रामप्रसाद की तेरहवी- जन पळभर म्हणतिल

मृत्यू म्हणजे काय? माणसाचे श्वसन थांबले, त्याची हृदयक्रिया थांबली आणि त्याच्या मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबला आणि थोड्या वेळाने तो मेंदूच मृत झाला की माणसाचे सगळे संपले, असेच आणि एवढेच आहे काय? विज्ञानाने शरीर म्हणजे काही लिटर पाणी आणि एक पिशवीभर क्षार असे शिकवले होते. म्हणजे मूलद्रव्यांतून जन्मलेल्या या शरीराचे परत मूलद्रव्यांत रूपांतर झाले की संपले. आत्माबित्मा सगळे झूट. मग त्या मृतदेहाचे दहन करा किंवा दफन. एक वर्तुळ पूर्ण झाले, एवढाच मृत्यूचा अर्थ. असेच ना? माती असशी मातीस मिळशी.. Ashes to ashes. Dust to dust. We are nothing, but dust and to dust we shall return. Amen…
पण हे इतके सोपे नाही. म्हणजे ते तेवढे सोपे आपण ठेवलेले नाही. मृत आत्म्याला सद्गती लाभावी, त्याची जन्म-मरणाच्या फेर्‍यातून सुटका व्हावी असेच त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना, सग्यासोयर्‍यांना वाटत असते का? ‘रेस्ट इन पीस’ ही हिंदू धर्मातली मुक्तीची कल्पना नाही. पण पिंडदान झाले, तेरावा दिवस झाला, सुतक संपले आणि गोडाचे जेवण झाले की मरणाचे दु:ख संपले, चला, जाणारा गेला. आता इतरांनी त्यांचे नेहमीचे आयुष्य जगायला लागावे. जगले तर पाहिजेच, नाही का?
रामप्रसादचेही असेच झाले आहे. खरे तर त्याला मृत्यू फार देखणा आला. तसे त्याचे जगून झालेच होते. मुलं, मुली आपापल्या घरी, नातवंडे मोठी झालेली. रामप्रसाद आणि त्याची बायको दोघेच त्या जुनाट घरात राहात होते. एका रात्री पियानोवर आवडती सुरावट वाजवता वाजवता रामप्रसादने तेथेच मान टाकली आणि तो गेला. असा मृत्यू येणे हे फार कमी लोकांच्या नशीबात असते. जगण्यात मजा आहे तोवरच मरण्यात मजा आहे असे गडकरी म्हणतात ते फारच खरे आहे. त्या अर्थाने रामप्रसाद नशीबवान. खितपत न पडता, वेदना सहन करायला न लागता तो गेला. आता त्याच्या बायकोला बिचारीला वाईट वाटते आहे. वाटणारच म्हणा. ती येणार्‍याजाणार्‍यांना पुन्हा पुन्हा सांगते आहे. ‘अहो, काय सांगू, जेवणं झाली. शेजारचा सक्षम पियानो शिकायला येतो. तो वाजवत बसला होता. मी म्हटलं की उशीर झालाय बाळा, आता घरी जा. पण हे म्हणालो की पियानो बेसुरा झाला आहे. घरात बेसुरं वाद्य ठेऊ नये. मी नको नको म्हणत असताना हे पियानोवर बसले. मी कशाला तरी आत गेले होते.एकदम पियानोचा मोठा आवाज आला...’
रामप्रसादाचा गोतावळा मोठा आहे. मुलं, सुना, नातवंडं, जावई, मेहुणे.. सगळे आले. त्या निमित्तानं गाठीभेटी झाल्या. त्यातही कोण आधी आला, कोण नंतर आला, कोण बसने आला, कोण टॅक्सी करून आला असे तू तू मै मै दिसतातच. कोण आधी आला, कसा आला त्यावर त्याचे महत्त्व किती आहे, त्याची रामप्रसाद बरोबर जवळीक किती होती असे सोपे निष्कर्ष काढायला लोक बसलेलेच आहेत. दहन झालं. त्या वेळेलाही सरणाच्या दरावरून घासाघीस झाली, आमच्याकडे किती रुपये मण, तुमच्याकडे किती असं सगळं झालं. . इथे मानवी स्वभावातली गंमत बघायला मिळते. आदल्या दिवशी गुळगुळीत सारवलेल्या जमीनीवर दुसर्‍या दिवशी पोपडे उठावेत तसे शोकाची पहिली लाट ओसरली की मग माणसाच्या स्वभावाचे, अहंकाराचे, स्वार्थाचे फणे उभे राहू लागतात. घरात एकच टॉयलेट आहे. त्यात कुणी किती वेळ जाऊन बसावं याला काही सुमार? पहिले एकदोन दिवस जेवण आलं असेल शेजार्‍यापाजार्‍यांकडून. नंतर एवढी माणसं, त्यांचं जेवण, चहापाणी, नाश्ता सगळं पडलंच की रामप्रसादच्या मुलींवर, सुनांवर. त्यात मग कुणावर किती कामं पडतात यावरून धुसफूस सुरू होते. ते होता होता एकमेकींची उणीदुणी निघतात. या सुनांपैकी सगळ्यात शेवटी येते ती रामप्रसादच्या धाकट्या मुलाची बायको. ती येते तेही विमानाने. ती एक नटी होण्याच्या प्रयत्नात आहे. मग तिच्याविषयीचा तिच्या जावांचा दुस्वास उफाळून येतो. मग बोलता बोलता या सगळ्या भावांनी एकमेकांकडून किती पैसे उसने घेतले होते यावर गाडी येऊन ठेपते. रामप्रसादच्या मुलीही यात मागं राहात नाहीत. आपले आईबाप किती श्रेष्ठ इथपासून ते किती स्वार्थी, त्यांनी आपल्यावर कसा अन्याय केला इथपर्यंत त्यांचाही प्रवास होतो. रामप्रसाद आणि त्याची बायको यांच्या भरजरी संसाराच्या अशा जाहीर चिंध्या होतात.
रामप्रसादाची मुलं त्याच्या अस्थि घेऊन त्या विसर्जित करण्यासाठी गेली आणि आता दिवस घालायच्या गोष्टी सुरू झाल्या मग त्यात हे उत्तर प्रदेशातले अगदी सनातनी कुटुंब. रामप्रसादचे दिवस-बिवस अगदी यथासांग व्ह्यायला पाहिजेत. मग त्याचा खर्च आला, त्याची तजवीज आली. तेरावा दिवस आला तो नेमका एक जानेवारीला. आता एक जानेवारीला मुद्दाम कुणाच्या तेराव्याला कोण जाईल? मग असं करू, की दोन जानेवारीला ठेवू. किंवा एकतीस डिसेंबरलाच का नको? अरे? असं कसं करता येईल? तेरावा दिवस म्हणजे तेरावा दिवस.. अहो, पण एक जानेवारी म्हणजे... ते असू दे, तेराव्याला तयार होत असलेल्या कचोर्‍यांचंच बघा ना. महाराज म्हणतात की ऐसी कचोरियां बनेगी की उंगली चाटते रह जाओगे. त्यावर काही लोक म्हणतात की शादी की कचोरियां थोडीही बन रही है? तेरहवी की कचोरियां बिल्कुल सादा होनी चाहिये, तर काही म्हणतात की हां, पता है की तेरवी की कचोरियां बन रही है, लेकिन खायेगा तो जिंदा आदमीही ना? जितने मूंह, उतनी बातें..
यूजिन ओ’नील च्या ‘लॉन्ग डेज जर्नी इंटू दी नाईट’ या नाटकात आई, बाप आणि दोन मुले हे एकमेकांशी बोलतात, आणि बोलता बोलता एकमेकांना सोलून काढतात, रक्तबंबाळ करतात. एक कुटुंब वगैरे सगळं ठीक आहे, पण शेवटी प्रत्येक नाते चिरफाळत जाते, खोटे पडते. मानवी नात्यांचे हे बहुदा असेच असते. ओरबाडताना, सोलताना काही नखे दिसतात, काही दिसत नाहीत, काही रक्त दिसते, काही नाही, काही जखमा दिसतात काही नाही , इतकेच. ‘कपूर अँड सन्स’ हा सिनेमाही तसाच. तेंडुलकरांचे ‘गिधाडे’ हे जास्त भडक, जास्त अंगावर येणारे होते, पण त्याचेही सूत्र तेच. माया, ममता, जिव्हाळा हे सगळं वरवरचं आहे. खाली फक्त मतलबीपणा, फक्त स्वार्थ. लळा जिव्हाळा शब्दचि खोटे...
रामप्रसादच्या तेराव्या दिवसापर्यंतही हे सगळे असेच होते. त्याचे मुलगे, मुली, सुना, जावई, नातू हे सगळे रामप्रसादच्या निधनांनंतर एकत्र येतात. सांत्वन, बाबूजी कितने भले आदमी थे हे सगळं होतं. बाबूजींच्या अस्थिविसर्जनाला गेल्यावर तिथं त्याची मुलं बाटली उघडतात, नाही असं नाही, पण काय असते बुवा एखाद्याला सवय. त्यातून थंडी केवढी मरणाची.मग जराशी चढल्यावर आतले आतले ते सगळे बाहेर येऊ लागते. हळूहळू रामप्रसादाचे दुर्गुण पण बोलण्यात यायला लागतात. मेल्या म्हशीला फक्त मणभर दूधच असते असे नाही, तर हळूच मेली म्हैस किती मारकुटी होती हेही बोलण्यात येते. बाबूजी काही साधे नव्हते. पक्का आपमतलबी माणूस. आपलं संगीत वगैरे सगळं बघीतलं, पण आम्हा मुलांसाठी काही केलं का बघा. आणि आई आमची, एक नंबरची.. जाऊ दे. मग आई बाप बाजूलाच राहातात, आणि या मुलांमध्येच वाद सुरू होतात. काय उपयोग तुम्हां भावांचा? माझ्या अडीअडचणीला कुणी उभं राहिलं? मग हे जराशी चढणं आणि त्यानिमित्तानं आतलं सगळं बाहेर येणं हे वारंवार होत राहातं. मोठा म्हणतो, मी मोठा आहे म्हणून मला काय मिळालं? आईवडीलांचा मार? लाड-कौतुक तर सगळं धाकट्याचं झालं. शेंडेफळ ना तो! मधले म्हणतात, अरे, आमच्याकडे बघा, आम्ही ना मोठे, ना धाकटे. असेच आपले जन्माला आलेले.एक ना दोन.
पण एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कुणाला किती दिवस बांधून ठेऊ शकेल? शेवटी प्रत्येकाच्या आत असलेले गिधाड जागे होते. नंतर मग बाबूजींनी घेतलेले कर्ज, त्यांनी कुणाकुणाला उसन्या दिलेल्या रकमा एवढंच काय, पण अगदी त्यांचे खाजगी, लैंगिक आयुष्य या सगळ्यांवर त्यांची मुलं, त्यांच्या सुना, त्यांचे अगदी मेरे अपने पण बोलायला लागतात. रामप्रसादच्या बायकोला, या मुलांच्या आईला, सासूला हे सगळं कळत असतं. आता नवर्‍याच्या मागे आपल्याला आपल्या मुलांपैकी कुणाच्या तरी घरी जाऊन ‘पडायला’ लागणार हेही ती जाणून असते. पण या मुलामुलांच्यातच इतका बेबनाव होतो की त्यात आई कुठे जाणार हा प्रश्न जरा बाजूलाच पडतो. रामप्रसादने घेतलेल्या कर्जाचे हप्ते कुणी भरायचे, मग त्यासाठी घराचा काही भाग विकायला लागणार की काय, मुळात बाबूजींनी एवढे पैसे घेतलेच कशाला असे अनेक प्रश्न आहेत. आता कर्ज घेतलंच होतं तर ते फक्त भावांनीच का फेडायचं?बहीणींचा त्यातही हिस्सा नाही का? आणि हे कर्ज का घेतलं होतं ते रामप्रसादच्या डायरीत लिहिलेलं सापडतं. सगळ्या मुलांना, जावयांना वेळोवेळी उसने दिलेले पैसे. याला इतके हजार, त्याला तितके हजार.
रामप्रसाद की तेरहवी माणसाच्या दिखाऊपणावर आणि दांभिकतेवर कडवट भाष्य करतो. अगदी माणूस गेला म्हणून काय झालं, लोक किती वेळा त्याच्या जाण्याच्या कहाण्या सांगतील? पण काय करणार? लोग क्या कहेंगे? तोच चिरंतन प्रश्न. लोग क्या कहेंगे? मग उसने अश्रू आले, उसने हुंदके आले. कुणी रामप्रसादच्या बायकोला मागे टेकायला उशी आणून देतो तेही तिला न विचारता, आणि कुणी ती काढून घेतो तेही तिला न विचारता. अशा वेळी अंत्यसंस्काराच्या वेळी त्या गेलेल्या व्यक्तीचा जो कुणी मोठा मुलगा वगैरे असेल त्याला गरज असो की नसो, दोन्ही बाजूंनी आधार देणार्‍यांची आठवण येते. तिला भेटायला, सांत्वनाला येणारा प्रत्येक जण विचारतो आहे, ‘कसं काय झालं बुवा?’ आणि ती येणार्‍याजाणार्‍यांना पुन्हा पुन्हा सांगते आहे. ‘अहो, काय सांगू, जेवणं झाली. शेजारचा सक्षम पियानो शिकायला येतो. तो वाजवत बसला होता. मी म्हटलं की उशीर झालाय बाळा, आता घरी जा. पण हे म्हणालो की पियानो बेसुरा झाला आहे. घरात बेसुरं वाद्य ठेऊ नये. मी नको नको म्हणत असताना हे पियानोवर बसले. मी कशाला तरी आत गेले होते.एकदम पियानोचा मोठा आवाज आला...’ आता मात्र तिच्या नातवंडांना हसू आवरत नाही. ते म्हणतात, आता छापूनच घ्यायला पाहिजे की असं असं झालं...
मग एकमेकांचे उणेदुणे काढणेही सुरू होते. रामप्रसादाची मोठी मुलगी म्हणते की नाहीतरी आई-वडील एकटेच होते अलीकडे, तुम्ही चौघे मुलगे असून तुम्हाला कुणाला आईवडीलांकडे यायला वेळ कुठे आहे? रामप्रसादाचा भाऊ,त्याच्या बायकोचा भाऊ, त्याच्या बहिणीचा नवरा हे जुन्या संस्कारांतले आहेत. त्यांचे आणि रामप्रसादच्या मुलांचे सारखे खटके उडतात. एखाद्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीला आपण फक्त ज्येष्ठ आहोत, वयाने मोठे आहोत म्हणून जो गंड असतो त्याचे चित्र येथे बघायला मिळते. रामप्रसादाचा नातू आणि शेजारच्या घरातली बिट्टू यांचे काहीतरी वेगळेच चालले आहे. पण तेही फार गंभीर नाही. बिट्टूला वाटतं की हे प्रेम आहे. रामप्रसादच्या नातवाला बाकी ते वेळ घालवण्याचे एक साधन वाटते आहे. एकूण काय, की रामप्रसादाचा मृत्यू हे फक्त कारण. सखेसोयरे डोळे पुसतिल, पुन्हा आपुल्या कामिं लागतिल, उठतिल, बसतिल, हसुनी खिदळतिल, मी जाता त्यांचे काय जाय..
हल्लीच्या बर्‍याच सिनेमांप्रमाणे रामप्रसाद की तेरहवी चे प्रसंग, संवाद आणि स्थळे अगदी नैसर्गिक आहेत. लखनऊच्या गल्ल्या, बोळ, जागोजागी दिसतात तशी विजेच्या तारांची कुरूप वेटोळी, धूळ, कशातरी लावलेल्या दुचाकी, चारचाकी गाड्या.... एकूण आपल्या शहरांवर, किंवा धड शहर नाही, धड खेडं नाही अशा अवस्थेतल्या नगरांवर जी कळा असते ती या चित्रपटात अगदी बरोबर पकडलेली आहे. उत्तर भारतातली थंडी हाही या चित्रपटातील एक महत्त्वाचा भाग आहे. या सगळ्या पात्रांच्या नात्यांत आलेला थंडपणा, गारठा दाखवणारीच जणू. या सगळ्या लोकांनी अंगावर ओढून घेतलेल्या रजया, शाली, डोक्यांवर घातलेल्या टोप्या, गळ्याभोवतीचे मफलर, अंगावरचे स्वेटर. हे सगळे जणू या लोकांचे मुखवटे. त्या सगळ्याच्या खालचे धूर्त, स्वार्थी जनावर झाकण्याचा प्रयत्न करणारे मुखवटे. रामप्रसादची विशाल पण जुनी हवेली, त्यातल्या जुन्यापुराण्या वस्तू, दरवाजे, खिडक्या, जुन्या पद्धतीची विजेची बटणे हे सगळे अगदी वास्तव, अगदी जिवंत आहे. दुसरी एक फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलीकडच्या बर्‍याच चित्रपटांत दुय्यम, तिय्यम पात्रेही अगदी विचारपूर्वक, खुलवून रंगवलेली असतात. त्यांचे संवाद, अभिनय यांवर खूप विचार केलेला असतो. ‘रामप्रसाद की तेरहवी’ मधील सगळ्याच कलाकारांचा अभिनय, त्यांची देहबोली हे सगळे फार पटण्यासारखे आहे.
मानवी नाती ही ताणलेल्या तारांसारखी असतात.एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हा ताण असेल तर त्यांतून मधुर सुरावट निघते. हा ताण कमीही नको आणि अधिकही नको. आयुष्य बदसूर पण व्हायला नको आणि तारा तुटायलाही नकोत. पण असं सुरात लावलेल्या वाद्यासारखं आयुष्य किती लोकांच्या नशीबात असतं? बहुतेक जागी वर्ज्य सुरांशी केलेली तडजोड किंवा तुटलेल्या तारा सांधण्याचा अयशस्वी प्रयत्न. ‘रामप्रसाद की तेरहवी’ अशाच तडजोडींची, अशाच अयशस्वी प्रयत्नांची कथा आहे. सगळी नाती, सगळे संबंध, सगळे व्यवहार खोटे असतात. सगळ्याच्या मागे असलेले सत्य म्हणजे स्वार्थ. हे सांगण्याचे धाडस हा चित्रपट करतो.
इतका सुरेख रंगलेला हा चित्रपट शेवटच्या अर्ध्या तासात फारच प्रचारकी ढंगाचा, आदर्शवादी वगैरे होण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा खरोखर वाईट वाटते. इथपर्यंत हा सिनेमा अगदी फार वास्तववादी, अगदी गुंतवून टाकणारा होतो. शेवटच्या काही मिनिटांत मात्र या चित्रपटाचा पोतच बदलतो. अगदी सनातनी विचारांचा मामा प्रागतिक वगैरे होऊन आपल्या बायकोला हातावर पाणी घातल्याबद्दल ‘ थॅंक यू’ वगैरे म्हणतो तेंव्हा तर हसूच येते. रामप्रसादच्या भावाच्या भूमिकेतल्या राजेंद्र गुप्ता या गुणी नटाला अशी वेशभूषा आणि कायम इंग्रजी संवाद का दिले आहेत हे कळत नाही. काहीकाही प्रतिके फारच ढोबळ, अगदी शांतारामबापूंची आठवण करून देणारी वाटतात. रामप्रसादच्या सगळ्यात धाकट्या मुलाला आदर्श दाखवण्याचा प्रयत्नही अनावश्यक वाटतो.
तरीही
‘रामप्रसाद की तेरहवी’ हा अलीकडच्या काळात बघीतलेल्या चित्रपटांपैकी एक उत्तम चित्रपट असे म्हणावे लागेल. या चित्रपटाच्या सवेसर्वा सीमा पहावा यांचे अभिनंदन करणे आवश्यक आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

समीक्षा आवडलीच. पण या निमित्ताने मनांत अनेक विचार आले.
एकतर, रावांनी या विषयावरील आधीच्या कलाकृतींची जी उदाहरणे दिली आहेत ती बहुसंख्य आम्ही पाहिलेली आहेत. त्याशिवाय, काही वर्षांपूर्वी, 'वासांसि जीर्णानि' हे प्रायोगिक नाटक आले होते, तेही पाहिले आहे. त्यामुळे आता या विषयांतच कोणी काही नवीन अँगल आणला असेल तरच बघण्यांत स्वारस्य उरले आहे.
थेरडा हा शब्द अगदी टोकाच्या केसेस मध्येच वापरला जात असेल अशी माझी बाळबोध समजुत होती. पण याच संस्थळावर थेरडेशाही वगैरे शब्द आणि तत्सम उल्लेख वाचल्यावर म्हातारी माणसे इतकी त्रासदायक ठरु शकतात याची जाणीव झाली. त्यापुढे जाऊन आपणही त्या कॅटेगरीत असू शकतो, याची भयप्रद जाणीव झाली. पुढची पिढी तसे वागण्या-बोलण्यातून दाखवत नसली तरी आपण तसे असू शकतो, ही भावनाच मन कुरतडणारी आहे. त्यामुळे असे वाटते की आत्मा हा खरंच असला आणि तो त्याच जागी काही काळ घुटमळत असला तर बरं होईल. निदान, आपल्याविषयी लोकांचं खरं मत काय होतं हे तरी समजेल. अर्थात, आत्मा हा बघु वा ऐकू शकत असेल तरच. असो. जे काही आहे ते मेल्यावरच कळेल किंवा काहीच कळणार नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0