(आमचा गणेशोत्सव-काही आठवणी-४)

(आमचा गणेशोत्सव-काही आठवणी-४)
चलनी नाण्यांची मनमोहक सजावट
एका वर्षी आम्ही आमच्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी चलनी नाणी ही ‘थीम’ निवडली होती. गणपतीची मूर्ती पारंपरिक पद्धतीने रंगविण्याऐवजी तिच्यावर पूर्णत: चलनी नाणी चिकटविली होती. तसेच सजावटीचे जे मंदिर केले होते त्याच्या भिंती, खांब आणि कमानींनाही विविध प्रकारची नाणी लावली होती. सजावटीला ही नाणी लावतानाही ती सरभेसळ पद्धतीने न लावता त्यात एकाच प्रकारच्या नाण्यांच्या आकृत्यांची मनमोहक सजावट केली होती. आधीच्या वर्षीच्या सुपारीच्या गणपतीप्रमाणेच आमच्या या चलनी नाण्यांच्या गणपतीलाही महापालिकेच्या स्पर्धेत मूर्ती आणि सजावटीला पारितोषिक मिळाले होते.
खरे तर मूर्ती व सजावटीसाठी चलनी नाणी वापरण्याची ही कल्पना आम्हाला आदल्या वर्षीच्या संकल्पनेवर विचार करतानाच सुचली होती. परंतु आयत्या वेळी एवढी नाणी उपलब्ध न झाल्यास पंचाईत होईल हे लक्षात घेऊन आम्ही ही कल्पना पुढील वर्षासाठी राखून ठेवली होती. त्यामुळे पुढील वर्षी आम्ही गणेशोत्सवाच्या बºयाच आधीपासून तयारीला लागलो. ही गोष्ट सुमारे ५० वर्षांपूर्वीची आहे. त्यावेळी १, २, ३, ५, १०, २०, २५ व ५० पैशांची तसेच एक रुपयाची नाणी चलनात होती. गणेशोत्सव सप्टेंबर महिन्यात होता. त्यामुळे गावातील दुकानदारांना आम्ही विविध प्रकारची चलनी नाणी जमा करून ती आम्हाला देण्याची विनंती जून महिन्यातच केली. मूर्ती व सजावटीसाठी नेमकी किती नाणी लागतील याचा अंदाज करणे कठीण होते. त्यामुळे जेवढी जमतील तेवढी नाणी घेण्याचा आमचा विचार होता. दुकानदारांकडून त्यांनी जमा करून ठेवलेली नाणी आणण्याआधी आम्ही कार्यकर्त्यांनी आपापल्या घरातील चलनी नाणी गोळा केली. चलनात असलेली नाणी विविध आकाराची व विविध नक्षींची होती. त्यामुळे मधे अजिबात रिकामी जागा न सुटता ही नाणी कशी चिकटवावी लागतील व त्यातूनही विविध आकृतीबंध कसे तयार करता येतील याचा पूर्वाभ्यास आम्ही ही घरातून गोळा केलेली नाणी वापरून केला. ते करत असताना आमच्या असे निदर्शनास आले की, चलनात असलेल्या नाणी समान काळ वापरात नसतात. त्यामुळे त्यांची चकाकी एकसारखी नसते. काही नाणी कमी वापर झाल्याने चकचकीत असतात तर काही नाण्यांची चकाकी बराच वापर झाल्याने निरनिराळ््या प्रमाणात कमी झालेली असते. आम्हाला मूर्ती व सजावटीसाठी एकसारखी चकाकी असलेली नाणी वापरणे गरजेचे होते.
अशी एकसारख्या चकाकीची नाणी कशी मिळविता येतील याचा विचार करताना गोळा केलेली नाणी धुवून बघण्याची कल्पना काही कार्यकर्त्यांच्या डोक्यातून निपजली. त्यानुसार थोडी नाणी बादलीत घालून सोड्याने धुतली. याने नाण्यांना चकाकी येण्याऐवजी अगदी उलटा परिणाम झाला. असलेली थोडीफार चकाकी जाऊन सर्व नाणी पांढरीफटक झाली. त्यामुळे दुकानदारांकडून गोळा करून आणललेली नाणी धुवून घेऊन ती सजावटीसाठी वापरता येणार नाहीत, हे नक्की झाले. सर्व नाणी एकसारख्या चकाकीची हवी असतील तर ती सर्व पूर्णपणे नवीन व अजिबात न वापरलेलीच असावी लागतील, याचीही जाणीव झाली.
परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर विविध मूल्यांची कोरी, चकचकीत नवी नाणी कशी मिळवायची हा नवा प्रश्न उपस्थित झाला. चौकशी करता असे समजले की, मुंबईला टांकसाळीतून पाडलेली नवी कोरी नाणी रिझर्व्ह बँकेकडून रोज व्यापारीवर्गासाठी वितरित केली जातात. प्रत्यक्ष तेथे जाऊन पाहिल्यावर हे खरे असल्याची खात्री पटली. तेथे नाणी घेण्यासाठी भली मोठी रांग असायची. शिवाय प्रत्येक प्रकारच्या नाण्यांच्या ठराविक वजनाच्या छोटेखानी पोतेवजा पिशव्या दिल्या जायच्या. प्रत्येक प्रकारच्या नाण्याची किमान एक तरी पिशवी घ्यावी लागे.
अशा प्रकारे हवी असलेली एकाच प्रकारच्या चकाकीची नवी कोरी नाणी एकाच ठिकाणी हवी तेवढी उपलब्ध होऊ शकतात, याची खात्री झाली.
पण हवी तशी नाणी मिळविण्याचा हा मार्ग आमच्या दृष्टीने सोपा नव्हता. एरवी आम्ही सजावटीसाठी लागणारे सामान उधारीवर आणायचो. नंतर एखादा ‘स्पॉन्सर’ मिळवून किंवा जमलेल्या वर्गणीतून ही उधारी फेडली जायची. रिझर्व्ह बँकेतून कोरी नाणी आणायची तर नाण्यांच्या मूल्याएवढी रक्कम आधी उभी करणे गरजेचे होते. शिवाय ही रक्कम नेमकी किती लागेल याचाही नेमका अंदाज आधी करणे कठीण होते. एकाऐवजी दोन ‘स्पॉन्सर’ मिळवून व नेहमीपेक्षा आधी व जास्त वर्गणी गोळा करून आम्ही या अडचणीवरही मात केली. मूर्ती व सजावटीसाठी १८ ते २० हजार रुपयांची नाणी लागतील, असा आम्ही ढोबळ अंदाज केला होता. आपल्याला हव्या तेवढ्या रकमेची नव्हे तर ठराविक वजनाच्या पिशवीच्या हिशेबाने रिझर्व्ह बँकेतून नाणी दिली जात असल्याने आम्हाला अंदाजित गरजेपेक्षा जास्त म्हणजे सुमारे २२ हजार रुपयांची नाणी घ्यावी लागली. त्यासाठी आमच्या मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी लागोपाठ चार दिवस मुंबईला जाऊन जेथून नवी कोरी सुटी नाणी दिली जायची त्या रिझर्व्ह बँकेच्या खिडकीपुढे रांग लावली.
खर्चाच्या दृष्टीने त्या वर्षीची चलनी नाण्यांची मूर्ती व सजावट आम्हाला इतर वर्षांच्या तुलनेने जास्त खर्चिक पडली. त्यासाठी कष्टही खूप घ्यावे लागले. परंतु त्यातून साकारलेल्या मनमोहक मूर्ती व सजावटीची दर्शनासाठी आलेल्या सर्वांनीच मुक्त कंठाने स्तुती केली तेव्हा केलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे समाधान मिळाले. संस्कारक्षम वयात आलेला हा अनुभव आम्हा मुलांना बरेच काही शिकवून गेला.

field_vote: 
0
No votes yet