"हर्ड इम्युनिटी"ने सुरक्षा मिळेल का?

"हर्ड इम्युनिटी"ने सुरक्षा मिळेल का?

डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे)

मागल्या वर्षीपर्यंत डॉक्टरकीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यालादेखील हा शब्द नीटसा माहीत नसायचा.. आणि आता प्रत्येक लहानथोराच्या तोंडामध्ये केवळ "हर्ड इम्युनिटी यायला हवी" असे शब्द दिसून येतात..

जसे माणसाच्या शरीरावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स सर्जन असतात तसेच संपूर्ण समाजाच्या आरोग्यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर्स हे सामाजिक आरोग्य विशेषज्ञ (Public Health Experts) असतात. ऑपरेशन करताना सर्जनचे मत ग्राह्य धरले जाते तरच रुग्णाचा जीव वाचेल. मात्र सध्या वैश्विक साथ सुरू असताना म्हणजे सामाजिक आरोग्य अतिशय धोक्यामध्ये असताना ती कशी थांबवायची याचा निर्णय मात्र WA फॉरवर्ड होणारे मेसेजेस आणि व्हिडीओनुसार जनताच घेत आहे हे अतिशय धोकादायक आहे.. अश्याने सामाजिक आरोग्याची अपरिमित हानी होणार आहे हे नक्की.

असो. एक सामाजिक आरोग्य विशेषज्ञ म्हणून ही माहिती मी सांगत आहे.

आपण हर्ड इम्युनिटी थोडी समजून घेऊया .

"हर्ड इम्युनिटी" ही संकल्पना पाळीव पशूंसाठी प्रथम वापरण्यात आली. प्राण्यांच्या कळपातील जनावरांना ठरावीक संख्येमध्ये लस टोचल्यास सर्व कळप (herd) सुरक्षित होतो. जेव्हा माणसांसाठीदेखील लसीकरण सुरू झाले, तेव्हा असे लक्षात आले की एखादा आजार नियंत्रणामध्ये आणण्यासाठी १००% मुलांना लसीकरण करणे आवश्यक नाही, ८०-९०% मुलांना लसीकरण दिले की आजार आटोक्यामध्ये येऊ शकतो..

मात्र किती टक्के लसीकरण झाल्यावर हर्ड इम्युनिटीचा फायदा मिळेल हे त्या आजारावर अवलंबून असते. काही आजार असे आहेत की लस असली तरी त्यांना हर्ड इम्युनिटी तयार होत नाही. उदा. धनुर्वात, टीबी (क्षयरोग). हे रोग तर शेकडो वर्षे आपल्या आजूबाजूला आहेत मात्र अजूनदेखील हर्ड इम्युनिटीने आपल्याला वाचवलेले नाही. आणि करोनाची हर्ड इम्युनिटी काही महिन्यांमध्ये येणार याची आपल्याला खात्री आहे, हे कसे?

तसेच आता हर्ड इम्युनिटी आलीये आणि इतरांनी लसीकरण घेतले नाही तरी चालेल असे नसते. कारण समाज बदलत असतो, नवीन जन्मामुळे लसीकरण केलेल्यांची टक्केवारी सतत बदलत राहते. तसेच समाजघटक आपली जागाही बदलत राहतात.. त्यामुळे संसर्गाचा धोका कधीही असू शकतो. उदा. एका मुलाने गोवरचे लसीकरण घेतलेले नाही मात्र त्याच्या शाळेमधील इतर सर्व मुलांनी ते घेतले असल्याने त्याची सुरक्षा या मुलालादेखील मिळेल. मात्र तो सुट्टीसाठी गावी जाईल किंवा बदलीमुळे शाळा बदलेल अश्या वेळी हर्ड इम्युनिटी त्याला वाचवणार नाही आणि त्याला गोवर होईल.

म्हणजेच हर्ड इम्युनिटी व्यक्तीला आजारापासून वाचवत नाही, ती केवळ आजार होण्याची शक्यता कमी करते.

हर्ड इम्युनिटी खरे तर समाजासाठी असते – समाजाला साथीपासून वाचवण्यासाठी.

आणि आता मात्र हर्ड इम्युनिटी लोकांना वाचवेल असे चित्र उभे केले जात आहे.

करोनापासून वाचण्यासाठी केवळ आणि केवळ स्वतःचे सुरक्षित वर्तनच महत्त्वाचे आहे, इतर सर्व बाबी साहाय्यकारी असतात.

असे असले तरी देखील समजा आपण करोनासाठी हर्ड इम्युनिटी या पर्यायाचा विचार करायचा ठरवला तर त्याबाबत सारासार विचार करूया..

हर्ड इम्युनिटी यशस्वी होण्यासाठी काही बाबी आवश्यक असतात –

  1. आजार झाल्यानंतर / लसीनंतर त्यासाठीची रोगप्रतिकारक शक्ती निर्माण व्हायला हवी.
  2. एकदा आजार झाल्यानंतर / लसीनंतर पुढील काही वर्षे अथवा आयुष्यभर तो आजार पुन्हा होऊ नये. म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती ही अधिक काळ टिकणारी हवी.
  3. एकदा आजार झाल्यावर / लसीनंतर पुन्हा संसर्ग होऊन शरीरामध्ये जंतू सुप्तपणे राहू नयेत व आजार पसरवू नयेत.
  4. सदर आजाराच्या जंतूंमध्ये उपप्रकार (Strains) शक्यतो नसावेत. असल्यास, रोगप्रतिकारक शक्ती सर्व प्रकारच्या उपप्रकारांविरुद्ध काम करायला हवी.

या प्रत्येक मुद्द्याबाबत करोना/कोविडची माहिती घेऊ या ..

  1. प्रत्येक करोना रोग्यामध्ये इम्युनिटी तयार होतेच असे नाही. लक्षणविरहित रुग्णांमध्ये इम्युनिटीचे प्रमाण अत्यल्प आहे. अश्या व्यक्तींना पुन्हा संसर्ग होऊ शकतो.
  2. ज्या रुग्णांमध्ये अशी इम्युनिटी तयार होतेय ती बहुधा काही महिने टिकणारी असते. रक्तातील प्रतिपिंडे साधारण ३-४ महिन्यांमध्ये कमी झालेली आहेत. त्यामुळे या गेल्या ८ महिन्यांमध्येही काही पुनर्संसार्गाच्या केसेस सापडत आहेत. पुढील वर्षांमध्ये चित्र स्पष्ट होईल.
  3. एकदा आजार झाल्यानंतर पुन्हा संसर्ग होऊन, आजारी न पडता संसर्ग पसरवणे शक्य आहे का यावर अजून माहिती उपलब्ध नाही.
  4. करोनाचे (SARS Cov-2) वेगवेगळे उपप्रकार (strains) सध्या अस्तित्वात आहेत आणि ही संख्या अजून वाढू शकते. तसेच वेगळ्या strainमुळे करोना संसर्ग होऊ शकतो असे दिसून आले आहे.

म्हणजे हर्ड इम्युनिटीसाठीचा एकही नियम हा करोना पूर्ण करत नाही आहे.. आणि तरीही आपण हर्ड इम्युनिटी हवी असे म्हणत आहोत.

आता करोनाच्या सध्या उपलब्ध लसींबाबत जाणून घेऊया.

  1. लस दिल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे प्रतिपिंडे रक्तात निर्माण होत आहेत. मात्र त्यापासून मिळणारे संरक्षण ५० ते ९५% या रेंजमध्ये आहे.
  2. हा नवा आजार आहे. तसेच लसदेखील अतितत्काळ तत्त्वावर तयार होत आहे. त्यामुळे लसीचे संरक्षण किती काळापर्यंत मिळेल याबाबत अजून माहिती उपलब्ध नाही . सध्या फायझर लसीने ६ महिने antibody titre चांगला राहतो असे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. मात्र फ्लूची लस ही दर वर्षी घ्यावी लागते, तशीच ही लसदेखील वारंवार घ्यावी लागू शकते.
  3. सध्या उपलब्ध असलेल्या लसीमुळे आजार पूर्णपणे टळत नाही मात्र सौम्य आजार होऊन जीव वाचतात. त्यामुळे जर सौम्य आजार होणार असेल तर अश्या व्यक्ती आजार पसरवू शकतात.
  4. उपलब्ध लसींमुळे सर्व उपप्रकारांपासून सुरक्षा मिळणे अवघड आहे.

म्हणजे जरी करोनाविरुद्ध लस उपलब्ध झाली तरीही लसीकरणाने हर्ड इम्युनिटी मिळणे थोडे कठीणच आहे. तेदेखील जर आपण आपल्या करोडो जनतेला कमी कालावधीमध्ये लस देऊ शकलो तर शक्य आहे. पल्स पोलिओमध्ये केवळ ५ वर्षाखालील मुलांना लस द्यायची असते आणि त्यासाठीदेखील एका दिवसामध्ये १०० % गाठणे सर्वत्र शक्य होत नाही. म्हणून करोनाची लस सर्व जनतेपर्यंत केवळ टप्याटप्याने पोचू शकेल.

जर आतापर्यंत तुम्ही हे वाचत असाल तर लक्षात आले असेलच की आपण अतिशय बेभरवश्याच्या उपायाच्या मागे लागलो आहोत. जो उपाय आपल्याला साथीपासून वाचवण्यासाठी उपयुक्त आहे, तो मिळवण्यासाठी आपण साथ सर्वांपर्यंत पसरू देतोय. म्हणजेच “आग लागू नये असे म्हणण्याऐवजी वणवा पेटू दे, जे शिल्लक उरेल ते आपले” असे वागतोय आपण सर्व..

साथ पसरली की ऑक्सिजन न मिळाल्याने होणारे मृत्यू वाढतात, आणि कुटुंबे उध्वस्त होतात..

कृपया कोणीही इम्युनिटी मिळवण्यासाठी संसर्ग होवू दे असे प्रयत्न करू नयेत.

आजार टाळणे हाच उपाय आपला व आपल्या कुटुंबियांचा जीव वाचवू शकतो.

मग जर हर्ड इम्युनिटी आजाराने मिळवणे हे बेभरवश्याचे आणि धोकादायक आहे तर मग अश्या वेळी नक्की काय करायला हवे?

कोणत्याही नवीन आजाराशी लढताना केवळ खात्रीचे उपाय / शस्त्रे वापरायला हवीत.

आणि खात्रीचे उपाय म्हणजे हातांची स्वच्छता, मास्कचा योग्य वापर, शारीरिक अंतर राखणे, गर्दी व बंदिस्त जागा टाळणे इ. नियम तर आपण सर्व जाणतोच फक्त पाळत नाही..

जास्तीत जास्त लोकांनी नियम पाळणे सुरू केले ना की आपोआप “नियम पाळणाऱ्या लोकांची” हर्ड इम्युनिटी निर्माण होईल.. आणि साथ नक्की आटोक्यात येईल..

म्हणून तर 'टीम भारत'मध्ये जास्त लोक हवे आहेत, सध्या 'टीम करोना'मध्ये जास्त संख्या आहे.

आपल्या टीमवर्कने साथ रोखूया.

करोनाला हरवूया.

--
डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) M.D. (Community Medicine) साथरोगतज्ज्ञ , मिरज.
#Fighting_Myths_DrPriya
पूर्वप्रकाशित : इथे आणि इथे, एप्रिल १७, २०२१
डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) यांचे सर्व लेखन Info Portal by UHC, GMC, Miraj या पानावर उपलब्ध आहे. #covid_insights_drpriya
त्यांचे 'ऐसी अक्षरे'वर प्रकाशित सर्व लेखन इथे उपलब्ध आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

हा शब्द सामान्य लोकांना माहीत असण्याचे काहीच कारण नाही.
कसा माहीत झाला?
कोणी तरी तज्ञ वक्ती नी जाहीर रीत्या हार्ड इम्मूनिटी वर अनमोल मत व्यक्त केले आणि प्रसार माध्यम नी ते दिव्य विचार समाजात पसरवले
पाहिले विविध तज्ञ,biologist, पेशी तज्ञ , साथीच्या रोगाचे विशेष तज्ञ, डॉक्टर्स ,ह्या सर्वांनी एका सुरात एकच गोष्ट सांगावी.
तेव्हा लोक कन्फ्युज होणार नाहीत.
सत्य हे सत्य च असते आणि ते एकच असते.
पण ह्या covid वर खूप च परस्पर विरोधी मत ,व्यक्त होत असतात.
खरा गोंधळ तिथे च आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा शब्द सामान्य लोकांना माहीत असण्याचे काहीच कारण नाही.
कसा माहीत झाला?
कोणी तरी तज्ञ वक्ती नी जाहीर रीत्या हार्ड इम्मूनिटी वर अनमोल मत व्यक्त केले आणि प्रसार माध्यम नी ते दिव्य विचार समाजात पसरवले
पाहिले विविध तज्ञ,biologist, पेशी तज्ञ , साथीच्या रोगाचे विशेष तज्ञ, डॉक्टर्स ,ह्या सर्वांनी एका सुरात एकच गोष्ट सांगावी.
तेव्हा लोक कन्फ्युज होणार नाहीत.
सत्य हे सत्य च असते आणि ते एकच असते.
पण ह्या covid वर खूप च परस्पर विरोधी मत ,व्यक्त होत असतात.
खरा गोंधळ तिथे च आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1