in old days
Moved earth and heaven, that which we are, we are;
One equal temper of heroic hearts,
Made weak by time and fate, but strong in will
To strive, to seek, to find, and not to yield.

२९-४-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
केसेस वेगाने घटतही नाहीत आणि वाढतही नाहीत अशा अधांतराचा दिवस. काल, म्हणजे २८ एप्रिल २०२१ च्या तुलनेत किंचित प्रगती आणि किंचित घसरण.
Active केसेस –. वाढीच्या तुलनेत सावकाश घटत आहेत. (आलेख १) अजून बरीच घट हवी. ह्यातले गृह विलगीकरण किती आणि रुग्णालयात दाखल किती हे खरं महत्वाचं आहे. ही माहिती सहज उपलब्ध नाही. गंभीर रुग्णांना आवश्यक सुविधा ही सर्वात कमकुवत कडी आहे. ज्या वेळेला ह्या सुविधांवर अवलंबून रकमी होऊन सुविधा सरप्लस होऊ लागतील तेव्हाच लाट ओसरली असं म्हणता येईल. आता जे आसपास होऊन कळतंय त्यानुसार गंभीर रुग्णांना अगदी सहज सुविधा उपलब्ध होत नाहीत असंच दिसतंय.
TPR – TPR (positive केसेस आणि एकूण चाचण्या ह्यांचे गुणोत्तर) हे घटताना दिसत आहे (आलेख २), पण ही घटही सावकाश आहे. एकूण चाचण्या कमी किंवा जास्त ह्यापेक्षा TPR बघणे योग्य आहे. जर मागणीपेक्षा चाचण्या फारच कमी असतील तर TPR वाढता असतो.
जिल्हाशः प्रसार – महानगरी आणि अन्य तफावत हीच गोष्ट मागील दिवसावरून पुढे चालू आहे. (आलेख ३) बुलढाणा, रत्नागिरी आणि नंदुरबार इथे १०% हून अधिक वाढवेग आहे. नंदुरबारची यशोगाथा नेमकी काय आहे ह्याबाबत कुतूहल वाढते आहे! ५५% केसेस ह्या विषाणूप्रसाराचा कल घटता असलेल्या जिल्ह्यांत आहेत. हे प्रमाण इथेच अडकलेले आहे, आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या केसेस ६००००-७०००० रेंजमध्ये अडकलेल्या आहेत. १ मे ते १४ मे ह्या नव्या निर्बंध काळात रुग्णप्रसाराचा वाढता कल असणाऱ्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष देणं गरजेचे आहे.
मृत्यूदर – वाढता आहे. १.३% पर्यंत हा दर पोचलेला आहे. पण इथे तपशीलातील सैतान खेळ करतो आहे. (आलेख ५,६, आणि ७) यवतमाळमध्ये १५% (जवळपास ७ मध्ये १) इतका जास्त मृत्यूदर आहे. तर मुंबईत ०.८% (१२५ मध्ये १) असा मृत्यूदर आहे. यवतमाळ वगळता रत्नागिरी, सिंधुदुर्ग (८%) , हिंगोली, औरंगाबाद, गडचिरोली, सोलापूर (४%) इथेही मृत्यूदर जास्त आहे. महानगरी/मोठ्या शहरी जिल्ह्यांत मृत्यूदर वाढत आहे आणि १% च्या आसपास हे प्रमाण आहे. म्हणजे इथेही महानगरी आणि अ-महानगरी दरी दिसते आहे. ही दरी माहितीची, सुविधांची दरीच आहे का? महानगरांच्या वेदना जगभर प्रक्षेपित होतात आणि रस्ते-वाहनांच्या सहज पल्ल्याआडची आक्रोशसृष्टी दृष्टीआड राहते असं होतंय का? कोव्हीडचे वादळ निवल्यावर जेव्हा आपण आपल्या परंपरागत मारामाऱ्या परत करू लागू तेव्हा आपण महानगरे, शहरे आणि गावे ह्यांत दरी का असते ह्याची थोडे कमी भावनिक चिकित्सा करू का?

३०-४-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
ब्रेक द चेनच्या पहिल्या निर्बंधांच्या कालावधीच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्रातील बऱ्याचश्या भागांत कोव्हीड परिस्थितीत सुधारणेची पुसट चिन्हे आहेत, पण काही जिल्ह्यांत परिस्थिती अजूनही गंभीर आहे.
Active केसेस –. घट सुरु आहे आणि ती थोडी वेगवानही होताना दिसत आहे. हे स्वाभाविक आहे. जर ८-१४ दिवसांपूर्वी केसेस बऱ्याच असतील तर आता डिस्चार्जही बरेच होतील. (आलेख १) ही घट वेगवान होईल आणि १५ मेच्या आता रुग्णालय क्षमतेत अतिरिक्त क्षमता बनेल अशी आशा करूया. ह्यातले गृह विलगीकरण किती आणि रुग्णालयात दाखल किती हे खरं महत्वाचं आहे. ही माहिती सहज उपलब्ध नाही. गंभीर रुग्णांना आवश्यक सुविधा ही सर्वात कमकुवत कडी आहे. ज्या वेळेला ह्या सुविधांवर अवलंबून रकमी होऊन सुविधा सरप्लस होऊ लागतील तेव्हाच लाट ओसरली असं म्हणता येईल. आता जे आसपास होऊन कळतंय त्यानुसार गंभीर रुग्णांना अगदी सहज सुविधा उपलब्ध होत नाहीत असंच दिसतंय.
TPR – TPR (positive केसेस आणि एकूण चाचण्या ह्यांचे गुणोत्तर) हे घटताना दिसत आहे (आलेख २), आणि ३० एप्रिलला मागच्या काही दिवसांपेक्षा जास्त घट झाली आहे. मुंबईत TPR १०% हून कमी आहे, तर महाराष्ट्राचा दर २२% च्या आसपास आहे. ह्याचाच अर्थ बाकी जिल्ह्यांत टेस्टिंग विषाणूप्रसाराच्या मानाने अपुरे पडत आहे. एकूण चाचण्या कमी किंवा जास्त ह्यापेक्षा TPR बघणे योग्य आहे. जर मागणीपेक्षा चाचण्या फारच कमी असतील तर TPR वाढता असतो.
जिल्हाशः प्रसार – महानगरी आणि अन्य तफावत हीच गोष्ट मागील दिवसावरून पुढे चालू आहे, पण ही तफावत भरून येताना दिसत आहे. (आलेख ३) बुलढाणा, रत्नागिरी आणि नंदुरबार इथे १०% हून अधिक केसेस वाढवेग आहे, पण वेग घटतो आहे अशी चिन्हे आहेत. ६८% केसेस ह्या विषाणूप्रसाराचा कल घटता असलेल्या जिल्ह्यांत आहेत. मागचे काही दिवस हे प्रमाण ५५% च्या आसपास होते. त्यात झालेली ही वाढ आशादायक आहे. १ मे ते १४ मे ह्या नव्या निर्बंध काळात रुग्णप्रसाराचा वाढता कल असणाऱ्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष देणं गरजेचे आहे.
मृत्यूदर –. १.३% ला हा दर स्थिरावताना दिसतो आहे आणि पुढे तो घटायला सुरुवात होऊ शकते कारण केसेस वाढण्याचा वेग मंदावत आहे. पण तपशीलातील सैतान अजून खेळ करतो आहे. (आलेख ५,६, आणि ७) यवतमाळमध्ये १५% च्या पातळीहून मृत्यूदर घटू लागला असला तरी अजूनही तो इतर जिल्ह्यांच्या मानाने बराच जास्त आहे. मुंबईत ०.८% (१२५ मध्ये १) असा मृत्यूदर आहे. रत्नागिरीतही घट आहे, पण सिंधुदुर्ग (८%) मध्ये नाही. हिंगोली, औरंगाबाद, गडचिरोली, सोलापूर (४%) इथेही मृत्यूदर जास्त आहे. सातारा, जालना, कोल्हापूर इथेही कल वाढता आहे, पण दर २% च्या आसपास आहे. टेस्टिंग आणि रुग्ण अत्यवस्थ होण्याआधी रुग्णालयात जाणं ह्याचं प्रमाण वाढायला हवं.
निर्बंध सुरु राहण्याच्या दुसऱ्या टप्यात, म्हणजे पुढच्या पंधरवड्यात परिस्थितीत अजून सुधार होईल अशी आशा महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने करूया. ‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीण’ हा अनुभव महाराष्ट्राने पुरेपूर घेतलेला आहे. ह्या यातना विस्मरणात न ढकलल्या जाता स्थायी सुधारणांच्या मागणीचे इंधन बनाव्यात.

१-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
ब्रेक द चेनच्या दुसऱ्या निर्बंध कालावधीच्या पहिल्या दिवशी म्हणजे महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रातील कोव्हीड परिस्थितीत दिसत असलेली सुधारणेची चिन्हे अजून ठळक झालेली आहेत. पण अजूनही active केसेस सावकाश कमी होत आहेत. Active केसेसमधला काही एक % भाग हा रुग्णालयात दाखल गंभीर केसेसचा असतो. Active केसेस कमी झाल्या म्हणजे रुग्णालयात दाखल गंभीर केसेसही त्याच प्रमाणात कमी होणार. जेव्हा हे गंभीर केसेसचे प्रमाण उपलब्ध क्षमतेच्या काही टक्के (माझ्यामते ५०%-७५%) येईल तेव्हा निर्बंध सैल करणे योग्य ठरणार आहे. Active केसेस वेगाने खाली आल्या तर हा योग्य बिंदू लवकर येणार आहे.
Active केसेस –. घट सुरु आहे, पण सावकाश आहे. (आलेख १) हे स्वाभाविक आहे. नव्या केसेस घटायला सरुवात झालेली नाही. ही घट वेगवान होईल आणि १५ मेच्या आता रुग्णालय क्षमतेत अतिरिक्त क्षमता बनेल अशी आशा करूया. ह्यातले गृह विलगीकरण किती आणि रुग्णालयात दाखल किती हे खरं महत्वाचं आहे. ही माहिती सहज उपलब्ध नाही. गंभीर रुग्णांना आवश्यक सुविधा ही सर्वात कमकुवत कडी आहे. ज्या वेळेला ह्या सुविधांवर अवलंबून रकमी होऊन सुविधा सरप्लस होऊ लागतील तेव्हाच लाट ओसरली असं म्हणता येईल. आता जे आसपास होऊन कळतंय त्यानुसार गंभीर रुग्णांना अगदी सहज सुविधा उपलब्ध होत नाहीत असंच दिसतंय.
TPR – TPR (positive केसेस आणि एकूण चाचण्या ह्यांचे गुणोत्तर) हे घटताना दिसत आहे (आलेख २), पण आता २१-२२% च्या आसपास हे रेंगाळते आहे. देशाच्या २०% ह्या TPR पेक्षा तरी हे प्रमाण कमी व्हायला हवे. मुंबईत TPR १०% हून कमी आहे, तर महाराष्ट्राचा दर २२% च्या आसपास आहे. ह्याचाच अर्थ बाकी जिल्ह्यांत टेस्टिंग विषाणूप्रसाराच्या मानाने अपुरे पडत आहे. एकूण चाचण्या कमी किंवा जास्त ह्यापेक्षा TPR बघणे योग्य आहे. जर मागणीपेक्षा चाचण्या फारच कमी असतील तर TPR वाढता असतो.
जिल्हाशः प्रसार – महानगरी आणि अन्य तफावत हीच गोष्ट मागील दिवसावरून पुढे चालू आहे, पण ही तफावत भरून येताना दिसत आहे. (आलेख ३) बुलढाणा, रत्नागिरी आणि नंदुरबार इथे केसेस वाढवेग आहे, पण वेग घटतो आहे अशी चिन्हे आहेत. बुलढाणा इथे अजूनही १०% हून अधिक दर आहे. ७२% केसेस ह्या विषाणूप्रसाराचा कल घटता असलेल्या जिल्ह्यांत आहेत. काल हे प्रमाण ६८% होते. ही वाढ चांगलीच आशादायक आहे. नाशिक वगळता चारी मोठे शहरी जिल्हे घटता कल दाखवत आहेत. १ मे ते १४ मे ह्या नव्या निर्बंध काळात रुग्णप्रसाराचा वाढता कल असणाऱ्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष देणं गरजेचे आहे.
मृत्यूदर –. १.३% ला हा दर स्थिरावताना दिसतो आहे आणि घटायला सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत. पण काही जिल्ह्यांत परिस्थिती अजूनही गंभीर आहे. (आलेख ५,६, आणि ७) यवतमाळमध्ये मृत्यूदर चांगलाच घटला आहे तरी अजूनही तो इतर जिल्ह्यांच्या मानाने बराच जास्त आहे. मुंबईत ०.८% (१२५ मध्ये १) असा मृत्यूदर आहे. रत्नागिरीतही चांगली घट आहे, आणि सिंधुदुर्गमध्येसुद्धा. हिंगोली आणि गडचिरोली मध्येही घट आहे. औरंगाबाद, सोलापूर (४%) इथेही मृत्यूदर जास्त आहे. नंदुरबार, कोल्हापूर इथेही कल वाढता आहे. टेस्टिंग आणि रुग्ण अत्यवस्थ होण्याआधी रुग्णालयात जाणं ह्याचं प्रमाण वाढायला हवं तरंच केसेस आणि मृत्यूदर दोन्ही घटतील.
लसीकरणाचा वेग सावकाश राहील अशीच चिन्हे आहेत. गंभीर केसेस (ICU आणि त्याहून गंभीर) ह्या उपलब्ध क्षमतेच्या ५०-७५% पर्यंत आल्या तरी काहीकाळ निर्बंध सैलावले जाऊ शकतात. ही परिस्थिती सर्व जिल्ह्यांत एकदम येईल असं नाही. आदर्श अवस्था गंभीर केसेसचे प्रमाण आवश्यक रेंजमध्ये येणे आणि त्याचवेळी पुरेश्या लोकसंख्येचे लसीकरण होणे आहे. पण अशी अवस्था यायच्या आधी कदाचित निर्बंधात थोडे थोडे शैथिल्य आणि गरज लागल्यास परत वाढ असा सावध पवित्रा ठेवून लसीकरण वाढवत ठेवावे लागेल. अजून बराच पल्ला आहे, पण काळोख कमी होताना दिसतो आहे.

२-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
आज दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होताना अधिक स्पष्ट दिसत आहे. मृत्यूदर घटताना दिसतो आहे आणि नव्या केसेसही आज अपेक्षेपेक्षा (ट्रेंड) कमी आहेत. (आलेख १) पण अजूनही active केसेस सावकाश कमी होत आहेत.
आशेची चिन्हे ठळक होत आहेत ही आनंदाची बाब आहे. पण मग हे निर्बंध कुठवर हा प्रश्न आपल्याला सोडवावा लागणार आहे. सरकारने active केसेसचा तपशीलवार डेटा उपलब्ध केला तरी त्याबाबत मंथन होऊ शकेल. लोकांना त्वरेने निर्बंध आणि त्यातले बदल समजावून देणाऱ्या सरकारने ही माहितीही पुरवावी. सरकारी अधिकारी, समित्या ह्यांना पूरक शहाणपण समाजात असते. ही ते वापरायची वेळ आहे.
Active केसेस – किंचित वाढलेल्या आहेत, कारण नव्या केसेसहून डिस्चार्ज कमी आहेत. (आलेख २) Active केसेस आणि त्यातही रुग्णालयात दाखल गंभीर केसेस कमी होणं ह्याशिवाय निर्बंध सैलावणार नाहीत. ह्यातले गृह विलगीकरण किती आणि रुग्णालयात दाखल किती ही माहिती सहज उपलब्ध नाही. गंभीर रुग्णांना आवश्यक सुविधा ही सर्वात कमकुवत कडी आहे. ज्या वेळेला ह्या सुविधांवर ताण कमी होऊन सुविधा सरप्लस होऊ लागतील तेव्हाच लाट ओसरली असं म्हणता येईल. आता जे आसपास कळतंय त्यानुसार गंभीर रुग्णांना अगदी सहज सुविधा उपलब्ध होत नाहीत असंच दिसतंय.
Active केसेसमधला काही एक % भाग हा रुग्णालयात दाखल गंभीर केसेसचा असतो. Active केसेस कमी झाल्या म्हणजे रुग्णालयात दाखल गंभीर केसेसही त्याच प्रमाणात कमी होणार. जेव्हा हे गंभीर केसेसचे प्रमाण उपलब्ध क्षमतेच्या काही टक्के (माझ्यामते ५०%-७५%) येईल तेव्हा निर्बंध सैल करणे योग्य ठरणार आहे. Active केसेस वेगाने खाली आल्या तर हा योग्य बिंदू लवकर येणार आहे.
TPR – TPR (positive केसेस आणि एकूण चाचण्या ह्यांचे गुणोत्तर) (आलेख ३), २२% च्या आसपास घुटमळतो आहे. TPR मधली घट हा केसेसची घनता, म्हणजे एखाद्या वस्तीत खूप केसेस सापडणे कमी झाले आहे हे दर्शवतो. २२% म्हणजे पाचात एक चाचणी positive येणे म्हणजे बऱ्याचश्या चाचण्या ह्या ज्याला गंभीर लक्षणे आहेत असेच रुग्ण करत आहेत असा होतो. ही गंभीर लक्षणे येईपर्यंत असे रुग्ण विषाणूसंक्रमण करत राहतात. TPR कमी होणे ही परिस्थिती सुधारण्याची खूण आहे. एकूण चाचण्या कमी किंवा जास्त ह्यापेक्षा TPR बघणे योग्य आहे. जर मागणीपेक्षा चाचण्या फारच कमी असतील तर TPR वाढता असतो.
जिल्हाशः प्रसार – महानगरी आणि अन्य तफावत तफावत भरून येताना दिसत आहे. (आलेख ४) पण बुलढाणा हा अजूनही सर्वाधिक वाढवेग असणारा जिल्हा आहे. दुर्दैवी बाब आहे. रत्नागिरीचा वाढकल कमी झाला आहे. पण आता कोल्हापूर दुसऱ्या स्थानी आहे. नाशिक आणि पुणे (जिल्हे) इथे कल थोडा वाढलेला आहे. ७३% केसेस ह्या विषाणूप्रसाराचा कल घटता असलेल्या जिल्ह्यांत आहेत. काल हे प्रमाण ७२% होते. म्हणजे सावकाश सुधार दिसतो आहे. १ मे ते १४ मे ह्या नव्या निर्बंध काळात रुग्णप्रसाराचा वाढता कल असणाऱ्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष देणं गरजेचे आहे.
मृत्यूदर –. १.३% ह्या पातळीहून हा दर घटताना दिसतो आहे! मोजक्या काही जिल्ह्यांत परिस्थिती अजूनही गंभीर आहे. (आलेख ५,६,७, आणि ८) यवतमाळमध्ये मृत्यूदर चांगलाच घटला आहे तरी अजूनही तो इतर जिल्ह्यांच्या मानाने बराच जास्त आहे. मुंबईत ०.८% (१२५ मध्ये १) असा मृत्यूदर आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोली इथे घट सुरु आहे. औरंगाबाद आणि सोलापूर (४%) इथेही मृत्यूदर घटेल अशी चिन्हे आहेत. नंदुरबार, बुलढाणा, परभणी आणि वाशीम इथे कल वाढता आहे. मोठ्या शहरी जिल्ह्यांत मुंबईत आणि ठाण्यात मृत्यूदर वाढता आहे, पण १% हून कमी आहे. पुणे, नागपूर, नाशिक इथे १% च्या आसपास आहे. टेस्टिंग आणि रुग्ण अत्यवस्थ होण्याआधी रुग्णालयात जाणं ह्याचं प्रमाण महानगरांच्या बाहेरही वाढायला हवं तरंच केसेस आणि मृत्यूदर दोन्ही घटतील.

३-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
सोमवार हा कोव्हीड आकडेवारीच्या दृष्टीने फसवा दिवस! रविवारच्या सुट्टीचा परिणाम म्हणून केसेस कमी दिसतात. पण TPR मध्ये थोडी वाढच आहे (२२% हून २३%). अनेक जिल्ह्यांत केसेस वाढीकडे कल दिसू लागलेला आहे. पण मृत्यूदर १.३% हून कमी होणं सुरु झालं आहे त्यात बदल नाही आणि सावकाश का होईना active केसेस घटत आहेत. नव्या केसेसही ट्रेंडहून कमी आहेत. (आलेख १) त्यामुळे ३ मे २०२१ चा दिवस महाराष्ट्राच्या दुसऱ्या कोव्हीडलाटेसाठी mixed bag असा आहे आणि थोडे सावधानतेचे इशारे देणाराच.
लसीकरण सावकाश चालू आहे. त्यामुळे active केसेस वेगाने घटणे, त्यासाठी नव्या केसेस वेगाने घटणे ह्याला पर्याय नाही. अन्यथा कडक-सौम्य निर्बंधांचीटांगती तलवार कायम राहणार आहे. त्यामुळे जिथे जिथे केसेसवाढीची पॉकेटस आहेत तिथे जास्त लक्ष घालण्याची गरज आहे. आजच्या पोस्टसोबत मोबिलिटी गुगल मोबिलिटी डेटा वापरून केलेला एक आलेख पण जोडलेला आहे. त्यात हे स्पष्ट दिसतंय कि साऱ्या जिल्ह्यांत लॉकडाऊनने लोकांचे जाणे-येणे सारखे कमी झालेली नाही. (आलेख ९) मोठ्या शहरी जिल्ह्यांत लॉकडाऊन अधिक प्रभावी आहे. रत्नागिरी आणि सिधुदुर्ग इथे ६ ते १५ एप्रिल दरम्यान बरीच जास्त हालचाल दिसते. ह्या दोन जिल्ह्यांत अधिक मृत्युदर दिसलेला आहे. महानगरी भागांना आणि अन्य भागांना वेगवेगळ्या कोव्हीडयोजना गरजेच्या आहेत, ज्यांत निर्बंधतीव्रता आणि लसींच्या मर्यादित साठ्याचे वाटप हेही येतात.
Active केसेस – सावकाश घट चालू आहे. (आलेख २) Active केसेस आणि त्यातही रुग्णालयात दाखल गंभीर केसेस कमी होणं ह्याशिवाय निर्बंध सैलावणार नाहीत. ह्यातले गृह विलगीकरण किती आणि रुग्णालयात दाखल किती ही माहिती सहज उपलब्ध नाही. गंभीर रुग्णांना आवश्यक सुविधा ही सर्वात कमकुवत कडी आहे. ज्या वेळेला ह्या सुविधांवर ताण कमी होऊन सुविधा सरप्लस होऊ लागतील तेव्हाच लाट ओसरली असं म्हणता येईल. आता जे आसपास कळतंय त्यानुसार गंभीर रुग्णांना अगदी सहज सुविधा उपलब्ध होत नाहीत असंच दिसतंय.
Active केसेसमधला काही एक % भाग हा रुग्णालयात दाखल गंभीर केसेसचा असतो. Active केसेस कमी झाल्या म्हणजे रुग्णालयात दाखल गंभीर केसेसही त्याच प्रमाणात कमी होणार. जेव्हा हे गंभीर केसेसचे प्रमाण उपलब्ध क्षमतेच्या काही टक्के (माझ्यामते ५०%-७५%) येईल तेव्हा निर्बंध सैल करणे योग्य ठरणार आहे. Active केसेस वेगाने खाली आल्या तर हा योग्य बिंदू लवकर येणार आहे.
TPR – TPR (positive केसेस आणि एकूण चाचण्या ह्यांचे गुणोत्तर) (आलेख ३), २२% च्या आसपास होते ते आज २३% आहे. म्हणजे सोमवारच्या कमी केसेस ह्या पुरेश्या टेस्ट झाल्या असत्या तर नेहमीच्या रेंजमध्ये आल्या असत्या किंबहुना थोड्या जास्तच. हा धोक्याचा बावटा आहे. टेस्टिंग कसं वाढवावं हा पेचिदा प्रश्न आहे. लोकांना टेस्ट ही त्रासदायक वाटते, विशेषतः जेव्हा त्यांना कुटुंबापासून वेगळं व्हावं लागणार असतं. पण विषाणू शरीरात असताना योग्य वेळेत टेस्टिंग महत्वाचे आहे. आणि टेस्टिंगचा सप्लाय मुळातच बराच ताणाखाली आहे.
TPR कमी होणे ही परिस्थिती सुधारण्याची खूण आहे. एकूण चाचण्या कमी किंवा जास्त ह्यापेक्षा TPR बघणे योग्य आहे. जर मागणीपेक्षा चाचण्या फारच कमी असतील तर TPR वाढता असतो.
जिल्हाशः प्रसार – महानगरी आणि अन्य तफावत तफावत भरून येताना दिसत आहे, पण बुलढाणा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग इथे विषाणूप्रसार फार आटोक्यात येताना दिसत नाही. (आलेख ४) नाशिक आणि पुणे (जिल्हे) इथे कल अधांतरी आहे, पुण्यात तो घटून परत वाढला आहे. ६४% केसेस ह्या विषाणूप्रसाराचा कल घटता असलेल्या जिल्ह्यांत आहेत. काल हे प्रमाण ७३% होते. म्हणजे मागच्या २-३ दिवसांत आलेली सुचिन्हे परत हरवलेली आहेत. १ मे ते १४ मे ह्या नव्या निर्बंध काळात रुग्णप्रसाराचा वाढता कल असणाऱ्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष देणं गरजेचे आहे.
मृत्यूदर –. १.३% ह्या पातळीहून हा दर घटताना दिसतो आहे, पण वेग सावकाश आहे! मोजक्या काही जिल्ह्यांत परिस्थिती अजूनही गंभीर आहे. (आलेख ५,६, आणि ७) यवतमाळमध्ये मृत्यूदर चांगलाच घटला आहे, पण ५% हाही जास्त आहे. मुंबईत ०.८% (१२५ मध्ये १) असा मृत्यूदर आहे. सिंधुदुर्ग आणि हिंगोली इथे सावकाश घट आहे. गडचिरोली आणि रत्नागिरी येथे १% ला पातळी स्थिरावते आहे. औरंगाबाद इथे सावकाश घट आहे, पण सोलापूर (४%) इथे मृत्यूदर किंचित वाढला आहे. नंदुरबार, बुलढाणा, परभणी आणि वाशीम इथे कल वाढता आहे. मोठ्या शहरी जिल्ह्यांत मुंबईत आणि ठाण्यात मृत्यूदर वाढता आहे, पण १% हून कमी आहे. नागपुरात घट आहे (०.७५%) तर नाशिक आणि पुणे येथे १% च्या आसपास. टेस्टिंग आणि रुग्ण अत्यवस्थ होण्याआधी रुग्णालयात जाणं ह्याचं प्रमाण महानगरांच्या बाहेरही वाढायला हवं तरंच केसेस आणि मृत्यूदर दोन्ही घटतील.

४-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
टेस्टिंगचे रिझल्ट उशिरा येऊ लागल्याने मंगळवार हाही थोडा सोमवारसारखा फसवा असतो. पण TPR मध्ये घट आहे. (२३% हून २१.५%). नव्या केसेसही ट्रेंडहून कमी आहेत. (आलेख १) आणि Active केसेस मध्ये आज मागच्या काही दिवसातली मोठी घट आलेली आहे. मृत्यूदर घटतो आहे. ही सारी सुचिन्हे पण १/३ हून अधिक केसेस ह्या अशा जिल्ह्यांत आहेत जिथे रुग्णवाढीचा कल दिसतो आहे आणि काही जिल्ह्यांतील मृत्यूदर वाढता आहे किंवा जास्त आहे. कोव्हीडच्या दुसऱ्या लाटेतून सावरू पाहणाऱ्या महाराष्ट्रासाठी ४ मे २०२१ हा चांगला पण तरीही ‘जागते रहो’ हे सांगणारा दिवस आहे.
१५ मे २०२१ पासून महाराष्ट्राला किती निर्बंधात ठेवणार ह्यावर नेतृत्व खल करत असेलच. (अर्थात राष्ट्रीय लॉकडाऊन येणार नाही असे गृहीत धरून!) १ मे ते १४ मे च्या कालावधीतील रुग्णवाढीच्या कलाद्वारे राज्याचे तीव्र, मध्यम आणि सौम्य अशा तीन भागांत विभाजन करून त्यांच्यासाठी वेगळी धोरणे ठरवली जायला हवीत. लसीकरणाचा मर्यादित साठा कुठे वापरायचा ह्याचेही निकष स्पष्ट व्हायला हवेत. सर्वत्र तोकडे लसीकरण किंवा केंद्रित लसीकरणाच्या जिल्हाशः पाळ्या ह्याची निवड सरकारने करावी.
Active केसेस – आज वेगवान घट आहे! (आलेख २) Active केसेस आणि त्यातही रुग्णालयात दाखल गंभीर केसेस कमी होणं ह्याशिवाय निर्बंध सैलावणार नाहीत. ह्यातले गृह विलगीकरण किती आणि रुग्णालयात दाखल किती ही माहिती सहज उपलब्ध नाही. गंभीर रुग्णांना आवश्यक सुविधा ही सर्वात कमकुवत कडी आहे. ज्या वेळेला ह्या सुविधांवर ताण कमी होऊन सुविधा सरप्लस होऊ लागतील तेव्हाच लाट ओसरली असं म्हणता येईल. आता जे आसपास कळतंय त्यानुसार गंभीर रुग्णांना अगदी सहज सुविधा उपलब्ध होत नाहीत असंच दिसतंय.
Active केसेसमधला काही एक % भाग हा रुग्णालयात दाखल गंभीर केसेसचा असतो. Active केसेस कमी झाल्या म्हणजे रुग्णालयात दाखल गंभीर केसेसही त्याच प्रमाणात कमी होणार. जेव्हा हे गंभीर केसेसचे प्रमाण उपलब्ध क्षमतेच्या काही टक्के (माझ्यामते ५०%-७५%) येईल तेव्हा निर्बंध सैल करणे योग्य ठरणार आहे. Active केसेस वेगाने खाली आल्या तर हा योग्य बिंदू लवकर येणार आहे.
TPR – TPR (positive केसेस आणि एकूण चाचण्या ह्यांचे गुणोत्तर) (आलेख ३), २३% च्या आसपास होते ते आज २१.५% आहे. हे महत्वाचे सुचिन्ह आहे. मागच्या महिन्याभरातली हा किमान TPR आहे. अर्थात ५% ह्या मानकापासून आपण अजून खूप दूर आहोत. पण पाठ थोपटायला किंचित जागा होते आहे.
TPR कमी होणे ही परिस्थिती सुधारण्याची खूण आहे. एकूण चाचण्या कमी किंवा जास्त ह्यापेक्षा TPR बघणे योग्य आहे. जर मागणीपेक्षा चाचण्या फारच कमी असतील तर TPR वाढता असतो.
जिल्हाशः प्रसार – महानगरी आणि अन्य तफावत ही फेमस कहाणी सुरु आहे आणि बुलढाणा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे अजूनही सर्वाधिक वाढ दर्शवत आहेत. सोलापूर ही चिंतेची जागा बनेल असे संकेत आहेत. (आलेख ४) नाशिकला कल घटण्याचा आहे आणि चांगलीच सुधारणा आहे. पुणे (जिल्हा) इथे कल अधांतरी आहे. ६३% केसेस ह्या विषाणूप्रसाराचा कल घटता असलेल्या जिल्ह्यांत आहेत. काल हे प्रमाण ६४% होते. म्हणजे परिस्थिती अजून खालावलेली नाही. १ मे ते १४ मे ह्या नव्या निर्बंध काळात रुग्णप्रसाराचा वाढता कल असणाऱ्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष देणं गरजेचे आहे.
मृत्यूदर –. घट सुरु आहे आणि आता १.२५% पर्यंत आलेली आहे! मोजक्या काही जिल्ह्यांत परिस्थिती अजूनही गंभीर आहे. (आलेख ५,६, आणि ७) यवतमाळमध्ये मृत्यूदर चांगलाच घटलेला आहे ही समाधानाची बाब आहे, पण मुंबईत ०.८% (१२५ मध्ये १) असा मृत्यूदर आहे तर यवतमाळला ५% (२० मध्ये १). रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथे मृत्यूदर निवळताना दिसतो आहे. पण हिंगोलीत मान वर काढतो आहे. औरंगाबाद आणि बुलढाणा इथे सावकाश घट आहे, पण सोलापूर, नंदुरबार, आणि वाशीम इथे कल वाढता आहे. मोठ्या शहरी जिल्ह्यांत मुंबईत (०.९%) आणि ठाण्यात (१%) मृत्यूदर वाढता आहे! नागपुरात किंचित वाढ आहे (०.८%) तर नाशिक आणि पुणे येथे १% च्या आसपास पण घटणारा. टेस्टिंग आणि रुग्ण अत्यवस्थ होण्याआधी रुग्णालयात जाणं ह्याचं प्रमाण महानगरांच्या बाहेरही वाढायला हवं तरंच केसेस आणि मृत्यूदर दोन्ही घटतील.

५-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
विकेंडच्या कमी टेस्टिंगचा परिणाम जाऊन मंडे ब्ल्यूज हे बुधवारच्या कोव्हीड आकड्यांत दिसत आहेत. पण TPR मध्ये घट आहे. (२१.५% हून २०.६%). (आलेख३) मागच्या ५ आठवड्यांत इतका कमी TPR नव्हता. मृत्यूदर घटतो आहे. ही झाली सुचिन्हे. नव्या केसेस ट्रेंडहून कमी आहेत, पण बऱ्याच जवळ आहेत. (आलेख १) Active केसेस मध्ये जैसे थे आहेत आणि ही वाईट बाब आहे. परिस्थतीत सुधार आहे पण तो अधिक वेगवान हवा.
महत्वाचे म्हणजे active केसेस फार सावकाश कमी होत आहेत. म्हणजेच डिस्चार्ज हे नव्या केसेसच्या मानाने फार जास्त नाहीत. खरंतर ७ ते १४ दिवसांपूर्वी केसेस जास्त होत्या, त्यामुळे आता डिस्चार्ज अधिक हवेत. तसं नसेल तर असं म्हणावं लागेल कि गृहविलगीकरण (म्हणजे सौम्य केसेस) जास्त वेगाने कमी होत आहेत, पण गंभीर (रुग्णालयात दाखल) केसेस सावकाश कमी होत आहेत किंवा सावकाश वाढत आहेत. सरकारी आकडेवारीत हे विभाजन सांगितले गेले तर परिस्थिती नीट कळेल. पण अप्रत्यक्षपणे पाहिलं तर प्राणवायूची मागणी घटलेली नाही असं दिसतंय, म्हणजे गंभीर केसेस सावकाश वाढणे असं घडत असावं. असं होण्याचं एक प्रमुख कारण रुग्ण आणि योग्य उपचार ह्यातले वाढते अंतर असू शकते. लोक जरा सैलावल्याने असं होत आहे का रुग्णांना आवश्यक सुविधा शोधण्यात वेळ गमवावा लागतो आहे हे स्पष्ट व्हायला हवं.
मुंबईत मृत्यूदर कमी आहे, पण वाढता आहे! तसंच नाशिक आणि ठाणे इथे. (आलेख ८) यवतमाळमध्ये २% ला आलेला आहे ही चांगली बाब आहे. (आलेख ६) हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, नंदुरबार, उस्मानाबाद,सिंधुदुर्ग, सोलापूर आणि वाशीम इथे धोक्याचे बावटे आहेत. (आलेख ७)
केसेस वाढण्याचा कल हा काही जिल्ह्यांत केंद्रित होताना दिसतो आहे. सिंधुदुर्ग आणि बुलढाणा इथे गंभीर वाढकल आहे, पाठोपाठ कोल्हापूर. पण अर्ध्याहून अधिक जिल्ह्यांत घटकल दिसतो आहे आणि २/३ हून अधिक केसेस ह्या घटकल असणाऱ्या जिल्ह्यांत आहेत. (आलेख ४)
महाराष्ट्रातील जिल्हाशः लसीकरण स्टेट्सचा एक आलेख सोबत जोडत आहे. (आलेख ९) किती जण लस घ्यायला पात्र आहेत हे ठरवायला मी थोड्या सांख्यिकी करामती, अर्थात तर्कसंगत, केलेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात २०११ ला ८ वर्षाहून जास्त असलेल्या लोकसंख्येतील ६.७% लोकसंख्या मरण पावली असं गृहीत धरून मी लसीकरणाला पात्र लोकसंख्या ठरवली आहे.
५ मे पर्यंत कोल्हापूर आणि पुणे जिल्हा इथे २५% हून अधिक पात्र व्यक्तींनी लशीचा पहिला डोस घेतला असं दिसतं आहे. कोल्हापूरमध्ये लसीकरणही चांगलं असूनही केसेसवाढ आणि मृत्यूदर का वाढता आहे हे कोडं आहे. लसीकरण शहरी आणि केसेस ग्रामीण असं आहे का? का लस घेतलेले लोक गाफील आहेत. पुणे आणि मुंबई प्रत्येक जिल्ह्यात दोन्हीकडे जवळपास २० लाख लोकांनी लस घेतली आहे. मुंबईच्या मानाने मुंबईची स्टोअररूम ठाणे जिल्ह्यात बराच कमी वेग आहे. नाशिक आणि गोंदियाची टक्केवारी सारखी आहे! म्हणजे लसीकरण किती तोकडं आहे आणि असमानरित्या केंद्रित आहे हे दिसतंय.
लसीकरणाची डिमांड हा फार इश्यू नाही. मोबाईल-इंटरनेट ह्यावर माझा वैयक्तिक अनुभव लोक लस घेऊ पाहतायेत पण त्यांना ती मिळत नाही हा आहे. पुरवठा हीच आता मेख आहे. ती निघाली कि येऊ घातलेल्या तिसऱ्या लाटेत आपल्याला लसीकरणाचा अडसर घालता येईल. ती अजून न रुतता लवकर निघावी.

६-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
६ मे २०२१ चे कोव्हीड आकडे हे ढोबळमानाने चांगले नाहीत. नव्या केसेस ट्रेंडहून जास्त आहेत (आलेख १) आणि परत ६००००+ आहेत. TPR २०.६% हून वाढून २२.४% झालेला आहे. (आलेख ४). मृत्युदर स्थिरावताना दिसतो आहे (आलेख ५) आणि बुलढाणा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर इथे दिसणारा वाढीचा कल अजून फार मंदावताना दिसत नाहीये. नाशिकमध्ये मृत्यदराने उसळी घेतली आहे! (आलेख ९). ६ मे २०२१ ला महाराष्ट्रात ५ मे हून जवळपास ४५०० अधिक केसेस दिसल्या. ह्या वाढीत मोठा भाग नाशिकचा आहे (आलेख २).
ह्या निराशाजनक ढगाची चंदेरी कड म्हणजे पाचही मोठ्या शहरी जिल्ह्यांत केसेस घटण्याचा कल दिसतो आहे. ८७% केसेस ह्या घटकल असलेल्या जिल्ह्यांत आहेत. मागचे २ आठवडे मुंबईतील केसेस सर्वाधिक वेगाने घटत होत्या. आता ती जागा नंदुरबारने घेतलेली आहे. (आलेख ५) मुंबईतील घटण्याचा वेग कमी झाला आहे आणि ही किंचित चिंतेची बाब आहे.
active केसेस आज जवळपास कमी झालेल्याच नाहीत. काल म्हटलं तसं ‘गृहविलगीकरण (म्हणजे सौम्य केसेस) जास्त वेगाने कमी होत आहेत, पण गंभीर (रुग्णालयात दाखल) केसेस सावकाश कमी होत आहेत किंवा सावकाश वाढत आहेत’ हा प्रकार घडत असावा. ही चिंतेची बाब आहे. सरकारने ह्यावर अधिक माहिती द्यावी. प्राणवायूची मागणी घटलेली नाही असं दिसतंय, म्हणजे गंभीर केसेस सावकाश वाढणे असं घडत असावं. असं होण्याचं एक प्रमुख कारण रुग्ण आणि योग्य उपचार ह्यातले वाढते अंतर असू शकते. लोक जरा सैलावल्याने असं होत आहे का रुग्णांना आवश्यक सुविधा शोधण्यात वेळ गमवावा लागतो आहे हे स्पष्ट व्हायला हवं.
बाकी मोठ्या शहरी जिल्ह्यांत मृत्यूदर घटतो आहे. यवतमाळमध्येही मृत्युदर आता बाकी अ-शहरी जिल्ह्यांसारखा आहे. अमरावती, बीड, हिंगोली, जळगाव, कोल्हापूर, नंदुरबार, उस्मानाबाद,सिंधुदुर्ग, सोलापूर आणि वाशीम इथे मृत्यूदर जास्त म्हणजे २% हून अधिक दिसत आहे. (आलेख ८)
एका आठवड्याने सरकारला १५ मे २०२१ पासून निर्बंध सैल करायचे का अधिक आवळायचे हे ठरवावं लागणार आहे. (अर्थात त्या आधी केंद्र सरकारने असा निर्णय घेतला नाही तर!) आणि हा मोठा कठीण निर्णय असणार आहे. कारण active केसेसमध्ये वेगवान घट नाही आणि कदाचित रुग्णालयात गंभीर केसेससाठी अतिरिक्त क्षमताही नाही. ह्या कोमट प्रगतीने निर्बध हटायला वेळ लागणार असंच दिसते आहे.
निर्बंध हटवायला दोन घटक महत्वाचे आहेत, किती टक्के लोकांना नजीकच्या भूतकाळात विषाणूसंक्रमण झालेले आहे आणि लसीकरण. १० किंवा ११ मे ला राजव्यापी random RT-PCR टेस्टिंग, किमान ५०००० लोकांचे करून विषाणूसंक्रमणाच्या स्थितीचा आढावा घेता येईल. हे टेस्टिंग नेहमीच्या टेस्टिंगशिवाय व्हावे. त्याचसोबत वयनिहाय लसीकरण आणि मृत्यू ह्यांची माहिती उपलब्ध व्हावी. जेणेकरून कोणत्या वयोगटाला किती संरक्षण आहे हे लक्षात येऊ शकते. जसं निर्बंध आणण्यात महाराष्ट्राने अन्य राज्यांना लीड केलं तसंच निर्बंध सैलावण्यातही व्हावं. त्यासाठी माहितीआधारित आणि पारदर्शी निर्णयप्रक्रिया आवश्यक आहे.

७ मे २०२१ चे कोव्हीड आकडे हे mixed bags आहेत. नव्या केसेस ट्रेंडहून कमी आहेत (Panel १) आणि ५५००० हून कमी आहेत. TPR २०.१% आहे आणि ही मागच्या ३० दिवसांतील किमान किंमत आहे. (Panel १). मृत्युदर १.२५% च्या थोड्या कमी पातळीवर स्थिरावताना दिसतो आहे (Panel२). पण बुलढाणा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर इथे दिसणारा वाढीचा कल अजून मंदावताना दिसत नाहीये आणि सर्वात नकारात्मक बाब म्हणजे active केसेस वाढलेल्या आहेत.
नव्या केसेसमधली घट ही बव्हंशी नाशिक जिल्ह्यातील नव्या केसेस घटल्याने झाली. (Panel ३) काल नाशिकमधील केसेसची वाढ अशीच संपूर्ण राज्यातील केसेस वाढण्यात कारणीभूत होती. दैनिक नव्या केसेसमध्ये इतकं जास्त fluctuation हे टेस्टिंगवर असलेल्या ताणानेही असू शकतं. नाशिकमधील मृत्यूदरही चढा आहे. (Panel २)
पाचही मोठ्या शहरी जिल्ह्यांत केसेस घटण्याचा कल अजूनही दिसतो आहे, पण अर्थात नाशिकमधलं चित्र थोडं फसवं असू शकतं. ८६% केसेस ह्या घटकल असलेल्या जिल्ह्यांत आहेत. नंदुरबारने लक्षणीय कमी प्रसारदर गाठलेला आहे. (Panel ३) मुंबईतील घटण्याचा वेग कमी झाला आहे आणि ही किंचित चिंतेची बाब आहे.
अमरावती, बीड, धुळे, हिंगोली, कोल्हापूर, नंदुरबार, उस्मानाबाद,सिंधुदुर्ग, सोलापूर आणि वाशीम इथे मृत्यूदर जास्त म्हणजे २% हून अधिक दिसत आहे. (Panel ५) नाशिक वगळता बाकी मोठ्या शहरी जिल्ह्यांत मृत्यूदर घटतो आहे. पुण्यात लक्षणीय घट आहे.
active केसेस वाढल्या आहेत हे थोडं निराशाजनक आहे. आधी म्हटलं तसं ‘गृहविलगीकरण (म्हणजे सौम्य केसेस) जास्त वेगाने कमी होत आहेत, पण गंभीर (रुग्णालयात दाखल) केसेस सावकाश कमी होत आहेत किंवा सावकाश वाढत आहेत’ हा प्रकार घडत असावा. ही चिंतेची बाब आहे. सरकारने ह्यावर अधिक माहिती द्यावी. प्राणवायूची मागणी घटलेली नाही असं दिसतंय, म्हणजे गंभीर केसेस सावकाश वाढणे असं घडत असावं. असं होण्याचं एक प्रमुख कारण रुग्ण आणि योग्य उपचार ह्यातले वाढते अंतर असू शकते. लोक जरा सैलावल्याने असं होत आहे का रुग्णांना आवश्यक सुविधा शोधण्यात वेळ गमवावा लागतो आहे हे स्पष्ट व्हायला हवं.
लसीकरणाची प्रक्रिया तापदायक बनते आहे असं शहरी भागांतील walk-इन च्या अनुभवांवरून दिसतं आहे. मुंबईत तर फ्रंटलाईन वर्कर्स वगळता अन्य कोणालाही walk-इन बंद करण्यात आलेले आहे. हा निर्णय अन्याय्य आहे कारण अनेक जेष्ठ नागरिक डिजिटल माध्यमांशी नीट परिचित नाहीत आणि त्यांचे अवलंबित्व वाढवणारा हा निर्णय आहे. मानवी dignity ला आपण सिरीयसली घेत नाही त्याचे हे उत्तम उदाहरण.
जिथे वॉक-इन आहे तिथे लोक लवकरात लवकर रांग लावायची स्पर्धा करत आहेत आणि अनेकांना निराश होऊन परतावे लागते आहे.
७ मे २०२१ रोजी महाराष्ट्रात २४३२६४ पहिले डोस दिले गेले. महाराष्ट्राच्या एकूण लसीकरण करण्याच्या लोकसंख्येच्या हे प्रमाण ०.२% असावं. आजमितीला महाराष्ट्रात १६% लसीकरणपात्र (१८+) लोकांचे लसीकरण झालेले आहे.
लसींचा तोकडा पुरवठा जिल्ह्यांत कसा वाटला जातो हे थोडं कोडं आहे. (panel ६). नव्या केसेस आणि लोकसंख्या ह्यांच्यानुसार दैनिक लसपुरवठ्यातील किती भाग कोणत्या जिल्ह्याला जाणार हे ठरत असावं. हे जे काही सूत्र आहे ते पारदर्शीपणे समोर यावं. दररोज किती लसी मिळणार हे केवळ लोकसंख्येच्या प्रमाणात ठरत नाही (मुंबई-ठाणे-पुणे सोडल्यास) असं तरी दिसतंय.

८-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
८ मे २०२१ चे कोव्हीड आकडे हे बरेचसे आशादायक आहेत. नव्या केसेस केसेस घटण्याच्या ट्रेंडशी जुळत आहेत (Panel १) पण आदल्या दिवसाहून थोडे वाढले आहेत. ही वाढ प्रामुख्याने नाशिक आणि पुणे येथून आलेली आहे. (panel २) TPR २१.७% आहे, जो आदल्या दिवसाहून (२०.१) वाढलेला आहे. (Panel १). मृत्युदर १.२५% च्या थोड्या कमी पातळीवर स्थिरावताना दिसतो आहे (Panel२). बुलढाणा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर इथे दिसणारा वाढीचा कल मंदावला आहे, पण घटण्याचा नाही. सर्वात आशादायक बाब म्हणजे मागच्या ३० दिवसातील active केसेसमधील सर्वात जास्त घट आज नोंदली गेली आहे.
नाशिकमधील दैनिक नव्या केसेसमध्ये इतकं जास्त fluctuation हे कोडं आहे. तसंच तिथल्या वाढत्या मृत्यूदराचेही. मुंबई-ठाणे इथे मृत्यूदर १% च्या आसपास आहे. पुण्यात ०.५% तर नागपुरात ०.७५%. नाशिकमध्ये १.५% हून अधिक. अन्य जिल्हे जिथे मृत्यूदर अधिक (२%+) आहे ते म्हणजे अमरावती, बीड, धुळे, हिंगोली, कोल्हापूर, नांदेड, नंदुरबार (इथे प्रसारदार किमान आणि ०.५ हून कमी आहे!), उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि वाशीम. कोव्हीडच्या नव्या केसेसचा प्रसार सावकाश आटोक्यात येत आहे (panel ३), पण गंभीर केसेस आणि मृत्यू ह्यांची दीर्घ कृष्णछाया अनेक जिल्ह्यांवर जाणवते आहे.
मृत्यूदर आणि टेस्टिंग हे मुद्दे विरोधी पक्षनेत्यांच्या पत्रानेही चर्चेत आलेले आहेत. मृत्यूदर हा भारतात आणि किंबहुना साऱ्या जगातच चर्चेचा मुद्दा आहे. पण अनेकदा त्याच्यावरची चर्चा ही उष्णता अधिक आणि प्रकाश कमी देते.
टेस्टिंग हा कळीचा मुद्दा आहे. जलद आणि अचूक टेस्टिंग साथ रोखण्यात प्रभावी अस्त्र आहे. साथीच्या रोगात टेस्टिंग हे positive externality आहे, आणि त्यामुळे ते बरंच स्वस्त हवं, किंवा मोफतच. दुर्दैवाने भारतात तेवढी संसाधनसमृद्धी नाही. परिणामी टेस्टिंग सावकाश वाढते आणि बऱ्याचदा एखाद्या पातळीला अडकलेले असते.
टेस्टिंग स्वस्त व्हावे म्हणून त्याला थोडा सदोष पर्याय दिला गेला आहे. टेस्टिंगच्या किंमतीही टप्प्या-टप्प्याने कमी केल्या जात आहेत. दुर्दैवाने टेस्टिंग करणाऱ्या firms ची क्षमता सावकाश वाढते आहे आणि ह्या खाजगी टेस्टिंगची किंमत परवडू शकणारा वर्ग मर्यादित आहे. परिणामी टेस्टिंगशिवाय औषधे घेणं किंवा शहामृगासारखे अज्ञानाच्या सुखात लपणं अशा गोष्टी होत आहेत.
त्यात आता रुग्णालयात दाखल व्हायला टेस्ट नको असा नियमबदल झालेला आहे. गंभीर रुग्णांना कोव्हीड रुग्णालयात त्वरित दाखल करायला हा नियम मदत करेल. पण गंभीर नसणारे पण रुग्णालयात जावे लागू शकणारे रुग्ण ह्या नियमाच्या वापराने अ-कोव्हीड रुग्णालयातच उपचार घेत राहू शकतात. कोव्हीड उपचारातील विलग भावना टाळायला हा नियमबदल वापरला जाऊ शकतो. मुळातले अपुरे टेस्टिंग अजून कमी होऊ शकते आणि वैद्यकीय कर्मचारी (डॉक्टर आणि अन्य) ह्यांनी लक्षणावरून निदान करणे हीच प्रमुख पद्धत होऊ शकते. स्कॅनवापर वाढू शकतो आणि अत्यंत गंभीर रुग्ण कोव्हीड उपचाराला दाखल होण्याचे प्रमाण वाढू शकते. गंभीर रुग्णांना मदत करताना मुळात साथीचा वेग वाढण्याचा धोका हा नियमबदल आणू शकतो.
साथीच्या काळातील अन्य positive externality म्हणजे लसीकरण. (panel ५). महाराष्ट्रातील लसीकरणाचा वेग एप्रिलच्या मध्यानंतर मंदावला आहे. १८ ते ४५ वयोगटाचे लसीकरण धीम्याने सुरु आहे. (५०% हून कमी दैनिक लसीकरण). पहिला डोस हाही बराच प्रभावशाली आहे आणि त्यामुळे पहिले डोस घेणारे वेगाने वाढायला हवेत. पण २५-३०% दैनिक डोसेस हे दुसरे डोसेस आहेत. हा म्हणजे काही जणांना भुकेले ठेवून काही जणांना पोटभर वाढायचा प्रकार आहे. त्यात डिजिटल अन्याय आहेतच – शहर, जिल्ह्यांच्या मर्यादा ओलांडून ऑनलाईन स्लॉट मिळवणे, योग्य माहिती न पोचल्याने लागणाऱ्या रांगा आणि वेळेची हानी.
दुसरे डोस पुढचे २ महिने बंद करणे आणि पहिल्या डोसचा स्लॉट स्थानिक पातळीवर लॉटरी पद्धतीने निश्चित करणे ह्या दोन मार्गांनी लसीकरणाचा प्रभाव वाढवला जाऊ शकतो. नोंदणी केलेल्या आणि पहिला डोस न घेतलेल्या व्यक्तींत जेवढे डोस आहेत तेवढे स्लॉट app नेच वाटायचे आणि त्यांना SMS ने कळवायचे. ही यादीही जाहीर करायची. त्यामुळे येणारी प्रत्येक व्यक्ती ही नक्की लस घेऊन जाईल. हे कराय

९-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
९ मे २०२१ चा विकेंड कोव्हीड स्थितीच्या आकडेवारीच्या दृष्टीने चांगला आहे. १७ मार्च २०२१ नंतर आता, म्हणजे ५३ दिवसांनी TPR २०% हून कमी आहे! (Panel १). Active केसेस सावकाश पण घटल्या आहेत. राज्याच्या मृत्यूदरात वाढ नाही. बुलढाणा जिल्ह्यात बऱ्याच दिवसांनी प्रसारदार १.५ च्या खाली आलेला आहे आणि कोणत्याही जिल्ह्यात प्रसारदार १.५ हून जास्त नाही. नव्या केसेस केसेस घटण्याच्या ट्रेंडहून कमी आहेत.
अर्थात केवळ सुचिन्हे नाहीत. सिंधुदुर्ग हा आता बुलढाण्याला मागे टाकत सर्वाधिक प्रसारदार असलेला जिल्हा झाला आहे. ८ मे २०२१, म्हणजे लसीकरण डेटा आहे असा लेटेस्ट दिवस, त्या दिवशी १७०८४२ डोसेस दिले गेले आहेत जे एकूण लसीकरण योग्य लोकसंख्येच्या जेमतेम ०.२% आहेत. ८ मे पर्यंत महाराष्ट्रातील १६.५% लसीकरण पात्र लोकसंख्येला पहिला डोस मिळालेला आहे. जर ०.२% चा वेग राहणार असेल तर ३१ मे २०२१ पर्यंत २१% लसीकरण होईल. लसीकरणाच्या आधारे कोव्हीडनिर्बंध संपवायच्या उद्दिष्टाला हळुवार करणारे हे आकडे आहेत.
नव्या केसेस घटण्याचा कल पक्का झालेला दिसतोय. अजून २ आठवड्यांनी active केसेस घटण्याचा वेग वाढेल अशी आशा दिसत आहे. म्हणजेच मे २०२१ च्या अखेरीपर्यंत तरी निर्बंध राहतील असं दिसतंय. मुंबईतील ८ मे २०२१ च्या माहितीच्या आधारे (https://stopcoronavirus.mcgm.gov.in/key-updates-trends) ऑक्सिजन बेडमध्ये ४०%, ICU बेड्समध्ये ७% आणि ventilator बेड्समध्ये ३% क्षमता शिल्लक आहे. गंभीर केसेस (ICU आणि ventilator) फारच कमी क्षमता आहे. मुंबईमध्ये, जी लाट बऱ्यापैकी आटोक्यात आलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे, तिथे ही अवस्था आहे तर बाकी महाराष्ट्रात कदाचित शिल्लक क्षमता नसेलच. शिल्लक क्षमता ३०% पर्यंत वाढेल (एक ढोबळ ठोकताळा) तेव्हा निर्बंध काही काळ सैलावायला वाव आहे असं म्हणता येईल.
पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील वेगाने कमी-जास्त होणाऱ्या आणि जास्त केसेस आणि अमरावती, कोल्हापूर, नंदुरबार, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि वाशीम येथील २%+ अधिक मृत्यूदर (panel ५) ह्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. नाशिक आणि पुणे इथे केंद्रशहर आणि ग्रामीणपरीघ अशा तफावतीने लाट फैलावते आहे का हे स्पष्ट व्हायला हवं. मोठ्या शहरांत मुंबई-ठाणे इथे सावकाश पण वाढणारा (१%+) मृत्यूदर तिथल्या लाटेच्या आकुंचनाला डाग लावतो आहे नाशिक इथे १.५% हा मोठ्या शहरी जिल्ह्यांच्या मानाने जास्त दर आहे. पुणे आणि नागपूर इथे ०.५-०.७५% हे प्रमाण आहे. (panel ३)
लसीकरणाच्या बाबतीत नवे डोसेस घटत आहेत. ही स्थिती केव्हा सुधारणार हेही स्पष्ट नाही. ह्या तोकड्या रिसोर्सचे जिल्हाशः वाटप कसे होते हे कोडे आहे. (panel ६). ८ मे २०२१ ला पुण्याला ३% डोसेस मिळाले. पुण्यात महाराष्ट्रातील जवळपास ९% लसीकरणपात्र लोकसंख्या आहे. ह्याच्या नेमकी उलटी स्थिती जळगावला आहे. अनेक जिल्ह्यांत हे विपरीत प्रमाण दिसून येत आहे.
पहिल्या डोसेस (panel ७)चे प्रमाण वाढते आहे असा छोटा ट्रेंड दिसतो आहे. संदिग्धपणे सरकारने दुसऱ्या डोसेसला होता होईतो डावलण्याचा निर्णय घेतलेला आहे असं दिसतंय. जर असे असेल तर - नागरिकांना स्पष्ट निर्देश न देता आडपडद्याने असे करणे हे उत्तम राजकारण असेल, पण वाईट नीतीकारण आहे.

१०-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
१० मे २०२१ चा सोमवार कोव्हीड स्थितीच्या आकडेवारीच्या दृष्टीने फारच चांगला आहे, अगदी सोमवारच्या इफेक्टला जमेत धरूनही. मुळात मागच्या सोमवारहून आज केसेस ११००० म्हणजे जवळपास २५% नी कमी आहेत. सलग दुसऱ्या दिवशी TPR २०% हून कमी आहे. (Panel १). Active केसेस वेगाने घटल्या आहेत आणि १४ एप्रिल २०२१ नंतर पहिल्यांदा ६ लाखाहून कमी आहेत! पाचही मोठ्या शहरी जिल्ह्यांत प्रसारदार सातत्याने कमी आहे. नाशिकमध्ये मृत्यूदरात घट दिसते आहे. (panel ३) नागपूरमध्ये प्रसारदर कमी झाला आहे आणि आता नागपूर प्रसारदर कमी असण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. (panel २) नागपूरमध्ये मार्चमध्येच केसेस वेगाने वाढल्या होत्या आणि तिथे स्थानिक निर्बंधही आले होते. थोडक्यांत, कोव्हीडच्या दुसऱ्या लाटेला वेसण घालणे यशस्वी होतंय असे ठळकसे संकेत आकड्यांत तरी आहेत! ते येत्या दिवसांत पुसट होऊ नयेत.
अर्थात चंदेरी ढगाला काळी किनार आहेच. राज्याच्या मृत्यूदरात थोडी वाढ दिसते आहे. सोमवार असूनही अहमदनगर जिल्ह्यांत आदल्या दिवसाहून ५% हून अधिक केसेस वाढल्या आहेत. (panel २) अहमदनगरमध्ये प्रसारदर अजून वाढता आहे. मुंबईत मृत्यूदर कमी (१% असला) तरी त्यात सावकाश वाढ होते आहे. आणि लसीकरणाचे गाडे रुळावर येत नाही. ९ मे २०२१ ला महाराष्ट्रात केवळ ८३३६५ पहिले डोस दिले गेले (panel ७). ही संख्या आदल्या दिवशीच्या संख्येच्या निम्मी आहे. ९ मे २०२१ पर्यंत महाराष्ट्रात लसीकरण पात्र लोकसंख्येपैकी ३.५% पूर्ण लसीकरण झालेले आहे. (panel ८) जिल्ह्याला मिळणारे पहिले डोस आणि गरज ह्यांत मुंबई आणि पुणे सोडले तर फार संबंध नाही असं दिसतंय. जळगाव आणि रायगड तर ह्या कोड्यातले लक्षणीय जिल्हे आहेत.
अकोला, अमरावती, बीड, कोल्हापूर, नंदुरबार, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि वाशीम येथे २%+ अधिक मृत्यूदर आहे. (panel ५) मुंबईतील ९ मे २०२१ च्या माहितीच्या आधारे (https://stopcoronavirus.mcgm.gov.in/key-updates-trends) ऑक्सिजन बेडमध्ये ४०%, ICU बेड्समध्ये ७% आणि ventilator बेड्समध्ये ३.५% क्षमता शिल्लक आहे. ह्यांत आदल्या दिवसाहून फार बदल नाही. मुंबईत जर गंभीर रुग्णांची स्थिती सावकाश सुधारत असेल तर अन्य महाराष्ट्रात फार वेगळी स्थिती नसेल असा कयास आहे. थोडक्यात दिशा योग्य आहे, पण प्रगती सावकाश आहे.

११-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
११ मे २०२१ चा मंगळवार कोव्हीड स्थितीच्या आकडेवारीच्या दृष्टीने ठीक आहे. मंगळवार असल्याने केसेस सोमवारहून वाढणं पण तरीही विकेंड इफेक्टने कमी राहणं अपेक्षित होतं, तसंच दिसत आहे. (panel १) अपेक्षेहून कमी असत्या तर अधिक चांगलं झालं असतं
पण दोन चांगल्या खुणा आहेत. पहिली म्हणजे TPR १८.८% आहे. ह्याहून कमी TPR हा १६ मार्च २०२१ ला होता. TPR सातत्याने २०% हून कमी राहणे ही चांगली खूण आहे आणि मागचे ३ दिवस तर तसा ट्रेंड दिसत आहे. दुसरं म्हणजे active केसेस मध्ये मागच्या ३० दिवसातील सर्वाधिक घट झालेली आहे आणि ही घट ३०००० हून जास्त आहे.
आता चिंतेच्या विषयाशी येऊया. राज्याचा मृत्यूदर १.२५% शी रेंगाळत आहे. म्हणजेच गंभीर केसेसच्या प्रमाणात फार घट होत नाही असं दिसतंय. मुंबईतील १० मे २०२१ च्या माहितीच्या आधारे (https://stopcoronavirus.mcgm.gov.in/key-updates-trends) ऑक्सिजन बेडमध्ये ४२%, ICU बेड्समध्ये ८% आणि ventilator बेड्समध्ये ४% क्षमता शिल्लक आहे. म्हणजे गंभीर केसेस सावकाश घटत आहेत असंच दिसतंय. बाकी महाराष्ट्रात त्या सावकाश वाढण्याचीही परिस्थिती असू शकते. अशा अवस्थेत रुग्णालयांवर ताण वाढतो आणि रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय ह्यांनाही मानसिक आजाराशिवाय अन्य तणावातून जावे लागते.
बाकी मोठ्या शहरी जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबईतील मृत्यूदर घटत नाहीये. नाशिकमध्ये चांगली घट आहे.
लसीकरणाच्या बाबतीत १० मे २०२१ ला १७६४४८ पहिले डोसेस दिले गेले. आदल्या दिवसाच्या, म्हणजे रविवार ९ मे च्या तुलनेत दुप्पट पण ८ मे च्या तुलनेत तेवढेच. (panel ८). जिल्ह्यांत डोस कसे वाटले जातात हे गुलदस्त्यातच आहे. (panel ७) ६ आठवड्यांपूर्वी पहिला डोस घेतलेल्या ४५+ वयोगटातील अनेकांना दुसरा डोस मिळत नाहीये असं समाजमाध्यमांवर चित्र आहे. त्याला प्रतिसाद म्हणून ह्या गटाकडे अधिक डोस वळवले जातील असं दिसतंय.
कोव्हीडच्या परिस्थितीगांभीर्याचे दोन प्रमुख निर्देशक म्हणजे मृत्युदर आणि प्रसारदर. मागच्या ७ दिवसांतील मृत्यूदर आणि अद्ययावत प्रसारदर ह्यांचा वापर करून कोव्हीडस्थितीचे गांभीर्य कोणत्या जिल्ह्यांत किती आहे हे ठरवता येऊ शकते. मृत्युदर २% हून जास्त आणि वाढता प्रसारकल हेगंभीर तर मृत्यूदर १% हून कमी आणि प्रसारदर ०.७५ हून कमी हे सावरलेले असं मी पकडलं आहे.
Panel ६ नुसार कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वाशीम आणि अमरावती इथे सर्वात गंभीर परिस्थती आहे. कोल्हापूरच्या बाबतीत जिल्ह्याच्या काही तालुक्यातच अधिक प्रसार आहे असं चित्र आहे. (https://twitter.com/jaysanhita/status/1392120173247680520). सर्वात जास्त सावरलेले जिल्हे आहेत नागपूर आणि भंडारा. ठाणे आणि मुंबई हे सावरण्याच्या सीमारेषेवर आहेत.

.
१२-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
१२ मे २०२१ चे कोव्हीड आकडे महाराष्ट्राच्या स्थितीतील सुधार दर्शवत आहेत. बुधवार असल्याने केसेस वाढणे अपेक्षित होते, पण केसेस ट्रेंडहून कमी आहेत. (panel १). TPR मधील घट सुरु आहे आणि TPR आदल्या दिवसाहून थोडा कमी आहे. Active केसेसमध्ये मागच्या काही दिवसांतील वेगवान घसरणीपेक्षा कमी घट आहे, पण मागच्या ५ दिवसांत active केसेस १ लाखाने घटल्या आहेत! दैनिक नव्या केसेसचा ट्रेंडही ५०००० हून कमी झाला आहे. ६ एप्रिल २०२१ नंतर असं पहिल्यांदा घडतं आहे. मृत्यूदरातही थोडी घट आहे
अर्थातच ही अंधार फिकट होण्याची सुरुवात आहे, उजेडाची नाही. मुंबईत मृत्यूदर वाढतो आहे आणि तो १.२५% च्या जवळ आहे. (panel ३) पुणे, ठाणे आणि नागपूर इथे मृत्यूदर १% किंवा कमी आणि न वाढता आहे. त्यामुळे मुंबईतील मृत्यूदर बुचकळ्यात पाडणारा आहे.
प्रसारदर आणि मृत्यूदर ह्यांच्या आधारे जिल्ह्यांच्या अवस्थेचा विचार केला तर नागपूर, भंडारा आणि ठाणे हे जिल्हे सावरले आहेत असं दिसतंय. नागपूर आणि भंडारा इथे लसीकरण पात्र लोकांपैकी २०% हून अधिक लोकांचे पहिले डोस झालेले आहेत. वाशीम, अमरावती, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग इथे सर्वात गंभीर अवस्था आहे. अकोल्यातही परिस्थिती गंभीर होऊ शकते असं दिसतंय. नंदुरबारमध्ये प्रसार आटोक्यात आलेला दिसतोय, पण मृत्यूदर जास्त आहे. केवळ ३ जिल्हे सावरलेले दिसत असल्याने निर्बंध वाढतील हे साहजिक आहे.
लसीकरणाची वाटचाल सावकाश आहे. ११ मे २०२१ ला १७% पात्र लोकांपर्यंत पहिला डोस पोचला आहे. येणाऱ्या दिवसांत दुसऱ्या डोसला प्राधान्य दिलं जाईल असं दिसतंय. Panel १० मध्ये दुसऱ्या डोसबद्दल काही रेशोज आहेत. त्यात हे दिसतंय कि ११ मेच्या सहा ते आठ आठवडा पूर्वी जे पहिले डोसेस झाले होते त्यातील बहुतेकांनी दुसरे डोस घेतले आहेत. पण ५ मे ते ११ मे मध्ये जे दुसऱ्या डोसला पात्र झाले त्यात ९% नाच दुसरा डोस मिळाला.
इतक्या कमी प्रमाणात दुसरे डोस दिले गेले तर कालांतराने पहिल्या डोसांचा प्रभाव संपून जाण्याची भीती आहे. त्यामुळे दुसऱ्या डोसवर अधिक लक्ष केंद्रित केलं जातंय. आणि ते बरोबर आहे. आपल्याकडे अधिक जास्त लसडोस हवेत ही कळीची बाब आहे. ते नाहीत तोवर ही डोके झाकले कि पाय उघडे आणि पाय झाकले कि डोके अशी पहिल्या-दुसऱ्या डोस प्राधान्यक्रमाची ओढाताण सुरु राहणार. मुबलक डोसांची सुबत्ता लवकर येवो. डिजिटल समृद्धीची नशा प्रत्यक्षाच्या टंचाईला कुठवर भूल पाडणार?

१३-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
१३ मे २०२१ चे कोव्हीड आकडे हे महाराष्ट्राची दुसऱ्या लाटेतील रिकव्हरी दर्शवत आहेत. केसेस ट्रेंडहून कमी आहेत आणि TPR मधील घट सुरु आहे (panel १). TPR १७% ला आलेला आहे. हा जवळपास मागच्या २ महिन्यातील किमान TPR आहे. Active केसेसमध्ये घट सुरूच आहे आणि मृत्यूदरातही सावकाश पण घट आहे. दुसऱ्या लाटेच्या अंधाऱ्या बोगद्यातून आपण हळूहळू बाहेर पडतो आहेत अशी आशा दर्शवणारे आकडे आहेत!
अर्थात काळजीच्या जागा आहेतच. मुंबईत मृत्यूदर वाढतोच आहे आणि तो १.२५% हून जास्त झालेला आहे. (panel ३) सोबत ठाण्यातही ही वाढ दिसते आहे. ठाण्यातील परिस्थिती ‘सावरलेली’ अशा गटात आहे, पण ती ‘न सावरलेली’ होईल अशी शक्यता आहे. (panel ६) पुणे आणि नागपूर इथे मृत्यूदर १% किंवा कमी आणि न वाढता आहे, नाशिकमध्येही घट आहे.
मुंबईतील ११ मे २०२१ च्या माहितीच्या आधारे (https://stopcoronavirus.mcgm.gov.in/key-updates-trends) ऑक्सिजन बेडमध्ये ४४%, ICU बेड्समध्ये १०% आणि ventilator बेड्समध्ये ५.५ % क्षमता शिल्लक आहे. ही सावकाश सुधाराची लक्षणे आहेत. ८ मेला हेच आकडे ३८%, ६% आणि ३% होते. हा सुधार मृत्यूदरातही दिसेल अशी आशा आहे. आणि मुंबईत सावकाश सुधार ही बाकी महाराष्ट्रातही अशीच पण किंचित मागची अवस्था असण्याचा संकेत आहे असं वाटतं.
प्रसारदर आणि मृत्यूदर ह्यांच्या आधारे जिल्ह्यांच्या अवस्थेचा विचार केला तर नागपूर, भंडारा आणि ठाणे हे जिल्हे सावरले आहेत असं दिसतंय, अर्थात ठाण्याचे स्थान डळमळीत आहे. (panel ६) वाशीममध्ये प्रसारदर कमी झालेला आहे. त्यामुळे गंभीर परिस्थितीत थोडा सुधार आहे. पण अकोला आता अमरावती, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग ह्या अन्य जिल्ह्यांसोबत गंभीर अवस्था गटात आहे. सिंधुदुर्गात कमाल प्रसारदर आणि कमाल मृत्यूदर आहे ही काळजीची बाब आहे. सिंधुदुर्गमधील परिस्थिती फार चर्चेतही आलेली दिसत नाही. तेथील लगतच्या गोवा राज्यात दुसरी लाट जोरात आहे ही बाबही लक्षात घ्यायला हवी. नकाशावरच्या भरीव सीमा एकेकदा प्रत्यक्षात फार जाळीदार असतात.
लसीकरणात १२ मे च्या माहितीनुसार दुसरे डोस वाढले आहेत आणि ४५+ वयोगटसुद्धा. दुसऱ्या डोसेसचं प्रमाण (panel ९) हे मागच्या काही दिवसांत फारच कमी झालेलं आहे. त्यात आता दोन डोसमधील अंतर १२ ते १३ आठवडे करण्याच्या निर्णयाने गोंधळ होईल अशी शक्यता आहे. ३१ मार्चपूर्वी पहिला डोस घेतलेले ६ आठवड्याच्या निकषाने दुसरा डोस घेऊ शकतात पण १२ आठवड्यांच्या निकषाने त्यांनी जूनच्या शेवटच्या आठवड्यात डोस घेतला पाहिजे.
डोसअंतर वाढवायचा निर्णय हा ‘प्रथमडोसप्राधान्य’ निर्माण करणार. कारण जर नवे डोसअंतर निकष वापरले तर १८ फेब्रुवारी-२५ फेब्रुवारी मध्ये पहिला डोस घेतलेलेच १४ मेनंतरच्या आठवड्यात दुसरा डोस घ्यायला पात्र ठरतील. १८ फेब्रुवारी – २५ फेब्रुवारीमध्ये पहिला डोस घेतलेली व्यक्ती अद्याप दुसरा डोस न घेता असेल ही शक्यता कमी आहे.
सतत बदलणारे लसीकरण निकष आणि लसीकरण केंद्रावर होणाऱ्या लसीकरणाची अनिश्चितता ह्यामुळे नागरिकांना प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागत आहे. त्यात डिजिटल माध्यमांशी अनोळखी किंवा कमी ओळख असलेल्या व्यक्तींना अपुऱ्या, उशिरा आणि चुकीच्या माहितीचा सामना करावा लागतो आहे. लसीकरणासाठी अधिक dignified आणि समन्यायी पद्धती हवी. नोंद केलेल्या स्थानिक नागरिकांना आठवड्याची सोडत काढून बोलवणे ह्या पर्यायाचा विचार करायला हवा. नागरिकांत स्पर्धा लावून उपयोग नाही. ही स्पर्धा कोण किती वेळेच्या आधी येतो अशा अघोरी अवेळी रांगांमध्ये बदलते किंवा काही क्षणात स्लॉट मिळण्याच्या जुगारात बदलते. असं लकीर के फकीर रांगणे संपून आपण नीट चालायला लागायला हवं, डबल डीजीट पळायच्या आधी.

१४-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
१४ मे २०२१ चे कोव्हीड आकडे हे महाराष्ट्राच्या सावरण्याच्या प्रक्रियेची प्रगती दर्शवणारे आहेत. नव्या केसेस ट्रेंडहून कमी आहेत आणि TPR मधील घट सुरु आहे (panel १ आणि २). TPR १६% हून कमी आहे. ह्या आधी अशा TPR १४ मार्च, म्हणजे बरोबर २ महिन्यापूर्वी दिसला होता. Active केसेसमध्ये घट सुरूच आहे आणि मृत्यूदरातही सावकाश पण घट आहे (panel २ आणि ३). निर्बंधाच्या दुसऱ्या टप्प्याचा (१४ मे पर्यंत) हा योग्य शेवट आहे.
पण इतके दिवस आशेचे beacon असलेल्या मुंबईत मृत्यूदर वाढतोच आहे आणि तो १.५% कडे जाताना दिसतो आहे. (panel ३) सोबत ठाण्यातही ही वाढ दिसते आहे. पुणे, नागपूर आणि नाशिक इथे मृत्यूदर वाढता नाही. मुंबईच्या बाबतीत दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक नव्या केसेस ४ एप्रिलला नोंदवल्या गेल्या तर सर्वाधिक मृत्यू १ मे २०२१ ला. ह्या दोन सर्वोच्च बिंदूंमधील अंतर हे गंभीर रुग्ण किती काळ रुग्णालयात राहत असावेत ह्यावर प्रकाश टाकतं. त्यामुळे १४ दिवसांच्या फरकाचा मृत्यूदर हा जास्त वाटणार. मुंबईतील दैनंदिन मृत्यू घटण्याचा ट्रेंड आहे, वाढण्याचा नाही.
१४ दिवसांचा मृत्यूदर आणि प्रसारदर पाहता नागपूर आणि भंडारा हेच दोन जिल्हे सावरलेले दिसत आहेत. (panel ६) अकोला, अमरावती, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे गंभीर अवस्था गटात आहे. प्रसारदराचा विचार करता ५ जिल्ह्यांतच (हिंगोली वगळून ३४ पैकी) प्रसारदर वाढता आहे. बाकी २९ जिल्ह्यांत तो घटता आहे! (panel २)
लसीकरणाच्या बाबतीत १३ मे च्या अद्ययावत माहितीनुसार १८-४५ गटाचे लसीकरण कमी झाले आहे (panel ९), पण ४५+ गटात पहिले डोस आणि दुसरे डोस दोन्ही दिले गेलेले आहेत. Sputnik लस दाखल होत असल्याची माहिती आज आलेली आहे. सद्यस्थितीला महाराष्ट्रात १७.५% लसीकरण पात्र लोकांचे पहिले डोस झालेले आहेत तर ४.५% लोकांचे दोन्ही.
मागच्या काही दिवसांत परिस्थितीत आलेला सुधार पाहता आणि हा सुधार परत मागे जाणार नाही अशी आशा करून – निर्बंध कसे सैल करायचे ह्याबाबत काही विचार होणे गरजेचे आहे. निर्बंध एकदम मोकळे होणार नाहीत हे स्पष्ट आहे. पण काही निर्बंध हे सहज काढता येतील कारण त्यांचा परिणाम फार नाही असं दिसतंय.
असा एक निर्बंध म्हणजे किराणा आणि अन्य जीवनावश्यक वस्तू विक्री सकाळी ७ ते ११ मध्ये करणे. २० एप्रिल २०२१ पासून हा निर्बंध आला. गुगल मोबीलिटी (https://www.google.com/covid19/mobility/index.html?hl=en) च्या माहितीचा वापर करून हे पाहता येतं कि स्मार्टफोनधारी लोक कसे वावरतात. त्यानुसार असं दिसतंय कि १५ एप्रिल २०२१ निर्बंध लागू झाले तेव्हा वावर (mobility) बरीच घटली, पण पुढे २० एप्रिलला ४ तासाचा खरेदीवेळ आणल्याने फारशी घट झाली नाही. (आलेख १०) अनेक जिल्ह्यांत तर सुरुवातीला काही दिवस वावर घटला पण नंतर तो वाढलेला दिसतो आहे (आलेख १० आणि ११).
हा डेटा स्मार्टफोनचा आहे आणि तो प्रातिनिधिक नसण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी तो अगदीच गैरलागू असण्याचीही शक्यता नाही. मुंबईत, जिथे अंमलबजावणी सगळ्यात व्यवस्थित असू शकते आणि स्मार्टफोनप्रमाणही जास्त असू शकते तिथेही ह्या निर्बंधाचा फार फरक दिसत नाही (आलेख १२) आणि मुंबईत केसेस कमी झालेल्या आहेत. म्हणजे ह्या निर्बंधाचा परिणाम वावगा होत नाहीये आणि गर्दीचे प्रमाण फार न घटता ती काही तासांतच होते आहे असं दिसतंय. असं असेल तर हा निर्बंध काहीसा सैलावण्याचा प्रयोग करता येईल. म्हणजे १ वाजेपर्यंत विक्रीला अनुमती देणे.
जसं निर्बंध आणायचे धाडस केले गेले त्याहून अधिक आणि डोळस धाडस निर्बंध सैल करायला लागणार आहे. निर्बंध सैल झाल्यावर केसेस काही प्रमाणात उसळी मारणार अशी शक्यता आहे. असं तेव्हाच होणार नाही जेव्हा लसीकरण मोठ्या प्रमाणावर झालेले असेल. पण एवढा वेळ आपल्याकडे आहे असं दिसत नाही. तेव्हा सावकाश निर्बंध सैलावत, माहितीआधारित प्रयोग करत जीव आणि उपजीविका ह्या दोन्ही गोष्टी साधाव्या लागतील.

१५-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
१५ मे २०२१ चे कोव्हीड आकडे हे महाराष्ट्राच्या सावरण्याच्या प्रक्रियेची प्रगती, थोड्या काळजीच्या जागा वगळता, वेगवान होते आहे हे दर्शवणारे आहेत. ह्या आठवड्यातले सहाही दिवस केसेस आठवडी ट्रेंडहून कमी आहेत. TPR मधील घट सुरु आहे (panel १ आणि २). TPR १५% हून कमी आहे. ह्या आधी अशा TPR ११ मार्चला होता. Active केसेसमध्ये घट सुरूच आहे आणि आता active केसेस ५ लाखाहून कमी आहेत. ६ एप्रिल २०२१ नंतर, म्हणजे निर्बंध सुरु होताना जी अवस्था होती तिथे आपण आलेले आहोत.
मृत्यूदरात थोडी वाढ आहे (panel ३). १४ दिवस आधीच्या नव्या केसेसशी तुलना करण्याचा मृत्यूदर पाहता मुंबईत आणि ठाण्यात मृत्यूदर वाढतोच आहे. नागपूरमध्येही थोडी वाढ आहे.
मृत्यूदर समजून घेण्याचा दुसरा मार्ग म्हणजे एकूण resolved केसेसमध्ये किती मृत्यू झाले हे पाहणं. (panel ७). ह्या निकाली मृत्यूदरानुसार हे कळतं कि दुसऱ्या लाटेत, फेब्रुवारीनंतर, निकाली मृत्यूदर बहुतांश जिल्ह्यात कमी होता. दुसऱ्या लाटेत मृत्यू वाढले पण केसेस त्याहून जास्त प्रमाणात वाढल्या. निकाली मृत्यूदर घटता असणं पण १४ दिवस फरकाचा मृत्यूदर चढता असणं ह्याचा अर्थ केसेसचा निकाल (बरे होऊन डिस्चार्ज अथवा मृत्यू) लागायला लागणारा सरासरी वेळ १४ दिवसांहून जास्त आहे.
निकाली मृत्यूदरानुसार अमरावती, हिंगोली आणि सिंधुदुर्ग इथे दुसरी लाट अधिक मारक ठरली आहे आणि ठरते आहे. अमरावतीमध्ये प्रसारदर सर्वाधिक आहे. १४ दिवस फरकाचा मृत्यूदर आणि प्रसारदर ह्यांच्या संयुक्त निकषानुसार अमरावती आणि सिंधुदुर्ग हे गंभीर अवस्था असलेले जिल्हे आहेत. (panel ६). त्याशिवाय अकोला आणि कोल्हापूर इथे गंभीर अवस्था आहे. सावरलेल्या जिल्ह्यांत नागपूर आणि भंडारा ह्या दोन सक्सेस स्टोरीजसोबत पालघरची भर पडली आहे, पण ती पक्की व्हायची आहे.
लसीकरणाच्या बाजूला सगळ्या जिल्ह्यांत जवळपास १०% पात्र लोकसंख्येला पहिला डोस मिळालेला आहे. हिंगोलीमध्ये किमान तर कोल्हापूरला (३०%) कमाल प्रमाण आहे. कोल्हापूरमध्ये लसीकरण आणि रुग्णवाढ ह्यांच्यात काय संबंध आहे हे तपासायला हवं! १४ मे च्या अद्ययावत माहितीनुसार ७२६३३ पहिले डोस दिले गेले आणि जवळपास तितकेच दुसरे डोस. (panel १०) येणाऱ्या दिवसांत दुसऱ्या डोसांचे प्रमाण निकषबदलाने घटून पहिल्या डोसांचे प्रमाण वाढेल.
खाजगी रुग्णालयात १८+ ला लस उपलब्ध आहे, पण ह्या गटाला शासकीय लसीकरण अनेक ठिकाणी बंद आहे असं दृश्य दिसतंय. जसे incentives तसे लोक आणि कंपन्यांचे वर्तन ह्या पायाभूत अर्थशास्त्रीय सिद्धांताला धरूनच हे दृश्य आहे. खाजगी कंपनीला खाजगी रुग्णालयाला लस विकणे फायदेशीर आहे, त्यामुळे त्यांना काही न काही सप्लाय जाणारच. राज्य सरकारांची घासाघीस क्षमता जास्त आहे आणि त्यामुळे त्यांना डावलून केवळ खाजगी सप्लाय होईल हे फारसं शक्य वाटत नाही. काही दिवसांत शासकीय लसीकरण परत सुरु होईल. पण लसीकरणासाठी अंमलात आणलेली धोरणे पाहता मार्केट, फायदा आणि सामाजिक प्राधान्य ह्यांचे विस्मित करणारे खेळ आपण पाहू ह्यात फार शंका वाटत नाही.

१६-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
१६ मे २०२१ च्या कोव्हीड आकड्यांत आठवड्याच्या आधीच्या ६ दिवसांना reality check आहे. नव्या केसेस आदल्या दिवसाहून थोड्याच कमी आहेत. बऱ्याच जिल्ह्यात केसेस आदल्या दिवसाहून जास्त आहेत, त्यामुळे एकूण घट कमी आहे. (panel २) नव्या केसेसचा ट्रेंड ४०००० हून कमी झाला आहे. ही पातळी २ एप्रिलनंतर आता आली आहे. active केसेस वेगाने घटत आहेत. ह्या आठवड्यात (९ मे ते १६ मे) active केसेस आठवड्याअगोदरच्या पातळीहून २५% ने कमी झाल्या आहेत. TPR १३% आहे. ह्याआधी असा TPR ९ मार्च २०२१ ला होता.
१४ दिवस फरकाच्या मृत्यूदरात वाढ आहे! परत एकदा हा मृत्यूदर १.२५% हून जास्त झाला आहे. मोठ्या शहरी जिल्ह्यांत मुंबईत सातत्याने मृत्यूदर वाढ सुरु आहे. नागपूरमध्येही वाढ झाली आहे.
सावरलेल्या जिल्ह्यांत नागपूर आणि भंडारासोबत पालघर आणि गोंदिया आलेले आहेत. पालघरने आपले सावरणे पक्के केलेले दिसते आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर इथे प्रसारदर कमी झाला आहे आणि त्यामुळे तिथली अवस्था गंभीर आणि सावरणे ह्यांच्या मध्ये आहे पण वाशीम आता गंभीर जिल्ह्यांत आहे आणि अकोला आणि अमरावती इथे अजून गंभीर अवस्थेत बदल नाही. (panel 5)
म्हणजे मागच्या आठवड्यात महाराष्ट्राने सुधाराच्या उतारावर चांगली मजल मारली आहे, पण परिस्थिती सावरलेली म्हणता येईल असे ३५ मधील ४ च जिल्हे आहेत. पडत्या आकड्यांनी लोकांना आपल्या सुखशोधी भिरभिर आयुष्याकडे परत जायची घाई झाली आहे, तर धोरणकर्त्याना निर्बंध कुठवर आवळायचे आणि सैल सोडल्यावर कितपत रुग्णवाढ ही बिनधोक मानायची हा पेच सोडवायचा आहे.

१७-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
१७ मे २०२१ चा सोमवार महाराष्ट्रासाठी mixed bag आहे. नव्या केसेस, सोमवार इफेक्टनुसार, कमी आहेत. TPR पण ११.३५% ला आलेला आहे. ह्या आधी ५ मार्चला ही पातळी होती. मागच्या १० दिवसांत सातत्याने TPR खाली आलेला आहे. Active केसेसही वेगाने कमी होत आहेत.
पण १४ दिवस-फरकाच्या मृत्यूदरात वाढ आहे. महाराष्ट्रातील दररोजच्या कोव्हीड मृत्यूंची संख्या अजून उताराला लागलेली नाही. (panel ६) पण निकाली मृत्यूदर हा दुसऱ्या लाटेत वाढलेला दिसत नाही (panel ६), पण आता शेवटाला तो अजून न खालावता स्थिर पातळी गाठेल किंवा परत वाढेल का हे पहावं लागेल. दररोजच्या मृत्यूंची संख्या खालावायला सुरुवात होणं गरजेचं आहे. नाहीतर कमी होणाऱ्या नव्या केसेसची संख्या ही अनेक केसेसची अधिकृत नोंदणी न झाल्याने होत आहे असं म्हणावं लागेल.
सावरलेले जिल्हे – (प्रसारदर ०.७५ पेक्षा कमी आणि १४ दिवस-फरकाचा मृत्यूदर १% हून कमी) – भंडारा, नागपूर, गोंदिया, पालघर आणि बुलढाणा
गंभीर परिस्थिती – (प्रसारदर १ हून जास्त आणि १४-दिवस फरकाचा मृत्यूदर २% हून जास्त – अमरावती, सोलापूर, अकोला, आणि वाशीम
निर्बंध सैलावण्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे तो नव्या केसेससाठी रुग्णालयात किती क्षमता शिल्लक आहे. खरंतर अशा स्वरुपाची माहिती नियमित स्वरुपात राज्य सरकारने द्यायला हवी. पण तशी उपलब्ध नाही. मुंबईसाठी अशी माहिती दैनिक स्वरुपात उपलब्ध होते. (https://stopcoronavirus.mcgm.gov.in/key-updates-trends) त्यानुसार मागच्या आठवड्यात (९ मे ते १६ मे २०२१) ह्या कालावधीत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ऑक्सिजन, ICU आणि ventilators ह्या तिन्ही प्रकारचे बेड्स कमी झाले. ह्यांत आश्चर्य नाही. काही रुग्णालये केसेस घटल्यावर कोव्हीड राखीव क्षमता कमी करत असतील. उपलब्ध बेड्सपैकी ऑक्सिजन बेड्समध्ये ५१% बेड्स शिल्लक आहेत, ICU मध्ये १३% तर ventilator मध्ये ७%. आठवड्याभरापूर्वी हे प्रमाण ४०%, ७% आणि ४% होते.
निर्बंध कमी केल्यावर नव्या केसेस वाढू शकतात. त्यावेळेला किती वेगाने ही रिक्त क्षमता वापरली जाईल, म्हणजेच नव्या केसेस वाढण्याचा संभाव्य वेग हा कितपत सहन केला जाऊ शकतो ह्याचा अदमास असणं गरजेचं आहे. आपल्याला डोळस धाडसाची गरज आहे आणि जोखीमेचे मापन ह्या त्याचा एक महत्वाचा भाग आहे.

१८-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
१८ मे २०२१ चा मंगळवार महाराष्ट्रासाठी ठीकठाक आहे. नव्या केसेस, मंगळवार इफेक्टनुसार, सोमवारपेक्षा थोड्या जास्त आहेत. पण TPR मध्ये वाढ नाही. पण मागच्या १० दिवसांत TPR सातत्याने खालावत २१.७५ पासून ११.४५ ला आला. आज तो तिथे स्थिरावलेला दिसतो आहे. टेस्ट्स घटलेल्या नाहीयेत. त्यामुळे आजच्या नव्या केसेस ह्या कमी टेस्टिंगने कमी आहेत असं म्हणायला वाव नाही. Active केसेसमधली घट सुरूच आहे.
पण मृत्यूदर अजून खालावत नाहीये. सरकारी आकडेवारीनुसार ह्या आधीच्या मृत्युच्या आकडेवारीत ६१२ मृत्यू अधिक वाढलेले आहेत. महाराष्ट्रात १८ मे २०२१ ला नोंदले गेलेले मृत्यू ६७९ आहेत. पण रीव्हीजनमुळे एकूण आकडा १२९१ दिसतो आहे. भारतीय सामाजिक सांख्यिकीचे हे वैशिष्ट्य आहे कि त्यात भूतकाळही बदलता येतो. कोव्हीड सांख्यिकी त्याला अपवाद नाही! कोल्हापूरमध्ये मागील दिवसांतील मृत्यूंच्या संख्येत वाढ झालेली आहे, त्यामुळे तेथील १४ दिवसफरकाचा मृत्यूदर झपाट्याने वाढलेला आहे.
प्रसारदर आता केवळ ३ जिल्ह्यांत १ हून अधिक म्हणजे वाढता आहे. सोलापूर, अकोला आणि अमरावती हे ते तीन जिल्हे आहेत. ह्या तीन जिल्ह्यांत १४ दिवस फरकाचा सरासरी मृत्यूदरही जास्त आहे. परिणामी हे जिल्हे ‘गंभीर’ अवस्थेत आहेत. (प्रसारदर १ हून जास्त आणि १४-दिवस फरकाचा मृत्यूदर २% हून जास्त) सावरलेले जिल्हे आहेत (प्रसारदर ०.७५ पेक्षा कमी आणि १४ दिवस-फरकाचा मृत्यूदर १% हून कमी) – भंडारा, नागपूर, गोंदिया आणि बुलढाणा.
पालघरमध्ये मृत्यूदरात वाढ झाल्याने तो आता सावरलेल्या गटात नाही. ठाण्यातही प्रसारदरात वाढ होऊन बऱ्याच दिवसांनी तो ०.७५ हून अधिक झाला आहे. म्हणजे केसेस घटत आहेत, पण घटण्याचा वेग मंदावत आहे. नांदेड, बीड, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग इथे सरासरी मृत्यूदर हा ३% हून अधिक आहे. ह्यांत काही भाग डेटा रिव्हिजनचाही आहे.
परिस्थिती सावरलेली ‘दिसते’ आहे, विशेषतः शहरी भागांत. पण मृत्यूदरात आणि संख्येत अपेक्षित अशी घसरण दिसत नाहीये. ही घसरण आल्याशिवाय नव्या केसेसमधील घट ही विषाणूप्रसार आटोक्यात आल्याने झाली आहे का मार्केट आणि शासनाच्या पल्ल्याला दुर्गम भाग दृष्टीआड झाल्याने आलेला भास आहे हे नक्की होणार नाही.

१९-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
भारतात कोव्हीड सांख्यिकीमध्ये जेव्हा केसेस बऱ्याच असतात तेव्हा बुधवार हे वास्तवाचे झटके असतात. सोमवार-मंगळवारचा विकेंड आभास बुधवारी संपतो. १९ मे २०२१ चा बुधवार त्याला अपवाद नाही.
नव्या केसेस आदल्या दिवसाहून जास्त आहेत, पण आठवडी ट्रेंडहून जास्त नाहीत. (panel १) TPR मध्ये थोडी वाढ आहे, लक्ष ठेवायचा मुद्दा आहे. टेस्टस घटलेल्या नाहीत, (panel २) त्यामुळे वाढता TPR जास्त कोड्यात टाकणारा आहे. १४ दिवस फरकाच्या मृत्यूदरात किंचित घट आहे. दोनच जिल्ह्यांत प्रसारदर वाढता आहे. पण अनेक जिल्ह्यांत १४ दिवस फरकाचा मृत्यूदर वाढता आहे.
सावरलेले जिल्हे – (प्रसारदर ०.७५ पेक्षा कमी आणि १४ दिवस-फरकाचा मृत्यूदर १% हून कमी) – भंडारा, नागपूर, गोंदिया, पुणे आणि बुलढाणा. पण नागपूर, भंडारा आणि गोंदिया इथे मृत्यूदर वाढता आहे.
गंभीर परिस्थिती – (प्रसारदर १ हून जास्त आणि १४-दिवस फरकाचा मृत्यूदर २% हून जास्त –सोलापूर आणि अकोला. अमरावतीमध्ये प्रसारदर घटता झालेला आहे. अमरावती जिल्हा ही एक क्युरिअस केस आहे. दुसऱ्या लाटेत ह्या जिल्ह्यात २-३ गोते आलेले आहेत. हा जिल्हा ‘गंभीर’ अवस्थेतून बाहेर असेल तर ती चांगली सुरुवात आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग इथे मृत्यूदर ४% किंवा अधिक आहे.
हा आठवडा निर्बंधांचे काय होणार ठरायला कदाचित मेक ऑर ब्रेक ठरेल. बहुतेक केसेस घटण्याचा ट्रेंडच सुरु राहील. कळीचा प्रश्न हा असणार आहे कि निर्बंध सैलावल्यावर काय होणार? परत एकदा झपाट्याने वाढ का कह्यात राहण्यापुरती वाढ?

२०-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
२० मे २०२१ चे कोव्हीड आकडे हे ‘जैसे थे’ आहेत. म्हणजे नव्या केसेस कमी होत आहेत. पण १४ दिवस फरकाच्या मृत्यूदरात किंचित वाढच आहे, कारण आज नोंदवलेले मृत्यू हे आदल्या दिवसापेक्षा बरेच जास्त आहेत. TPR जो मागचे २ दिवस घटत नव्हता तो आज घटून ११% हून कमी आहे. ही अवस्था ह्याअगोदर २ मार्च २०२१ ला होती. Active केसेस २ एप्रिल २०२१ नंतर आज ४ लाखाहून कमी आहेत. पण सावरलेले जिल्हे हे स्थिर नाहीयेत. काही दिवस मृत्यूदर कमी राहतो आणि परत वाढतो असे चित्र अनेक जिल्ह्यांत आहे. त्यामुळे एका हुरहूर लावणाऱ्या समातोलावर महाराष्ट्रातले चित्र आहे. जे दिसते आहे, प्रामुख्याने मोठ्या शहरांत ते पूर्वपदावर येण्याचा हुरूप येण्यासारखे आहे. पण जे दिसत नसावे ते चिंतेत टाकणारे असावे अशा शंकेला वाव आहे.
१९ मे हून २० मे ला केसेस घटल्या असल्या तरी काही जिल्ह्यांत आदल्या दिवसाहून लक्षणीय वाढ आहे. (panel २) परिणामी प्रसारदर वाढता असणारे जिल्हे २ वरून ४ झालेले आहेत. प्रसारदरात असा दैनिक बदल होत राहणं हे एक दिवशी केसेसमध्ये लक्षणीय घट आणि त्यानंतर त्याहून लक्षणीय वाढ अशा अनुक्रमाने होते. विषाणूप्रसार अश्या उड्या मारत होत असेल ह्यापेक्षा टेस्ट रिपोर्टिंग हे क्षमताताणाखाली असल्याने असा क्रम दिसण्याची शक्यता जास्त आहे.
सावरलेले जिल्हे – (प्रसारदर ०.७५ पेक्षा कमी आणि १४ दिवस-फरकाचा मृत्यूदर १% हून कमी) –गोंदिया, पुणे, बुलढाणा आणि वर्धा (नवा प्रवेश!). नाशिक वाटेवर आहे. नागपूर आणि भंडारा हे मृत्यूदर वाढल्याने ‘सावरलेले’ गटातून बाहेर आहेत.
गंभीर परिस्थिती – (प्रसारदर १ हून जास्त आणि १४-दिवस फरकाचा मृत्यूदर २% हून जास्त –सोलापूर आणि अमरावती. वाशीम थोडा दूर आहे आणि अकोल्यात मृत्यूदरात घट असल्याने ‘गंभीर’ गटातून बाहेर आहे, पण प्रसारदर वाढता आहे.
लसीकरणात मागचा आठवडा सावकाश होता. महाराष्ट्रात १९ मे २०२१ पर्यंत पर्यंत १ कोटी ६० लाख पहिले डोस आणि ४३ लाख दुसरे डोस दिले गेले आहेत. १८+ लोकसंख्येपैकी (अंदाज) १८% जणांना पहिले डोस तर ४.८% जणांना दोन्ही डोस मिळाले आहेत. १३ मे ते १९ मे २०२१ मध्ये ५ लाख पहिले डोस (एकूण गरजेच्या ०.६%) आणि पावणेतीन लाख दुसरे डोस (एकूण गरजेच्या ०.३%) दिले गेले. जिल्हानिहाय प्रगती बरीच विषम आहे. (panel ६ आणि ७) १ मे पासूनचा ट्रेंड पाहता १८-४५ गट आणि दुसरे डोस घटलेले आहेत. (panel ८)
लसीकरणाचा कोमट प्रकार आणि महानगरी-अन्य अशी विषम विषाणूप्रसार परिस्थिती पाहता प्रसारस्थितीनुसार निर्बंध शिथिल करणं आणि सुरवातीला (२४ मे पासून) मोजके कमी संभाव्य धोक्याचे निर्बंध शिथिल करून चाचपणी करणं हा सावध पवित्रा योग्य ठरेल.

२१-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
२१ मे २०२१ चे कोव्हीड आकडे चांगले नाहीत. नव्या केसेस फारच थोड्या कमी झाल्या आहेत आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मोठी वाढ दिसली आहे. काही दिवसांपूर्वी झालं तसं ७०८ मृत्यू हे एकूण मृत्यूंच्या संख्येत नव्याने आले आहेत. म्हणजे २१ मे २०२१ ला नोंदलेले मृत्यू आहेत ५५५, पण २१ मे ला झालेली मृत्यूसंख्येची वाढ आहे १२६३! १४ दिवस फरकाचा मृत्यूदर वाढता आहे ही बाब आहेच, पण एकूण मृत्यूंची संख्या लक्षात यायला काही दिवस जावे लागतात ही बाब कोव्हीडच्या साथीच्या तीव्रतेवर, यंत्रणेची क्षमता आणि ताण ह्यावर प्रकाश पाडते. तंत्रज्ञानाच्या बाबतीत आघाडीच्या राज्यांपैकी एक असणाऱ्या राज्याला ही बाब भूषणावह नाही.
ह्या तश्या करड्या ढगाला थोडी बरी किनार आहे. TPR आदल्या दिवसाहून कमी झाला आहे, १०.३%, जी पातळी ह्याआधी १ मार्चला होती. Active केसेस मागच्या काही दिवसातील वेगवान घटीच्या तुलनेत सावकाश घटल्या आहेत. मुंबई आणि ठाणे ह्या दोन जिल्ह्यांत १४ दिवस फरकाचा मृत्यूदर घटतो आहे.
सावरलेले जिल्हे – (प्रसारदर ०.७५ पेक्षा कमी आणि १४ दिवस-फरकाचा मृत्यूदर १% हून कमी) –गोंदिया, पुणे, बुलढाणा, वर्धा आणि नाशिक (नवा प्रवेश!). नाशिक वाटेवर आहे हे कालच दिसत होतं. पुण्यात backdated मृत्यू आल्याने काही दिवसांनी आणि काही दिवसांसाठी तिथे सरासरी मृत्यूदर वाढता दिसू शकतो, जसं कोल्हापूरसाठी होतंय. (panel ५)
गंभीर परिस्थिती – (प्रसारदर १ हून जास्त आणि १४-दिवस फरकाचा मृत्यूदर २% हून जास्त –सोलापूर आणि अमरावती. उस्मानाबादमध्ये मृत्यूदर तूर्तास कमी आहे, पण केसेस वाढत असतील तर तो साधारण वाढतोच.
केसेस घटणे आणि वाढणे ह्या दोन ढोबळ बाबींपेक्षा थोडी खोलात जायची बाब आहे ती म्हणजे वाढवेग (१+) आणि घटवेग (१-) घटतोय का वाढतोय. वाढवेग घटता असेल तर थोड्या दिवसात तो १ हून कमी होऊन केसेस घटण्याची अवस्था येण्याची शक्यता आहे. घटवेग वाढता असेल आणि १ हून थोडाच कमी असेल तर काही दिवसांनी केसेस वाढताना दिसण्याची शक्यता आहे. वाढता वाढवेग ही तर गंभीरच बाब आणि घटता घटवेग ही चांगली.
ह्या अनुषंगाने पाहिलं तर केसेस घटत्या आहेत पण परिस्थिती बदलू शकते असे जिल्हे – औरंगाबाद, गडचिरोली, हिंगोली, सातारा, वाशीम. सांगलीमध्ये परत केसेस वाढतील कि काय अशी अंधुक चिन्हे आहेत. तिथे मृत्यूदर अजून २%हून जास्त नाही, पण कल वाढता आहे.
सोलापूर आणि अमरावतीमध्ये काही दिवसांत केसेस घटायला सुरु होतील अशी पुसट चिन्हे आहेत. उस्मानाबाद मध्ये मात्र वाढता वाढवेग दिसतो आहे.
अजून बरीच मजल बाकी आहे. आजचा करडा दिवस अपवाद असेल आणि ज्या जिल्ह्यांत परिस्थिती बदलू शकते तिथे लक्ष दिले जाईल अशी आशा करूया. अशा जिल्ह्यांतील व्यक्ती त्यांची निरीक्षणे, स्थानिक आकडेवारीसह, नोंदवतील तर त्याने स्पष्टता येईल.

२२-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
२२ मे २०२१ चे कोव्हीड आकडे आदल्या दिवसाच्या करड्या छटा काहीश्या कमी करणारे आहेत. नव्या केसेस कमी झाल्या आहेत आणि उस्मानाबाद जिल्ह्यात मोठी घट दिसली आहे. आदल्या दिवशी मोठी वाढ, मग मोठी घट हे टेस्टिंग ताणाखाली असल्याचे लक्षण आहे. अर्थात ह्याचा दुसरा अर्थ काही दिवसांत विषाणूप्रसाराची वाढ (तात्पुरत्या) सर्वोच्च टोकाला जाण्याची शक्यता आहे किंवा होऊन गेली आहे असंही असू शकतं.
मृत्यूदरात किंचित घट आहे. आज नोंदवलेले मृत्यू आहेत ६८२. अर्थात पाठमोरी आकड्यांची तडजोड होत असेल तर दैनिक आकड्याला कमी-जास्त म्हणणं फारसं भरवश्याचे नाही. मुंबईत १४ दिवस फरकाचा मृत्युदर परत वाढतो आहे. ठाण्यात चांगलीच घट झाली असून तिथे हा मृत्यूदर १% हून कमी आहे.
लक्षणीय चांगल्या बाबी म्हणजे TPR १०% हून कमी आहे! ही पातळी ह्याआधी २३ फेब्रुवारीला होती. टेस्टिंगमध्ये घट नाहीये, त्यामुळे आजच्या आकड्यांच्या पाठी दडलेले सत्य हे जास्त गहिरे नाही. Active केसेसची घट सुरूच आहे.
सावरलेले जिल्हे – (प्रसारदर ०.७५ पेक्षा कमी आणि १४ दिवस-फरकाचा मृत्यूदर १% हून कमी) –गोंदिया, पुणे, बुलढाणा, आणि नाशिक. वर्ध्यातला केसेस घटण्याचा वेग थोडा मंदावला असल्याने तो ‘सावरलेले’ गटातून बाहेर गेला आहे. बुलढाणा वगळता अन्य सावरलेले जिल्हे तसे बाहेर फेकले जाण्याच्या तयारीतच आहेत.
गंभीर परिस्थिती – (प्रसारदर १ हून जास्त आणि १४-दिवस फरकाचा मृत्यूदर २% हून जास्त –फक्त अमरावती. उस्मानाबादमध्ये मृत्यूदर तूर्तास कमी आहे, पण केसेस वाढत असतील तर तो साधारण वाढतोच. सोलापूरमध्ये कल वाढीहून घटीचा बनला आहे असं आता तरी दिसतं आहे. सोलापूर, अकोला, सांगली आणि अर्थात उस्मानाबाद हे लक्ष ठेवायचे जिल्हे आहेत.
महाराष्ट्रातील नव्या केसेस घटण्याची प्रक्रिया सुस्पष्ट झाली असली तरी मृत्यूदरात तसं दिसत नाहीये. अर्थात इथेही जिल्हानिहाय वैविध्य आहे. चित्र क्र. ६ ते ९ मध्ये मी मृत्यूदराच्या थोड्या तपशीलात जायचा प्रयत्न केला आहे. चित्र ८ चा विचार केला तर अजूनतरी दैनंदिन मृत्यूंचा सर्वोच्च बिंदू आल्याचे दिसत नाही, अगदी आकड्यांच्या तडजोडीने आलेले दोन मोठे स्तंभ वगळले तरी. ही चिंतेची बाब आहे. केसेस घटणे, TPR घटणे पण मृत्यूदरात घट न येणे ह्याचा अर्थ असा असू शकतो - अनेक लक्षण नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या केसेस अधिकृत टेस्टिंगमध्ये येतंच नाहीयेत आणि बऱ्याच टेस्ट्स प्रामुख्याने लक्षणे नसलेल्या व्यक्तींसाठी वापरल्या जात आहेत, जसे ना-हरकत मिळवणे, सक्तीचे टेस्टिंग इ.
मागच्या महिन्याभराचा विचार केला तर यवतमाळ, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथे बरेच जास्त असलेले १४ दिवस फरकांचे मृत्युदर आता बरेच कमी झाले आहेत, विशेषतः यवतमाळ! (चित्र ६) कोल्हापूरमध्ये आकड्यांच्या प्रतिगामी तडजोडीने वाढ दिसते आहे, पण ती मंदावत जाईल.
जिथे मृत्यूदर ४% पर्यंत होता अशा अ-महानगरी जिल्ह्यांत मृत्यूदर कमी आहे आणि वाढतानाही दिसत नाही अशी उजेडाची बेटे म्हणजे – बुलढाणा, गोंदिया, आणि लातूर. बाकी अन्यत्र एकतर दर जास्त (२%+) आहे किंवा/आणि वाढतो आहे. जास्त आणि वाढता अशा काळजीच्या जागा म्हणजे औरंगाबाद, बीड, गडचिरोली आणि रायगड,
१४ दिवस फरकाचा मृत्यूदर हा मृत्यूंपेक्षा वेगाने घटणाऱ्या केसेसमुळे जास्त वाटण्याची शक्यता असते. मृत्यूंची तुलना निकाली (बरे झालेले+मयत) केसेसशी केल्याने हा बायस जाऊ शकतो. पण तिथेही (चित्र ९) काही सुस्कारा नाही. इतके दिवस खालावणारा निकाली दर (मोठ्या प्रमाणात डिस्चार्ज असल्याने) शेवटला वाढलेला आहे.
घटत्या नव्या केसेसने आपण बंधनमुक्त सुखशोधाकडे जायला उत्सुक असू, पण त्याआधी हे मृत्यूदराचे अंधारे कोडे सुटायला हवे. आपण एकदा मोकळे होऊन भिरभिरू लागलो कि कदाचित आपल्याला सोडून जाणारे आपल्याला डाचणारही नाहीत.

२३-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
२३ मे २०२१ चे कोव्हीड आकडे आणि विशेषतः एकूण मृत्यूंच्या आकड्यातील प्रतिगामी (backdated) वाढ ही फार दिलासादायी नाही. केसेसमध्ये आदल्या दिवसाहून किंचित वाढ आहे! दररोजच्या नव्या केसेसचा ट्रेंड, म्हणजे अपेक्षित दैनिक नव्या केसेस आता ३०००० हून कमी आहेत. पण हा आकडा पहिल्या लाटेच्या सर्वोच्च आकड्याहून जास्तच आहे. जर केसेस घटण्याचा कल असाच सुरु राहील तर मे महिन्याच्या अखेरीस दैनिक नव्या केसेस २०००० हून कमी असतील.
Active केसेसमध्ये सावकाश घट आहे. मागच्या आठवड्यात ११९५९० केसेस कमी झालेल्या आहेत. TPR ही आदल्या दिवसाहून किंचित कमी आहे. टेस्टिंगमध्ये घट नाही. (चित्र १-३)
मृत्यूंची संख्या बदलत राहणं हे यंत्रणेवरचा ताण दर्शवते आहे. प्रामाणिकपणे असे बदल करणं हे स्तुत्य असलं तरी असं करावं लागत आहे हे चिंताजनक आहे. १४ दिवस फरकाचा मृत्यूदर आता फेब्रुवारीत दिसलेल्या मृत्यूदराएवढा (जवळपास २%) आहे. मुंबई आणि पुणे (जिल्हा) इथे मृत्यूदर १.७५% झालेला आहे. पुण्यात आकड्यांच्या प्रतिगामी बदलाने वाढ दिसत असावी. ठाण्यातही वाढ आहे. अ-महानगरी जिल्ह्यांत औरंगाबाद, बीड, भंडारा आणि गडचिरोली इथे मृत्यूदर वाढता दिसतो आहे. (चित्र ५)
सावरलेले जिल्हे – (प्रसारदर ०.७५ पेक्षा कमी आणि १४ दिवस-फरकाचा मृत्यूदर १% हून कमी) –गोंदिया, पुणे, बुलढाणा, आणि नाशिक. जे काल होते तेच. बुलढाणा इथे प्रसारदर वाढण्याची तर बाकी जिल्ह्यांत मृत्यूदर वाढण्याची टांगती तलवार आहेच.
गंभीर परिस्थिती – (प्रसारदर १ हून जास्त आणि १४-दिवस फरकाचा मृत्यूदर २% हून जास्त –अमरावती आणि सोलापूर (परत). अकोला, सांगली, उस्मानाबाद आणि हिंगोली हे लक्ष ठेवायचे जिल्हे आहेत.

निर्बंधांच्या पुढे काय - थोडा विचार - २३-५-२१
१ जूनपासून काय हा प्रश्न आता येत्या आठवड्यात अधिकाधिक ठळक होत जाणार. धोरणकर्त्यांना काय द्विधा आहे – निर्बंध सैलावल्यावर विषाणूप्रसार वाढून परत आरोग्यक्षमतेच्या पातळीवर केसेस जातील कि काय. इथे आपण असं गृहीत धरतोय कि केसेस घटणे हे निर्बंधांमुळे झाले. पण मुळात हे गृहीतक अचूक नाही. मुंबई, पुणे आणि ठाणे ह्या महानगरी जिल्ह्यांत आणि लातूर, भंडारा, औरंगाबाद, धुळे, हिंगोली, जळगाव, जालना आणि नांदेड इथे दुसऱ्या लाटेतील नव्या केसेसचा सर्वोच्च बिंदू निर्बंधांचा परिणाम दिसण्याच्या अगोदरच होता. (चित्र 1 आणि 2) ह्या तिन्ही जिल्ह्यांत स्थानिक निर्बंध होते, पण ते राज्यव्यापी निर्बंधांच्या इतके तीव्र नव्हते. निर्बंधांच्या अपेक्षित परिणामाच्या आधीच सर्वोच्च बिंदू यायचं स्थानिक निर्बंध हे कारण नसेल तर उरलेलं कारण म्हणजे बऱ्याच जास्त लोकांपर्यंत विषाणूप्रसार झालेला असल्याने नव्या प्रसाराचा वाव मुळातच कमी झालेला असणे. हे निर्बंधाच्या शिवायच झालेलं असेल तर ह्या जिल्ह्यांना लाट परत उसळी घेईल हे भयही कमी असेल.
निर्बंधाच्या अपेक्षित परिणामबिंदूच्या नंतर सर्वोच्च बिंदू आणि मग सातत्यपूर्ण घट असा निर्बंधांचा टिपिकल परिणाम दिसणारे जिल्हे आहेत – अहमदनगर, बीड, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, नाशिक, पालघर, परभणी, रायगड, रत्नागिरी, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, नंदुरबार आणि वाशीम. इथे निर्बंध नसतील तर काय हा प्रश्न विचारात घ्यावाच लागेल.
बाकी जिल्ह्यांत निर्बंधांचा अपेक्षित परिणाम, विशेषतः सातत्यपूर्ण घट दिसत नाहीये. अकोला आणि अमरावती इथे तर अजून सर्वोच्च बिंदूच आलेला दिसत नाही. हा तिसरा गट आणि त्यातले शेवटचे दोन जिल्हे हे लक्ष केंद्रित करण्याचा जागा असाव्यात.
ह्या तीन गटांना अनुक्रमे कमी होणारी निर्बंधमोकळीक देण्याचे डोळस धाडस हा १ जून २०२१ पासूनच पर्याय असू शकतो.

२४-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
२४ मे २०२१ हा सोमवार असूनही कोव्हीड आकडे थोडेसे विचारात पाडणारेच आहेत. सोमवारची घट आहे, पण ह्या आधी काही आठवडे रविवार आणि सोमवार ह्यांत जशी मोठी घट दिसायची तशी नाहीये. पण टेस्टिंगमध्येही आता सोमवारच्या आकड्यांत फार घट येत नाही. TPR मध्ये घट आहे आणि आता TPR ९% हून कमी आहे. म्हणजे सोमवारी जी विकेंडच्या मर्यादित टेस्टिंगने कृत्रिम घट दिसायची तशी आता फारशी दिसत नसावी. तसं असेल तर चांगली बाब आहे. Active केसेसमध्येही चांगली घट आहे. १४ दिवस फरकाचा मृत्यूदरही किंचित घटलेला आहे, पण मागच्या आठवड्यात वारंवार झाली तशी आकड्यांची प्रतिगामी जुळवणूक होत राहील तोवर अशी घट हा भासमान प्रकारच मानायला लागेल.
सावरलेले जिल्हे – (प्रसारदर ०.७५ पेक्षा कमी आणि १४ दिवस-फरकाचा मृत्यूदर १% हून कमी) –गोंदिया, आणि नाशिक. अपेक्षेप्रमाणे बुलढाण्यात केसेस घटण्याचा दर सावकाश झाला आहे आणि पुण्यात मृत्यूदर वाढला आहे आणि त्यामुळे हे जिल्हे सावरले गटात नाहीत. नागपूर, ठाणे आणि लातूर हे काही दिवसांनी सावरलेले गटात येतील असं दिसतंय.
गंभीर परिस्थिती – (प्रसारदर १ हून जास्त आणि १४-दिवस फरकाचा मृत्यूदर २% हून जास्त –अमरावती आणि सिंधुदुर्ग (परत एकदा). सोलापूरमध्ये प्रसारदर चांगला मंदावला आहे. अकोला, आणि सांगली हे गंभीर गटाच्या जवळ असलेले दोन जिल्हे आहेत.
निर्बंधांचा महत्वाचा उद्देश हा असतो कि आरोग्यक्षमतेत रुग्णांना उपचार देण्याची क्षमता शिल्लक ठेवणं. जर निर्बंध काळाच्या शेवटी अशी बरीच क्षमता असेल तर निर्बंध सैलावल्यावर होऊ शकणारी मर्यादित तीव्रतेची रुग्णवाढ सहन करता येऊ शकते. जितके ह्या क्षमतेचे प्रमाण जास्त तितके निर्बंध सैलावणे आणि नंतर सैलावलेलेच ठेवणे शक्य.
https://stopcoronavirus.mcgm.gov.in/key-updates-trends इथे मुंबईतील उपलब्ध बेड्सची माहिती असते. राज्यासाठी अशी पद्धतशीर माहिती मिळत नाही.
मुंबईतील ऑक्सिजन, ICU आणि ventilator बेड्सची संख्या ८%, २% आणि २.५% नी घटली आहे. कारण मागणी घटलेली आहे. आणि शिल्लक क्षमता आहे अनुक्रमे ६३%, १९% आणि १०%. आठवड्याभरापूर्वी ही क्षमता अनुक्रमे ५१%, १३% आणि ७% होती. महाराष्ट्राचं सरासरी चित्र ह्याहून चांगलं असण्याची शक्यता कमी आहे, पण काही शहरांत असू शकतं. गंभीर रुग्णांना आवश्यक राखीव क्षमता अजूनही कमी आहे. अजून आठवड्याभराने त्यात वाढ होईल, पण ती पुरेशी असेल का?

२५-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
२५ मे २०२१चे कोव्हीड आकडे मनात शंकेची पाल चुकचुकवणारे आहेत. दैनिक नव्या केसेस घटत तर आहेत, पण घटण्याचा आठवडी ट्रेंड मंदावताना दिसतो आहे. ट्रेंड मंदावणे हे धोकादायक नाही, पण घटण्याचा ट्रेंड मंदावणे हे वाढीच्या सुरुवातीचा संकेत असू शकेल अशा दृष्टीने ही शंकेची पाल चुकचुकते आहे. त्याशिवाय परत एकदा आधीच्या एकूण मृत्यूंच्या आकड्यात वाढ - प्रतिगामी जुळवणूक - केली आहे. त्यामुळे १४ दिवस फरकाचा मृत्यूदर किंचित वाढलेला आहे. TPR मध्ये थोडी वाढ आहे, पण ती टेस्टिंग थोडे घटल्याने आलेली असावी असं दिसतंय. Active केसेसमध्ये घट आहे एवढीच आजची जमेची बाजू आहे.
अनेक जिल्ह्यांत केसेस घटण्याचा ट्रेंड मंदावताना दिसतो आहे. (चित्र ५) धुळे, जळगाव, आणि नंदुरबार वगळता अन्य साऱ्या जिल्ह्यात एकतर वाढ आहे किंवा घटण्याचा वेग मंदावतो आहे. केसेस घटणे थांबून परत वाढू लागतील अशी धोक्याची चिन्हे दिसत आहेत असे जिल्हे म्हणजे अहमदनगर, जालना, कोल्हापूर, मुंबई(!), परभणी, रायगड, रत्नागिरी, आणि यवतमाळ.
निकाली (डिस्चार्ज आणि मयत) रुग्णांमधील मृत्यूदर हे परिस्थिती किती गंभीर होती ह्याचे चांगले परिमाण आहे. १२ मे ते २५ मे २०२१ ह्या २ आठवड्याच्या काळात निकाली मृत्यूदर वाढलेला दिसतो आहे असे जिल्हे म्हणजे – बीड, भंडारा, गडचिरोली, हिंगोली, कोल्हापूर, नांदेड, आणि पालघर. केसेस घटण्याचा कल मंदावून वाढीचा होण्याचा धोका असलेले जिल्हे आणि निकाली मृत्यूदर वाढता असलेले जिल्हे इथे प्राधान्याने लक्ष द्यायची गरज आहे.

राज्यात सातारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, उस्मानाबाद, बीड, रायगड, पुणे, हिंगोली, अकोला, अमरावती, कोल्हापूर, ठाणे, सांगली, गडचिरोली, वर्धा, नाशिक, अहमदनगर, लातूर ह्या जिल्ह्यांत गृहविलगीकरण पूर्ण बंद करून प्रत्येक रुग्णाला कोव्हीड केंद्रात आणण्याचा निर्णय झालेला आहे. (https://www.loksatta.com/.../maharashtra-home-isolation.../) वरकरणी योग्य वाटणारा हा निर्णय लोकांच्या वर्तनाचा विचार केला तर विपरीत ठरू शकतो.
बहुतेक रुग्ण परिस्थिती गंभीर होईपर्यंत कोव्हीड केंद्रात जायला तयार नसतात असं म्हणता येईल. बहुतेक व्यक्ती टेस्टिंगचा निर्णय हा टेस्ट positive आल्यावर काय हा विचार करून घेतात. जर टेस्टिंगनंतर नकोसा अनुभव येणं म्हणजे कोव्हीड केंद्रात जावे लागणे असं होणार असेल तर मुळात टेस्टच न करून घेण्याचा निर्णय वाढू शकतो. अनेक डॉक्टर्स हे लक्षणांवरून उपचार करतच आहेत. त्यामुळे टेस्टिंग न केल्याने उपचार नाहीत असा धोका खूप संभवत नाही. अशा अवस्थेत अत्यंत गंभीर केसेसच टेस्टिंग परत येतील आणि मृत्यूदर वाढलेला दिसेल. अर्थात जर रुग्णालय कोव्हीड टेस्ट सक्तीची करत नसेल, जे आता दाखल होताना सक्तीचे नाही, तर टेस्टिंग आणि मृत्यूदर दोन्ही घटताना दिसू शकतात, पण प्रत्यक्षातली परिस्थिती वेगळी असू शकते.
शासनाचे हे अठरा जिल्हे – रेड झोन – काय निकषावर ठरवलेले आहेत तर राज्यातल्या TPR - म्हणजे positive रुग्ण आणि चाचण्या ह्यांचे गुणोत्तर -पेक्षा अधिक TPR असलेले जिल्हे. शासन जिल्हाशः टेस्टिंगचा डेटा खुला करतच नाही. पण मुळात रेड झोन (गंभीर अवस्था) हा उपलब्ध आरोगक्षमता (जिची जिल्हावार माहिती लोकार्थ उपलब्ध नाही) आणि कल ह्यांच्या अनुषंगाने ठरवायची व्याख्या आहे. शासनाच्या रेड झोनपैकी बीड, पुणे, ठाणे, गडचिरोली, वर्धा, नाशिक आणि लातूर इथे केसेस पुरेश्या वेगाने मंदावत आहेत. (सोबतचे आलेख पहा.) त्यामुळे ते रेड झोनमध्ये का आहेत हेच कोडे आहे. खाजगी टेस्टिंग किंवा सरकारी टेस्टिंग व्यापक प्रमाणावर उपलब्ध नसल्याने जिथे केसेस घटत आहेत इथे मोजकेच लोक टेस्टिंग करून घेत असल्याने TPR जास्त राहू शकतो. मुळात बहुतेकांना टेस्टिंग नको आहे ही बाब आहे.
नियम बनवताना लोकांचा त्या वर्तनाला येऊ शकणारा प्रतिसाद लक्षात घेतला गेला पाहिजे. ‘रेड झोन’ मधील ११ जिल्हे हे रुग्णवाढ न थांबलेले किंवा रुग्णघट मंदावून परत वाढ होण्याचा धोका असलेले आहेत. पण त्याला योग्य उपाय टेस्टिंग वाढवणं आणि अर्थात गंभीर केसेसना आवश्यक क्षमता वाढवणे हा आहे. आणि हे टेस्टिंग सर्रासच हवे. फोकस्ड टेस्टिंग किंवा लक्षण आल्यावर टेस्टिंग हे टंचाईने आलेले दात कोरून पोट भरायचे मार्ग आहेत, योग्य रस्ते नव्हेत.

२६-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
२६ मे २०२१ चे कोव्हीड आकडे निर्बंधांचे सैलावणे दूर सरकते का अशी शंका निर्माण करणारे आहेत. केसेस घटण्याचा आठवडी ट्रेंड स्पष्ट मंदावताना दिसतो आहे. बुधवार असल्याने कालच्यापेक्षा आज केसेसमध्ये वाढ अपेक्षित होतीच, थोडीच वाढ आहे. पण मुळात ह्या आठवड्यात २०००० पेक्षा कमी दैनिक केसेस येणे सुरु व्हायला हवे होते. तसे न होता २०००० च्या आसपास केसेस स्थिरावणार किंवा परत एक उसळी घेणार अशी पुसट चिन्हे आहेत. Active केसेसमध्ये १८ दिवसानंतर पहिल्यांदा वाढ झालेली आहे. १४ दिवस फरकाचा मृत्यूदर २%+ अधिक झालेला आहे आणि ही दुसऱ्या लाटेतील सर्वात वाईट पातळी आहे. ह्याचे कारण अर्थातच – मृत्यूसंख्येची प्रतिगामी जुळवणूक! साऱ्या मोठ्या शहरी जिल्ह्यांत १४ दिवस फरकाचा मृत्यूदर वाढता आहे.
TPR परत एकदा ९% हून कमी आहे एवढीच जरा हायसे वाटणारी बाब. दैनिक टेस्टिंग २.९ लाखाच्या आसपास स्थिरावले आहे. टेस्टिंग labs ना सबसिडी देऊन आणि किमान टेस्ट करण्याचा प्रोटोकॉल बदलून एकूण टेस्टिंग वाढवणे, बहुतांश केसेस लक्षणांच्या एकदम सुरुवातीलाच सापडणे आणि त्यातून मृत्यूदर कमी होणे हा मार्ग अवलंबण्याची गरज आहे.
निर्बंध केव्हा सैलावणार ह्याबद्दल चर्चा होते आहे आणि त्यात अनेक सूचक निकषांच्या बातम्या येत आहेत. ५०% लसीकरण झाल्याशिवाय निर्बंध सैलावणे बरोबर नाही असे एक विधान वाचले. २५ मे २०२१ पर्यंत महाराष्ट्रात सुमारे १९% १८+ लोकांना पहिला डोस मिळाला आहे तर ५% लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. संख्येच्या रुपात पाहिलं तर १.६८ कोटी पहिले डोस तर ४४ लाख दुसरे डोस दिलेले आहेत. १९ मे ते २५ मे २०२१ ह्या आदल्या सप्ताहात केवळ ८ लाख पहिले डोस तर १.२ लाख दुसरे डोस दिले गेले आहेत.
३५ पैकी १० जिल्ह्यांत २०% पात्र व्यक्तींना पहिला डोस मिळालेला आहे. हिंगोली,पालघर, सोलापूर आणि जळगाव इथे बरेच कमी प्रमाण आहे. मागच्या ७ दिवसांतील पहिले आणि दुसरे डोस मुंबईत आणि मोठ्या शहरी जिल्ह्यांत जास्त प्रमाणात दिले गेले आहेत. (चित्र ५ आणि ६)
केवळ पहिल्या डोसासाठीचे ५०% लक्ष्य पूर्ण करायचे म्हटले तरी अजून बरीच मजल आहे. एवढा वेळ मागणी-पुरवठ्याच्या आदिम बलासमोर निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची सरकारी क्षमता आहे का हा पहिला प्रश्न आणि एवढा काळ तीव्र निर्बंध ठेवण्याने होणाऱ्या अहिताची भरपाई कशी व्हावी हा दुसरा प्रश्न लसीकरण हा निर्बंध सैलावण्याचा निकष करण्याअगोदर सोडवले पाहिजेत.

२७-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
२७ मे २०२१ चे कोव्हीड आकडे मागच्या २ दिवसांचे मळभ काही प्रमाणात दूर करणारे आहेत. आजच्या नव्या केसेस आदल्या दिवसाहून बऱ्याच कमी आहेत. Active केसेसमध्ये घट झालेली आहे. TPR कमी झालेला आहे.
आजही ‘मृत्यूसंख्येची प्रतिगामी जुळवणूक’ अर्थात एकूण मृत्यूंची संख्या ही आज नोंदलेल्या मृत्यूंपेक्षा जास्त वाढली आहे. जोवर अशी जुळवणूक आहे तोवर दैनंदिन मृत्यूंची संख्या कमी आहे असे म्हणण्याला विशेष अर्थ नाही. अश्या जुळवणूकीने १४ दिवस फरकाचा मृत्यूदर वापरण्यातील चूक वाढते. त्यामुळे निकाली मृत्यूदर अर्थात डिस्चार्ज आणि मयत केसेसमधील मयत केसेसचे प्रमाण हा निर्देशक वापरावा लागतो.
निकाली मृत्यूदरात वाढ दिसते आहे असे जिल्हे म्हणजे – औरंगाबाद, बीड, भंडारा, गडचिरोली, हिंगोली, कोल्हापूर, नांदेड, पालघर, रत्नागिरी, वर्धा, आणि वाशीम. ह्या यादीत मोठे शहरी जिल्हे नाहीत हे लक्षात घ्यायला हवं. मोठे शहरी जिल्हे साऱ्या मिडीयाचा फोकस होतात आणि त्यांच्या पलीकडच्या परिस्थितीवर, अपवाद वगळता, फार प्रकाश पडत नसतो.
चाचण्यांची संख्या घटली आहे (चित्र ३ ). हा गृहविलगीकरण बंद करण्याच्या आमनधपका वाटणाऱ्या उपायाचा परिणाम आहे हे कळायला काही दिवस जावे लागतील. त्यामुळे २७ मे २०२१ ची रुग्णघट ही आभासीही असू शकते, कारण TPR काही विशेष घटलेला नाही.
मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत केसेस घटण्याचा वेग बराच मंदावला आहे. हे तिन्ही जिल्हे मुंबई महानगरी प्रदेशाशी निगडीत आहेत. मुंबईतील बंधने सैलावण्याच्या योजनांसाठी केसेस नियंत्रणात राहणं गरजेचं आहे. सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, आणि रत्नागिरी इथे केसेसमध्ये वाढीचा कल आहे. अकोला आणि अमरावती ह्या दोन जिल्ह्यांत घटीचा कल आहे ही समाधानाची बाब, कारण मागचे बरेच दिवस ह्या दोन जिल्ह्यांत केसेस वाढत होत्या.

२८-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
२८ मे २०२१ चे कोव्हीड आकडे हे कोव्हीडलाटेतून सावकाश आणि अस्थिर सावरणे दाखवणारे आहेत. नव्या केसेसमध्ये आदल्या दिवसाहून थोडी घट आहे. पण नव्या दैनिक केसेसचा आठवडी ट्रेंड अजून २००००हून कमी झालेला नाही. TPR घटून ७.९% झालेला आहे. पण दररोजच्या चाचण्याही कमी झालेल्या आहेत.
केसेस कमी होणं आणि सोबत TPR कमी होत चाचण्या कमी होणं हे परिस्थिती सुधारण्याचे लक्षण आहे. चाचण्यांची गरज, जी विषाणूप्रसार दर्शवते, तीच कमी झाल्याने चाचण्या कमी झाल्या असे म्हणता येते. पण मृत्यूसंख्येत अपेक्षित घट दिसत नसल्याने सुधाराच्या शक्यतेबाबत ठामपणे काही बोलता येत नाही.
राज्यातील एकूण मृत्यूंच्या संख्येत दररोजच प्रतिगामी जुळवणूक होते आहे. अनेक महानगरपालिकांच्या दैनंदिन माहितीपत्रकात रिपोर्ट होणारे मृत्यू हे राज्याच्या बुलेटीनमध्ये ह्याच महानगरपालिकांमधील रिपोर्ट होणाऱ्या मृत्यूहून जास्त असतात. पुढे ते राज्याच्या आकड्यांत समाविष्ट केले जातात. माहिती गोळा, छाननी, संगतवारी आणि वहन करणाऱ्या यंत्रणेला असा वेळ लागणे हे यंत्रणा ढिसाळ असण्याचे लक्षण आहे किंवा परिस्थिती गंभीर असल्याने तिच्यावर असणाऱ्या ताणाचे.
रायगड, पालघर ह्या जिल्ह्यांत केसेस परत वाढायला लागतील अशी चिन्हे आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथे त्या वाढू लागलेल्या आहेत. ह्या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. मुंबईतही केसेसमधील घट मंदावण्याची पुसट चिन्हे आहेत, पण अजून उसंत दिसते आहे. भंडारामध्येही केसेस परत वाढतील अशी चिन्हे आहेत. (चित्र ५)
कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी मध्ये रुग्णवाढ आणि मृत्यूदरवाढ अशी दुहेरी गंभीर परिस्थिती आहे. कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे! रायगड, पालघर आणि भंडारा इथेही अशी परिस्थती निर्माण होऊ शकते. (चित्र ४) गोंदिया हा एकच जिल्हा असा आहे जिथे मागचे बरेच दिवस केसेसची वाढ आणि मृत्यू हे दोन्ही नियंत्रणात आहेत. धुळे जालना आणि नागपूर ह्या जिल्ह्यांतही ही दुहेरी सुधाराची चिन्हे आहेत, पण ती किती टिकतात हे महत्वाचे आहे.

२९-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
२९ मे २०२१ चे कोव्हीड आकडे हे महाराष्ट्राच्या क्युरिअस केसला ठळक करणारे आहेत. क्युरिअस दोन कारणांसाठी. प्रतिदिन ६०००० वरून प्रतिदिन ५००००- नव्या केसेस ही घट १० दिवसात झाली. तिथून प्रतिदिन ४००००- चा टप्पा ४ दिवसात आला. मग ६ दिवसांनी ३००००- चा टप्पा आला. तिथून ७ दिवसांनी प्रतिदिन केसेसचा ट्रेंड २३००० पाशीच आलेला आहे. केसेसची घट इतकी सावकाश का होते आहे हे एक कोडे. दुसरे कोडे अर्थातच मृत्यूसंख्येचे आणि त्यात सातत्याने केल्या जाणाऱ्या जुळवणूकीचे. आजही अशी जुळवणूक झालेली आहे.
केवळ दैनंदिन मृत्यूसंख्येतील बदलांचा ट्रेंड (चित्र ८ आणि ९) जरी पाहिला तर मुंबई आणि नंदुरबार वगळता अन्य जिल्ह्यांत सातत्याने नवे नोंदले जाणारे मृत्यू कमी होताना दिसत नाहीयेत! म्हणजे मुंबईतील वाढता वाटणारा १४ दिवसांचा मृत्यूदर हा खरंतर केसेसपेक्षा मृत्यू कमी वेगाने घटत असल्याने वाढता दिसतो आहे. बाकी जिल्ह्यांत घट सातत्यपूर्ण नाही किंवा अद्याप सुरु झालेली नाही. मृत्यूसंख्या घटणे हा अत्यंत ठाम निर्देशक आहे आणि तो दिसेपर्यंत परिस्थिती सावरली असे म्हणता येणार नाही.
Active केसेसमध्ये घट आणि TPR मध्ये वाढ नाही ह्या आजच्या दिलासादायक बाबी. ५% ह्या स्वीकारार्ह पातळीपासून TPR अजून ३% जास्त आहे. टेस्टिंग सावकाश घटते आहे.
१४ दिवस फरकाचा आणि निकाली मृत्यूदर हे दोन्ही वाढत आहेत. अनेक जिल्ह्यांत १४ दिवसफरकाचा मृत्यूदर २%+ आणि वाढता आहे. बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, नागपूर, पालघर आणि परभणी इथेच २% - पातळी आहे.
मृत्यूदर हा काही दिवस आधीच्या कोव्हीडस्थितीचा निर्देशक आहे तर प्रसारदर हा येऊ घातलेल्या परिस्थितीचा. प्रसारदराचा विचार केला तर ६ जिल्ह्यांत केसेस वाढण्याचा कल आहे. हा कल बहुतेकदा वाढत्या मृत्यूदरातही परावर्तित होतो. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, आणि भंडारा इथे प्रसारदर जास्त आणि मृत्यूदर जास्त अशी दुहेरी गंभीर परिस्थिती आहे. सातारा, पालघर, आणि रायगड इथेही अशी दुहेरी गंभीर परिस्थिती येण्याची शक्यता आहे. ह्या दोन्ही बाबींवर चांगली परिस्थिती असलेले जिल्हे आहेत – गोंदिया, धुळे, नागपूर आणि जालना. काही दिवसांनी जळगावही ह्या यादीत येऊ शकते.

३०-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
३० मे २०२१ चे कोव्हीड आकडे हे महाराष्ट्राच्या दुसऱ्या लाटेतून सावरणाऱ्या प्रक्रियेतली बरी चिन्हे आहेत. १६ मार्च २०२१ नंतर पहिल्यांदा नव्या केसेस ह्या २०००० हून कमी आहेत, अडीच महिने! मृत्यूंच्या संख्येतली जुळवणूक सुरूच असली तरी ती जमेस धरूनही दैनिक नव्या मृत्यूंच्या नोंदीत घट सुरु झाल्याचा कल दिसतो आहे. (चित्र ६) TPR आदल्या दिवसाहून घटलेला आहे आणि ७.४% आहे.
दैनंदिन चाचण्या कमी होत आहेत, जे मागणी घटल्याचे लक्षण असावे अशीच जास्त शक्यता आहे. Active केसेसमध्ये आज बरीच कमी घट झाली आहे. १७ मे ते २३ मे २०२१ ह्या आठवड्यात सुमारे १.२ लाख केसेस घटल्या. पण त्यानंतरच्या, म्हणजे आज पूर्ण झालेल्या आठवड्यात ७६००० केसेस घटल्या आहेत. काही प्रमाणात प्रोसेस सावकाश होणं अपेक्षित आहेच. पण अजूनही महाराष्ट्रात जवळपास ३ लाख केसेस active आहेत. ३१ जानेवारी २०२१, ज्या दिवसानंतर दुसरी लाट स्पष्ट झाली त्यादिवशी active केसेस होत्या ४६०००.
जिल्हाशः विचार केला तर (चित्र ४) सिंधुदुर्ग, कोल्हापूर, भंडारा आणि रत्नागिरी इथे केसेस वाढीचा कल आणि जास्त (२%+) असा १४ दिवस फरकाचा मृत्यूदर अशी दुहेरी गंभीर अवस्था आहे. वाढता प्रसारदर आणि वाढता मृत्यूदर म्हणजे केसेस आणि मृत्यू दोन्ही वाढते असणे! रत्नागिरीमध्ये केसेसची घट लवकरच सुरु होईल अशी चिन्हे आहेत. तशीच चिन्हे बुलढाण्यातही आहेत. भंडारामध्ये वेग मंदावेल अशी चिन्हे अजून नाहीत. पालघरमध्ये केसेस वाढीचा कल येईल अशी चिन्हे आहेत. पालघर वगळता, रायगडची लक्ष ठेवायची केस सोडली तर जिथे केसेस घटत आहेत अशा बाकी जिल्ह्यांत, जे २७ आहेत, तिथे ही घट पलटून वाढ सुरु व्हायची सुस्पष्ट चिन्हे तरी नाहीत.
TPR च्या आधारे काही निर्बंध सैलावण्याचे सावकाशीचे धोरण चुकीचे नाही. दुधाने तोंड पोळल्याने ताक फुंकून पिण्याचा प्रकार धोरणकर्ते करणार ह्यांत नवल नाही.

३१-५-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
३१ मे २०२१ चे कोव्हीड आकडे हे एकदम सोमवारचे आभासी आकडे आहेत. साधारण दैनिक २.५ लाख+ असणाऱ्या चाचण्या १.९ लाख, म्हणजे २४% कमी झाल्या आहेत, TPR थोडा वाढलेला आहे. म्हणजेच जर आदल्या दिवशी इतक्या चाचण्या झाल्या असत्या तर रुग्णसंख्येत घट दिसलीच नसती! मागचे २ सोमवार चाचण्या फार घटल्या नव्हत्या, ह्यावेळी घटल्या. TPR घटता असल्याने हे तसं सुचिन्ह आहे, पण गृहविलगीकरण बंद केल्याने टेस्टिंग कमी होणं असं घडत नाहीना ह्यावर लक्ष ठेवायला हवं. पण Active केसेसमध्ये चांगली घट आहे आणि दररोज नव्याने नोंदले जाणारे मृत्यूही घटताना दिसत आहेत (चित्र ७).
जिल्हाशः बघितलं तर भंडारा इथे सर्वात गंभीर चित्र आहे – जास्त मृत्यूदर (१४ दिवस फरकाचा) आणि केसेस वाढण्याचा कल. त्याशिवाय अशीच दुहेरी रिस्क सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत आहे. रत्नागिरीत केसेस घटण्याच्या कलाची सुरुवात दिसते आहे. पालघरमध्ये केसेसवाढीची सुरुवात आहे. बाकी जिल्ह्यांत केसेस घटण्याचा स्पष्ट कल आहे.
निर्बंध सैलावायला सावध सुरुवात उद्यापासून होईल. TPR आणि ऑक्सिजन बेड्सची शिल्लक क्षमता ह्या दोन निकषांवर निर्बंध सैलावणे अवलंबून आहे. ही योग्य निवड आहे. निर्बंध सैलावाल्याने व्यक्तीपरस्परसंपर्क वाढून रुग्णालयात दाखल होणाऱ्या केसेसमध्ये वाढ किंवा घट मंदावणे हे घडेल अशी शक्यता आहे.
https://stopcoronavirus.mcgm.gov.in/key-updates-trends इथे मुंबईतील क्षमतेचा दैनंदिन आढावा असतो. २३ मे ते ३० मे २०२१ मध्ये मुंबईत उपलब्ध ऑक्सिजन बेड्स – ११४५५, ICU- २८३२, आणि Ventilators – १४९३ आहेत. त्यात उपलब्ध क्षमता आहे अनुक्रमे ७१%, २४.५% आणि १५%. अन्य जिल्ह्यांतील अवस्था अशीच किंवा ह्याहून वाईट असेल असे पकडू. ही क्षमता निर्बंध सैलावल्यावर कितपत रुग्णवाढ झेपू शकते हे ठरवणार आहे.

१-६-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
१-६-२१ चे कोव्हीड आकडे निर्बंध सैलावण्याच्या पहिल्या दिवसाला साजेसे आहेत. खरंतर मंगळवारी सोमवारपेक्षा थोड्या केसेस जास्त येतात, पण आज तसं झालेलं नाही. ह्याचं कारण नाशिक जिल्ह्याच्या आकड्यांत झालेली मोठी घट आहे.
चाचण्यांची संख्या आदल्या दिवसाहून जास्त आहे, पण २.५ लाखाहून कमी आहे. पण TPR मध्ये जवळपास १.५% ची घट आहे आणि आता TPR ६.३% आहे. Active केसेसमध्ये मोठी घट झालेली आहे. दैनंदिन मृत्यूंचा कलही घटता आहे. (चित्र ६)
(चित्र ५) सातारा आणि रत्नागिरी इथे केसेस घटणे सुरु झालेले दिसते आहे. भंडारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पालघर इथेच केसेस वाढण्याचा कल आहे. ह्याच्या उलट धुळे जिल्ह्यात परिस्थती आहे. प्रसार आणि मृत्यूदर ह्या दोन्ही पातळ्यांवर जिल्ह्याची कामगिरी सातत्याने चांगली आहे. ह्या जिल्ह्यांत – गंभीर आणि दिलासादायी- काय घडते आहे हे नीट कळायला हवे आहे. तेथील स्थानिक सजग नागरिक, जे तिथला ट्रेंड track करत असतात त्यांनी आपली निरीक्षणे नोंदवायला हवीत.
लसीकरणाच्या पातळीवर स्लो आणि स्टेडी प्रकार सुरु आहे. २५ मे ते ३१ मे २०२१ ह्या आठवड्यांत पहिले डोस प्रामुख्याने मोठ्या शहरी भागांत केंद्रित होते, जे लोकसंख्येच्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे योग्य. पण दुसरे डोस कसे वाटले जात आहेत हे कोडेच आहे. एकूण लसीकरण फार झालेले नाही. ह्या ७ दिवसांत १२२०७०६ पहिले डोस दिले गेले आणि १४७२०९ दुसरे डोस. महाराष्ट्रात आता एकूण १.८ कोटी पहिले डोस झालेले आहेत आणि ४५ लाख दुसरे डोस. लसीकरण पात्र लोकसंख्येतील ५.१% चे पूर्ण लसीकरण झालेले आहे तर ७९.७% चे पूर्ण लसीकरण बाकी आहे. ह्यांत परत जिल्हावार विषमता आहेच. नाशिक वगळता मोठे शहरी जिल्हे राज्य सरासरीच्या पुढे आहेत. हिंगोली आणि पालघर हे सर्वात पिछाडीवर आहेत.
१० जून २०२१ च्या आसपास निर्बंध सैलावलेल्या शहरांत/जिल्ह्यांत काय अवस्था असेल हीच कळीची बाब आहे. जर निर्बंध सैलावल्याने केसेसमध्ये शिल्लक क्षमता भरून टाकणारी वाढ येणार नाही असे दिसले तर लसीकरणाच्या धीम्या साथीतही अजून काही निर्बंध सैलावता येतील.

२-६-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
२-६-२१ चे कोव्हीड आकडे महाराष्ट्रातील परिस्थिती सुधारत असल्याची चिन्हे स्पष्ट करणारी आहेत. बुधवार असल्याने केसेसच्या संख्येत वाढ आहे, पण बरीच थोडी. चाचण्यांची संख्या आदल्या दिवसाहून जास्त आहे, पण २.५ लाखाहून कमी आहे आणि TPR जवळपास तेवढाच आहे. Active केसेसमध्ये चांगली घट आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे दैनंदिन मृत्यूंचा कलही चांगलाच घटला आहे. (चित्र ६)
कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग ह्या दोनच जिल्ह्यांत केसेस वाढण्याचा कल दिसतो आहे. भंडारा, बुलढाणा आणि पालघर येथे परत केसेस घटण्याचा कल दिसू लागला आहे. कोल्हापूरमध्ये लवकरच केसेस घटायला सुरवात होईल असं दिसतंय. बाकी कोणत्याही जिल्ह्यांत केसेस वाढण्याचा कल दिसेल अशी चिन्हे नाहीत.
दैनंदिन मृत्यूसंख्येच्या बाबतीत काही जिल्ह्यांत वाढीचा ट्रेंड दिसतो आहे,, ज्याकडे लक्ष द्यायला हवं. गडचिरोली, लातूर, आणि नांदेड इथे १४ दिवस फरकाचा मृत्यूदर आणि नव्याने नोंद होणारे मृत्यू हे दोन्ही वाढताना दिसत आहेत. ह्या तिन्ही जिल्ह्यात मागचे काही आठवडे दैनिक नव्या केसेस सातत्याने घटत होत्या. हे घटणे टेस्टिंगच्या कमतरतेने येत होते आणि म्हणून गंभीर केसेस वाढून मृत्यू वाढत आहेत किंवा शहरी भागातील मोठी घट आणि ग्रामीण भागातील वाढ ह्यामुळे केसेस घटणे पण मृत्यू वाढणे असं चित्र दिसतं आहे हे स्पष्ट व्हायला हवं.
ह्या जिल्ह्यांत काय घडते आहे हे नीट कळायला हवे आहे. तेथील स्थानिक सजग नागरिक, जे तिथला ट्रेंड track करत असतात त्यांनी आपली निरीक्षणे नोंदवायला हवीत.

३-६-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
३-६-२१ चे कोव्हीड आकडे हे महाराष्ट्रातील परिस्थिती स्लो आणि स्टेडी सुधारत असल्याची चिन्हे स्पष्ट करणारी आहेत. आदल्या दिवसापेक्षा केसेसच्या संख्येत वाढ आहे, पण बरीच थोडी. ही थोडी वाढही प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यांत आलेल्या मोठ्या वाढीमुळे आहे. चाचण्यांची संख्या २.५ लाखाहून जास्त आहे आणि सोबत TPR ६% हून कमी (५.८%) आहे. जवळपास ४ महिन्यांनी TPR हा ६% हून कमी आहे. Active केसेसमध्ये चांगली घट होणे सुरूच आहे आणि दररोज नोंदल्या जाणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही सातत्याने घट आहे.
शासनाच्या आकडेवारीत आज नोंदलेल्या मृत्यूंची संख्या कमी असते. त्या बुलेटीनमध्ये तळटीपेत अगोदरच्या दिवसांत मृत्यूंची संख्या वाढली अशी नोंद असते. ह्या मुत्सद्दी प्रांजळपणाने किंवा यंत्रणेच्या सुसूत्रीकरण अभावाने, वृत्तपत्रात येणारा दैनंदिन मृत्यूंचा आकडा कमी दिसतो. अर्थात अशा फेरहिशोबानंतरही मृत्यूंची संख्या घटतच आहे!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात केसेस वाढत्या आहेत आणि घट सुरु व्हायला अवकाश आहे. कोल्हापूर आणि रत्नागिरी वाढ-घट संतुलनावर आहेत. रायगडमध्ये परत वाढ दिसेल अशा शंकेला वाव आहे. लातूर, नांदेड इथे मृत्यूदर जास्त आहे.
निर्बंध पूर्ण सैलावण्याच्या शक्यतेची आज समाजमाध्यमांत आणि माध्यमांत चर्चा झाली. TPR आणि बेड्स क्षमता ह्यांच्यावर आधारित dynamic निर्बंध हे धोरण चुकीचे नाही. पण १ जूनपासून आलेल्या सैलसर वातावरणाचे परिणाम काय दिसतात हे १०-१४ जूनपर्यत स्पष्ट होईल. त्यानंतर नवे धोरण अंमलात आणणे इष्ट ठरेल. आणि धोरण सतत fine-tuning करणे हे सैद्धांतिकदृष्ट्या योग्य असले तरी त्या बदलांचे कम्युनिकेशन, अगदी सोशल मिडियाद्वारेही, अचूक होत नाही आणि बराच गोंधळ होतो. त्यामुळे किमान २ आठवड्यांसाठी तरी धोरण स्थिर असावे.

४-६-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
४-६-२१ चे कोव्हीड आकडे हे महाराष्ट्राच्या दुसऱ्या लाटेच्या धक्क्यातून सावरण्याबाबत मिश्र संकेत देणारे आहेत. आदल्या दिवसापेक्षा केसेसच्या संख्येत मोठी घट आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मात्र नव्या केसेस मध्ये मोठी वाढ आहे. Active केसेसची संख्या जवळपास अडीच महिन्यानंतर २ लाखाहून कमी आहे. TPR घटून ५.५% आहे आणि चाचण्यांची संख्या २.५ लाख आहे.
पण एकूण मृत्यूंच्या संख्येत १३००+ वाढ आहे! ह्यांतले १०००+ मृत्यू हे आधीच्या दिवसांतील आहेत. साहजिक दररोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या मृत्यूंचा कल परत वाढताना दिसतो आहे. (चित्र ६) अनेक जिल्ह्यांत दैनिक नव्या नोंदल्या जाणाऱ्या मृत्यूंचा कल वाढताना दिसतो आहे, अगदी अशा जिल्ह्यांतही जिथे नव्या केसेस सातत्याने घटत आहेत.
नव्या केसेस घटण्याचा सातत्यपूर्ण कल पण मृत्यू वाढण्याचा कल असं विसंगत चित्र का दिसू शकतं? ह्यांचं एक संभाव्य उत्तर असं आहे – शहरी भागांत, महानगरी भागांत टेस्टिंग होत आहे आणि केसेस आणि मृत्यू दोन्ही घटत आहेत. पण ग्रामीण भागात टेस्टिंग कमी आहे आणि रुग्ण बरेच उशिरा सापडत असल्याने मृत्यूंची संख्या जास्त आहे. ग्रामीण भागातला TPR जास्त असेल तर वरचे स्पष्टीकरण खरे असण्याची शक्यता बरीच जास्त आहे. TPR चा अद्ययावत जिल्हाशः डेटा खुल्या वापरला उपलब्ध नाही, त्यामुळे ही शक्यता तपासता येत नाही.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील वाढीचा कल सुरु आहे. रत्नागिरीत आज झालेल्या मोठ्या वाढीने परत वाढीचा कल आला आहे. रायगडमध्ये अजूनही काही दिवसांनी केसेस वाढताना दिसतील अशी शक्यता आहे. अमरावती, जिथे एकाहून अधिक वेळेला दुसऱ्या लाटेने उसळी (surge) घेतली होती तिथली परिस्थिती – १४ दिवस फरकाचा मृत्यूदर आणि केसेस घटणे - बरीच सुधारलेली दिसत आहे. तीच बाब चंद्रपूरची.

६-६-२१ महाराष्ट्र कोव्हीड सद्यस्थिती अपडेट
मागचे जवळपास अडीच महिने सुरु असलेल्या भय आणि निर्बंधांच्या अवस्थेतून आज महाराष्ट्र कमी-जास्त जागा होईल. दुस्वप्नवत असलेली ही अवस्था लोकांच्या वर्तनावर, म्हणजे आपल्या सुखाच्या शोधात आपले सावधपण गमावणे, फार परिणाम करेल असं वाटत नाही. कोणत्याही संकटाला जेव्हा एक ठरलेला आणि जवळ दिसणारा शेवट असतो तेव्हा तलावातील थंड पाण्यात दूरच्या दिव्याकडे नजर लावून रात्र काढणाऱ्या माणसाप्रमाणे आपण वागतो. तो शेवट येणार आहे ही भावना आपल्याला अप्रिय अवस्थेत जगायला उब देते. पहिली लाट ओसरली, बाकी देशांत लाटा ओसरल्या, लसीकरण प्रत्यक्षात आलेले आहे अशी बरीच उब असल्याने दुसरी लाट भयावह असूनही आपल्या सामाजिक वर्तनात फार काही बदल घडवेल असं नाही.
मुंबईतले गुगल मोबिलिटीचे कलही ह्या शक्यतेला दुजोरा देणारे आहेत. (चित्र ६-११). मुळातच निर्बंधांच्या काळातही वावर सावकाश वाढतच होता, पण तरीही निर्बंधपूर्व काळापासून कमी होता. १ आणि २ जूनला त्यात निर्बंधकाळातील ट्रेंडहून अधिक वाढ दिसते आहे.
थोडक्यात जसे निर्बंध सैलावातील तसा व्यक्तींचा परस्परसंपर्क झपाट्याने वाढेल अशीच चिन्हे आहत. असे होऊनही जर अद्यापी विषाणूसंपर्क न आलेली pockets फार कमी असतील तर परत रुग्णसंख्या लक्षणीय वाढणार नाही असे होऊ शकते.
निर्बंध किती सैलावतील हे विषाणूप्रसारावर अवलंबून असणार आहे ही चांगली बाब आहे. पण त्वरेने बदलू शकणारे आणि सूक्ष्म तपशील असलेले नियम हे लोकांच्या वागण्यात प्रत्यक्षात आणणे हे मोठे आव्हान आहे. लोकांच्या वर्तनाचा रेटा नियमांचे सरधोपटीकरण करतो किंवा असे नियमजंजाळ सिस्टीमबाह्य वर्तनाला प्रोत्साहित करते.
---
६ जून २०२१ चे कोव्हीड आकडे हे येणाऱ्या दिवसांबद्दल बरीचशी आशा आणि किंचित धाकधूक निर्माण करणारे आहेत. TPR आणि Active केसेस सातत्याने कमी झालेले आहेत. मागच्या आठवड्यात (३१ मे ते ६ जून) active केसेस जवळपास ८६०००ने कमी झाल्या. त्या आधीच्या आठवड्यात त्या ७६००० ने कमी झाल्या होत्या.
पण ही आशेची चिन्हे सर्वत्र सारखी पसरलेली नाहीत. कोकण विभागातील जिल्ह्यांत एकतर केसेस वाढण्याचाच कल आहे किंवा घटण्याचा कल स्थिरावला आहे आणि परत वाढीकडे यायची शक्यता आहे अशीच अवस्था आहे. (चित्र ४) सिंधुदुर्ग आणि नागपूर इथे दैनिक नवे नोंदले जाणारे मृत्यू वाढत आहेत आणि ह्याआधीच्या सर्वोच्च संख्येहून ही संख्या अधिक आहे. इतरही अनेक जिल्ह्यांत जितक्या सातत्याने केसेस कमी झाल्या आहेत तसे सातत्य मृत्यूंची संख्या घटण्यात दिसत नाही. अजून काही दिवसांत १०-११ जूनपासून निर्बंध सैलावण्याचा रुग्णसंख्येवरील परिणामही दिसेलच.
अशा काळजीच्या जागा लगेचच पूर्णतः नाहीश्या होणार नाहीत. त्यांना नीट सांभाळतच निर्बंध सैलावण्याचा प्रवास करावा लागेल. हे करायला लागणारी सुयोग्य, समजसुलभ धोरणे आणि लवचिक धोरणविवेक असतील ही आशा परतीच्या अजून एका प्रवासाच्या सुरुवातीला करूया.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

गणिती मॉडेल वरून निष्कर्ष चूक ठरू शकतात.गणिती मॉडेल वर काढलेले निष्कर्ष शास्त्रीय रित्या योग्य असतात असे नाही.ते फक्त अंदाज.
सर्व परिणाम करणाऱ्या घटकांचा परिपूर्ण विचार करून काढलेला निष्कर्ष हेच सत्याच्या थोडेफार जवळ जावू शकतात.
पण ते पण पूर्ण सत्य स्थिती सांगत नाहीत.
प्रतेक व्यक्ती ची माहिती घेवून खरी आकडेवारी मिळते पण ते अतिशय कष्टाचे काम आहे ते कोणीच करत नाही.
COVID चे विविध उत्पारीवर्तन झालेले विषाणू आणि निर्माण झालेल्या प्रतेक strain चे किती रुग्ण आहेत ह्याची माहिती कोणाकडे आहे.
आणि महामारी मध्ये strain ha अतिशय परिणामकारक घटक आहे .त्याला टाळून चालणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0