म्हणींच्या गोष्टी ... (७)

आधीच्या म्हणी .. (१), (२), (३), (४), (५), (६) आणि इथेही वाचता येतील.

***

मराठी भाषेचे शब्दवैभव, मराठी भाषिकांना आणि मराठीच्या जाणकारांना चिरपरिचित आहे. विविध प्रकारच्या म्हणी, वाक्प्रचार आणि सुविचारांच्या अलंकारांची लेणी मराठी भाषेला लाभलेली आहेत. काही म्हणी रोजच्या संवादात अगदी सहजपणे वापरल्या जातात. त्या म्हणी कशा प्रचलित झाल्या असाव्यात? त्यांच्या मागे काय कथा असतील? तर काही म्हणींच्या या गोष्टी …

मराठीतील म्हणी या अगदी नेमक्या आणि अचूक शब्दात आशय व्यक्त करणाऱ्या आहेत. एखाद्या अनुभवाचे वर्णन करण्यासाठी अनेक शब्द आणि वाक्ये खर्ची पडतात. पण तेच काम म्हणींच्या प्रयोगाने काही शब्दातच आणि अधिक नेटकेपणाने करणे शक्य होते. आता ही एक सर्वपरिचित अशी म्हण आहे..

"आयजीच्या जीवावर बायजी उदार"

ही म्हण वाचल्यावर तिचा अर्थ साधारण लक्षात आलाच असेल. अर्थ असा आहे.. की समजा एखाद्याला दुसऱ्या कुणाला मदत करायची आहे, तर ती तो तिसऱ्या करवी करून घेतो. स्वतः काहीच करीत नाही. परंतु मदतीचे श्रेय मात्र स्वतःकडे घेऊन मिरवतो. समाजात अशी अनेक माणसे आढळून येतात, जी फक्त बोलघेवडेपणा करतात, परंतु प्रत्यक्षात कृतिशून्य असतात. दुर्दैवाने अशा माणसांची लबाडी कुणाच्याही लक्षात येत नाही, आणि अशी माणसे फुकाचा चांगुलपणा मिरवित राहतात.

असाच काहीसा अर्थ असलेली अजून एक म्हण आहे.

"हलवायाच्या घरावर तुळशीपत्रं ठेवणे"

मराठी भाषेत, कशावर तरी तुळशीपत्रं ठेवणे याचा अर्थ त्या वस्तूचा त्याग करणे असा आहे. उदा सुखासीनतेवर त्याने तुळशीपत्र ठेवले -- म्हणजे सुखासीनतेचा त्याग केला

जी वस्तू अथवा वास्तू स्वतःच्या मालकीची नाही, तिचे अन्य कुणाला परस्पर दान देणे अथवा त्याग करणे, म्हणजेच हलवायाच्या घरावर (जे घर स्वतःचे नाही, (इथे) हलवायाचे आहे) तुळशीपत्र ठेवणे असा आहे. यात तुळशीपत्र ठेवणारा स्वतःचे काहीच गमावत नाही, पण थोर दानी म्हणून नावाजला मात्र जातो.

मराठी भाषेतील म्हणींचे हे वैशिष्ट्य आहे, की त्यांच्या प्रयोगाने फारसे कठोर शब्द न वापरता व्यवहारातील विसंगती नेमकेपणाने व्यक्त होते.

अनेकांना असा अनुभव कधी ना कधी आलेला असतोच, की कुणाच्यातरी सांगण्यावरून इच्छा नसताना काही कृती करणे भाग पडते. यात करणाऱ्यांच्या वाट्याला मनस्ताप येतो, आणि सांगणारा परस्पर श्रेय लाटतो. मदत घेणाऱ्याला फायदाच होतो, कारण त्याचे काम झालेले असते, गरजेची पूर्तता झालेली असते.

या दोन्ही म्हणी ढोंगी, भोंदू माणसाचे नेमके गुणवर्णन करतात. अशी माणसे मोठेपणाचा फक्त आव (सोंग) आणतात. त्यांच्या लंब्याचौड्या गप्पांमधला मोठेपणा, त्यांच्या कृती मध्ये कधीच दिसून येत नाही. अशी माणसे बोलण्यात मोठी चतुर असतात. गोड गोड बोलून, ऐकणाऱ्याला भ्रमित करण्याची कला त्यांना साध्य असते. अशा माणसांपासून सावध राहणे हाच शहाणपणा असतो, कारण स्वतःला श्रेय लाभावे याकरता ते इतर कुणाचे नुकसान देखील करू शकतात. अशा व्यक्तींना मोठेपणा हवा असतो, परंतु त्या साठी कष्ट करण्याची, अथवा झळ सोसण्याची त्यांची अजिबात तयारी नसते. आता उदाहरणार्थ या दोन मित्रांची कर्मकहाणी बघा ना ..

(वाचलेली कथा)

भारतवर्षातील वैशाली हे एक सामर्थ्यवान राज्य होते. वैशालीचे सम्राट क्षेत्रपाल हे प्रजाहितदक्ष म्हणून ओळखले जात. आपल्या साम्राज्यात गुणवान लोकांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांचा आदर्श समोर ठेवून, एक सुसंस्कृत समाजाची जडणघडण व्हावी, या करता ते अनेक स्पर्धांचे आयोजन करीत असत आणि विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करीत असत. त्या पुरस्कारांपैकी महत्वाचा पुरस्कार होता तो "सर्वोत्तम नागरिक" पुरस्कार.

वैशाली राज्यामध्ये एक लहानसं, टुमदार गाव होत, विष्णुपूर त्याचे नाव. गावातील सर्व लोक एकमेकांना ओळखत असत. सर्वांशी सौजन्याने व्यवहार करीत. भांडण तंटे फारसे होत नसत. ग्रामपंचायतीमध्ये वयोवृद्ध, अनुभवी माणसे होती. ती निष्पक्षपणे न्यायनिवाडा करीत. ग्रामपंचायतीचा निर्णय सारेजण शिरोधार्य मानत असत. संपूर्ण वैशाली साम्राज्यात, विष्णुपूर एक आदर्श गाव म्हणून प्रसिद्ध होते.

त्या गावात एक जमीनदार राहत असे, त्याचे नाव सिद्धराम. त्याच्या घरी लक्ष्मीचा वास होता. संपत्तीचा आलेख सतत वाढतच होता. असे असूनही त्याला गर्व नव्हता, व्यवहारात माणुसकी होती. श्रीहरी त्याचा एकुलता एक पुत्र होता. त्याला घरातील संपत्तीचा गर्व होऊ नये, आणि त्याने चार शहाणपणाच्या गोष्टी शिकाव्यात, म्हणून सिद्धरामने श्रीहरीला गुरुकुलात शिकण्यासाठी पाठवले. तिथेच त्याची रंगनाथ बरोबर ओळख झाली. रंगनाथ विष्णुपूरमधील एक शेतकरी सुधन्वाचा मुलगा होता. त्याचे कुटुंब धनवान नसले, तरी खाऊनपिऊन सुखी होते. घरातील सर्व सदस्य दिवसभर कष्ट करीत आणि साधेपणाने जीवन व्यतीत करीत असत. त्यांचा कधी कुणाबरोबर भांडण तंटा नव्हता. उलट कुणा अडलेल्या गरजवंताला नेहमी मदतीचा हात देत असत. त्यांच्या परिस्थितीनुसार शक्य होईल ती मदत ते करीत असत. त्यामुळे गावातील सर्वांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते.

रंगनाथने त्याच्या कुटुंबाची परंपरा, गुरुकुल मधल्या वास्तव्यात देखील जोपासली होती. रंगनाथ सर्व गुरुजनां मध्ये उत्तम शिष्य म्हणून ओळखला जात असे. त्याच्या विनम्र आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्याची सर्व सहध्यायांबरोबर चांगली मैत्री जमली. श्रीहरी देखील त्यात होताच. श्रीहरी, धनवान जमीनदारांचा एकुलता एक पुत्र असल्याने लाडाकोडात वाढलेला होता. अगदी साध्या साध्या कामात देखील त्याला कुणाच्यातरी मदतीची गरज भासत असे आणि रंगनाथ त्याला नेहमीच मदत करीत असे. त्यामुळे रंगनाथ बरोबर त्याची लगेचच मैत्री जमली होती. गुरुकुल मधील वास्तव्यात श्रीहरीला रंगनाथचा आधार वाटत असे.

स्वगृही श्रीहरीला आणि त्याच्या आवडी-निवडींना नेहमीच प्राधान्य मिळत असे. माता-पिता, नोकर-चाकर सदोदित त्याच्या कौतुकात मग्न असत. त्याच्या लहानसहान गुणांना देखील भलतीच प्रसिद्धी मिळत असे. परंतु गुरुकुलामध्ये परिस्थिती निराळी होती. तिथे त्याच्या श्रीमंतीचा प्रभाव चालत नसे. गुणांना, कर्तृत्वाला महत्त्व दिले जात असे. आणि म्हणूनच रंगनाथ त्याच्याच गावातील एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा असून देखील, तोच सर्वांना प्रिय झालेला होता. सर्वजण नेहमी त्याचेच कौतुक करीत. याचे श्रीहरीला भारी वैषम्य वाटत असे. एकदिवस त्याने त्याच्या मनातील सल गुरुजींकडे व्यक्त केला. तो म्हणाला,

"गुरुदेव मी आणि रंगनाथ एकाच गावामध्ये राहणारे आहोत. मी घरून येताना तऱ्हे तऱ्हेच्या किंमती वस्तू आणल्या आणि बरोबरच्या मुलांना दिल्या. माझ्या घरून माझे नोकर मिठाई, फळे आणतात, ती मी सर्वाना देत असतो. रंगनाथने कुणाला कधी काही दिल्याचे माझ्या स्मरणात नाही. तरी सर्वजण त्याचीच स्तुती करतात. अध्यापक देखील त्यालाच नावाजतात. तो या गुरुकुलातील लोकप्रिय स्नातक आहे. असे का? "

गुरुजींनी आश्चर्याने श्रीहरीकडे बघत विचारले,

"तुला मत्सराची बाधा झालेली आहे का? रंगनाथचे कुणाबरोबर वैर नाही. मग तुला असे वाटायचे कारण काय? तू एक गोष्ट लक्षात ठेव, जगात पैसा सर्वश्रेष्ठ नाही. तू इतर लोकांना जशी वागणूक देशील, तशीच वागणूक ते तुला देतील. तू तुझ्या पैशांनी किंवा बळाने आदर, स्नेह विकत घेऊ शकत नाहीस किंवा मिळवू शकत नाहीस. इतरांनी तुला आदर, सन्मान द्यावा असे वाटत असेल, तर प्रथम तू त्यांना तो दे. रंगनाथ सर्वांबरोबर नम्रतेने वागतो. उच्चं-नीच, गरीब-श्रीमंत असा भेद करीत नाही. मदतीला सदा तत्पर असतो. म्हणून सारे त्याच्याबद्दल जिव्हाळा बाळगतात. त्याच्याशी मैत्री करणे त्यांना सन्मानाचे वाटते."

गुरुजींचे बोलणे श्रीहरीने चांगले ध्यानात ठेवले. त्याने मनोमन निश्चय केला, की रंगनाथसारखी लोकप्रियता त्याला मिळवायची आहे. तसा तो लाडावलेला, श्रीमंत असला तरी मनाने वाईट नव्हताच. आता त्याच्या वागण्या बोलण्यात हळूहळू बदल घडू लागला. शक्यतो कुणाचा अपमान न करता, न दुखावता स्वतःचे म्हणणे सांगण्याची कला त्याने अवगत केली. कुणी अडलेला, गरजवंत असेल तर मदत करण्याची तो तयारी दाखवीत असे. फक्त यात एक मेख होती. ती म्हणजे तो स्वतः कुठलेही काम न करता, इतरांकडून करून घेत असे. तरीही काहीजण त्याच्या या गोडबोलेपणाला भुलत आणि त्याच्या चांगुलपणाचे गोडवे गात असत.

गुरुकुलातील शिक्षण पूर्ण झाल्यांनतर दोघे विष्णुपूर मध्ये माघारी आले. श्रीहरी जमीनदारीचे कामकाज शिकून वडिलांना मदत करू लागला, तर रंगनाथने हाती शेतीची अवजारे घेतली. दोघाचेही विवाह संपन्न होऊन गृहस्थाश्रमात त्यांनी प्रवेश केला. काही काळातच रंगनाथ त्या गावातील एक प्रतिष्ठित शेतकरी गणला जाऊ लागला. रंगनाथाचा संपूर्ण दिवस शेतामध्ये कष्ट करण्यात व्यतीत होत असे. पण त्यातही कुणी मदत मागण्यास आला, तर तो नकार देत नसे. प्रसंगी नुकसान सोसूनही गरजवंताला सर्वोतोपरी सहाय्य करण्यास तो तत्पर असे. त्यामुळे ग्रामपंचायतीत देखील त्याला सन्मानाचे स्थान मिळाले होते. जमीनदार सिद्धरामने श्रीहरीला सर्व जबाबदारी देऊ केली होती आणि तो तीर्थयात्रेस निघाला.

श्रीहरीचा सारा दिवस आता जमीनदारीच्या कामकाजात व्यतीत होऊ लागला. त्याने गुरुजींचे शब्द नीट लक्षात ठेवले होते. त्याच्या बोलण्यात विनम्र गोडवा असे. तो शब्दांनी कुणाला दुखवीत नसे. परंतु त्याच्या संभाषणातील सौजन्य व्यवहारामध्ये दिसून येत नसे. मजुरांकडून काम करून घेताना अथवा कर्जदाराकडून वसुली करताना तो अत्यंत कठोरतेने वागत असे.

त्या दिवशी नेहमीप्रमाणे श्रीहरी कामकाजामध्ये व्यस्त होता. तितक्यात एक वाटसरू तेथे आला. हात जोडून म्हणाला,

"श्रीमान, खूप लांबचा प्रवास करून आलो आहे. कुठे निवासाची सोय होऊ शकेल का? आपला मोठा वाडा पाहून थांबलो इथे."

श्रीहरी तत्परतेने म्हणाला,

"निवासाची सोय होईल ना. मी असताना तुम्हाला काळजी करण्याचे काही कारण नाही. इथून असेच सरळ जाऊन डाव्या बाजूला वळल्यावर एक घर लागेल. धर्मराव मालक आहेत तिथले. त्यांना माझे नाव सांगा, ते तुमची सोय नक्की करतील. त्यांचा तसा लौकिकच आहे ना. अरे दामू .. पाहुण्यांना गूळ, पाणी दे बरं !"

असे म्हणून पुन्हा तो त्याच्या कामात गढून गेला. पाहुणा पाणी न घेताच पुढे निघाला. म्हणाला, "धर्मरावांकडेच पाणी घेईन."

एकदा त्याच्या शेतावरच्या मजुराच्या पायाला नांगराचा फळ लागला. खूप रक्तं वाहू लागले. श्रीहरीने तातडीने त्याला वैद्याकडे धाडले, वर चिठ्ठीही दिली, की सखारामला दोन दिवस तुमच्या घरी ठेवून घ्या. त्याला शुश्रूषेची गरज आहे. बिचारा गरीब मजूर, कुठे जाईल?

वैद्यराजांना श्रीहरीचा शब्द मोडता आला नाही. त्यांनी आणि त्यांच्या घरच्यांनी सखारामची चांगली आठ दिवस देखभाल केली. त्यांचा निरोप घेताना सखारामने कृतज्ञतेने वैद्यराजांच्या पायावर मस्तक ठेवले म्हणाला, "तुम्ही मला जीवदान दिलेत महाराज."

श्रीहरीला तक्रार करायला ते एका कारणच मिळाले. तो सर्वाना सांगू लागला, "बघा, त्या सखारामची मी वैद्यराजांकडे व्यवस्था केली. माझ्या शब्दाखातर वैद्यांनी त्याच्यावर उपचार केले, तर त्याने माझे आभार देखील मानले नाहीत. ज्याच्या त्याच्यापाशी वैद्यराजांची स्तुती करीत असतो. "

एकदिवस गावचा कुंभार, सोमनाथ श्रीहरीकडे आला. म्हणाला,

"जमीनदार साहेब, माझ्या आजारी आईला शेजारच्या गावी असलेल्या माझ्या बहिणीकडे पोहोचते करायचे आहे. तुमची घोडागाडी द्याल का एका दिवसापुरती? माझी आई इतक्या लांबवर चालत जाऊ शकणार नाही. "

श्रीहरीला मनातून जरा रागच आला, 'घोडागाडी मागतोय माझी. घोड्याची देखभाल करायला किती खर्च येतो माहिती आहे का?' पण वरकरणी गोड आवाजात म्हणाला,

"अरे मला कामानिमित्त कुठे जायचे तर घोडागाडीची गरज भासते. असे कर तो रंगनाथ आहे ना, त्याला सांग. तो त्याची बैल गाडी देईल तुला. त्याला सांग मी पाठवले आहे म्हणून, तो नाही म्हणायचा नाही."

सोमनाथ रंगनाथकडे आला. रंगनाथने नुसती बैलगाडी दिली नाही, तर तो स्वतः सोमनाथ च्या आईला शेजारच्या गावी पोहोचविण्यासाठी आला. म्हणाला, "अरे इतक्या दूर एकटा गाडी चालवशील, बैलांना सांभाळशील का तुझ्या मातोश्रींची काळजी घेशील? दूरचा प्रवास आहे, एकाला दोघे असलेले चांगले."

सोमनाथ गावभर रंगनाथच्या उपकाराचे गोडवे गाऊ लागला. श्रीहरीला ते कळल्यावर म्हणाला, "बघा, मी त्याला रंगनाथ कडे जाण्यास सांगितले. माझे नाव ऐकून रंगनाथने त्याला मदत केली. आणि आता तो मला विसरून गेला."

सुगीचे दिवस नुकतेच संपले होते. शेतकऱ्याची कोठारे धान्याने भरली होती. शेतसाऱ्याची मनाजोगती वसुली झाल्याने सम्राट क्षेत्रपाल समाधानी होते. आता काही दिवसांनी वैशाली साम्राज्याचा वार्षिकोत्सव होणार होता. दरवर्षी वैशाली नरेश स्वतः गुणवंतांचा सत्कार करीत असत. दरवर्षी ते "उत्तम नागरिक" हा पुरस्कार देत असत. सदाचारणी, नम्र, निगर्वी, प्रामाणिक अशा नागरिकास हा पुरस्कार मिळत असे. त्यात एक महत्त्वाची अट होती, की तो नागरिक इतरांच्या मदतीस तत्पर असायला हवा. आणि त्याने केलेली मदत लोकांनी सांगायला हवी. राज्यातील निरनिराळ्या गावातून प्रवेशिका आल्या होत्या. विष्णूपूर मधून देखील दोन प्रवेशिका होत्या. रंगनाथ आणि श्रीहरी. रंगनाथ ची प्रवेशिका ग्रामपंचायतीने पाठविली होती तर श्रीहरीने स्वतःच आपले नाव स्पर्धक म्हणून नोंदवले होते.

अनेक चाळण्यातून पार होत शेवटी विष्णुपूरचे नाव अग्रस्थानी होते. पण तिथल्या तर दोन प्रवेशिका होत्या. वैशालीनरेश क्षेत्रपाल विचारात पडले. पुरस्कार एकाच व्यक्तीला मिळणार होता. सर्वोत्तम नागरिक निवडण्यासाठी उरलेल्या दोन प्रवेशिकांची तुलना होणे आवश्यक होते. महाराजांनी प्रधानजींना सल्लामसलतीकरता पाचारण केले. वैशालीचे प्रधानजी चतुरसेन, नावाप्रमाणेच चतुर होते. त्यांनी महाराजांना एका नामी युक्ती सुचवली. महाराजांनी देखील ती स्वीकारली.

प्रसन्न प्रभात समय होता. स्वच्छ सूर्यप्रकाश होता. पक्षांची किलबिल कानांना सुखवीत होती. शेतातील कामे उरकलेली असल्याने, काही गावकरी निवांतपणे पारावर विसावलेले होते. पान, तंबाखूची देवाणघेवाण होत होती. इतक्यात तिथे दोघे वाटसरू आले. बरीच दूरची वाटचाल करीत आलेले असावेत. कपडे मळलेले, चेहऱ्यावर थकवा होता. पाराला असलेल्या पायरीवर त्यांनी बैठक घातली. मुंडासे काढून, उपरण्याने ते वारा घेऊ लागले. दोघेही विष्णुपूरचे नक्कीच वाटत नव्हते. मग पारावरच्या एकाने विचारले,

"पाहुणे, कुण्या गावचे म्हणायचे तुम्ही? लांबून आलात जणू?"

वाटसरू उत्तरला,

"हो ना, आम्ही तिकडचे चंडीपूरचे. चाललो आहोत कुंतिपूराला. पण माझा हा सोबती जरा आजारलाय. म्हणून म्हणलं दोन दिवस थांबावं. इथल्या जमीनदारांची कीर्ती कानावर आली. वाटले मदत करतील ते."

मग जमीनदार श्रीहरीच्या घरी कसे जायचे ते विचारून घेऊन दोघा वाटसरूंची वाटचाल पुन्हा सुरु झाली. श्रीहरीच्या हवेलीपर्यंत पोहोचायला बराच वेळ लागला त्यांना. सूर्य माथ्यावर आलेला, ऊन मी म्हणत होते. तापलेल्या मातीच्या वाटेवरून चालताना पावलांना चटके बसत होते.

श्रीहरी त्याच्या कचेरीमध्ये कसलेतरी हिशेब तपासत होता. तितक्यात नोकराने दोन पाहुण्यांची वर्दी दिली. जरा त्रासिक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत श्रीहरीने विचारले,

"बोला, काय काम आहे?"

त्याचा रागीट आवाज आणि त्रासिक चेहरा बघून पाहुणे जरा अडखळले. मग हात जोडून अजिजीने म्हणाले,

"मालक दूरदेशीहून आलो आहोत. माझा सोबती आजारी आहे. दोन दिवसापुरता आश्रय मिळाला असता तर.. " असे म्हणून तो थांबला.

श्रीहरी म्हणाला, "तुम्ही बघताच आहात मला बिलकुल वेळ नाहीये. बरीच कामे आहेत. नाहीतर मी तुमच्यासाठी नक्की काही केले असते. आमच्या गावाचे वैद्यराज ज्ञानी आहेत. ते तुमच्या सोबत्याला चांगले औषध देतील. माझे नाव सांगा त्यांना. नाही म्हणायचे नाहीत."

वाटसरू परत अजिजीने बोलला, " पण आमची राहण्याची सोय झाली असती तर बरे झाले असते."

श्रीहरी लगेच बोलला, "आमच्या गावातली धर्मशाळा उत्तम आहे. माझ्या वडिलांनी त्यासाठी भरगोस देणगी दिली होती. असेल तिथे कुणी तर तुमची सोय नक्की होईल. त्यांना माझे नाव सांगा." असे म्हणत निरोपादाखल त्याने हात जोडले.

बिचारे वाटसरू आल्या पावली परत निघाले होते. वाटेवरून चालताना गावातली लहानमोठी घरे दिसत होती. ते चालत चालत एका घराजवळ येऊन थांबले. अती थकव्याने आता त्यांना एक पाऊल देखील पुढे टाकणे अशक्य झाले होते. घरासमोरच्याच एका झाडाखाली, बुंध्याला टेकून ते स्वस्थपणे बसून राहिले. काही वेळानंतर बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज येऊ लागला. बैलगाडीच्या चाकांची खडखड कानावर येऊ लागली. शेतावर गेलेला रंगनाथ घरी परत येत होता. घरासमोर त्याची गाडी थांबली. खाली उतरून तो घराच्या दिशेनं जाणार तोच त्याची नजर झाडाखाली विसावलेल्या वाटसरूंकडे गेली. त्याने त्याच्या नोकराला हाक दिली आणि बैलगाडीचा कासरा त्याच्या हाती सोपवला. नंतर झाडाखाली बसलेल्या वाटसरुंजवळ येत त्याने चौकशी केली,

"पाहुणे, इथे का थांबला आहात? कुठे जायचे आहे तुम्हाला?"

मग वाटसरूने त्यांची कर्मकहाणी कहाणी ऐकवली. रंगनाथ म्हणाला,

"माझे घर काही मोठे नाही. पण तुम्हाला चालत असेल तर आतमध्ये या. गरीबाघरची चटणी भाकरी खा. मग पुढची वाटचाल करा."

वाटसरूंनी कृतज्ञतेने हात जोडले. रंगनाथने त्यांना विहिरीतून निर्मळ, ताजे पाणी काढून दिले. तापलेल्या धुळीतून चालून आल्यावर, ते थंडगार पाणी पावलावर घेताना पाहुणे सुखावले. त्यांच्याकरता ओसरीवर घोंगडी अंथरली. रंगनाथच्या मुलांनी गुळाचा खडा असलेली वाटी दिली. त्यावर पाणी पिताना त्यांनी रंगनाथला मनापासून आशीर्वाद दिले. रंगनाथच्या पत्नीने तयार केलेले, साधेच पण चवदार, ताजे आणि गरम अन्न ग्रहण केल्यांनतर समाधानी चित्ताने ते दोघे झोपेच्या अधीन झाले. पुढचे दोन तीन दिवस रंगनाथ आणि त्याच्या पत्नीने दोघांचेही चांगले आदरातिथ्य केले. आजारी वाटसरूची तब्येत चांगली सुधारली आणि त्या दोघांनीं पुढील मार्गक्रमणा करण्यास प्रारंभ केला.

वाजत गाजत वार्षिक उत्सवास आरंभ झाला. त्यावर्षीचे सर्वोत्तम नागरिकाचे पारितोषिक अर्थातच रंगनाथला देण्यात आले होते.

***

उपकथा

"--- आपण या समाजाचे देणे लागतो ही जाणीव त्यांच्या मनात जागृत आहे, आणि म्हणूनच त्यांनी हे महान कार्य उभे केले आहे. समाजातील वंचित, शोषित घटकांचा उद्धार करण्यासाठी सीमाताईंनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांच्या अथक प्रयासाचे फलस्वरूप, आज असंख्य कष्टकरी माता, भगिनींची मुले शिक्षण घेत आहेत. त्यांच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश यावा म्हणून सीमाताईंनी अनेक योजना राबविल्या. सर्वसामान्यांना जनसेवेची प्रेरणा दिली. आणि म्हणून.... "

व्यासपीठावरील वक्त्याचे भाषण रंगात आले होते. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मंजुश्रीच्या नजरेसमोर, असंख्य स्मृतींनी फेर धरला होता. पंचवीस वर्षे.. खरंच! बघता बघता किती मोठा काळ उलटला? डोईवरच्या काळ्याभोर केसांमध्ये रुपेरी तारा चमकायला लागल्या, डोळ्यांवर चष्मा चढला होता. मंजुश्रीने पर्समधील हातरुमाल काढून डोळ्यांच्या कडा टिपून घेतल्या. परत एकदा सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रसिद्ध समाजसेविका सीमाताई पाटणकरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारून सीमाताईंनी माईकचा ताबा घेतला.

"बंधू, भगिनींनो, तुम्हा सर्वांची मी ऋणी आहे. हा माझा एकटीचा गौरव नसून, आम्ही मिळून करत असलेल्या कार्याचा गौरव आहे. माझे साथीदार वर्षा आणि यतीनदादा ..."

मंजुश्री आजूबाजूला बघत जागेवरून उठली. "गमन" अशी पाटी असलेला दरवाजा शोधून ती सभागृहाबाहेर आली. वातानुकूलित, बंद जागेतून बाहेर आल्यावर तिला खूपच बरे वाटले. लवकरात लवकर घरी पोहोचायला हवे होते. प्राची आणि प्रणव घरी आलेले असतील. समीर तर कामानिमित्ताने बडोद्याला गेलेला होता. तिने रिक्षा स्टॅण्डवरच्या एका रिक्षावाल्याला सांगितले, जनलोक सोसायटी .. घरी पोहोचायला किमान वीस ते पंचवीस मिनिटे लागणार होती.

रिक्षाच्या चाकांबरोबर तिच्या विचारांची चक्रे देखिल गरगरत होती. पंचवीस वर्षांचा काळ म्हणजे काही थोडाथोडका नव्हता. त्या कालखंडात खूप काही घडले होते, अनुभवले होते. तिच्या व्यक्तिमत्वात तर आमूलाग्र बदल झाला होता. मंजुश्रीच्या चेहऱ्यावर नकळतसे स्मित उमटले. पण गडबडीने ते पुसत तिने चेहरा कोरा केला. "कुणाला वाटेल ही बाई एकटीच का हसते आहे?" तिच्या मनात आले. आणि या विचाराचे तिला स्वतःलाच नवल वाटले. "कधीपासून मी 'कुणाला काय वाटेल' असा विचार करायला लागले?"

घरी अपेक्षेप्रमाणे प्राची आणि प्रणव तिची वाटच बघत होते.

"आई किती उशीर? भूक लागलीय मला कधीची. कुठे गेली होतीस?" प्रणव ने विचारले.

"अरे सीमा आत्याचा सत्कार होता ना आज देविदास सभागृहामध्ये. अजून समारंभ संपला नाहीये, मी आधीच निघाले."
तिने घाईघाईने स्वतःचे आवरून घेतले आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली.

प्रणव आणि प्राची तिची मुले. तिला त्यांच्याबद्दल फार अभिमान होता. प्रणवचे आता इंजिनीअरिंगचे शेवटचे वर्ष होते, तर प्राचीने फ्रेंच भाषेत पदवी घेऊन आता दुभाषिका पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. निदान मुलांचे आयुष्य तरी सुरळीत मार्गी लागले म्हणून ती समाधानी होती. नाहीतर तिच्या आयुष्यात चांगले असे काय शिल्लक राहिले होते? नकळत तिचा चेहरा आक्रसला होता. कपाटातली ताटे, वाट्या घेण्यासाठी आलेल्या प्राचीच्या ते लगेचच लक्षात आले, तिने विचारले..

"आई.. आता काय झाले?"

"कुठे काय? काही नाही.. . "
असे म्हणत तिने उकळी आलेल्या आमटीचे भांडे चिमट्याने उचलले आणि जेवणाच्या मेजावर ठेवले.

उरलेल्या भाजी, आमटीचे डबे फ्रीज मध्ये ठेवून तिने फ्रीजचे दार बंद केले . ओव्हन च्या वर लावलेल्या एका रॅकवर ठेवलेल्या घड्याळाकडे तिने बघितले. ११.१० वाजले होते. समीरला घरी परत यायला अजून दोन तास तरी अवकाश होता. बडोद्याहून मुंबईला येणारी त्याची फ्लाईट उशीराने येणार होती.

ती दिवाणखान्यात आली तेव्हा प्राची आणि प्रणव दूरचित्रवाणी बघत होते. दूरदर्शन संचावरची दृष्टी बाजूला न करता प्रणव ने विचारले,

"आई, -- बाबा कधी येणार आहे? किती उशीर झालाय?"

"अरे उशीर होणार आहे त्याला, फ्लाईट लेट आहे आज त्याची, मगाशीच मेसेज आला होता त्याचा." मंजुश्रीने माहिती दिली.

काही वेळ ती पण दूरचित्रवाणी बघत राहिली. प्राची आणि प्रणव तिथून गेल्यानंतर तिने एक मंद प्रकाश देणारा दिवा ठेवून बाकीचे दिवे बंद केले, आणि तिथल्या आरामखुर्चीमध्ये विसावली. तिला सीमाताईच्या सत्कार समारंभातील भाषणे आठवत होती. निःस्पृह, समर्पित कार्यकर्ती, वैयक्तिक सुखाचा त्याग केला, समाजाकरिता अहोरात्र कष्ट ... मंजुश्रीच्या चेहऱ्यावर एक कडवट स्मित उमटले.

शिक्षणाच्या निमित्ताने घरापासून दूर, वेगळ्या शहरांमध्ये राहणारी तिची मुले, बऱ्याच दिवसांनी घरी आली होती. त्यांच्यासमोर तिला कुठलाही अप्रिय विषय आज काढायचा नव्हता, पण मनात येणारे असंख्य विचार ती थोपवू शकत नव्हती. आज सत्कार समारंभा मध्ये जी स्तुतिसुमनाची उधळण चाललेली होती, त्यामुळे तर ती फार अस्वस्थ झाली होती. कारण सीमाच्या या समाजकार्यामुळे तिचा हसता खेळता संसार कोमेजून गेला होता. तिच्या त्या झळाळणाऱ्या यशासाठी, मंजुश्रीच्या कौटुंबिक सौख्याची आहुती दिलेली होती. सीमाच्या कार्याचे गोडवे गाणाऱ्या लोकांना, मंजुश्रीच्या व्यथा, वेदनांची जराही जाणीव नव्हती.

सीमा, समीरची मोठी बहीण .. लग्नं करून सासरी गेली, आणि दोन तीन वर्षातच माघारी आली, लहानग्या श्रेयाला घेऊन. तिच्यावर सासरी फार बंधने होती असे ती सांगे. आणि सर्वसामान्य गृहिणीप्रमाणे आयुष्यभर गृहकृत्य करीत राहण्याची तिची तयारी नव्हती. त्यावेळी समीरचे आईवडील रायपूरमध्ये राहत असत. सीमा त्यांच्याबरोबर रायपूरमध्ये वास्तव्यास आली. त्यांनतर काही वर्षे फार त्रासाची होती. सीमाच्या घटस्फोटासाठी न्यायालयात खेटे घालावे लागत. मग अनेकदा समीरला रायपूरला जावे लागत असे. दोन मुलांना सांभाळून मंजुश्री एकटीच घरी, मुंबईमध्ये रहात असे.

रायपूरमध्येच सीमा एका शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली, परंतु तिचा ओढा समाजकार्याकडे होता. शाळा आणि समाजकार्य यांत ती इतकी व्यस्त झाली, की घराकडे आणि श्रेया कडे लक्ष द्यायला तिला वेळ होईना. मग श्रेयाची रवानगी मुंबईला झाली. आता प्राची आणि प्रणव बरोबर श्रेयाची जबाबदारी मंजुश्रीवर आली होती. अर्थात तिने ती विनातक्रार स्वीकारली देखील.

सीमा आता एक आघाडीची समाजकार्यकर्ती म्हणून नावाजली जाऊ लागली होती. तिच्या समाजकार्याचा परीघ आता व्यापक झाला होता. मग भाषणे, सभा, बैठकांच्या निमित्ताने तिचे दौरे सुरू झाले. अनेक सामाजिक संस्था, संघटनांबरोबर तिचे कार्य विस्तारले होते. कधी ती स्वतः तर कधी तिच्या संघटनेतले साथी मुंबईला आले की सीमाताईंच्या घरी, म्हणजे मंजुश्रीच्या घरी हक्काने येत असत. समीरचे घर म्हणजे सीमाचे मुंबई कार्यालयच झाले होते. सीमा रायपूरहून फोन करीत असे,

"अगं मंजू, इथल्या आदिवासी पाड्यावरच्या तिघीजणी मुंबईला यायच्या आहेत. वसतिगृहामध्ये त्यांची सोय होईपर्यंत आपल्या घरी राहतील बरं का त्या. आणि प्राची आणि श्रेयाचे काही कपडे असतील तर दे त्यांना, बिचाऱ्या गरीब मुली."

मग सीमाने सोपवलेले समाज कार्य, मंजुश्री पार पाडीत असे. कधी कुणी विद्यार्थी येत तर कधी मुंबईच्या हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी आलेले रुग्ण आणि त्याचे नातेवाईक असत. सीमाताईंनी त्यांची राहण्याची, जेवण्याची सोय करून दिली म्हणून म्हणून तीन तीनदा तिचे आभार मानीत असत. मंजुश्री आणि तिचे कष्ट मात्र कुणाच्या खिसगणतीतही नसत. ती फक्त भारवाही, श्रेय सगळे सीमाचेच.

सतत घरी येणारा पाहुण्यांचा ओघ मंजुश्रीला आता असह्य होऊ लागला होता. कारण या सर्वांचे आदरातिथ्य करण्यात तिचे कौटुंबिक जीवन संपूनच गेले होते. मुले पण कुरकुर करीत. त्याच्या दिनक्रमात अडथळा येत असे. पण समीरकडे या बद्दल काही बोलण्याची सोय नव्हती. काही सांगायला जावे तर त्याला राग येई. तो म्हणे,

"सीमा माझी बहीण आहे. तिला आधार देणे भाऊ म्हणून माझे कर्तव्य आहे. आणि ती काय सोनेनाणे मागते आहे का? चार दोन दिवसांकरता जर कुणी घरी आले, तर इतकं त्रास करून घ्यायला काय झालं?"

मग मंजुश्री काही बोलत नसे. तिला वाटे, सीमाने सोनेनाणे मागितले असते तरी चालले असते. समीरला बोलायला काय झाले? घरात सर्वांची उस्तवारी मला करायला लागते. तो नोकरीनिमित्त दिवसभर बाहेर, घरी ती एकटीच असते ना? अनेक वेळा तर परगावी गेलेला असतो. मला माझे स्वतःचे आयुष्य जगताच येत नाहीये. गरजूंना मदत करणे वगैरे बोलायला ठीक आहे. सीमाने समाजसेवेचे व्रत घेतले आहे, पण ती स्वतः भाषणे देणे आणि उपदेश करणे या व्यतिरिक्त काहीच करीत नाही. तिच्या मुलीची जबाबदारी पण माझ्यावरच टाकून ती मोकळी झाली आहे.

पण यातले ती काहीच बोलू शकत नसे. कारण ऐकण्यासाठी समीर तिच्या समोर थांबतच नसे.

आता मंजुश्रीचे घर आणि आयुष्य देखील सार्वजनिक झाले होते. सीमाच्या शिफारशीने, कधी कोण घरी येईल? -- सांगता येत नसे. सीमाच्या समाजसेवेचं क्षेत्र आता विस्तारले होते. वंचित, मागासवर्गीयांचा उद्धार करण्याचे तिचे ध्येय होते. त्या समाजातील मुलांना रोजगार मिळविता येईल अशी कौशल्याची कामे शिकविणे तिच्या केंद्राने सुरू केले होते. रायपूरला कौशल्य विकास वर्ग सुरू केले होते. एक दिवस, एक वीस बावीस वर्षांची मुलगी आली. तिचे नाव दीपाली. तिला केशभूषा, वेशभूषा आणि सौंदर्य प्रसाधनाचे प्रशिक्षण घ्यायचे होते. त्यांनतर ती रायपूरच्या केंद्रामध्ये ते शिकविणार होती. तिच्या राहण्याची सोय सीमाने समीरच्या घरी केली. म्हणाली,

"दोन तीन महिन्याकरता कशाला वसतिगृहाचा खर्च? दिवसभर ती तिच्या प्रशिक्षण वर्गामध्ये असेल. रात्रीपुरती राहील ती आपल्या घरी. चालेल ना मंजू?"

सीमाच्या या विचारण्यात तसा काहीच अर्थ नसे. तिने जे ठरविले, त्याला घरचे कधीच विरोध करीत नसत. आणि हे सीमाला चांगले माहिती होते.

मग काय, दीपालीचा वर्ग सुरू झाला. बिचारी गरीब मुलगी. तिच्याकडे नीटसे कपडे नव्हते. मग सीमानेच सुचवले, मंजुश्रीचे कपडे वापरेल ती काही दिवस. तिला वापरण्याजोगे व्हावेत म्हणून ते कपडे थोडेफार अल्टर करावे लागतील इतकेच. नवीन कपड्यांचा खर्च वाचला ना?

पण अल्टर केल्यांनतर, ते कपडे मंजुश्रीसाठी आता निरुपयोगी झाले त्याचे काय? अर्थात असे काही विचारण्याची सोयच नव्हती. उत्तर मिळाले असते, "तू फक्त तुझा विचार करते आहेस, हा स्वार्थीपणा आहे. गरीब बिचाऱ्या मुलीला मदत झाली, याचे समाधान वाटायला हवे तुला."

दीपालीचा कार्यानुभव सुरू झाला. ती शनिवार, रविवारी तिच्या वर्गमैत्रिणींना घरी बोलावत असे. त्यांची केशभूषा, वेशभूषा, प्रसाधन इ. चालू असे. एक दिवस तिने प्रयोगासाठी म्हणून मंजुश्रीचे केस कापले. मंजुश्रीने आरशात बघितल्यावर तिला रडू कोसळायचे बाकी राहिले होते. फारच विचित्र दिसत होते तिचे केस. ती दीपालीला म्हणाली,

"अगं, हे काय केलंयस तू माझ्या केसांचे?"

दीपाली म्हणाली,

"काकू, नवीन हेअरस्टाइल आहे ती. आजकाल सगळ्याच बायका असे केस कापतात. फॅशन आहे ती."

मंजूश्री म्हणाली, "पण तू म्हणाली होतीस की फक्त केसांची टोके कापणार आहेस, सरावासाठी?"

दीपाली उत्तरली, "आहो काकू, तुमचे केस किती दाट आणि लांब होते? आजकाल असे केस असण्याची फॅशन नाहीये. मी तुम्हाला जरा मॉडर्न लुक दिला. सगळ्यांना आवडेल बघा."

मंजुश्री नेहमीप्रमाणे गप्प राहिली. घरातल्या कुणाच्या लक्षात तिचे कापलेले केस आलेच नव्हते, कारण कुणाला तेव्हढा वेळ नव्हता.
दीपालीचा तीन महिन्यांचा वर्ग सहा-सात महिने चालला.

आता सीमाने अजून एक नवा उपक्रम सुरू केला होता. आदिवासी कलेचा प्रसार करण्याचा. त्या योगे आदिवासी कलाकारांना उत्तेजन मिळेल आणि ते अधिक समाजाभिमुख होतील, हा देखील हेतू होता. उपक्रम चांगला होता, परंतु त्या करता मंजुश्रीच्या घराचा उपयोग प्रशिक्षण वर्ग म्हणून केला जाऊ लागला. रायपूर मध्ये आदिवासी कलाकार प्रात्यक्षिके करीत, आणि ती बघून मुंबईतील शिकाऊ कलाकार इथे प्रयोग करीत. 'ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग' होता तो. आता तिच्या घरात वेताच्या काठ्या, बांबूचे छिलके. कागद, खळ, डिंक, तर कधी माती, आणि त्यावर नक्षीकाम करण्याची साधने इत्यादीचाचा पसारा दिसू लागला. घरातील इतर कामांबरोबर त्याच्या साफसफाईचे काम मंजुश्रीच्या मागे लागले होते. त्यानंतर कापडावरील नक्षीकाम झाले. त्यासाठी मंजुश्रीच्या घरातील चादरी, अभ्रे, टेबलक्लॉथ, पडदे इतकेच काय लहानमोठे कपडे, साड्या इ. चा वापर केला जाऊ लागला. सीमाच्या आईनी म्हणजे मंजुश्रीच्या सासूबाईंनीच ते सुचवले होते. गरीब कलाकारांना प्रशिक्षण द्यायचे तर त्यांना सगळी साधने पुरवायला हवीत ना? मंजुश्रीने कुरकुर केल्यावर त्यांनी लगेच समीरकडे तक्रार केली. आई काही सांगते ते मंजुश्री मानत नाही, ते पाहून समीरच्या रागाचा पारा चढला होता.
मंजुश्रीने समीरला सांगायचा प्रयत्न केला. तर तो म्हणाला,

"अगं अनायासे पुण्यकर्म घडतंय. आणि तुला काय त्रास आहे त्यांचा? ती मुले त्यांचे काम करतात. तुला आजकाल तक्रार करण्याची फार सवय लागली आहे. म्हणूनच मी शक्यतो घरी येत नाही. स्वभाव बदल जरा तुझा."

तिच्या घरातील चादरी, पडदे इत्यादींचे रंग, नक्षीकाम बदलून गेले होते. तिच्या मूळच्या नाजूक, सुंदर रंग आणि नक्षीकाम असलेल्या चादरी, पडदे, टेबल, सोफा इत्यादींवरील कापडी आवरणे इतकेच काय हातरुमाल, ओढण्या वगैरेंनी निराळाच अवतार धारण केला होता. केला गेलेला बदल अजिबातच सुखावह नव्हता.

एके दिवशी सीमा मुंबईला आली होती. त्यांच्या संस्थेचे काही काम होते म्हणे. तिच्यासोबत तिचा गोतावळा होताच. यतीन केरकर, कल्याणी जामदार, वर्षा डाके. सगळ्यांचा मुक्काम समीरच्याच घरी होता. काम संपल्यानंतर तीनचार दिवस मुंबई दर्शन झाले. स्वतःची कार त्यांच्या दिमतीला देऊन, समीर टॅक्सीने ऑफिसमध्ये जात होता. घरात त्यांची सरबराई करायला मंजुश्री होतीच. एकंदरीत सगळा आनंदच होता.

सगळेजण दूरचित्रवाणी बघत होते. एकीकडे गप्पा देखील चालू होत्या. दुसऱ्या दिवशी सारेजण रायपूरला जायचे होते. बोलता बोलता सीमा समीरला म्हणाली,

"समीर आमच्या केंद्राने 'कन्या विकास केंद्राची' योजना केली आहे. ती संस्था मुंबईमधून कार्यान्वयित व्हायची आहे. त्या कामाकरताच आम्ही इकडे आलो होतो. मुंबई केंद्राची जबाबदारी माझ्याकडे आहे. मी आता मुंबईला येईन पुढच्या महिन्यात."

ते ऐकताच मंजुश्रीच्या कपाळावर आठी चढली होती. पण समीर अथवा सीमाचे तिकडे लक्षच नव्हते. सीमा पुढे म्हणाली,

मी केंद्राच्याच वसतिगृहामध्ये राहीन, पण श्रेया तुझ्याघरी येईल, ठीक आहे ना?"

"तुझ्याघरी? हं ..." मंजुश्रीच्या मनात आले. हे घर समीर इतकेच तिचे देखील आहे याचा त्या दोघांनाही विसरच पडलेला होता. तिलासुद्धा निर्णयामध्ये सहभागी करून घ्यायला हवे असे सीमाच्या किंवा समीरच्यादेखील मनात आले नाही. शेवटी घराची जबाबदारी तिच्यावरच असणार होती. पण निर्णय घेताना मात्र तिला गृहीत धरले गेले होते ... नेहमीप्रमाणेच.

आता आयुष्याला वेग आला होता. श्रेया घरी राहणार होती. तिच्याकरता वेगळी व्यवस्था करणे आवश्यक होते. प्रणव आणि प्राचीच्या परीक्षा सुरू होत्या. त्यामुळे त्यांची मदत गृहीत धरता येणार नव्हती. तिला वाटले सीमाला सांगावे की १५ दिवस उशीराने ये. मुलांच्या परीक्षा चालू असताना घरात पाहुण्यांचा गोंधळ असणार होता. पण मंजुश्री काहीच बोलू शकली नव्हती. शक्य तो मुलांच्या अभ्यासात अडथळा येणार नाही याची ती काळजी घेत होती.

श्रेया घरी आली. लहान असताना काही वर्षे ती तिथे राहत होती. पण आता तिच्यात बराच बदल झाला होता. आजी, आजोबांचे अती लाड आणि आईचे दुर्लक्ष .. त्यामुळे ती अगदी एककल्ली झाली होती. तिला हवे ते मिळाले नाही, तर घरात गोंधळ घालीत असे. तिची तैनात सांभाळताना मंजुश्रीची चांगलीच दमछाक होऊ लागली होती. प्राची आणि प्रणवचे तिच्याबरोबर अजिबात पटत नसे, परंतु नशिबाने त्यांना त्यांची बरीच व्यवधाने होती. त्यामुळे दोघेही घरी फार कमी वेळ असत.

सीमाचे मुंबईमध्ये बस्तान बसले. केंद्राच्या जबाबदारीमुळे तिचे बाहेरगावचे दौरे कमी झाले होते. अधूनमधून ती घरी यायची. ती घरी आली की श्रेयाबरोबर तिचा काहीतरी वाद होई. दोघींचाही स्वभाव हट्टी, कुणीच नमते घेत नसे. मग रागाने श्रेया तिच्या खोलीत निघून जाई. मायलेकीमधला तो विसंवाद पाहून मंजुश्रीला नवल वाटे. तिला वाटे सीमाला सांगावे की, पोर आता अडनिड्या वयात आली आहे. तिला समजून घ्यायला पाहिजे. पण ती काहीच बोलत नसे, कारण सीमाला ते आवडत नसे. पण मंजुश्रीला जी भीती होती ती खरी ठरली होती.

सीमा बहुधा शनिवारी घरी येत असे. त्या दिवशी ती तशीच आली होती. तिची प्रकृती ठीक नव्हती म्हणून दोन तीन दिवस राहणार होती. कधी नव्हे ते श्रेया सगळ्यांच्या बरोबर दिवाणखान्यात आली होती. तिला काहीतरी बोलायचे होते. बराच वेळ ती तशीच गप्प राहिली. सीमा नेहमीप्रमाणे तिचे केंद्र आणि त्यातील उपक्रम याबद्दल बोलण्यात गुंतली होती. सीमा घरी असली, की इतर सर्वांना श्रोत्यांची भूमिका करायला लागत असे. तिच्याकडे बोलण्यासारखे, सांगण्यासारखे खूप काही असे. आणि दुसऱ्याचे काही ऐकायची तिला सवयच नव्हती. सीमाचे बोलणे संपत नव्हते. श्रेयाची अस्वस्थता मंजुश्रीच्या लक्षात आली होती. सीमाचा बोलण्याचा ओघ जरा मंदावल्यावर, श्रेयाला बोलते करण्यासाठी ती म्हणाली,

"श्रेया तुझी परीक्षा कधी आहे गं? आजकाल तुझे क्लासेस वगैरे उशीरापर्यंत चालू असतात."

मंजुश्रीचा प्रश्न ऐकून श्रेयाला जरा हायसे वाटले. तिला बोलायची संधी मिळाली होती. पण सुरुवात कुठून करावी हे बहुदा समजत नव्हते. ती म्हणाली,

"परीक्षा येत्या सोमवारपासून सुरू आहे. मध्ये काही दिवस विद्यापीठात संप चालू होता ना? त्या मुळे अभ्यासक्रम बराच मागे पडला आहे. म्हणून जास्तीचे वर्ग घेतायत."

त्यांनतर सीमाकडे वळून म्हणाली, " आई तुला काही सांगायचंय मला?"

कपाळाला अमृतांजन चोळत सीमा म्हणाली, "आता इतक्यात नवीन काही मागू नकोस बाई. मागच्या महिन्यात रायपूर, जबलपूर ला आमचे शिबीर होते ना. मीच तर आयोजिका होते. शिबीर संपल्यावर काही दिवस मुक्काम होता आम्हा सर्वांचा तिथे, बराच खर्च झालाय माझा."

"नाही पैसे नकोयत मला" श्रेया बोलली.

"मग काय आहे?" डोळे मिटूनच जरा त्रासिकपणे सीमाने विचारले.

मंजुश्रीला वाईट वाटले, आणि सीमाचा जरा राग पण आला, "कसली आई आहे ही? स्वतःच्या मुलीबरोबर कशी तुटकपणे बोलतेय?"
"श्रेया अग सांग ना काय ते? काही अडचण आहे का?" मंजुश्री समजुतीच्या स्वरात बोलली.

"नाही मामी तसं काही नाही, पण तो अंकित आहे ना, मागच्या रविवारी इथे आला होता तो ...." श्रेया अडखळत बोलत होती.

मंजुश्रीला साधारण अंदाज आला होता, पण तिला बोलू द्यावे म्हणून ती गप्प राहिली. सीमाला तेव्हढा धीर नव्हता,

"म्हणजे? लग्न करणार आहे की काय तू त्याच्याबरोबर? " सीमाने जरा चिडूनच विचारले.

सीमाचा तो त्रासिक स्वर ऐकून, आतापर्यंत अडखळणारी श्रेया म्हणाली, "हो .. तेच तुला सांगायचे होते." एव्हढे बोलून तिथून निघून गेली.

काय बोलावे कुणाला कळत नव्हते. सीमाच्या रागाचा पारा अस्मानात पोहोचला होता. रागारागाने ती बोलली,

"समीर ऐकलंस ना? किती उद्धट मुलगी आहे? सांगायचे होते म्हणे. विचारायची काही पद्धतच नाही."

श्रेयाने तिला न विचारता निर्णय घेतला, म्हणून सीमाचा अहंकार दुखावला होता. श्रेयाबरोबर दोन समजुतीचे शब्द बोलण्याची तिची तयारी नव्हती. तिने श्रेयाला सांगितले की, तिला अंकित योग्य वाटत नाही. श्रेया आणि अंकित दोघेही अजून विवाहयोग्य वयाचे नाहीत. अंकितची नोकरी नुकतीच सुरू झाली आहे आणि तितकीशी चांगलीपण नाही. श्रेयाचे शिक्षण पूर्ण व्हायला हवे वगैरे. सीमाच्या बोलण्यात तथ्य होते, परंतु श्रेयाला न दुखावता, तिला विश्वासात घेऊन तिने ते सांगितले असते तर कदाचित श्रेयाने ते मान्यदेखील केले असते, आणि पुढचा अनर्थ टळला असता. परंतु सीमाच्या स्वभावात नमते घेणे नव्हतेच. तिने घेतलेला निर्णय इतरांनी मानलाच पाहिजे, असा तिचा दुराग्रह असे.

तिचे बोलणे ऐकल्यावर श्रेया त्यावर काहीच बोलली नाही. पण सीमा तिच्या केंद्रात गेल्यावर, मंजुश्रीसाठी चिट्ठी ठेवून ती घरातून निघून गेली. सीमाचा संताप इतका होता, की तिने त्या नंतर श्रेयाचे नावच टाकले. तिला घरी परत आणायचा, तिच्याशी बोलण्याचा जराही प्रयत्न केला नाही.

पण मंजुश्रीला राहवेना. तिने श्रेयाच्या वर्गमैत्रिणींना विचारून, श्रेयाचा ठावठिकाणा माहिती करून घेतला. तिच्याशी संपर्क साधला, आणि घरी यायचा आग्रह केला. तिला म्हणाली,

"श्रेया जे झाले ते झाले .. तो राग मनात ठेवून नाती तोडू नकोस. आई आहे ती तुझी, तुझ्या काळजीने बोलली."

श्रेयाला काही ते पटले नाही. पण ती सीमा नसेल तेव्हा, अधूनमधून घरी येऊ लागली.

श्रेयाच्या प्रकरणानंतर मंजुश्री जरा धास्तावली होती. प्राची तशी अजून लहान होती, पण काही सांगता येत नाही. ती येता जाता तिला तिच्या मित्र, मैत्रिणीबद्दल विचारू लागली. तिची भीती प्राचीच्या लक्षात आली. ती म्हणाली,

"आई, मी श्रेयासारखं काही करणार नाही, तू उगीच काळजी करू नकोस."

"हो गं, माहितीय मला ते. पण तरीही.. " मंजुश्री खजील होत बोलली.

सीमाच्या कार्याची व्याप्ती सतत वाढत होती, आणि तिची ख्याती देखील सर्वदूर झाली होती. सीमाताईच्या मताला, बोलण्याला महत्व प्राप्त झाले होते. देशातील विविध प्रदेशातील समाजसेवी संस्था, संघटना तिला आवर्जून आमंत्रित करीत. आता तिचा आणखी एक नवीन उपक्रम सुरू झाला होता. बाल शिक्षण योजना आणि कन्या शिक्षण योजना. त्या अंतर्गत, दारिद्र्य रेषेखालील मुलामुलींना व्यावसायिक शिक्षणासाठी मदत दिली जाणार होती. योजनेसाठी सरकारी अनुदान तर मिळालेच, परंतु काही दानशूर व्यक्तींनी आर्थिक पाठबळ दिले होते. विविध संस्थानी प्रशिक्षण शुल्क कमी केले किंवा माफ केले. प्रशिक्षणार्थींच्या निवासाची सोय देखील करण्यात आली होती. मंजुश्रीच्या घराशेजारील एक घर संस्थेतर्फे भाडेतत्वावर घेतले होते. योजने अंतर्गत शिकणारे काही विद्यार्थी तिथे राहणार होते.
एक दिवस, त्या घराची व्यवस्था तपासण्याकरता सीमा आली होती. तिथून ती घरी आली. समीर ला म्हणाली,

"समीर, इथे शेजारी काही विद्यार्थी राहायला येतील. तशी त्यांची सर्व व्यवस्था संस्थेने केली आहे. परंतु काही गरज लागली तर ती येतील तुझ्याकडे, थोडी मदत करा तुम्ही. चालेल ना?

"हो हो, चालेल की. त्यात काय एव्हढे? करू की आम्ही मदत." समीर बोलला.

नेहमीप्रमाणे मंजुश्रीला सांगण्याची, विचारायची कुणालाच गरज भासली नव्हती.

"बोलायला काय जातंय याचे?" मंजुश्रीच्या मनात आले. "असतोय कुठे हा घरी? मदत करणार आहे मीच ना? या सीमाला देखील सवय झाली आहे, तिच्या कार्याचा भार माझ्यावर टाकण्याची... कष्ट माझे आणि मान-सन्मान तिचे. आता मलाही झेपत नाही, तब्येत बरी नसते माझी अलीकडे. पण हे समीरच्याच लक्षात येत नाही, तर सीमाकडून काय अपेक्षा करायची?"

प्रशिक्षण वर्ग सुरू झाले. शेजारील घरात राहणारे विद्यार्थी अधून मधून काही मागायला येत. सुरुवातीचा संकोच हळूहळू नाहीसा झाला होता. कधी त्यांना भांडीकुंडी हवी असत तर कधी जरासे तेल, थोडासा मसाला. कधीकधी कांदे-बटाटे मागून नेत तर कधी एखादी चादर. काही दिवसांनी त्यांची भीड अजून कमी झाली. मग ती मुले सर्रास वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुण्यासाठी येऊ लागली साबण, हँगर्स मागून घेत असत. दिवसेंदिवस त्यांचे घरातील अतिक्रमण वाढू लागले. प्राची आणि प्रणव चिडून म्हणत,

तू त्यांना येऊ नका म्हणून का सांगत नाहीस? कुठलीही वस्तू घेऊन जातात ते लोक. गरीब म्हणून थोडीफार मदत करणे ठीक आहे, पण हे अती होतंय."

मग मंजुश्री सांगे,
"अरे पण बाबानेच कबूल केलंय ना सीमा आत्याला. त्याने शब्द दिलाय तर मी विरोध कशी करणार?"

पण तिला देखील हे सारे नकोसे झाले होते. त्या मुलांना नाही सांगावे, तर सीमा लगेच म्हणत असे,

"इतकी कंजूसी बरी नाही मंजू, आपण समाजाचे देणे लागतो. आपल्याकडे जे आहे, त्यातले थोडे गरजूंना दिले तर काय हरकत आहे?"

पण हे समाजाचे देणे देताना, मंजुश्रीच्या घराचे सौख्य पार नाहीसे झाले होते. सीमाला ते समजण्याची शक्यता बिलकुल नव्हतीच. तिने तर स्वतःचे घर, संसार मोडून समाजकार्य हाती घेतले होते. एकुलत्या एक मुलीला देखील दूर सारले होते. तिला मंजुश्रीची व्यथा कळणे शक्यच नव्हते. इतकी आत्मकेंद्रित, असंवेदनशील व्यक्ती, समाजसेविका म्हणून कशी गौरवली जाऊ शकते? याचे सीमाला नवल वाटत होते.

शिक्षणाच्या निमित्ताने प्रणव आणि प्राची घरापासून दूर गेले होते. त्यांच्या इच्छा, आकांक्षांना पंख लाभले होते. प्रणवला उच्चं शिक्षणाकरता परदेशी संस्थेमध्ये प्रवेश मिळाला होता. त्याच्या कागदपत्रांची पूर्तता झाली की तो तिकडे प्रयाण करणार होता. प्राचीच्या पण स्पर्धा परीक्षा, नोकरीच्या मुलाखती इ. चालू होते. दोघेही मुले त्यांच्या व्यापात पूर्णपणे गुंतली होती. समीर नेहमीच त्याच्या कार्यालयीन जबादारीमध्ये मग्न असे.

आताशा मंजुश्री घरी एकटीच असे. फक्त सीमाच्या संस्थेचे विद्यार्थी घरी येतजात असत. तिच्या घराचा, घरातील वस्तूंचा मुक्तंपणे वापर करीत असत. आणि हताशपणे ते बघत राहण्यापलीकडे मंजुश्री काहीच करू शकत नसे.

मंजुश्रीचे आजवरचे आयुष्य घरालाच बांधलेले होते. तिचे शिक्षण, तिचे छंद, आवडीनिवडी याचा तिला विसरच पडलेला होता. अर्थात त्याबद्दल तिची तक्रार नव्हतीच. परंतु आता सांसारिक जबाबदारीतून ती जरा मोकळी होत होती, मुले मोठी होऊन स्वतंत्र झाली होती. समीर नसे ना का सोबत, पण तिला आता तिचे छंद, आवडी-निवडी जोपासायचे होते. थोडा निवांतपणा उपभोगायचा होता. पण ते काहीच साध्य होत नव्हते. घरातली वर्दळ काही कमी होत नव्हती. तिची जबाबदारी संपतच नव्हती.

घर सोडून कुठे बाहेर जावे, तर घरी काय घडेल याची चिंता काही पाठ सोडीत नसे. कारण आता घराची एक किल्ली त्या विद्यार्थ्याकडे सुपूर्त केलेली होती, सीमाच्याच सांगण्यावरून. त्या घरातील रहिवासी नेहमी बदलत असत. कधी रुग्णसेवेचे प्रशिक्षण घेणाऱ्या परिचारिका असत, तर कधी फॅब्रिकेशन, वेल्डिंग, मोल्डिंग, ग्लासवर्क अशी कामे शिकण्यासाठी आलेले उमेदवार असत. कधी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरता विद्यार्थी आलेले असत. तर कधी फॅशन डिझायनर, ब्यूटीशियन इ चे प्रशिक्षण घेण्याकरता आलेले उमेदवार असत. काहीवेळा निरनिराळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्याकरता, अथवा प्रशिक्षणाकरिता क्रीडापटू आलेले असत. कधी काही कलाकार देखिल येत असत. तिथे रहाण्याकरता कुणीही येवोत, मंजुश्रीचे घर सगळ्यांकरता कायम खुले होते.

मंजुश्रीने समीरकडे अनेकवेळा तक्रार सांगून पाहिली. त्यालादेखील आताशा घरातील परिस्थितीचा अंदाज येऊ लागला होता आणि बहुदा त्रास देखील होत असावा. उघडपणे तो मान्य करीत नसला तरी मंजुश्रीला ते समजत होते. परंतु तरीदेखील सीमाला स्पष्टपणे काही सांगायची त्याची तयारी नव्हती.

त्या दिवशी दोघांचा असाच वाद झाला होता. मंजुश्रीने त्याला काही त्रासदायक घटना कथन केल्या होत्या. सीमाबद्दल तक्रार सांगते म्हणून समीर मंजुश्रीवरच संतापला होता.

"घरी आलो की सतत तुझ्या तक्रारीचा पाढा चालू असतो आजकाल. घरी येणेच नकोसे वाटते मला." समीर म्हणाला.

"समीर, तू तर कधीतरीच असतोस घरात. मी २४ तास घरी असते. माझे कार्यक्षेत्र म्हणजेच हे घर आहे. आणि त्यावर कोण कुठले परके अतिक्रमण करीत असतात. या सर्व गोंधळात माझे काय होत असेल याचा विचार केलायस कधी?" मंजुश्री विचारत होती. तिला अर्थातच उत्तराची अपेक्षा नव्हतीच. पण आज सर्वकाही बोलायचेच असे तिने ठरविले होते.

"सीमाला समाजकार्य करायचे आहे, तर ती का नाही या सगळ्यांसाठी काही करत? माझ्या घरात माझी सत्ता नाही. माझ्या अपरोक्ष घरात कुणी काही केले, तर त्याचा जाब मी विचारू शकत नाही? लगेच मला सामाजिक जाणीव, दया, पाप-पुण्य इत्यादी मोठे मोठे शब्द ऐकवले जातात. माझ्या घराचा, कुटुंबाचा, मुलांचा विचार करणे, त्यांच्या हिताची जपणूक करणे स्वार्थीपणा असेल, तर मी स्वार्थी आहे. मला दया, सहानुभूती, गरज वगैरे सारे काही समजते, पण म्हणून मी माझ्या घराच्या, कुटुंबियांच्या सुखावर पाणी सोडायचे का? इतर लाखो कुटुंब त्यांचे आयुष्य सुखाने जगतात, त्यांना कुणी स्वार्थी म्हणत नाही. मग माझ्यावर ही जबरदस्ती का? अनेक वर्षे झाली आता, सीमाने काही उपक्रम आयोजित करायचा आणि आपण सर्वांनी त्याची कार्यवाही करायची, तिच्या जबाबदाऱ्या आपण पार पाडायच्या. आपण गैरसोय सोसायची, आणि कार्यकर्ती म्हणून सीमा मिरवीते आहे. मी स्पष्ट बोलते, हे म्हणजे 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' असा प्रकार चालला आहे. मला कीर्ती अथवा मान-सन्मान नको आहेत. मला माझ्या खाजगी, कौटुंबिक आयुष्यात होणारी ढवळाढवळ सहन होत नाहीये. आणि तू सीमाला हे सांगू शकत नसशील, तर तुझे माझे मार्ग वेगळे आहेत हे समजून घे." बोलता बोलता मंजुश्री थांबली. "काय बोलले हे मी?" तिच्या मनात आले. "असं बोलायचे ठरविले तर नव्हते, पण बहुदा ते माझ्या मनात कुठेतरी असेलच. म्हणून सहज पणे व्यक्त झाले."

समीर तिचे बोलणे ऐकताना स्तब्ध झाला होता. त्याला सगळ्या परिस्थितीची जाणीव होती, परंतु आजवर तो ते सर्व नाकारत होता. 'दृष्टी आड सृष्टी' ही नीती त्याने अवलंबली होती. अगदीच काही सामोरे आले तर सोयीस्करपणे मंजुश्रीवर, तिच्या स्वभावावर दोषारोप करून, तो नामानिराळा होत होता.

"हे बघ मंजू .." समीरचा आवाज आता खाली आला होता. त्याला जरा अपराधी वाटत असावे. "सीमाताई माझी बहीण आहे. आता आई आणि अण्णा देखील नाहीत. तिला सासरचा काही आधार नाही. अशा परिस्थितीत मी तिला दुखावू शकत नाही. तू समजून घे जरा. वाटल्यास तू तिच्याशी बोल, मी काही म्हणणार नाही."

समीर अजिजीने बोलत होता. मंजुश्रीला त्याची परिस्थिती समजत होती. परंतु आता तिने सोक्ष मोक्ष लावायचे नक्की केले होते. अर्थात समीर काही मदत करेल, सीमाला काही सांगेल, असे तिला अजिबात वाटत नव्हते. इतक्या वर्षांच्या सहवासाने, तिला इतकेतरी नक्कीच समजत होते. म्हणून मग जरा विषय बदलत ती म्हणाली,

"पुढच्या आठवड्यात प्राची आणि प्रणव यायचे आहेत. थोडेच दिवस आहेत ते घरी, तू कुठे बाहेरगावी जायचे ठरवू नकोस."
"हो आहे लक्षात माझ्या, प्रणवची फ्लाईट पुढच्या महिन्यात ५ तारखेची आहे ना? मी दोनचार दिवस रजा घ्यायचा प्रयत्न करतो." समीर म्हणाला. आता वातावरणातील ताण जरा निवळला होता.

समीरने तिला बोलण्याची परवानगी दिली असली, तरी मंजुश्री तसे काहीच स्पष्टपणे बोलू शकली नाही. ठरल्याप्रमाणे सोमवारी प्राची आणि प्रणव घरी आले. इतके ठरवून देखील समीरला दोन दिवसांकरता बडोद्याला जावेच लागले होते. नेमका त्याच दिवशी सीमाताईचा सत्कार समारंभ होता. प्राची, प्रणव समारंभाला यायला तयार नव्हते. मग मंजुश्री एकटीच गेली तिथे. घरचे कुणीच नाही असे नको व्हायला. सीमाताईंच्या कार्याचे वर्णन करणारी भाषणे ऐकताना, मंजुश्रीला मात्र तिचे घर आठवत होते. २५ वर्षातील घटना, प्रसंगाचा स्मृतिपट तिच्या अंतर्चक्षूंच्या समोर उलगडत होता.

दारावर वाजणाऱ्या बेलच्या आवाजाने मंजुश्री भानावर आली. रात्रीच्या त्या शांत प्रहरी, बेलचा आवाज फारच कर्कश्यं आणि नकोसा वाटत होता. तिने पुढे होऊन घराचा मुख्य दरवाजा उघडला.

"फार उशीर झाला रे" ती म्हणाली.

"हो ना, अगं मी पुष्कळ नशीबवान म्हणायचा. काही काही फ्लाईट्स तर ३-४ तास लेट झाल्या आहेत.काय झाले आहे माहिती नाही. उद्या बातम्यांमध्ये कळेल." हातातली प्रवासी सुटकेस जमिनीवर ठेवत समीर म्हणाला.

"प्रणव, प्राची आले आहेत ना? " त्याने विचारले.

"हो कधीच .. तुझी वाट बघत होते इतकावेळ दोघंही. बरं, जेवणार आहेस ना?" मंजुश्रीने विचारले.

"नको आता .. " असे म्हणत समीर त्याच्या खोलीकडे निघाला.

आता किमान आठवडाभर, सीमा आणि तिच्या केंद्राचा विषय काढायचा नाही, असे मनोमन ठरवीत मंजुश्रीने दिवाणखान्यात लावलेला एकुलता एक दिवा बंद केला.

***

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

"हलवायाच्या घरावर तुळशीपत्रं ठेवणे"

मराठी भाषेत, कशावर तरी तुळशीपत्रं ठेवणे याचा अर्थ त्या वस्तूचा त्याग करणे असा आहे. उदा सुखासीनतेवर त्याने तुळशीपत्र ठेवले -- म्हणजे सुखासीनतेचा त्याग केला

जी वस्तू अथवा वास्तू स्वतःच्या मालकीची नाही, तिचे अन्य कुणाला परस्पर दान देणे अथवा त्याग करणे, म्हणजेच हलवायाच्या घरावर (जे घर स्वतःचे नाही, (इथे) हलवायाचे आहे) तुळशीपत्र ठेवणे असा आहे. यात तुळशीपत्र ठेवणारा स्वतःचे काहीच गमावत नाही, पण थोर दानी म्हणून नावाजला मात्र जातो.

"तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा|"

हे नक्की कशाचे उदाहरण समजायचे? "हलवायाच्या घरावर तुळशीपत्रा"चे? की "आयजीच्या जिवावर बायजी उदार" होण्याचे?

(बार्टर ट्रेडचे, किंवा त्याहीपेक्षा शॉर्टसेलिंगचेसुद्धा उदाहरण असू शकेल. खात्री नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"तुम मुझे खून दो - मै तुम्हें आजादी दुंगा |"

या वाक्याचा संदर्भ आणि इतिहास, भूगोल आपणा सर्वांनाच माहिती आहे.
त्या चौकटीत बघितले तर एक (खरोखरचे) आदरणीय व्यक्तीमत्व डोळ्यांसमोर येते. त्यांनी स्वत:चे रक्तच काय प्राण देखिल पणाला लावले होते, ते जर कमी पडले तर तुम्ही भर घाला अशी त्यांनी हाक दिली होती. आणि असे केल्यावर जे स्वातंत्र्य मिळेल, ते उपभोगायला मी कदाचित असेन नसेन, तर ते मी तुम्हालाच देऊन जाईन .. असे त्यांनी सांगितले होते.
त्यामूळे वरील दोन्ही म्हणी इथे बिल्कूल लागू होत नाहीत.

पण समजा ...
माहिती असलेली संदर्भ चौकट, इतिहास नाकारला, तर या वाक्याचा अगदी व्यापारी अर्थ निघू शकतो. ती चौकट काढल्यावर मला असे दिसले, की कुणी एक बेपारी, टोपलीमधे अजादी नामक काहीतरी घेऊन आठवडी बाजारात विक्रीसाठी गिऱ्हाईकांना बोलावतो आणि म्हणतो माझ्याकडे आजादी आहे (कशापासूनची माहिती नाही) त्याची किंमत तुमचे रक्तं आहे. पण यात देखिल वरील म्हणी बाद ठरतात, कारण हा तर सरळ सरळ व्यवहार आहे (तुम्ही म्हणता तसा 'बार्टर' विनिमय पद्धतीचा ). परंतु माझ्या मते इथे "बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात" ही म्हण कदाचित योग्य ठरेल. कारण आजादी ही काही टॅन्जिबल वस्तू नाही. रक्तं मात्रं खरे असू शकते (म्हणजे भ्रम निर्माण करून केलेली फसवणूक).
यात असे गृहितक आहे की, त्या आजादीला कुणी ग्राहक आहे. हे चूक असू शकते.
बाजारात फिरणारे म्हणतील, "ही आजादी काय भानगड आहे? आणि त्या करता दोन दोन खून? मोसंबी नारंगी, किंवा अप्सरा असती तर विचार केला असता नाही का?"
मग ती आजादी तशीच टोपलीमधे पडून रहाण्याची शक्यता खूप जास्ती आहे.
तुम्हाला काय वाटते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

पहिल्या कथेत स्त्रीपात्र फक्त रंगनाथची बायको, पण तिला तिचं स्वतंत्र अस्तित्व नाही.

दुसऱ्या कथेत मात्र चिकार स्त्रीपात्रं आहेत; अमक्याची आई, तमक्याची बायको अशा नातेवाईक असण्याजागी त्यांना आपापली नावं आहेत. दुसऱ्या कथेतली चांगली बाई ही रांधा-वाढा-उष्टी काढा अवाक्षर न काढता करणारी आहे आणि दुष्ट बाई घटस्फोट घेणारी, पोटच्या मुलीला न सांभाळणारी आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बरोबर आहे. (तुम्ही आक्षेप घेत आहात? की फक्त निरीक्षण नोंदवले आहे? ते कळले नाही. )

पण घटस्फोटीत बायका दुष्ट असतात आणि घरकाम करणाऱ्या चांगल्या .. असं काही मला म्हणायचे नाहीये. कथेच्या अनुषंगाने रंगवलेली ती पत्र आहेत, आणि अगदीच पूर्णत: काल्पनिक देखिल नाहीत.

आपण नॉर्मल आयुष्यात एकमेकांना मामी, मावशी, काकू, ताई, दादा , काका, मामा असेच संबोधतो असे मला वाटते. त्यात स्त्रीयांना कमी लेखण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. ही कथा एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात घडते. त्यातले सदस्य एकमेकांना अशाच पद्धतीने संबोधतील ना?
मला तरी त्यात काय वावगे आहे कळले नाही.

पहिली कथा जुन्या काळात घडलेली आहे (राजा, प्रधान वगैरे पात्र आहेत). त्या काळात घराबाहेर, सार्वजनिक ठीकाणी महिलांचा वावर अगदी अभावानेच असे, हे सर्वश्रूत आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||