एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १२

समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न

सुधीर भिडे

ज्या जातीत आणि ज्या देशात स्त्रीला मान दिला जात नाही त्या जातीला वा त्या देशाला सुसंस्कृत म्हणता येणार नाही.
– महात्मा गांधी

एकोणिसाव्या शतकातील स्त्रियांची स्थिती आपण गेल्या भागात पाहिली. या भागात आपण स्त्रियांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी काय प्रयत्न झाले याचा विचार करू. समाजसुधारकांनी इंग्रज सरकारकडे स्त्रीविषयक कायदे करण्यासाठी वारंवार अर्ज केले. त्यास यश येऊन इंग्रज सरकारने महिलांच्या उत्थापनासाठी विशेष कायदे केले. स्त्री शिक्षणाची सुरुवात होऊन सुधारणांना सुरुवात झाली.

कायद्याचा आधार

कोणत्याही समाजात कायदे करून समाजात बदल आणता येत नाही; पण कायद्याचा आधार गरजेचा असतो. भारतातील स्त्रियांच्या वाईट अवस्थेची चार प्रमुख कारणे होती - बाल विवाह, सती प्रथा, विधवा विवाहाला विरोध आणि स्त्रियांच्या शिक्षणाला विरोध. १८३० पासून १८९०पर्यंत यांपैकी तीन प्रश्न सोडवण्यासाठी इंग्रज सरकारने कायदे केले.

सर्वांत भयंकर सतीप्रथा होती. भारतात सतीप्रथा प्राचीन काळापासून होती. सतीचे ऐतिहासिक पुरावे इसवी सन ३००पासून मिळतात. सुरुवातीला ऐच्छिक असलेली ही प्रथा पुढे बळजबरीने लागू करण्यात आली. मुघल शासकांनी सतीप्रथा बंद करण्याचे प्रयत्न केले. राजा राममोहन रॉय यांच्या सतत प्रयत्नामुळे १८२९ साली बंगाल प्रेसिडेंसीमध्ये सतीप्रथेच्या विरुद्ध कायदा करण्यात आला. या कायद्याविरुद्ध हजारो सह्या असलेले अर्ज गव्हर्नरला देण्यात आला. १८३०मध्ये हा कायदा बाँबे आणि मद्रास प्रेसिडेंसींना लागू करण्यात आला. १८३२ प्रिव्ही कौन्सिलने भारतातील उच्चवर्णीयांचे अर्ज फेटाळून कायदा लागू केला. त्यानंतर हळूहळू सर्व संस्थानांत १८४६पर्यंत सतीप्रथेविरुद्ध कायदा झाला. (The History Behind Sati, a Banned Funeral Custom in India, Culture trip, Richa Jain, 2 May 2018)

विधवा पुनर्विवाह कायदा १८५६ साली करण्यात आला. बालविवाह टाळण्यासाठी १८९१ साली विवाहाचे वय १२ वर्षापर्यंत वाढविण्यात आले. १९३० साली ते वाढवून १८ करण्यात आले. १८९१ साली संमती कायदा बनविण्यात आला. या कायद्यान्वये बारा वर्षांखालील विवाहित किंवा अविवाहित मुलीशी लैंगिक संबंध ठेवणे कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला. या कायद्याला टिळकांसकट पुण्यातील सनातनी ब्राह्मणांनी विरोध केला. त्यांचे म्हणणे की सरकारने धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करू नये. बारा वर्षांपेक्षा लहान मुलीशी लैंगिक संबंध ठेवणे ही धार्मिक बाब कशी होते ते कळत नाही.

महाराष्ट्रातील समाज सुधारक

विष्णु परशुराम पंडित यांचा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. पारंपरिक संस्कृत शिक्षणानंतर त्यांनी पुण्यात इंग्रजीचे शिक्षण घेतले. १८४८ साली त्यांनी सरकारी शिक्षण खात्यात नोकरी घेतली. १८६४मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन मुंबईच्या इंदुप्रकाश वृत्तपत्राचे ते संपादक झाले. बालविवाह, विधवापुनर्विवाह, जरठ-कुमारी विवाह यांवर त्यांनी आपले विचार सडेतोडपणे मांडले. स्त्रियांच्या उन्नतीची त्यांना तळमळ होती. १८७० साली पुण्यात शंकराचार्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत त्यांनी विधवा पुनर्विवाहाबद्दल विचार मांडले. शंकराचार्यांनी हे विचार मान्य केले नाहीत हा भाग निराळा. ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुनर्विवाहाच्या सशास्त्रतेसंबंधी लिहिलेल्या ग्रंथाचे त्यांनी भाषांतर केले. त्यांनी स्वत: विधवेशी पुनर्विवाह केला.
(वरील माहिती मराठी विश्वकोशातून घेतली आहे.)

जोतिबा आणि सावित्रीबाई


जोतिबा आणि सावित्रीबाई

विष्णु पंडित आणि जोतिबा फुले समकालीन होते. जोतिबांनी आपल्या पत्नीस – सावित्रीबाईंस शिकविले. त्यानंतर सावित्रीबाईंना नगरला शिक्षण शास्त्राचे शिक्षण घेण्यास पाठविले. अशा प्रकारे शिक्षण घेतलेल्या त्या भारतातील पहिल्या स्त्री ठरल्या. १८५१-५२मध्ये त्यांनी मुलींसाठी तात्यासाहेब भिडे यांचे वाड्यात शाळा सुरू केली. पहिल्या शाळेतील पटावरच्या मुलींची नावे – अन्नपूर्णा जोशी, सुमति मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी थत्ते, सोनू पवार, जानी करडिले. या सर्व मुली चार ते सहा वयोगटातील होत्या. (प्राजक्त साप्ताहिक, कोल्हापूर, संपादक - प्रभाकर भिडे, मे २०२२).

डाव्या बाजूचा फोटो भिडे वाड्याचा आहे. वास्तूची दयनीय अवस्था मनाला अस्वस्थ करते. उजव्या बाजूला पोस्टरचा फोटो ज्यावर राजकारणी व्यक्तींनी आपली जाहिरात केली आहे. हा फोटो सरळही लावलेला नाही. आपल्याला आपल्या ऐतिहासिक वास्तूंची किंमत नाही हेच खरे. समोर चांदी आणि सोन्याने मढविलेले दगडूशेठ हलवाईचे गणेश मंदिर आहे. कोणास हे समजत नाही की खरे मंदिर गणपती मंदिराच्या समोर आहे. दोन्ही फोटो विजय धडफळे यांच्या सौजन्याने.

मागील भागात उल्लेख आल्याप्रमाणे विधवांवर घरात अत्याचार होऊन गर्भधारणा होई. त्यानंतर स्त्रियांस आत्महत्येशिवाय काही उपाय राहात नसे. अशा स्त्रियांसाठी जोतिबांनी आश्रम चालू केला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. उषा पोळ-खंदारे, कोमल प्रकाशन, २०११, पृष्ठ १४० या संदर्भातून उद्धृत केलेला हा उतारा –

जोतिरावांनी शिक्षणाने सावित्रीबाईंची ज्योत प्रज्वलित केली. जोतिरावांच्या सर्व समाजकार्यात सावित्रीने सहभाग घेतला. जोतिरावांच्या बरोबर समाजकार्यात त्यांनी त्वेषाने उडी घेतली. प्रत्येक अनाथाची आई होऊन त्यांनी अनाथाला सनाथ केले. सावित्रीबाईंनी सुंदर काव्ये लिहिली. जोतिरावांच्या पश्चात त्यांनी कार्याची धुरा सांभाळिली. तिरडी धरून जोतिरावांच्या अंत्ययात्रेत त्या सहभागी झाल्या. पतीच्या चितेला त्यांनीच अग्नी दिला. भारताच्या इतिहासात असा पहिलाच प्रसंग असावा. जीवनाच्या शेवटपर्यंत त्या समाजसेवा करीत राहिल्या. प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करिताना त्यांनाच लागण झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

सावित्रीबाई फुल्यांच्या बरोबर जोतिबांच्या शिष्या ताराबाई शिंदे यांचा उल्लेख आवश्यक आहे. ताराबाईंचा जन्म बुलढाणा येथे एका सधन कुटुंबात झाला. त्यांचे वडील सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ता होते. वडिलांनी त्यांना इंग्रजी, मराठी आणि संस्कृत शिकविले. स्त्रियांच्या स्थितीविषयी ताराबाईंना कळवळ होती. १८८२ साली त्यांनी स्त्री पुरुष तुलना ही पुस्तिका लिहिली.

त्या काळातल्या आघाडीच्या समाजसुधारक अशी त्यांची ओळख आहे. ताराबाई शिंदे यांनी "इंग्रज सरकारचे राज्य ईश्वर राज्य असे सदोदित चिरकाल ठेवो" अशी इच्छा व्यक्त केली होती. कारण इंग्रजांच्या आगमनामुळे अनेक सुधारणा झाल्या असे त्यांचे मत होते. त्यांचे स्त्रियांच्या स्थितीबद्दलचे हे उद्गार पाहा.

आजपर्यंत बटकीप्रमाणे ताबेदारीत राहून सदासर्वदा नवऱ्याची मर्जी तोलून, घरातील सर्व मनुष्याचे जे नाही ते सर्व बोलणे सोसून, सदोदित भाड्याच्या बैलासारिखे राबून हरिणसश्यासारखी रात्रंदिवस जनांची, घरच्यांची भीती बाळगून वागत असताही स्त्रियांना एक शब्द बोलण्याची अगर चिमटीभर दाण्याची सत्ता नसावी काय रे?

(मिळून साऱ्याजणी, संपादिका विद्या बाळ, ऑगस्ट १९८९)

महात्मा फुले यांचे दुसरे शिष्य आणि सहकारी डॉक्टर विश्राम रामजी घोले यांनी स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात केलेलं काम महत्त्वपूर्ण आहे. डॉक्टर घोले यांचा जन्म १८३३ साली वेंगुर्ले येथे झाला. त्यांचे वडील इंग्रजांच्या सैन्यात सुभेदार होते. त्यांचे शिक्षण भिवंडी, दापोली, पुणे आणि मुंबई येथे झाले. १८५२ साली ठाणे सिविल हॉस्पिटलमध्ये त्यांनी अप्रेंटीस म्हणून नोकरी चालू केली. त्यानंतर त्यांनी इंगजी सैन्याच्या वैद्यकीय भागात नोकरी घेतली. इंग्रजी सैन्यातर्फे त्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी मिळाली. ते शल्यचिकित्सक झाले.

पुण्यात आल्यावर ते महात्मा फुले यांच्या सहवासात आले. महात्मा फुले यांचे ते फमिली डॉक्टर होते. पुण्याच्या सत्यशोधक समाजाचे ते अध्यक्ष झाले. त्यांनी आपली मुलगी काशीबाई हिला शिक्षण देण्यास सुरुवात केली. त्याबद्दल त्यांना धमक्या मिळाल्या . पण न घाबरता त्यांनी काशीबाईंचे शिक्षण चालूच ठेवले. काशीबाईंना ते लाडाने बाहुली
म्हणत. काही नतद्रष्ट लोकांनी काशीबाईंना काचेचा चुरा घातलेला लाडू खायला दिला. अंतर्गत रक्तस्रावाने काशीबाईंचा मृत्यू झाला. आपल्या लाडक्या मुलीच्या स्मरणार्थ त्यांनी पाण्याचा हौद बांधला आणि त्यास बाहुलीचा हौद असे नाव दिले. त्यानंतर घोल्यांनी आपल्या दुसर्‍या मुलीचे शिक्षण चालू ठेवले. १०० वर्षाहून अधिक काळ हा हौद बुधवार पेठेतील कोतवाल चावडीजवळ अस्तित्वात होता.


Kashibai & Vishram Ramji Ghole

(माहिती दैनिक प्रभात ३ सप्टेंबर २०२२ अंकातून)

महादेव गोविंद रानडे यांनी १८६२ साली बी. ए. पदवी आणि १८६६ साली एल. एल. बी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी न्यायाधीश म्हणून काम करण्यास सुरुवात केली. तीस वर्षे ते न्यायाधीश म्हणून काम करत राहिले. सरकारी नोकरीत असतानाच समाजातील विविध प्रश्नांवर त्यांनी बोलायला आणि लिहायला सुरुवात केली. अस्पृश्यता, विधवाविवाह या विषयांवर त्यांनी आपले विचार व्यक्त केले. पुणे सार्वजनिक सभा आणि प्रार्थना समाज या संस्थांच्या कार्यात ते सहभागी झाले. काँग्रेसच्या स्थापनेमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. कॉँग्रेसच्या १८९२ सालच्या अलाहाबाद येथील अधिवेशनाबरोबर रानड्यांनी स्त्री-उद्धारासाठी सामाजिक परिषद भरवली. त्यात त्यांनी खालील ठराव मांडले -

  • लग्न खर्चाची मर्यादा
  • स्त्री शिक्षणाचा पुरस्कार
  • स्त्री विवाहासाठी वयोमर्यादा १४
  • पुरुषाने एकापेक्षा जास्त पत्नी ठेवणे कायदेबाह्य
  • केशवपन बंदी
  • पुनर्विवाहास मान्यता

यानंतर निरनिराळ्या ठिकाणी सामाजिक परिषदा भरवून रानड्यांनी वरील कल्पनांचा प्रसार केला.

रानड्यांनी आपली पत्नी रमाबाई यांना घरीच शिकविले. लग्नाच्या वेळी रमाबाई ११ वर्षांच्या होत्या, आणि रानडे ३१ वर्षाचे होते. सत्तावीस वर्षे संसार झाल्यावर रानडे १९०१ साली निधन पावले पती निधनांनंतर रमाबाईंनी स्त्री शिक्षणाला वाहून घेतले.

त्यांनी सेवासदन संस्था श्री. देवधर यांच्या मदतीने चालू केली. ही संस्था मुलींच्या शिक्षणासाठी सुरू करण्यात आली. त्यांनी शाळेत नर्सिंग कोर्स चालू केला. वरच्या फोटोत विद्यार्थिनी नऊवारी साडी नेसून आणि केसांचा अंबाडा बांधून वर्गात शिकताना दिसत आहेत. ही संस्था आजही पुण्यात कार्यरत आहे.

नागपूरमध्ये गोपाळराव भिडे यांनी आपल्या घरात १८७६ साली मुलींची शाळा चालू केली. १८७८ साली भिडे गर्ल्स एजुकेशन या संस्थेची स्थापना झाली. (प्राजक्त साप्ताहिक, कोल्हापूर, संपादक – प्रभाकर भिडे, मे २०२२)



भिडे गर्ल्स स्कूल आणि कॉलेज

पंडिता रमाबाईंचे वडील अनंत डोंगरे हे विद्वान ब्राह्मण होते. (या रमाबाई निराळ्या, त्यांचा रमाबाई रानड्यांशी संबंध नाही.) वडिलांनी रमाबाईस शिकविण्यास सुरुवात केली. त्याकरिता कुटुंबास वाळीत टाकण्यात आले. मग कुटुंब देशोधडीस लागले. तरीही रमाबाईंचे वेदांचे शिक्षण चालूच राहिले. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर रमाबाई भावाबरोबर कलकत्त्यास गेल्या. तिथे त्यांनी हिंदू धर्मावर व्याख्याने दिली. तिथेच त्यांना पंडिता ही पदवी मिळाली. कलकत्त्यास त्यांनी खालच्या जातीच्या एका बंगाली पुरुषाशी विवाह केला. हा त्या काळातील पहिला आंतरजातीय विवाह होता. या विवाहातून त्यांना एक मुलगी झाली.

रमाबाईंचे वैयक्तिक आयुष्य दु:खद होते. आई-वडील लहानपणीच गेले. त्यानंतर भाऊ आणि पतीचे निधन झाले. मग त्या पुण्यास परतल्या. त्यांनी इंग्लिश भाषा शिकण्यास सुरुवात केली. आर्य महिला समाज स्थापून बालविवाहाविरुद्ध चळवळ सुरू केली. १८८३ साली त्या इंग्लंडला गेल्या. त्या कॉलेजात संस्कृतच्या अध्यापक म्हणून काम करू लागल्या. तिथेच त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. तेथून त्या अमेरिकेस गेल्या. तिथे त्यांनी हिंदू धर्मावर भाषणे दिली. १८८९ साली त्या भारतात परतल्या.

त्यांनी मुंबईत शारदा सदन चालू केले. तरुण विधवा स्त्रियांना आसरा देण्याचे काम चालू केले. जेव्हा भयंकर दुष्काळ पडला त्यावेळी त्यांनी २,००० स्त्रियांना आसरा दिला.

गोपाळ गणेश आगरकर

(माहिती मराठी विश्वकोष आणि आगरकर, य. दि. फडके, मौज प्रकाशन.या पुस्तकातून)

आगरकरांचे शालेय शिक्षण कराडला आणि कॉलेज शिक्षण पुण्यात डेक्कन कॉलेज मध्ये झाले. आगरकरांनी टिळक आणि चिपळूणकरांच्या बरोबर १८८० साली शाळा आणि केसरी, मराठा वृत्तपत्रे चालू केली. १८८५ साली याच सहकाऱ्यांनी फर्ग्युसन कॉलेज चालू केले. सुरुवातीला केसरीचे संपादक आगरकर होते. संपादकीयातून त्यांनी विधवाविवाह आणि बालविवाहविरोध हे विषय मांडले. १८८७मध्ये समाज सुधारणेच्या विषयावरून आगरकर आणि टिळक यांचे मतभेद वाढले आणि आगरकरांनी केसरी सोडून स्वतःचे सुधारक नावाचे वृत्तपत्र चालू केले. सुधारकमधून त्यांनी अस्पृश्यता, विधवाविवाह या प्रश्नांना वाचा फोडली. १८९२ साली ते फर्ग्युसन कॉलेजचे प्रिन्सिपल झाले. वयाच्या ३९व्या वर्षी १८९५ साली त्यांचे निधन झाले.


गोपाळ गणेश आगरकर

आगरकरांनी प्रथम केसरीमधून आणि नंतर सुधारक या पत्रातून समाजसुधारणेचा पाठपुरावा केला. त्या काळी मुलीस ऋतुप्राप्ती झाली की त्याचा उघड सोहळा करीत. आगरकरांनी त्यास विरोध केला. लिखाणात त्यांनी सनातनी ब्राह्मणावर हल्ला चढविला.

बुद्धिवादी दृष्टीकोनातून समाजजीवनाचे विश्लेषण करून अन्याय्य रूढी आणि परंपरा यांच्यावर त्यांनी कडाडून हल्ले चढविले. बुद्धीच्या निकषांखेरीज अन्य कोणताही निकष ते मानीत नसल्यामुळे समाजसुधारणांचे समर्थन करण्यासाठी स्मृतिवचनांचा आधार घेणे त्यांना मान्य नव्हते. चातुर्वर्ण्य, जातिसंस्था, अस्पृश्यता, बालविवाह, ठरवून केलेले विवाह इ. गोष्टी त्यांना सर्वथैव अमान्य होत्या. मुला-मुलींस समान शिक्षण, कौशल्याधारित अभ्यासक्रम व व्यवसायाभिमुख शिक्षण द्यावे, दुष्ट आचारांचे निर्मूलन करावे, सदाचाराचा प्रसार करावा, ज्ञानवृद्धी करावी, सत्यसंशोधन करावी, भूतदया राखावी यासाठी ते प्रयत्नशील होते.

(मराठी विश्वकोष)

आपल्या वैचारिक लेखांनी मराठीतील निबंधसाहित्यात त्यांनी मोलाची भर घातली, काव्य आणि संवेदना यांचा विशेष संबंध, काव्यातील सत्य आणि शास्त्रीय सत्य, काव्यातील करुणरस, कविमन आणि काव्यनिर्मितिप्रक्रिया इत्यादींसंबंधीचे त्यांचे विचार या दृष्टीने लक्षणीय ठरतात.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

महर्षी शिंदे यांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्याविषयी आपण भाग आठमध्ये माहिती घेतली. महर्षी शिंद्यांनी स्त्रियांच्या प्रश्नांवरही खूप काम केले आहे. वर उल्लेखिलेल्या ताराबाई शिंदे यांचे महर्षी शिंदे यांचे काही नाते नाही. महाराष्ट्रातील समाजसुधारकांत दोन रमाबाई – रमाबाई रानडे आणि पंडिता रमाबाई – आणि दोन शिंदे – ताराबाई शिंदे आणि महर्षी शिंदे – आहेत. खालील माहिती महापुरुषांच्या नजरेतून स्त्री (मंगला आठलेकर, राजहंस प्रकाशन, २०१८) या पुस्तकातून घेतली आहे. (प्रकरण ९)

महर्षी शिंदे यांचे लग्न त्यांच्या वयाच्या नवव्या वर्षी झाले. त्यावेळी बायकोचे वय होते एक वर्ष. हे लग्न टिकलेही नाही. त्यांच्या बहिणीचे लग्न चौथ्या वर्षी झाले. हे लग्नही टिकले नाही. त्यांनी आपल्या आईचे घरात होत असलेले हाल पाहिले. या वैयक्तिक अनुभवातून स्त्रियांच्या स्थितीविषयी त्यांच्या मनात जागरूकता आली.

महर्षी शिंदे यांनी मुरळी प्रथेविरुद्ध चळवळ केली. महाराष्ट्रातील मुरळी प्रथा ही देवदासी प्रथेप्रमाणे अनिष्ट प्रथा आहे. त्यांनी एक सदन सुरू करून या प्रथेतून बाहेर आलेल्या मुलींसाठी राहण्याची आणि शिक्षणाची व्यवस्था केली. या मुलींची लग्ने लावून देऊन त्यांना समाजात स्थान दिले. १९२० साली बॉम्बे प्रोव्हिन्समध्ये झालेल्या निवडणुकीसाठी ते उभे राहिले. त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात स्त्रियांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले.

धोंडो केशव कर्वे

धोंडो केशव कर्वे फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक होते. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी विधवेशी विवाह केला. त्यांच्या दुसर्‍या पत्नी आनंदीबाई बाया कर्वे या नावाने ओळखल्या जात. बाया कर्वे यांचे वयाच्या आठव्या वर्षी वीस वर्षांच्या गृहस्थाशी लग्न झाले. त्यांना लवकरच वैधव्य आले. त्यांच्या भावाने त्यांचे पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन येथे शिक्षण सुरू केले. धोंडो केशव कर्वे यांची प्रथम पत्नी निवर्तल्यावर त्यांनी विधवेशी विवाह करण्याचे ठरविले आणि त्यांचे लग्न आनंदीबाई यांचेशी झाले. त्यांना समाजाने वाळीत टाकले. विधवांचा प्रश्न किती गंभीर आहे याची त्यांना कल्पना आली आणि त्यांनी पुण्याजवळ हिंगणे येथे विधवांसाठी आश्रम चालू केला.

रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी कर्वेंचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि रु. ७५० संस्थेच्या उभारणीसाठी कर्वेंकडे सुपूर्त केले. या उजाड माळरानावर कर्वेंनी एक झोपडी बांधली. ही पहिलीवहिली झोपडी ही हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेची गंगोत्री.

(लोकसत्ता, २५ जून २०२२)


महर्षी धोंडो केशव कर्वे

या उपक्रमात त्यांना आनंदीबाईंची साथ मिळाली. त्या काळी हिंगणे गावाबाहेर होते. आनंदीबाई आश्रमात मुलींची काळजी घेत. धोंडो केशव हिंगण्याहून रोज चालत फर्ग्युसन कॉलेजला शिकविण्यास जात. त्यांना समाजाने फार त्रास दिला. त्याचबरोबर काही लोक मदतीसाठीही पुढे आले. सयाजीराव गायकवाड, अक्कलकोटच्या राणीसाहेब यांनी त्यास मदत केली. १९१६ साली मुंबईच्या ठाकरसी कुटुंबाने मदत केल्याने त्यांनी एस. एन. डी. टी. कॉलेज सुरू केले.


आइनस्टाईनबरोबर धोंडो केशव कर्वे
आइनस्टाईनबरोबर धोंडो केशव कर्वे

महर्षी कर्वे यांनी १९२९ साली युरोपमध्ये सहा महिने प्रवास केला. त्या वेळी त्यांनी युरोपमधील शिक्षण संस्थांना भेट दिली. त्याकाळात बर्लिनला त्यांनी आइनस्टाईन यांची भेट घेतली.

<ब>गांधीजींचे स्त्रियांसंबंधी विचारब>

खालील माहिती महापुरुषांच्या नजरेतून स्त्री (मंगला आठलेकर, राजहंस प्रकाशन २०१८, प्रकरण ८) या पुस्तकातून घेतली आहे. ही माहिती गांधी विचार दर्शन या खंडांतून घेतली आहे असे लेखिकेने नमूद केले आहे.

गांधीजींचे स्त्रियांविषयीचे विचार त्यांचे वय वाढत गेले तसे परिपक्व होत गेले असे दिसते. तरुण वयात त्यांचा पुरुषी अहंकार होता असे ते प्रांजळपणे मान्य करतात. त्यांची पत्नी कस्तुरबा हे सार्‍या स्त्री जातीला समजून घेण्याचे माध्यम ठरले असे त्यांनी नमूद केले आहे. गांधीजींचे विचार खाली दिले आहेत –

  • स्त्री ही अहिंसा आणि स्वार्थत्याग यांची जिवंत मूर्ती आहे. स्त्रीशिवाय अहिंसा सत्यसृष्टीत उतरणे अशक्य आहे.
  • स्त्री आणि पुरुष दोहोंमध्ये स्त्री अधिक थोर आहे.
  • स्त्री आणि पुरुषात कायद्याने जी विषमता निर्माण केली आहे ती नष्ट केली पाहिजे.
  • स्त्रियांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला पाहिजे ज्यायोगे सार्वजनिक जीवन शुद्ध होईल.
  • धार्मिक साहित्यात स्त्रीला जे पापाचे आणि मोहाचे उगमस्थान मानले गेले आहे ते मला मान्य नाही.
  • चौदाव्या वर्षी मुलीला गर्भधारणा होणे हे नि:संशय अनैतिक आणि अमानुष आहे.
  • पुनर्विवाहाचा हक्क प्रत्येक विधुराला असेल तितकाच प्रत्येक विधवेला आहे.
  • पतीपुढे पत्नीला अत्यंत हीनदीन ठेवण्याची चूक हिंदू संस्कृतीने केली आहे हे खरे आहे. कोणतीही गोष्ट प्राचीन आहे म्हणून ती चांगली आहे असे मी मानत नाही. पुराणपरंपरांच्या पायी आपण आपली ईश्वरदत्त तर्कशक्ती गहाण टाकावी हे बरोबर नाही. रूढी कितीही जुनी असली तरी नीती-तत्त्वांशी तिचा विरोध असेल तर उच्चाटन होण्यास ती पात्र आहे.
  • हुंड्याची दुष्ट रूढी नष्ट करण्यासाठी मुलींना योग्य शिक्षण दिली पाहिजे.

वरील सर्व विचार प्रगतीशील आणि काळाच्या पुढे होते असे दिसते. पण दोन बाबतीत त्यांचे विचार खटकतात –

  • निसर्गाने स्त्री पुरुषात जसा भेद केला आहे तसाच तो शिक्षणातही आवश्यक आहे. संसारात दोघांच्या कामात भेद आहे. घरातील व्यवस्था स्त्रीने तर बाहेरची पुरुषाने बघायची आहे.

बलात्काराच्या संदर्भात गांधींची विधाने गोंधळात टाकणारी आहेत. गांधीजी लिहितात,

  • ‘आपले पावित्र्य ही आपली ढाल आहे हे ज्या स्त्रीला कळले आहे तिची विटंबना होणार नाही.’ गांधीजींचे हे मत म्हणजे आशावादाची कमालच म्हणायची. पुढे गांधीजी लिहितात, ‘स्त्री कोणत्याही अवस्थेत स्वत:वर बलात्कार होऊन देणार नाही. तो होण्यापूर्वीच ती मरून जाईल.’ म्हणजे पशुत्वापुढे स्त्रीने काय करायचे तर मरून जायचे. (पृष्ठ २०७)

निष्कर्ष

सर्व समाजसुधारकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे या शतकात स्त्रियांच्या स्थितीत सुधारणेला सुरुवात झाली. समाजसुधारकांमध्ये महर्षी कर्वे, महात्मा फुले आणि महर्षी शिंदे यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. इतर समाजसुधारकांनी या विषयावर लिखाण केले. फुले, शिंदे आणि कर्वे यांनी विचार कृतीत आणले. त्याचप्रमाणे इंग्रज सरकारलाही श्रेय द्यावे लागेल. मुख्य, महत्त्वाचे म्हणजे या शतकात जे बदल सुरू झाले त्यामुळे पुढच्या शतकात समाज बदलून गेला. आज २०२०मध्ये स्त्रियांची स्थिती पूर्ण बदलली आहे त्याची बीजे १८१८ ते १९२० या काळात पेरली गेली.

अस्पृश्यता निवारण आणि स्त्रियांचा उद्धार या शिवाय एकोणिसाव्या शतकात समाजात काय बदल झाले ते पुढच्या – भाग १३ – मध्ये पाहू.

मागचे भाग -

भाग १ – एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती
भाग २ – अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी
भाग ३ – अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती
भाग ४ – अठराव्या शतकातील शासनयंत्रणा
भाग ५ – धर्मशास्त्रे आणि कर्मकांडी धर्म
भाग ६ – अठराव्या शतकातील धर्माचे स्वरूप
भाग ७ – धार्मिक सुधारणांची आवश्यकता
भाग ८ – धार्मिक सुधारणांचे प्रयत्न
भाग ९ – समाजसुधारणा – दलित कोण आणि कसे?
भाग १० – समाज सुधारणा – दलितांच्या उद्धाराचे प्रयत्न
भाग ११ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न

लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.

सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.

सुधीर भिडे

field_vote: 
0
No votes yet

अलीकडेच माझ्या वाचण्यात 'जेंडरिंग कास्ट' नावाचं उमा चक्रवर्ती यांचं पुस्तक आलं. त्यात हिंदू लग्नव्यवस्थेत 'एज ऑफ कन्सेंट' आणि कन्सेंट म्हणजे काय यावर खोलात जाऊन लिहिलं आहे. मुळात हिंदू लग्न विधींमध्ये, 'कन्यादान' हा विधी मुलीचा लग्नाला होकार आहे किंवा नाही हे विचारात न घेता रचलेला आहे. एका पुरुषाकडून स्त्री दुसऱ्या पुरुषाला दान केली जाते. तीसुद्धा सालंकृत आणि हुंडा देऊन.
जेव्हा ही प्रथा मोडायचा प्रयत्न केला आणि सिव्हिल मॅरेज कायदा आला, तेव्हा असं लग्न घरातील वडील मंडळींना मोडता यावं अशा पद्धतीनं त्या कायद्यात तरतुदी केल्या गेल्या (नोटीस देणे आणि नोटीस देण्यात आणि प्रत्यक्ष लग्न होण्यात बराच वेळ ठेवणे). ही सगळी लूपहोल्स स्त्रियांनी जातीबाहेर लग्न करू नये याकरिता ठेवण्यात आली होती (आणि अजूनही आहेत). हे कायदे अशा प्रकारे रचण्यातही टिळक फळीचा हात होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात हिंदू लग्न विधींमध्ये, 'कन्यादान' हा विधी मुलीचा लग्नाला होकार आहे किंवा नाही हे विचारात न घेता रचलेला आहे.

अत्यंत खोटारडे, हिंदुधर्माचा अवमान करणारे आणि कमालीच्या हीन दर्जाचे वाक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात हिंदू लग्न विधींमध्ये, 'कन्यादान' हा विधी मुलीचा लग्नाला होकार आहे किंवा नाही हे विचारात न घेता रचलेला आहे. एका पुरुषाकडून स्त्री दुसऱ्या पुरुषाला दान केली जाते. तीसुद्धा सालंकृत आणि हुंडा देऊन.

अशाप्रमाणे हे लिहिले की तो एक Rhetorical question होतो आणि त्याला एकच उत्तर अपेक्षित असते जे प्रश्नकर्त्याच्या मनात असते.

प्रत्यक्षात असे असते काय? दान करणारा एक पुरुष हा प्रत्यक्षात मुलीचा बाप असतो. ही वस्तुस्थिति नजरेआड ठेऊन असा प्रश्न विचारता येईल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्व च धर्म,सर्वच धर्मातील जाती,पंथ,उपजाती , उप पंथ सर्वच समाजात.
काही से वर्ष पूर्वी स्त्रियांना काहीच अधिकार नव्हते
सर्वच ठिकाणी लग्न कमी वयात च होत.
नवरा आई बाप च निवडत
उगाच च असे काही जण दाखवत अस्तात ..ज्या काही वाईट रीती रीवज होते ते फक्त हिंदू धर्मात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0