“द नंबर यू हॅव डायल्ड डझ नॉट एक्सिस्ट.”

मी स्वतःला हातगाडी सारखं ढकलत ढकलत घरी चाललो होतो. ऑफिसला जाताना ढकलगाडी परत येताना पण ढकलगाडी. ऑफिसात कुठे ठेवणार नाही का?
ढकल ढकल एकदा फिरून रे....
शेजारून एक लांब लचक गाडी अगदी खेटून गेली. थोडा धक्का लागला असता म्हणजे? जो पाहावा तो माझ्या जीवावर उठलेला.सुखाने जगू देखील देत नाहीत, हे गाडीवाले.
कर्र कच्च त्याच गाडीवाल्याने अर्जंट ब्रेक लावले होते. गाडीतून झ्याक प्याक सूटवाला उतरला माझ्याकडे पळत येत होता. आता हा काय मला फायर करणार काय? माझी काहीही चूक नव्हती. मी थोडाच ऐकून घेणार होतो?
सूटवाल्याने येऊन मला मिठीच मारली की हो. कुठल्या तरी उग्र डीओचा घमघमाट दरवळला,
“अरे ओ इंग्लिश मास्टर, ओळखल नाय मला तू?”
“तुला ओळखलं नाही असं कसं होईल.” मी स्मरणशक्तीला ताण देऊन ओळखण्याचा प्रयत्न करत म्हणालो.
“ह्या शांतारामला नओळखणारा शक्स ह्या शहरात कोणी नाही.” शांताराम काय. हो आत्ता ओळख पटली. शांताराम मानकापे.
“मिस्टर मानकापे, किती दिवसांनी आपण भेटलात.”
“केकू, अस पाहुण्यासारखे केव्हापासून बोलायला लागलास?” शांताराम मानकापेने माझा हात धरून त्याच्या गाडीकडे खेचत नेले.
“नानू, आपल्या नेहमीच्या जागी घे.” म्हणजे त्याच्या ड्रायव्हरचे नाव नानू होते एकूण.
नानूने लवून येससर केलं.
गाडी भरधाव कुठल्यातरी हॉटेलकडे निघाली.
ते फाईव स्टार हॉटेल होते एवढी समज मला होती. पण तेथल्या चकचकाट्याचे वर्णन करणे माझ्याचाने होणे नाही. मुळात कुठल्या गोष्टीला काय म्हणतात हेच मला माहित नाही.
“बोल केकू, काय घेणार? व्हीस्की मागवू?”
“नको नको, मी चहा घेईन फक्त, घरी जायला उशीर होईल.” मी आक्रस्तून बोललो. खरं म्हणजे घरी वाट बघणारं कुत्रं पण नव्हते.
“केशव, घरी फोन कर. सांग सकाळी परत येईन.”
“अस कस. बिचारी काळजी करत रात्रभर जागरण करत बसेल.”
“आयला काय लकी आहेस तू. माझी बायको..... जाऊ दे. म्हणजे माझी सेकंड वाईफ. बरका. मास्टर तो कोण बोलला रे, “स्त्री जात तेव्हढी नमक हराम!” खरं बोल्ला बघ तो. माझी पैली बायको शिंपली ग्रेट! पण तिनं काय म्हणतात ते सुसाईड केली बघ. का? मला थांग लावू दिला नाही. मास्टर आपल्याला बाई कधी समजली नाही अन समजणार पण नाही. जो खायेगा उसका भी भला, नही खायेगा उसका भी भला. ऐसा झमेला है.”
मला त्याच्या बायका आणि त्याची बायकांबद्दलची मते ऐकायची नव्हती.
“शांत्या, मी घरी फोन लावतो.”
थोडा बाजूला जाऊन मी माझ्या नसलेल्या बायकोला फोन केला.
परत येऊन शांत्याच्या समोर बसलो.
“तर बोल, काय आपले दिवस होते. शाळेतले. आठवतात ते दिवस? तू, मी, दगडोजी झांगोजी पवार वडारवाडीवाला, बेंजामिन फ्रेडरिक पंडित, हणम्या आणि मंग्या किरणानंद! काय करतात रे हे सगळे. तू म्हणजे इंग्लीशचा मास्टर! दगडोजी म्युनसिपालटीचा मोठा ठेकेदार झाला आहे. भेटतो अधून मधून. बेन्जामिन कुठे गायब झाला काय माहित. हणम्या दोनदा तिनदा सासुरवाडीला जाऊन आला. खुनाच्या केस मधून मीच त्याला सोडवला. नाहीतर गेला होता बाराच्या भावात. शाळेतच तो रामपुरी घेऊन यायचा. आता माझ्याकडेच ‘काम’ करतो. ते सोड आमच्या रडकथा कशाला तुला ऐकवतो आहे. तुझे कसे चालले आहे? इंग्लीश मध्ये काही लिहिलस कि नाही. कोण रे तो? तू सारख नाव घ्यायसास? चार्ल्स कोण?”
शाळेत मला चार्ल्स डिकन्सची खूप मोहिनी पडली होती. वाटायचे कधीतरी आपणही अस लिहू. मी चार्ल्स डिकन्सला केव्हाच विसरलो होतो. पण शांत्याच्या लक्षात सगळे होते. जखम पुन्हा उघडी पडली. पण आता त्यातून रक्त वहात नव्हते. दुखतही नव्हते. न भरून येणारी जखम होती ती.
“इकडे “अबोली” म्हणून इंटरनेटवर जागा आहे. तिकडे मी स्टोऱ्या टाकतो.(लिहितो अस म्हणायचे होते. पण टाकतो हाच करेक्ट शब्द. पाट्या टाकतो शी फिट जुळतो.)”
“काय बोलतोस काय? मी देखील तिकडे असतो.”
मला ४४० चा झटका बसावा तसे वाटले.
“केकू कुणाला सांगू नकोस हा. मी नाही रे. मी एक माणूस ठेवला आहे. तो नेट वरून, व्हाट्सप वरून माल गोळा करतो आणि इकडे ओततो. चार पाच जण कोरस धरायला ठेवले आहेत. ते बरे वाईट प्रतिसाद देतात. मग इतरेजण त्यात जंप घेतात. मग दे धमाल! अस माझ्या मॅनेजरने मला सांगितले हा. मी तिकडे फिरकत सुद्धा नाही. केकू कराव लागत. त्याच्या जोरावर तर मी टाऊन प्लॅनिंग कमिटीचा माननीय सभासद झालो आहे.” एव्हढे बोलून तो गडगडाटी हसला.
केकू करावं लागत. होय शांत्या, आय बिलिव यू. प्रॉब्लेम काय आहे न की कळतं पण वळत नाही.
एकूण शांताराम मानकामे म्हणजे बड प्रस्थ दिसतय.
“मंग्या काय करतो ते सांग. काही शोध वगेरे लावला आहे कि नाही? नोबल का काय ते प्राईझ केव्हा मिळणार आहे? कुठे जॅक लावायचं असेल तर सांग. तुम्ही शोध लावा. किताब लिवा. जॅक लावायचं, पैसा ओतायचे हे काम आपले. होऊ दे खर्चा. दोस्तोके लिये कुछ भी.”
मंगेश रामचंद्र नाईक म्हणजे जिनियस मुलगा. मास्तर गणिताचे कूटप्रश्न विचारायचे त्यांचे वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच त्याचे उत्तर तयार! त्याला केम्ब्रिजला जायचं होत. रॅंगलर व्हायचं होत. पण झाल काय? तो नक्षलवादी झाला. जंगलात आदिवासींबरोबर लढ्यात उतरला. मुठभेडमध्ये मारला गेला. ह्यालाच आयुष्य म्हणायचे का!
मी मंग्याची कहाणी सांगत होतो आणि शांत्या ऐकत होता. मंग्याचे गणित अन त्याचे उत्तर. बरोबर का चूक?
आपल्याला हे गणित पडले असते तर आपण कसे सोडवले असते? काय उत्तर काढले असते? ज्याचे त्याचे गणित आणि ज्याचे त्याचे उत्तर!
एक लांब उसासा सोडून तो एव्हढेच म्हणाला, “नशिबाचे खेळ. दुसर काय म्हणायचे?”
थोडा वेळ वातावरण गढूळ झाले. तोंडाची चव गेली. आम्ही दोघेही थोडा वेळ गप्प. जणू मंग्याला श्रद्धांजली,
पाच मिनिटानंतर पुन्हा बातचीत सुरु.
“केकू, तुला आठवतं, तू आणि मंग्या हस्तलिखित चालवत होता. आपले मराठीचे मास्तर नखाते सर जुन्या काळच्या स्वस्ताईच्या फोका मारत होते. काय तर लोणी आळीत तुपाचे नुसते नमुने गोळा करत गेलो तर पाव किलो तूप व्हायचं, मग तुम्ही लोकांनी काय लिहिलं होतं की ते तूप चापून नखात्या इतका फुगला.”
“ते कसंं काय कुणास ठाऊक सरांपर्यंत पोहोचलंंं. अस झापलं आम्हा दोघांना. माझी तर टलीफा होती. नखात्या
आमाला काय म्हणतो की तुमी ह्या चौघांची संगत सोडा.”
“शांत्या, तू काय करतोस? तुझ्यासारखा माणूस राजकारणातच जायला पाहिजे.”
“मी काय धंदे करतो ते तुला सांगण्यासारखे नाही आणि सांगितले तरी तुझ्यासारख्याने ऐकण्यासारखे नाही, आणि पोलिटिक्स बद्दल बोलायचे तर निवडणूक आली की आमदार खासदार येऊन पाय धरतात. पैशाशिवाय निवडणूक? नो चान्स.”
शांत्या, अगेन आय बिलिव यू.
“गाडी बिडी ठेवली आहेस कि नाही?”
इकडे ‘गाडी’ हे समूहवाचक नाम आहे. गाडी म्हणजे कार, मोटार सायकल, स्कूटर, सायकल काहीही.
“आहे स्कूटर आहे.”
“मग आज काढली नाहीस?”
“परवडायला पाहिजे ना.”
“ही माझी कार्डे आहेत. कधी पोलिसांच्या भानगडीत, अरे म्हणजे सिग्नल तोडलास तर आणि मामानं पकडलं तर हे कार्ड दाखवायचं. सगळं पोलीस डिपार्टमेंट आपल्या बंगल्यावर लेफ्ट राईट करत येतं, ही माझी इन्शुरन्स स्कीम आहे.थोडासा हप्ता भरायचा. मग खुशाल सिग्नल तोड किंवा WT प्रवास कर. पकडला गेलास तर हे माझे कार्ड दाखवायचे. नो फाईन. ”
मी कार्ड भक्तिभावाने आदराने कपाळाला लावले आणि खिशात टाकले.
“चला, शांत्या बराच उशीर झाला आहे. हलायला पाहिजे मला.”
“अरे थांब रे. जाशील की. एव्हढी काय घाई आहे. किती दिवसांनी भेटतो आहेस. मला तरी तझ्या शिवाय कोण आहे रे. तुझी आणि मंग्याची कॉपी करून परिक्षा दिल्या आणि इथवर पोचलो. माझे वैभव हे तुमच्यामुळे.”
मला मनातून बरं वाटलं. आता चार चौघात मन ताठ करून सांगता येईल. शांताराम मानकापे साहेब माझे दोस्त आहेत!
त्याचा निरोप घेताना वाईट वाटलं. पण जाणं जरुरी होतं.
वार्डात परत आलो तर नर्सबाई नेहमीप्रमाणं सगळयांच्यावर डाफरत होती.
“चला चला. आपले सामान जागच्या जागी ठेवा. कपड्यांच्या चादरीच्या घड्या करा. मोठ्या साहेबचा फेरा आहे. शर्टाची बटणं लावा. सखू मावशी त्याच्या पायजम्याची नाडी नीट बांध. धम्या, लाळ गळती आहे बघ. तोंड पूस आधी. मावशी त्या परशाला पॉट दे. डॉक्टर यायच्या अदुगर सगळे विधी उरकून घ्या.”
अशी धमाल लगबग चालली होती. खुळ्यांचाच वार्ड तो.
सगळ्यांची विचारपूस करत करत डॉक्टर माझ्या कॉटपाशी आले.
“हा केकू, आज कोणाशी गप्पा मारत होता. काल कोण बर? सचिन तेंडूलकर आला होता भेटायला. आपल्या संघात रहाणेला घ्यावे का हनुमा विहारीला घ्यावे असा तुमचा वाद झाला. आता आज कोण भेटला?”
डॉक्टर अशी माझी रोज टिंगल करतात. मी सांगतो त्यावर विश्वास ठेवत नाहीत. पण आज माझ्याकडे सज्जड पुरावा आहे.
“आज माझ्या शाळेतला मित्र भेटला. शहरातला मोठा माणूस झाला आहे तो. आम्ही शाळेतल्या आठवणींना उजाळा दिला. ही पहा त्याची बिझिनेस कार्ड. पाहिजे तर तुम्ही एक ठेवा. कामाला येईल.” मी विजयी मुद्रेने डॉक्टरांकडं बघितलं. “आता बोला.”
डॉक्टरांनी कार्ड निरखून बघितले. खिशातून मोबाईल काढला. कार्डावरचा नंबर डायल केला. अर्ध्या मिनिटांनी मोबाईल माझ्या कानाशी धरला.
“द नंबर यू हॅव डायल्ड डझ नॉट एक्सिस्ट.”

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सुरुवात मला आवडली, पण पुढे नाही तेवढी मजा आली. (म्हणून नक्की काय बदललं तर मला आवडेल असा विचार केला तर तेही नाही सुचत.)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.