गाथा

तुकारामाच्या गाथेने
जेव्हा पछाडले मला
तेव्हा ज्ञानोबा नावाचा
एक मांत्रिक शोधला

भ्रम रिंगण तोडून
ज्ञानोबाने केली शर्थ
कानामध्ये सांगितला
गहनाचा गूढ अर्थ

त्याची बहीण मुक्ताई
सार्‍या मांत्रिकांची माय
सूर्य गिळण्या ही मुंगी
नभ ओलांडून जाय

"गाथा बुडवून टाक"
मला मुक्ताई दटावे
गाथा तरंगून येते
अंतर्यामी तिला ठावे

गाथा रक्तात भिनते
गाथा वज्रलेप होते
शब्द रोकडे बोलत
पुन्हा पुन्हा पछाडते

field_vote: 
0
No votes yet