वजनकाटावाला

वजनकाटावाला
---------------------
तो चौकात वळणावर बसायचा . वजनकाटा घेऊन.
पांढरा पायजमा ,पांढरा नेहरू शर्ट आणि पांढऱ्याच मिशा . सावळासा देह. वय झालेलं असूनही अंगाने तो चांगला होता . रोज सकाळी तो त्याच्या काट्याला नमस्कार करून स्वतःचं वजन बघायचा. म्हणजे धंदा चांगला होतो अशी त्याची श्रद्धा होती.
त्याचा वजनकाटा सर्वधर्मसमभाव मानणारा होता .
त्याच्याकडे लहान अवखळ पोरं , लुकड्या पोरी , मध्यम वजनाची मध्यमवयीन माणसं आणि जाड्याजुड्या बायका , सगळेच यायचे .
चौक बदलला . शेजारचं दारूचं दुकान मोठं झालं . चायनिजच्या नव्या गाड्या रस्ता अडवू लागल्या .
तो तसाच राहिला .
एके दिवशी लॉकडाउन पुकारण्यात आलं . पहिलं . कडक ! सगळं बंद !
त्याचा वजनकाटाही. त्याला कितीही नमस्कार केला तरी त्याचा काहीच उपयोग नव्हता आता . तो आणि त्याच्यासारखी माणसं अशा वेळी काय करतील ?... कोरोनाला त्याच्याशी काहीच घेणंदेणं नव्हतं ... आणि कोणालाच ... प्रत्येकाला आपलं आपलं पडलेलं .
रोज कमवायचा तेव्हा खायचा तो . अवघड परिस्थिती झाली . बाहेर पडायची चोरी . करायचं काय ? त्याच्याकडे बँक बॅलन्स थोडाच होता ? की वर्क फ्रॉम होम ? की घरी बसून पगार ? ...
म्हाताऱ्याची अन्नानदशा झाली . भीक मागायला लागला तो .
वजनकाटा मात्र तो उराशी बाळगून होता . पडलाझडला तरी - शेवटी पोटपाणी होतं ते त्याचं .
लॉकडाउनच्या ऑक्टोपससारख्या नांग्यांनी जीव गुदमरायला लागल्यावर काही जणांना काही लोकांच्या भुकेकंगालपणाची जाणीव झाली . ती अशी भुकेकंगाल माणसं होती की जी कायमची भिकारी नव्हती . पण वेळच अशी वाईट आली होती . पोट माणसाला सारं विसरायला लावतं ! लाचारी पत्करायला लावतं xxx !
मग अन्नदान सुरु झालं . थोडयाफार गरीब बिचाऱ्या जनतेची भूक तरी भागू लागली . थोडीफार. तोही रांगेत उभं राहू लागला . दोन टायमाला गिळू लागला . xxxx , जीवजाळ्या भुकेला बुस्टर डोसच जणू ! पण पुढे ? ...
अशा अवघड काळातही देशात अब्जाधीशांची संख्या एकेकाने वाढत होती ; तेव्हा त्याच्यासारख्या लोकांच्या फाटक्या पत्रावळींवरचं एकेक शीत कमी होत चाललं होतं .
परिस्थितीच्या पारड्यात त्याचं वजन कमीच होतं .
त्याची परिस्थिती आणखी बिघडत गेली . त्याच्या डोईवरचे केस आणखी राठ झाले. तो आणखी म्हातारा दिसू लागला . खंगला बिचारा .
एके दिवशी तो त्याच चौकात मरून पडला .
कॉर्पोरेशनच्या लोकांनी त्याला सहज उचलला , कारण त्यावेळी त्याचा देह वजनाला कापसासारखा हलका झाला होता .
बाजूला पडलेला वजनकाटा पोरका झाला होता . त्याचं आता कोणीच नव्हतं . तो धुळीने भरला होता , त्याचा काटाही तुटला होता , त्याची वाट लागली होती ... मालकासारखी अन भंजाळलेल्या विस्कळीत समाजासारखी .

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुम्हाला अशा छानछान गोष्टी कशा काय सुचतात हो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचकांचे आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0