शाळा - सुधीर बेडेकर

विचारवंत आणि लेखक सुधीर बेडेकर यांचे नुकतेच निधन झाले. ज्येष्ठ विचारवंत दि. के. बेडेकर यांचे ते सुपुत्र होते. ‘मागोवा’ आणि ‘तात्पर्य’ या नियतकालिकांचे ते संपादक होते. त्यांना आदरांजली म्हणून त्यांचा एक लेख साभार प्रकाशित करत आहोत.

---

शिक्षणाचा विचार करायला लागलं की एक कविता आठवते. मिरोस्लाव होलब नावाचा झेकोस्लोव्हाकिया देशातला एक झक्क कवी आहे. तो डॉक्टर होता. आधी पॅथॉलॉजिस्ट म्हणून काम करायचा, नंतर इम्युनॉलॉजीच्या शास्त्रात त्यानं संशोधन केलं. त्याच्या बऱ्याच कविता विज्ञानाशी संबंधित आहेत. ऑक्सिडेशन, मायक्रोस्कोपखाली, अग्नीचा शोध अशी त्याच्या कवितांची नावं. शिक्षणावरच्या या त्याच्या कवितेचं नाव आहे 'शाळा'. तिच्यामध्ये तेराव्या ओळीत थोडासा बदल करून घेऊन तिचा अनुवाद असा आहे -

एक झाड दारातून प्रवेश करतं,
वाकून नमस्कार करत म्हणतं,
मी झाड आहे.

एक अश्रूचा काळा थेंब,
आकाशातून खाली पडतो अन् म्हणतो,
मी पक्षी आहे.

आणि आता कोळ्याच्या रूपेरी जाळ्यावरून
प्रेमासारखं काहीतरी जवळ येतं
आणि म्हणतं,
मी निःशब्दता आहे.

पण त्या तिथं फळ्यासमोर
उभा ठाकलेला असतो,
एक सांस्कृतिक राष्ट्रवादी
बंद गळ्याच्या कोटातला घोडा.

तो पुन्हा म्हणतो,
कान टवकारून चारी दिशांना
पुन्हा पुन्हा घोकतो,

मी इतिहासाची सनातन प्रेरणा आहे
आणि
आपल्या सगळ्यांना प्रिय आहे
विकास
आणि
धीरोदात्त रणवीरांचे पराक्रम

...

तेव्हा वर्गाच्या दाराखालून वाहत असतो
रक्ताचा एक ओघळ

कारण आता सुरू झालेलं असतं शिरकाण,
कापाकापी निष्पापांची.

खरं पाहिलं तर एखादं मूल जगण्यातून शिकत असतं. जगताना जग त्याला सामोरं येतं. साक्षात. आणि तेच त्याला स्वतःबद्दल सांगतं, समजून देतं, शिकवतं. झाड असं त्याच्यासमोर येतं, आणि पोरगंही झाडाला आत्मसात करतं, आकळून घेतं, आपलंसं बनवून टाकतं. त्या झाडाचं निखळ कौमार्यावस्थेतलं झाडपण पोराला थेट कळूनच जातं. झाडाचं सत्यच समजून जातं.

आता हा जो सत्याचा साक्षात्कार होतो तो नेहमीच पुरेसा असतो असं नाही. तो गोंधळात टाकणारा किंवा वरवरचा, अपुरादेखील असू शकतो. शिक्षणाचं काम इथं असतं. अशा ठिकाणी मध्यस्थी करण्याचं असतं. जगण्याचा व जगाचा अर्थ निष्पापपणानं, साक्षातपणानं, ताजेपणानं जाणून घेण्याची क्रिया मुलांची, माणसांची चालूच असते. ती जास्त समर्थ व परिणामकारक बनवण्याचं काम शिक्षणाचं असतं. समोर दिसतंय त्याच्या मागे, पुढे, आजूबाजूला, आणि आतमध्ये खोलात जाऊन काय आहे ते पाहण्याच्या क्षमता मुलाला देण्याचं. देखाव्यांना न भुलण्याचा सावधपणा त्याला देण्याचं. त्याला सत्याचं आकलन जास्त चांगल्याप्रकारे करता यावं याकरता. झाडाची सगळी उपलब्ध माहिती व ज्ञान शिक्षणातून त्याला मिळायला हवी. पण खुद्द झाड काय म्हणतंय ते ऐकण्याची, झाडाला उराउरी भेटण्याची पोराची क्षमताही वाढायला हवी. कारण सारखं नवं नवं काय काय म्हणत असतं.

आकाशातून एखादा थेंब पडतो. तो नेहमीच असं नाही सांगत की मी पावसाच्या पाण्याचा थेंब आहे. कधी कधी थेंब असतो एक अश्रू. कोणाच्या डोळ्यातून तो ओघळलाय? कोण कसलं दुःख करतंय? आणि तो अश्रू काळा का आहे? या सगळ्या प्रश्नांनी भांबावून गेलेलं तुमचं मन हे कोडं सोडवायच्या मागे लागायच्या आतच थेंब म्हणतो, मी एक पक्षी आहे! शक्य आहे. पक्षी आकाशात असतो, काळाही असतो. पण पक्षी पंख पसरून तरंगत असतो, भरारत असतो, विहरत असतो. तो असा सरळ खाली कसा पडतोय?

ते पोरगं या सगळ्या भानगडीनं सुद्धा अजिबात डगमगत नाही. कारण त्याच्याकडे जादू आहे. कल्पकता आहे. स्वप्न पाहण्याची शक्ती आहे. आणि स्वप्नात तर काहीही घडू शकत! अश्रू पक्षी असतो किंवा फूल किंवा चांदणी. तो आकाशात असेल किंवा माझ्या डोळ्यातही असेल. स्वप्नात काय वाट्टेल ते चालतं. स्वप्न पाहण्यातून, जादूई नगरी उभारण्यातून, कल्पनेनं हवं ते नवं निर्माण करण्याद्वारा, समोर असलेल्या जगाला माणूस एका वेगळ्याच विलक्षण तऱ्हेनं आकळून घेत असतो. आपलंसं बनवत असतो. आटोक्यात आणत असतो. आणि या निर्मितीमध्येच स्वतःमध्ये लपलेलं अथांग भावविश्वदेखील उलगडून ठेवत असतो.

लहान मुलांमध्ये आणि माणसांमध्येही अशी गोष्टींना विलक्षण तऱ्हेनं भारून जाण्याची शक्ती असते. मोकळ्या, उत्सुक व मुक्त मनानं अशी कलात्मक निर्मिती करण्याची, इतरांनी केलेल्या अशा निर्मितीमध्ये रंगून जाण्याची त्यांची क्षमता वाढवणं हे शिक्षणाचं काम असतं. कविता घोकून पाठ करण्यासाठी नसते, चित्र कॉपी करण्यासाठी नसतं, गाणं बक्षीस मिळवण्यासाठी नसतं. जादूच्या नगरीत शुभ्र पांढऱ्या घोड्यावरून, फुलांची गाणी ऐकत, स्वतःच्या मस्तीत उडत जाण्याची शक्ती तुमच्यात यावी यासाठी हे सगळं असतं. तुम्हाला कुणाच्या काळ्या अश्रूंना आणी त्यांच्या मागे असलेल्या दुःखाच्या गुंतागुंतीच्या स्ट्रक्चरला आपलंसं करता यावं म्हणून असतं.

शिक्षण यासाठीसुद्धा लागतं की माणसाला इतर माणसाशी जास्त चांगली नाती जोडता यावी. रुपेरी जाळ्याच्या हलत्या नाजूक धाग्यांसारखी संबंधांनी माणसं जोडली जावी. हवं तर त्याला प्रेम म्हणा, दुसरं काही म्हणा. नेमकं त्याला नाव देणं अवघडच. पण प्रेमासारखं काहीतरी स्वभावतःच त्या पोराला दुसऱ्याबद्दल वाटतं. सुंदर नक्षीकामासारख्या जाळ्यात वावरावंसं वाटतं. त्याला शब्दांच्या प्रचंड भडिमारानं गारद कशाला करायचं? नात्यांना महान मातृत्व किंवा स्वर्गीय प्रेम असली नावं देण्यापेक्षा, ती पाठ करायला लावण्यापेक्षा, त्याला हे प्रेमासारखं काहीतरी प्रत्यक्षात अनुभवाला येतं. थेट समजतं. या प्रेममय माणूसपणाचा विकात घडून येण्यासाठी शिक्षण हवं.

तर असा कोवळा, जिवंत, रसरसलेला आणि जगाशी समर्थपणे सर्वांगानी भिडणारा माणूस शिक्षणातून निर्माण व्हायला हवा. ज्याच्यामध्ये सत्य शोधण्याची वैज्ञानिक दृष्टी, कला निर्माण करण्याची सर्जनशीलता, प्रेमस्वरूप नाती जोडण्याची क्षमता, एकसंधपणे नांदतात असा माणूसच खऱ्या अर्थानं माणूस असतो. सुशिक्षित.

शिक्षणाद्वारे माणसाला काहीएक माहिती, ज्ञान, कौशल्य मिळावं, समाजोपयोगी काहीतरी क्षमता लाभावी, त्यानं तिचा वापर करून समाजाला काहीतरी द्यावं, आणि त्या बदल्यात स्वतःचं जीवन फुलवण्यासाठी त्याला काहीतरी मिळावं. यात गैर काहीच नाही. हे आवश्यक आहे. पण जर या सगळ्याची व्यवस्था अशी असेल की शिकताना व नंतर जगताना माणूस स्वतःमधल्या या मूळ मानवी क्षमताच गमावून बसत असेल तर काय उपयोग.

सध्याचा सगळा शिक्षण व्यवहार म्हणजे असा एक भला मोठा उद्योग खाला आहे. धंदा. वर्गात मुलं का असतात? शिक्षणातून चांगले मार्क्स पाडून चांगली नोकरी मिळते, म्हणजे पैसा मिळतोम म्हणून. शिक्षक शिकवतात पगार मिळतो म्हणून. म्हणून वर्ग भरतात, शाळा चालते, कॉलेजं व विद्यापीठं चालतात. ही व्यवस्था पैशांनी अशी बांधलेली आणि तारलेली असल्यानं तोच तिचा आधार आणि उद्दिष्टही बनला आहे. फक्त पैसा नाही. पैसा व त्या अनुषंगानं येणारी प्रतिष्ठा, सत्ता, मानसन्मान. बड्या बड्या लोकांना उपकुलगुरू, संचालक, शिक्षणमहर्षी, गेला बाजार विद्वान प्राध्यापक म्हणून मिरवता येतं. देशाच्या विकासाला चालना दिल्याबद्दल पद्मश्री वगैरे मिळते, सत्कार पुरस्कार लाभतात. आणि विकास आपल्या सगळ्यांना प्रिय असतोच! सध्यातर खाजगीकरण व जागतिकीकरण यांचा जबरदस्त रेटा आहे. केवळ देशच नव्हे तर मीसुद्धा महासत्ता बनायला हवं अशी ईर्षा, किलर इनस्टिंक्ट, यांच्यावर भर आहे. शिक्षण हा या इंधनावर चालणारा व्यवहार बनतो आहे, जास्तच बनणार आहे. अधिक मोठा. जास्त अमानुष.

मात्र इतर उद्योगांपेक्षा शिक्षणाचा दुसराही एक उपयोग असू शकतो, करून घेतला जात असतो. शिक्षणाच्या आधी वर्णन केलेल्या खऱ्या उद्देशाच्या नेमका उलट हा उद्देश असतो. तो म्हणजे निष्पाप, कोवळ्या मनांची कत्तल. सत्याचा शोध घेण्याची, कल्पनेनं अचाट नव्या जगाची रंगचित्र काढण्याची, मैत्री व प्रेम करण्याची, अशी सगळी माणसाची शक्ती मारून काढण्याचं दुष्ट कामही शिक्षणातून होऊ शकतं, केलं जात असतं. कारण आजच्या जगात सूत्रधारांना माणसाविषयीच मुळात दुस्वास असतो. फार अविश्वास असतो. त्यामुळे त्यांना इंजिनियर हवा असतो, इंजिनियरिंग येणारा माणूस नको असतो. काटछाट करून, तासून घडवलेले, भांडवलशाहि समाजयंत्राचे पार्ट्स त्यांना हवे असतात. मानवी समाजात राहणारी व काम करणारी माणसं त्यांना नको असतात. आणि या करता तुमच्या स्वतःहून विचार करण्याच्या, नवनिर्मितीच्या, प्रेम करण्याच्या शक्तींचं खच्चीकरण करावं लागतं. पण एवढंच नाही तर तुमच्या मनोविश्वाची खांडोळी करावी लागते. तुकडे करावे लागतात. तुमची वैज्ञानिकता, कलात्मकता व प्रेममयता एकमेकांपासून तोडून अलग करावी लागतात. वस्तुतः विज्ञानाच्या व्यवहारात नवनिर्मितीसाठी मुक्त कल्पकता लागते, माणुसकीचे अस्तर लागते. कलेला तर माणूसपणाची उपस्थिती लागतेच व वास्तवतेचे कठोर भानही असावे लागते. आणि ज्ञानविज्ञान आणि सुसंस्कृत सुंदरता यांच्यामुळे भाबड्या व तोकड्या प्रेमभावनेला उंची व समृद्धी प्राप्त होते. नपेक्षा माणूस आधाअधुरा, रिता व तुकडेबंद बनतो. यांत्रिक बनतो. क्रूर बनू शकतो. किंवा दुबळा बनू शकतो.

सध्याचं शिकवणं आणखी एका तऱ्हेनं माणसाला शतखंड करून टाकतंय. येत्या काळात तर असं जास्तच होण्याची भीती आहे. जगातल्या सर्व माणसांबद्दल मित्रता बाळगणाऱ्या एकसंध माणुसकीची खांडोळी केली जातायत. जात, धर्म, राष्ट्र, यांच्यात माणूस वाटून टाकला जातोय. मानवमित्र असणं किंवा कोणाचाही द्वेष न करणं हे भाबडेपणाचं व बावळटपणाचं समजलं जातंय. यासाठी इतिहासातल्या महापुरुषांचे साफ गैरलागू दाखले काढून आत्मसन्मान, शौर्य व पराक्रमाच्या बेगडी गोष्टी केल्या जातायत. आजच्या शिक्षणामध्ये हे होत आहे. उद्याच्या शिक्षणात जास्त होण्याचा धोका आहे.

मुलांच्या डोक्यांची रिकामी खोकी बनवून त्यांत भरला जाणार आहे माणसां-माणसांमधल्या द्वेषावर आधारलेल्या एका बंदिस्त विचारसरणीच्या विषानं संपृक्त कापूस. पैशाच्या आसुरी आसक्तीनं भरलेला. भुसभुशीत व कधीही पेट घेणारा. कारण त्यायोगे सत्ता व मत्ता मिळवता येते. शिक्षणाचा उपयोग यासाठी व्हायला हवा. मग वर्गाच्या दाराखालून रक्ताचे ओघळ पसरत गेले म्हणून काय झालं.

पण हे कायम असंच चालत राहणार आहे. कारण रोज वर्गाच्या दारातून झाड आत येतं आणि म्हणतं, मी झाड आहे. अश्रूचा थेंब खाली उतरतो आणि म्हणतो, मी पक्षी आहे. आणि माणुसकीच्या धाग्यांनी रुपेरी जाळं विणलं जात असतं.

---

नोंद - लेखातली पुरुषप्रधान भाषा मूळ लेखानुसार.

field_vote: 
0
No votes yet

विचारवंत आणि लेखक सुधीर बेडेकर यांचे नुकतेच निधन झाले

सुधीर बेडेकरांची काही पुस्तकं आहेत का? ॲमेझॉन आणि बुकगंगावर सापडली नाहीत.

म्हणजे ते विचारवंत/लेखक असतील तर त्यांचं संचित काय आहे?
मी आणखी काही ठिकाणीही त्यांच्याविषयी लेख वाचले, पण त्यात वैयक्तिक आठवणी ("सुधीर म्हणजे लाख माणूस" टाईप) होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे ते विचारवंत/लेखक असतील तर त्यांचं संचित काय आहे?

त्यांची पुस्तके ॲमेझॉन आणि/किंवा बुकगंगावर सापडतात/सापडत नाहीत, हा ते विचारवंत असण्या/नसण्याचा निकष असू नये.

किंबहुना, असा काही निकष बनवायचाच झाला, तर ("उस के दुश्मन हैं बहुत, आदमी अच्छा होगा"च्या चालीवर) मी तर म्हणेन, की ज्या अर्थी त्यांची पुस्तके ॲमेझॉन/बुकगंगावर नाहीत, त्याअर्थी मनुष्य मोठा विचारवंत असला पाहिजे!

मी आणखी काही ठिकाणीही त्यांच्याविषयी लेख वाचले, पण त्यात वैयक्तिक आठवणी ("सुधीर म्हणजे लाख माणूस" टाईप) होतं.

हे होणे साहजिक आहे. अर्थात, तिऱ्हाइताचे यातून काहीही ज्ञानवर्धन होत नाही, याविषयी सहमत.

==========

फॉर्दॅट्मॅटर, माझीही पुस्तके तुम्हाला ॲमेझॉन/बुकगंगावर सापडणार नाहीत.१अ, १ब

१अ मी आजवर कधीही पुस्तके लिहिली नाहीत, हा यामागील केवळ एक भाग झाला. The point being, that alone should not stop me from being a विचारवंत (whatever that may be).

१ब "So I haven't written in a very long time. Neither has Shakespeare." (एका पिच्चर-पोष्टकार्डावरून उद्धृत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बुकगंगा/ॲमेझॉनवर थोडा जास्तच विश्वास टाकला ही चूक मान्य आहे!

"लेखक आणि विचारवंत" अशी पहिल्याच वाक्यात ओळख असलेल्या व्यक्तीचं पुस्तक असावं अशी अपेक्षा रास्त नाही का?
उ.दा .त्यांच्या पत्नी चित्रा बेडेकर (विकी - धन्यवाद!) ह्यांची बरीच पुस्तकं मला सापडली. चित्रा बेडेकर ह्यांची ओळख "या एक मराठी लेखिका होत्या. वैज्ञानिक, सामाजिक, राजकीय विषयांवर त्यांनी लिखाण केले." अशी करून दिली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"लेखक आणि विचारवंत" अशी पहिल्याच वाक्यात ओळख असलेल्या व्यक्तीचं पुस्तक असावं अशी अपेक्षा रास्त नाही का?

"लेखक" अशी ओळख असलेल्या व्यक्तीचे पुस्तक असावे, अशी धारणा प्रथमदर्शनी होऊ शकते. "विचारवंत" असलेल्या व्यक्तीचे पुस्तक असलेच पाहिजे, ही अपेक्षा काय म्हणून, ते समजत नाही.

(अधिक खोलात शिरून विचार केला असता, "लेखक" अशी ओळख असलेल्या एखाद्याचेसुद्धा पुस्तक असलेच पाहिजे, हेदेखील पटत नाही. सदर व्यक्ती वर्तमानपत्रांतून, मासिकांतून (अगदीच काही नाही, तर गेला बाजार "वाचकांच्या पत्रां"तून) लिहू शकत नाही काय? (तसेच पाहिले, तर आपण सर्वच (माफक प्रमाणात का होईना, परंतु) 'लेखक'च नव्हेत काय? भले आपले लेखन हे प्रतिसाद आणि/किंवा खरडफळ्यावरील खरडी, किंवा अगदीच गंगेत घोडे न्हायले, तर वैयक्तिक ब्लॉग, या परिघाबाहेर फारसे चमकत नसले, तरीही?)

उ.दा .त्यांच्या पत्नी चित्रा बेडेकर (विकी - धन्यवाद!) ह्यांची बरीच पुस्तकं मला सापडली.

कोणास ठाऊक, मिष्टर बेडेकर हे प्रसिद्धीपराङ्मुख असतील, मिसेस बेडेकरांना तसले काही ह्यांगप्स नसतील, वगैरे वगैरे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुधीर बेडेकरांची काही पुस्तकं आहेत का?

‘कला, विज्ञान आणि क्रांती’ आणि ‘हजार हातांचा ऑक्टोपस’ ही त्यांची पुस्तकं. तसंच ‘मागोवा’ आणि ‘तात्पर्य’ ही नियतकालिकं ते संपादित करत. त्यांतही आणि इतर नियतकालिकांतही त्यांनी वेळोवेळी लिहिलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मिरोस्लाव होलब नावाचा झेकोस्लोव्हाकिया देशातला एक झक्क कवी आहे. ... शिक्षणावरच्या या त्याच्या कवितेचं नाव आहे 'शाळा'. तिच्यामध्ये तेराव्या ओळीत थोडासा बदल करून घेऊन तिचा अनुवाद असा आहे -

बदल जर केवळ तेराव्या ओळीत केलेला असेल, तर...

एक झाड दारातून प्रवेश करतं,
वाकून नमस्कार करत म्हणतं,
मी झाड आहे.

(पहिल्याच तीन ओळींतून उद्धृत.)

झे(चे?)कोस्लोवाकियातील झाडेसुद्धा आपल्यासारखाच वाकून वगैरे नमस्कार वगैरे करीत असत, हे वाचून सद्गदित वगैरे झालो. ('मेरा भारत महान'!) चालायचेच.

बाकी, झाडाने "मी झाड आहे" म्हणून सांगणे... Isn't that stating the obvious?

आणि, कविता hallucinationsनी भरलेली दिसते. झाड दारातून प्रवेश करून वाकून नमस्कार करून "मी झाड आहे" म्हणते काय, अश्रूचा काळा थेंब "मी पक्षी आहे" म्हणतो काय (इथे double hallucination? बोले तो, अश्रूला आपण पक्षी आहोत असा भास होतो असा कवीला भास होतो?), कोळ्याच्या जाळ्यावरून कशासारखे तरी दिसणारे काहीतरी जवळ येऊन असेच आणखी काहीतरी म्हणते काय, नि काय नि काय!

कवी कविता पाडण्याअगोदर ज्या कशाचे सेवन करीत होता, ते द्रव्य मलासुद्धा पाहिजे!

तेव्हा वर्गाच्या दाराखालून वाहत असतो
रक्ताचा एक ओघळ

कारण आता सुरू झालेलं असतं शिरकाण,
कापाकापी निष्पापांची.

वर्गवादाच्या विरोधात अनिवार्यरीत्या होणाऱ्या रक्तपाताचे हे द्योतक आणि/किंवा कबुली समजावी काय? (बाकी, शिरकाणात ज्यांची कापाकापी होते, ते खरोखर निष्पाप असतात, हे एका साम्यवादी देशातील कवीने उघडउघडपणे मांडणे हे निव्वळ अपूर्व आहे. कवीची रवानगी (व्हाया मॉस्को) सैबेरियाप्रत झाली नाही काय?)

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0