एक चटणी. एक ठेचा.
माझ्या इथल्या पूर्वकर्मांमुळे या दोन्ही पाककृती खऱ्या आहेत आणि खाण्यायोग्य आहेत हे इथे आवर्जून सांगावंसं वाटतं.
१. लसणीच्या पातीची हिरवी चटणी
भारतात - पुण्यात - कर्वेनगरच्या विठ्ठल मंदिराच्या मागच्या भाजी मंडईत - हल्ली लसूण पात मुबलक प्रमाणात मिळते. अनेक बेचव/चवहीन (तरीही पौष्टिक) पदार्थांना चव आहे असा भास निर्माण करण्यासाठी ही पाककृती वापरली जाऊ शकते.
जिन्नस:
लसूण पात (१)
तिखट हिरव्या मिरच्या (४-५)
ओलं खोबरं (१/२ वाटी)
कोथिंबीर (१/४ वाटी)
लिंबू (अर्धे)
मीठ - साखर (आवडीनुसार)
कृती:
लसणीच्या पातीची हिरवी पानं धुवून, चिरून मिक्सरच्या चटणी करायच्या भांड्यात टाकावीत. लसूण शक्यतो भाजीत किंवा आमटीत किंवा पुढील पाककृतीत वापरावा. दोन्हीं वापरायला काही हरकत नाही फक्त मग दिवसभर/रात्रभर आपण असा काही पदार्थ खाल्ला आहे याची आठवण होत राहील. तसाही हा पदार्थ तरुण लोकांनी शुक्रवारी संध्याकाळी खाऊ नये.
मग उरलेले जिन्नस भांड्यात घेऊन, त्यात थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यावेत.
२. मध्यम बांध्याच्या लाल मिरचीचा ठेचा
ताजी बारीक लाल मिरची आणि लाल ढोबळी मिरची या दोन्हींच्या मधल्या आकाराची मिरची सध्या बाजारात उपलब्ध आहे. ती चवीलाही मध्यम तिखट असते. रंग मात्र अगदी लाल चुटुक असतो त्यामुळे ही मिरची बघितल्यावर लगेच तिचा ठेचा करायची इच्छा होते.
जिन्नस:
लाल मिरच्या (७-८)
शेंगदाणे (मूठभर)
लसूण (१०-१२ पाकळ्या. वरील हिरव्या चटणीतून उरलेले लसूण वापरायची चांगली संधी)
तेल (३ टेबल स्पून, किंवा आवडत असल्यास जास्त)
मीठ
चांगला लोखंडी तवा (तेल जास्त वापरायचे असल्यास लोखंडी कढई)
तव्यावर तेल तापवून त्यात आधी लसूण आणि मग प्रत्येक मिरचीचे साधारण दोन तुकडे करून टाकावेत. त्यानंतर दाणे टाकावेत. या तीनही गोष्टी तेलात बराच वेळ परतून घ्याव्या. मिरच्या बाहेरून थोड्या पांढऱ्या दिसू लागतात आणि त्यांना सेकंड डिग्री बर्न्स होतात. यानंतर स्वयंपाकघरात थोडा खाट उठतो. असा खाट उठला की त्यात मीठ घालून, नीट मिसळून गॅस बंद करावा.
खरी पद्धत यानंतर एक दगडी बत्ता घेऊन तव्यातच हे मिश्रण ठेचायची आहे. पण मी हे मिश्रण गार करून मिक्सरमधून एकदा किंवा दोनदा हलकेच फिरवून घेते.
ते स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत काढून तव्यात उरलेले तेल त्यावर ओतावे. त्या तेलात मिरचीचा आणि लसणाचा अर्क उतरलेला असतो त्यामुळे ठेचा अजून चविष्ट होतो आणि जास्त दिवस टिकतो.
काही लोकांना ही मिरची कमी तिखट वाटू शकते. असं असल्यास तिखटपणा वाढवायला ताजी, बारीक पण लाल (च) मिरची वापरावी.
खरंतर काहीही तीनाच्या संचात अधिक शोभून दिसतं. पण मी या दोनच पाककृती करून बघितल्या आहेत आणि कल्पनाशक्ती वापरायची नाही असं ठरवल्याने एवढ्यावरच थांबते.
प्रतिक्रिया
.
> तसाही हा पदार्थ तरुण लोकांनी शुक्रवारी संध्याकाळी खाऊ नये.
हा सल्ला पूर्णपणे पटला नाही. दोन्ही संबंधित पक्षांनी (किंवा दोनपेक्षा अधिक असल्यास सर्वांनी) खाल्ल्यास संभाव्य दुष्परिणाम कॅन्सल व्हायला हरकत नाही. चरकसंहितेप्रमाणे लसूण कामोत्तेजक असते हे ही इथे नमूद करू इच्छितो. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी ही चटणी खाऊन शनिवारी सकाळी चहाबरोबर साजुक तुपातला शिरा खाल्ल्यास तामस, राजस, सात्विक असे तिन्ही गुण कव्हर होऊन जीवनाचा समतोल टिकून राहील असं माझं मत आहे.
- जयदीप चिपलकट्टी
(होमपेज)
.
>>न्ही संबंधित पक्षांनी (किंवा दोनपेक्षा अधिक असल्यास सर्वांनी) खाल्ल्यास संभाव्य दुष्परिणाम कॅन्सल व्हायला हरकत नाही.
असं एकमताने लसूण खाण्यासाठी ओळखीची अनेक आवर्तनं व्हावी लागतात. एखादी जोडीदारेछुक व्यक्ती नाईटक्लबमध्ये अशाप्रकारे लसूण खाऊन गेली तर तशाच प्रकारे लसूण खाऊन आलेली दुसरी (किंवा अनेक) व्यक्ती भेटायची प्रोबेबलिटी काय?
आणि शिऱ्यात आणि लसूण चटणीमध्ये १२ तासांचे अंतर ठेवायची काहीच गरज नाही. आपल्याकडे शिऱ्याबरोबर तिखट लोणचं किंवा चटणी खाण्याची परंपरा आहेच. त्याशिवाय इतका गोडमिट्ट पदार्थ खाताच येत नाही.
…
समजा, पबमध्ये गेल्यानंतर, जोडीदार गाठल्यानंतर मग दोन्हीं (किंवा तिन्हीं, किंवा असतील तितक्या) जोडीदारांनी एकसमयावच्छेदेकरून (किंवा आळीपाळीने, किंवा कसेही) बियरबरोबर (किंवा बियरविना, किंवा इतर कशाही बरोबर किंवा विना) लसूण (आणि वाटल्यास मिरच्यासुद्धा, नि झालेच तर, फॉर गुड मेझर, कांदे) हाणायला जर सुरुवात केली, तर? त्याला तर तुमची काही हरकत असू नये, नाही काय?
हे तुम्ही कोण ठरवणार? असतील त्यांचे (कोशरसारखे) काही कडक (आणि गुंतागुंतीचे) नियम! तुम्हांस काय ठाऊक?
महाराष्ट्रातले पब्ज़ (परंपरेस अनुसरून) ज्या दिवशी (बियरबरोबर किंवा बियरविना) शिरा आणि लोणचे देऊ लागतील, त्या दिवशी लक्ष्मी रोडवरचे आमचे लाडके१ ‘जनसेवा दुग्धमंदिर’२ पुनरुज्जीवित होऊन खरवसासोबत (‘पियूष’ऐवजी) सिंगल माल्ट (औंसभर विनम्रतेसह) सर्व्ह करू लागेल!
असो चालायचेच.
—————
१ ‘कारण शेवटी आम्ही भटेच! त्याला काय करणार?’ असे पु.ल. म्हणून गेलेलेच आहेत.
२ उपाध्यांचे. गेऽले बिचारे! म्हणजे, दुग्धमंदिर; उपाध्ये नव्हेत. उपाध्ये असतीलही अजून, किंवा नसतीलही; कोणाला फरक पडतो?
आव्हान स्वीकारत आहे.
हे वाक्य मला खिजवण्यासाठी लिहिलं आहे असं वाटत आहे. की ही घे पाककृती, आणि ही चटणीसुद्धा बेचव करून दाखव बघू! तर आता लसूण पेरायचा काळ आहे. मग वश्याच्या शेवटी लसून तयार होईल, तेव्हा हे आव्हान स्वीकारण्यात येईल.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
ठेचा
कोणतीही चटणी करताना कोणाला तरी ठेचावंच लागतं .
.
लसूण स्वतः पिकविलेला असला की पुढचे कुठलेच निकष लागू होत नाहीत. तो जन्मतःच चविष्ट असतो.
आणि मी?
मी लसूण पिकवल्यास मीही चविष्ट ठरते का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मस्त पाककृती. तुम्ही जर
मस्त पाककृती. तुम्ही जर राजमा, छोले, मा की दाल, पनीर लोबिया इत्यादि पदार्थ खात असाल तर त्यात लसूण टाकणे गरजेचे. नाही टाकले तर रात्री त्रास होण्याची संभावना जास्त. शुक्रवारी रात्री लसूणाची चटणी आणि तिखट मिरची जास्त खाल्ली तर शनिवारी सकाळी पोट स्वच्छ होण्याची संभावना जास्त.
.
हा तुमचा दृष्टिकोन झाला.
तुमचे ठीकच आहे. तुम्ही काही जोडीदार शोधायला शुक्रवारी संध्याकाळी नाइटक्लबमध्ये (पबमध्ये?) जात नाही. (चूभूद्याघ्या.) त्यामुळे, तुम्हाला असा दृष्टिकोन परवडू शकतो.
——————————
(पबवरून आठवले. बाकी, बियरबरोबर भरपूर लसूणयुक्त असा (आणि, फॉर्दॅट्मॅटर, भरपूर मिरच्यायुक्तसुद्धा!) पदार्थ खरे तर अतिशय सुंदर जमून जायला हरकत नसावी. परंतु, इथल्या नाकाने लसूण सोलणाऱ्यांना काय त्याचे! आज म्हणताहेत शुक्रवारी संध्याकाळी लसूण खाऊ नका, म्हणून; उद्या म्हणतील चातुर्मासांत (पबमध्ये जा, परंतु) लसूण खाऊ नका! यांचे कुठवर ऐकून घ्यायचे? आणि, काय म्हणून?)
(अतिअवांतर: केवळ लसूण खाल्ल्यामुळे जर जोडीदार आकर्षित होणार नसेल, तर, is that जोडीदार worth it?)
.
>>परंतु, इथल्या नाकाने लसूण सोलणाऱ्यांना काय त्याचे!
अरेरे. मला हा धागा सुरू झाला तेव्हापासून हा वरील वाक्प्रचार सुचला होता. तो वापरायची संधी माझ्याआधी तुम्ही शोधलीत याचं मनापासून दुःख झालं.
>>केवळ लसूण खाल्ल्यामुळे जर जोडीदार आकर्षित होणार नसेल, तर, is that जोडीदार worth it?
सगळं "worth it" कशाला हवं? इतकं इकॉनॉमिकली कशाला जगायचं? तसंही "worth it" जोडीदार शोधायला कुणी नाइट क्लबात जात नाही (न.बा, तुमचा नाइट क्लब आणि पब या दोन स्थळांचा गोंधळ होतो आहे हे मी नम्रपणे तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छिते).
वर्थइट जोडीदार शोधायचे "अनुरूप" हे एकमेव ठिकाण.
आपण कृपया पुण्यातील नाईट क्लब
आपण कृपया पुण्यातील नाईट क्लब आणि पब यांची सद्यस्थिती या विषयावर एक अगदी प्रबंध नाही तरी किमान निबंध लिहावा ही आपणास नम्र विनंती. सांप्रतकाळी तरुण पिढीचे पाणवठे* कसे असतात हे तरी आम्हास कळेल.
लसूण अँड मिरची कॅन वेट.
हायस्ट्रीट
नाइटक्लब अशी जागा असते जिथे
(एकवीस ते सत्तावीस या वयोगटातल्या) बायका बॉडीकॉन ड्रेस (ज्यांना हा शोभतो त्यांची टक्केवारी एकूण लोकसंख्येच्या ०.०५ % असते) आणि साधारण चार इंच उंच हील्स घालून (बाहेर दारू महाग असते म्हणून घरीच थोडी पिऊन) टॅक्सी शेअर करून जातात. तिथे कानाचे पडदे फाटायला जरा कमी, इतक्या मोठ्या आवाजात (शक्यतो पॉप) संगीत लावलेलं असतं. तिथे प्रवेश मिळवायला अनेक विक्षिप्त आणि अतर्क्य नियम असतात आणि आत जाताना हातावर क्लबच्या नावाची मोहर लावून पाठवतात. तिथे कुणाशीही बोलायला त्यांच्या अगदी जवळ बसून त्यांच्या कानात ओरडावं लागतं. इथे लोक शक्यतो फक्त दारू पितात आणि नाच करतात (किंवा ज्यांना नाच करता येतो अशांकडे दारू पिता पिता बघत बसतात).
पब म्हणजे माझ्या अनुभवाप्रमाणे जिथे नीट बसायला जागा असते, बिअर बरोबर खाण्यासारखे बरेच लसूणयुक्त पदार्थ (कोणत्यातरी फॉर्ममध्ये तळलेले बटाटे + गार्लिक एओली, स्टेक, फिश आणि चिप्स, अमेरिकेत रूबन सारखं एखादं सँडविच इत्यादी इत्यादी) मिळतात, आणि मुख्य म्हणजे टेबलवर उपस्थित बहुतेक लोकांचे बोलणे नीट ऐकू येते; आणि अगदी तत्वज्ञानावर वगैरेही चर्चा करता येऊ शकते अशी जागा.
पुण्यातले चांगले क्लब सध्या बाणेर - बालेवाडी हायस्ट्रीटवर आहेत असं सध्याची तरुणाई सांगते.
सखोल माहिती पुरविल्याबद्दल
सखोल माहिती पुरविल्याबद्दल आभारी आहे...परिस्थितीने एकंदरीत गंभीर वळण घेतलेले दिसते तर.
आपण पबचे वर्णन केलेत ते विलायतेतील असावे ना ?
पूर्वी (गेले ते दिवस... सुस्कारा) पुण्यात तुम्ही ज्याला नाईट क्लब म्हणत आहात त्याला डिस्कोथेक किंवा डिस्क किंवा पब म्हणणेची ( बहुधा चुकीची) प्रथा होती. नाईट क्लबचे वर्णन थोडे वेगळे असे.
पण ते एक असो.
आभार
टेन डाऊनिंग स्ट्रीट
म्हणजेच TDS नावाचा प्रसिद्ध क्लब पुण्यात होता. तुम्ही म्हणता तसं त्याला पब म्हणायचे. पण तेव्हा म्हणजे लेट ९०s अर्ली २००० मध्ये तिथे फक्त अतिश्रीमंत (हॉस्टेल रूमवर घालायला खऱ्या आदिदास चपला असणारे, १०००० रुपये खर्चून ब्रायन Adams काँन्सर्ट (शी!!) बघणारे) लोक जायचे. त्यामुळे तेव्हा आम्ही कधीच गेलो नाही. कारण आम्ही संस्कारी होतो.
पण नंतरच्या प्रत्येक भारतवारीत या अशा स्थळांचे उत्तरोत्तर लोकशाहीकरण होताना दिसले. भारतातही तिथे जाण्याला "क्लबिंग" असा शब्द रूढ झाला. आणि मग तिथे कुणीही (म्हणजे आम्हीही!) जाऊ लागले. दोन वर्षांपूर्वी आम्ही शाळेतले सगळे काकाकाकू मिळून अशा क्लबमध्ये गेलो होतो तेव्हा तिथे रिमिक्स चिकनी चमेली लावलं होतं काही वेळ. त्यामुळे पूर्वीचे दिवस राहिले नाहीत हेच खरं.
TDS अर्थात टेन डाऊनिंग स्ट्रीट
हा ऐशीच्या दशकाच्या शेवटी किंवा नव्वदीच्या सुरुवातीचा बरं.
आणि त्यात पेठी लोके पण असत बरं (शेवटी आम्ही सपे)
गरीब जागा होती , पण वेळेला म्हणतात ना तसे काहीतरी. लसूण खाऊन गेल्याचे मात्र स्मरत नाही.
तत्पूर्वीचा रुमर्स अजून गरीब पण उत्तम. आणि एक गरीब ब्लॅक कॅडीलॅक.
अर्थात हे तुमच्यासारख्या तरुण पिढीला कशाला सांगू
अर्थात तुम्हाला TDS माहीत असेल तर हे असे का म्हणावे.
तर असो.
पब
पुण्यातल्या पब्जच्या वर्णनावरुन, रुपाली हा देखील दारु(तिथे) न पिणाऱ्या पुणेकरांचा पब म्हणावा की हब म्हणावा ? की वितंडवाद घालणाऱ्यांचा स्नब म्हणावा ?
त्यापेक्षा परडाईज किंवा
त्यापेक्षा परडाईज किंवा डायमंड म्हणा सर
?
का बुवा? बचकभर लसूण खाऊन "अनुरूप"मधून शोधलेल्या जोडीदाराच्या तोंडात "हा!" करण्याची सोय असते की काय?
लसूण आणि राणीसाहेब
लसणावरून आठवले.
नुकत्याच दिवंगत झालेल्या राणीसाहेब एलिझाबेथ यांच्या खानपानासंबंधी त्यांच्या एका शेफची मुलाखत पाहिली. राणीसाहेब असेपर्यंत त्यांच्या मुदपाकखान्यात लसूण वर्ज्य होते.
आता काय परिस्थिती आहे याची कल्पना नाही.
???
आँ!
ती थेरडी जोडीदार शोधायला कुठल्या(कुठल्या)
पबांनाइटक्लबांतून (या वयात!) उंडारायची, म्हणे? (आरशात थोबाड पाहिले होतेन् काय कधी?)----------
बाकी, हा 'लसणीचा तोंडाला वास येतो' प्रकार हा टिपिकल इंग्रजी/अँग्लो(/इंग्रजीझग्यातूनपडलेलेछापांचा) भंपकपणा असावा काय? इटालियनांना नि फ्रेंचांना लसणीचे वावडे असण्याचे काही कारण दिसत नाही - त्यांच्यात सर्रास वापरतातसे वाटते. (चूभूद्याघ्या.) नि पोर्तुगीजांचे म्हणाल, तर... 'विंडालू' या गोवन प्रकाराचे नाव ज्याचा अपभ्रंश आहे, त्या मूळ पोर्तुगीज नावातच लसूण आहे, नाही? (शिवाय तुमची - बोले तो, पोर्तुगीजांची - ती लिंग्विका नि चुरीसो सॉसेजे... त्यांच्या चवींतून लसणीचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी जाणवला, ब्वॉ.)
असो चालायचेच!
युरोपियन व्हॅलिडेशन
लसूण चांगला आहे हे सांगायला तुम्हाला anglo Saxon लोकांना तुच्छ लेखायला युरोपियन का लागतात? भारतातही लसूण वापरला जातो. काही बावळट लोक खात नाहीत (काही बावळट फक्त तरुण असताना आणि शुक्रवारी रात्री खात नाहीत) पण तरीही तुम्ही पोर्तुगाली विंदालू/चोरिझो उपसण्याआधी सुकट, बोंबील किंवा हे अती होत असेल तर भरली वांगीही काढू शकला असतात. (मुंबईचा फौजदारमध्ये रंजना भरली वांगी करण्यासाठी शेजाऱ्यांकडून जिन्नस मागून आणते, आणि त्यात लसणीच्या कुड्या असतात तो सीन मला फार आवडतो). कोल्हापुरी मटण आहे. बांगड्याचं तिखलं. मला आठवत नाही कुठे, पण I am sure मी लसणाचं लोणचंही बघितलं आहे.
एवढंच काय, मला गेले काही दिवस सर्दी झाली आहे तर ३८ ते ७३ या वयोगटातल्या ३ व्यक्तींनी मला लसूण भाजून खा, सर्दी पळून जाईल असं सांगितलं. आणि मी असं काही करणार नाही याची खात्री असल्याने पुन्हा फोन करून तो उपाय केला का हे विचारलं.
भारतीय लोक आवडीने लसूण खातात. इंग्रज बिचारे काहीच शिकले नाहीत.
असं (जाज्वल्य) अभिमानाने म्हणता यायला हवं.
<3
आयुर्वेदिक लोक वाढीव रक्तदाब कमी ठेवण्यासाठी, रक्त पातळ करणारी लसूण खायला सांगतात. मी फक्त तळलेली लसूण आवडते म्हणून खायचे.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
(अवांतर)
त्यात पुन्हा एक गोची आहे. रक्तदाब कमी ठेवणे, झालेच तर कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे, वगैरेंसाठी लसूण उपयुक्त ठरतो, असे म्हणतात खरे, परंतु तो कच्चा. शिजविल्यावर हे सर्व गुणधर्म लोप पावतात, असेही वाचलेले आहे.
(अतिअवांतर: चहा हे एक आरोग्यवर्धक पेय आहे.)
सर्दी झाल्यावर नुसती लसणाची
सर्दी झाल्यावर नुसती लसणाची कुडी गोळी गिळतो तशी गिळायची आणि पाणी प्यायचं असा उपाय एका पुस्तकात मी वाचला होता. काय चमत्कार होतो माहित नाही पण सर्दी पळून जाते अक्षरशः.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
प्रश्न तो नाही
हिंदुस्थानात तर खातातच; प्रश्न तो नाही. पांढऱ्या माणसांमध्येसुद्धा लसूणवर्ज्य/लसूणतोंडालावासमारतोचा हा बावळटपणा फक्त अँग्लोंमध्येच चालत असावा, किंवा कसे, (आणि आपल्या बावळट शुक्रवारतरुणांत हे लोण तेथूनच आले असावे, किंवा कसे), फक्त एवढ्याचाच आढावा घेत होतो.
बाकी चालू द्या.
आणखी एक कारण…
इटालियन, फ्रेंच, पोर्तुगीज आदींचा(च) ज़िक्र करण्याचे आणखी एक (महत्त्वाचे!) कारण म्हणजे, रोमान्सचे नि लसणीचे वाकडे नसल्याचे (निर्विवादपणे) प्रस्थापित करणे१.
बाकी काय, चाललेच आहे!
——————————
१ काय नंदन, इ.इ.
अतिरेकी
बडोद्यात कामानिमित्त रहात असताना, आमच्या बिल्डिंग मधला एक मध्यमवयीन माणूस अचानक मेला. त्यानंतर असेही कळले की तो खिशांत कायम बचकभर लसुणी ठेवायचा आणि दिवसभर खात रहायचा. डॉक्टरांनी त्याच्या मृत्युचे ते एक संभाव्य कारण असु शकेल असे सांगितले होते म्हणे!
नागपूर , अमरावती साइडला दारू
नागपूर , अमरावती साइडला दारू बरोबर लसूण फ्राय नामक गोष्ट खातात चकणा म्हणून असे ऐकलं आहे.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
रोचक.
बट मेक्स सेन्स.
पुण्यात सुद्धा अनेक बारमध्ये
पुण्यात सुद्धा अनेक बारमध्ये मिळतो हा चखणा म्हणून.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
शीर्षकावरून (अवांतर)
‘एक मुसाफ़िर एक हसीना’ हे चित्रपटशीर्षक उगाचच आठवून गेले.
पाककृती करून पाहण्यापेक्षा विचारांना चालना देणाऱ्या असतात.
तसाही हा पदार्थ तरुण लोकांनी शुक्रवारी संध्याकाळी खाऊ नये.
आम्ही (मी) आठवड्यातील कोणत्याही वारी आणि वेळी काहीही करत/खात होतो तरुणपणी. हल्लीच्या पिढीचे अर्थातच माहिती नाही.
इथे तळटिपेचा आकडा हवा होता. तळटिपेंमुळे लेख सटीक होतो.
.
https://youtu.be/o3ctwuaXa-A
लासणावर इतकी चर्चा झाली आहे त्यामुळे नाईलाजाने ही लिंक इथे आणावी लगत आहे.
लोल
... हे तर विसरलेच होते!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
त्च त्च
पूर्वीचं ऐसी राहिलं नाही- पाककृतीवर ३० प्रतिक्रिया!!!
उठा ले रे बाबा.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
तेही...
तेही भांडणांशिवाय. लसणीचा महिमा हो हा!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
त्च त्च +1
पूर्वीचे नबा ही राहिले नाहीत
अस्स आहे तर.
हा पदार्थ खरेतर *मला* बनवायचा होता. तेही कर्वेनगरच्या भाजीबाजारात जाउन तिथल्या भाज्या आणुनच. तोही अस्सान अस्साच. पण शक्य झाले नाही. तुम्ही बरोबर केलात.
लघुकथेचं बीज
तुमची आई किंवा आज्जी, किंवा खरं तर सावत्र मावसआज्जी हा पदार्थ कसा बनवायची आणि तुम्ही त्यात मोजके बदल करून तो पदार्थ कसा आजच्या धकाधकीच्या आयुष्यासाठी साजेसा बनवलात आणि त्यातून तुमच्या सासरच्या लोकांना आपण भयंकराच्या दारात उभं असल्याची जाणीव झाली ... अशी लघुकथा यातून लिहिता येईल. तुम्ही प्रयत्न करून बघाच!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
दोन्ही पाकृ. चांगल्या आहेत.
दोन्ही पाकृ. चांगल्या आहेत.
*********
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना |
ऐसे मनमौजीको मुश्कील हैं समझाना | है ना?