आयुर्वेदाची शास्त्रीयता – भाग ५

आयुर्वेदाची शास्त्रीयता – भाग ५

डॉ. विष्णू जोगळेकर

माझ्या लेखांवरील प्रतिक्रिया आणि सुधीर भिडे यांचे लेख पाहता आयुर्वेदाचा इतिहास आणि उत्क्रांती सविस्तरपणे मांडणे आवश्यक आहे.

पतंजली यांच्याबद्दल खुलासा श्री भिडे म्हणतात –

यानंतरचे या क्षेत्रातील नाव पतंजली. या नावाच्या एकापेक्षा जास्त व्यक्ती असाव्यात असा अंदाज आहे. पतंजलि योगसूत्रे लिहिणारे आणि व्याकरण महाभाष्य लिहिणारे आणि चरक संहिता लिहिणारे अशा तीन व्यक्ती असाव्यात. त्यांचा काल इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून पाचव्या शतकापर्यंत असावा. एका प्रचलित श्लोकानुसार पतंजली आणि चरक एकच. पतंजलींची वेगळी संहिता नाही.

संस्कृत वाङ्ग्मयात एक सुभाषित आहे

पातञ्जल महाभाष्य चरकप्रतिसंस्कृतै:
मनोवाक्कायदोषाणाम् हर्त्रेऽहिपतये नमः॥

१. पातञ्जल योगसूत्रे हा योग विषयक ग्रंथ,
२. पातञ्जल महाभाष्य हा व्याकरणाचा ग्रंथ, आणि
३. चरक संहिता (अग्निवेश तंत्राचे प्रतिसंस्करण),
असे तीन ग्रंथ शेषनागाचे अवतार असलेल्या पतञ्जली मुनींनी लिहिले अशी दंतकथा आहे. या तीन ग्रंथांच्या काळाची व्याप्ती सुमारे आठशे वर्षे येते. (इ. स. पू. ४०० ते इ. स. ४००) या कालगणनेबाबत मतमतांतरे आहेत. त्यामुळे पतञ्जली हे कुलनाम समजले तर एकाच कुटुंबातील वेगवेगळ्या पिढ्यांमधील पतञ्जली यांनी हे ग्रंथ लिहिले असावेत ही बाब सयुक्तिक वाटते.

धन्वंतरी हे देव समुद्र मंथनात वर आले असा भागवत पुराणात उल्लेख येतो. या देवतेला आयुर्वेदाचे पिता असे समजले जाते. परंतु धन्वंतरी यांनी रचलेल्या कोणत्या ग्रंथाचा उल्लेख येत नाही. त्यामुळे त्यांनी कोणते ज्ञान कोणास दिले हे समजत नाही.

धन्वंतरी हे काशी राज्याचे राजे दिवोदास यांचे कुलनाम आहे. त्यांनी सुश्रुत औपधेनव गोपुररक्षित वैतरण औरभ्र आणि करवीर्य अशा सहा शिष्यांना शल्यतंत्र शिकवले.
संदर्भ – सुश्रुत सूत्रस्थान १/३

यांपैकी सुश्रुत यांनी लिहिलेल्या तंत्राची उत्कृष्टता मोठी असल्याने सुश्रुत संहिता ही तीन मुख्य संहितांमध्ये समाविष्ट झाली.

तरीही या विषयावर जोगळेकरांनी मुद्दाम लिहावं म्हणून इथे मांडतो.

नुसत्या संहिता पाहिल्या तर आयुर्वेदशास्त्राचे हे दोन ऐतिहासिक कालखंड दिसतात.

१. बृहतसंहितांचा काळ - चरक, सुश्रुत, कदाचित काश्यप -> तक्षशीलेच्या आसपास किंवा तक्षशीलाच केंद्र? -> यांचे नवनीत : वाग्भट : पाऱ्याचा क्वचित उल्लेख
२. ग्रीक /यवन, पर्शियन वगैरे लोकांच्या देवाणघेवाणीतून आणि स्वयंप्रतिभेतून नागार्जुनसारख्या लोकांनी सुरू केलेले अल्केमीचे प्रयोग -> रसशास्त्र : तक्षशीलेच्या आसपास किंवा तक्षशीलाच केंद्र? : पारा आणि बाकीचे धातू यांच्यावर प्रमुख काम. नागार्जुनाने फार्मकॉलॉजीची भारतीय सुरुवात केली असे म्हणावे फार फार तर.

नंतरच्या लोकांनी या दोन गोष्टी वापरून शास्त्रात जमेल तशी भर घातली असली तरीही मुख्य शोध हेच होत.

– नील लोमस यांनी दिलेली प्रतिक्रिया

बरेच कालखंड आहेत
१. आद्य संहिता काल / आर्ष काल

चरक सुश्रुत आणि काश्यप यांत अक्षर न अक्षर तंतोतंत सारखे असलेले काही श्लोक आहेत. यावरून उपलब्ध संहितांच्यापूर्वीचा एक कालखंड आहे. या कालखंडात आयुर्वेदाचे मूळ सिद्धांत तयार किंवा विकसित होत गेले आणि काश्यप, सुश्रुत, अग्निवेश यांच्या मूळ संहिता तयार झाल्या. काही ऋषी काश्यप आणि सुश्रुत दोन्ही संहितांमध्ये वादासाठी उपस्थित असल्याचे दिसते. तर काही ऋषी काश्यप आणि अग्निवेश तंत्रात समान आहेत.

यावरून मूळ तीन संहितांची पहिली आवृत्ती साधारण एकाच काळात तयार झाली असे म्हणता येईल.

अनेक श्लोकांत आर्ष किंवा पाणिनीपूर्व संस्कृत आढळते त्यावरून हा काळ खूप प्राचीन आहे हे नक्की. पाणिनी व्याकरणाचा काळ इ. स. पू. ६०० ते ४०० वर्षे समजला जातो. मूळचा आयुर्वेद किंवा आयुर्वेदाची पाळेमुळे त्याही पूर्वीची आहेत.

२. प्रतिसंस्करण काल

चरक महर्षी हे थोर संपादक होते. तक्षशिला येथे त्यांनी अग्निवेश तंत्राचे प्रतिसंस्करण केले. चरक संहितेत प्रत्येक अध्यायात शेवटी अग्निवेशकृते तंत्रे चरकप्रतिसंस्कृते असे शब्द येतात. संपादक किंवा प्रतिसंस्कर्ता मूळ लेखकापेक्षाही जास्त नावाजला जाऊनही संहिता अग्निवेश तंत्र या ऐवजी चरक संहिता म्हणून ओळखली जाते.

आधुनिक वैद्यकात हॅमिल्टन बेली या महान शल्यतंत्रज्ञाने अशीच किमया करून दाखवली. Pie's surgical handicraft नावाचे आधीचे पुस्तक त्यांनी संपादित केल्यानंतर Bailey's surgical handicraft नावाने ओळखले जाऊ लागले.

चरक संहिता ही पाणिनीच्या आसपासच्या काळात लिहिली गेली असावी. जवळपास आठशे वर्षांनंतर दृढबल यांनी चरकसंहितेतील जो भाग लुप्त होऊ घातला होता तो नव्याने लिहून अपुरी संहिता पूर्ण केली. साधारण त्याच सुमारास नागार्जुन ऋषींनी सुश्रुत संहितेचे संपादन करून सध्या उपलब्ध असलेली संहिता तयार केली.

३. टीकाकारांचा पहिला कालखंड

गयदास, जेज्जट, चक्रपाणी डल्हण सुदान्तसेन वगैरे लोकांनी मूळ संहिता स्पष्ट करण्यासाठी, वनस्पती निश्चित करण्यासाठी अवघड भाग सोपा करून सांगण्यासाठी टीका लिहिल्या. त्यातल्या काही आजही वापरात आहेत पण बऱ्याच टीकांबद्दल नंतरच्या टीकांमधून येणाऱ्या उल्लेखावरून माहिती मिळते.

४. संग्रह काल

वाग्भट या नावाचे आजोबा आणि नातू यांनी वेगवेगळ्या संहितांचा समुद्र व्यवस्थितपणे घुसळून एकाच ग्रंथात आयुर्वेदाच्या आठही अंगांचे संकलन केले. थोरल्या वाग्भटांनी अष्टांग संग्रह लिहिला. हा गद्य आणि पद्य असा संमिश्र किंवा चम्पू ग्रंथ आहे. अतिशय विस्तृत पण नेमके असे याचे स्वरूप आहे. त्यांचा नातू नावाप्रमाणेच वाग्भट किंवा भाषाप्रभू होता. अष्टांग संग्रह या विस्तृत ग्रंथातील जवळपास ९०% आशय कायम ठेवून या संग्रहाचा गाभा असलेला आणि पूर्णपणे पद्य आणि अर्थातच पठणासाठी सोयीस्कर असा अष्टांग हृदय हा ग्रंथ लिहिला.

५. लघुत्रयी कालखंड

संग्रहकालात आणखी काही प्रथा सुरू झाल्या. विषयवार ग्रंथ तयार होऊ लागले. रोगनिदानावरील माधवनिदान, औषधिनिर्माण या विषयांवर शार्ङ्गधर आणि वनस्पतींचे गुणधर्म सांगणारा भावप्रकाश या तीन ग्रंथांना लघुत्रयी म्हणतात.

माधवकर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव माधवनिदान. हा पूर्णपणे निदानाचा ग्रंथ आहे. यात चिकित्सा दिलेली नाही. या ग्रंथावर विजयरक्षित यांनी लिहिलेली मधुकोश नावाची टीका ही एक वस्तुपाठच आहे. मल्लिनाथ जसा साहित्यातला अग्रगण्य टीकाकार समजला जातो तसा आयुर्वेदात विजयरक्षित. (मधुकोश या टीकेच्या नावाने जास्त प्रसिद्ध).

माधवनिदानात चरक, सुश्रुत यांत न आलेल्या आम्लपित्त, आमवात, फिरंग यांसारख्या रोगांचे निदान आले आहे. भावमिश्र यांनी लिहिलेला भावप्रकाश हा एक वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ आहे. यात परंपरागत आयुर्वेद तर आहेच पण वनस्पती वर्णन करणारा निघण्टु यामध्ये आहे. पोर्तुगीजांनी मिरची भारतात आणण्यापूर्वी हा ग्रंथ आहे.

शार्ङ्गधर यांनी लिहिलेली संहिता मुख्यत्वेकरून औषधे बनविण्यासाठी मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध आहे. यात रसशास्त्रीय औषधेदेखील समाविष्ट आहेत. या संहितेत दिलेली श्वासोच्छ्वास प्रक्रिया जवळपास आधुनिक वैद्यकशास्त्रात दिलेल्या प्रक्रियेशी साधर्म्य असणारी आहे

वृंदमाधव हा रसशास्त्र समाविष्ट असलेला आणखी एक जुना ग्रंथ.

क्षेमकुतूहल हा आहार शास्त्राबद्दलचा ग्रंथ देखील पोर्तुगीजांनी मिरची भारतात आणण्यापूर्वीचा. यात शाकाहारी आणि मांसाहारी अशा अनेक पाककृती आहेत आणि मसाले-मिरची विरहित आहेत. माझे गुरू वैद्य य.गो. जोशी यांनी या पुस्तकाचे मराठी भाषांतर उदरभरण नोहे या नावाने केले आहे. (इंद्रायणी प्रकाशन.)

६. टीकाकारांचा दुसरा कालखंड
यात प्रामुख्याने चरक, सुश्रुत आणि वाग्भट यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या अनेक टीका लिहिल्या गेल्या. अरुणदत्त हेमाद्री हे त्यातले प्रमुख टीकाकार. टीका लिहिणे आजही चालू असलेले काम आहे. माझे गुरू वैद्य य. गो. जोशी यांनी चरकसंहितेवर मराठीत यशवंत टीका लिहिली. त्यांची अष्टांग हृदयावरील यशवंत टीका लवकरच प्रसिद्ध होईल.

योगरत्नाकर हा अण्णा कुंटे यांनी संकलित केलेला ग्रंथ आयुर्वेदात रसशास्त्र ही चिकित्सा पद्धती सामावली गेल्यानंतरचा महत्त्वाचा ग्रंथ.

रसशास्त्र आणि आयुर्वेद

बऱ्याच लोकांचा असा समज झालेला दिसतो की रसशास्त्र अलेक्झांडरच्या स्वारीनंतर विकसित झाले. पण वस्तुस्थिती तशी नाही. रसशास्त्र अगदी अथर्ववेदातदेखील बीजरूपाने आहे. विविध प्रांतात रसशास्त्राच्या वेगवेगळ्या परंपरा विकसित झाल्या. दक्षिणेत सिद्धवैद्यक ही पारा, धातू, खनिजे, विषारी वनस्पती यांचा वापर करणारी पद्धत विकसित आणि दृढमूल झाली. मुख्यतः तामिळ भाषेत यांचे ग्रंथ आहेत. केरळमध्येदेखील विषतंत्रातील औषधे पारा आणि खनिजे यांचा वापर करतात. पुलुयारपटलम् आणि कालवञ्चना हे ग्रंथ यात मुख्य होते. ते आता उपलब्ध नाहीत पण त्यातील औषधे प्रयोगसमुच्चय आणि क्रिया कौमुदी या ग्रंथांत आहेत आणि आजही वापरात आहेत.

आंध्रप्रदेश, कर्नाटक या भागांत बसवराजीयम् या ग्रंथाचा सढळपणे वापर होतो. लोहसर्वस्वम् हा देखील ग्रंथ प्रसिद्ध आहे. बंगाल, आसाम वगैरे भागांत शाक्तपंथी लोकांनी अनेक वेगवेगळ्या खनिजांचा आणि भांग, बचनाग, अफू, गांजा यांचा वापर करून प्रभावी औषधे वापरात आणली. राजस्थानात राजे लोकांना युद्धात होणाऱ्या जखमा निस्तरण्यासाठी आणि जनानखान्यात विलास करता यावेत म्हणून रसशास्त्र विकसित झाले. महाराष्ट्रातील रसशास्त्र मुख्यतः नाथपंथीय योग्यांनी विकसित केले.

रसशास्त्र आयुर्वेदापेक्षा वेगळे आहे असे प्रतिपादन काही वैद्यही कंठरवाने करत असतात पण अष्टांग संग्रह उत्तरतंत्र यात विषोपयोगी अध्याय आहे. त्यात रसशास्त्र आयुर्वेदात एकजीव होण्याची बीजे दिसतात.

लघुत्रयीतील दोन ग्रंथ शार्ङ्गधर आणि भावप्रकाश रसौषधी बनवणे आणि वापरणे याबाबत भरपूर विवेचन करतात.

थोडक्यात असे म्हणता येईल की पूर्वापारपासून स्वतंत्र असलेल्या या परंपरा वाग्भट ते शार्ङ्गधर या काळात एकत्र आल्या आणि अजूनही सुखाने नांदत आहेत.

सिद्धांत आणि व्यवहार यांची उत्क्रांती

त्रिदोष सिद्धांत जरी प्राचीन असला तरी त्याची उत्क्रांती बृहत् त्रयीत दिसून येते. चरक संहिता वातदोषाचे पाच प्रकार सांगते पण पित्त किंवा कफाचे सांगत नाही. सुश्रुत संहिता वाताच्या जोडीला पित्ताचे पाच प्रकार सांगते पण कफाचे सांगत नाही. अष्टांग संग्रह आणि हृदय तीनही दोषांचे पाच पाच प्रकार सांगतात. शार्ङ्गधर श्वसन प्रक्रिया वर्णन करतात, माधवनिदानात नवीन रोगांचे वर्णन आहे, भावप्रकाशात नवीन वनस्पतींचे वर्णन आहे.

याचा अर्थ आयुर्वेद ही फॉसिलाईझ झालेली ज्ञानशाखा नसून जिवंत आणि नवीन धुमारे फुटणारी ज्ञानशाखा आहे असे म्हणता येईल. इंग्रजी अंमलात आयुर्वेदामध्ये खूपच बदल झाले. त्यांचे विहंगावलोकन पुढील लेखात करू.

लेखकाचा अल्पपरिचय :
डॉ. विष्णू जोगळेकर आयुर्वेदाचे प्राध्यापक आहेत (आता निवृत्त). पुणे येथील टिळक आयुर्वेद विद्यालयाशी ते संलग्न होते. J-AIMच्या (Journal of Ayurveda and Integrative Medicine) संपादकीय समितीवर ते होते.

field_vote: 
0
No votes yet

डॉ जोगळेकर काका
माझ्या आणि नितीन थत्ते यांच्या सूक्ष्म जीव , विशेषतः विषाणू याविषयीच्या प्रश्नांची उत्तरे कधी द्याल याची आतुरतेने वाट बघत आहे.
उत्तरे द्याल ना ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0