एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग १४

समाजातील बदल – मुंबईचा विकास

सुधीर भिडे

या दोन भागांत महाराष्ट्रातील आजच्या पाच मोठ्या शहरांचा – पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई - एकोणिसाव्या शतकात विकास कसा झाला ते पाहू. या शतकात मुंबईने फार मोठी उडी मारली. १९२० साली मुंबई देशाचे आर्थिक केंद्र बनले होते. पुणे हे देशातील शिक्षण, समाजसुधारणा आणि राजकारण यांचे केंद्र म्हणून विकसित झाले. त्या मानाने नाशिकचा विकास हळू राहिला. नागपूरचा इतिहास थोडा निराळा आहे. नागपूर त्यावेळचा सेंट्रल प्रोव्हिन्सेसचा भाग होते तर औरंगाबाद (संभाजीनगर?) त्या काळात हैदराबादच्या निजामाच्या राज्यात होते. पुणे आणि मुंबई या शहरांची माहिती जास्त सविस्तर दिली आहे. त्यावरून त्याकाळातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थितीची कल्पना येते.

१८१८ साली पुणे मोठे आणि महत्त्वाचे शहर होते. १९२० साली मुंबई सर्वांत मोठे आणि महत्त्वाचे शहर बनले. मुंबईचा विकास याच शतकात झाला. मुंबईचा विकासाची माहिती मुंबईचे वर्णन ह्या पुस्तकातून घेतली आहे. हे पुस्तक १८६३ साली गोविंद नारायण माडगावकर यांनी लिहिले (पुन:प्रकाशन, समन्वय प्रकाशन, २०१२). या पुस्तकात मुंबईच्या विकासाबरोबर त्या काळातील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थितीची माहिती मिळते. या पुस्तकातील बरीच माहिती त्याकाळातील ज्ञानोदय या पत्रातून घेतली आहे.

१७०० साली मुंबईचा गवर्नर, निकोलस वेट लिहितो, "हे अती दरिद्री मोडकळीस आलेले बेट आहे." येथून मुंबईच्या वाटचालीची सुरुवात झाली आणि दोनशे ‌वर्षांत मुंबई भारताची आर्थिक राजधानी झाली.

भौगोलिकरीत्या मुंबई अशी बनली

मुंबई हा सात बेटांचा समूह होता. १७८० साली वरळीच्या खाडीत बांध बांधण्यात आला.

या खाडीमुळे अर्धी मुंबई पाण्यात होती ती पाण्याबाहेर आली. मुंबईची रचनाच बदलून गेली. वस्तीसाठी मोठा भूभाग तयार झाला. अशा तर्‍हेने वरळीचा बांध मुंबईचा आमूलाग्र बदल करणारी घटना ठरली. कुलाबा हे दक्षिणेकडील बेट होते. १८३८ साली हे बेट इतर भागांत भर घालून जोडण्यात आले. गिरगाव ही मुंबईतील उच्चभ्रू श्रीमंत लोकांची बंगल्यांची जागा बनली. वांद्र्याच्या खाडीवर जमशेटजी जिजिभाय यांनी दीड लक्ष रुपये खर्च करून पूल बांधला; त्यामुळे वांद्र्यापलीकडे वस्ती वाढू लागली.

पिण्याच्या पाण्याची सोय

१८५७ साली सरकारने याबाबत काम चालू केले. विहाडच्या (विहार) डोंगरात एक धरण बांधून तलाव तयार करण्यात आला. हा तलाव १२०० एकर जागेवर पसरला आहे. तेथून जमिनीखालून पाईपाद्वारे पाणी मुंबईत आणण्यात आले आणि ते पाणी नळाद्वारे घरोघरी पोहचविण्यात आले. आजही (२०२१) हा तलाव मुंबईला पाणी पुरवितो.

पाण्याबाबतीत अजून एक मनोरंजक माहिती ही की १८६०पर्यंत अमेरिकेहून मुंबईस बर्फ आयात केले जाई. मुंबईचे वर्णनमध्ये माडगावकर लिहितात –

थिजलेल्या पाण्यास बर्फ म्हणतात. प्रतिदिवशी १००० रुपयाचे (आजच्या किमतीत २० लाख रुपयाचे) बर्फ विकले जाई. हे दगडासारखे घट्ट असून रंग स्फटिकासारखा असतो. शिशाच्या पत्र्याच्या वखारीत हे बर्फ साठविले जाते. हे फार थंड असते. येथील बर्फाची मागणी पाहून एका इंग्रज माणसाने मुंबईत १८६२ साली बर्फाचा कारखाना चालू केला.

टाउन हॉल आणि एशियाटिक सोसायटी

१८२६मध्ये या दोन इमारतींचे काम चालू झाले. कामासाठी जनतेकडून रोखे स्वरूपात पैसे उभे केले. इमारत पूर्ण करण्यास पंधरा वर्षे लागली. या इमारतीत प्रॉव्हिन्शियल कौन्सिल, दरबार व सरकारी ऑफिसे होती. ॲग्रीकल्चरल सोसायटी आणि जिऑग्राफिकल सोसायटी यांचीही ऑफिसे येथेच आणण्यात आली. टाउन हॉलच्या उत्तरेस एशियाटिक सोसायटीचे ग्रंथालय आहे.


Asiatic Society

टाऊन हॉलचे त्या काळातील चित्र. वाहतुकीत घोडागाडी आणि बैलगाडी दिसत आहेत. या ग्रंथालयात एक लाख ग्रंथ आहेत. याच प्रमाणे पुरातन शिलालेख, ताम्रपट, नाणी वगैरे इथे ठेवली आहेत. माडगावकर लिहितात –

सन १८६१ त मुंबईचे फक्त ६५ सभासद आहेत. लोकांनी या ग्रंथालयाचा उपयोग करून घेऊ नये ही किती दुःखाची गोष्ट! आम्हां लोकांमध्ये अशी पुस्तकालये नसल्याने सामान्यांस त्याचा काय उपयोग ते कळत नाही.

संग्रहालय

एल्फिन्स्टन यांनी मुंबईतील पहिले संग्रहालय १८५५ साली चालू केले. १८५७ साली हे संग्रहालय टाउन हॉलमध्ये नेण्यात आले. भाऊ दाजी लाड आणि जगन्नाथ शंकरशेठ यांनी प्रयत्न करून संग्रहालयाच्या इमारतीसाठी रक्कम उभी केली. १८७१ साली जिजामाता उद्यानात ही इमारत तयार झाली. सध्या हे संग्रहालय भाऊ दाजी लाड मुंबई शहर संग्रहालय या नावाने ओळखले जाते.

(डॉ. दिलीप वाणी, लाड शक वाणी समाजाचा इतिहास, फेसबुक)

माडगावकरांच्या लिखाणात जो पुरातन शिलालेख, ताम्रपट, नाणी यांचा उल्लेख आला आहे तो हे संग्रहालय टाउन हॉलमध्ये असतानाचा असावा.

व्यापार आणि उद्योग

व्यापार वृद्धीसाठी मुंबईत मोठमोठाले व्यापारी आणि सावकार येऊन राहतील या साठी मालमत्तेचे रक्षण आणि जकातीची माफी अशा सोयी कंपनी सरकारने केल्या.

कुलाब्यास जमशेटजी जिजीभाय यांनी स्वत:च्या व्यापारासाठी बोटीचा खाजगी धक्का बांधला. त्यांच्या स्वत:च्या बोटी होत्या आणि सिंगापूर आणि चीनबरोबर व्यापार चाले.

१७९० साली माजगाव येथे बंदुकीची दारू बनविण्याचा कारखाना चालू झाला. १८२३मध्ये कुलाब्यात तोफा, तोफांचे गाडे आणि तोफांचे गोळे बनविण्याचा कारखाना सुरू झाला. लोखंड आणि पितळाचे ओतीव काम येथे केले जाई. वाफेवर चालणारी यंत्रे होती. येथे शेकडो माणसे काम करीत.

कुलाब्यातच वेधशाळा चालू झाली. येथे हवेचे मोजमाप करणारी यंत्रे बसविण्यात आली.

१८५२ साली बोरीबंदरजवळ बोटींसाठी एक धक्का बांधण्यात आला. रेल्वेसाठी लागणारे सामान आणि रूळ येथेच उतरवले जात. त्यापलीकडे माजगाव येथे मोठे बंदर विकसित करण्यात आले.

१६८१ साली कंपनीने आपल्या नावे नाणी पाडण्यास सुरुवात केली. लवकरच कंपनीच्या नाण्यांची ख्याती झाली; आणि मुघल व पेशवाईपेक्षा ही नाणी जास्त वापरात येऊ लागली. वाफेच्या यंत्रावर चालणारी टांकसाळ १८२५ साली चालू झाली. जे काम करण्यास शेकडो सोनार खपत असत ते काम यंत्राद्वारे चालू झाले.

बावन्न लाख भांडवल घालून १८४० साली मुंबई बँकची स्थापना झाली. १८६०पर्यंत बँकेच्या ठेवी तीन कोटीपर्यंत वाढल्या. ही व्यावसायिकांसाठी बँक होती. सामान्यासाठी एक निराळी बचत बँक काढण्यात आली.

वाहतूकीसाठी मुंबईत २,६०० खाजगी घोडागाड्या होत्या. याशिवाय ५३० भाड्याच्या घोडागाड्या होत्या. मालसामान वाहून नेण्यासाठी ७,००० बैलगाड्या होत्या. याशिवाय घरगुती ४०० पालख्या, मेणे होते.

मुख्य व्यापार तंबाखू, तपकीर, गांजा, अफू आणि कापूस यांचा असे. मुंबईत तंबाखू भडुच, सुरत, धारवाड, मिरज आणि सिंध या भागांतून येत असे. मुंबईत अफीणीचा (अफू) व्यापार कोट्यावधी रुपयांचा होत असे. सन १८६१ साली ४५,००० पेट्यांचा व्यापार झाला. एका पेटीस पंधराशे रुपये पडत. (आजच्या किमतीत तीस लाख) या व्यापारात जकातीपासून सरकारास लाखो रुपये उत्पन्न होत असे. हा सर्व माल चीनला जाई.

मुंबईत अमली पदार्थ विक्रीची जागोजागी दुकाने होती. ह्या कैफामुळे कित्येकांची शरीरे जळून लोक बुद्धी भ्रष्ट झाले आहेत. – माडगावकर.

जहाज बांधणी

(माहिती भारतीय नौकानयनाचा इतिहास, डॉ. केतकर, मर्वेन टेक्नॉलॉजीज, २०१९ या पुस्तकातून घेतली आहे.)

सुरत येथे इंग्रजांचे जहाजबांधणीचे काम चाले. तेथे इंग्रजांकरिता वाडिया कुटुंब हे काम करत असे. सुरतमधील जहाज बांधणारे सर्व कारागीर पारशी होते. इंग्रजांनी वाडिया कुटुंबातील लोवजी वाडिया या मास्टर बिल्डरला जहाजबांधणीसाठी मुंबईला बोलाविले. १६७३ साली माझगाव येथे ३०० टनापर्यंत जहाजे उभी करण्याचा धक्का बांधण्यात आला. या धक्क्याजवळच जहाज बांधणीसाठी १६० फुट X ४५ फुट आकाराची गोदी बांधण्यात आली. लोवजी वाडिया यांनी ईस्ट इंडिया कंपनीसाठी २७ जहाजे बांधली. १७७४मध्ये त्यांचा मृत्यू झाला. या नंतर त्यांचा नातू रुस्तमजी यास ७०० रुपये पगारावर (आजच्या हिशोबाने १४ लाख) मास्टर बिल्डर म्हणून नेमण्यात आले. त्यांच्या नंतर त्यांचा मुलगा धनजी वाडिया मास्टर बिल्डर झाला. त्यांनी बांधलेल्या जहाजांच्या नोंदी मिळतात.

जहाजाचे नाव साल वजन – टन तोफा
कॉर्न वालिस १८०० १३६३
पिट १८०५ ३६
सालसेत्ती

१८०७

३६
मिंडेन १८१० १७२१
कॉर्न वालिस II १८१३ १८०९ ७४
व्हिक्टर १८१४
ट्रिंकोमालि १८१७

आपण हे पाहू शकतो की जसा अनुभव वाढत गेला तशी मोठी जहाजे बांधणे सुरू झाले.


First Sailboats

वरील सर्व जहाजे लाकडी बांधकामाची आणि शिडाची होती. या जहाजांची चाल वार्‍यावर अवलंबित असे. १८२०मध्ये वाफेच्या इंजिनावर (बाष्प शक्तीच्या आधारावर) पंखा (प्रोपेलर) फिरवून जहाजाला गती देण्याचे तंत्र ज्ञान विकसित झाले. पहिली वाफनौका कलकत्त्यात बांधली गेली.
१८२९ साली माजगाव गोदीत ४११ टनाची पहिली वाफनौका बनवली गेली. या जहाजास ८० अश्वशक्तीची दोन इंजिने बसविली होती. यानंतर १८६०पर्यंत माजगाव गोदीत १२ वाफनौका बांधण्यात आल्या.


First Sailboats

पहिल्या वाफनौकांना शिडेसुद्धा असत.

अर्देसर वाडिया

अर्देसर वाडियांचे वडील मास्टर बिल्डर होते. त्यांनी चौदाव्या वर्षी डॉकयार्डमध्ये काम करायला सुरुवात केली. १८३० साली त्यांनी स्टीम इंजिनचा अभ्यास चालू केला. त्यांनी आपल्या घरात एक छोटे स्टीम इंजिन बनवून एका होडीला ते लावले. त्यांनी आपल्या घरात कोळश्यापासून वायू बनविण्याचा कारखाना चालू केला. या वायूपासून घरात दिवे लावण्याची व्यवस्था केली. एल्फिन्स्टन इंस्टिट्यूटमध्ये ते सहाय्यक म्हणून काम करू लागले. १८३८ साली ते शिक्षणासाठी इंग्लंडला गेले आणि त्यांनी मरीन इंजिनीयरिंगचा अभ्यास केला. माझगाव डॉकमध्ये त्यांची इन्स्पेक्टर म्हणून नेमणूक झाली. त्यांना फेलो ऑफ रॉयल सोसायटी म्हणून गौरविण्यात आले. त्यानंतर ते अमेरिकेला गेले आणि तिथे ते इलेक्ट्रोप्लेटिंगचे तंत्र शिकले.

मुंबई इलाख्यातील सैन्य

(काळे, गोरे हे शब्द माडगावकरांचे, त्यावेळचे लेखक भारतीय सैनिकांचा काळे असा उल्लेख करतात. गोडसे भटजींच्या लिखाणातही हे दिसते.)

साल गोरे सैनिक काळे सैनिक एकूण
१६८६ ५०० अंदाजे
१७७७ ६०००
१७९४ ३२७३ १२५२८ १५८०१
१८०७ ५००० २३४५० २८४५०
१८४७ ११२१० ६५८४५ ७७०५५

१८५७च्या उठावाच्या अगोदर इंग्रजांचे चांगले मोठे सैन्य उभे झाले होते.

मुंबईची लोकसंख्या

१८१६ – १,६१,७५०, १८४४ – ५,२४,१२१, (जातीनिहाय - ~ ७,००० ब्राह्मण, ~ ३ लाख हिंदू, ~२,००० जैन, ~१,२४,०० मुसलमान, ~१,१४,००० पारशी, १३,००० ख्रिश्चन.) ब्राह्मण आणि इतर हिंदू अशी मोजणी केली जाई हे लक्षणीय आहे. ब्राह्मणांनी स्वत:ला समाजापासून किती दूर केले होते याचे हे निदर्शक आहे. पारशी लोकांची मोठी वस्ती होती, आज काही हजार आहे.

राज्यकारभार

मुंबई इलाख्याचा कारभार गव्हर्नर पहात असे. त्यांचा वर्षाचा पगार १,२०,००० (एक लाख वीस हजार रुपये) असे. त्याला मदत करण्यासाठी चार व्यक्तींचे कौन्सिल असे. प्रत्येक कौन्सिलरला ६०,००० रुपये पगार मिळे. यांचा एकत्रित वार्षिक पगार ३,६०,००० (आजच्या हिशोबांनी ७२ कोटी) होतो. या शिवाय या सर्वांना राहण्यास बंगला, ये-जा करण्यास घोड्याची बग्गी आणि घरात नोकरचाकर देण्यात येत. या शिवाय प्रत्येक जिल्ह्यात नोकरशाही असेच. यांचा सर्वांचा पगार अर्थातच भारतीय जनता भरे. १८६० साली सरकारने इन्कम टॅक्स आणि स्टॅम्प फी चालू केली.

मुंबईची आर्थिक सुबत्ता

शहरातील सरकारी आणि खाजगी मालमत्ता –
१६६६ – २८,३४० रुपये
१६८८ – ६४,९६० रुपये
१८१२ – १,३२,६०,००० रुपये
१८५८ – ५० कोटी रुपये
१८६१ साली मुंबईतील सरकारी खजिन्यातील रोकड – ३ कोटी रुपये, हिंदुस्थानच्या सरकारकडे रोकड १४ कोटी रुपये.

मुंबईतील पारशी समाज

मुंबईत पारशी लोक निराधार परिस्थितीत आले. त्यांनी व्यापाराच्या जोरावर कोट्यवधींची संपत्ती मिळविली. १८५४ साली मुंबईत १, १०, ००० (एक लाख दहा हजार) पारशी लोक होते. त्या काळातील सर्वांत श्रीमंत आणि मोठे पारशी जमशेटजी जिजीभाय हे होते. त्यांनी व्यापारात अमाप संपत्ती मिळविली. त्यांनी त्यांच्या आयुष्यात मदत आणि दान दिलेली रक्कम ३५ लाख (आजच्या हिशोबांनी ७००० कोटी) एवढी होते. मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल, ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स त्यांच्याच मदतीने चालू झाले.

जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे

त्या काळात जगन्नाथ शंकरशेठ हे मुंबईतील प्रभावी व्यक्तिमत्व होते. जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म १८०३ साली सराफाच्या श्रीमंत कुटुंबात झाला. वयाच्या अठराव्या वर्षी जगन्नाथ यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर व्यवसायाचा सांभाळ करण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांच्या वडिलांनी व्यापारात इतकी संपत्ती मिळवली होती की, त्यांचं आयुष्य मजेत गेलं असतं. परंतु त्यांचा समाजकार्याकडे कल होता. त्यांचा मुंबईच्या जडणघडणीत मोठा वाटा होता. जमशेटजी जिजीभाय हे त्यांचे मित्र होते.


Jagannath Shankarshet

१८२३ साली ब्रिटिश पार्लमेंटकडे सती या अमानुष प्रथेवर बंदी आणण्यासाठी एक अर्ज केला गेला. त्यावर राजा राममोहन रॉय आणि नाना शंकरशेट यांच्या प्रामुख्यानं सह्या होत्या. पुढे म्हणजे १८२९ साली ज्यावेळी सती चालीस बंदी घालणारा कायदा आणला गेला, त्यावेळी नाना शंकरशेट यांनी त्याला जाहीर पाठिंबा दिला होता. सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, या तत्त्वावर स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले.

नाना शंकरशेठ यांनी १८२४ साली स. का. छत्रे यांच्या सहाय्याने बाँम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापिली. शिक्षण प्रसारासाठी मुंबईत एका भारतीयाने स्थापन केलेली ही पहिलीच संस्था होती. एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट या संस्थेची १८३७ साली स्थापना झाली; या मागची प्रेरणाही जगन्नाथ शकरशेठ यांचीच होती.

नाना आणि जिजीभोय यांनी मिळून मुंबईत शिक्षण आणि उद्योग या दोन्ही क्षेत्रांत मोठे योगदान दिले. दोघांनी मिळून १८४५ साली इंडियन रेल्वे असोसिएशनची स्थापना केली. या संस्थेच्या प्रयत्नाने आठ वर्षांतच मुंबईत भारतातील पहिली रेल्वे गाडी सुरू झाली. ग्रेट इंडियन पेनींनस्यूलर (जी. आय. पी.) रेल्वेची स्थापना या दोघांच्या प्रेरणेनेच झाली.

जगन्नाथ शंकरशेट यांनी स्थापन केलेल्या संस्था :

  • १८४५ : ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना
  • १८४८ : स्ट्यूडंट्‍स लिटररी व सायन्टिफिक सोसायटी
  • १८४९ : जगन्नाथ शंकरशेट मुलींची शाळा
  • १८५२ : बाँबे असोसिएशन स्थापण्यात पुढाकार घेतला.
  • १८५५ : विधी महाविद्यालयाचा पाया घातला.
  • भारतीयांना कलाशिक्षण मिळावे, म्हणून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्‌च्या स्थापनेत सक्रिय भाग घेतला.
  • जे. जे. हॉस्पिटलचा पाया घालून त्यांनी रुग्णसेवेस चालना दिली.
  • बाँबे स्टीम नॅव्हिगेशन कंपनीची स्थापना केली.

३१ जुलै १८६५ रोजी नाना शंकरशेट यांचं निधन झालं.

माहिती marathim.comमधून

निष्कर्ष

पुणे, नागपूर, कोल्हापूर या शहरांना विकासाची पार्श्वभूमी होती. ही नगरे त्यावेळच्या संस्थानांच्या राजधानीची शहरे होती. मुंबईचा विकास उत्स्फूर्तपणे झाला. मुंबईतील मराठी लोकांचे लक्ष शिक्षण, समाजसुधारणा यांकडे होते. तर उद्योगधंदा पारशी आणि गुजराती लोकांकडे होता.

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील शहरांचा इतिहास म्हणजे मुंबईच्या उदयाचा इतिहास. त्या शतकाच्या शेवटी मुंबई शहर देशाची आर्थिक राजधानी बनले. मुंबईच्या उत्कर्षाचे पुष्कळसे श्रेय पारशी समुदायाला जाते. जमशेटजी जिजिभाय यांनी त्यांच्या आयुष्यात ७००० कोटी रुपये दानधर्म आणि मदत या स्वरूपात दिले हे वाचून थक्क व्हायला होते. मुंबईच्या जडणघडणीत जगन्नाथ शंकरशेठ यांचे मोठे योगदान होते.

मुंबईत सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रांत ज्या घटना घडत होत्या त्यांतून एक गोष्ट लक्षात येते ती ही की मुंबईचा समाज १८५७च्या उठावापासून फार दूर होता. तो समाज त्या काळातील संस्थानिकांचा जराही विचार करत नव्हता. आपण १८५७च्या उठावाचा विचार करू त्यावेळी हा मुद्दा परत येईलच.

पुढच्या भागात – भाग १५मध्ये पुण्याच्या विकासाची माहिती घेऊ.

मागचे भाग -

भाग १ – एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती
भाग २ – अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी
भाग ३ – अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती
भाग ४ – अठराव्या शतकातील शासनयंत्रणा
भाग ५ – धर्मशास्त्रे आणि कर्मकांडी धर्म
भाग ६ – अठराव्या शतकातील धर्माचे स्वरूप
भाग ७ – धार्मिक सुधारणांची आवश्यकता
भाग ८ – धार्मिक सुधारणांचे प्रयत्न
भाग ९ – समाजसुधारणा – दलित कोण आणि कसे?
भाग १० – समाज सुधारणा – दलितांच्या उद्धाराचे प्रयत्न
भाग ११ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १२ – समाजसुधारणा – स्त्रियांचे प्रश्न
भाग १३ – समाजातील बदल

लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.

सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.

सुधीर भिडे

field_vote: 
0
No votes yet