आमचे डिझेल इंजिन.

आमचे डिझेल इंजिन.
ते दिवस परीक्षेचे होते. परीक्षा खरी तर आई बाबांची होती. थोडी फार मुलांची पण. त्या अभ्यासाच्या रात्री होत्या. आणि अगदी नेमक्या त्याच वेळेला आमच्या कॉलनीत विजेचा लपंडाव सुरु झाला. म्हणजे वीज केव्हाही गायब व्हायची आणि केव्हाही परत यायची, कधी पाच मिनीटांनी. कधी एक तासाने, नंतर नंतर फुल दिवसभर! दिवसा गेले तरी काही प्रॉब्लेम नव्हता कारण मी ऑफिस मध्ये –काय म्हणतात त्याला हा “टकाटक”- एसी मध्ये बसलेला असे.
पण नंतर वीज जेव्हा प्राईम टाईम ला जायला लागली तेव्हा मी खडबडून जागा झालो.
इकडे टीवीवर वाद विवादाची आग पेटलेली. कुठल्यातरी पक्षाचा प्रतिनिधी रागाने बेभान अनावर झालेला, आता हातापायी होणार म्हणून मी उत्सुखतेने वाट बघतो आहे नेमके त्याच क्षणी वीज गायब. किंवा कोहलीने पट्टा फिरवलेला, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक झेल पकडण्यासाठी पळतो आहे. और बिजली गायब हो जाय. मी तणतणत किचन मध्ये गेलो.
“हे काय हे. रोज रोज लाईट जाताहेत. माणसाने करायचे तरी काय?”
बायको फिक करून हसली. मग काळजीने म्हणाली, “होना, संजूच्या अभ्यासाचे खोबरे होतंय.”
एकदा लाईट गेले तेव्हा घोरपडे काका लिफ्टमध्ये होते. आतून आरडाओरडा करून त्यांनी एकच हो हल्ला केला. आम्ही सगळ्यांनी माहीत असलेले सगळे उपाय केले. सरतेशेवटी बंबवाल्यांना बोलवावे लागले.
दुसऱ्या दिवशी मी कॉलनीच्या सबस्टेशनमध्ये गेलो. तिथे एक जण पेपर वाचत खुशाल पाय टेबलावर पसरून बसला होता.
तेव्हड्यात घंटा वाजायला लागली. समोरच्या पॅनलवर लाल हिरवे पिवळे दिवे उघडझाप करू लागले. आवाज काही थांबेना. मी थोडा घाबरलो.
“ट्रान्सफार्मर ऑन फायर, ट्रान्सफार्मर ऑन फायर, ट्रान्सफार्मर ऑन फायर...”
“अहो ते बघाना काय झाल आहे ते.” मी पॅनलकडे टकमक बघत सांगितले. त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले.
“अरे, कांबळे, जरा रिसेट कर रे बाबा.”
कांबळे अवतीर्ण झाला. “साहेब मी एकतर नाच करेन नाहीतर गाणे गाईन. चहा तरी करेन नाहीतर रिसेट करेन. बोला काय करू?”
“दोनी कर.”
तिकडे आग लागली आहे आणि हे दोघे “क्या करे ना करे...”अस चालले होते.
अखेर कांबळेने बटन दाबून आवाज बंद केला.
“साहेब, ह्याचे काय ते बघा एकदा. नाहीतर मी रिले मध्ये काडी घालून ठेवीन. म्हणजे आग लागली तरी अलार्म वाजणार नाही.” कांबळेने साहेबाला दम भरला.
“जा तू. तिकडे चहा उकळून चालला बघ,”
आता साहेबाचे माझ्याकडे लक्ष गेले.
“आपण काय काम काढून आलात इकडे?” साहेबाने विचारले, “बिल जास्त आले आहे का? आधी भरून टाका. मागाहून तक्रार करा. आमची चूक असेल तर पुढच्या बिलात वळते करून टाकू.”
कुठेही आग लागली नसल्याची खात्री झाल्यामुळे मला अवसान चढले होते.
“नाय. बिलाची कायपण तक्रार नाय. मी विचारायला आलो होतो कि तुमचा सप्लाय घडी घडी जातो काय नि येतो काय? आमच्या सोसायटीत एकाचा कॉम्प्युटर उडाला, एकाचा फ्रीज जळला. मुलांच्या अभ्यासाचं खोबर होतंय. ह्याला कोण जबाबदार? सांगा. उत्तर द्या.”
“पैले एक समजाऊन घ्या. सप्लाय माझा नाही. तो पॉवर स्टेशन कडून येतो तो आम्ही तुमच्या घरापर्यंत पोहोचवतो. मी पण इथेच क्वार्टरमध्ये रहातो. जाम वैताग आलाय बगा. माझा पण फॅन जळला. मी कुणाकडे तक्रार करायची? दर महिन्याला ट्युबा बदलतो. आपण नुसती बिलं भरायची. ह्या कंपनीवर कुणाचाही वचक नाही. तुम्हाला निदान दिवसाचे अठरा तास तरी सप्लाय मिळतो. तिकडे गावाकडे भल्या पहाटे तीन चार तास असतो. रात्री दोन ते पहाटे सहा पर्यंत.”
“मग आम्ही लोकांनी काय करायचं?”
“मी काय सांगू? मी तुम्हाला सांगणार की तुम्ही एसई कडे जा. तो पण माझ्या सारखाच हात झटकणार आणि तुम्हाला सीई कडे वळवणार. सीई तरी काय करणार? तो तुम्हाला डायरेक्टरकडे डायरेक्ट करणार. तिथून मिनिष्टर, मग एमईआरसी, नंतर सीईए. सीईए बोट दाखवणार सीइआरसीकडे. सीइआरसीपुढे तुम्हाला एक अॅफिडेवीट करावे लागेल. त्यात तुम्ही डिक्लेअर करायचे कि मी –म्हणजे तुम्ही- मी च्यू... आहे म्हणून मी...”
******
आमच्या सोसायटीच्या मीटिंग मध्ये मी हा किस्सा – शेवटचा भाग सोडून- वर्णन केला.
“मी तुम्हाला आधीच सांगितलं नव्ह्तं कि ह्यांचे “त्यांच्याशी” काही तरी साटं लोटं आहे म्हणून? आपण कितीही शेपूट हापटलं तरी काSSSही होणार नाही. मी तर बुवा उद्याच इनव्हर्टर घेऊन येणार.” सावंत उद्गारले.
मीटिंगमध्ये इमरजेन्सी डीझल इंजिन घेण्याबाबत चर्चा झाली. पण त्याचे बजेट ऐकून सगळ्यांची छाती दडपून गेली.
ज्यांना शक्य होतं त्यांनी इनव्हर्टर विकत आणले आणि आपल्यापरीने प्रश्न मिटवून टाकला.
असे दिवस चालले होते.
आमच्या कॉलनीच्या सोसायट्या जुन्या होत चालल्या होत्या. प्रत्येक इमारतीला जवळपास चाळीस वर्षे होऊन गेली होती. अशा घरांवर बिल्डरची नजर गेली नाही तर नवल. आमच्या सोसायटीवरही बिल्डर घिरट्या घालत होते. सेक्रेटरी बिचारा साधा माणूस. त्याच्याचेनी हे प्रेशर सहन होईना. त्याने सोसायटीची मीटिंग बोलावली.
“तो बिल्डर मला सळो की पळो करून राहिला आहे. सारखे कॉल वर कॉल करतो. आता तुम्हीच काय ते बघा.”
आजच्या कथेचा हा विषय नाहीये. त्यावर “आमच्या सोसायटीचे रिनोवेशन” अशी गोष्ट मी लिहिणार आहेच.
तेव्हा थोडक्यात म्हणजे आमची सोसायटी बिल्डरच्या हातोड्याखाली गेली.
ह्या सगळ्या रगाड्यात एक गोष्ट मेंबर लोकांना भावली ती म्हणजे इमर्जंसी डीझेल इंजिन. बिल्डर बरोबर बोलणी करताना मेम्बरांनी बाथरूममध्ये कुठल्या टाईल्स लावायच्या ह्यावर बिल्डरचे डोके खाल्लेच, पण त्याही पेक्षा डीझेल इंजिन कुठले घ्यायचे, त्याची एचपी किती, ते सप्लाय गेल्यावर किती सेकंदात चालू होणार ह्यावर बराच काथ्याकूट झाला.
बिल्डरने बरीच कागद इकडे तिकडे करून सांगितले, “हा हे पहा. इथे आहे. मॅन्युफॅक्चरच्या डेटाप्रमाणे कंपनीचा सप्लाय गेल्यावर हे इंजिन अकरा सेकंदाने फुल लोडवर येईल.”
“काय अठरा सेकंद!” सावंत (कॅशिअर, कसबा पेठ ब्रँच, फनजॉब बँक) खवळून उठले. “माझा इनवर्टर एक सेकंद पण घेत नाही.”
त्यांना समजाऊन सांगता सांगता बिल्डरच्या नाकी नऊ आले.
रिनोवेशन हा निराला विषय आहे. त्याची चर्चा इथे नको. त्याला टांग मारून पुढे जाउया.
बिल्डींगचे रिनोवेशन झाले. सगळ्यांचे फ्लॅट चकाचक झाले. तीस पस्तीस वर्षांपूर्वी एक लाखाला घेतलेल्या फ्लॅटची किंमत कोटीच्या घरात गेली. नव्या फ्लॅटला साजेलस फर्निचर भरलं गेलं. त्यासाठी लोकांनी राजीखुशीने पाच सहा लाख खर्च केले.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे डीझेल जनरेटर आला होता.
मधल्या रस्त्यावर सबस्टेशन मधला तो इंजिनिअर भेटला. कॉलर ताठ करून मी त्याला ही बातमी दिली.
“कुठल्या कंपनीचं?”
मी त्याला कंपनीचे नाव सांगितले. तो एव्हढेच म्हणाला, “अरेरे.” आणि मी काही विचारायच्या आत सुळकन सटकला.
काहीही असो. आमचे इंजिन उत्तम सर्विस देत होते. कंपनीचा वीज पुरवठा खंडित झाला रे झाला कि क्षणार्धात डिझल जनरेटर चालू! मेंबर लोक खूष. उन्हाळ्यात तर काय लोकांची चंगळच झाली. गुदस्ता उन्हाळ्याची आठवण येऊन लोकांना घाम फुटायचा. पण गेले ते दिवस! आणि त्या घामट आठवणी! त्या उन्हाळ्यात आम्ही सगळ्यांनी झक मारत इनव्हर्टर विकत घेतले. मधेच मार्केटमध्ये सबस्टेशनचा तो इंजिनिअर भेटला होता. त्याला मी उपरोधाने सांगितले, “सर, आता तुम्हाला वीज पुरवठा खंडित करायची गरज नाही. आम्ही सगळ्यांनी इनव्हर्टर विकत घेतले आहेत.” “छान” असा स्टॅंडर्ड प्रतिसाद देऊन तो निघून गेला अशा प्रकारे माझा उपरोधिक टोमणा वाया गेला.
तर ह्या उन्हाळ्यात आम्हा कोणालाही लोणावळा, खंडाळा, गेला बाजार सातारा सारख्या माफक थंड आणि परवडेबल हिल स्टेशनला जायची गरज वाटली नाही. क्रेडीट गोज टू अवर डीजी.
पण म्हणतात ना सुख के दिन गयो रे भैय्या...
आमच्या डीजीने त्रास द्यायला सुरवात केली.
आधी कंपनीचा वीज पुरवठा खंडित झाला कि डीजी क्षणार्धात लाईनवर येत असे. आता एखाद्या चुकार नोकराप्रमाणे थोडा उशिरा चालू व्हायला लागला. म्हणजे समजा कि पाच मिनिटानंतर सुरु व्हायला लागला. आम्ही विचार केला एवढे काय मनावर घ्यायचे. लोकल, बसेस तरी कधी वेळेवर चालतात का? मग आपण काय करतो? काही करत नाही, “चालायचंच” म्हणतो. आणि फारच उशीर होणार अस वाटलं तर रिक्षा, टक्सी असं काहीतरी पकडून चालायला लागतो.
पण प्रकरण इतकं साधं नव्हतं.
कारण “उशीर” पाच मिनिटावरून अर्ध्या तासावर, अर्ध्या तासावरून एक तासावर, एक तासावरुन... अशा चढत्या भांजणीसारखा वाढत चालला. म्हणजे समजा आता दुपारी वीज पुरावठा खंडित झाला अर्ध्या तासासाठी मग हे महाराज संध्याकाळी सुरु होणार आणि ऑटोमॅटीकली अर्ध्या तासांनी बंद होणार. अरे माझ्या ऑफिसमध्ये हा असता तर? लगेच लाल शाईने लेटमार्क पडला असता. तीन लेटमार्क नंतर एक लीव नसेल तर एक दिवसाचा पगार कापला गेला असता.
आता मात्र टू मच झालं. कंपनीच्या इंजिनीअरला बोलवायचे असा ठराव पास झाला. आणि हे झंझट माझ्या गळ्यात पडले. का? कारण मी डिप्लोमा इंजिनीअर होतो म्हणून.
मी कंपनीच्या सर्विसला फोन लावला. एक दाबा, मग दोन दाबा, आता शून्य दाबा... असे करत करत अखेर एका होमो सेपिअनच्या आवाजात बोलणाऱ्या यंत्राशी माझा संवाद झाला.
“तुमचे नाव?” मी नाव सांगितले. त्यानंतर क्रमाक्रमाने माझी जन्मतारीख, पॅन कार्ड, आधार कार्ड, इ-मेल, मोबाईल क्रमांक ह्याची माहिती विचारली गेली.
“तुमच्या वडिलांचे पूर्ण...”
“एक मिनिट, हे म्युनसिपालटीचे जन्म मृत्यू नोंदणी खाते आहे का?”
“नाही हे डिझल इंजिनचे कस्टमर सर्विस खाते आहे. तुम्हाला जन्म मृत्यू नोंदणी खात्याशी बोलायचे आहेका?”
“नाही नाही. मला तुमच्याशीच बोलायचे आहे. तुम्हाला माझ्या मुलाची वय वर्ष तीन माहिती लागेल ना. त्याचे नाव...”
“त्याची सध्या तरी गरज नाही. गरज लागली तर विचारेन.” तो थोडा वेळ थांबला. मला त्याच्या माउसची टिक टिक ऐकू येत होती, “तुमचा डीजी वॉरंटीच्या बाहेर गेला आहे. तर तुम्हाला रुपये एक हजार फक्त चार्ज पडेल.”
अशातऱ्हेने शेवटी त्यांच्या सर्विस इंजिनीअरची पाउले आमच्या सोसायटीला लागली,
आल्या आल्या त्याने सुरुवात केली. “काय प्रॉब्लेम काय आहे.”
मी त्याला “प्रॉब्लेम” समजाऊन सांगितला.
“आयला ह्या इंजिनाच्या मायला. ह्यो पण त्रास द्यायला लागला काय? सगळ्या इंजिनांनी आमच्या इंजिनिअर साहेबाच्या सवयी उचलल्या आहेत, एक काम वेळेवर करणार नाय. ह्याची माय आज उलथली तर हा उद्या चोवीस तासानंतर टाहो फोडणार. माझं प्रमोशन ह्यानं आज उद्या करून लटकाउन लावले आहे. अरेरे तुम्ही ह्या कंपनीचं इंजिन घ्यायला नको पाहिजेल होते. बिल्डरने दिलं ना. वाटलच. तुम्ही काय जंटलमन लोकं. ह्याची एचपी काय सांगितली?”
मी त्याला एचपी सांगीतली.
“वाटलच. इंपिरिअल का मेट्रिक? विचारलत कधी?”
अरे देवा!
“आमच्याकडे इंजिनाची ओरिजिनल सर्टीफिकेट्स आहेत.” मी.
“सर्टीफिकेट्सचे काय घेऊन बसलात. पैसे दिले कि सर्टीफिकेट्स हजार. आता समजा तुम्ही मला वडा पाव खायला घातला. वर पेशल चा पाजला. तर मी पण तुम्हाला सर्टीफिकेट देणार काय कि हा केशव कुलकर्णी नावाचा इसम झेंटलमन हाय. म्हणून काय तुम्ही झेंटलमन झाले? नाही ना.”
मी त्याला इंजिन दुरूस्त करायचे आहे ह्याची आठवण दिली.
“हा हा करणार करणार. दुरुस्त करणार.”
मग त्याने कुठल्या तरी दोन वायरी खसकन बाहेर काढल्या. आणि त्या दुसऱ्या ठिकाणी घुसवल्या. “प्रत्येक इंजिनाच्या वायरिंग मध्ये हाच घोळ! आता दोन तीन महिने चालेल ठीक ठाक. पुन्हा बसा बोंबलत. ये रे माझ्या मागल्या. डायबेटीस कसा अनुवांशिक असतो तसा ह्या मॉडेलची ही वंशपरंपरागात बीमारी आहे.”
हजार रुपयांची पावती फाडून तो चालता झाला.
इंजिन सहा महिने सुतासारखे सरळ चालले होते.
सहा महिन्यांनी इंजिनाचे नखरे चालू झाले. पूर्ण बेभरंवशाचे झाले. कभी हा कभी ना!
ह्यावेळी आलेला सर्विस इंजिनिअर जरा सोफीस्टीकेटेड वाटला. महत्वाचे म्हणजे वेडेवाकडे बोलत नव्हता. त्याने पॅनेल उघडला आणि वायरिंग चेक करू लागला.
“अरेरे. वायरिंगमध्ये कुणीतरी अनधिकृत माणसाने छेडछाड केलेली दिसतेय.”
मी त्याला सांगितले कि तुमचाच सर्विस इंजिनिअर सहा महिन्यापूर्वी आला होता.
“तो उंच किडमिडीत? बोलताना सारखा घसा साफ करणारा?”
त्याची ही घसा साफ करण्याची लकब तेव्हा लक्षात आली नव्हती. मी होकार भरला.
“त्या येड्याला कंपनी हाकलणार होती, त्या आधी त्याने स्वतः नोकरी सोडली.”
त्यानंतर त्याने मीटरची दोन टोकं कुठेतरी घुसवली.
“इथे तर बरोबर अर्थ मिळतेय. इथे व्होल्टेज थोड कमी आहे पण चालेल...”
चेकिंग करता करता तो माझ्याशी गप्पा मारत होता. ते कॉर्पोरेशनच्या निवडणुकांचे दिवस होते. तेव्हा आघाडीची सत्ता होती.
“साहेब, तुम्ही कुणाला मत देणार?”
मी त्याच्याकडे बघून अंदाज घ्यायचा प्रयत्न केला.
“मी दादा साहेबांच्या पार्टीला मत देणार.” खर सांगायचे झाले तर मी आयुष्यात कधीही मतदान केलेले नाही. कारण,
Your vote doesn’t count. If it had then they would not have allowed you to vote.
पण माझा होरा सपशेल चुकला.
“नाही नाही. दादासाहेब गेले आणि पार्टीची पूर्वीची रया गेली. तुम्ही ना साहेब, पीजेबीला मत द्या.” मग माझ्या जवळ सरकून खाजगी आवाजात तो बोलला, “आपल्या लोकांची पार्टी आहे. काय समजलात ना.”
त्याच्या त्या शेवटच्या वाक्याचे काढावे तितके अनेक अर्थ निघू शकतात.
“बर बुवा. आता तुम्ही म्हणताय तर...”
“आपले कॅन्डिडेट ओहोळ साहेब आहेत ना, नेहमी हसतमुख. लाख मोलाचा दिलदार माणूस. तुमच्या सेवेशी तत्पर. कॉर्पोरेशन मध्ये काहीही काम असो... तुम्ही त्यांचे ऑफिस बघितले आहे का?...”माझ्या डोळ्यासमोर मी झोपलो आहे आणि हा ओहोळ साहेब माझे पाय दाबतो आहे असे दृश्य तराळले.
मी भानावर आलो नि बोललो, “ओहोळ साहेब, आय मीन, इंजिनिअर साहेब आमचे इंजिन...”
“हे काय झालेच.”
त्याने पॅनलचा दरवाजा बंद केला. पावती लिहायला बसला. तोंडाची टकळी चालु होती.
“आमच्या कंपनीने ह्या इंजिनसाठी एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारा नियंत्रक बनवला आहे. खूप सुविधा आहेत बरका त्याच्यात. त्याचे इंजिनावर कायम लक्ष असते. डीझेल जास्त खातय का, जास्त हादरे बसताहेत का, एक्झास्ट गॅसच्या कॉम्पोझीशनवर लक्ष ठेवणार. काही गडबड झाली तर आमच्या कंट्रोलरूमला सावध करणार. सर्विस इंजिनिअरला त्याच्या बेडमध्ये जागे करून बोलवणार. सोसायटीच्या खात्यातून पैसे कंपनीच्या खात्यात वळवणार. आणि तुम्हाला मेल करून हे सर्व कळवणार. मग तुम्हाला समजणार. तुम्ही उद्गारणार आईला असा लफडा झाला होता काय!. अजूनही बरच काही आहे. वापरायला एकदम सोप्प. इंजिनाच्या समोर उभ राहायचं आणि म्हणायच, “तिळा तिळा चालू हो” अस...”
धाडकन इंजिन सुरु झाले.
सर्विस इंजिनिअर आश्चर्यचकित झाला. “आय, काय झाले? कंपनीचा सप्लाय फेल झाला जणू.”
मी दुसऱ्या सोसायट्याकडे पाहिले. सगळीकडे सप्लाय होता.
“थांबा. मला चेक करुद्या. “तिळा तिळा बंद हो”” इंजिन बंद झाले.
“तिळा तिळा चालू हो” इंजिन सुरु झाले.
“तिळा तिळा बंद हो” इंजिन बंद झाले.
“साहेब, अभिनंदन! तुमच्या इंजिनला कृत्रिम बुद्धिमत्ता प्राप्त झाली आहे. फुकटात.”
मला ह्यात नवल वाटले नाही. त्याच काय आहेना, तुम्ही जर पुण्यातल्या उंदराला हवेत उडी मारून चीझचा तुकडा पकडायला शिकवले तर न्यूयॉर्क मधल्या उंदराला न शिकवता ही कला अवगत होते. उंदरांची कॉस्मिक जाणीव नेणीव... ओके ओके. जास्त नाही बोलत.
इंजिनाची ही स्टोरी हळूहळू सोसायटीत सगळ्यांना माहित झाली. कशी? ते मला विचारू नका. बातम्या कशा फुटतात आणि प्रसारण पावतात ह्यावर एक शोध निबंध लिहिता येईल. प्रत्येक सोसायटीत एक “अफवा एक्स्चेंज” असते.. इथे बातम्यांची देवाण घेवाण होते. पुरुष ह्याला “महिला मंडळ” म्हणतात तर महिला त्याला “कट्टा” म्हणतात.
पण इथून म्याटर जरा सिरिअस झाले.
आमचे डिझल पार्किंगच्या एका बाजूला आहे. मी आपला असाच ऑफिसमधून घरी परत य्रून पार्किंगमध्ये पुणेरी गाडी(म्हणजे सायकल) पार्क करून चाललो होतो तेव्हढ्यात बाजून कोणीतरी आवाज दिला, “अहो केशवराव, शुक शुक. इकडे इकडे पहा.”
मी दचकलोच की! आजुबाजुला कोणीही नव्हते.
“मी मी इंजिन बोलतोय.”
“कोण इंजिन? कुठलं इंजिन?” मी बावचळलो होतो.
“सोसायटीत कचरा-समस्या झाली आहे ना? मी तुमचा प्रश्न सोडवतो.”
सध्या एआयच युग असल्यामुळे इंजिन बोलतय ह्याचा मला शॉक बसला नाही.
हो खरच समस्या होती.
त्याचे काय झाल होत कि शहराचा सगळा कचरा जिथे टाकला जातो त्या कचरा डेपो जवळच्या गावकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं होतं. बघता बघता कचरा राक्षस गावाच्या वेशीवर येऊन ठाकला होता. त्यांचेही काय चुकलं नव्हतं. आता हा त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न झाला होता. आंदोलन उग्र झालं तसं म्युनसीपालटीने आयडिया केली. त्यांनी फर्मान काढलं की प्रत्येक सोसायटीने आपला कचरा स्वतःहून कंपोस्ट करावा. म्युनसीपालटी आता कचरा उचलणार नाही. देशात “स्वच्छ शहर” म्हणून प्रसिद्ध झालेल्या आमच्या शहराची पार रया गेली. आमच्या सोसायटीत कचरा कंपोस्ट करायला खड्डा खणायचीपण जागा नव्हती. मग प्रत्येक मेंबरने आपला आपला कचरा स्वतःच कंपोस्ट करावा असाही एक बूट निघाला.
“तू काय करणार? आमचा कचरा आम्हीच उचलायचा.”
“तुमची ही फिलोसोफिकल बोलणी बंद करा नि मी काय सांगतोय ते ऐका. तुम्ही काय करायचे, तुम्ही एव्हढेच करायचे कि सोसायटीच्या कचरा भरलेला ड्रम रात्री ह्या इथं माझ्या समोर ठेवायचा, बस्स. पुढचं मी बघतो.”
“आणि तू तो कचरा खाणार? कचऱ्यापासून वीज निर्मिती. व्वा.” मी कुत्सितपणे बोललो.
“केशवराव, तुम्हाला ना कवडीची पण...कचरा भरलेला ड्रम माझ्यासमोर ठेवायला तुमचे काय जातंय ऑं? रात्री ड्रम ठेवायचा आणि इकडे कुणी फिरकायचं नाही.”
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सोसायटीची सभा झाली. मी इंजिनाचं म्हणणं लोकांपुढे ठेवले.
लोकांच्या प्रतिक्रिया बोलक्या होत्या.
“कुलकर्णी, काहीतरीच काय. इंजिन कधी बोलेल काय? तुम्हाला भ्रम झाला असेल. कचऱ्याच्या टेन्शन मुळे. इतकं मनावर नका घेऊ राव.”
फक्त काळभोरनी मला पाठिंबा दिला.
“पण मी म्हणतो की कुलकर्णी म्हणताहेत तर करायला काय हरकत आहे. वुई मस्ट साला ट्राय... इवनइफ इट इज वेडगळ. मला काय म्हणायचं आहे कि... समजला ना?”
“मिस्टर काळभोर, ह्यानेच समाजात अंधश्रद्धा बोकाळतेय. अहो उद्या कुलकर्णी म्हणाले कि टेरेसवरून उडी मारा. तुमचे अडलेले प्रमोशन होऊन जाईल. मारणार उडी? सांगा मला.”
“माझ्या प्रमोशनला का मध्ये खेचताय? तुमचं प्रमोशन कसं... मी साहेबाच्या मुलाला रोज शाळेत...” इत्यादी इत्यादी.
मी जर का मिटींगची एमओएम लिहून पब्लिश केली तर ते बेस्ट सेलर होईल.
अखेर माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आणि मी तिरीमिरीने उठलो, “मंडळी, मी निघतो. मात्र मी माझा पर्सनल कचरा आज रात्री इंजिन समोर ठेवणार आहे. तुमचं तुम्ही बघा.”
मी रात्री जेव्हा माझा कचरा इंजिन समोर ठेवायला गेलो तर काय सोसायटीचा कचऱ्याचा कॉमन ड्रम -फुल भरलेला- आधीच तिथ होता. घ्या.
सकाळी केव्हातरी सावंत (कॅशिअर, कसबा पेठ ब्रँच, फनजॉब बँक) मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले ते ओरडतच माझ्या फ्लॅटमध्ये शिरले.
“अहो सावंत (कॅशिअर, कसबा पेठ ब्रँच, फनजॉब बँक) काय झाले ते नीट सांगा.”
त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. माझा हात धरून त्यांनी मला इंजिन समोर नेले.
“खलास, सगळा कचरा खाल्ला. बापरे हे अघोरी आहे. आमच्या कोकणात...” ते (कॅशिअर, कसबा पेठ ब्रँच, फनजॉब बँक) मटकन खाली बसले.
मी बघितले तर काय ड्रम चाटून पुसून स्वच्छ केला गेला होता.
मी सावंतांना (तेच ते ) उठवले. त्यांना शांत करायचे म्हणून म्हटले, “अघोरी वगैरे काही नाही. ते कचऱ्यापासून वीज बनवणारे इंजिन आहे.”
माझा स्वतःचा त्यावर विश्वास नव्हता सावंतांचा (पुन्हा तेच ते )कसा बसणार?
मॉर्निंग वॉक रद्द करून सावंत() घरी परतले.
मी इंजिनाच्या समोर गेलो. “इंजिन, हा काय प्रकार आहे? तू काय कचरा खल्लास कि काय?”
“छ्या, मी डीझेल पिणारा आहे. मी कशाला कचरा खाऊ?” इंजिन गर्वाने म्हणाला.
“म कचरा गेला कुठे?”
“हे पहा तुम्हाला मी सांगेन ते समजणार नाही. तरीपण सांगण्याचा प्रयत्न करतो. ह्या विश्वात असंख्य जागा आहेत. समोर येईल त्याचा स्वाहा करणारे राक्षस असतात तिथे. मी हा कचरा तिकडे टेलीपोर्ट केला. तुमचा चुल्लूभर कचरा. त्याची काय बात? अहो, ह्या देशाचा काय आख्ख्या सूर्यमालेचा, कायपर बेल्ट, ऊर्ट क्लाउड सह सगळा कचरा पोटात रिचवणारे राक्षस आहेत. एनीवे व्हाट डू यू केअर? तुम्ही आपलं कचरा करायचं काम चालू ठेवा.”
मला शष्प देखील समजले नाही.

मला उगीचच “पाईड पायपर” ची आठवण झाली. शहरातला सगळा कचरा धावत धावत आमच्या इंजिनाच्या समोर येतोय आणि इंजिन त्याला त्या कचरा खाणाऱ्या राक्षसाकडे पाठवून देतो आहे असं दृश्य दिसायला लागले. पण त्या कथेचा उत्तरार्ध भीतीदायक होता. उद्या हेच इंजिन कशावरून माणसांना गट्टम करणार नाही. बापरे! हे खरोखर अमानवी होते. आपण एक प्रश्न सोडवायला जातो आणि त्यातून त्याहीपेक्षा कठीण असा दुसरा प्रश्न तयार करतो.
इंजिनला जणू माझे विचार समजले असावेत.
“कुलकर्णी, तुम्ही घाबरू नका. मोबदल्यात मी तुमच्याकडून सोन्याच्या नाण्यांनी भरलेली थैली मागत नाहीये. फक्त माझं एक काम करा. मला पाय नाहीत नाहीतर मीच गेलो असतो. आपल्या कॉलनीच्या तोंडाशी तो रोबोट उभा आहे न त्याला एक निरोप द्यायचा आहे. त्याला सांगायचं कि “क्लाटू बराडा निक्टो.” लिहून घ्या पाहिजे तर.”
““क्लाटू बराडा निक्टो.” एवडच सांगायचे होत ना, लिहून घ्यायची काही गरज नाही. माझ्या लक्षात राहील. “क्लाटू बराडा निक्टो.”” मी इंजिनला खात्री दिली, “पण मला एक सांग, ह्याचा अर्थ काय होतो?”
“ह्याचा अर्थ संदर्भावर अवलंबून असतो. कधी, “आय लव यू!” कधी “सो लॉंग अँड थँक्यू फॉर आल दि फिश.” तर कधी “मी मृत्युच्या छायेत आहे. मला जिवंत कर. बदला घेऊ नकोस.” “आय होप द फोर्स विल बी विथ यू अँड दॅट यू लिव लॉंग अँड प्रॉस्पर.” पण तुम्ही काळजी करू नका. रोबोटला समजेल बरोबर.”
(मित्रानो त्या मूर्ख कुलकर्ण्याने काय घोळ घातला. रोबोट जागा झाला का? पुढे काय झालं? हे पुढच्या भागात वाचा,)
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

एवढंच सांगेन: क्लाटू बराडा निक्टो.... म्हणजे कथा आवडली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

“क्लाटू बराडा निक्टो.”
ज्या कोणाला हा काय प्रकार आहे अशी उत्सुकता असेल त्यांनी ही लिंक पहावी.
https://en.wikipedia.org/wiki/Klaatu_barada_nikto
तसेच The Day the Earth Stood Still (१९५१)हा पिक्चर mx player वर बघू शकता. आणि for
remake, see The Day the Earth Stood Still (2008 film)
मूळ कथा Harry Bates's 1940 short story "Farewell to the Master."
mx player ची लिंक
https://www.mxplayer.in/movie/watch-the-day-the-earth-stood-still-movie-...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटले, जीएंचा काही चावटपणा असेल, म्हणून.

असो चालायचेच.

(‘क्लाटू बराडा निक्टो’ला ‘इस्किलार’ हे प्रत्युत्तर कसे वाटते?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इस्किलार?
क्लाटू बराडा निक्टो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0