आद्य

#ललित #ट्रॅश #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२२

आद्य

मूळ लेखक - डॉ. रवि कोप्परपु
अनुवाद -
वरदा

मूळ तेलुगू कथा कौमुदी ह्या मासिकामध्ये प्रकाशित झाली होती.

***

आद्य

"चला चला, निघायला हवं आपल्याला. ती बॅग ठेव गाडीत." बाबांची घाई सुरू होती. त्यांचे हे नेहमीचेच आहे. आम्ही आमच्याच कारने जाणार होतो. शिवाय कार मी चालवणार होतो. घाई करत निघण्याची काही गरज नव्हती. पण बाबांना मात्र धीर नव्हता. त्यांना निघावे वाटले म्हणजे इतरांनाही तसेच वाटले पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असे. सुमारे दोन तासांच्या अंतरावर असलेल्या माझ्या आजीच्या गावी आम्ही जाणार होतो. तिथे वाड्यात आजी एकटीच राहते. आम्ही अधूनमधून तिला भेटायला जातो. मी प्राथमिक शाळेत असताना आम्ही तिथेच राहात होतो. त्यामुळे ते गाव मला अगदी ओळखीचे आहे. आता म्हातारपणात आजीने इथे आमच्याकडे येऊन राहावे असा बाबांचा आग्रह असतो, पण आजी त्याला बधत नाही. ती तिथे गेली ५० वर्षे राहाते आहे. तिच्या अनेक ओळखी आहेत आणि तिथल्या समाजाचा ती एक महत्त्वाचा घटक आहे. आम्ही कितीही मागे लागलो तरी ते सगळे सोडून इथे येऊन राहण्याचा विचारही ती करणार नाही.

"हो, हो, आलोच," मी मित्राला व्हॉट्सअपवर एक निरोप पाठवला आणि फोन माझ्या खिशात ठेवला. सगळ्या बॅगा मी गाडीत मागे ठेवल्या आणि आम्ही निघालो. बाबा नेहमीप्रमाणे पुढच्या सीटवर बसले आणि आई मागे बसली. आता त्यांनीही आईसोबत मागे बसावे ना! पण नाही, बाकी कोणाच्या कार नीट चालवण्यावर त्यांचा मुळी भरवसाच नाही. पूर्ण प्रवासभर त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरू असतो - "नीट चालव", "अरे हळू!", "किती टुकूटुकू चालवतोस रे!", "इथे वळ", "त्या गाडीच्या पुढे काढ आपली गाडी" - एक ना दोन. सूचनांचा भडीमार सतत सुरू असतो. आम्ही आमच्या गावाच्या वेशीबाहेर पडलो आणि दुतर्फा दिसू लागलेल्या शेतजमिनी आणि छोटी खेडीपाडी मला भूतकाळात घेऊन गेली. माझे बालमित्र, त्यांच्याबरोबर केलेली दंगामस्ती, शेतांमधून हुंदडत केलेली मजा आणि कोणतीही जबाबदारी नसलेले एकूणच सुखात घालवलेले रम्य, स्वैर बालपण! आमच्याकडे काही पिढयांपूर्वी म्हणे मोठमोठ्या शेतजमिनी होत्या. आजी सांगत असे की आमचे पूर्वज श्रीमंत जमीनदार होते. त्या गडगंज संपत्तीपैकी आणि जमिनींपैकी अगदीच थोड्या गोष्टी आता आमच्याकडे उरल्या आहेत.

शेवटी आजीच्या घरी पोहोचलो. मी कार एका बाजूला लावली आणि सामान बाहेर काढायला सुरुवात केली. आमचा आवाज ऐकून आजी लगबगीने बाहेर आली आणि तिने आम्हाला प्रेमाने जवळ घेतले. आम्ही घरात गेलो. आजीचे घर मोकळेढाकळे आहे. घरात अगदी मोजके फर्निचर आहे. घरातल्या सगळ्या वस्तू जुन्या, पूर्वीच्या आहेत. मी लहानपणापासून त्या पाहात आलो आहे. ह्या वस्तू नेमक्या किती जुन्या असाव्यात काही कल्पना नाही. पण त्यांची बांधणी, त्यांचे रंगरूप पाहता त्या अनेक दशकांपूर्वीच्या असाव्यात. ओसरीत एक मोठा लाकडी झोपाळा आहे. मी लहानपणी त्यावर खेळत असे. जेवण झाल्यावर आम्ही सगळे ओसरीत गप्पा मारत बसलो. मी माझ्या आवडत्या झोपाळ्यावर बसलो.

"का रे आदि, तुला मोठी नोकरी लागल्ये म्हणे? कुठेशीक? पगार बरा आहे का?" आजीने विचारले.

"हो. सरकारी नोकरी आहे," मी म्हणालो.

"तुझी आई म्हणत होती की तू सैन्यात नोकरी करणार म्हणून? सैन्यात भरती होणार आहेस का? बघ हो, आपल्या वंशाचा एकुलता एक दिवा आहेस तू! वंश पुढे न्यायची जबाबदारी आहे हो तुझ्यावर!"

"अगं नाही, मी काही सैन्यात भरती होणार नाहीये," मी हसत म्हणालो, "संरक्षण खात्यातली नोकरी आहे. एक नवीन विभाग त्यांनी सुरू केला आहे. त्याचं नाव 'अमर' - 'Advanced Materials Analysis and Research'. सैन्याला लागणारी उपकरणं आणि अवजारं तयार करण्याचं काम आमच्या ह्या विभागाकडे आहे."

बाबा वर्तमानपत्रात डोके खुपसून बसले होते. "सॅलरी पॅकेज उत्तम आहे!" मान वरही न करता ते म्हणाले.

"काय म्हणालास?" आजीने विचारले.

"म्हटलं, उत्तम पगाराची नोकरी आहे चिरंजीवांची. आता इंजिनिअरिंग केल्यावर मिळायलाच हवी म्हणा उत्तम नोकरी!" बाबा म्हणाले.

"तुला नाही रे, मी आदिला विचारत होते." आजी म्हणाली.

"सैन्याला लागणारी उपकरणं आणि अवजा... " मी पुन्हा सांगायला सुरुवात करताच आजी मला अडवत म्हणाली, "ते नाही, तुमच्या त्या विभागाचं नाव काय म्हणालास? अमर?"

"हो.., का?" आजीला आमच्या विभागाच्या नावात रस वाटलेला पाहून मला गम्मत वाटली.

"थांब हो, मी आलेच," म्हणत आजी उठली आणि घरात गेली.

मी आणि बाबांनी गोंधळून एकमेकांकडे पाहिले. थोडा वेळ झाला तरी आजी बाहेर येत नाही पाहून मीच तिला शोधत घरात गेलो. ती पडवीतल्या कोठीच्या खोलीत काहीतरी शोधत होती. गेल्या अनेक पिढयांपासून ही खोली कोठीची खोली म्हणून वापरात आहे. तिथे असलेले जुने फर्निचर, मोठमोठ्या पेट्या वगैरे वस्तू घरात नेमक्या कोणी, कधी आणि कुठून आणल्या त्याची माहिती आमच्या आजीच्या पिढीतल्या लोकांना तरी होती की नाही कुणास ठाऊक.

"काय शोधत्येस?" मी विचारले.

"दाखवते ना. ती लोखंडी पेटी ओढ जरा इकडे." एका पेटीकडे बोट दाखवत आजी म्हणाली.

मी ती जड पेटी पुढे ओढली. ती उघडून आजीने त्यात शोधाशोध करून एक गोलाकार वस्तू बाहेर काढली. बोलिंग बॉलपेक्षा थोडा छोटा पण अतिशय गंजलेला लोखंडी गोळा होता तो. काही ठिकाणी गंजक्या भागाचे टवके उडाले होते.

"ह्या वस्तूवर काय लिहिलंय ते तुला वाचता येतंय का बघ बरं," तो गोळा माझ्या हातात देत आजी म्हणाली.

काहीतरी लिहिलेले असावे हे कळत होते, पण नेमके काय लिहिले होते ते त्या गंजातून कळत नव्हते. इंग्रजी "R" हे अक्षर पुसट दिसत होते. कल्पनेला ताण दिला तर "R"च्या आधी "A" लिहिलेला असावा असे वाटत होते. पण खात्रीने सांगता येणे अवघड होते.

"तुझ्या आजोबांनी मला हे जपून ठेव म्हणून सांगितलं होतं. तुझ्या आजोबांना ते त्यांच्या आजोबांनी दिलं होतं म्हणे, आणि त्यांना त्यांच्या आजोबांनी. अशी पिढ्यानपिढ्या आपल्याकडे असलेली ही वस्तू आहे. ह्या वस्तूचं नाव "अमर" की असंच काहीसं आहे असं तुझे आजोबा एकदा म्हणाले होते. तुझे आजोबा सांगायचे की पणजोबा, म्हणजे तुझ्या आजोबांचे पणजोबा, ते म्हणजे एक बडी आसामी! त्यांचं नाव आदिनारायण की कायसं होतं. तुझ्या नावाशी मिळतंजुळतं. ते म्हणे मोठे विद्वान होते. त्यांना अनेक गोष्टींचं ज्ञान होतं. त्यांना इंग्रजी उत्तम बोलता यायचं. त्यामुळे त्यांना ब्रिटिश मित्र होते आणि ते ब्रिटिशांना अनेक गोष्टींत मदतही करायचे. त्यांची बायको, त्यांचं नाव सरोजिनी, त्या माहेरच्या मोठ्या जमीनदार घराण्यातल्या होत्या. त्यांच्या वडलांकडे मोठा जमीनजुमला होता, खूप श्रीमंती होती. ती संपत्ती आणि जमीन नंतर सरोजिनी बाईंना मिळाली. आता आपल्याकडे जे काही आहे ते त्या सरोजिनीबाईंच्या माहेराहूनच आलेलं आहे. तू मगाशी 'अमर' म्हणालास ना तेव्हा मला हे सगळं आठवलं. आता तूच ही वस्तू सांभाळ. आता तुझी नवी नोकरी, नवं आयुष्य सुरू होणार आहे ना!"

मी गोंधळलो. माझी नवी नोकरी, ही गंजलेली वस्तू आणि माझे खापर खापर पणजोबा, कशाचा कशाशी संबंध होता का? पण आजीला बरे वाटावे म्हणून ती वस्तू मी माझ्याकडे ठेऊन घेतली. कधी गप्पांमध्ये लोकांना अशा जुन्या वस्तू दाखवताना आणि त्यांच्याबद्दलचे किस्से सांगताना मजा येते.

"बरं, मी सांभाळीन."

"जपून बरंका आदि, अशा मिलिट्रीतल्या नोकऱ्या जोखमीच्या असतात." आजीला अजूनही माझ्या नोकरीची काळजी वाटत होती.

"अगं आजी, माझी नोकरी टेबलखुर्चीवर बसून खर्डेघाशी करण्याची आहे. बसून बसून चांगला जाडजूड होण्याची जोखीम मात्र आहे!" मी हसत म्हणालो. तिने मान डोलावली, पण तिला काळजी वाटत आहे हे तिच्या चेहऱ्यावर दिसत होते.

***

आता माझी नोकरी सुरू झाल्याला तीन महिने झाले आहेत. मला हे काम आवडत आहे आणि जमतही आहे. आम्ही सगळे एका मोठ्या प्रकल्पावर काम करत आहोत. माझ्यावर त्यांनी एक विशिष्ट गोष्ट - एक विशिष्ट भाग तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. पण त्या प्रकल्पाबद्दल बाकी काहीच ते सांगायला तयार नाहीत आणि ही एक गोष्ट मला सतत खटकत असते. मी केलेला भाग नक्की कुठे, कसा, कशासाठी वापरला जाईल ह्याची मला अजिबात कल्पना नाही. आता ही माहिती मिळाली तर मला माझे काम योग्य रीतीने पूर्ण करण्यात मदतच होईल. मी माझ्या सहकाऱ्यांनाही त्याबद्दल विचारत असतो, पण तेही मोठ्या प्रकल्पाबद्दल अंधारातच आहेत. गोपनीय प्रकल्प आहे म्हणे. बाकीच्यांना तसेही त्यात काही देणेघेणे नाही. रोज इथे येऊन नेमून दिलेल्या कामाच्या पाट्या टाकून झाल्या की घरी जायचे असा सगळ्यांचा दिनक्रम असतो. पण मी मात्र संधी मिळाली की प्रकल्पाबद्दल प्रश्न विचारायचे सोडत नाही.

काही दिवसांनी आमच्या विभागप्रमुखांनी मला त्यांच्या ऑफिसात बोलावले आणि मी गेलो तेव्हा दार लावून घ्या म्हणाले. मी दार लावून घेताच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.

"तुम्ही तुमच्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत रस घेत असता असं मला समजलंय. पण तसं चालणार नाही. तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष देत चला." ते म्हणाले.

"हो.. सर. पण मला वाटतं की मला जर प्रकल्पाच्या उद्दिष्टांबद्दल माहिती समजली तर मला माझं काम जास्त चांगल्या प्रकारे करता येईल.. म्हणून... " माझे बोलणे मध्येच तोडत ते म्हणाले, "तुम्ही तुमच्या कामाचं तेवढंच बघा. ते कुठे कसं वापरायचं ते आम्ही बघू." त्यांचा आवाज आता तापला होता. "हा काही साधासोपा आयटी जॉब नाही. हा राष्ट्रीय सुरक्षेचा मामला आहे. तुम्हाला काय आणि कधी सांगायचं ते आम्हांला माहीत आहे. तुमचं काम सोडून इतर चवकश्या करत बसलात तर सांगून ठेवतो… तुमची नोकरी तर जाईलच, पण…" माझ्याकडे रोखून पाहात त्यांनी वाक्य मध्येच सोडून दिले.

"समजलं सर. पण एक गोष्ट विचारू… " मी काही विचारण्याचा प्रयत्न केला, पण मला मध्येच तोडत ते म्हणाले, "या आता."

मी माझ्या जागेवर परतलो. 'हे बरंय की! प्रकल्पाबद्दलची माहिती मिळावी ही माझी मागणी एवढी अवास्तव आहे का?' मी मनातल्या मनात विचार केला. त्यांचे शब्द अजूनही माझ्या कानात घुमत होते. प्रकल्पाला मदत व्हावी हाच माझा उद्देश होता. पण बॉसला ते पटवून देणे अवघडच होते. कॉफी पिऊन जरा बरे वाटेल, असा विचार करत मी कँटीनला गेलो. तिथे मशीनवर कॉफी करून घेतली आणि शेजारच्या एका सोफ्यावर कॉफीचे घुटके घेत बसलो.

थोड्या वेळाने एक मनुष्य मला त्या कॉफी मशीनशी झटापट करताना दिसला. त्याचे केस अस्ताव्यस्त होते आणि डोळे तांबारलेले होते. बरेच दिवसात तो नीट झोपला नसावा बहुतेक. त्याचे माझ्याकडे लक्ष गेल्यावर तो ओशाळे हसला आणि पुन्हा त्याने मशीनशी झटापट सुरू केली. मी थोडावेळ त्याच्याकडे बघत बसलो आणि मग न राहावून म्हणालो, "फार दमला आहात का तुम्ही?"

तो कसनुसे हसला. मी हात पुढे करत म्हणालो, "मी आदित्य. मला आदि म्हटलंत तरी चालेल."

"रणजित मिश्रा," माझा हात हातात घेऊन हलवत तो म्हणाला. रणजित मिश्रा हे नाव मला ऐकून माहीत होते.

"तुम्ही अप्लाइड डिव्हिजनमध्ये काम करता ना?" मी विचारले.

त्याने होकारार्थी मान हलवली.

"तुमचं काम खूप रोचक आहे असं मी ऐकून आहे. तुम्ही त्या मोठ्या इमारतीत बसता ना?"

त्याने पुन्हा होकारार्थी मान डोलावली. हा मनुष्य पार्ट्यांमध्ये खूप लोकप्रिय असणार असे माझ्या मनात येऊन गेले.

"त्या मोठ्या इमारतीत बसून तुम्ही काय काम करता? आमच्या ऑफिसातल्या लोकांमध्ये तुमच्या कामावरून पैजा लागतात. आम्ही केलेल्या कामांबद्दलची कागदपत्र तुम्ही तयार करता म्हणे. म्हणजे, असं काही जण म्हणतात. सरकारी खातं ना आपलं! नोकरशाही म्हटली की कागदी घोडे नाचवावे लागतच असणार. मी तर गमतीत म्हणतो की तिथे बसून तुम्ही सगळे पार्ट्या झोडत असणार! बरोबर?"

तो हसला. आता मात्र त्याच्या हसण्यात कसनुसेपणाचा, ओशाळेपणाचा मागमूसही नव्हता. "दुर्दैवाने आमच्या कामाबद्दल काही सांगायला आम्हाला मनाई आहे. आम्ही काय करतो ते मी सांगू शकत नाही. हां, पण आम्ही काय करत नाही ते मात्र सांगू शकीन. आम्ही तिथे अजिबातच पार्ट्या झोडत नाही. म्हणजे तुम्ही म्हणताय त्याअर्थाने तर नाहीच नाही!"

त्याला प्रकल्पाबद्दल माहिती विचारण्याची संधी मी सोडली नाहीच, पण रणजितने मला काही माग लागू दिला नाही. आम्ही थोडावेळ इकडचे-तिकडचे बोललो आणि आपापल्या मार्गी लागलो.

संध्याकाळी माझे काम संपेस्तोवर बाहेर अंधार पडला होता. म्हणजे कामात मी किती तास घालवले त्याचा मला पत्ताच नव्हता तर! माझे बहुतेक सारे सहकारी कधीच निघून गेले असावेत. मीही माझी पिशवी उचलली आणि पार्किंग लॉटच्या दिशेने निघालो. काही तुरळक कार सोडल्या तर पार्किंग लॉट बराचसा रिकामा झाला होता. माझी पिशवी गाडीत ठेवताठेवता माझे लक्ष त्या मोठ्या - रणजित मिश्रा काम करत असलेल्या इमारतीकडे गेले. मी दोन क्षण त्या इमारतीबद्दल विचार करत उभा राहिलो.

त्या इमारतीत जाण्याची मला परवानगी नाही. त्या इमारतीच्या बाहेर सुरक्षा रक्षक कायम उभे असतात. तिथे नेमके काय चालते ते जाणून घेण्याची मला फारच उत्सुकता आहे. आत्ताही तो रणजित तिथे आत बसलेला असणार. तसा तो मनुष्य मला गटवण्याजोगा वाटला. ह्या माणसावर थोडी 'मेहनत' घेतली तर तो मला त्याच्या कामाबद्दल सांगेल का? त्याला कसे गटवावे हा विचार करत मी त्या सुरक्षा रक्षकांच्या दिशेने गेलो.

"मला ही प्रकल्पासंदर्भातली डिस्क रणजित मिश्रांना द्यायची आहे. ते आत बसले आहेत." मी माझ्या पिशवीतून हाताला लागली ती एक सीडी काढून त्या सुरक्षारक्षकाला दाखवली. त्या रक्षकाने माझे ओळखपत्र तपासले, त्याच्या संगणकामध्ये काही नोंदी केल्या आणि आश्चर्य म्हणजे मला आत जाण्याची परवानगी दिली. हे इतके सहज जमून येईल, माझा खोटेपणा इतका सहज वठेल असे मला खरेच वाटले नव्हते.

मी आत शिरलो आणि कोणत्या दिशेने जावे असा विचार करत क्षणभर उभा राहिलो, तोच रणजित मिश्रा लगबगीने माझ्या दिशेने येताना मला दिसला.

"सॉरी, मला तुम्हाला भेटायचं होतं म्हणून मी त्या गार्डला खोटंच काम सांगितलं." मी अजीजीने म्हणालो.

"हो, आलं माझ्या लक्षात. हे नसतं धाडस तुमच्या अंगाशी येणार बरं का! पण आता आधी आत चला."

आम्ही दोघे एका दारापाशी आल्यावर रणजित मिश्रा थांबला. त्याने ते दार उघडले आणि आम्ही दोघे आत गेलो. आतमध्ये थोड्या उंची असाव्यात अशा गुबगुबीत गादीवाल्या खुर्च्या ओळीत मांडलेल्या होत्या. त्यांच्या पुढ्यात काचेची एक मोठी भिंत होती. त्या खुर्च्यांवर बसून त्या भिंतीपलीकडच्या खोलीतील दृश्य पाहता यावे अशी रचना केलेली होती. त्या पलीकडील खोलीत जे काही होते ते निव्वळ वर्णनातीत होते. डोळे कितीही मोठे केले तरी समोरचे ते अवर्णनीय दृश्य डोळ्यांत साठवणे केवळ अशक्य होते. त्या काचेच्या भिंतीपलीकडे एक प्रशस्त, नव्हे भव्य खोली होती - किमान १०० फुटांची लांबी-रुंदी-उंची तरी असावी. भिंतींना चमकदार पांढरा रंग होता. कोपऱ्यात मोठ्या जड वस्तू हलवण्यासाठी लागते तशी क्रेन होती. छतावर आणि भिंतींवर पांढरे दिवे झगमगत होते, पण त्यांचा प्रकाश सौम्य होता.

त्या खोलीच्या मध्यभागी एक वस्तू ठेवलेली होती. हॉलिवूडच्या स्टुडिओत एखाद्या साय-फाय चित्रपटामध्ये वापरण्यासाठी केलेली वस्तू असावी अशी दिसत होती. सुमारे ३० फूट व्यासाच्या धातूच्या चमकदार गोलकाभोवती धातूची दोन कडी एकमेकांना काटकोनात छेदत फिरत होती. त्या गोलकावर एका ठिकाणी आत जाण्यासाठीचा दरवाजा दिसत होता. दरवाजाच्या वरच्या भागावर छोटी खिडकी होती. समोरचे दृश्य पाहात मी मी तिथे अवाक उभा राहिलो.

"लष्करासाठी आम्ही हे नवं शस्त्र तयार करत आहोत. हा ट्रान्सपोर्टर आहे. तो सैन्याला कुठेही पाठवू शकतो. आपल्या पुराणातल्या कथांमध्ये देव कसे त्यांच्या मनात येईल तेव्हा अवतरतात आणि अंतर्धान पावतात? तर आता आपल्याकडेही ही अंतर्धान पावण्यासाठीची टेक्नॉलॉजी आहे."

"काय? कसं?" नेमके काय विचारावे मला कळेना. खूप प्रश्न होते मनात.

"थोडक्यात सांगायचं तर हे टेलिपोर्टेशन यंत्र आहे. चला आपण तिथे जाऊ. मी तुम्हाला दाखवतो."

आम्ही त्या मोठ्या गोलाकापाशी गेलो. रणजितने संगणकाची बटणे दाबत त्या गोलाकाचे दार उघडले आणि म्हणाला, "सैन्य ह्या दारातून आत जातं. एका वेळी २० ते ३० सैनिक मावू शकतील एवढी जागा आत आहे. सैनिक आत गेल्यावर जिथे जायचे आहे तिथले कोऑर्डिनेट्स ह्या कॉम्प्युटरवर दिले की क्षणात, पापणी लवायच्या आत तिथे पोहोचता येतं. एका मिनिटांत आम्ही शंभर सैनिक सहज टेलिपोर्ट करू शकतो."

मी चकित झालो होतो. एका क्षणात सैन्य इकडून तिकडे पाठवता आले तर देशाला त्याचा किती फायदा होईल! क्षणार्धात आपले शेकडो सैनिक शत्रुसैन्यात घुसले तर त्यांची किती तारांबळ उडेल नाही का!

"पण मग सैनिकांना परत कसं आणता?" मी विचारले.

रणजित त्या गोलकात गेला आणि हातात मावेल असा एक लहान गोलक आतून घेऊन आला.

"हा ट्रॅकर आहे. हा सैनिकांचा माग ठेवतो. मग त्या ठिकाणाहून सैनिकांना परत आणता येतं."

मी तो छोटा गोलक नीट निरखून पाहिला. त्यावर एका बाजूला 'AMAR' नाव कोरलेले होते. माझ्या विभागाचे नाव. तो छोटा गोलक पाहिल्यावर मला आजीची आठवण झाली. तिने दिलेला तो गंजलेला गोलक एवढाच, असाच होता का?

रणजितच्या बोलण्याने माझी तंद्री पुन्हा भंगली. "तुम्हाला आत जाऊन बघायचंय का?" त्याने विचारले.

मला आत जाण्याची उत्सुकता तर होती, पण मी हो म्हणताना थोडा कचरलो. "चालेल का तसं? म्हणजे मला परवानगी आहे का आत जायला? एक तर मी खोटं बोलून इथे आलोय. शिवाय माझ्यामुळे उगीच तुम्ही गोत्यात आलात असं नको." मी म्हणालो.

"इतक्या उशिरा कोण येणार इकडे? आतापर्यंत सगळे घरी गेले असतील." रणजित हसत म्हणाला.

मीही मान डोलावली आणि आत गेलो. आत एकही खुर्ची नव्हती. तसेही खुर्चीचे काय काम होते म्हणा? आत गेलेला प्रत्येक जण क्षणात टेलिपोर्ट होऊन दुसरीकडे कुठेतरी अवतरत असणार. काही डझन लोक एकावेळी मावतील एवढी जागा आत नक्कीच होती.

मी आत काय आहे हे बघत असताना अचानक त्या गोलकाचे दार खाड्कन बंद झाले. मी दाराकडे धावत गेलो, पण तोवर ते घट्ट बंद झाले होते. मी ते उघडण्याचा निकराने प्रयत्न केला, रणजीतच्या नावाने जोरजोरात हाका मारल्या, पण काही उपयोग झाला नाही. दारावरच्या काचेतून मी बाहेर पाहिले, तर माझे विभागप्रमुख रणजितशी बोलताना मला दिसले. बापरे, म्हणजे असा डाव होता तर!

त्यांनी जवळचा माईक उचलला आणि त्यातून बोलायला सुरुवात केली. आता त्यांचे बोलणे मला त्या गोलाकाच्या आत व्यवस्थित ऐकू येत होते. "हे बघ, तुझं काम सोडून बाकी गोष्टीत नाक खुपसू नकोस असं मी तुला नीट बजावलं होतं, पण तू माझं ऐकलं नाहीस. आता मात्र तुला जावंच लागेल."

"रणजित, रणजित, प्लीज दार उघडा. प्लीज. त्यांचं ऐकू नका. प्लीज मला बाहेर काढा..." मी आतून ओरडत सुटलो. पण रणजित अगदी असहाय्य दिसत होता.

"प्लीज दार उघडा. कुठे पाठवताय मला?" मी ओरडतच होतो.

"कुठे? त्यापेक्षा कधी ते विचार!" माझे बॉस म्हणाले.

"म्हणजे? म्हणजे काय?" मी पार गोंधळून गेलो होतो. हे काय म्हणत आहेत नेमके?

"म्हणजे आता काही क्षणात तू जगातला पहिला टाइम ट्रॅव्हलर असशील. पहिला कालप्रवासी मानव! तू आत्ता टाईममशीनमध्ये आहेस. का ल यं त्र!!"

माझ्यावर जणू वीज कोसळली होती. माझा बॉस पुढे बोलतच होता, "तुला सांगतो काळासारखं दुसरं शस्त्र नाही! कोणी कोणाला मारण्याची आता गरजच नाही. शिक्षा द्यायची झाली तर त्यांना दुसऱ्या काळात ढकलून दिलं की झालं काम! मग कोणी त्यांना शोधून काढण्याचा प्रश्नच येत नाही! कुठे शोधणार ना? मी तुला असाच दुसऱ्या काळात ढकलून देणार आहे. तुला लाख वर्षं मागे पाठवू का? माणसं माकडं असण्याच्या काळात? मग जा हनुमानाला भेटायला!" हे कुत्सित हसले.

"नको, नको, प्लीज…" मी ओरडत असतानाच माझ्या बॉसने यंत्र सुरू केले.

ताबडतोब काहीतरी करायला हवे, पण नेमके काय करायला हवे ते समजत नाही अशी माझी अवस्था झाली होती. मी दिसतील ती बटणे दाबायला सुरुवात केली. तो छोटा गोळा अजूनही माझ्या हातात होता. तो आतले कन्सोल आणि टर्मिनल्सवरती आपटायला सुरुवात केली. काही करून यंत्रात बिघाड निर्माण करावा असा माझा हेतू होता. पण तो मोठा गोलक जोरजोरात हादरायला सुरुवात झाली. हे हादरणे माझ्या आपटाआपटीमुळे की माझ्या बॉसने यंत्र चालू केल्यामुळे?

अचानक माझ्याभोवती प्रखर प्रकाश पसरला आणि मी त्यात बुडून गेलो. क्षणभर तो प्रकाश आणखी प्रखर झाला आणि माझी शुद्ध हरपली.

***

मी डोळे उघडले तेव्हा मला समोर निळे आकाश आणि पक्षी उडताना दिसले. पूर्ण भानावर येण्यासाठी मला थोडा वेळ लागला. मी उठून बसलो. माझे डोके ठणकत होते. मी आजूबाजूला नजर फिरवली. मी एका माळरानात होतो. कुठे आहे मी? कोणत्या काळात? मी स्वप्नात तर नव्हतो?

मी डोळे मिटून आठवण्याचा प्रयत्न केला. इथे माळरानात येण्यापूर्वी मी कुठे होतो? काय करत होतो?

"कोन रं तू? काय जालं तुला? बरा हाईस का? कुटनं आला रं तू?" कोणीतरी मला प्रश्न विचारत होते.

मी डोळे उघडले. समोर एक शेतकरी हातात कोयता धरून उभा होता.

"कुठे आहे मी? ह्या गावाचं नाव काय?" मी बोलण्याचा प्रयत्न केला.

"हे कोत्तुरू गाव. बरं वाटतंय का? उठतो का तू? मी धरू?" त्या शेतकऱ्याने मला खांद्याला धरून उभे राहायला मदत केली.

"बऱ्या घरचा दिसतो की! कुटनं आला म्हने?" त्याने विचारले.

"लांब….वरून आलो," मी पुटपुटलो.

"ही आपल्या मालकांची जमीन हाय. जमीनदार राजलिंगम. चाल मी तुला त्यांच्याकडं घिऊन जातो. त्यांस्नी सगळं बैजवार सांग."

"हे कोणतं साल आहे?"

"मला ठावं नाय. पण आपले मालक निजाम राजाला कर द्येतात बघ." त्याने त्याच्याकडची माहिती पुरवली.

निझाम? म्हणजे अठरावे शतक? १७५०चा सुमार असावा का? बापरे! अशक्य!! मी विचार करता करता चालत राहिलो.

आम्ही मालकांकडे गेलो. जमीनदार ओसरीत बसले होते आणि कोणाशी तरी बोलत होते. आम्हाला येताना पाहून ते बोलायचे थांबले. त्या शेतकऱ्याने झुकून त्यांना वंदन केले.

"नमस्कार मालक. ह्यो तिथं श्येतात सापडला मला. बेसुध पडला व्हता. लांबवरनं आलाय म्हने. चांगल्या घरचा दिसतो. म्हनून तुमच्याकडं घेऊन आलो."

जमीनदारांनी माझ्याकडे निरखून पाहात विचारले, "नाव काय तुमचं? कुठून आलात?"

"माझं नाव आदित्य. मी तेनालीहून आलो…" मी थांबलो आणि दोन्ही हातांमध्ये माझे डोके धरून उभा राहिलो. माझे डोके असह्य दुखत होते.

"हं… ठीक आहे. बरे नाही का तुम्हाला?" जमीनदारांनी शेजारी उभ्या असलेल्या माणसाला खूण केली.

"तुम्ही थोडावेळ विश्रांती घ्या. हे आमचे लेखनिक. ते तुम्हाला आमच्या विश्रामगृहात घेऊन जातील. माझे काम आटोपले की आपण तपशीलवार बोलू."

"थँक्यू!... अं… धन्यवाद!" मी चूक लगेच दुरुस्त करत म्हणालो.

"अरे वा! टोपीकराची भाषा येते वाटते तुम्हाला? शिकलेसवरलेले दिसता? तुम्हाला वेळ होईल तेव्हा माझ्या मुलीशीही बोला."

मग घरात बघत त्यांनी त्यांच्या मुलीला हाक मारली, "सरोजा, बाहेर ये जरा."

सरोजा? म्हणजे सरोजिनी? मी आधी कुठे ऐकले आहे बरे हे नाव?

"या, माझ्याबरोबर या अ…." ते लेखनिक बहुतेक माझे नाव विसरले असावेत.

अचानक मला आजीने माझ्या खापर खापर पणजीचे नाव सरोजिनी सांगितले होते त्याची आठवण झाली. मग एकूण परिस्थिती ध्यानात यायला मला वेळ लागला नाही.

खोलवर श्वास घेत मी लेखनिकांकडे हसून पाहिले आणि म्हणालो, "मला आदिनारायण म्हणा."

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

कथा खूपच वाईट आहे, पण so bad that it is good म्हणावं इतकी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

भाषांतरित का होईना, विज्ञानकथा आहे!
पण कालप्रवास-paradox हे फार फार घासून गुळगुळीत शब्दएव्हढंच जुनं कथानक का!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0