व्यवहारज्ञान

आज जेन आत्याचा गोष्टी सांगण्याचा उत्साह  दिसत होता.
तिच्या असंख्य भाचे, पुतण्यांपैकी रेमंड हा तिचा सर्वात लाडका होता. का ते तसं सांगता येणार नाही. पण बहुदा दोघांचा आवडीचा विषय समान असल्यामुळे असेल... मनुष्यस्वभाव, सवयी आणि वर्तणूक हा मिस जेन मार्पलचा आवडीचा विषय. म्हणजे त्यात तिने कुठली पदवी संपादन केलेली नव्हती, परंतु जीवनाच्या विशाल शाळेमध्येच, ती सारे काही प्रत्यक्ष अनुभवातून शिकली होती. आणि रेमंड हा एक लेखक होता. मिस जेन मार्पल च्या मते त्याचे कथाविषय असलेली माणसे काहीशी वेगळीच असत, म्हणजे तिच्या जुन्या पुराण्या व्हिक्टोरियन जगामध्ये सामावली न जाणारी अशी. पण तरीही तो एक यशस्वी लेखक होता. आणि त्या बद्दल जेन आत्याला सार्थ अभिमान होता. रेमंड ला त्याच्या या वृद्ध, अविवाहित आत्याबद्दल विलक्षण आदर आणि आपुलकी होती. सेंट मेरीमीड या लहानशा गावा बाहेरील जगात फारशी न वावरता देखिल तिच्याकडे असणारी समज आणि तर्कशुद्ध विचार पद्धती त्याला चकित करीत असे. 

तर असा हा रेमंड. त्याचा मित्र जोन याच्यासह मिस मार्पलच्या घरी काही दिवसासाठी आला होता. जोन हा एक कलाकार होता. चित्रकार होता तो. विविध प्रकारच्या माणसांची तो चित्रे रेखाटीत असे. अर्थात ती चित्रे मिस मार्पलच्या मते .. अं ..म्हणजे काहीशी वेगळीच असत. असणारच ना? तो थोडाच व्हिक्टोरियन युगातील चित्रकार होता? जेन आत्याने दोघांचे मोठ्या आपुलकीने स्वागत केले. एरवीचे तिचे निरस आणि एकाकी आयुष्य काही दिवसांसाठी का होईना, उत्साहाने हसू लागले होते.
 
"रेमंड, तुला माझे स्नेही श्री. पथेरिक आठवतात का रे?"

रात्रीच्या  भोजनानंतर तिघेजण तिच्या छोटेखानी आणि आरामदायक अशा बैठकीच्या खोलीत कॉफीचा आस्वाद घेत असताना जेन ने विचारले. 

"फारच सज्जन आणि प्रामाणिक माणूस. माझे  सर्व कायदेशीर आणि आर्थिक व्यवहार तेच सांभाळत असत. ते असे पर्यंत मला त्या बाबत कधीच चिंता करावी लागली नाही, परंतु दुर्दैवाने दोन वर्षापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. आता त्यांचा मुलगा माझे सारे व्यवहार बघतो. तो देखील त्याच्या वडिलांप्रमाणेच बुद्धिमान आणि प्रामाणिक आहे. परंतु का कोण जाणे?  सिनियर पथेरिक असताना मी जितकी निः शंकपणे त्यांच्याकडे सारे व्यवहार सोपवित असे, तसा विश्वास मला नाही वाटत..." 
बोलता बोलता सुस्कारा सोडत जेन काही क्षण शांत राहिली. कदाचित तिच्या मृत स्नेह्याची तिला आठवण येत असावी. रेमंड आणि जोन देखिल काही न बोलता कॉफीचे घोट घेत राहिले. 

जेन मार्पल चे एक वैशिष्ट्य होते. तिच्या बोलण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे इत्थंभूत वर्णन ती ऐकवीत असे. त्याचे दिसणे, सवयी, आवडी-निवडी आणि मग त्या व्यक्ती संदर्भातील तिचे निरीक्षण.. जे सहसा अचूक असे, हे सर्व ती सांगत  असे, आणि  रेमंडला त्याची सवय होती.
 
रेमंडला अर्थातच श्रीयुत पथेरिक आठवत नव्हते. पण तो गप्प बसून राहिला. 

"एक दिवस मी जेवणघरातील टेबल जवळ काही लिहीत बसले होते. वसंतऋतुच्या काळात घरामध्ये दोन दोन फायरप्लेस जळत ठेवणे म्हणजे त्याचा दुरूपयोग आहे असे मला वाटते. म्हणून बैठकीच्या खोली ऐवजी मी जेवणघराला  पसंती दिली होती.  इतक्यात ग्वेन माझ्याकडे व्हिजिटिंग कार्ड घेऊन आली. ग्वेन तरी आठवते ना तुला रेमंड?"  मिस मार्पलने बोलता बोलता अचानक प्रश्न केला. 

"नाही, मला नाही आठवत."  रेमंड ने उत्तर दिले. 
 
जेन च्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले. 

"नाही? अरे ती माझी मेड नाही का? लाल, कुरळ्या केसांची..? " जेन ने माहिती पुरवली.

पण रेमंडने परत नकारार्थी मान डोलवली. 

"... तर बरं का, ग्वेन ने श्री. पथेरिक चे कार्ड मला दिले. रात्रीचे जवळ जवळ नऊ वाजत आले होते. मला आश्चर्यच वाटले. मी माझ्या खुर्चीवरून उठून बैठकीच्या खोलीकडे निघाले. जाता जाता ग्वेन ला चेरी ब्रँडी आणि ग्लासेस आणायची सूचना दिली. सोफ्यावर पथेरिक एका अनोळखी व्यक्ती बरोबर बसले होते. मी तिथे जाताच त्याने माझी  त्या अनोळखी व्यक्तीबरोबर ओळख करून दिली. त्याचे नाव श्रीयुत ऱ्होडस. तो तसा तरूणच वाटत होता, चाळीशी ओलांडून दोन तीन वर्षे झाली असावी. पण सध्या फारच तणावग्रस्त असावा, असेच त्याचा चेहरा सांगत होता."

"क्षमा करा मिस मार्पल तुमच्या घरी न कळविता या वेळी आलो. पण कारणच तसे आहे. तुमच्या सल्ल्याची श्री. ऱ्होडस ना फारच जरूर आहे."
पथेरिक म्हणाले.

माझ्या सल्ल्याची याला का आवश्यकता असावी मला कळेना. मी काही कुठल्या विषयातील तज्ञ नाही. मग?

श्री. पथेरिक पुढे म्हणाले, "सध्या प्रत्येक विषयातील तज्ञाचा सल्ला घ्यायची पद्धत आहे. पण माझे या संदर्भातील मत काहीसे वेगळे आहे. आता डॉक्टरचेच उदाहरण घ्यायचे, तर एक एखाद्या विशिष्ट रोगातील तज्ञ असतो, आणि एक तुमचा कौटुंबिक डॉक्टर, ज्याला तुमची सारी माहिती असते. माझ्या नात्यातील एका तरूण मुलीला असा अनुभव आला. तिच्या मुलाला त्वचेचा कसलासा विकार झाला म्हणून ती त्वचारोगतज्ञाकडे गेली. माझ्या मते तिने आधी तिच्या नेहमीच्या डॉक्टरकडे जायला हवे होते. मग त्या तज्ञ डॉक्टरने बरीच महागडी औषधे लिहून दिली, कसल्या कसल्या तपासण्या करवल्या, आणि निष्कर्ष काय निघाला? तर त्या मुलाला एक प्रकारच्या कांजिण्या झाल्या होत्या. आता ती आधीच तिच्या नेहमीच्या डॉक्टरकडे गेली असती तर? काही वेळा ज्ञाना पेक्षा अनुभव जास्त उपयोगी ठरतो."

पथेरिक ने ऱ्होडस कडे पाहिले. पण त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. त्याने ते सारे बोलणे ऐकलेच नसावे असे मला वाटले. त्याच्या चेहऱ्यावरच्या तणावाच्या रेषा तशाच दिसत होत्या. तो एकदम म्हणाला,

"काही दिवसातच, मला गळफास लागून मी मरणार आहे."

त्याची बोलण्याची पद्धत काहीशी तुसडी होती. पण कुठल्यातरी काळजीमध्ये असलेल्या व्यक्तीकडून सौजन्यपूर्ण वागणुकीची अपेक्षा ठेवणे चूकच.. नाही का?"  मिस मार्पल म्हणाली. रेमंड आणि जोन ची अर्थातच तिच्या बोलण्याला सहमती होती. 

"तर मिस मार्पल. .. श्री.ऱ्होडस हे इथून वीस मैल  अंतरावर असलेल्या बर्नचेस्टर या गावातून आले आहेत. तुम्हाला आठवत असेल काही दिवसापूर्वी तेथे एक खून झाला होता. तो यांच्या पत्नीचा." मि. पथेरिक म्हणाले.

आता माझ्या लक्षात आले की ऱ्होडस इतका चिंताग्रस्त का होता. पत्नीचा खून झालेला, म्हणजे पहिला संशयित अर्थात तिचा पती असणार. मला काहीसे ओशाळल्या सारखे झाले. ती खूनाची घटना मी ओझरती ऐकली होती पण त्या बद्दल मला काहीच माहिती नव्हती. मनुष्य स्वभावच असा आहे, की आपल्या भोवताली काय घडते आहे या कडे दुर्लक्ष करून दूरच्या घटनांची नोंद तो घेत असतो. आता माझेच बघा ना... मला भारतात त्यावेळी आलेल्या भूकंपाबद्दल माहिती होती, पण माझ्या इतक्या जवळ घडलेल्या घटनेची गंधवार्ता नव्हती, तसही आमच्या गावात घडलेले ते नर्स चे प्रकरण होतेच. आणि ते मला तरी फारच महत्त्वाचे वाटत होते. त्या मुळे त्या बर्नचेस्टर च्या खूनाकडे माझे फरसे लक्ष गेलेच नव्हते. पण तसे कबूल करणे शहाणपणाचे नव्हते. म्हणून मी घाईघाईने म्हणले,
  
"हो हो.. मी ऐकले आहे त्या संबंधी." मी माझे अज्ञान उघड न दर्शविता सावरून घेतले. 

रेमंड आणि जोन आता उत्सुकतेने सरसावून बसले. होते. 

"बरं का ऱ्होडस, मिस मार्पल ने अशा अनेक गुंतागुंतीच्या केसेस आजवर यशस्वीरित्या सोडविल्या आहेत. ती कदाचित या विषयाची तज्ञ नसेल, पण तिचे अनुभव, व्यवहारज्ञान आणि निरीक्षण शक्ती याच्या भांडवलावर, तज्ञ व्यक्तींना न समजलेल्या केसेस सोडवून तिने  पूर्णत्वास नेल्या आहेत. म्हणूनच मी तुला इथे आणले आहे. कारण ज्ञान आणि व्यवहारज्ञान यात अनेक वेळा व्यवहारज्ञान श्रेष्ठ ठरते. तुझ्याकडे ज्ञान असेल तर तू एखादी समस्या सोडविण्यासाठी सर्वात जवळच्या शक्यतेचा विचार करशील, पण व्यवहारज्ञान मात्र तुला अशा अनेक दुर्लक्षित घटना, व्यक्ती, आणि वस्तू दाखवून देते, ज्या समस्या सोडविण्यासाठी फार महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे मिस मार्पल तुझी समस्या सोडवेल याची मला खात्री वाटते." पथेरिकने मिस मार्पल विषयी त्याला वाटणारा आदरयुक्त विश्वास व्यक्त करून ऱ्होडसला दिलासा द्यायचा प्रयत्न केला होता. 

"श्री. पथेरिक च्या या स्तुतीने मला छानच वाटत होते, खोटे कशाला बोलू? स्तुती सर्वांनाच प्रिय असते. पण श्री. ऱ्होडस कडे बघताना माझा तो आनंद मावळून गेला होता. कारण पथेरिक च्या शब्दांचा त्याच्यावर् वर काहीच परिणाम झालेला दिसला नाही. त्याला माझ्याबद्दल अजिबात विश्वास वाटत नव्हता. आणि त्याच्या चेहऱ्यावर ते स्पष्टपणे दिसत होते." जेन आत्याने प्रामाणिकपणे सांगितले. 

ऱ्होडस ची नाराजी बहुदा पथेरिकच्या नजरेस आली नसावी, अथवा त्याने जाणून बुजून तिकडे दुर्लक्ष केले असावे. ते पुढे सांगत होते,

"असं बघा मिस. मार्पल.. बर्नचेस्टरच्या डिस्ट्रिक्ट ज्यूरीने हा खून कोणी एक किंवा अनेक अनोळखी  व्यक्तींनी केल्याचे सांगून त्यानुसार चौकशी करण्याचे आदेश दिले असले, तरी पोलीसांच्या दृष्टीने प्रमुख संशयित हा ऱ्होडसच आहे. त्यामुळे त्याला काळजी वाटते आहे, कोणत्याही क्षणी त्याला अटक होईल. त्याच्यासाठी एक - सर माल्कम ओल्ड यांना ही केस देण्यात आली आहे. ते अशा प्रकारच्या... म्हणजे खून, हत्या वगैरेंच्या केसेस चे तज्ञ समजले जातात. पण मला वाटतंय.  त्यांना एकदा समस्या दिली की ती सोडविण्यासाठी, ते उत्तराच्या जवळ असणाऱ्या शक्यतेचाच फक्तं विचार करतात आणि त्याप्रमाणे आपला बचाव कसा असायला पाहिजे, याची आखणी करतात. पण हे करत असताना बऱ्याच महत्वाच्या मुद्द्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होते आहे.  अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. पण असे काही मुद्दे, जे कमी महत्त्वाचे आहेत, किंवा अजिबात महत्त्वाचे नाहीत असे  वाटत असते, त्यांना समस्या सोडविण्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे त्यांचा बचाव साहजिकच दुबळा ठरेल अशी मला भीती वाटते. म्हणूनच मी ऱ्होडसला तुमच्याकडे यायचा सल्ला दिला."  पथेरिकने सविस्तरपणे त्याचे मत सांगितले.  

मी परत एकदा ऱ्होडसकडे पाहिले. परंतु अजूनही तो हताशपणे बसलेला होता. 

"मला जर तुम्ही पहिल्यापासून माहिती दिली तर माझ्यासाठी सल्ला देणे सोपे होईल", असे म्हणून मी मोठ्या अपेक्षेने ऱ्होडस कडे पाहिले. त्याच्या एकंदरीत अविर्भावावरून त्याला पथेरिक च्या सल्ल्यात फारसे तथ्य वाटत नसावे. तो काहीच बोलला नाही. मग पथेरिक यांनीच मला सारी माहिती पुरवली. 

"श्रीमान आणि श्रीमती ऱ्होडस यांनी बर्नचेस्टर येथील क्राऊन हॉटेल मध्ये दोन खोल्या आरक्षित केल्या होत्या. या खोल्या पहिल्या मजल्यावर अगदी टोकाला होत्या. दोन खोल्यांच्या मध्ये दरवाजा होता. जिना चढून गेल्यानंतर मोकळी जागा होती, त्याचे रुपांतर लाउंज मध्ये करण्यात आले होते. जिथे काही टेबल्स होती आणि त्यांच्या भोवताली खुर्च्या.  त्या हॉटेलमध्ये राहणारे लोक तेथे बसून त्यांच्या मनपसंत पेयाचा आस्वाद घेत असत. घटना घडली तेव्हा तिथे दोघे व्यावसायिक  आणि एक मध्यमवयीन जोडपे बसलेले होते. लाउंज मध्ये बसल्यावर ऱ्होडस पती-पत्नींच्या च्या खोल्यांचे दरवाजे व्यवस्थित दिसत असत. त्या चौघानी खात्रीपूर्वक सांगितले, की त्यांनी त्या खोल्यांमध्ये जाताना तिथली एक कर्मचारी आणि स्वतः श्री.ऱ्होडस या व्यतिरिक्त अन्य कोणालाच पाहिले नव्हते. तसेच त्याच वेळी एक इलेक्ट्रिशियन, श्रीमती ऱ्होडस च्या खोलीच्या समोर असलेल्या व्हरांड्यात कसल्याशा दुरूस्तीचे काम करत होता. त्याने पण असाच जवाब दिला."

 
आता मात्र मला ही केस कठीण वाटायला लागली होती. परंतु का कुणास ठाऊक, श्री. पथेरिक ला ऱ्होडस च्या निरपराधी असण्याची खात्रीच होती. आणि पथेरिक हे  अत्यंत व्यवहारी आणि समंजस व्यक्ती असल्याने मला त्यांच्यावर अविश्वास दाखविता आला नाही. म्हणून मी अजून काही माहिती मिळते का याचा शोध घेऊ लागले. 

घटना घडली त्या काळात ऱ्होडस हे प्राचीन अश्मांसंदर्भात एक पुस्तक लिहीत होते. त्या साठी ते त्यांच्या खोलीत बसून लिखाण करीत होते. त्यांनी देखिल फक्त तिथल्या एका कर्मचारी महिलेला (चेंबर मेड) त्यांच्या पत्नीच्या खोलीत जाताना, आणि तेथून परत येताना पाहिले होते. त्यामुळे साहजिकच माझ्या चौकशीची दिशा आता त्या कर्मचारी महिलेकडे वळली,तिचे नाव होते मेरी हिल. ती त्याच गावातली एक रहिवासी  आहे, आणि गेली कित्येक वर्षे  क्राऊन हॉटेलमध्ये काम करत आहे. तिच्याशी बोलताना माझ्या लक्षात आले, ती फारशी बुद्धिमान स्त्री नाही, आणि थोडीफार घाबरटच असावी. तिच्याबरोबर बोलल्यावर मला असे अजिबातच वाटले नाही, की ती कुणा व्यक्तीवर हल्ला करून तिचा खून करू शकेल. आणि तिला श्रीमती ऱ्होडसचा खून करण्यासाठी काही कारणसुद्धा नव्हते. त्यामुळे तिच्यावर संशय घेण्यात काहीच अर्थ नव्हता.

मग  मी त्या हॉटेलची, म्हणजे विशेषतः ऱ्होडस पती-पत्नी जेथे राहत होते, त्या भागाची रचना तपासण्यास सुरुवात केली. जिना चढून आल्यानंतर एक कॉरीडॉर आहे, नंतर तेथे जी मोकळी जागा आहे, ज्याला ते लाउंज असे म्हणतात. तेथे काही स्त्री पुरूष बसलेले होते. म्हणजे अनोळखी व्यक्तीने येऊन, खून करून कुणाच्याही नजरेस न येता तेथून निसटणे सर्वथा अशक्यच होते. 

ऱ्होडस पती-पत्नींच्या खोल्यांपैकीश्रीमती ऱ्होडस च्या खोलीला अजून एक दार होते, जे विरुद्ध बाजूच्या  व्हरांड्यामध्ये उघडते. तो भाग लाउंज अथवा श्री. ऱ्होडस च्या नजरेआड आहे. पण तेथील दार आतून बंद केलेले होते..अगदी कुलुपबंद आणि त्याच्या शेजारील खिडकी, जी पलीकडच्या भागातच उघडते ती सुद्धा आतून बंद असून त्याचेही लॅच लावलेले होते. म्हणजे खूनी व्यक्ती तेथून विरुद्ध बाजूच्या सज्जा मधून  गेली असण्याची, अथवा तिथून खोलीत आली असण्याची शक्यताच नाही. 

मी परत एकदा माझे लक्ष श्री. ऱ्होडस कडे केंद्रित केले. त्याने काहीशा तुटक शब्दात त्याच्या पत्नी संबंधी माहिती दिली, परंतु मला ती अजिबातच समाधानकारक वाटली नाही. उलट काहीशी विस्कळीत, आणि त्याला स्वतःला सहानुभूती मिळविण्यासाठी जुळवलेली असावी असेच मला वाटले.  श्री. पथेरिकला त्या ऱ्होडस च्या निर्दोषी असण्याची इतकी खात्री का होती? देवजाणे!

ऱ्होडस ने सांगितले, त्याची पत्नी ही  नेहमी  कसल्यातरी भीती अथवा तणावाखाली वावरणारी, अशी स्त्री होती. तिला सतत स्वतःला काहीतरी गंभीर आजार असल्याचे वाटत असे. आणि त्यावर इतरांनी विश्वास ठेवावा अशीही तिची अपेक्षा असे. ऱ्होडस, सवयीने या सततच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यास शिकला होता. तसेच तिला प्रत्येक घटना, आहे त्यापेक्षा वाढवून सांगण्याची खोड होती. उदाहरणार्थ ती समजा केळीच्या सालीवरून पाय घसरून पडता पडता वाचली, तर ती सांगे, मी एका फार मोठ्या अपघातातून नशिबाने वाचले. -- किंवा ती असलेल्या ठिकाणी शॉर्टसर्किटने आग लागली असेल, तर ती सांगेल  संपूर्ण आयुष्यातील सर्वात मोठ्या दुर्घटनेतून ती वाचली आहे. पण तिच्या या कथांकडे सुद्धा दुर्लक्ष करण्याची सवय ऱ्होडस ने स्वतःला लावून घेतली होती.
 
मला असे वाटते की श्रीमती ऱ्होडस सारख्या व्यक्तींची हीच शोकांतिका असते. कारण त्या सांगत असलेली प्रत्येक गोष्ट,  ही कपोलकल्पित मानून त्यांच्याकडे सगळे दुर्लक्ष करत राहतात, आणि जेव्हा खरोखरीच त्यांना मदतीची गरज असते, तेव्हा ती त्यांना मिळू शकत नाही. काही वेळा असा दुःखद शेवट त्यांच्या नशिबात येतो.  

श्री. ऱ्होडस ने सांगितले, की तिला काही काळापासून धमकीची पत्रे येतात असे त्याच्या पत्नीने त्याला सांगितले होते. काही पत्रे तिने त्याला दाखवली होती. पण ती पत्रे इतकी बालीश आणि विचित्र होती, की श्री. ऱ्होडस चे असे मत झाले की कुणीतरी तिला फक्त घाबरविण्यासाठी म्हणून असे उद्योग करत आहे. किंवा दुसरी शक्यता म्हणजे ती स्वतःच असली पत्रे लिहित असावी. तिच्या एकूण स्वभावावरून त्याला ही शक्यता जास्त खरी वाटत होती. 

श्रीमती ऱ्होडस सांगत असे, की त्यांच्या विवाहापूर्वी तिच्या कारखाली सापडून एक लहान मुलगा जखमी झाला होता. चूक त्या मुलाचीच असल्याने ( तो खेळता खेळता वेगाने वाहने जात असणाऱ्या रस्त्यावर आला होता, जिथे पायी चालणारे कुणी येणे अपेक्षित नव्हते) तिला काही शिक्षा झालेली नव्हती. पण  त्याच्या आईने म्हणे, त्यावेळी तिला धमकी दिली होती, की याची शिक्षा तिला (म्हणजे श्रीमती ऱ्होडसला) भोगावी लागेल. आणि बहुदा तीच स्त्री अशी पत्रे वरचेवर पाठवीत असे. 

मला देखील ऱ्होडसने ती पत्रे दाखविली. त्याचे म्हणणे अगदीच काही खोटे नव्हते. ती पत्रे खरंच फार बालीश पद्धतीने लिहीली गेली होती. पण तरी देखिल ही शक्यता दुर्लक्षून चालणार नव्हती.  आता त्या हॉटेलमध्ये कुणी एकटी स्त्री, किंवा काही स्त्रिया रहायला आलेल्या होत्या का? ही माहीती मिळविण्यासाठी, मी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना विचारण्यास सुरूवात केली......

आता मी माझ्या चौकशीचा रोख परत एकदा 'मेरी हिल' कडे वळवला होता.
   
मेरी हिल ही त्या हॉटेल मध्ये अनेक वर्षे नोकरी करत होती. तिथे वास्तव्यासाठी असणाऱ्या लोकांच्या निवासी खोल्यांची व्यवस्था बघण्याचे काम ती करीत असे.  श्रीमती ऱ्होडस ला जिवंत पाहणारी खुनी व्यक्ती व्यतिरिक्त, ती एकमेव शेवटची व्यक्ती असावी. 
मी तिला प्रश्न न विचारता त्या दिवशी काय काय घडले याचे सविस्तर वर्णन करण्यास सांगितले.

मेरी हिल क्राऊन हॉटेल ची एक कर्मचारी, चेंबर मेड आहे. ती त्या दिवशी नेहमीप्रमाणे श्रीमती ऱ्होडसच्या खोलीत, तिला लागणाऱ्या गरम पाण्याच्या बाटल्या  ठेवण्यासाठी गेली होती. खोलीकडे जाताना तिने लाउंजमध्ये बसलेले चौघेजण पाहिले होते, तसेच त्या खोलीच्या बाहेर काम करणारा इलेक्ट्रिशियन सुद्धा तिने पाहिला होता. तिने पाहिले, श्री. ऱ्होडस त्यांच्या खोलीतील मेजाजवळ बसून काही लिहीत होते. ती श्रीमती ऱ्होडस च्या खोलीत आली, तेव्हा ती झोपायच्या तयारीतच होती. नव्हे जवळ जवळ झोपलीच होती. तिचे डोळे मिटत होते. मेरी ला वाटले, बहुदा तिने झोपेचे औषध घेतले असावे.श्रीमती ऱ्होडस ही स्वतःच्या प्रकृतीची अवास्तव काळजी घेणारी स्त्री होती. त्यामुळे तिला नेहमी वेगवेगळी औषधे घ्यायची असत. तसेच ती नेहमी लवकरच झोपी जात असे. त्या मुळे  तिला मेरी हिल आल्याची कसलीच चाहूल लागली नसावी. मेरीने गरम पाण्याच्या बाटल्या श्रीमती ऱ्होडसच्या बिछान्याजवळील मेजावर ठेवल्या आणि ती खोलीबाहेर आली. त्यानंतर तिला श्रीमती ऱ्होडसच्या मृत्यूचीच  बातमी समजली होती. तिच्या दृष्टीने, ती खोलीत गेली असताना तिथे काहीच संशयास्पद दिसल्याचे स्मरत नव्हते.  

मेरी हिलने दिलेल्या या माहितीचा तपासाच्या दृष्टीने काहीच उपयोग नव्हता. पण कुठलाही मुद्दा दुर्लक्षित ठेवून चालणार नव्हता.
 
त्यानंतर मी श्री. ऱ्होडसला त्या दिवशीचा घटनाक्रम वर्णन करण्यास सांगितले.
 
ऱ्होडस ला रात्री उशीरापर्यंत लिहीत बसण्याची सवय होती. तो जे पुस्तक लिहीत होता त्यासाठी त्याला अनेक संदर्भ तपासावे लागत. खूपच लक्षपूर्वक काम करावे लागे. त्यामुळे लिहीत असताना त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल तो फारसा जागरूक नसे. पण एक नक्की, तो लिहीत असताना त्याच्या खोलीचे दार उघडेच होते. आणि गरम पाण्याच्या बाटल्यांचा ट्रे घेऊन जाणारी मेरी हिल त्याने पाहिली होती. नंतर थोड्याच वेळात तिला परत जाताना पण त्याने पाहिले होते. रात्री जवळ जवळ ११ वाजल्या नंतर त्याने त्याचे लिखाण बंद केले होते.  बिछान्याकडे जाण्यापूर्वी श्रीमती ऱ्होडस च्या खोलीत तो आला. काही बोलण्यासाठी त्याने तिच्याकडे पाहिले तर तेव्हा तिचा मृत्यू झालेला होता, कदाचित तासाभरापूर्वीच. तिच्या बिछान्यावर रक्ताचे डाग दिसत होते. नंतर त्याला पोलीसांकडून कळले तिचा मृत्यू पोटात धारदार चाकू खुपसल्यामुळे झालेला होता. तो चाकू श्रीमती ऱ्होडसचाच होता. त्याचा वापर ती पेपरकटर म्हणून करत असे, आणि जो नेहमीच तिच्या ड्रेसिंग टेबलवर ठेवलेला असे. तिच्या खोलीतील साऱ्या वस्तू जशाच्या तशा होत्या. म्हणजे चोरीचा वगैरे प्रयत्न झालेला दिसत नव्हता. खोलीचे पलीकडील भागात उघडणारे दार आतून बंद होते आणि खिडकीसुद्धा. नंतरच्या पोलीस तपासणीत त्या चाकूच्या हॅंडलवर हातांचे ठसे आढळून आलेले नव्हते. खुनी व्यक्तीने अत्यंत कल्पकतेने ,सफाईने आणि नियोजनबद्ध काम केले होते.  

श्री. ऱ्होडस आणि मेरी हिल च्या सांगण्यात संगती तर लागत होती. त्यामुळे त्या दोघांपैकी कुणी खोटे बोलत असावे असे वाटत नव्हते. शेजारील खोलीत असून ऱ्होडसला कसलाही आवाज आला नव्हता, याचे स्पष्टीकरण मेरीच्या जबानीत मिळू शकत होते. कारण मेरी ने सांगितले होते, ती जेव्हा खोलीत गेली तेव्हा श्रीमती ऱ्होडस ग्लानीतच होती, त्यामुळे तिने कसलाही प्रतिकार केला नसणे शक्य होते.  

पण मला कळत नव्हते की मग खुनी आला कुठून? आणि गेला कुठे? 

सगळे परिस्थितीजन्य पुरावे  ऱ्होडस कडेच खुनी म्हणून बोट दाखवीत होती. पण श्री. पथेरिकला खात्री होती तो निर्दोष असण्याची, आणि मला माझ्या या जुन्या मित्रावर अविश्वास दाखवायचा नव्हता.  

मी माझ्या घरातील बैठकीच्या खोलीत विचार करत बसले होते. सरळ साधी वाटणारी केस चांगलीच गुंतागुंतीची झाली होती.  

इतक्या ग्वेन.. माझी मेड आली. श्री. पथेरिक आणि श्री. ऱ्होडस आल्याचे तिने मला सांगितले. ती त्यांना बैठकीच्या खोलीकडे आणण्यासाठी दाराकडे निघालीच  होती, त्याचवेळी  ते दोघे तिथे आले. श्री. ऱ्होडस चा चेहरा चांगलाच चिंताग्रस्त दिसत होता. मला त्याच्याबद्दल थोडी सहानुभूती वाटली.  

दोघेजण सोफ्यावर बसल्यावर पथेरिकने सांगितले, कि त्यांना मी  विचारलेली माहिती मिळाली आहे.
 

क्राऊन हॉटेल मध्ये  राहणाऱ्या दोन स्त्रिया अशा होत्या, ज्या पूर्णतः स्वतंत्रपणे एकट्याच रहात होत्या. त्यातील एक साधारण पन्नाशीची असून तिचे नाव श्रीमती ग्रॅनबी असे होते. ती एक अँग्लो इंडियन स्त्री होती. तिचे कपडे काहीसे भडक आणि तिथेच मिळणाऱ्या सिल्कच्या कापडाचे असत. ती नेहमी केसांचा विग वापरीत असे. 
आणि दुसरीचे नाव श्रीमती कॅरथर्स. ती साधारण चाळीस वर्षे वयाची असावी. तिचे स्कर्टस आणि कोट नेहमीच्या बायकी रंगसंगतीचे नसत. तिची आवड काहीशी पुरूषी असावी. आणि तिचे केसही पुरूषांप्रमाणे अगदी बारीक कापलेले होते. तिची एक सवय फारच विचित्र आणि वैशिष्ट्यपूर्ण होती, ती म्हणजे तिच्या हातातील वस्तू सतत खाली पडणे. काहीवेळा ती ते मुद्दाम तर करत नाही ना? असा संशय येई.
 

मिळालेली माहिती मी नीट समजून घेत होते. परत एकदा साऱ्या माहितीची मी उजळणी केली आणि शेवटी माझे मत पक्के झाले.
 
"माझ्या मते श्रीमती ग्रॅनबी किंवा श्रीमती कॅरथर्स या दोघींपैकी कुणी एकीने खून केला असावा"  मी सांगितले.  

ऱ्होडस आणि पथेरिक आश्चर्याने बघत होते.  

"कशावरून? " ऱ्होडसने विचारले. त्या दोघींना मी किंवा माझी पत्नी ओळखत देखील नाही आणि या दोघींपैकी कुणालाच मी तिच्या खोलीत जाताना किंवा येताना पाहिले नाही" ऱ्होडस म्हणाला.  

"तू पाहिलेस  ऱ्होडस, नक्कीच पाहिलेस. मला सांग, आत्ता तुम्ही दोघे आलात तेव्हा दार कुणी उघडले?" मी विचारले.

"कुणी म्हणजे? अर्थातच तुमच्या मेडने" ऱ्होडस म्हणाला.

"तिचे वर्णन करता येईल तुला?"  मी  विचारले.
 
"हो! का नाही. साधारण माध्यम उंचीची आणि लाल केस असलेली  आहे ती"  ऱ्होडस म्हणाला.

"बरोबर आहे, पण तू अगदीच सर्वसामान्य वर्णन केलंस. अशा वर्णनाच्या या पंचक्रोशीत कितीतरी मुली असतील. नेमके वर्णन कर, तिचे डोळे कसे आहेत? निळे की तपकीरी? नाक सरळ आहे की अपरे? दात सरळ ओळीत आहे की वेडेवाकडे, किंवा पुढे आलेले? "
माझ्या प्रश्नांच्या सरबत्तीने तो चांगलाच गोंधळून  गेला होता, तो म्हणाला -- 

"मिस मार्पल, क्षमा करा पण मी इतके नीटपणे तिच्याकडे लक्ष नाही दिले. म्हणजे इतक्या कमी वेळात, ओझरत्या बघितलेल्या व्यक्तीचे तपशीलवार वर्णन करणे कसे शक्य आहे? आणि सध्या माझी मनःस्थिती ठीक नाहीये... " 

मी ऱ्होडसला हातानेच थांबण्याची खूण केली. इतके स्पष्टीकरण देण्याचे कारण नाही. अर्थातच तुझी काहीच चूक नाहीये. त्या दिवशी नेमके असेच घडले असावे. म्हणजे तू लिहिण्यात मग्न होतास. त्यावेळी गरम पाण्याच्या बाटल्या घेऊन, हॉटेलच्या गणवेषातील कर्मचारी आलेली तू पाहिलीस. पण मला खात्री आहे, तू तिचा चेहरा पाहिलेला नाहीस. फक्त गणवेषातील एक व्यक्ती तू खोलीत जाताना आणि तसाच गणवेष  परिधान केलेली व्यक्ती परत जाताना पाहिलीस. पण त्या दोघी नक्कीच वेगवेगळ्या व्यक्ती असाव्यात."  

माझा निष्कर्ष ऐकून दोघांच्या चेहऱ्यावर फारच मजेशीर भाव दिसत होते. ऱ्होडस तर उघड उघड अविश्वासाने माझ्याकडे बघत होता. आणि श्री. पथेरिक चांगलेच गोंधळलेले दिसत होते.  

मग मी त्यांना माझ्या निष्कर्षाचे स्पष्टीकरण द्यायला सुरूवात केली.  

त्या दिवशी काय घडले असावे मी सांगते. श्रीमती ऱ्होडसच्या खोलीत गरम पाण्याच्या बाटल्या ठेवण्यासाठी मेरी हिल गेली, आणि ती दुसरे दार उघडून पलीकडच्या दरवाजाने तिथून निघून गेली. अर्थातच तिला तसे सांगितलेले असावे आणि थोड्याफार पैशासाठी ती हे काम करण्यास तयार झाली असावी. ती गेल्यावर त्याच दाराने हॉटेलचा गणवेष  परिधान केलेली दुसरीच स्त्री आली. श्रीमती ऱ्होडस झोपेतच होती. त्यामुळे कसलाही  प्रतिकार करणे तिला शक्यच नव्हते.  त्या स्त्रीने रक्ताने माखलेला चाकू स्वच्छ पुसून परत होता तसा मेजावर ठेवला. ती ज्या दाराने आत आली होती ते दार तिने बंद करून कुलुप लावले, आणि पुढच्या म्हणजे लाउंजच्या बाजूच्या दाराने बाहेर आली. तू पाहिलेस तसेच इतरांनीही तिला पाहिले होते. तिने परिधान केलेला गणवेष  बघून तुला आणि तिथे उपस्थित असलेल्या अन्य साक्षीदारांना  वाटले, आधी आत गेलेलीच कर्मचारी स्त्री  परत आली आहे. यात कुणाचीच तशी चूक नाही. सामान्य परिस्थितीत प्रत्येकजण असेच वर्तन करीत असतो. हा मानवी स्वभावच  आहे. एखादी संदर तरूणी जात असेल, तर निदान काही पुरूष तिच्याकडे निरखून बघतील. परंतु एखाद्या  अनाकर्षक गणवेष परिधान केलेल्या, सामान्य रंग- रूप असलेल्या, मध्यमवयीन स्त्रीकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही. तुझ्याप्रमाणेच तो इलेक्ट्रीशियन आणि लाउंजमध्ये बसलेले चौघेजण यांनीही त्या गणवेषधारी स्त्रीला  पाहिले, म्हणजे तिचे कपडे, केस, उंची इत्यादी साधारण गोष्टी पाहिल्या. कुणाचेच लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेले नाही. अतिशय  कल्पकतेने तिने ही योजना आखली असावी. त्या साठी तिने तुझा आणि मिसेस ऱ्होडस चा बराच पाठलाग केला असण्याची शक्यता आहे. तुम्हा दोघांच्या सवयी, तुमचे वेळापत्रक सारे काही... "  बोलता बोलता श्वास घेण्यासाठी मी काही काळ थांबले. त्याचा फायदा घेत ऱ्होडसने विचारले,

"पण का? आम्ही तिचा काय अपराध केला होता,  म्हणून ती आमच्या मागे होती?"

आता मला देखिल ऱ्होडस निर्दोष असल्याचा साक्षात्कार झाला होता. माझ्या जुन्या स्नेह्याच्या, श्री. पथेरिकच्या समंजसपणाचा मला अभिमान वाटला. सर्व विरूद्ध पुरावे असताना देखिल तो ऱ्होडसच्या बाजूने ठाम उभा राहिला होता. मी त्यांच्याकडे बघून जरासे स्मित केले,
"तू काहीच केले नाहीस, पण तुझ्या पत्नीला येत असलेली पत्रे दुर्दैवाने खरी होती. तुझा, किंवा प्रथम माझाही तिच्या कथेवर विश्वास बसला नाही. अर्थात मी ही तुझी चूक मानणार नाही. 'लांडगा आला रे आला' च्या कथेतील मेंढपाळासारखी तुझ्या पत्नीची अवस्था झाली होती. ती सत्य सांगत होती पण  तुला नेहमीप्रमाणे, तो तिचा  कल्पनाविलास वाटला. आणि दुर्दैवाने तिचा असा अंत झाला."

दोन्ही हाताच्या तळव्यात चेहरा झाकून ऱ्होडस काही काळ शांत बसलेला होता. मग हलकेच चेहऱ्यावरील हात बाजूला करून तो म्हणाला,

"कोण असेल ती?"  विचारताना त्याचा आवाज थरथरत होता.

"ग्रॅनबी किंवा कॅरथर्स " मी आत्मविश्वासाने म्हणाले.

"पण ते कसे शक्य आहे, श्रीमती ग्रॅनबीचे केस खूपच वेगळे आणि रंगवलेले आहेत, आणि श्रीमती कॅरथर्स  चे केस अगदीच बारीक कापलेले आहेत. कपडे जरी तेच असले तरी केसातील वेगळेपण जाणवण्याइतके आहे नक्कीच.. " ऱ्होडस म्हणाला.

"तरीही माझे तेच मत आहे. कारण श्रीमती ग्रॅनबी विग वापरत असते, हे मला सांगितले गेले आहे. तिला मेरी हिल च्या केसांसारखा विग लावणे काहीच अशक्य नाही. आणि तेच श्रीमती कॅरथर्स  बद्दल. तिचे केस बारीक कापलेले असल्याने तिला देखिल केसांचा कृत्रिम टोप लावणे अगदीच सोपे आहे. मेरी हिल ला पैसे देऊन कपडे मिळविणे, आणि खोलीचे दार उघडे ठेवणे सहज शक्य होते. त्या स्त्रीने आपला सूड घेतलाच. पत्रे जरी विचित्र आणि बालीश पद्धतीने लिहिली असली, तरी तिने आखलेली योजना चांगलीच कल्पक आणि घातक  होती. आता हेच बघ ना, तुम्हा दोघांचाही अजून विश्वास बसत नाही. पण काही हरकत नाही. तुम्ही पोलीस तपासणी अधिकाऱ्याला हे सर्व सांगा.. यातून सत्य बाहेर येईलच. "  मी म्हणाले.  

जवळच्या मेजावर ठेवलेली टोपी  डोक्यावर चढवून, चालताना  वापरत असलेली छडी हातात घेत, श्री पॅथरिक जागेवरून उठले. उठता उठता श्री. ऱ्होडस कडे बघत म्हणाले, "बघ माझा अनुभव बरोबर होता ना?  नुसते विषयाचे ज्ञान असणे पुरेसे नाही, तर त्या जोडीला ते ज्ञान वापरायचे तारतम्य, आणि व्यवहारज्ञान देखिल हवे. निरिक्षण, अनुभव आणि त्याचे विश्लेषण  करणारी बुद्धी हे समस्या सोडविण्यासाठी लागणारे महत्त्वाचे घटक आहेत." 

श्रीयुत ऱ्होडसला अर्थातच ते पूर्णपणे पटले होते. त्याच्या चेहऱ्यावर कृतज्ञता दिसत होती. 

"धन्यवाद मिस. मार्पल!  मला खात्री होतीच, की तुम्ही माझ्या या मित्राला जरूर मदत कराल. आता फक्त शेवटचे एक सांगा, तुमच्या मते दोघीं पैकी कोण गुन्हेगार असावी? त्याने विचारले.

या प्रश्नाचा मी देखिल विचार केलाच होता. "श्रीमती कॅरथर्स " मी वेळ न घालवता उत्तर दिले.  

"कशावरून?"  मि पथेरिकने उत्सुकतेने विचारले.  

" कॅरथर्स हिचे वागणे खूपच विचित्र होते असे हॉटेल मधील साऱ्यांचे म्हणणे आहे. पण तिचा संशय येण्याचे ते कारण नाही.  तिचे वागणे काहीवेळा मुद्दाम वाटेल असेच असे. म्हणजे लोकांच्या मनात स्वतःचा वेंधळेपणा ठसावा या हेतूने केलेले असेच तिचे वर्तन होते. पण त्यातील कृत्रिमपण सर्वांनाच जाणवलेला होता. आपण आहोत, त्या पेक्षा काहीतरी वेगळे दर्शविण्याचे/भासविण्याचे  तिला दुसरे काय कारण असणार?  तिच्यासारखी वेंधळी स्त्री, अशी योजनाबद्ध पद्धतीने, सफाईने एखादा खून करेल असे कुणालाच वाटणार नाही, तसा संशयही कुणाला येणार नाही." 

जोन आणि रेमंड जेन आत्याच्या  कथेमध्ये चांगलेच गुंतले होते. रेमंडच्या चेहऱ्यावर  आत्याविषयी त्याला वाटत असलेला अभिमान स्पष्ट दिसत होता.  

"मग पुढे काय झाले? तुमचा अंदाज बरोबर होता का? " जोन ने विचारले

"अर्थात, असणारच" काहीशा नाराजीने त्याच्याकडे बघत रेमंड म्हणाला.

"हो, अगदी तंतोतंत.. ", मिस मार्पल म्हणाली. "श्रीमती कॅरथर्स, म्हणजेच त्या मुलाची आई. सूड भावनेने पेटलेली स्त्री, मग एरवी ती सर्वसामान्य का असेना पण   किती घातक असते? ते तुमच्या लक्षात येईल. तिने अनेक वर्षे श्रीमती ऱ्होडस चा पाठलाग केला. पत्रे पाठवून तिला मानसिकरित्या कमकुवत केले, आणि संधी मिळताच मोठ्या सफाईने तिचा खून केला. मला समाधान आहे की ऱ्होडस सारख्या सज्जन माणसाला, मी खुनाच्या खोट्या अरोपाखाली बळी जाऊ दिले नाही. आता तो सुखात आहे. त्याने त्याला शोभेल अशा शहाण्या, समजूतदार मुलीबरोबर विवाह केला आहे. त्यांच्या घरी एक नवीन लहानगा पाहुणा आला आहे. आणि माहिती आहे ?  श्री .ऱ्होडस चा चांगुलपणा म्हणजे त्याने मला त्याच्या मुलाची 'गॉडमदर'  होण्याची विनंती केली, जी अर्थातच मी मान्य केली." 

मिस मार्पलचे बोलणे संपूनदेखील रेमंड आणि जोन काहीच बोलत नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत मग मिस मार्पल गमतीने म्हणाली, "मला आशा आहे की माझी कथा तुम्हाला फार कंटाळवाणी वाटली नसावी." 

"नाही, अजिबात नाही"  जोन आणि रेमंड ने एका सूरात उत्तर दिले.  

(समाप्त)

(अ‍ॅगाथा ख्रिस्ती यांच्या "मिस मार्पल टेलस अ स्टोरी" या कथेचे मराठी रुपांतर.
यातील पात्रे आणि स्थळांची नावे मी त्यांच्या स्पेलींगनूसार लिहिली आहेत.)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कथा आवडली. उत्तम अनुवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||