माणूस हा (चेहऱ्यावरील केस न आवडणारा) केसाळ प्राणी आहे.

#संकीर्ण #ट्रॅश #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२२

माणूस हा (चेहऱ्यावरील केस न आवडणारा) केसाळ प्राणी आहे.

- प्रभाकर नानावटी

उत्क्रांत झाल्यापासून आजपर्यंत शरीरावरील नको असलेले केस काढून टाकणं आणि त्यातून आरोग्य रक्षण करणं, ही सवय माणूस प्राण्याला जडली आहे. इतिहासकाळापासून गेली हजारो वर्षं ही केशकर्तनक्रिया, काही प्रसंगांत प्रतिष्ठेची, काही वेळा त्यागाची व काही वेळा शिक्षा सुनावण्याची म्हणूनही ओळखली जाते. केशकर्तनाचे हे प्रकार जगभरातल्या सर्व संस्कृतींत आढळतात, आणि तशीच केशकर्तनासाठी वापरलेली हत्यारंसुद्धा! गंमत म्हणजे आपल्याकडच्या राम, कृष्ण, दत्तात्रय, विठ्ठल इत्यादी पुरुष देवतांच्या छबी, मूर्ती बघितल्यास (काही ऋषी-मुनींचा अपवाद वगळता) बहुतेकांचा चेहरा गुळगुळीत दिसतो. या देवतांचा न्हावी कोण होता; त्या न्हाव्याकडे कुठली हत्यारं होती; वा त्यांना चेहऱ्यावर केस न उगवण्याचा एखादा मंत्र वा लोशन सापडलं असेल का, इत्यादी प्रश्न या संबंधात विचारावेसे वाटतात.

दगड

हजारो वर्षांपूर्वी आपले पूर्वज जेव्हा नागड्या-उघड्या अवस्थेत, हिमवर्षावाच्या प्रदेशात, वाळवंटात, जंगलदऱ्यांत, ऊन-पावसात शिकार करण्यासाठी भटकत होते तेव्हा अंगावरचे केस अडचणीचे ठरत असावेत. डोक्यावरच्या आणि चेहऱ्यावरच्या वाढलेल्या केसांत पावसाचे पाणी वा वाळू शिरल्यानंतर ते झटकून काढणे जिकिरीचं काम होतं. पाण्याचा बर्फ झाल्यानंतर हिमबाधा होण्याची शक्यता होती. त्यातून रक्षण करून घेण्यासाठी गुहेत राहणारा माणूस चेहऱ्यावरील केस हाताने उपटून काढत होता. नंतरच्या काळात त्यासाठी समुद्रातील शंख-शिंपल्यांच्या तुकड्यांचा चिमट्यासारखा वापर करू लागला. साठेक हजार वर्षांपूर्वी माणसं शिंपल्यांची खापर वापरून दाढी करायला लागले याची नोंद गुहेतल्या भिंतीचित्रांत बघायला मिळते.

तीन हजार वर्षांपूर्वी केस काढून टाकू शकणाऱ्या क्रीमचा शोध लागला. हे क्रीम म्हणजे चुना, स्टार्च व आर्सेनिकचे मिश्रण होते. या क्रीमचा वापर प्रामुख्यानं बायका करत. याच सुमारास शेती मूळ धरायला लागली. माणसं भटकणं सोडून टोळी करून एकाच ठिकाणी राहू लागली. नंतरच्या काळात केव्हातरी लोखंडाचा शोध लागला असावा. त्यातून केस कापण्यासाठी वस्तरा हा प्रकार प्रचलित झाला असावा.

इ.स.पू. चौथ्या शतकात ग्रीक इतिहासकार हिरोडोटसनं (इ.स.पू. ४८५-४२५) इजिप्तमधील जनता पेहरावापेक्षा स्वच्छतेला जास्त महत्त्व देत होती, अशी नोंद केली आहे. दिवसातून अनेक वेळा ते लोक आंघोळ करत असत. बायका, आणि मुलं नको असलेल्या ठिकाणच्या केसांचे मुंडण करून काढून टाकत. उच्चभ्रू वर्गातल्यांसाठी आपलं केसविरहित शरीर दाखवणं हा प्रतिष्ठेचा विषय झाला होता. त्यामुळे जास्तीत जास्त वेळा (जवळजवळ) निर्वस्त्रावस्थेत ते गावभर फिरत असत.

इजिप्त हा देश उष्ण कटिबंधातला, नाईल नदीच्या काठी वसलेला. तिथे खांद्यापर्यंत रुळणाऱ्या केसांत घाम साठत असे. त्यामुळे शरीरावरचे केस नकोनकोसे वाटणे साहजिक होतं. त्याचबरोबर या वाढलेल्या केसांमध्ये उवा, वा तत्सम रोग फैलावणारे कृमीकीटक घर करून राहत होते. सामान्य लोकांना अशा रोगावरील औषधं मिळत नसल्यामुळे, (किंवा ही औषधं न परवडणारी असल्यामुळे,) आणि साबणाचा शोधही लागलेला नसल्यामुळे डोक्यावरचे सर्व केस काढून मुंडण करून घेणे ते पसंत करत होते. सर्वश्रेष्ठ नाईल संस्कृतीतले आरोग्यरक्षणाचे हे उपचार गुलाम, शेतकरी, गुन्हेगार, आणि मागासलेल लोकांना उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांना दाढी-मिशा व डोक्यावरच्या वाढलेल्या केसांचे प्रदर्शन करणे भाग होते. त्यामुळे त्यांची ओळख संस्कृतीरक्षकांना होत असावी.

केसविरहित अवस्था गाठण्यासाठी इजिप्शियन्स एका प्रकारचे केशनाशक क्रीम वापरत होते. हे क्रीम वापराल्यानंतरही उरलेल्या केसांचे खुंट काढून टाकण्यासाठी एक प्रकारच्या सच्छिद्र दगडाने अंग घसाघसा घासून केस काढून टाकण्याचे प्रयत्न करत होते. पुनर्जन्मानंतर वापरण्यासाठी म्हणून मृतांच्या थडग्यात इतर अनेक वस्तूंबरोबर वक्राकार वस्तरेसुद्धा संशोधकांना सापडले आहेत.

भित्तीचित्र

तसंच, केसांचे खुंट वाढलेल्या चेहऱ्यानं फिरणं हे वैयक्तिक आरोग्याकडे दुर्लक्षाचं लक्षण समजलं जात होतं. हे तीन-तीन दिवस अंगावरचे कपडे न बदलता फिरल्यासारखं त्यांना वाटत असावं. त्यामुळे स्वतःचा न्हावी असणं हे श्रीमंतीचे लक्षण मानलं जात होते. त्या काळी डॉक्टर, सरकारी अधिकारी, सैन्याधिकाऱ्यासारखे न्हाव्यांना मानानं वागवलं जात होतं. परंतु दाढी-मिशा वाढवून स्वतःच्या पौरुषत्वाचे प्रदर्शन करणाऱ्या इजिप्शियनांनासुद्धा भरपूर मान-मरातब मिळत होता. परंतु डोक्यावरील केसाच्या टोपाप्रमाणे चेहऱ्यावर नकली दाढी वापरण्याकडे त्यांचा कल होता. म्हणूनच फारोह आणि राजघराण्यातल्या स्त्रियांसकट सर्वांना दाढी असलेले पेंटिंग्स-चित्रलिपी आपल्याला बघायला मिळतात.

इजिप्शियनांच्या आरोग्यविषयक कल्पनांचं लोण ग्रीस आणि रोमपर्यंत पोहोचलं होतं. कदाचित त्यासाठी अलेक्झांडर द ग्रेटला जबाबदार धरायला हवं. त्यानं तर त्याच्या सगळ्या सैनिकांना रोज गुळगुळीत दाढी करून कवायतीला हजर राहण्याचं फर्मान सोडलं होतं. त्यामुळे प्रत्यक्ष, समोरासमोरच्या युद्धाच्या वेळी वैऱ्यांचे नेमके कुठले अवयव पकडावे, हा प्रश्न पडला. यापूर्वी वैऱ्याची दाढी घट्ट पकडून त्यास जेरबंद करणं सोपं होतं.

अलेक्झांडरच्या, रोज दाढी करून येण्याच्या आदेशामुळे सैनिकांव्यतिरिक्त इतरही गुळगुळीत दाढी करायला लागले. दाढी करण्याला समाजमान्यता मिळायला लागली. एवढंच नाही, तर ती एक फॅशन झाली. त्याची रचनाही बदलली. पितळी वस्तऱ्याऐवजी तांब्याचे आणि लोखंडांचे वस्तरे वापरात यायला लागले. बघता बघता इजिप्शियनांचा वक्राकार वस्तरा सरळ रेषेचा झाला. आजही तो सरळ रेषेचाच आहे.

चेहऱ्यावर गुळगुळीतपणा येण्यासाठी दोन-तीन वेळा वस्तरा चालवल्यानंतर शिल्लक राहिलेल्या दाढीचे खुंट उपटून काढण्यासाठी प्युमिस नावाच्या दगडानं चेहरा घासून घेत होते. त्याचबरोबर विशिष्ट तेल वापरून मालिश करत व त्यावर सुगंधी द्रव्याचे फवारे (perfume) सोडायचे. वस्तऱ्याला धार करण्यासाठी तेलात बुडवलेले कोळीष्टकाचे तंतू व व्हिनेगारपासून तयार केलेल्या मलमाचा वापर केला जात होता.

गुळगुळीत दाढी करण्याची सक्ती अलेक्झांडरच्या आदेशावरून झालेली असली आणि नंतर फॅशन म्हणून आकर्षक झालेली असली तरी काही काळातच एक सामान्य कार्यक्रम म्हणून तो प्रकार रूढ व्हायला लागला. न्हाव्याच्या दुकानात जाणे हा एक नित्याचा कार्यक्रम झाला. तिथे केवळ दाढीसारख्या श्मश्रूकामासाठीच लोक येत नव्हते, तर गप्पा मारण्यासाठीही गोळा होत असत. गावातल्या बातम्यांची देवाणघेवाण करत असत. श्रीमंत मात्र अशा सार्वजनिक ठिकाणी न येता जास्त पैसे देऊन न्हाव्यालाच घरी बोलवत असत. अनेक श्रीमंतांचे खासगी नाभिक असत. जितका जास्त श्रीमंत तितके शरीरावरील केस कमी (अगदी जननेंद्रियाजवळपाससुद्धा)!

मध्ययुगात मात्र या दाढीच्या उत्सवीपणाला ओहोटी लागली. ती लोकप्रिय असली तरी त्यामागे एक वेगळे कारण होते. १०५०च्या सुमारास ईस्टर्न ऑर्थोडॉक्सपासून कॅथोलिक चर्च वेगळं झाल्यानंतर पाश्चिमात्य चर्चप्रमुख आपल्या पाद्र्यांना ज्यू आणि मुस्लिमांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी दाढी करून घेण्यास उत्तेजन देऊ लागले. चर्चप्रमुखांनी तर १०९६मध्ये आर्चबिशपच्या आदेशानुसार धार्मिक कायद्यामध्येच दाढीवर निर्बंध घालण्याचे कलम टाकले. त्यात फक्त पवित्र भूमीसाठी लढणाऱ्या क्रूसेडर्सनाच दाढी राखण्याची मुभा दिली गेली.

या काळी केस विमोचन क्रिया भलतीच महिलाप्रिय झाली. पहिली एलिझाबेथ राणी अक्रोड तेल, व्हिनेगार आणि अमोनियाचे मिश्रण पापण्यांवर लावून चिमट्याने आपल्या पापण्यांचे केस काढून टाकत होती. आणि तिचंच अनुकरण उच्चभ्रू घरातल्या स्त्रिया करायला लागल्या. पापण्यांचे केस कमी केल्यास कपाळाची रुंदी वाढून सौंदर्यात भर पडते, हा हिशोब त्यामागे होता. परंतु गळ्याखालचा भाग मात्र नैसर्गिक अवस्थेतच ठेवला जात होता. वस्तऱ्याने चुकून एखाद्या नाजूक भागाला इजा झाल्यास न्हाव्याची गर्दनच छाटली जाण्याची भीती होती.

अठराव्या शतकाच्या शेवटपर्यंततरी वस्तऱ्यांच्या रचनेत काही बदल झालेला नव्हता. वस्तऱ्याला नीट धार नसायची, तो झाकून ठेवण्याची सोय नसायची. फार फार तर दिवसभराचं काम संपल्यानंतर न्हावी वस्तरा कापडात गुंडाळून ठेवायचे. गंमत म्हणजे हे साधन हाताळण्यासाठी कौशल्य हवं, अशीच समजूत होती. त्यामुळे बहुतेकांना न्हाव्याच्या दुकानाला भेट देण्यशिवाय गत्यंतर नसे. हातातली कामं संपली की दाढी करून घेऊ या, असं पुरुषांना म्हणायची सोय नव्हती आणि ते शक्यही नव्हतं. रुग्णावर शस्त्रक्रिया करताना डॉक्टर्स न्हाव्याचीच मदत घेत असत.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला हे चित्र बदलायला लागलं. जाँन जाक पेरे, (Jean-Jacques Perret) हा हरहुन्नरी फ्रेंच नाभिक नेहमीच स्वतःच्या कल्पनासाम्राज्यात बुडालेला असे. आपापल्या स्नानगृहातल्या आरशासमोर उभे राहून लोक स्वतःच दाढी करून घेत आहेत, असं स्वप्न तो पाहात होता. याच कल्पनेचा पाठपुरावा करत त्यानं वस्तऱ्याला लाकडी मूठ लावली; आणि हात कापू नये म्हणून लाकडी कवच बसवलं. असा तयार झाला जगातला पहिला सुरक्षित वस्तरा! त्या वस्तऱ्याचं पातं सरळ रेषेतच होतं. अशाच प्रकारच्या अनेक रचना त्या काळी वापरल्या जात होत्या. शेफील्डच्या सरळ वस्तऱ्याला फिरतं झाकण होतं; याच झाकणाचा मूठ म्हणूनही वापर करता येत होता. १८८०च्या सुमारास काम्प्फे (Kampfe) बंधूंनी जगातल्या पहिल्या सुरक्षित वस्तऱ्याचे स्वामित्व आणि विक्रीचे हक्क मिळविले. त्यांच्या वस्तऱ्याची धारदार बाजू तारेच्या जाळीने सुरक्षित केलेली होती. दाढी करताना तयार झालेल्या साबणाचा फेस गोळा करून ठेवण्याची सोय त्यात होती.

काम्प्फे बंधूंच्या वस्तऱ्यात अनेक दोष होते. दर वेळी तो चामड्याच्या पट्ट्यावर घासून त्याला धार काढावी लागत होती. खरं पाहता वस्तऱ्याला धार करत बसण्यापेक्षा नवीन धारदार तुकडेच यात बदलून का लावू नयेत? याच कल्पनेचा पाठपुरावा किंग सी. जिलेट या फिरत्या विक्रेत्यानं केला. ती १८९५च्या सुमारास त्यानं प्रत्यक्षात आणली.

जिलेट हा सेल्समन असल्यामुळे विक्रीसाठी दुकानांच्या मालकांकडे जाताना गबाळ्यासारखं दिसणं त्याला आवडत नसे. टापटीप कपड्यांबरोबरच डोक्यावर नीटनेटके केस आणि दाढी केलेल्या चेहऱ्यानं जावं असं त्याला वाटत होतं. न्हाव्याकडून दाढी करून घेण्यासाठी त्याच्या दुकानासमोर रांगेत तिष्ठत उभं राहाण्याचा त्याला कंटाळा येत होता. यावर काही तरी उपाय शोधला पाहिजे असं त्याला नेहमीच वाटायचं.

एके दिवशी न्हाव्याच्या दुकानासमोर, भल्या मोठ्या रांगेत उभा असताना, आपणच आपली दाढी का करून घेऊ नये, या विचारानं त्याला पछाडलं. यासाठी नेमकं काय करावं हे सुचत नव्हतं. पण दाढी करण्यासाठी वस्तऱ्याचा एक कच्चा आराखडा त्यानं स्वतःच तयार केला. त्यात त्यानं ब्लेड या संकल्पनेभोवती रचना केली. ब्लेडला चिमट्यासारख्या होल्डरनं पकडता येईल; ब्लेड रेझरसारखी धारदार असून ती चेहऱ्यावर फिरेल; धार संपल्यानंतर आधीची ब्लेड फेकून नवीन ब्लेड घालण्याची सोय त्यात असेल; या मूलभूत गोष्टीभोवती ते डिझाईन होतं. ब्लेड स्वस्त असली की ती खपेल, हा हिशोबही त्यामागे होता. भरपूर प्रयत्न करून होल्डरच्या अंतिम रचनेतून त्यानं त्याचं प्रारूप तयार केलं. परंतु धारदार ब्लेडसाठी त्याची घोडदौड अडून बसली. इतक्या कमी जाडीचा लोखंडी पत्रा बाजारातही नव्हता वा कुणी उत्पादनही करत नव्हतं. त्याची ही कल्पना प्रत्यक्षात उतरणार नाही, असे वाटत असतानाच एमआयटी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विल्यम निकर्सन या तरुणाची गाठ पडली. तोही या डिझाइनवर ३-४ वर्षं काम करत होता. नंतर तो तेथेच प्रोफेसर झाला; त्यानं ब्लेडचं अंतिम डिझाइन तयार करून दिलं. ते डिझाइन घेऊन जिलेट स्टील उत्पादकांकडे गेला. इतक्या कमी जाडीच्या ब्लेडचं उत्पादन शक्य नाही म्हणून त्यांनी त्याला वेड्यात काढलं. परंतु जिलेटने नाउमेद न होता एका उत्पादकाकडून, त्याला हवी तशी, दोन्ही बाजूंना धार असलेली ब्लेड तयार करून घेतलीच. यात उत्पादनाची प्रक्रिया पक्की केली आणि स्वतःची कंपनी काढून त्याने रेझरसेटच्या उत्पादनाला सुरुवात केली.

सुरुवातीची काही वर्षं सोडल्यास त्याच्या या उत्पादनाला भरभरून उत्तेजन मिळाले. १९०६ या एकाच वर्षात त्यानं सुमारे तीन लाख रेझरसेटचं उत्पादन केलं. वस्तऱ्याची जागा रेझरसेटनं घेतली. पहिल्या महायुद्धाच्या कालखंडात त्याच्या या उत्पादनाला प्रचंड मागणी मिळाली. प्रत्येक सैनिकाच्या किटमध्ये रेझरचा सेट असणं सक्तीचं झालं. जिलेटचं हे उत्पादन प्रत्येक (पुरुष) अमेरिकनाच्या तोंडी होतं. किंग जिलेटनं उत्पादन क्षेत्रात एक नवा इतिहास घडवला.

विसाव्या शतकाच्या आरंभापासून सामाजिक व्यवस्थेत बदल घडायला लागले. फॅशनचे वारे वाहायला लागले. स्त्रियांना आपले पाय व हात उघडे दाखविण्यात कमीपणा वाटेनासा झाला. फॅशन मॅगेझिनमध्ये पोहण्याच्या पोषाखातल्या तरुणींचे फोटो चमकू लागले. हात वर करून स्विमिंग पूलमध्ये उड्या मारण्याचे फोटो झळकू लागले. तोपर्यंत स्त्रिया बगलेतले केस काढण्यासाठी केवळ घरगुती मलमाचा वापर करत होत्या. १९१५च्या सुमारास मिलडी डेकोलटेने (Milady Decolletée) स्त्रियांसाठी खास असे रेझरसेट तयार केले व त्यालासुद्धा प्रचंड मागणी यायला लागली.

जरी १९२०च्या सुमारास बॅटरीवर चालणाऱ्या रेझरचा शोध लागलेला असला तरी जिलेट कंपनीला त्यांच्या मूळ डिझाइनमध्ये काही बदल करण्याची गरज भासली नाही. १९६०पर्यंत जिलेटचं मूळ डिझाइनच जगभर वापरात होतं. त्यात बदल करण्यासारखी एकही चूक सापडलेली नव्हती. १९६०च्या सुमारास कंपनीतील इंजिनियर्सनी कार्बन ब्लेडऐवजी स्टेनलेस स्टीलचं ब्लेड बाजारात आणलं. कारण कार्बन ब्लेडची धार कमी होते, आणि एक-दोन वापरांनंतर ब्लेड टाकाऊ ठरत होते. स्टीलची ब्लेड गंज पकडत नाही, ते आम्लरहित असतं, आणि इतर कामांसाठीसुद्धा वापरण्यायोग्य होती. याचीच पुढची पायरी - धार कमी झाल्यानंतर नवीन ब्लेड घालण्यापेक्षा 'वापरा आणि फेकून द्या' प्रकारच्या डिस्पोजेबल रेझरसेटला मिळालेलं उत्तेजन.

१९७१मध्ये या कंपनीने दाढीच्या सेटमध्ये एका प्रकारची क्रांतीच घडवून आणली. प्लॅस्टिक होल्डर व स्टील ब्लेडची जोडणी असलेल्या Trac II ट्विन ब्लेड मार्केटमध्ये आल्या. या ट्विन ब्लेडमुळे दाढी करणं आणखी सोपं झालं. त्वचेची जळजळ कमी झाली. नंतरच्या काळात दोनऐवजी तीन, नंतर पाच, त्यानंतर अगदी सात ब्लेडपर्यंत या मल्टीब्लेड्सने मजल मारली.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेतील घरोघरी वीज पोचलेली होती. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या सोयीसुविधांची लयलूट होती. हातानं कामं करण्यापेक्षा (इलेक्ट्रिकल) यंत्रांच्या सहाय्यानं कामं करण्याकडे कल वाढायला लागला. विजेवर चालणारे टूथब्रश, बूट चकचकीत करणारी पॉलिशिंग यंत्रं, सोफा स्वच्छ करण्यासाठी व्हॅक्यूम क्लीनर्स अशा कित्येक साधनांची भर पडली. त्यामुळे १९२०च्या दशकातल्या इलेक्ट्रिक रेझरलाही नवजीवन मिळालं. जेकब स्चिक या निवृत्त सैन्यधिकाऱ्यानं फिरणारं एक शाफ्ट, हातात धरता येणारी मोटर आणि त्याला जोडलेलं कटर इत्यादींच्या साहाय्यानं दाढीचं उपकरण तयार केलं. परंतु १९२०च्या दशकाच्या शेवटी आलेल्या जागतिक महामंदीमुळे अमेरिका हवालदिल झालेली होती. त्यातही इलेक्ट्रिक रेझरच्या गुंतागुंतीच्या डिझाईनमुळे सुरुवातीला मागणी नव्हती. खरं पाहता, आता सगळ्यांना जसे आयपॅड हवेहवेसे असतात, तसा तेव्हाचा रेझरचा सेटही हवाहवासा वाटण्यासारखा होता. तरीसुद्धा पहिल्या वर्षी स्चिक केवळ तीन हजार सेट्स विकू शकला. परंतु मंदी ओसरल्यानंतर मागणी वाढली. १९३७मध्ये त्याने दीड लाख सेट्सची विक्री केली. गंमत म्हणजे इलेक्ट्रिक रेझरने दाढी करताना तोंडाला साबणाचा फेस लावावा लागत नाही. म्हणजे ही बिनपाण्याची दाढी ("dry shave") असते. त्या काळी हा सुमारे दोन कोटी डॉलर्सचा धंदा होता.

दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला रेमिंग्टन कंपनीने पहिल्यांदाच स्त्रियांसाठी खास इलेक्ट्रिक रेझरसेट बाजारात आणले. युद्धामुळे नायलॉनचा तुटवडा होता. त्यामुळे तरुणींचे पाय झाकणारे स्टॉकिंग्स मिळत नव्हते. रेमिंग्टनचे रेझरसेट त्याजागी उपयोगात आले. हातानं पायावरचे केस काढून टाकण्यात वेळ घालवण्यापेक्षा इलेक्ट्रिक रेझरनं केस काढून टाकणं सोपं आणि स्वस्त होतं. कमी वेळ लागत असल्यामुळे बायकांचा कल हे उपकरण वापरण्याकडे होता.

१९४०पासून सुरू झालेल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे केशकर्तनाच्या पद्धतीतही अनेक बदल झाले. वॅक्सिंग स्ट्रिप्स आल्या, लेसर तंत्रज्ञान आलं. लेसर तंत्रज्ञानामुळे त्वचेला त्रास न जाणवता केस काढणं शक्य झालं. लेसरच्या दुष्परिणामापासून मुक्ती मिळविण्यासाठी इलेक्ट्रोलिसिस पद्धत रूढ झाली. हीट प्रोब वापरून केसांचे फॉलिकल्स (follicles) उपटून काढणं शक्य झालं.

आजकाल वेगवेगळ्या आकाराच्या रेझरचे हजारो नमुने बाजारात मिळतात. आपल्या मागणीनुसार, नाकातले केस कापण्यासाठीच्या अगदी करंगळीएवढ्या आकाराच्या ट्रिमर्सपासून निर्वात शक्ती वापरणाऱ्या फ्लोबीसपर्यंत (vacuum-powered Flowbees) अनेक प्रकार बाजारात आहेत. मल्टी ब्लेड रेझरप्रमाणे मल्टिपल कटिंग हेड्स असलेले इलेक्ट्रिक शेव्हर्सही सामान्य ग्राहकापर्यंत पोचत आहेत. (रिचार्जेबल) बॅटरी वापरून केशकर्तक मोटरीचा वेग कमीजास्त करता येतो. त्यामुळे शंभर वर्षापूर्वीचे स्चिकचे शाफ्ट, कटर इत्यादी असलेले इलेक्ट्रिक रेझरसेट कालबाह्य झाले आहेत. आता आपापल्या आवडीनुसार रेझरची निवड करून वापरणं अगदी सोपं झालं आहे.

आपल्या चेहऱ्यावर केस असावेत की नाही याबद्दलही धर्मरूढींचा पगडा आहे. हिंदू धर्मातील बहुतेक जातीजमातींमध्ये मृत्यू झाल्यास मृताच्या जवळचे पुरुष नातेवाईक डोक्यावरचे केस काढून मुंडन करतात, चेहरा गुळगुळीत ठेवतात. तिरुपती देवस्थानाच्या ठिकाणी मुंडन करून केशदान करून पुण्य कमावतात. मुस्लिम समाजामध्ये धार्मिक परंपरा म्हणून मिशा न ठेवता फक्त दाढी ठेवतात. कदाचित हा धर्म अरबस्तानामधून आल्यामुळे तेथील अरबांची नक्कल इतर ठिकाणीसुद्धा केली जात असावी. वाळवंटी प्रदेशात राहणारे अरब मिशीत वाळू शिरून जेवताना ती तोंडात जाण्याची शक्यता असल्यामुळे ओठावरच्या मिशा भादरून फक्त दाढी ठेवत असावेत!

केसाळ हनुवटी कुरवाळणारे, दाढी-मिशांची निगा राखणारे, चेहरा गुळगुळीत ठेवणारे, फक्त दाढी ठेवणारे, फक्त मिशा ठेवणारे असे अनेक प्रकार, धर्माच्या देखरेखीखाली किंवा गरज, आवड म्हणून, वा एखाद्या राजा-महाराजानं फतवा काढला म्हणून मानवी समाजानं बघितले आहेत. माणसाच्या चेहऱ्यावर केस असावेत का, कितपत असावेत याची फॅशन काळक्रमात बदलत गेली आहे. अनेक वेळा कुठल्या तरी सरदारांनी वा प्रतिष्ठित व्यक्तींनी मिशांना एखादा वेगळा आकार दिलेला असल्यास त्याचे अनुनय करणाऱ्यांची संख्या कमी नसेल. विसाव्या शतकात तर गाजलेल्या चित्रपटातील अभिनेत्याची नक्कल करत, चेहऱ्यावरचे केस कमी-जास्त वा गायब होत होते. चिकण्या हिरोसारखं दिसण्यासाठी तरुणवर्ग जिवाचं रान करत होता. १९२०च्या सुमारास अगाथा क्रिस्तीच्या रहस्यकथातील हर्क्युल प्वाराॅच्या (Hercule Poirot) मिशांची स्टाइल भलतीच लोकप्रिय होती. अमूर्त पेटिंग्ससाठी नावाजलेल्या साल्वादोर दालीच्या मिशांची स्टाइल आणखीनच निराळी होती. सर्वांत लांब मिशा असलेल्या आपल्या भारतातल्या रामसिंग चौहानच्या गाठ मारलेल्या मिशीची लांबी ४.२९ मीटर (१४ फूट) होती. दर दहा दिवसांनी तो गाठ सोडवून मिशीला आंघोळ घालत असे. शीख पंथात तर 'क'पासून सुरू होणाऱ्या लक्षणांमध्ये 'केशां'ना महत्त्वाचं स्थान आहे. (मिशांचा इतिहास हा वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकतो.)

एक काळ असा होता की रूढी-परंपराग्रस्त समाजात व्यक्तीच्या आशाआकांक्षा कायम जखडून ठेवल्यासारखी परिस्थिती होती. एका सुप्रसिद्ध लेखकानं म्हणलं आहे, 'अगदी साध्या मिशीचं उदाहरण घेता येईल. ओठाच्या वरच्या भागावर उमटणाऱ्या मिशीचे आकार-प्रकार सोडूनच द्या, पण मिशीला चाट मारण्याची कृती आज सहजरीत्या करताना ती सर्वप्रथम छाटणाऱ्या महाभागाचे आपल्याला स्मरण तरी कधी होते का? नाही ना? पण ज्यानं पुरुषार्थाचं लक्षण मानली गेलेली मिशी सर्वप्रथम छाटली असेल त्याचा पुरुषार्थ इतरांपेक्षा कमी होता का? आजच्या युवती आपल्या सौंदर्यस्वरूप केसांना विविध आकार, रंगच्छटा देतात; त्यांना ज्या स्त्रीनं आपल्या केसांना सर्वात प्रथम कात्री लावून ते कापले तिचे स्मरण तरी होतं का? सर्वांत आधी मिशी छाटणाऱ्या 'पुरुषार्थी' पुरुषाचं आणि सर्वांत आधी आपल्या लांब केसांना कात्री लावणाऱ्या धैर्यवती स्त्रीचं नाव इतिहासात नोंदवलेलं नाही. पण म्हणून त्यांचं आपल्यावरचं ऋण कमी का होईल? त्या अनामिकांचं स्मरण आज होताना दिसत नाही हे मात्र खरं. सामाजिक बदलांचं हे असंही असतं.' (कालसमीक्षा, अरुण टिकेकर)

लाख वर्षांपूर्वी सुरुवात झालेल्या केशनिर्मूलनाची (वा काही प्रमाणात दाढी-मिशा ठेवण्याची/ काढण्याची) माणसाची आस आज या टप्प्यापर्यंत पोचली आहे. भविष्यात काय वाढून ठेवले आहे ते केवळ भविष्यालाच माहीत.

संदर्भ

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)