रुह से उठती हुई एक आवाज...

बेग़म अख़्तरना मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मी काही फार कळत्या वयाची नव्हते, पण आवाज बाकी आरपार घुसणारा वाटला होता तेव्हा. नंतर जसंजसं माझं गज़ल प्रेम वाढत गेलं तसंतसं मी बाईंच्या गज़ला ऐकत गेले आणि अक्षरशः त्यांची पारायणं करत गेले.

गज़लगायकीत अव्वल स्थानावरचं नाव आहे बाईंचं. पण बाईंबद्दल फार माहिती नव्हतीच, नंतर जसं वाचन वाढत गेलं तसं बाईंबद्दल अधिकाधिक कळत गेलं.
लखनधल्या फैज़ाबादमध्ये १९१४मध्ये एका वकीलाच्या घरी जन्माला आलेल्या या बीब्बीचीच पुढे जाऊन अख़्तरीबाई फैज़ाबादी आणि तिचीच बेग़म अख़्तर, मलिका ए गज़ल झाली. लहानपणापासूनच अख़्तरीबाईंना गाण्याचा, शेर-ओ-शायरीचा शौक होता. आपल्याजवळच्या वहीत ती अनेक गज़ल, कविता लिहून ठेवत असे.

अख़्तरी साधारणपणे १०-११ वर्षांची असेल तेव्हाचा एक किस्सा. तिची अम्मी, मुश्तारी बेग़म अख्तरीच्या भविष्याबाबत चिंतेत होती, खूप काळजीत होती. आणि या साठी अख्तरीला घेऊन अम्मी बरेलीच्या पीर अज़ीज़ मियांकडे गेली. पीरबाबाने अख़्तरीला बघता क्षणीच म्हटले "आप तो मलिका हैं" त्याहीवेळी अख़्तरीच्या हातात तिची कविता, गज़ल लिहिलेली वही होतीच. तिच्या हातून वही घेऊन एक पान उघडलं आणि म्हटलं "अगली रेकार्डिंग में सबसे पहले इसे गाना, शोहरत तुम्हारे कदम चुमेगी और दौलत तुम्हारी बंदी होकर घुमेगी देखना". ती गज़ल होती बहज़ाद लखनवी यांची,

'दीवाना बनाना है, तो दीवाना बना दे,
वरना कहीं तकदीर तमाशा न बना दे'

या पीर बाबाच्या भेटीनंतर काहीच दिवसात कोलकातामधे दुर्गापूजेदरम्यान अख़्तरीनं ही गज़ल गायली, गंमतीची गोष्ट ही की त्यावेळी तिला सारंगीवर साथ करायला उस्ताद बडे गुलाम अली खां साहेब होते. ह्या गज़ल गायकीनंतर अख्तरीची अख़तरीबाई फैजाबादी म्हणून देशभर ओळख निर्माण झाली. ही गज़ल इतकी गाजली की तिची मागणी प्रचंड वाढली आणि त्याकरता मेगाफोन कंपनीला कोलकातामधे रेकाॅर्ड प्रेसिंग प्लान्ट तयार करावा लागला. याच गज़लेची आणखी एक गंमत म्हणजे, स्व. पं. जसराज यांनी वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षी ही गज़ल ऐकली मात्र आणि त्यांनी ठरवून टाकलं की आपण गायकच व्हायचं. पीरबाबाचा हा किस्सा सांगत असताना बेग़म अख़्तर म्हणाल्या होत्या की " काश पीर साहब दौलत और शोहरत के बदले मुझे थोड़े सुकून और चैन की दुआ दे देते, तो थोड़ी खुशियां मेरे भी दामन में आ जाती...' आणि तसं तर हे खरंही होतंच. बीब्बी, अख़्तरीबाई फैज़ाबादी, बेग़म इश्त़ियाक अहमद अब्बासी, बेग़म अख़्तर ते मलिका-ए-गज़ल हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. यात दुःख होतं आणि हे दुःखच त्या खास आवाजाचं रहस्य होतं असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. स्वतः बेग़म अख़्तर म्हणत,

'रंज से ख़ूगर हुआ इन्सा तो मिट जाता है रंज,
मुश्किलें मुझ पर पड़ी इतनी की आसां हो गयी'

लहानपणापासून गाणं अन् शेर -ओ-शायरीचा शौक असल्यामुळं, स्वतः ज्या गज़ल गायच्या आहेत त्यांना स्वरबद्धही त्या स्वतःच करत असत. आणि त्यामुळं त्यांनी गायलेल्या गज़ल या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अंगानं जाणाऱ्या आहेत.

अख़्तरीबाईंच्या वडलांनी त्यांना अन् त्यांच्या आईला व बहिणीला सोडून दिलं होतं, त्यांच्याबरोबर ते रहात नसत त्यामुळंही अख़्तरीबाईंचं बालपण तसं दुःखातच गेलं. नंतर त्यांचं लग्न झालं ते इश्तियाक अहमद अब्बासी यांच्याशी. आणि लग्नानंतर काही वर्षं त्यांचं गाणं बंद झालं, बंद केलं गेलं. यानंतर बहज़ाद लखनवी यांनी शायरी करणंही बंद करून टाकलं. तसं पाहिलं तर या दोघांत बरंच अंतर होतं. पण बहज़ाद लखनवी अख़्तरीबाईंच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. पुढे फाळणीनंतर बहज़ाद पाकिस्तानात गेले अन् अख़्तरीबाई इथं भारतात. पाकिस्तानात एका मुशायऱ्यात अनेकांनी लखनवी यांना आपले काही शेर सादर करायला सांगितले पण त्यांनी मात्र साफ नकार दिला. इकडे भारतातही अख़्तरीबाईंना कुणा पत्रकाराने तेव्हा विचारले की तुम्ही बहज़ाद लखनवी यांच्यावर प्रेम करता का? त्यावर अख़्तरीबाईंनी उत्तर दिलं " हां, बहज़ाद से मुहोब्बत करती हूं, क्यूं न करुं? मेरा गाना बंद होने पर जिसने लिखना बंद किया उससे मुहोब्बत ना करू तो किससे करू?" हे असं कधीच एकमेकाला न सांगितलेलं अन् असंच काही गज़लांमधून चिरंजीव झालेलं प्रेम.

फक्त लखनवीच नव्हे तर इतरही अनेक शायर अख़्तरीबाईंनी गावं याकरताच शायरी करू लागले होते. यातलं एक मोठं नाव म्हणजे सुदर्शन फाकिर. अख़्तरीबाईंची खासियत ही होती की त्या गज़लगायकी शास्त्रीय अंगानं स्वरबद्ध करत. असंच एकदा जिगर मुरादाबादीची रचना 'तबीयत इन दिनो...' जी सिंधुरा रागात बसवली होती ती वन्स मोरच्या फर्माईशीवर तिसऱ्यांदा सादर करताना मंचावर एक पंजाबी शायर आला आणि मोठ्या आदबीनं म्हणाला 'एक गुज़ारिश है आपसे, गर एकाद बार आप मेरी गज़ल गा दो तो मेरी ज़िन्दगी बन जायेगी'असं म्हणून एका कागदावर लिहिलेरी आपली गज़ल बेग़मसाहेबांना दिली. गज़ल वाचली मात्र बेग़मसाहिबांनी तिथल्यातिथं ती स्वरबद्ध करून त्या शायरला शाबाहकी दिली. तो शायर म्हणजे सुदर्शन फाकिर. सुदर्शन फाकिरची एक गज़ल आहे " कुछ तो दुनिया की इनायत ने दिल तोड़ दिया" ह्या गज़लेचे दोन शे'र सुदर्शनसाहेबांनी बेग़मसाहिबांच्या सांगण्यावरून लिहिलेत. कारण बेग़म साहिबांचं म्हणणं होतं की ही गज़ल म्हणजे माझी कहाणी आहे. ते दोन शे'र म्हणजे,

'हम तो समझे थे कि बरसात में बरसेगी शराब,
आई बरसात तो बरसात ने दिल तोड़ दिया.’

आपको प्यार है मुझसे कि नहीं है मुझसे,
जाने क्यों ऐसे सवालात ने दिल तोड़ दिया'

भूप(की भूप कल्याण?)मध्ये बांधलेल्या गज़लेमधील 'दिल तोड दिया'ऐकण्यासाठी लोक गर्दी करत अन् वरचेवर वन्स मोर देत.

बहजाद लखनवी, सुदर्शन फाकिर, शमीम जयपुरी, जिगर मुरादाबादी या आणि कित्येक शायरांना बेगम साहिबांनी त्यांच्या लिहिलेल्या रचना गायल्यामुळे लोकप्रसिद्धी मिळत गेली. जिगर मुरादाबादी हा बेगम साहिबांचा तेव्हाचा आवडता शायर होता, इतका की जिगरमुरादाबादींचं दिवान त्या आपल्या उशाशी घेउन झोपत. इतका आवडता की एकदा न राहवून बेगम साहिबांनी मुरादाबादींना पत्र लिहिलं आणि 'आपण लग्न करायचं का' असं विचारलं. उलटपत्री जिगरसाहिबांनी इतःपर तुम्ही मला पत्र लिहू नका, माझा विचार करू नका असं कळवलं अन् बेगमसाहिबा भयंकर दुखावल्या गेल्या. इतक्या दुखावल्या गेल्या की त्यावेळी हरेक मैफिलीत त्या जिगर मुरादाबादीच्याच गज़ला गात असत मात्र त्या रात्रीच्या मैफिलीत त्यांनी ग़ालिबची

'ये न थी हमारी किस्मत की विसाल-ए-यार होता,
अगर और जीते रहते, यही इंतज़ार होता.'

ही गज़ल गायली.

‘शाम-ए-गम कुछ उस निगाह-ए-नाज़ की बातें करो,
बेखुदी बढ़ती चली है राज़ की बातें करो.
निकहत-ए-जुल्फ-ए-परेशां दास्तां-ए-शाम-ए-गम,
सुबह होने तक इसी अंदाज़ की बातें करो'

फिराक़ गोरखपुरीच्या या गज़लेचाही एक किस्सा आहे. त्याचं झालं असं की फिराक़ गोरखपुरी एकदा बरेच आजारी होते अन् त्यांना बेगम साहिबांना भेटायचं होतं. तसा निरोप पाठवल्यावर बेगम साहिबा आल्या भेटायला पण फिराक़ गोरखपुरींची तब्येत बरीच नाजूक होती, खूप क्षीण आवाजात त्यांनी सांगितलं, 'वेळेचं काही सांगता येणार नाही, इकडच्या तिकडच्या गप्पांपेक्षा माझी एक गज़ल देतो ती वाच, अन् मला लगेच म्हणुन दाखव' मैत्रीच्या हक्कानं बेगमसाहिबांना गोरखपुरींनी आपली गज़ल दिली अन् काहीच वेळात बेग़मसाहिबांनी शिवरंजनी रागात बांधलेली ही आर्तशी गज़ल गाऊन दाखवली. मात्र अंथरूणावर पडल्यापडल्या गोरखपुरीसाहेब ओक्साबोक्शी रडू लागले.

ज्या शायरांना बेगम साहिबांनी गायले ते लोकप्रिय शायर होत गेले. असंच एक नाव म्हणजे शकिल बदांयूनी. आजही बेग़मसाहिबांची गज़ल म्हटल्यावर पहिल्यांदा ज्या गज़लचे शब्द ओठी येतात ती म्हणजे,

"ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया,
जाने क्यों आज तेरे नाम पे रोना आया.
यूं तो हर शाम उम्मीदों में गुज़र जाती थी,
आज कुछ बात है जो शाम पे रोना आया.’

तर या गज़लेचीही एक गंमत आहे. मुंबईहून लखनौला जाणाऱ्या रेलवेमधे बेग़मसाहिबा होत्या. ट्रेन सुटणारच इतक्यात एक माणूस धावतपळत ट्रेनमधे चढला, बेग़मसाहिबांच्या बोगीत गेला अन् एक चिठ्ठी त्यांच्या हातात कोंबून म्हणाला की ट्रेन सुटल्यावरच ह्यातला मजकूर वाचावा. बेगमसाहिबांनी कागद उघडून पाहिलं तर त्यावर एक गज़ल लिहिलेली होती. ती गज़ल म्हणजे ऐ मोहब्बत... आणि तो सद्गृहस्थ म्हणजे शकिल बदांयूनी गज़ल वाचून झाली मात्र, बेग़मसाहिबांनी आपला हार्मोनियम काढला अन् त्या गज़लेला स्वरबद्ध करण्यात रात्र घालवली. पहाटे पहाटे रागप्रहर भैरवीचा असताना ही गज़ल भैरवी रागातच स्वरबद्ध होऊन तयार झाली, इतकंच नाही तर एक आठवड्याच्या आत रेडिओवरून ही गज़ल देशभरात प्रसारित झाली अन् रातोरात शकिल तर ताईत बनलेच पण आदीच प्रसिद्ध झालेल्या बेग़म अख़्तर गज़ल गायकीतला कोहिनूर म्हणुन प्रसिद्ध झाल्या. बेग़म अख़्तर म्हणजे ऐ मोहब्बत, गज़ल म्हणजे ऐ मोहब्बत अशीच ओळख सामान्य जनतेत त्यानंतर झाली. दिवाना बनाना है तो दिवाना बना दे या गज़लेनं बेग़म अख़्तरना ओळख मिळवून दिली तर ऐ मोहब्बत... या गजलेनं अख़्तरबाईंना गज़ल गायकीत अशा स्थानावर बसवलं जिथं अजूनही कुणी पोहचू शकलेलं नाही.

यानंतर काही कारणानं शकिल अन् बेग़म अख़्तर यांच्यात वाद झाले अन् त्यांनी शकिल यांच्या रचना गाणं बंद केलं. मात्र अनेक वर्षांनी परत एकदा शकिल यांची एक रचना बेग़म अख़्तरनी गायली ती म्हणजे,

'मेरे हम-नफस मेरे हम-नवा,
मुझे दोस्त बना के दगा न दे.
मैं हूं दर्द-ए-इश्क से जां-ब-लब,
मुझे जिंदगी की दुआ न दे.’

ही गज़ल देखिल ऐ मोहब्बत इतकीच प्रसिद्ध झाली, तितकीच लोकांना आवडली.

ऐ मोहब्बत आणि मेरे हम-नफस या दोनही गज़ला अख़्तरीबाईंच्या सर्वाधिक ऐकल्या गेलेल्या गज़ला आहेत.

बेग़मसाहिबा गाण्याबाबत कायम म्हणत, "अगर इन्सान इमानदार हो तो उसके गाने में तासीर पैदा होती है, आप देखो, गाने पर असर इमान से पडता है, सच्चाई मेहनत और साफ दिल रखने से सूर भी सच्चे लगते है और आवाज़ भी खुलती है"

बेग़मसाहिबांनी फक्त गज़लच गायल्या नाहीत तर ठुमरी दादरा हे संगीतप्रकार देखील गायले अन् त्यातही त्या अव्वलदर्जाच्याच ठरल्या. आर्त, विरहव्याकूळ, असा आणि इंग्रजीत husky म्हणतात असा, जो बायकांच्या आवाजात अतीशय दुर्मिळ असतो असा आवाज त्यांना लाभला होता. या आवाजाचं सोनं करत ठुमरी, दादरा, गज़ला हे संगीतप्रकार त्या जनतेसमोर मांडत.

उत्तरभारतातील पितृसत्तेचा अतोनात पुरस्कार करणाऱ्या, पुरुषप्रधान अशा समाजात राहून, वावरून आपल्या गायकिनं समाजात अव्वल स्थान मिळवून, सरकारकडून दिला जाणार पद्म पुरस्कार असो किंवा संगीत अकादमीचा पुरस्कार असो किंवा लोकांच्या गळ्यातील ताईत बनणं असो हे आजही एका बाईला जिथं अवघड आहे तिथं अख़्तरीबाईंनी अनेक वर्षांपूर्वी हे साध्य केलं होतं.

बाईंना आपल्या जाण्याची चाहूल जणू लागलीच होती. एका प्रोग्रामच्या दरम्यान कैफी आज़मी, बाईंचा अत्यंत आवडता शायर यानं म्हटलं होतं की "बेग़म साहिबा के सामने आकर सिर्फ गज़ल सुनने को नही देखने को भी मिलती है" शमीम जयपुरीनं देखील अख़्तरीबाईंबद्दल म्हटलं होतं की,"रूह से उठती हुई एक आवाज है वो, जो रूह को छूकर गुज़र जाती है.’ किती खरं म्हटलं होतं हे!

बाईंची शेवटची मैफिल अहमदाबादला होती. प्रत्येक मैफिलीची सांगता भैरवीनं केली जात. बाई त्या मैफिलीत "ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया..." गातगात मंचावरच हृदयविकाराच्या झटक्यानं गेल्या. बाई कैफीसाहेबांना नेहमी म्हणत, "मेरी पहचान स्टेज से है, वहीं से ज़िन्दगी की शुरुआत की है, और चाहती हूं की मेरा दम, मेरी आखिरी सांस भी वही पे निकले" बाईंची ही इच्छाही पूर्ण झालीच.

आज बाईंचा जन्मदिवस, स्मरणदिवस, संध्याकाळ होऊ लागली की घरातील दिवे मालवावेत, मंद आवाजात अख़्तरीबाईंच्या गज़ला लावाव्यात अन् आपण डोळे मिटून शांतपणे ते शब्द, ते स्वर आपल्या आतपर्यंत झिरपू द्यावेत. रुह से उठती हुई आवाज को रुह को छुकर जाने देनाही बेहतर है!...

~अवंती

repost

#गाणाऱ्याबायका
#थोरबायका

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet