आय.आय.टी.तील गणितविभागाचा प्रमुख असताना - भाग २

आय.आय.टी.तील गणितविभागाचा प्रमुख असताना

बालमोहन लिमये

भाग २

नवीन शिक्षणक्रम कसा अमलात आला

मी विभागप्रमुख बनण्याच्या अगोदरच गणितविभागाने ‘सांख्यिकीय संगणकशास्त्र’ (Statistical Informatics) नावाच्या नवीन शिक्षणक्रमाची सुरुवात करण्याबाबत निर्णय घेतला होता. भाग १मध्ये ते सविस्तरपणे सांगितले आहे. कुठल्याही विभागाने तयार केलेला शिक्षणक्रम प्रथम संस्थेच्या प्रायोजन समितीकडे (Programme Committee) जातो. तिथे प्राथमिक तपासणी झाल्यावर विभागाला काही तांत्रिक फेरफार करण्यासंबंधी सूचना मिळू शकतात. त्यानुसार बदल केलेल्या शिक्षणक्रमाला नंतर संस्थेच्या अधिसभेची (senate) मान्यता मिळवावी लागते. संस्थेच्या सर्व विभागांत ज्यांनी ज्यांनी पूर्ण प्राध्यापकाचा हुद्दा मिळवला असेल ते सगळे या अधिसभेचे सदस्य असतात, व अध्यक्ष म्हणून संस्थेचे निदेशक काम पाहतात. मोठ्या श्रोतृगृहात (auditorium) भरणाऱ्या या अधिसभेत कोणीही प्राध्यापक काहीही प्रश्न विचारू शकतात, आक्षेप घेऊ शकतात, स्पष्टीकरण मागू शकतात. त्यामुळे आपला प्रस्ताव मान्य करून घेणे ही विभागप्रमुखाची कसोटीच असते. मी पण पुऱ्या तयारीनिशी नवीन अभ्यासक्रमाचा प्रस्ताव मांडला. खरे म्हणजे या शिक्षणक्रमातील बरेच विषय मला परिचित नव्हते. पण त्यांचे महत्त्व मी जाणून होतो. म्हणून त्या त्या विषयांत प्रवीण असणाऱ्या आमच्या विभागातील प्राध्यापकांचा सल्ला घेऊन मी नव्या शिक्षणक्रमाने काय साधेल व त्याची आजच्या काळात किती आवश्यकता आहे हे सुसूत्रपणे मांडले. त्यावेळी मी अधिसभेला पारदर्शिकेच्या (transparency) साह्याने एक ओघपत्र (flow chart) दाखवले. त्यांत वास्तव जगातील विदांचा (data) उपयोग करून आमचा शिक्षणक्रम माहितीपर्यंत व ज्ञानापर्यंत (Information and Knowledge) कसा पोचवतो ते विशद करण्याचा मी प्रयत्न केला होता. आजही ते ओघपत्र माझ्या संग्रहात आहे.अधिसभेच्या किती सदस्यांना माझे म्हणणे पटले याचा अंदाज येणे कठीण होते. पण अधिसभेचे अध्यक्ष व संस्थेचे तत्कालीन निदेशक प्राध्यापक बिश्वजित नाग यांनी संमतिदर्शक मान डोलावली होती. आता सभागृहात चर्चा सुरू होणार होती. अशा वेळी काही अनपेक्षित आक्षेपांमुळे गाडी रुळांवरून घसरून जाण्याची शक्यता नेहमीच असते. तसे काही होऊ नये म्हणून आधीच तजवीज करून ठेवणे बरे नाही का? ती काळजी मी घेतली होती. कुठल्याही मोठ्या सभेत काही सदस्यांचा दरारा असतो. तो त्यांच्या वाक्पटुत्वाने निर्माण झालेला असतो. त्यांच्याशी वादविवाद करणे महामुश्कील असते. आय.आय.टी.च्या अधिसभेतही अशा काही व्यक्ती होत्या. या व्यक्ती पुढच्या रांगेत बसायच्या व प्रतिपक्षाचा पुरेपूर समाचार घ्यायच्या. अशा व्यक्तींपैकी एक म्हणजे विद्युत अभियांत्रिकी (Electrical Engineering) विभागातील व्ही. सुब्बाराव. सभेच्या आधीच मी त्यांची वेळ ठरवून भेट घेतली होती, त्यांना आमच्या नव्या शिक्षणक्रमाची सांगोपांग माहिती दिली होती, त्यांचे शंकानिरसन करून पाठिंबा मिळवला होता. झाले, अधिसभेत मी गणितविभागाचा नवीन शिक्षणक्रम प्रस्तुत केल्याबरोबर प्राध्यापक सुब्बारावांनी दमदारपणे त्याचा पाठपुरावा केला व आतापर्यंत भारतात कुठेही चालू नसलेल्या या उपक्रमाचे स्वागत केले. त्यानंतरच्या चर्चेत होय किंवा नाही असा प्रश्न उरलाच नव्हता, फक्त हा शिक्षणक्रम कसा राबवता येईल याबद्दल काही सूचना करण्यात आल्या. संगणकशास्त्राचा विभाग हा आमचा मित्रपक्ष होताच; त्या विभागातील प्राध्यापक फाटक व सारडा यांच्याशी झालेल्या माझ्या संभाषणातूनच तर या शिक्षणक्रमाचा उगम झाला होता. त्यांनीही सहकार्य देऊ केले. तथापि काही विशेष अभ्यासक्रम शिकवू शकणारे प्राध्यापक गणितविभागातच असणे दीर्घकालीन दृष्टिकोणातून गरजेचे होते. अशा प्राध्यापकांची भरती निश्चित करून घेऊ असे मी विभागप्रमुख या नात्याने सभेला सांगितले.

असे सगळे झाल्यावर आमच्या शिक्षणक्रमाला अधिसभेची मान्यता मिळणार असे दिसत असतानाच अध्यक्ष प्राध्यापक नाग यांनी एका बाबतीत खोड काढलीच. शिक्षणक्रमाचे ‘Statistical Informatics’ हे नाव त्यांना पसंत पडले नाही. कुठेही न आढळणाऱ्या या नावाचे स्पष्टीकरण मी या सभेत दिले असले तरी जे पालक आपल्या मुलांना हा शिक्षणक्रम घेण्यासाठी पाठवणार आहेत त्यांना या नावाने काय बोध होईल असा प्राध्यापक नाग यांचा मुद्दा होता. मग दुसऱ्या काही नावांची चर्चा झाली. पण कुठलेच नाव सर्वमान्य होईना. शेवटी अध्यक्षांनी निर्णय घेतला की नवा शिक्षणक्रम अधिसभेला मान्य आहे, पण त्याचे नाव एका द्विसदस्य समितीने निश्चित करावे व त्या समितीचे सभासद असतील गणितविभाग आणि संगणकशास्त्रविभाग यांचे प्रमुख, म्हणजे मी आणि प्राध्यापक दीपक फाटक. आम्ही दोघांनी विचारविनिमय करून या शिक्षणक्रमातील दोन मुख्य पैलूंचा समावेश होईल असे Applied Statistics and Informatics हे नाव पक्के केले आणि पुढच्या अधिसभेत ते मान्यही झाले. हा शिक्षणक्रम ए.एस.आय. (ASI) या आद्याक्षरसंज्ञेने (acronym) ओळखला जाणार होता. हे सगळे व्हायला 1994 सालचा मे महिना उलटून गेला होता. त्यामुळे नव्या शिक्षणक्रमाची जाहिरात देऊन, विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवून, त्यांची प्रवेशपरीक्षा घेऊन तो 1994-95 या शैक्षणिक वर्षांत सुरू करणे शक्यच नव्हते. तसे बघितले तर गणितविभागाला सज्ज होण्यासाठी काही कालावधी लागणारच होता. नव्या विषयांतील उत्तम प्रतीचे प्राध्यापक सहजासहजी मिळत नाहीत ही वस्तुस्थिती होती.

नवीन प्राध्यापकांची भरती

विभागाला नेमक्या कोणत्या विषयांत संशोधन करणाऱ्या प्राध्यापकांची जरुरी आहे याची जाहिरात देऊन अर्ज मागवायचे, त्यांची छाननी करून सुयोग्य उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवायचे, त्यांच्यापैकी प्रत्येकाला त्याच्या संशोधनावर छोटेसे भाषण करायला सांगून त्याबद्दल विभागातील प्राध्यापकांची प्रतिपुष्टी (feedback) घ्यायची व ती संस्थेच्या निदेशकाला विभागप्रमुखाने कळवायची. एव्हाना संस्थेने सुमारे पाच विशेषज्ञांची निवडसमिती गठित केलेली असते. नंतर ती प्रत्येक उमेदवाराची साक्षात मुलाखत घेते. या प्रसंगी विभागप्रमुखही उपस्थित असतो. विभागाच्या गरजेनुसार व उमेदवारांच्या कामगिरीनुसार निवड होते. हा सगळा खाक्या पाळावाच लागतो. पण नुसती जाहिरात देऊन काही उत्तम प्रतीचे मासे गळाला लागत नाहीत. त्यासाठी अगोदरपासून संभाव्य (potential) उमेदवारांना अर्ज करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागते. आमच्या शिक्षणक्रमासाठी तर खास निपुणता असलेले उमेदवार हवे होते, सांख्यिकी व संगणकशास्त्र यांची जोड घालू शकतील असे. मी त्यांच्या शोधात होतोच आणि काही जणांना हेरूनही ठेवले होते. आमच्याच विभागातून 1986 साली सांख्यिकी व संक्रिया संशोधन (Statistics and Operations Research) या धारेतून एम.एस्सी. पदवी मिळवलेली चित्रा लेले हिची नुकतीच भेट झाली होती. तिने स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पीएच.डी. ही पदवी मिळवली होती, व नंतर तिने चार वर्षे काही अमेरिकन विद्यापीठांत व संशोधनसंस्थांत जीवसांख्यिकी आणि साथरोगशास्त्र (Biostatistics and Epidemiology) या विषयांत काम केले होते. तिला अर्जाची एक प्रत देऊन मी तो तिच्याकडून भरूनच घेतला. सचिन पाटकर या हुशार विद्यार्थ्य़ाने आय.आय.टी.च्या संगणकशास्त्र विभागात प्रथम बी. टेक. व नंतर 1992मध्ये पीएच.डी. अशा पदव्या मिळवलेल्या होत्या. त्याने विद्युत अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक एच. नारायण यांच्या देखरेखीखाली समचयी इष्टतमीकरण (Combinatorial Optimisation) या विषयांत संशोधन केले होते. आमच्या नव्या शिक्षणक्रमाच्या दृष्टीने हा विषय फारच निकटचा होता. परंतु पीएच. डी. झाल्या झाल्या त्याला आमच्याच आय.आय.टीत स्थान मिळू शकले नसते. याचे कारण आमच्या संस्थेत अंतर्जनन (inbreeding) टाळण्याचा प्रघात आहे. इतर विद्यापीठांत पीएच.डी. प्राप्त झाल्यावर तिथेच चिकटून जाण्याचा प्रकार खूप ठिकाणी चालतो. त्यामुळे एकाच गटाचे हितसंबंध जपले जातात व वशिलेबाजीलाही वाव मिळतो. आय.आय.टी.त पीएच.डी. केल्यानंतर मात्र दुसऱ्या कुठल्या संस्थेत दोन-तीन वर्षे संशोधन वा अध्यापन करावे लागते, किंवा एखाद्या उद्योगसमूहात काम करावे लागते. तिथे नवे अनुभव मिळवल्यानंतर आपल्या आय.आय.टी.त परतून शिक्षक म्हणून रुजू होता येत असे. तशीच परिस्थिती सचिनची होती. 1993-1994 ही दोन वर्षे जर्मनीतील बॉन (Bonn) येथील विद्यापीठात त्याने हम्बोल्ट अधिछात्र (Humbolt Fellow) म्हणून संशोधन केले होते व तो नुकताच परत आला होता. अशी सुवर्णसंधी मी दवडणार नव्हतो. त्यालाही अर्ज करायला सांगितले.

अशी सगळी तयारी केल्यावरही प्रत्यक्ष मुलाखती कशा होतील, निवडसमितीतील कोण विशेषज्ञ काय प्रश्न विचारतील याचा काही नेम नसतो. परंतु संस्थेचे निदेशक नाग यांच्या सकारात्मक दृष्टिकोणामुळे चित्रा लेले आणि सचिन पाटकर यांची तर निवड झालीच, पण अमेरिकेतून येऊ घातलेले गिरीश अरस आणि कलकत्त्याच्या भारतीय सांख्यिकी संस्थेतील (Indian Statistical Institute) सुमित्र पुरकायस्थ यांनाही निवडण्यात आले. मी खूप खूष झालो होतो, कारण या चार जणांची भर पडल्यावर आमच्या विभागाला नवा शिक्षणक्रम निश्चित पेलता आला असता. हे चारी जण एकामागून एक आमच्या विभागात रुजू झाले. त्याशिवाय अगोदरपासून आमच्या विभागात काम करणारे रजनी जोशी, मुरली श्रीनिवासन आणि संजीव सबनीस हे आधारभूत प्राध्यापक होतेच.

सुरुवात आणि सांगता

1995 सालाच्या मे-जून महिन्यात आम्ही गणितविभागासंबंधी एक माहिती पुस्तिका काढली. तिच्यात विभागातील सर्व चौतीस प्राध्यापकांची नावे दिली होती व त्यांनी जगभरात कुठे पीएच.डी. मिळवली हे कंसात लिहिले होते. (यांपैकी पाच प्राध्यापक आजही गणितविभागात कार्यरत आहेत.) पुस्तिकेबरोबर एक भित्तिपत्र (poster) आम्ही कित्येक महाविद्यालयांकडे पाठवले. एम.एस्सी.चे दोन्ही शिक्षणक्रम दोन वर्षाचे होते. त्यापैकी ‘एम.एस्सी. - गणित’ हा शिक्षणक्रम जवळ जवळ तीस वर्षे आमच्या विभागात चालू होताच. पण त्या शैक्षणिक वर्षी नव्याने सुरू होणाऱ्या ‘एम.एस्सी. - ए.एस.आय.’ या शिक्षणक्रमाला उठाव देणे आवश्यक होते.मी विभागप्रमुख असेपर्यंत म्हणजे 1997 सालाच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत नव्या शिक्षणक्रमाचे सर्वतोपरी संगोपन करणे हे माझे मुख्य काम होते. काही अडचणी अपेक्षित होत्या, पण गणितविभागातील बऱ्याच प्राध्यापकांचा उत्साह आणि संगणकशास्त्रविभागातील प्राध्यापकांनी वेळोवेळी केलेला पाठपुरावा यामुळे दरवर्षी वीस-पंचवीस विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या तुकड्या (batches) बाहेर पडू लागल्या. बहुतेकांना औद्योगिक समूहांमध्ये छान नोकऱ्या मिळत असत. तसेच काही उत्तम विद्यार्थी सखोल संशोधनाकडेही वळत. काही काळानंतर आमच्या विभागात औद्योगिक गणिताचा (Industrial Mathematics) एक गट निर्माण झाला, प्राध्यापक मोहन जोशी व अमिया पाणी यांच्या पुढाकाराने. त्यामुळेही नव्या शिक्षणक्रमांत एक वेगळी भर पडली. मात्र हळूहळू एक गंभीर प्रश्न उभा ठाकत राहिला. एका बाजूने संगणकशास्त्रविभागातील प्राध्यापक आमच्या विभागातील विद्यार्थ्यांना शिकवायला नाखूश दिसू लागले. फाटक-सारडा ही जोडगोळी प्रमुखपदी होती तेव्हा जे गप्प होते, त्यांना वाचा फुटू लागली. दोन भिन्न विभागांतील विद्यार्थ्यांच्या तयारीमध्ये तफावतही दिसून येत होती. दुसऱ्या बाजूने गणितविभागाने खास या शिक्षणक्रमासाठी भरती केलेले प्राध्यापक काही ना काही कारणाने आमच्या विभागातून अथवा संस्थेतून बाहेर पडले. आधीच्या प्राध्यापकांनी नवीन अभ्यासक्रम शिकवायचे कसब आणावे ही सुरुवातीची अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे या शिक्षणक्रमाचे वैशिष्ट्य कमी होऊ लागले. शेवटी 2022 साली गणितविभागानेच या शिक्षणक्रमाचे नामकरणही बदलून घेतले, एम.एस्सी. - सांख्यिकी असे. तोपर्यंत मला निवृत्त होऊन बरीच वर्षे झाली होती खरी, पण मला एक आवंढा गिळावाच लागला. हा वेगळ्या धाटणीचा अभ्यासक्रम अठ्ठावीस वर्षे चालला हेही नसे थोडके. एव्हाना आय.आय.टी. खरगपूर, आय.आय.टी. गुवाहाती आणि इतरही काही संस्थांनी या शिक्षणक्रमाच्या धर्तीवर आपापले नवीन शिक्षणक्रम सुरू केले होते ही एक जमेची बाब म्हटली पाहिजे.

नवे निदेशक

1995 सालाच्या जानेवारी महिन्यात प्राध्यापक सुहास सुखात्मे यांनी संस्थेच्या निदेशकाची सूत्रे हाती घेतली. पंचवीस-तीस वर्षे ते आमच्याच संस्थेत काम करत असल्याने त्यांना संस्थेची खडान्‌खडा माहिती होती. त्यांनी बोलावलेल्या सर्व विभागप्रमुखांच्या पहिल्या बैठकीला मी उपस्थित होतो. अभियांत्रिकीचे उत्तम शिक्षण देण्याबाबत आमच्या संस्थेची महती होतीच, पण आता उत्तम संशोधन करून दाखवणारी संस्था उभारण्याला त्यांनी प्राधान्य दिले. बैठकीच्या शेवटी ते म्हणाले की पुढच्या महिन्यात प्रत्येक विभागाला प्रत्यक्ष भेट द्यायचा त्यांचा विचार आहे. दुसऱ्याच दिवशी मी त्यांना गणितविभागात येऊन जाण्यासाठी पाचारण केले. ते शिस्तीचे व स्वच्छतेचे भोक्ते असल्याचे मला नक्की माहीत होते. म्हणून ते येण्याच्या आधी मी सगळ्या कर्मचाऱ्यांकडून वेगवेगळ्या गोष्टी व्यवस्थित लावून घेतल्या, साफसफाई करून घेतली. ते विभागप्रमुखाच्या खोलीत आल्यावर माझ्या खुर्चीवरून उठून त्यांना तिथे बसायची विनंती मी केली. ते म्हणाले ‘नाही, विभागप्रमुखाने स्वत:च्या जागेवरच बसले पाहिजे. मी समोरच्या खुर्चीवर बसतो.’ त्यांनी विभागाच्या तातडीच्या गरजा काय आहेत, तसेच लांब पल्ल्याची काय स्वप्ने आहेत याबद्दल जाणून घेतले. नंतर विभागात सगळीकडे एक फेरफटका मारला. आधी सर्व झाडलोट केलेली असली तरी एका वर्गात शिरताना कागदाचा एक कपटा खाली पडलाच होता. प्राध्यापक सुखात्म्यांच्या नजरेतून तो सुटणारही नव्हता. पटकन खाली वाकून त्यांनी तो कपटा उचलला आणि आपल्याच खिशात घालून टाकला. मला किती अपुरे वाटले असेल ते सांगणे न लगे!

कसे संबोधायचे

1975 साली मी आय.आय.टी.त रुजू झालो तेव्हा शिकवणाऱ्यांचे तीन संवर्ग (cadres) होते : व्याख्याता (Lecturer), सहायक प्राध्यापक (Assistant professor) आणि प्राध्यापक (Professor). या शिवाय सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) असे अनौपचारिक पदनामदेखील (informal designation) काही वेळा वापरले जात असे. यांपैकी व्याख्याते आणि सहप्राध्यापक यांनी पीएच.डी. ही पदवी मिळवली असेल तर त्यांना ‘डॉक्टर’ अशी उपाधी मिळे व तसे संबोधले जाई, कागदोपत्री आणि सभांमध्येही, नाहीतर त्यांना श्रीयुत (Mister) असे संबोधले जाई. फक्त जे पूर्ण प्राध्यापक (Full Professor) असत, त्यांच्यासाठीच प्राध्यापक हे संबोधन राखून ठेवलेले होते. काही काळानंतर सहयोगी प्राध्यापक नावाचा संवर्ग औपचारिकरीत्या प्रचलित झाला, सहप्राध्यापक आणि प्राध्यापक यांच्या मधला. आता या संवर्गातील शिक्षकांना कसे संबोधायचे या नाजूक प्रश्नाचे सरळ सोपे उत्तर नव्हते. विभागातील सदस्यांची सभा चालवताना माझी पंचाईत होऊ लागली. दरवेळी कोणाला संबोधताना श्रीयुत म्हणायचे, डॉक्टर म्हणायचे की प्रोफेसर म्हणायचे? गेल्या सभेत ज्याला डॉक्टर म्हणून संबोधत होतो त्याची पदोन्नती झाली असेल तर ते लक्षात ठेवून आवर्जून प्राध्यापक म्हणून संबोधणे भाग असायचे. मला हे फारच कटकटीचे व कृत्रिम वाटू लागले. तसे पाहता विभागातील सर्वच सदस्य एकाच प्रकारचे, म्हणजे संशोधनाचे व अध्यापनाचे, काम करत असत. मग त्यांना संबोधताना त्यांचा हुद्दा कशाला लक्षात घ्यायचा? डॉक्टर हे संबोधन खालच्या दर्जाचे आणि प्राध्यापक हे संबोधन वरच्या दर्जाचे असा फरक कशाला करायचा? गंमत म्हणजे बाहेरील महाविद्यालयांत शिकवणाऱ्या सगळ्यांना प्रोफेसर असेच संबोधले जात असे; त्यांच्यापैकी ज्या काही थोड्यांनी पीएच.डी. ही पदवी मिळवली असेल, त्यांना डॉक्टर संबोधून मान दिला जात असे, म्हणजे आय.आय.टी.च्या अगदी उलट.

मी विचार केला की आपण सगळ्यांनी अशा मानपानाच्या पलीकडे गेले पाहिजे. पण रुढ असलेली प्रथा बदलायची कशी? एक मार्ग होता. प्रत्येक सत्रामध्ये आय.आय.टी.च्या सर्व शिक्षकांची एक सभा (Faculty Meeting) भरत असते. आय.आय.टी.चे निदेशक या सभेच्या अध्यक्षस्थानी असतात. संस्थेच्या कामासंबंधी कुणालाही एखादा मुद्दा उपस्थित करायचा असला तर तसे आधी कळवून त्याचा कार्यसूचीत (agenda) समावेश करून घेता येतो. मी संबोधनाची बाब लिहून पाठवली. ते साल होते 1995 आणि शिक्षकसभेचा सचिव (secretary) म्हणून गणितविभागातील प्राध्यापक सुधीर घोरपडे काम बघत होते. सभेच्या आदल्या दिवशी मी माझे म्हणणे मुद्देशीरपणे लिहून काढले होते, सभेत ते नीट मांडता यावे यासाठी. पण नेमका त्या दिवशी माझा घसा इतका बिघडला की स्पष्टपणे बोलणेही कठीण झाले. मग मी प्राध्यापक घोरपडे यांना माझे लिखाण सभेपुढे वाचून दाखवायची विनंती केली. त्यांचे वाचन संपताच सभेतील अनेक जेष्ठ सभासदांनी आक्षेप घेतले. त्यांचे म्हणणे असे की पूर्ण प्राध्यापकाचा दर्जा त्यांनी खूप प्रयत्नांती मिळवला होता; त्यांची आणि नव्याने रुजू होणाऱ्या सदस्यांची बरोबरी करणे अयोग्य आहे. काहींचा तर तिळपापडच झाला. बरे झाले मला काही बोलता येत नव्हते, नाहीतर मी त्यांचा समाचार घ्यायला कमी केले नसते. मी फक्त एक चिठ्ठी सचिवाकडे पाठवली व तिच्यात लिहिले : जो ‘profess’ करतो, म्हणजे गोष्टी उघड करून मांडतो तो ‘professor’, आणि आपण सगळेच आपापल्या वर्गांत तसे करत असल्याने `professor’ म्हणवायला पात्र आहोत. बऱ्याच उदारमतवादी सदस्यांनी माझ्या मुद्द्याला पाठिंबा दिला. अध्यक्षस्थानावरून प्राध्यापक सुखात्मे इतकेच म्हणाले की त्यांनी दोन्ही बाजू नीट ऐकल्या आहेत, व योग्य निर्णय ते घेतील. त्यानंतर त्या दिवशीच्या कार्यसूचीतील इतर काही बाबींचा विचार होऊन सभा संपली. माझा मुद्दा दुग्ध्यातच राहिल्याने मी जरासा हिरमुसला झालो होतो, पण मला आणखी जास्त काही करण्यासारखे नव्हते. दोन-चार दिवसांतच संस्थेच्या कुलसचिवाकडून (Registrar) सर्व विभागांकडे व अनुभागांकडे (departments and sections) एक लेखी सूचना आली. तिच्यात लिहिले होते : ‘निदेशकांनी मला असे कळवायला सांगितले आहे की आजपासून कुठल्याही लेखी किंवा तोंडी व्यवहारात सर्व शिक्षकांना, अगदी अभ्यागत (visiting) शिक्षकांनादेखील, प्राध्यापक असे संबोधले जावे.’ तेव्हापासून मुंबईच्या आय.आय.टी.तील शिक्षकांमध्ये एक प्रकारची समानता आली. ही गोष्ट वरकरणी मामुली दिसत असली तरी इरादा स्पष्ट होता : आपल्यातल्या आपल्यात उघडपणे तरी प्रतवारी करायला नको. ही प्रथा आजही मुंबईच्या आय.आय.टी.त पाळली जाते. दुसऱ्या कुठल्या आय.आय.टी.मध्ये काय चालते याची मला कल्पना नाही.

प्राध्यापक रामचंद्र राव

आमच्या विभागातील ज्येष्ठ प्राध्यापक रामचंद्र राव माझे मुख्य आधारस्तंभ होते. मी आय.आय.टी.त रुजू झाल्यावर त्यांच्याबरोबर बी.टेक.च्या मोठ्या वर्गांना शिकवायची संधी मला लाभली होती. त्यावेळी मला अगम्य असलेला हा प्रकार कसा शिताफीने हाताळायचा याचे बाळकडू त्यांनी मला पाजले होते. त्यांचे आणि माझे संशोधन अगदी वेगळ्या विषयांत असले, तरी आम्हा दोघांनाही गणितातील सर्वच विषयांबद्दल आस्था होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विभागाची प्रगती कोणत्या दिशेने व्हावी याबद्दल आमच्यात एकवाक्यता होती. गणिताच्या मूलभूत पैलूंना तर प्राधान्य द्यायचेच, पण असे करताना गणिताच्या उपयोजित भागांचाही विकास साधायचा, अशी ती दिशा होती. सर्व विद्यार्थ्यांबरोबर ते अतिशय सहानुभूतीने वागत, त्यांची बाजू नीट समजावून घेत, व त्यांना उपकारक सूचना करत. प्राध्यापकांबाबतही त्यांची वृत्ती हितकारी असे. पण कोणी विनाकारण अडचणी निर्माण करू लागला, तर मात्र त्यांच्यासारखा खमका दुसरा कोणी नसे. मला कुठलाही छोटा-मोठा निर्णय घ्यायचा असला, विशेषतः कुणाचा रोष पत्करावा लागणार असला, तर मी प्रथम त्यांच्याशी चर्चा करून माझे धोरण ठरवत असे.माझ्या डावीकडे प्राध्यापक रामचंद्र राव

1995 साली रामचंद्र रावांची संस्थेच्या सर्व शैक्षणिक कार्यक्रमांचा अधिष्ठाता (Dean of Academic Programmes) म्हणून नेमणूक झाली. त्या काळात संस्थेच्या वेगवेगळ्या अभियांत्रिकी विभागांत बी.टेक. ही पदवी मिळवल्यावर फारच थोडे विद्यार्थी आय.आय.टी.च्या एम.टेक. या पदव्युत्तर शिक्षणक्रमात प्रवेश घेत असत. खूपसे विद्यार्थी कुठल्यातरी उद्योगसमूहात लठ्ठ पगाराची नोकरी स्वीकारत किंवा परदेशी प्रयाण करत. या परिस्थितीमुळे त्या विभागांच्या संशोधनकार्याला हातभार लागत नसे. यावर उपाय म्हणून रामचंद्र रावांनी एक शक्कल लढवली. जे.ई.ई. (J.E.E., Joint Entrance Examination) या प्रवेशपरीक्षेनंतर बी.टेक.-एम.टेक. असा पाच वर्षांचा द्विदल पदवी कार्यक्रम (Dual Degree Programme) सुरू करायचा व दोन्ही पदव्या शिक्षणक्रमाच्या अखेरीस एकदम द्यायच्या. हा प्रकार चांगल्या विद्यार्थ्यांना कितपत आकर्षित करेल याचा नेम नव्हता. तरीही विद्युत, यांत्रिकी व रासायनिक (Electrical, Mechanical and Chemical) या तीन अभियांत्रिकी विभागांतील प्राध्यापकांचा जोरदार पाठिंबा मिळवून रामचंद्र रावांनी हा शिक्षणक्रम मुंबईच्या आय.आय.टी.त राबवला. काही वर्षांनी हा शिक्षणक्रम इतर आय.आय.टी.मध्येही सुरू झाला व त्यात उत्तमोत्तम विद्यार्थी दाखल होऊ लागले. रामचंद्र राव अधिष्ठाता असताना त्यांना जी काही मदत करता येईल ती मी मनापासून केली. त्यासाठी माझा मुक्काम मुख्य भवनातील (Main Building) अधिष्ठात्यांच्या कार्यालयात (Deans Office) बराच वेळ असे. कोणीतरी म्हटलेच आहे ना, एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ.

काही अपवाद

माझ्या तीन वर्षांच्या कारकिर्दीत मला बहुतेक सर्व प्राध्यापकांचे सहकार्य मिळाले, व त्याचे मला समाधान होते. फक्त दोन-तीन वेळाच मला जरा कडक भूमिका घ्यावी लागली. 1995मध्ये एका प्राध्यापकांनी दोन वेळा प्रत्येकी दोन महिन्यांसाठी अर्जित रजा (earned leave) मागितली होती, पण दोन्ही वेळा रजा सुरू व्हायच्या फक्त दहा दिवस आधी तसे कळवले होते. त्यामुळे त्यांनी शिकवायच्या अभ्यासक्रमाची तजवीज आयत्या वेळी करणे भाग पडणार होते. मी दोन्ही अर्जांची शिफारस केली खरी, पण जेव्हा माझा अभिप्राय द्यायची वेळ आली तेव्हा मी निदेशकांना निक्षून लिहिले की हा प्रकार काही चाकोरीत बसणारा नाही. निदेशकांनी एक खरमरीत पत्र त्या प्राध्यापकाला पाठवले. ‘दीर्घ मुदतीच्या रजेसाठी खूप आधीपासून अर्ज करावा लागतो व रजेच्या काळांतील जबाबदाऱ्यांची पर्यायी व्यवस्था करून घ्यावी लागते, हे तुम्हाला ठाऊक असेलच. तुमची वागणूक एका जेष्ठ प्राध्यापकाकडून अपेक्षित नाही. कुठल्याही परिस्थितीत पुन्हा असे घडणार नाही अशी मी आशा करतो.’ त्या प्राध्यापकांना रजा मिळून गेली, पण एक स्वच्छ संदेश त्यांना आणि त्यांच्या सोबत्यांना मिळाला. दुसऱ्या एका प्राध्यापकांनी विचित्रपणाच केला. ते एका विभागीय समितीचे सभासद होते. पण ज्या ज्या दिवशी त्या समितीची सभा असेल नेमक्या त्या त्या दिवशी ते नैमित्तिक रजेचा (casual leave) अर्ज देऊन घरी रहायचे. दोन वर्षांत असे बारा-तेरा वेळा झाले. त्यांना सोपवलेल्या इतर कामांतूनही त्यांनी अंग काढून घेतले होते. या असहकाराची दाद मी निदेशकांशिवाय कुणाकडे मागणार? त्यावेळी निदेशकांनी उच्चारलेले एक वाक्य माझ्या चांगले लक्षात आहे. ‘कोणत्याही रजेवर, मग ती अर्जित असो वा नैमित्तिक असो, मागणाऱ्याचा हक्क नसतो; मंजूर झाल्यावरच रजा घेता येते.’ तिसऱ्या एका प्राध्यापकांची मानसिक अवस्था निवृत्त होण्याआधी अशी काही विचित्र झाली होती की कुठलाही अभ्यासक्रम त्यांना शिकवायला सांगणे हे एक धाडसाचे काम होऊन बसले होते. सामान्यत: जर कुणाच्या निवृत्तीचा दिवस सत्राच्या मध्यंतरी येत असेल तर त्या सत्राअखेर सेवावधी वाढवण्याची शिफारस विभागप्रमुख करत असतो. या महाभागांबाबत अशी शिफारस करणे मी निरर्थक मानले. अशा सर्व बाबतींत मला काही व्यक्तींचा रोष पत्करावा लागला. सर्व प्रवृत्तीच्या लोकांशी जुळवून घ्यायचे असेल तर तारेवरची कसरत करावी लागतेच, परंतु सर्वसामान्यपणे खेळीमेळीच्या वातावरणात कामकाज चालू राहिले.

नव्या नेमणुका व पदोन्नती

म्हणता म्हणता 1995 साल संपत आले. विभागप्रमुख म्हणून माझी कारकिर्द संपायला जेमतेम एक वर्ष उरले होते. नवीन शिक्षणक्रम चालवण्याच्या हेतूने चार नव्या सदस्यांची विभागात नेमणूक झाली असली तरी या अवधीत पाच जण निवृत्त झाले होते, आणि पुढच्या पाच वर्षांत आणखी दहा जण निवृत्त होणार होते. विभागाची कार्यक्षमता नुसती टिकवून ठेवण्यासाठीच नव्हे तर ती वाढवण्यासाठी काही आराखडा ठरवणे जरूर होते. यासाठी मी आठ जणांची एक समिती नेमली व मीच तिचा आमंत्रक (convener) झालो. समितीचे नांव होते Growth Plan Committee, म्हणजे विकास योजना समिती. या समितीत वेगवेगळ्या विषयांत काम करणाऱ्या विभागातील ज्येष्ठ (आणि श्रेष्ठ!) प्राध्यापकांचा समावेश होता. त्यामुळे कशावर किती भर द्यायचा याबाबत समतोल राखला जाणार होता. दुसरे म्हणजे समितीचा अहवाल सर्व सदस्यांच्या सभेत मान्य होणे सुकर बनणार होते. 1995 सालच्या जानेवारी महिन्यात हा अहवाल तयार झाला. त्याची एक प्रत मी अजूनही सांभाळून ठेवली आहे. पुढच्या पाच वर्षांत म्हणजे 2000 सालापर्यंत कोणकोणत्या विषयांत संशोधन करणाऱ्या प्राध्यापकांच्या नेमणुकींना प्राधान्य द्यायचे हे तर अहवालात लिहिलेच होते, पण जाहिरात देताना काय खबरदारी घ्यायची याचीही स्पष्ट नोंद केली होती. उदाहरणार्थ, एखाद्या विषयातील काही संकुचित भागाची मर्यादा न घालता व्यापक स्वरूप पत्करावे, कुठल्याही विषयात नेमके किती जणांना घ्यायचे ते पूर्वनिर्धारित नसावे वगैरे. अर्थात ही पाच वर्षांची योजना अमलात आणण्याची जबाबदारी माझ्यानंतर येणाऱ्या विभागप्रमुखांचीदेखील होती, व ते त्यात बदलही करू शकले असते.

नव्याने घेतल्या जाणाऱ्या सदस्यांबरोबरच विभागात अगोदरच असलेल्या सदस्यांच्या पदोन्नतीचा विचारविनिमय विशेषज्ञांची एक निवडसमिती करते. तिची बैठक दर वर्षाआड तरी होत असे. त्यावेळी मुलाखती संपल्यावर निदेशक विभागप्रमुखाला त्याच्या विभागाची प्रतिपुष्टी (feedback) विचारतो. विभागातील सर्वच उमेदवारांची शिफारस प्रमुखाने करावी असा अलिखित रिवाज असे. परंतु अशी शिफारस किती तीव्रतेने केली जात आहे याकडेही निवडसमितीचे लक्ष असते. किंबहुना मुलाखतींच्या आदल्या दिवशी होणाऱ्या भेटीत संस्थेच्या निदेशकाने विभागप्रमुखाकडून प्रत्येकाबद्दल सविस्तर अहवाल मागवलेला असतो व तो बारकाईने अभ्यासलेला असतो. ही झाली सर्वसामान्य कार्यपद्धती. पण दर वेळच्या निवडसमितीचे सभासद वेगळे असल्याने अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. मला आठवते आहे की एका प्रसंगी विभागप्रमुख म्हणून मी विभागातील उमेदवारांची शिफारस केल्यानंतर निवडसमितीने माझा चक्क निरोप घेतला: तुमचे म्हणणे ऐकून घेतले आहे; आता तुम्ही जाऊ शकता असे सांगून. त्यामुळे मला निवडसमितीच्या निर्णयांची काहीच कल्पना आली नाही. यथाकाल जेव्हा ते निर्णय कळले तेव्हा दिसून आले की विभागातील एकाही सदस्याची पदोन्नती झालेली नाही. त्यामुळे मीच पुरेशी खटपट केली नसल्याचा ठपका आला. कालांतराने मला कळले की निवडसमितीतील एक वजनदार सभासद बैठकीच्या आधी चंदिगडहून मुंबईला पोचल्यावर टि.आय.एफ.आर. या संस्थेत गेले होते. तेथे सल्लामसलत करून त्यांनी आमच्या संस्थेतील कुणाचीही पदोन्नती होऊ न देण्याचा घाट घातला होता. वस्तुतः निरनिराळ्या संस्थांतील पदोन्नतीचे निकष भिन्न असल्याने असे काही करणे वाजवी नव्हते. मात्र एकदा समितीमधील विशेषज्ञांनी ठाम भूमिका घेतली की निवडसमितीच्या अध्यक्षस्थानी असलेल्या संस्थेच्या निदेशकांना काही वेगळे करणे कठीण गेले असावे.

समारोप

1996 सालचे जुलैपासून नोव्हेंबरपर्यंत चालणारे सत्र संपले आणि त्याबरोबरच माझ्या विभागप्रमुखपदाचा कालावधी संपत आला. त्यावेळी संस्थेचे उपनिदेशक (Deputy Director) होते प्राध्यापक सुधाकर सहस्रबुधे. आपल्या एका सहकाऱ्याबरोबर ते ठरल्या वेळी गणितविभागात आले, सर्व प्राध्यापकांचा पुढील विभागप्रमुखाबद्दल कौल घेण्यासाठी. त्यांना विभागप्रमुखाच्या खोलीत बसवून मी स्वत:च्या खोलीत निघून गेलो. सर्वात अलीकडे रुजू झालेल्या प्राध्यापकापासून सुरुवात होऊन एकेक जण त्यांना भेटून आपली मते सांगत होते. सर्वात ज्येष्ठ प्राध्यापकांना भेटून झाल्यावर मला बोलावणे आले. मी माझे मत सांगितल्यावर प्राध्यापक सहस्रबुध्यांनी मला जाऊ दिले नाही. त्यांनी मला विचारले की तुमच्या अंदाजाप्रमाणे कोणाचे नाव बहुसंख्य लोकांनी सुचवले असावे. याचे उत्तर देणे कठीण होते, कारण कुणाच्या मनात काय आहे हे सांगायला मी थोडाच मनकवडा होतो. तरीही मी एक नाव सांगितले. ते म्हणाले की सपशेल चूक. मग मी दबकत दबकत दुसरे एक नाव घेतले. तरीही प्राध्यापक सहस्रबुध्यांचा तोच प्रतिसाद. शिवाय त्यांनी अशी मखलाशी केली की तीन वर्षे विभागप्रमुख असूनही मला विभागातील प्राध्यापकांची नस (pulse) समजली नाहीये! मी निरुत्तर तर झालोच, पण ओशाळलोही. माझा पाणउतारा होत आहे असे वाटले. माझी स्थिती बघून सहस्रबुध्यांना हसू आवरेना. मिस्कीलपणे (?) ते मला म्हणाले : तुम्हीच पुन्हा तीन वर्षे विभागप्रमुख बनावे असे कित्येकांचे मत आहे. ते माझी गंमत करत होते की एक गोपनीय गोष्ट बोलून दाखवत होते हे माहीत नाही. परंतु आणखी तीन वर्षे विभागप्रमुख असण्याची कल्पनाही मी करू शकत नव्हतो. विभागप्रमुखाची जबाबदारी निभावताना त्याच्यातील अनेक गुणावगुणांचे सगळ्यांसमोर प्रदर्शन होत असते. तुमचे पितळ उघडे पडत असते म्हणा ना. ती कसोटी पुन्हा द्यायची माझी तयारी नव्हती. शिवाय या तीन वर्षांत प्रमुखपदाची बरीच काही किंमत मी मोजली होती, माझे स्वत:चे अध्ययन आणि संशोधन लांब राहिले होते. त्यामुळे मी फक्त स्मितहास्य करून प्राध्यापक सहस्रबुध्यांना अभिवादन केले व त्यांचा निरोप घेतला. आठवड्याच्या आतच प्राध्यापक विष्णुदत्त शर्मा यांना निदेशक सुखात्मे यांनी विभागप्रमुख होण्यासाठी पाचारण केले. मी त्यांचेच नाव सुचवले होते ही गोष्ट अलाहिदा. प्रमुखपदाचा किताब प्राध्यापक शर्मा यांना सुपुर्द करण्याच्या आधी मी सर्व महत्त्वाच्या धारिका (files) कालक्रमाने नीट लावून तयार ठेवल्या होत्या, जेणेकरून त्यांचा मार्ग सुकर व्हावा.

एका बिकट कालावधीतून बाहेर पडून जरा हायसे वाटतेय तोच मला प्राध्यापक सुखात्म्यांचा फोन आला. त्या काळी संस्थेचा निदेशक एका सल्लागार समितीचे (Advisory Committee) गठन करत असे. संस्थेतील प्राध्यापकांनी मागितलेली दीर्घ मुदतीची रजा, त्यांना परदेशी जाण्यासाठी लागणाऱ्या मोठ्या खर्चाची तरतूद अशा महत्त्वाच्या गोष्टींवर ही समिती सल्ला देत असे. सध्याचे अधिष्ठाता, प्राध्यापक (Dean, Faculty) हे स्थान तेव्हा अस्तित्वात नव्हते. त्याऐवजी ही समिती काम करत असे. या समितीचा मी आमंत्रक बनावे यासाठी तो फोन होता. निदेशकाच्या अशा स्वागतार्ह निमंत्रणाला कोणी नाही म्हणत नाही. हे काम मी पुढची सहा वर्षे करत राहिलो, प्राध्यापक अशोक मिश्रा 2000 साली संस्थेचे नवे निदेशक म्हणून स्थानापन्न झाल्यानंतरही तीन वर्षांपर्यंत.

आय. आय. टी.सारख्या शिक्षणसंस्थेच्या आंतरिक कारभाराची एक झलक मिळेल व इतिहासजमा झालेल्या काही गोष्टींना उजाळा मिळेल अशी आशा करून हा लांबलेला लेख संपवतो.
(समाप्त)
---

बालमोहन लिमये

(balmohan.limaye@gmail.com)

Balmohan Limaye 2020

लेखकाचा अल्प-परिचय : मुंबईच्या आय्. आय्. टी.मधील गणित विभागात ४२ वर्षे काम केल्यानंतर आता गुणश्री प्राध्यापक (Professor Emeritus). पवईलाच रहिवास.

बालमोहन लिमये यांचे इतर लिखाण

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

संपूर्ण लेखातील भावलेली गोष्ट म्हणजे "माझ्या डावीकडे प्राध्यापक रामचंद्र राव" ही फोटो-कॅप्शन. कमीत कमी शब्दांत, सहज वाक्यरचनेत, परिपूर्ण, unambiguous माहिती देण्यात गणिताचे प्राध्यापक शोभता खरे!