आयुर्वेदाची शास्त्रीयता – भाग १

आयुर्वेदाची शास्त्रीयता

डॉ. विष्णू जोगळेकर

आयुर्वेद हे छद्मशास्त्र किंवा सूडोसायन्स आहे असे आरोप जगभरातील अनेक देशांमध्ये वारंवार झाले आहेत. ब्रिटिश पार्लमेंट – हाऊस ऑफ लॉर्डसवर – मध्यंतरी या विषयावर लॉर्ड वॉल्टन यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणीदेखील झाली. तिथे ॲलोपथीमधील संशोधनातील अनेक महारथी आयुर्वेद शास्त्रीय आहे अशी बाजू मांडायला गेले होते. ते यशस्वी होऊन ब्रिटनमध्ये आयुर्वेदाला शास्त्रीय वैद्यक म्हणून स्थान देण्यात आले.

पण त्याला एक दशक झाल्यावरदेखील आयुर्वेद सूडोसायन्स आहे असे कथन (नॅरेटिव्ह) सातत्याने वेगवेगळ्या व्यासपीठांवर मांडले जात असते.

अगदी नुकतेच गोवा येथील 'ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद'च्या लोकार्पण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील प्रमाण किंवा पुराव्याचे महत्त्व अधोरेखित केले.

एक काळ असा होता की औषध कंपन्यांवर खापर फोडले गेले असते. पण मला असे वाटते की शास्त्रीय कशाला म्हणायचे याबाबत काही चुकीचे समज खूप दृढमूल झाले आहेत.

मग यावर उत्तर काय?

या पार्श्वभूमीवर असा समज होण्याची शक्यता आहे की आयुर्वेद कुठल्याही पुराव्यांचा विचार किंवा उपयोग करतच नाही की काय? आधुनिक वैद्यक प्रत्येक औषध क्लिनिकल ट्रायलनंतरच स्वीकारते तर आयुर्वेद असा काय तीच जुनी पुराणी गुळवेल, त्रिफळा, वगैरे औषधे क्लिनिकल ट्रायल न करताच हजारो वर्षं वापरतो? काही शास्त्रीय पद्धत वगैरे असते की नाही?

यांतल्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा शक्य आहे. पण आधी आयुर्वेद सत्य कशा पद्धतीने पारखतो हे पाहणे इष्ट ठरेल.


.

कोणतीही गोष्ट तपासताना खरे ज्ञान किंवा भ्रामक ज्ञान होऊ शकते आणि या शक्यता विचारात घेऊन जाणून घेणारी (तांत्रिक शब्द – प्रमाता) काही साधनांचा (प्रमाणांचा किंवा परीक्षांचा) वापर करते. भ्रांती किंवा आभासी ज्ञान खोडून काढले की खरे ज्ञान (तांत्रिक शब्द प्रमा) उत्पन्न होते. प्रमाता प्रमाण उत्पन्न होण्यासाठी जी साधने वापरते त्यासाठी तांत्रिक शब्द प्रमाण असा आहे. म्हणजे प्रमात्याने प्रमाणाचा वापर करून भ्रांती नष्ट केली की प्रमाण उत्पन्न होते.

यात प्रमात्याकडे अजून एक गोष्ट आवश्यक आहे. ती म्हणजे जाणून घेण्याची इच्छा. किंवा जिज्ञासा.

प्रमात्याला जिज्ञासा झाली की ती जी वस्तू जाणून घ्यायची असेल, त्या वस्तूबद्दल ती ज्या दर्शनशास्त्राची अभ्यासक असेल त्यानुसार मान्य असलेल्या प्रमाणांपैकी कोणतीही प्रमाण वापरू शकते. भारतात पूर्वापार सहा वैदिक दर्शने आणि चार्वाक, जैन आणि बौद्ध ही नऊ दर्शने प्रचलित आहेत. चार्वाक दर्शन प्रत्यक्ष आणि अनुमान ही प्रमाणे मानते. बाकी प्रमाणे त्यांना अमान्य आहेत. तर 'ब्रह्म सत्यमेव जगन्मिथ्या' म्हणणाऱ्या वेदांत दर्शनाला फक्त वेदवाक्य हेच प्रमाण मान्य आहे. काही दर्शने आठ प्रमाणे मानतात.
आयुर्वेद ही सर्वदर्शनपरिषद् आहे. त्यामुळे जीवन समजून घ्यायला, तंदुरुस्तीसाठी आणि आजार बरे करण्यासाठी ज्या ठिकाणी जे प्रमाण योग्य वाटेल ते प्रमाण मान्य करतो. बरीचशी प्रमाणे म्हणजे मूळ चारपाच प्रमाणांमधले बारकावे आहेत.

आयुर्वेद सर्वांत जास्त भर प्रत्यक्ष आणि अनुमान यांच्यावर देतो. बुद्धिमान लोकांनी याच दोन परीक्षा वापराव्यात असे म्हणतो. पण चाकाचा शोध नव्याने लावायची गरज नाही, हा व्यवहारवादी भूमिका घेऊन पूर्वसूरींनी नोंदविलेली निरीक्षणेदेखील प्रमाण मानतो. यासोबत उपमानप्रमाण आणि युक्तिप्रमाण ही आयुर्वेदाची वैशिष्ट्ये असलेली प्रमाणे आहेत. या प्रमाणांचा विचार आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोतच.

आता प्रमाणांचा वापर ते सत्य समजणे किंवा प्रमा हा प्रवास कसा असतो ते पाहू.

प्रमाण वापरले की प्रथम निष्पन्न होते ते निरीक्षण किंवा ईक्षण. आपण रक्तचाचण्या केल्या की रिपोर्ट येतात तसेच हे ईक्षण. रिपोर्ट जसा डॉक्टर तपासतात आणि काय बिघडले आहे; किती बिघडले आहे; हे जोखतात तसेच ईक्षणदेखील पारखून घ्यावे लागते. या पारखण्याच्या प्रक्रियेला नाव आहे अन्वीक्षण. आन्विक्षिकी हे त्यांचे शास्त्र. विशेषत: न्यायाधीशांना आन्विक्षिकी अवगत असणे अनिवार्य होते.

अन्वीक्षण करून भ्रांती नष्ट करताना तीन शक्यता असतात.

१. एक म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार अर्धवट स्पष्टता आलेली असून शकते. याला तांत्रिक नाव संशय असे आहे. अशा परिस्थितीत आणखी ईक्षण गरजेचे ठरते. कदाचित वेगळे प्रमाणदेखील वापरावे लागू शकते.
२. ईक्षण प्रथमदर्शनी बरोबर वाटते, पण तसे गृहीत धरले तर काही परिणाम तर्कशुद्ध विचार केला तर स्वाभाविक ठरतात. याला तांत्रिक नाव तर्क असे आहे. तर्कशुद्ध परिणाम होतात की नाही हे काही काळाने दिसून येईल किंवा काटेकोरपणे प्रयोग करून ठरवता येईल.
३. ईक्षण आपल्या समजुतीच्या अगदी विरुद्ध असू शकते. याला तांत्रिक नाव आहे विपर्यय. आपली समजूत याला तांत्रिक नाव आहे अभ्युपगम. आधुनिक विज्ञान याला हायपोथेसिस म्हणते. तो प्रयोगाने मान्य किंवा अमान्य केला जातो पण चूक होण्याची शक्यता गृहीत धरून निष्कर्ष कितपत विश्वसनीय ते सांख्यिकी पद्धतीने मांडले जाते.

संशय तर्क आणि विपर्यय या तीनही शक्यता पडताळून पाहिल्यानंतर भ्रांती नष्ट होऊन सत्यज्ञान किंवा प्रमाण उत्पन्न होते. ही ज्ञानप्राप्तीची आयुर्वेदाची प्रक्रिया आहे.


.

आयुर्वेद एखाद्या गोष्टीचा खरेखोटेपणा असा पारखतो ते समजून घ्यायला हवे. त्या पद्धती तर्काच्या कसोटीवर तपासून योग्य की अयोग्य हे पाहिले पाहिजे. चरक संहिता या पद्धतींना परीक्षा म्हणजे, तर सुश्रुत संहिता त्यांना प्रमाण म्हणते. प्रमाण किंवा आजच्या भाषेत पुरावा जास्त प्रचलित आहे म्हणून या लेखमालेत प्रमाण हाच शब्द वापरला आहे. याविषयी आयसर, पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. के. पी. मोहनन यांचे मत लक्षणीय आहे. ते म्हणतात,

The norms of inquiry as they existed in Ayurveda several centuries ago and as they exist in current science are both norms of scientific inquiry: there is no pseudoscience in either.

If we criticise Caraka or Sushruta for mentioning Vishnu or Dhanvantari, we should also criticise Einstein for saying that God does not play dice with the universe, and Newton for saying that he wants to study the laws of the universe to understand the creator of the universe.

आयुर्वेदात सिद्धांत हे चार प्रमाणांवर आधारित आहेत –
१. सूक्ष्म निरीक्षण किंवा प्रत्यक्ष प्रमाण – हे सर्वांत जास्त महत्त्वाचे. वाग्भटाचार्य म्हणतात की अगदी ब्रह्मदेव जरी म्हणाला की अंबष्ठादि गण जुलाब घडवतो तर ते मी मान्य करणार नाही कारण तो गण जुलाब थांबवतो हा रोजचाच अनुभव आहे.
२. अनुमान प्रमाण – वारंवार अनेकांना आलेल्या अनुभवांवर आधारित. तर्कशुध्द निष्कर्ष – धूर आहे तिथे अग्नी आहे पण अग्नी असलेल्या प्रत्येक ठिकाणी धूर दिसेलच असे नाही. (त्याकाळच्या) हा स्वयंपाकघरातील नित्य अनुभव. पर्वतावर धूर दिसतो आहे, यावरून पर्वतावर आग लागली आहे हा निष्कर्ष. यासाठी पञ्चावयवी वाक्य ही पद्धत वापरली जाते.प्रतिज्ञा, हेतू, दृष्टांत, उपनय आणि निगमन या प्रत्येक टप्प्यावर तपासणी करण्याच्या पद्धती न्यायदर्शनातून आयुर्वेदाने स्वीकारल्या आहेत. सध्या हायपोथिसिस टेस्टिंगसाठी स्टॅटिस्टिक्सचा वापर होतो तेव्हा याच पायऱ्या (वेगळ्या क्रमाने) वापरल्या जातात.
३. उपमान प्रमाण – सहज कळतील अशा उपमा देऊन सिद्धांत मांडले जातात. उदाहरणार्थ, शब्द किंवा आवाज पसरतो कसा याला कदंबमुकुल ही उपमा दिली आहे. कदंब फुले उमलताना एकाच वेळी सर्व दिशांना फुलतात. वीचितरंग ही उपमा शरीरातील काही गोष्टी वर्णन करायला दिली आहे पाण्यावरील लाटांप्रमाणे हालचाल हा त्याचा अर्थ होतो. आजकाल कंप्युटर मॉडेलिंग हे तंत्रज्ञान वापरले जाते. आयुर्वेदात असलेल्या उपमान प्रमाणात हे समाविष्ट होईल.
४. युक्तिप्रमाण – आजच्या भाषेत याला Experimental evidence म्हणता येईल. बहुकारणयोगज किंवा multifactorial. अनेक घटक एकत्र येऊन नवीनच पदार्थ तयार होतो. त्यात अमुकच एक घटक महत्त्वाचा असे म्हणता येत नाही. शिवाय the whole is greater than the sum of parts. यात प्रत्येक घटकाचा सहभाग आणि ते कशा पद्धतीने एकत्र येऊन काम करतात याचा बुद्धिपूर्वक केलेला विश्लेषणात्मक विचार आणि घटकांमध्ये बदल केला तर परिणामांमध्ये (भूत, भविष्य आणि वर्तमानकाळ यांपैकी कशातही) काय बदल होतो हे तपासणे याला युक्तिप्रमाण असे नाव आहे.

आजार घडताना दूष्य, देश, बल, काल वगैरे दहा गोष्टी एकत्र येऊन आजार होतात हा आयुर्वेदात रूढ असलेला सिद्धांत आहे. किंबहुना प्रत्येक रुग्णाची औषधयोजना ठरवताना या दहा अक्षांवर गणित मांडून ठरवावी असे आयुर्वेद सांगतो.

काळाची मोजमापे

आयुर्वेदात मानपरिभाषा कालासाठी निमेश ते युगचक्र अशी सविस्तर आहे. काळाचा विचार आयुर्वेद दोन प्रकारे करतो –
१. सूर्य केंद्रित संवत्सर आणि ऋतू
२. औषधांसाठी आणि रोगांसाठी –

  • औषध गोळा करण्याची वेळ
  • औषधांवर संस्कार करण्याची वेळ
  • रोगांच्या अवस्थांप्रमाणे औषधे घेण्याची वेळ

अंतराची मोजमापे

दुसरी अंतराची मोजमापे ही वेदकालापासून यज्ञाकरिता आणि शिल्पशास्त्रात आहेत ती आयुर्वेद स्वीकारतो. शरीराच्या मोजमापासाठी त्याच व्यक्तीच्या बोटांची रुंदी ही एकक धरून असतात. त्यामुळे सहा फुटी माणसाला आणि पाच फुटी माणसाला असणारे अवयव त्या प्रमाणात मोजले जातात.

वजनाची मोजमापे

वजनाची मोजमापे प्रत्येक प्रांतात वेगळी होती. मगधात मागध मान तर कलिंगात कालिंगमान. आकारमानाच्या मोजमापासाठी विशिष्ट आकारमानाच्या पितळी किंवा ब्राँझच्या मापांचा वापर सार्वत्रिक होता. शेर, मण, छटाक वगैरे मापे हल्ली म्युझियममध्ये पाहायला मिळतात पण अगदी वीस-पंचवीस वर्षांपूर्वी ती नित्य वापरातील होती. यात पौतवमान हे घनपदार्थांसाठी आणि द्रुवयमान हे द्रव पदार्थ मोजायला.

ही मोजमापे आजच्या जागतिक प्रमाण मोजमापांमध्ये रूपांतरित करणे सहज शक्य आहे.

बाकीच्या प्रमाणांबाबत पुढील लेखात पाहू.

(क्रमशः)
लेखकाचा अल्पपरिचय :
डॉ. विष्णू जोगळेकर आयुर्वेदाचे प्राध्यापक आहेत (आता निवृत्त). पुणे येथील टिळक आयुर्वेद विद्यालयाशी ते संलग्न होते. J-AIMच्या (Journal of Ayurveda and Integrative Medicine) संपादकीय समितीवर ते होते.

field_vote: 
0
No votes yet

भिडे सरांच्या प्रतिसाद प्रतिवादाच्या प्रतीक्षेत.

या दोघांची संवादी जुगलबंदी लावता आली तर खूप भारी होईल. म्हणजे भिडे - जोगळेकर यांनी परस्परांना प्रश्न विचारून लेखमाला लिहावी. जे काय आहे त्याचा सोक्षमोक्ष लावून टाकू!

-------

पुढील लेखांत सांगोपांग चर्चा होईल असे गृहीत धरतो तरीही या विषयावर जोगळेकरांनी मुद्दाम लिहावं म्हणून इथे मांडतो.

नुसत्या संहिता पाहिल्या तर आयुर्वेदशास्त्राचे हे दोन ऐतिहासिक कालखंड दिसतात

१. बृहतसंहितांचा काळ - चरक, सुश्रुत, मे बी काश्यप -> तक्षशीलेच्या आसपास किंवा तक्षशीलाच केंद्र? -> यांचे नवनीत : वाग्भट : पाऱ्याचा क्वचित उल्लेख
२. ग्रीक/यवन, पर्शियन वगैरे लोकांच्या देवाणघेवाणीतून आणि स्वयंप्रतिभेतून नागार्जुन सारख्या लोकांनी सुरु केलेले अल्केमीचे प्रयोग -> रसशास्त्र: तक्षशीलेच्या आसपास किंवा तक्षशीलाच केंद्र? : पारा आणि बाकीचे धातु यांच्यावर प्रमुख काम. नागार्जुनाने फार्मकॉलॉजीची भारतीय सुरुवात केली असे म्हणावे फारफारतर.

नंतरच्या लोकांनी या दोन गोष्टी वापरून शास्त्रात जमेल तशी भर घातली असली तर मेजर ब्रेकथ्रु हेच होत.

आता आयुर्वेदाच्या सगळ्या प्राचीन ते मध्ययुगीन ग्रंथांचा काळ आणि भारताचा तत्कालीन इतिहास यांची सांगड घातली तर - आर्यवेदाच्या प्राथमिक तत्त्वांची रचना ही तत्कालिन विद्यापीठी केंद्रांमध्ये झाली आहे जिथे ज्ञानाची संस्थात्मक देवाणघेवाण होत होती आणि त्या त्या काळात ती सर्वोच्च पातळीवरची म्हणावी लागेल.

म्हणजे ते एका अर्थाने तेव्हा तेव्हाचे आधुनिक वैद्यकच होते.

नंतर झालेल्या वैज्ञानिक क्रांतीनंतर मात्र आयुर्वेदाने शांतपणे आधुनिक वैद्यकात मिसळून जायला पाहिजे. कारण जीवशास्त्र/जनुकशास्त्र, इतर तांत्रिक सुधारणा यांच्यातील आमूलाग्र बदलांनंतर आयुर्वेदाच्या मुलभूत तत्त्वांना डिबार करणे क्रमप्राप्त आहे. उदाहरणार्थ, डार्विनियन उत्क्रांतीनंतर त्यापूर्वीचे जीवशास्त्र हे आमूलाग्र बदलले. आणि ज्या काही तत्कालिन आधुनिक धारणा होत्या त्याही रद्दबातल ठरल्या, बदलल्या. तसे आयुर्वेदाचे मात्र झाले नाही. मला सांगा डार्विनियन उत्क्रांती आयुर्वेदात कशी अप्लाय करणार? आणि ती केली तर आयुर्वेद आयुर्वेदच राहणार नाही. म्हणजे पर्यायाने त्याला आधुनिक वैद्यकात सामील व्हावे लागेल.

शास्त्रीय या शब्दाच्या वापराबद्दल फार काळजी घेतली पाहिजे. भास्कर चंदावरकर त्यांच्या एका निबंधात म्हणतात - शास्त्रीय या शब्दाचा अर्थ आधुनिक अर्थाने वैज्ञानिक घेऊ नये. त्याला thereotical

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

वरील सर्व मुद्दे नोंदविले आहेत. पुढील लिखाणात ओघाओघाने हे मुद्दे येतीलच. थोडी प्रतीक्षा करावी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0