चार्ली चॅप्लिन दिग्दर्शित 'मॉडर्न टाइम्स'

Britain/Silent/B&W/35 mm/70 min/Dir: Charlie Chaplin

xxx

चित्रपट व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळातील मायावी चित्रपटसृष्टीत वयाच्या 24व्या वर्षी प्रवेश केलेल्या चार्ली चॅप्लिन यानी स्वतःच्या देहबोलीच्या विशिष्ट शैलीतून मूक चित्रपटांची हास्य-विनोदाला केद्रस्थानी ठेवणाऱ्या एका नवीन संप्रदायाची प्रथा सुरु केली. 1913 पासून 1970 पर्यंतचा चित्रपटसृष्टीतील त्याचा वावर अविस्मरणीय होता. 1914 साली त्याचा पहिला चित्रपट पडद्यावर आला – ‘Making a Living’ नावाचा, तर 1967 साली त्याचा शेवटचा चित्रपट आला – ‘A Countess from Hong Kong’. त्याने एकूण 82 चित्रपट बनवले. त्यातले 77 मूकपट होते, तर 5 बोलपट होते.

हा मूकपटांमध्ये अभिनय करणारा इंग्लिश फिल्ममेकर अभिनेता, दिग्दर्शक व संगीतकारही होता. विनोदी ढंगाच्या मूकाभिनयासाठी त्याची विशेष ख्याती होती. अभिनयासोबत तो मूकपटांचे लेखन, दिग्दर्शन सांभाळत असे, तसेच संगीतही रचत असे. पहिल्या महायुद्धाच्या अगोदरच्या काळात तो जगभरातल्या सर्वांत प्रसिद्ध सिनेताऱ्यांपैकी एक होता.

चित्रपटांचा तो सुरुवातीचा काळ होता. त्या काळी युरोप वा अमेरिकेमध्ये लोकांचे करमणुकीचे साधन म्हणजे गल्ली-बोळातील थेटरमधील नाच-गाणी, हास्य-विनोद, कुचाळक्या-चेष्टा अशा धमाल करणाऱ्या गोष्टीं. म्युझिक हॉलमध्ये अनेक अप्रसिद्ध, गरीब कलावंत आपली कला, गाणी, नाटक, एकपात्री प्रयोग सादर करत आणि उपजीविका चालवत. त्यामुळे मूक चित्रपटातसुद्धा लोकांचे क्षणिक मनोरंजन करणाऱ्या हास्य प्रसंगाची लयलूट होती. पाठलाग करणाऱ्या, पळता पळता घसरून भुईसपाट होणाऱ्या, तोंडावर चिखल, आयस्क्रीम वा केक फेकून मजा बघणाऱ्या, पृष्ठभागावर लाथ मारणाऱ्या, चित्र-विचित्र हावभाव करणाऱ्या प्रसंगांची रेलचेल होती.

चॅर्ली चॅप्लिनसुद्धा अशाच प्रकारचे भूमिका करत असताना त्याला त्याच्या आयुष्यातलं सर्वांत प्रभावी पात्र सापडलं, तेच ते वेंधळ्या चार्लीचं... ज्यात तो पडतो, धडपडतो, त्याच्यावर काही ना काही आदळतं किंवा तो कोणावर तरी आदळतो. हसवणारं पण आतून सहृदय, परोपकारी. विचित्र वाटणारे कपडे घातलेलं. छोटी बोलर टोपी आणि मोठाले बूट, काठी आणि फेंगडी चाल. ढगळ विजार आणि तंग कोट, फाटका विटलेला शर्ट आणि बेंगरूळ वाटणारा टाय आणि मुख्य म्हणजे आखूड मिशा. हे विचित्र रसायन लोकांना फारच भावलं. हिटलर आणि चार्ली चॅप्लिन यांच्यात एक समानता आहे. दोघांच्या पण मिशा सारखे होते. पण हिटलरला पूर्ण जग घाबरत असे. आणि चार्ली चॅप्लिन, लोकांमध्ये असलेली भीती संपवून त्यांना भरभरून हसवत होता.

चार्ली चॅप्लिनचे सुरुवातीचे चित्रपट अशा गल्लाभरू मसाल्याने भरलेली असली तरी याच देहबोलीचा वापर करून त्यानी प्रेक्षकांना विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती केली. हास्याच्या मागे दडलेल्या करुणेचे, मानवीयतेचे दर्शन त्यानी घडविले. हसवता हसवता समाजातील दोषांवर बोट ठेवत प्रेक्षकांना अंतर्मुख करण्यास तो प्रेरित करत होता. 1925 साली प्रदर्शित झालेल्या Gold Rush हा चित्रपट पाहून हा उत्कृष्ट कलाकृतीचा निर्माता आहे अशी प्रशंसा विमर्शक करू लागले. त्याच्यातील सामाजिक प्रज्ञांचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष जाणीव त्याच्या चित्रपटात दिसू लागल्या. करोडोपती, बेवारशी, आंधळी मुलगी, श्रीमंताघरच्या महिला, रस्त्यावरील भुके कंगाल भटके, हडकुळी कुत्री यांच्यावरील प्रसंगासोबतच कामगार, कारखान्यांचे मालक, सैनिक, सैन्याधिकारी व राजकारणी यांच्याभोवतीचे प्रसंग त्याच्या चित्रपटात ठळकपणे दिसू लागले. हा बदल कदाचित त्याच्या वैयक्तिक जाणिवेतूनही आली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रसंगातील व्यंग्य व कणव यांचे मिश्रण बघत असताना तो समस्यांचे सुलभीकरण करत आहे की काय असाही संशय येऊ शकतो. ‘मॉडर्न टाइम्स’ हा चित्रपट त्याच्या बदलत असलेल्या जाणिवांचे एक जिवंत उदाहरण ठरू शकेल.

‘मॉडर्न टाइम्स’ हे चित्रपट शीर्षकच सुचविल्याप्रमाणे ही एक ‘आधुनिक’ काळाची कथा. विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या दशकात (त्या काळच्या) आधुनिक तंत्रज्ञानाचा नुकताच प्रवेश झाला होता. तथाकथित स्वयंचलित मशीन्स, मशीन्सवर नजर ठेवणारे कॅमेरे, कामाची काटेकोर विभागणी, वेळेला दिलेले महत्व, कामगारावर नजर ठेवणारे मॅनेजरच्या ऑफीसमधील स्क्रीन, ऑफिसमधूनच माइकवरून ऑर्डर सोडणारा मॅनेजर इत्यादींनीयुक्त अशा आधुनिक कारखान्यात चार्ली एक यःकश्चित कामगार. सरकत्या बेल्टवर वेगाने येणाऱ्या प्लेटवरील बोल्ट हातातील स्पॅनरने निर्दिष्ट वेळेत टाइट करण्याचे त्याचे काम. टाइट करण्य़ास थोडासा उशीर झाला तरी प्लेट तसेच पुढे सरकण्याची भीती. त्या अजश्र यंत्रात अडकण्याची भीती. त्यामुळे चार्लीला या कामाची इतकी सवय झालेली असते की बोल्ट समोर नसले तरी रिकाम्या हातांनी फिरवल्याचा हातवारे तो करत असे. त्याची एखादी चूकसुद्धा भयंकर गोधळाला कारणीभूत ठरत असे.

त्या कारखान्यातील कामगारांचा लंचटाइमचा वेळ कमी करून उत्पादन वाढविण्यासाठीच्या एका यंत्राची प्रात्यक्षिक करायचे होते. त्या प्रात्यक्षिकासाठी चार्लीची निवड होते. हात न लावता तोंडासमोर येणाऱी बशी, तोंडात घास भरविणारे कृत्रिम हात, दर घासाला तोंड पुसणारे यांत्रिक टॉवेल अशा या यंत्रासमोर चार्ली बसल्यानंतर काय काय होते व काय काय होऊ शकते याची कल्पनाच आपण करू शकत नाही. तडफडणाऱ्या चार्लीला बघून मॅनेजरला या यंत्राची आशा सोडावी लागते.

सवयीने बोल्ट फिरवल्याची हातवारे करत असताना एक महिला कर्मचारी त्याच्या समोर येते. तिच्या स्तनाला हा बोल्ट समजून फिरवण्याचा प्रयत्न करतो. ती बिचारी घाबरून पळू लागते. या गोंधळामुळे चार्लीची रवाना वेड्यांच्या हॉस्पिटलला केली जाते.
हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर कशीबशी एक नोकरी त्याला मिळते. परंतु कामगारांच्या संपामुळे ती नोकरीही जाते. रस्त्यावरून जाताना ट्रकच्या पाठिमागे लावलेला झेंडा खाली पडलेला त्याला दिसतो. झेंडा परत देण्यासाठी तो गाडीचा पाठलाग करत असतो. तितक्यात संपावर असलेले कामगार त्याच्या पाठीमागून येतात. पोलीस त्याला कामगारांचा पुढारी समजून तुरुंगात पाठवतात.

चार्लीच्या कथेला समांतर अशी अजून एका निराश्रित मुलीची कथा येथे येते. फार भूक लागली म्हणून ती ब्रेड चोरते व पळून जाते. दुकानदाराच्या लक्षात आल्यावर पोलीस तिला पकडण्यासाठी तिच्या मागे पळतात. जेलमधून सुटलेला चार्ली तिच्यावर गुदरलेला प्रसंग ओळखून स्वतःवर चोरीचा आळ घेतो. परंतु जमलेले लोक तिलाच पकडण्यासाठी हट्ट धरतात. त्याला फार वाईट वाटते. चार्ली कुठल्यातरी एका हॉटेलमध्ये भरपूर खाऊन पैसे नाहीत म्हणून सांगितल्यावर पहारेकरी त्याला पोलीसांच्या हवाली करतात. पोलीस त्याला गाडीत कोंबतात. तितक्यात ती अनाथ मुलगीसुद्धा गाडीत येते. वाटेत ती मागे उभे असलेल्या पोलीसाला ढकलून चार्लीसकट खाली पडते. सर्व जण बेशुद्ध होतात. काही वेळाने चार्ली शुद्धीवर येतो. त्या मुलीला उठवून पळून जायला सांगतो. ती पळते. परंतु चार्लीला सोबत घेऊन एका मोडक्या-तोडक्या झोपडीत राहू लागते.

चार्लीला एका मोठ्या मॉलमध्ये रात्रपाळीची नोकरी लागते. त्या मॉलवर चोरी करण्यासाठी काही जण येतात. ते फक्त खाण्या-पिण्याचे पदार्थ चोरतात. ते सर्व संपावर असलेले कामगार असतात व उपासमारीमुळे चोरी करतात. चार्लीला ते ओळखतात व सर्व जण मिळून सर्व पदार्थ खाऊन संपवतात. दुसऱ्या दिवशी मालकाला कळल्यानंतर चार्लीला पुन्हा तुरुंगात जावे लागते. त्या मुलीला एका हॉटेलमध्ये नर्तकीचे काम मिळते. तुरुंगातून सुटलेला चार्ली तिच्या वशिल्याने तेथे गायक होतो. काही गंमतीदार प्रसंगामुळे तेथे त्या मुलीला पकडण्यासाठी आलेल्या पोलीसांच्या तावडीतून सुटून पुन्हा दोघेही रस्त्यावर येतात.....

हा मूक चित्रपट असूनसुद्धा दृश्याच्या अधून मधून आलेल्या लिखित बोर्डवरून कथा सहजपणे कळते. 1936 साली अमेरिका आर्थिक महामंदीच्या विळख्यातून बाहेर पडत असताना चार्लीचा हा चित्रपट आला. भांडवलशाही, प्रचंड आणि बिनडोक उत्पादन, गळेकापू स्पर्धा, त्यामुळे माणसाच्या व्यक्तिगत गुणांचा होणारा ऱ्हास, बेकारी, बकाली, गुन्हेगारी अशा अनेक पैलूंवर तो मोलाचं भाष्य करतो, अर्थात मूकपट बनवूनच. खरं तर या वेळेपर्यंत बोलपट आलेले होते आणि चांगलेच रुळलेही होते, पण चार्लीला चित्रपटातले संवाद आवडले नाहीत. त्याने चित्रपटात संवाद घ्यायचं नाकारलं. मात्र या चित्रपटात पार्श्वसंगीत भरपूर वापरलं.

तो स्वत:देखील पटकथा लिहीत नसे. कॅमेरातून दृश्य बघूनच चित्रीकरण त्याला हवं तसं झालं आहे की नाही, हे कळत असे आणि पुढे कथा कशी घेऊन जायची हेही समजत असे. त्यामुळे तो नेहमी प्रेक्षकांना कसं दिसतंय आणि आपण काय दाखवू इच्छितो, हे पाहत असे आणि पुढे काय करायचं हे ठरवत असे. त्यामुळे कधी कधी एका साध्या साध्या दृश्याचे 50-60 रिटेक होत असत. दिवसभराच्या शूटिंगनंतर तो स्वत:ला एका खोलीत कोंडून घेत असे आणि आपण दिवसभर शूट केलेल्या फिल्म्सवर काम करत असे. त्या खोलीत फक्त प्रोजेक्टर, दिवा, टेबल आणि खुर्ची एवढंच असायचं. तिथंच तो पुढे काय करायचं हे ठरवत असे. दिवसभराच्या कामाचा शिणवटा, भूक, झोप कशाचीही तमा तो बाळगत नसे. दिवसभर मेहनत केल्यावर संध्याकाळ आरामात, मजा करत खात-पीत घालवणं त्याला आवडत नसे. तो तितका सोशलही नव्हता.

त्याचे ‘The Kid’ (1921), ‘City Lights’ (1931), ‘Modern Times’ (1936), ‘The Great Dictator’ (1940), ‘Limelight’ (1952) हे चित्रपट ‘मास्टरपीस’ मानले जातात. आजदेखील चार्लीचे चित्रपट कुठल्या ना कुठल्या वाहिनीवर दाखवले जात असतातच. त्याची लोकमानसावरची मोहिनी यत्किंचितही कमी झालेली नाही.

इंग्लंडमधील सुरुवातीच्या वास्तव्यानंतर त्याला अमेरिकेतील हॉलिवुडचे आकर्षण वाटू लागले. तो हॉलिवुडमध्ये स्वतःच्या मालकीच्या स्टुडिओमध्ये चित्रपटांची निर्मिती करून बक्कळ पैसा कमवू लागला. नंतरच्या काळात तो अमेरिकन नागरिक झाला. दुसऱ्या जागतिक युद्धानंतर याच्या डावीकडे झुकलेल्या विचारामुळे तो कम्युनिस्ट असावा म्हणून त्याच्यावर पाळत ठेवली गेली. त्याच्या चित्रपटावर अमेरिकेत दाखविण्यास बंदी घालण्यात आली. या सगळ्या गोष्टींना वैतागून नंतर तो मरेपर्यंत स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झाला. नंतरच्या काळात त्याला ऑस्करसकट भरपूर पारितोषकं मिळाली. अमेरिकन जनतेसकट संपूर्ण विश्वच त्याच्या प्रेमात पडले. खऱ्या अर्थाने तो एक विश्वमानव होता.

वयाच्या 88 व्या वर्षी, 25 डिसेंबर 1977 रोजी चार्ली चॅप्लिनचे निधन झाले.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet