इंग्मार बर्गमन दिग्दर्शित ‘वाइल्ड स्ट्रॉबेरीज’

Sweden/1957/B&W/95 min/Dir: Ingmar Bergman

photo 1

1950 – 60च्या दशकात काही नवोदित चित्रपट दिग्दर्शकानी श्रेष्ठ चित्रपटांची निर्मिती केली. अशा चित्रपट दिग्दर्शकामध्ये स्वीडिश फिल्ममेकर, इंग्मार बर्गमनचे नाव सर्वात वरती असेल. त्याची दिग्दर्शन शैली अगदीच वेगळ्या प्रकारची, वैशिष्ट्यपूर्ण होती. चित्रपट बघत असतानाच्या पहिल्या चार पाच मिनिटातच हे चित्रपट इंग्मार बर्गमनचे (1918 –2007) आहे हे ताबडतोब लक्षात येत होते. त्या काळच्या पिढीला धार्मिकतेकडे झुकणाऱ्या तत्वज्ञानाला अशीही वेगळी बाजू असू शकते हे हळू हळू लक्षात येऊ लागले.

वास्तवाशी सुतराम संबंध नसलेले काल्पनिक जग, सांप्रदायिकतेला जखडून घेतलेल्या पुराण - मिथक कथा, स्वप्नंसुद्धा खोटी वाटावीत अशी फँटसी, आचरटपणाकडे झुकलेली कॉमेडी, ओढून ताणून आणलेली नाट्यमयता इत्यादींचा लवलेशही नसलेल्या, वास्तवाशी अगदी जवळिकी असलेल्या चित्रपटांची निर्मिती करून यशस्वी होणे अगदीच अशक्यातली गोष्ट होती. परंतु कॅबिनेट ऑफ डॉ. क्यालिगारीचे रॉबर्ट वीने, वाइल्ड स्ट्राबेरीचे इंग्मार बर्गमन आदी एक्सप्रेशनिस्ट्सनी (परिणामकारी) चित्रपटांची निर्मिती करून या माध्यमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर उदयास आलेले हे एक्सप्रेशनिस्ट्स दिग्दर्शक युद्धप्रकारांचे गौरवीकरण न करता युद्धामुळे होत असलेली सामाजिक घुसळण व मानवी मनाची होत असलेली कुचंबणा यावर लक्ष केंद्रित केलेल होते. पहिल्या युद्धाच्या सुमारास जर्मनीमध्ये उदयास आलेली ही एक्सप्रेशनिस्ट्स चळवळ कलेच्या सर्व प्रांतात पसरली व चित्रपटक्षेत्रात त्याला एक वेगळे स्थान मिळाले. वास्तवदर्शी चित्रपटापेक्षा हे चित्रपट वेगळे होते. प्रेक्षकांच्या मनाचे धाव घेणारे ते चित्रपट होते. चौदाव्या शतकातील धार्मिक प्रतीकांचा वापर करून मॉरल प्लेजचे सादरीकरण करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती केली गेली. मृत्युचे भय माणसांचा पिच्छा करत असते, त्यातून सुटका नाही, या आशयावर त्यांचा भर होता. अशाच चित्रपटप्रकारामध्ये 1957 साली बर्गमन यांचे ‘वाइल्ड स्ट्राबेरीज’ प्रदर्शित झाला.

थोडक्यात चित्रपटाची कथा अशी आहेः

प्रोफेसर इसाक बोर्गच्या 78व्या जन्मदिनी त्यांना लुंड येथील विश्वविद्यालयातर्फे ऑनररी डॉक्टरेट पदविप्रदान करून गौरविण्यात येणार होते. इसाक यांनी वैद्यकीय क्षेत्रासाठी केलेल्या त्यांच्या अभूतपूर्व योगदानासाठी हा समारंभ आयोजित केला जात होता. त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झालेली होती. स्टॉकहोम ते लुंडला पोचण्यासाठी विमानाचे तिकिटही त्यांनी काढले होते. त्याच्यासोबत गेली कित्येक वर्षे त्यांची सेवा करणारी आगडा त्यांना सोबत करणार होती. परंतु आदल्या रात्री इसाक बोर्गने विमानाने न जाता कारने जाण्याचे अचानक ठरविल्यामुळे आगडाशी थोडीशी वादावादी झाली. आगडाला एकटीच विमानाने जावे लागत आहे म्हणून ती नाराज झाली. दुसऱ्या दिवशी बोर्ग मात्र हट्टाला पेटल्यासारखे त्याची सून, मारियाबरोबर कार मधून निघतो. प्रवासाच्या वेळी आपल्या सुनेला त्यांच्याबद्दल आपुलकी नाही हे त्यांच्या लक्षात येते. तिचे नवऱ्याशी भांडण झालेले असते. तिला मूल हवे असते. परंतु तिचा नवरा, इव्हाल्डला मूल नको असते. या जगात अजून एका तोंडाची भर का घालावी म्हणून तो तिच्याशी भांडतो. इसाकसुद्धा इव्हाल्डइतकाच . स्वार्थी, हट्टी आहे असे इसाकला मारिया स्पष्ट शब्दात सुनावते.

काही वेळाने जगाची भटकंती करण्यासाठी निघालेले सारा, अंड्रे व व्हिक्टर हे तरुण त्याना लुंडपर्यंत सोडण्याची विनंती करतात. इसाक त्यांना कारमध्ये घेतात. त्यांच्याशी गप्पा मारताना या तरुण मंडळींचा, विशेषकरून साराचा, अल्लडपणा व मुक्त जगणे याचे त्यांना आश्चर्य वाटते. वाटेत त्यांच्या कारला अपघात होतो. दुसऱ्या कारमधील जोडपे त्यांची चूक झाली म्हणून क्षमा मागतात. या भांडकुदळ जोडप्याला आपल्या कारमधून इसाक घेऊन जातात. त्यांच्या भाडणाला कंटाळून मारिया त्यांना कारमधून अर्ध्या वाटेवर उतरवते. वाटेत ते सर्व इसाकच्या समर हाउसमध्ये काही वेळासाठी थांबतात. इसाकचे बालपण तेथे गेलेले होते. बालपणीच्या गोष्टी त्याला आठवतात. नंतर कारमधून जात असताना इसाक बोर्ग यांना लहानपणच्या कडू आठवणीचे स्वप्न पडते. गंमत म्हणजे नुकतेच भेटलेले भांडकुदळ जोडीतील नवरा, आल्मनच त्यांच्यावर आरोप करत शिक्षा देण्याचे प्रयत्न करत असतो. आपल्या इतक्या वर्षाच्या जीवनाबद्दलची स्पष्ट कल्पना इसाकला येऊ लागते. पुढे एका पेट्रोल पंपापाशी ते पेट्रोल भरून घेण्यासाठी थांबतात. अनिरीक्षितपणे पंपावर काम करणारा त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढतो. पत्नीशी ओळख करून देतो. पेट्रोलचे पैसेसुद्धा घेत नाही. इसाक भारावून जातो. तेथूनच जवळ असलेल्या आपल्या आईला भेटण्यासाठी सर्व जण घरापाशी उतरतात. आईचे वय नव्वदी पार केलेले असते. एकटीच ती तेथे राहत असते. तिला नऊ मुलं असतात. परंतु आता फक्त इसाकच जिवंत असतो इसाकलासुद्धा आपल्या एकटेपणाची तिटकारा वाटू लागते. संपूर्ण प्रवासातील अनुभव व त्यांना पडत असलेले स्वप्न यातून बोर्ग यांना आपले असली खरे रूप कळू लागते. . मारिया एखाद्या त्रयस्थासारखे वागते.

लुंड शहरी पोचल्यानंतर अत्यंत गंभीरपणे साजरा होत असलेल्या समारंभात (अगदी त्रयस्थपणे) भाग घेऊन इसाक आपल्या मुलाच्या घरी येतात. केरटेकर, आगडा आलेली असते. स्वतःच्या मुलात व इसाक यांच्यात भरपूर फरक आहे हे त्यांना कळते. त्यांना भेटलेले ते तरुण त्रिकूट एक पुष्पगुच्छ देत त्यांचे निरोप घेते. इसाकला आपले जीवन सार्थकी लागल्यासारखे वाटू लागते. समाधानाने बोर्ग झोपण्यासाठी निघून जातात. .... व चित्रपट येथे संपतो.
तसे पाहता वाइल्ड स्ट्रॉबेरीची चित्रपटकथा सलगपणे सांगता येत नाही. वास्तवात घडलेल्या घटना, पूर्वीच्या आठवणी, चांगले व वाईट स्वप्नदृश्ये, इसाकच्या मनात आलेल्या गोष्टी इत्यादींची सरमिसळ येथे झालेली आहे. म्हातारपणामुळे काही गोष्टी आठवतात, काही नाही अशी अवस्था येथे होत असते. त्या देशाने त्यांचा फार मोठ्या प्रमाणात गौरव केला आहे. जीवन सार्थकी लागल्याचे ते लक्षण असेल. परंतु सार्वजनिकरित्या एवढा सत्कार होत असताना आपल्या जवळच्यांना त्याच्याबद्दलची अतृप्ती इसाकच्या मनाला फार लागलेली आहे. रस्त्यावरचा एक अपरिचित त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढत असताना घरातलेच त्याचे दुस्वास करत आहेत, हे त्यांच्या स्वाभिमानाला धक्का पोचविणारी ठरत आहे. मृतवत् जगत असलेल्या म्हाताऱ्या आईचा भूतकाळ, तंटे-बखेड्यात अडकलेले मुलगा-सून यांचा वर्तमानकाळ आणि सारा-व्हिक्टर-अँड्रा यांच्यापुढील उज्वल भविष्यकाळ यांच्यामध्ये कुठे तरी इसाक बोर्गचे जीवन अडकलेले आहे. आपण फार शहाणे आहोत या त्यांच्या समजुतीलाच मोठा धक्का बसला असून अजूनही फार शिकायचे आहे, याची जाणीव नव्याने होत आहे. यशस्वी जीवनाचे मूल्यमापन कसे करायचे हा प्रश्न त्यांना सतावत आहे. भविष्याकडे झेप घेणाऱ्या वर्तमानाला भूतकाळाने वेढलेले आहे. त्यातून सुटका कशी करून घ्यायची, हेच कळेनासे झाले आहे. या चित्रपटाचा आस्वाद घेत असताना अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारावेसे वाटतात. यातच बर्गमनची प्रतिभा प्रेक्षकांच्या लक्षात येते.

बर्गमनने साठपेक्षा जास्त चित्रपट व टीव्हीसाठी डॉक्युमेंटरीजचे दिग्दर्शन केले. ते स्वतः पटकथा लेखन करत होते. दि सेव्हंथ सील, पर्सोना, क्राइज अँड व्हिस्पर्स, दि ऑटम्न सोनाटा, फॅन्नी अँड अलेक्झांडर हे त्याचे गाजलेले चित्रपट. त्याच्या चित्रपट निर्मितीचा ठराविक संच होता. त्यांचे बहुतेक चित्रपट स्विडनमध्येच चित्रित केले होते. 170पेक्षा जास्त नाटकांचे दिग्दर्शन त्यानी केले.

वयाच्या 89व्या वर्षी झोपेतच त्यांचे निधन झाले.

चित्रपट पाहण्यासाठी येथे क्लिक करावेः

https://www.youtube.com/watch?v=TxBY5kmUZR0&ab_channel=EldinJoseph

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अनेक वर्षांपूर्वी बघितला होता हा सिनेमा.

स्वतःबद्दल लोकांची काय मतं आहेत याची अजिबात काही जाणीव नसणारा हा हुशार प्राध्यापक बघितल्याची आठवण अजून आहे. त्यानंतर काही काळ मी रानटी स्ट्रॉबेऱ्या शोधल्या. गंमत म्हणजे कालच एका ठिकाणी त्या दिसल्या.

घराजवळच एका मॉलच्या भागात, रिकाम्या जागेत खूप पावसाळी लिल्या फुलल्या आहेत. त्या नेहमीच्या लिल्यांपेक्षा आकारानं जास्त मोठ्या आहेत; आणि लवकरच फुलल्या आहेत. म्हणून मला वाढीव कुतूहल. म्हणून मी मुद्दाम तिथे जाऊन बघितलं; तर गाडीपासून त्या लिल्यांपर्यंत जाताना रस्त्यात त्या स्ट्रॉबेऱ्या दिसल्या.
आज हवा चांगली आहे तर हळूच त्यांतल्या दोन स्ट्रॉबेऱ्या आणून पेरायच्या आणि दोन लिलीचे कंदही खणून आणायचे, असा माझा विचार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.