अंत झाला अस्ताआधी - मिहाइल सर्गेय्विच गोर्बाचोव

It is not always going from bad to worse that leads to revolution. What happens most often is that a people that puts up with the most oppressive laws without complaint, as if it did not feel them, rejects those laws violently when the burden is alleviated.....The evil that one endures patiently because it seems inevitable, becomes unbearable the moment its elimination becomes conceivable. - Alexis De Tocqueville *
(* source - The collapse - Mary Elise Sarotte)

मिखाईल गोर्बाचे‌व मिहाईल

मिहाइल गोर्बाचोव ह्या नावाने ओळखली जाणारी जागतिक स्तरावरची एक श्रेष्ठ व्यक्ती आणि खरे तर एक सत् शक्ती गेली 3 दशके इतिहासाच्या अडगळीत पडलेली असताना आज अखेरीस जग सोडून गेली तेव्हा ह्या नावाचे महत्त्व समजण्याच्या कितीतरी पुढे जग निघून आले आहे. आजच्या कर्त्या पिढीला ह्या इतिहासाशी काहीच देणेघेणे नाही. ज्येष्ठ पिढीला आठवण असेलही पण सोयरसुतक फारसे कुणालाच नाही. विशेषत: रशियामध्ये. असो.

गोर्बाचोव हे 1985 ते 1991 - जेव्हा सोविएत संघाचे विघटन झाले तोपर्यंत - आधी सोविएत साम्यवादी पक्षाचे चिटणीस, नंतर सर्वोच्च सोविएतचे अध्यक्ष आणि अखेर सोविएत संघाचे अध्यक्ष होते. हा कालखंड संपूर्ण जगाच्या इतिहासाच्या दृष्टीने एका मोठ्या परिवर्तनाचा आणि एका विनाशाच्या सावलीने झाकोळलेल्या काळातून बाहेर पडण्याचा ठरला.

पाश्चात्य विद्वान-विश्लेषकांनी नेहमीच गोर्बाचोव ह्यांचे योगदान कमी लेखले आहे, आणि सोविएत संघामधल्या ह्या काळातल्या घडामोडी एखाद्या अनियंत्रित प्रवाहाप्रमाणे गोर्बाचोव ह्यांना न जुमानता घडत गेल्या, अशी मांडणी केली आहे. ही मांडणी गोर्बाचोव ह्यांच्यावर अन्याय करणारी आहे असे मला वाटते.

गोर्बाचोव बोल्शेविक क्रांती आणि महायुद्ध ह्यांच्या मधल्या काळात जन्मलेले. सोविएत शिक्षण व्यवस्थेतच शिक्षण घेतलेले आणि शेतकरी वर्गातून आलेले होते. त्यांच्या 'पीपल-स्किल्स'मुळेच मुख्यत: ते पक्षात चढत गेले व पन्नाशीच्या आत पॉलिट ब्यूरोचे सदस्य बनले. त्यांच्या आसपासची परिस्थिती - एका बाजूला महायुद्धाच्या खाईतून पुन्हा वर उठून सोविएत संघ महासत्ता बनला होता, आर्थिक आघाडीवर ब्रेझनेव युगातील स्थैर्य आणि साचलेपणा, उत्पादनातील संख्यात्मक व गुणात्मक घट हे मुद्दे होते, आंतरराष्ट्रीय पातळीवर शीतयुद्ध 'देतोंत्' (le detente) म्हणजे तुलनेने शांततेच्या काळात होते, जे अफगाणिस्थानमध्ये सोविएत सैन्य घुसल्यावर पुन्हा प्रज्वलित झाले, अण्वस्त्रस्पर्धेत सोविएत संघाने अमेरिकेची बरोबरी केली होती, अंतराळ क्षेत्रात स्पेस-स्टेशन्स सारखे उपक्रम यशस्वी केले होते. पण उपलब्धी कितीही असल्या तरी सत्तरच्या दशकात आणि पुढेही चालू राहिलेली आर्थिक पीछेहाट हा अधिक गंभीर मुद्दा होता. सरकारी यंत्रणेचा स्वत: भाग असल्यामुळेच गोर्बाचोव ह्यांचे विचार सुधारणा-बदल ह्या दिशेने सत्तेवर येण्यापूर्वीच पक्के झाले होते.

माओ झे डाँग यांचे निधन 1976 मध्ये झाले आणि 1978मध्ये दंग झियाओ फंग सत्तेवर आले, आणि त्यांनी चीनमध्ये आर्थिक सुधारणा आणायला सुरुवात केली. गोर्बाचोव हे पाहत होते आणि अशा सुधारणा सोविएत संघातही करायला हव्यात हे त्यांनी ठरवले होते. म्हणूनच 'पेरेस्त्रोइका' (पुनर्रचना) ही त्यांची सत्तेवर आल्यावर पहिली घोषणा होती. ह्या सुधारणा मुख्यत: आर्थिक होत्या. उत्पादनावरील नियंत्रण कमी करणे, उत्पादनवाढीसाठी विशेष प्रयत्न, शेतीतील सुधारणा, पंचवार्षिक योजनेची पुनर्मांडणी अशा विविध प्रकारच्या होत्या. परंतु त्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या प्रतिसादामुळे, नोकरशाहीच्या असहकाराच्या आणि अडवणुकीच्या धोरणामुळे त्यांना ह्या सुधारणा राजकीय क्षेत्रातही आणणे भाग पडले. ह्याला त्यांनी 'ग्लासनोस्त' (खुलेपणा) हे नाव दिले. सुधारणा पुढे रेटण्यासाठी खुली टीका करायला पत्रकारांना आणि राजकीय नेत्यांना उघड प्रोत्साहन देणे हा ह्या धोरणाचा मुख्य गाभा होता. पण आग लागली ती ह्याच धोरणामुळे. तरीही इथून सुरुवात करून शेवटपर्यंत गोर्बाचोव ह्यांनी कधीही त्यांच्या राजकीय, वैचारिक विरोधकांवर दडपशाही केली नाही, कुणाला तुरुंगात किंवा गुलागमध्ये टाकले नाही. मारून टाकणे तर दूरच. ह्या ठिकाणी त्यांचे अन्य साम्यवादी नेत्यांपेक्षा वेगळेपण दिसायला लागते. (चीनने आर्थिक सुधारणा केल्या पण राजकीय सुधारणा मागणाऱ्यांचे काय केले ते तियानानमेन चौकात जगाने 1989 साली पाहिले.)

आंतरराष्ट्रीय धोरणात असेच आमूलाग्र बदल केले गेले. परंतु तिथे पोचण्यापूर्वी एक महत्त्वाची घटना घडली. ती म्हणजे एप्रिल 1986मध्ये चेर्नोबिलची भयानक दुर्घटना. अनेक विश्लेषकांच्या मते सोविएत संघाच्या पतनामागे हे एक मोठे कारण होते. ह्या दुर्घटनेतून बाहेर येण्यासाठी जो अजस्त्र खर्च आवश्यक होता त्याचे ओझे (इतर अनेक ओझ्यांप्रमाणेच) अर्थव्यवस्थेला असह्य होते. सोविएत संघ सैन्य, शस्त्रास्त्रे, अण्वस्त्रे ह्या सर्वांवर करत असलेल्या खर्चाला चाप लावण्याची वेळ आली होती. वॉर्सा करारातील देशांमध्ये व अफगाणिस्थानात असलेले प्रचंड सैन्य कमी करणे आवश्यक झाले होते. ह्या अपरिहार्यतेमधून त्यांचे परराष्ट्रीय धोरण पुढे गेले. वॉर्सा करारातील देशांमधल्या समाजवादाचे "रक्षण" करण्यासाठी सैन्याचा हस्तक्षेप करण्याच्या "ब्रेझनेव डॉक्ट्रिन" चा त्याग करून त्यांनी "सिनात्रा डॉक्ट्रिन" स्वीकारले. (फ्रँक सिनात्रा ह्या अमेरिकन गायकाच्या "माय वे" ह्या गाण्याचा गोर्बाचोव ह्यांनी गंमतीत दिलेला संदर्भ.) ह्या नव्या धोरणानुसार वॉरसा करारातील देशांनी आपापली परिस्थिती आपण स्वत: सांभाळावी. सोविएत संघ हस्तक्षेप करणार नाही असे त्यांनी जाहीर केले. एवढेच करून ते थांबले नाहीत. तर त्यांनी सैन्यही परत बोलवायला सुरुवात केली. पोलंडचे वोयचिक यारूझेलस्की, हंगेरीयन यानोस कदार, झेक गुस्ताव हुशाक, रोमेनियन निकोल चाउसेस्क्यू, पूर्व जर्मनीचे एरिक होनेकर ह्या सर्व नेत्यांशी त्यांच्या झालेल्या बैठकांच्या अहवालांवरून हे आजही पाहता येते की गोर्बाचोव ह्यांनी त्यांची ही अधिकृत भूमिका केवळ घोषणेसाठी नव्हे तर प्रत्यक्ष राबवण्याच्या दृष्टीने स्पष्ट केली होती, तसेच त्या त्या देशांतल्या सुधारणांना पाठिंबा दिला होता. पूर्व युरोपात 1985 नंतर सुरू झालेली बंडाळी (पोलिश सोलिदारनोश्चचा (solidarity) अपवाद सोडून) ह्या भूमिकेच्या प्रकाशात पहावी लागते. बर्लिनची भिंत पाडली गेली त्यालाही गोर्बाचोव आणि रेगन, तसेच गोर्बाचोव आणि हेलमुट कोल ह्यांच्या चर्चांचा आणि गोर्बाचोव ह्यांनी हस्तक्षेप न करण्याच्या दिलेल्या ग्वाहीचा संदर्भ होता. 1987 साली रेगन ह्यांनी ब्रॅंडेनबुर्ग गेटच्या समोर दिलेल्या भाषणात "Mr. Gorbachev, tear down this wall!" अशी घोषणा केली. भिंत अर्थातच गोर्बाचोवच्या हुकुमाने तोडली गेली नाही हे सर्वश्रुत आहे. पण त्या कृतीला त्यांचा असलेला मूक पाठिंबा महत्त्वाचा होता हे ह्यावरून दिसते.

1987 साली अथक प्रयत्न करून गोर्बाचोव ह्यांनी रेगन ह्यांच्याशी मध्यम पल्ल्याच्या अण्वस्त्रबंदीच्या करारावर सह्या केल्या. एवढेच नव्हे तर स्वत:हून पूर्व युरोपातले आणि अफगाणिस्थानातले सैन्य काढून घेणे ह्या कृतीही केल्या. शीतयुद्धाचा अंत सोविएत संघाच्या विघटनामुळे झाला, पण त्याची पृष्ठभूमी अशा अनेक कृतींमधून गोर्बाचोव ह्यांनी तयार केली होती. 1990चे शांततेचे नोबेल पारितोषिक त्यांना देण्यात आले. माझ्या मते ह्या पारितोषिकासाठी त्यांच्याएवढा लायक माणूस शोधूनही सापडणे अवघड आहे.

सोविएत संघातले सुधारणवादी, फुटून निघणारी घटक राष्ट्रे, रशियन राष्ट्रवादाचे राजकारण करणारे बोरिस येलत्सिन हे एका बाजूला आणि सोविएत साम्यवादी पक्षातले कर्मठ, सुधारणाविरोधी नेते दुसऱ्या बाजूला, ह्या रस्सीखेचीत गोर्बाचोव सापडले आणि त्यातून बाहेर येऊ शकले नाहीत. स्वत:च्या हाताने त्यांनी सोविएत संघाचे विसर्जन केले आणि ते राजकारणातून बाहेर फेकले गेले. त्यांचे इतका काळ मित्र असणारे, त्यांच्याशी संबंध ठेवण्यात उत्सुक असलेले पाश्चात्य नेतेही नंतर त्यांना सोयीस्करपणे विसरून गेले. त्यांची गरज संपली होती. नव्या रशियात त्यांना कुठलेही स्थान असणार नव्हते.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

गोर्बाचेव्ह रशियाचे अध्यक्ष होते आणि रशियाचं विघटन झाले तेव्हा माझं हे काही समजण्याचं वय नव्हतं. आता भांडवलशाहीत राहताना पुतिन आणि युक्रेनच्या युद्धाचे खिशावर होणारे परिणाम वगळता रशियासंदर्भात काही वाचायचं तर फारच कष्ट होतात. त्यामुळे हा लेख लिहिण्याबद्दल विशेष आभार.

नव्या रशियात त्यांना कुठलेही स्थान असणार नव्हते.

नव्या जगातच गोर्बाचेव्हसारख्या उदारमतवादी, मवाळ लोकांना फार स्थान असावं असं दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उत्तम माहितीपूर्ण लेख

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फार उत्तम लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

माहितीपूर्ण लेख.

नव्या जगातच गोर्बाचेव्हसारख्या उदारमतवादी, मवाळ लोकांना फार स्थान असावं असं दिसत नाही
अफूच्या गोळ्या आणि जादूच्या कांड्या विकनाऱ्यांची चलती आहे सध्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला पण याहूनही विस्तृत लिहावा आणि गोर्बाचेव्ह यांच्या कर्तृत्वाची जास्त ओळख करुन द्यावी.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समयोचित लेखाबद्दल आभार. 'डीडब्ल्यू टीव्ही' या जर्मन वाहिनीने या निमित्ताने एक व्हिडिओ वृत्तांकन आणि एक डॉक्युमेंटरी शेअर केली आहे. दोन्ही रोचक वाटतील :

वृत्तांकन दुवा.
डॉक्युमेंटरी दुवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ही जाहिरात रोचक आहे.

https://www.facebook.com/watch?v=1117498012499741

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेरेस्त्रोयका आणि ग्लासनाॅस्त हे दोन शब्द ज्यांच्यामुळे कळले ती ही व्यक्ती. बाकीचं काहीच माहीत नव्हतं. हां, त्यांच्या कपाळावरचा तो वण अगदी उठून दिसणारा आणि लक्षात राहिलेला. तू अजून लिहीशील नंतर, हे उत्तम आहे, पण फारच थोडं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This too shall pass!