मीनाक्षी कोकणेची गोष्ट

असामान्य बायकांच्या कथा, 'सक्सेस स्टोरीज' नेहमीच लिहिल्या जातात, 8 मार्चला तर एकदम घाऊक भावात. मेनस्ट्रीम पत्रकारितेत असतानाही मीही असं अनेकदा केलं आहे पण मला नेहमीच खूप नाव नसलेल्या, प्रसिद्धी, कौतुक पुरेसं वाट्याला न आलेल्या तरीही प्रचंड कष्ट उपसणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या स्त्रियांच्या कहाण्या खुणावतात. म्हणूनच आज मीनाक्षी कोकणेची कहाणी.

m1

मीनाक्षी आमच्या ऑफिसमध्ये एडमिन म्हणून काम करते. म्हणजे नेमकं काय करते? तर ऑफिसमध्ये लागणारी प्रत्येक वस्तू, सेवा संबंधित लोक नीट पुरवत आहेत की नाही, ऑफिसात काय कमी पडतंय, कोणाला कोणती बिस्कीटं लागतात, कोणत्या प्रकारची कॉफी लागते इथपासून सफाई काम करणाऱ्या मावशी नीट काम करून जात आहेत ना, कोणते दिवे दुरुस्त करायचेत, एखाद्याचा लॅपटॉप बिघडलाय- तो दुरुस्त करवून घेणे, ऑफिसमध्ये एखादा कार्यक्रम असला तर उपस्थितांच्या खाण्या-पिण्याची सोय, रेकॉर्डिंग स्टुडिओची वेळोवेळी देखभाल करून घेणं, अशा तमाम गोष्टी अगदी चोख पाहणं, या सगळ्यांवर देखरेख करणं, हे ती करते. पण हा झाला तिच्या कामाचा अगदी महत्वाचा तरी छोटासा भाग. याहून मोठमोठी कामं ती लीलया करते. ती कोणती? तर शिक्षणानंतर, लग्नानंतर संसारात पडलेली, तब्बल एकोणीस वर्षानंतर अबकडपासून करिअरला सुरुवात करणारी, अगदी ईमेल कशी पाठवायची हेही माहीत नसलेली स्त्री आज स्टोरीटेलसारख्या बहुराष्ट्रीय कंपनीत हजारो ऑडिओबुक्सबाबतच्या सगळ्या माहितीचं व्यवस्थापन करते(रेकॉर्ड मेंटेन) करते, हे सांगितलं तर अनेकांना आश्चर्य वाटेल. इतकंच नाही तर स्टोरीटेल इंडियाअंतर्गत ज्या अकरा भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक्सचं काम केलं जातं, त्या सगळ्या भाषांमध्ये जेवढी म्हणून पुस्तकं ऑडिओकरता घेतली जातात, त्यांचे आयएसबीएन (ISBN) नंबर्स मिळवण्याचं अत्यंत महत्वाचं काम ती करते कारण या आयएसबीन क्रमांकाशिवाय पुस्तक/ऑडिओबुक प्रकाशितच करता येत नाही. अकरा भाषांतल्या शेकडो पुस्तकांसाठी आयएसबीएन मिळवणं, आमच्या सिस्टममध्ये त्यांची प्रॉडक्टस/फाईल्स तयार करणं, रॉयल्टी आणि इतर बाबींचे तपशील असलेले करार करण्याकरता आवश्यक त्या बाबी करणं हे काम करून मग या पुस्तकांचे सर्व तपशील अनेक एक्सेल शीट्समध्ये भरणं हे सारं ती नित्यनेमाने करते आणि अशाप्रकारे करते की कोणत्याही भाषेतल्या कोणत्याही पुस्तकाबद्दल तिला विचारलं, आम्हाला एखादा तपशील सापडत नसला आणि तिला फोन केला की ती दोन-तीन मिनिटांतच एक्सेल शीट्सच्या महाकाय पसाऱ्यातून हवे ते काढून देते. कोणत्याही पुस्तकाच्या कामाबद्दल मला काही अडलं तर मी पहिला फोन तिला लावते आणि आजवर असं एकदाही झालं नाही की तिच्याकडून शंकेचं निरसन झालं नाही. इतकंच काय, एक्सेल शीट्समध्ये फिल्टर्स कसे लावायचे, हे तिनेच मला शिकवलं आहे. कधी कधी वाटतं, मीनाक्षी एक दिवस ऑफिसला नसली तर काय होईल? अर्थातच इतर लोक मदत करतातच पण बहुधा मला सवय झाली आहे, काही हवं असलं की तिला फोन लावण्याची.

हे सारं ती करते, अशा प्रकारची अनेक कामं जगात अनेक लोक, स्त्रिया करत असतात, तरी तिच्याबद्दल जास्त कौतुक आहे याचं कारण तिची लाईफ-स्टोरी.

१९७७ मध्ये मुंबईत तिचा जन्म झाला. घरात चार बहिणी, त्यांच्या पाठीवर झालेले दोन भाऊ असं मोठं कुटुंब. मुलगा व्हावा, या आग्रहापोटी तयार झालेलं हे मोठं कुटुंब आणि घरची आर्थिक स्थिती बेताचीच. घरात मुलींच्या मतांना काहीच किंमत नाही. भारतातल्या करोडो स्त्रियांप्रमाणेच बालपणापासूनच तिला लिंगभेदाचा सामना करावा लागला. घरात पुरुषी वातावरण. सगळं महत्व मुलांच्या शिक्षणाला, त्यांच्या करिअरला. मुलींच्या विचारांना तिथं काही किंमत तर नव्हतीच पण घरातल्या पुरुषांचा वचकच असे. अशा वातावरणात अनेक आव्हानांचा सामना करत ती कॉलेजची पायरी चढली. ही तिच्या कुटुंबातली कॉलेजला जाणारी पहिली पिढी. एसवायबीएला असतानाच तिला एक स्थळ सांगून आलं. तेव्हा तिला लग्न करायचं नव्हतं, शिकायचं होतं पण तिच्या संमतीचा प्रश्नच नव्हता. उच्चशिक्षण घेऊन प्राध्यापक व्हायचं स्वप्न होतं तिचं पण घरात मुलींच्या म्हणण्याला काडीची किंमत नव्हती. होणारा नवरा निर्व्यसनी, सुस्वभावी आहे, यातच समाधान मानत तिने लग्न केलं.

m२

आता बीए.ची डिग्री तर अर्धवट राहिली होती, पण लग्नानंतर ती इतक्या मोठ्या खटल्याच्या कुटुंबात येऊन पडली होती की शिक्षणाला रामराम ठोकावा लागणार, अशीच परिस्थिती झाली. तरीही जिद्द न सोडता ती जमेल तितकं कॉलेजला जात राहिली. ती सांगते, “ मी तेव्हा के.जे.सोमय्या कॉलेजात मराठी साहित्य शिकत होते. बालसाहित्यिक अनंत भावे आम्हाला मराठी शिकवायचे. त्यांच्या लेक्चर्सना मी बसायचे, तर खूप थकवा असल्याने माझ्या डोळ्यांवर सतत झोप असायची. एक तर मी नव्यानेच लग्न झालेली एकवीस-बावीस वर्षांची मुलगी. त्यात कॉलेजला जाण्याआधी पहाटे उठून आठ-दहा माणसांच्या एकत्र कुटुंबाचं सगळं करण्यात मी इतकी दमून जायचे, की वर्गात बसल्यावर लेक्चर ऐकायचा कितीही प्रयत्न केला तरी डोळ्यांत प्रचंड झोप असायची. हे भावे सरांनी नोटीस केलं होतं, त्यांनी एक दिवस मला वर्गात झोपण्यामागचं कारण विचारलं. मी सगळं सांगितलं. ही परिस्थिती कळल्यावर त्यांनी आनंदाने मला वर्गात झोपण्याची परवानगी दिली. अशा स्थितीत मी कॉलेज केलं. डिग्री घेतली. त्यानंतर पुढे काही शिकणार, करिअर करणार तोवर मला मुलगा झाला. मग आधीच घरातल्या इतक्या जबाबदाऱ्या त्यात मुलांचा सांभाळ करायचा, यात नोकरी करण्याचा प्रश्नच नाही आला.”

एका बाजूला नवऱ्याचा हळूहळू स्थिर होणारा व्यवसाय, त्यात येणाऱ्या अडचणी, दुसरीकडे एकत्र कुटुंबाकरता करावी लागणारी कामं, धावपळ आणि मुलांंचं संगोपन हे सारं करताना तब्बल एकोणीस वर्ष ती नोकरी-व्यवसायापासून दूर राहिली. दरम्यानच्या काळात अनेकदा आर्थिक परिस्थिती बिकट होत गेली, पण ती पाय रोवून उभी राहिली.

२०१७ मध्ये तिनं स्टोरीटेलकरता इंटरव्यू दिला. स्वीडनच्या या कंपनीनं भारतात तेव्हा नुकतीच सेवा सुरू केली होती. आमचा कंट्री हेड योगेश दशरथनं जेव्हा तिला इंटरव्ह्यूसाठी बोलावलं, तेव्हा तिचा नवरा आणि दीर दोघे तिच्यासोबत गेले होते, कारण इतक्या वर्षांनी ती पहिल्यांदा नोकरीसाठी बाहेर पाऊल टाकत होती. बाकी कोणतीही कौशल्यं नसताना केवळ बी.ए. च्या बळावर बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळणार तरी कशी, असा प्रश्न तिच्यासमोर होताच. परंतु योगेशनं तिच्यावर विश्वास दाखवून तिला संधी दिली आणि त्याचं तिनं सोनं केलं. इमेल्स पाठवणं - त्यात फाईल्स अटॅच करणं, फाईल्स डाऊनलोड करणं अशा साध्या साध्या गोष्टींपासून आम्ही कामासाठी जी सॉफ्टवेअर्स वापरतो, त्यातल्या खाचाखोचा तिला इथल्या सहकाऱ्यांनी शिकवल्या. आमची इंग्रजीची पब्लिशर रत्ना सक्सेना, बंगाली भाषेचं काम पाहणारी सुरोमिता रॉय या दोघींनी तिला अशा लहानसहान गोष्टी शिकवल्या. प्रशांत मित्रानं एक्सेल शीट्सवर कसं काम करायचं, हे शिकवलं. या साऱ्यांनीच हे सारं शिकवताना कधीही तिला कमीपणा वाटेल, असं काही केलं नाही. आपल्या प्रत्येकाकडून होतात, तशा सुरुवातीला अनेकदा तिच्याकडून चुका झाल्या, पण सगळ्यांनी तिला समजून घेतलं. विशेषत: योगेशनं तिला चुका समजावून देत, योग्य पद्धतीने आपल्याला एखादं काम कशाप्रकारे करणं अपेक्षित आहे हे सांगितलं. तीही भराभर अनेक गोष्टी शिकत गेली. तंत्रज्ञान, तांत्रिक कौशल्यांचा अभाव असलेल्या स्त्रियांकरता असा समजुतदार अवकाश उपलब्ध असला की असं काही आशादायक घडू शकतं.

m३

आपलं शिक्षण नीट पूर्ण झालं नाही, हवं तितकं शिकता आलं नाही, प्राध्यापक बनता आलं नाही, याची खंत मीनाक्षीच्या मनात आहेच पण आता तिनं मुलांच्या स्वप्नांना बळ द्यायचा निश्चय केला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडणाऱ्या मीनाक्षीनं तिच्या मुलाला-प्रद्युम्नला अमेरिकेच्या साऊथ कॅरोलायनातल्या क्लेमसन युनिवर्सिटीत शिकायला पाठवलं आहे. ऑटोमोबाईल इंजिनीअरिंगमध्ये मास्टर्स करणारा प्रद्युम्न पहिल्यापासूनच अभ्यासात खूप हुशार, सिन्सीअर असल्याने त्याच्या शिक्षणाचे हाल होऊ द्यायचे नाहीत, कितीही कष्ट पडले तरी त्याला हवं ते शिकायला द्यायचं असा चंगच तिनं बांधला होता. २०१९ मध्ये त्याकरता शैक्षणिक कर्ज मिळवण्याकरता त्यांनी बरीच खटपट केली आणि पाठोपाठ करोना महामारीचं संकट हजर…अखेरीस सगळ्या अडचणींतून मार्ग काढत मागच्या वर्षी तो अमेरिकेत शिकायला गेला. आता ती तिच्या मुलीला उच्च शिक्षणासाठी युरोपात पाठवण्याची तयारी करते आहे. अंधेरीच्या भवन्स कॉलेजमध्ये मास मीडियाचं शिक्षण घेणारी तिची मुलगीही परदेशात शिकायला जायचं म्हणते, तेव्हा एकाचवेळी मीनाक्षीला, आता दोन्ही मुलं आपल्यापासून काही वर्ष दूर राहणार, याने गलबलायला होतं तर तिचं दुसरं मन म्हणतं मुलांचे पंख आपणच छाटता कामा नये, त्यांना उडू द्यावं त्यांच्या अवकाशात. आणि ती मुलीच्या उच्चशिक्षणासाठी पुंजी जमा करायला लागते. किंबहुना मुलापेक्षा मुलीच्या शिक्षणाबद्दल ती जास्त जागरुक आहे, कारण ती म्हणते, “मुलं काय कसंही शिकतात, त्यांना शिकवलं जातं कारण पुढे जाऊन त्यांना घर सांभाळायचं असतं, मुलींना मात्र खूप त्रास सहन करावा लागतो, स्वत:ला सतत सिद्ध करावं लागतं. माझं नुकसान झालं तसं माझ्या लेकीचं होऊ नये.”

“मला माझ्या कॉलेजच्या वयात मोकळंढाकळं फिरता येत नव्हतं, पण आता माझ्या मुलीला रात्री दोन वाजता घरी यायचं असलं तरी तसं वातावरण मी देते, अर्थात तिला जबाबदारीची, स्वत:च्या सुरक्षिततेबाबतची जाणीव करून देऊन. मी नाही, मुलीला समजून घेणार तर कोण घेणार?” असं ती म्हणते तेव्हा जाणवतं, खरंच केवढं समृद्ध केलंय तिनं स्वत:ला…केवढं विस्तारलंय!

तिच्या या प्रवासात तिला तिच्या समजूतदार नवऱ्याची साथ आहे, त्यामुळे रस्ता थोडा अजून थोडा सोपा झाला अन्यथा शिक्षण, नोकरी, कौशल्य, सांस्कृतिक-साहित्यिक भांडवल, जातवर्गीय विशेषाधिकार वा एकंदरितच व्यक्तिमत्व समृद्ध करण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा अभाव यातून वाट काढत काढत पुढे सरकणं आणि वयाच्या चाळिशीत नोकरी सुरू करणं हे बाईसाठी किती आव्हानात्मक आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही.

निर्मितीच्या क्षेत्रात सहसा लेखक-दिग्दर्शक, त्या प्रकल्पातल्या सहभागी माणसांचं कौतुक केलं जातं, त्यांना प्रसिद्धीही मिळते, पण अनेक सर्जनशील प्रकल्पांमध्ये पडद्यामागे असे अनेक हात राबत असतात, हे हात गेली पाच वर्ष अव्याहतपणे सगळ्यांना मदत करत आहेत, त्याचं इतकं कौतुक तर करायलाच पाहिजे आणि बाई म्हणून कुटुंबात, समाजात कराव्या लागणाऱ्या अधिकच्या संघर्षाचीही दखल घेतली पाहिजे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख आवडला. मात्र मोहन आगाशेंशी त्याचा विशेष संबंध दिसत नाही.

> अमेरिकेच्या साऊथ कॅरोलिनातल्या 

अमेरिकेत रूढ असलेला उच्चार: ‘कॅरोलायना’.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

मात्र मोहन आगाशेंशी त्याचा विशेष संबंध दिसत नाही.

किंबहुना, त्या दुसऱ्या फोटोत ते मोहन आगाशे आणि ते दुसरे जे कोण आहेत ते (अज्ञानाबद्दल क्षमस्व. किंबहुना, त्यांपैकी एकजण मोहन आगाशे आहेत, हेदेखील मला चिपलकट्टींच्या प्रतिसादामुळेच समजले, परंतु ते एक असो.), मीनाक्षीबाईंकडे बोट दाखवून हसत आहेत, हे अत्यंत चमत्कारिक वाटते. या gestureचा कल्पित अर्थ काय वाटेल तो असेल (आणि, तो कदाचित वाईट नसेलही.), परंतु, पाहणारास तो फारशा चांगल्या रीतीने प्रतीत होत नाही. 'एखाद्याकडे बोटे दाखवून (फिदीफिदी) हसणे' यातून काही भलत्याच धारणा पाहणाऱ्याचे ठायी निर्माण होतात.

शिवाय, लेखात काहीही संदर्भ नसताना, श्री. मोहन आगाशे आणि ते जे कोणी दुसरे गृहस्थ आहेत, ते, त्यांच्याबरोबरचे फोटो डकविल्याने, उगाच लेखविषय असलेल्या व्यक्तीचे महत्त्व अनाठायी वाढविल्याची धारणा पाहणारास होते. जणू काही हे दोन गृहस्थ प्रस्तुत व्यक्तीची subtle शिफारस (काहीही कारण नसताना) करीत आहेत, असे काहीसे. त्याची काहीही गरज नाही; उलट, it is counterproductive. अत्यंत gimmicky वाटते, आणि लेखविषय असलेल्या व्यक्तीविषयी (तिचा काहीही दोष नसताना) एका प्रकारची अत्यंत negative धारणा पाहणाराचे ठायी निर्माण होते.

बाकी लेख एकंदरीत बरा आहे, वाईट म्हणवत नाही. (काहीसा 'तुप्यांच्या प्रियांकाने आमच्या मीनाक्षीचे नाव आंतरजालावर छापून आणले, हो!' स्वरूपाचा असला, तरीही. अर्थात, त्या genreमधील लेख म्हणून चांगलाच आहे, आणि, त्या genreमध्येही per se काहीच वाईट नाही. छापील वृत्तपत्रांमध्ये पुरवण्या भरण्यासाठी अशा लेखांचा वापर पारंपरिक - अगदी stapleवजा - आहे, भले ते फारसे कोणी वाचत नसले, तरीही; त्यामुळे, त्या genreमध्ये काही गैर आहे, असे म्हणवत नाही. शिवाय, एखाद्या सामान्य, अप्रसिद्ध व्यक्तीवरील लेख,on the outside chance that त्यावरून कोणी काही प्रेरणा घेऊ शकेल, अगदीच काही निरुपयोगी वा अस्थानी नाही. With no disrespect meant towards the person in question. आणि, अशा लेखांनाही आपला असा एक ग्राहकवर्ग असतोच.)

मात्र, दुसरे आणि तिसरे छायाचित्र टाकले नसते, तर बरे झाले असते. त्या दोन छायाचित्रांमुळे लेख, आणि, पर्यायाने, लेखविषय असलेली व्यक्ती, frivolous वाटतात. (लेखविषय असलेली व्यक्ती कदाचित प्रत्यक्षात frivolous नसेलही, परंतु, त्या परिस्थितीत, a great disservice is being done to the (person who is the) subject of this article by the mere inclusion of those two photographs. लेखावर अशा प्रकारचे काही संपादकीय संस्करण झाले असते, तर बरे झाले असते.)

पहिले चित्र आपल्या जागी ठीक आहे, आणि लेखास पूरक आहे. त्यामुळे, ते ठेवले, तरी चालेल. (किंबहुना, तेवढे पुरले असते.)

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप छान. अनंत आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऊ. कशापायी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते राजमान्य राजश्री उफराटी नवी बाजू असे असावे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

त्या परिस्थितीत तो उ. ऱ्हस्व नको काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थँक्स जयदीप. कॅरोलायना हे एडीटलं आहे. आणि मोहन आगाशे आमच्या ऑफिसात हल्लीच एका कार्यक्रमाला आले होते. तेंडुलकरांची नाटकं ऑडिओबुकमध्ये आली, तेव्हा त्याचा प्रकाशन कार्यक्रम झाला, त्याकरता आगाशे आणि काही मंडळी आली होती, त्या कार्यक्रमाचं बरंच काम मीनाक्षीने केलं होतं, म्हणून तिचे हे ऑफिसमधले त्यांच्यासोबतचे फोटो आहेत, त्यांनीही कौतुकाने तिच्यासोबत काढून घेतलेले. तिचे ऑफिसातले दुसरे फोटो नव्हते, म्हणून हे वापरले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0